वेदकालीन संस्कृती भाग ५

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि सतेमं सचता परुष्ण्या |
असिक्न्या मरुद्व्र्धे वितस्तयार्जीकीये शर्णुह्यासुषोमया ||
तर्ष्टामया परथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया |
तवं सिन्धो कुभया गोमतीं करुमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे || (ऋग्वेद १०|७५)

हे गंगे, यमुने, सरस्वती, शुतुद्रि (सतलज), परुष्णी (रावी), हे मरुद्व्र्धे हे अष्किनी (चिनाब), हे वितस्ता (झेलम) सुषोम (सोहन), कृपया लक्ष देउन ऐका, हे सिन्धु तू वाहताना प्रथम तर्ष्टामयेला मिळतेस, नंतर सुसरतू, रसा, श्वेता त्यानंतर, कुभ (काबूल), गोमती (गोमल) , नंतर मेहन्तू सोबत करमु, आणि ह्या सर्वांना आपल्यासमवेत घेऊन वाहतेस. नदिसुक्तातील पहिल्या ऋचेत एकूण सप्त सप्त त्रेधा म्हणजे (२१) नद्या आहेत, त्यातील १९ वरच्या ऋचेत आहेत. उरल्या दोन. ह्यातील एक बियास इथे नाही, दुसरी कोणती आहे त्याचा शोध घेणे चालू आहे.

वेदांमध्ये सरस्वतीचे वर्णन ५० पेक्षा अधिक ऋचांमध्ये आहे. ह्या सरस्वतीमुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. सर्व वादांची जनक असणारी सरस्वती ही अवेस्तामधील हरहवती (आजची हेलमण्ड) आहे हे सर्व विद्वानांचे (पाश्चिमात्य व भारतीय) मत होते व त्याला अनुसरून त्यांनी अनेक मते मांडली. थोडे मागे जाउन मी वेदांमधील सरस्वतीचे वर्णन व त्याला धरुन भूगोल मांडायचा प्रयत्न करणार आहे. कारण वेदांमधील सरस्वती ही वेदांच्या आधाराशिवाय मांडली तर उत्तर मिळणार नाही असे वाटते.

वेदात सरस्वती ही तीन प्रकारे आली आहे, नदी म्हणून, मुख्य देवी म्हणून व उपदेवी म्हणून. पैकी नदी असणारे श्लोकच मी येथे देतो आहे, कारण वैदिक भूगोल जाणण्यासाठी ते आवश्यक ठरतात. वरील श्लोकाचे महत्त्व नद्यांच्या प्रवाहावरुन त्यांचा आजचा भूगोल मांडण्यास उपयोग व्हावा ह्यात कोणाचेही दुमत नसावे. आजही हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, कारण हिंदू संस्कृती नुसार प्रयाग संगमामध्ये ह्या तीन नद्या आहेत व त्यातील सरस्वती ही लुप्त आहे.

आता आणखी एक दोन ऋचा पाहू.

पर कषोदसा धायसा सस्र एषा सरस्वती धरुणमायसी पूः |
परबाबधाना रथ्येव याति विश्वा अपो महिना सिन्धुरन्याः ||
एकाचेतत सरस्वती नदीनां शुचिर्यती गिरिभ्य आ समुद्रात |
रायश्चेतन्ती भुवनस्य भूरेर्घ्र्तं पयो दुदुहे नाहुषाय ||

ह्या श्लोकात सरस्वती ही गिरी पर्वत फोडून वाहते व सरतेशेवटी ती समुद्राला मिळते असे म्हणलेले आहे. तिच्या प्रवाहाने राजा नहुषाचे जीवन दुधा तुपाने समृद्ध झाले आहे. सरस्वतीचे वर्णन नेहमीच एक रौद्र अन विशाल नदी म्हणूनच वेदांमध्ये आहे. आपल्या प्रवाहाने, मोठे मोठे गिरीशिखरे, पर्वत, फोडून, अनेक वृक्षांमधून ती वाहते.
उदाहरणार्थ
यस्या अनन्तो अह्रुतस्त्वेषश्चरिष्णुरर्णवः |
अमश्चरति रोरुवत ||
सा नो विश्वा अति दविषः सवसॄरन्या रतावरी |
अतन्नहेव सूर्यः ||
(ऋग्वेद ६ | ६१ | ८, ९,)

इथे लक्षात घ्यायच्या गोष्टी तीन. १. सरस्वती गिरिपर्वांतून निघते व समुद्राला मिळते, २. राजा नहुष - हा राजा पुरुरव्याचा नातू होता. नहुष हा सम्राट होता. पुरूरव्याबद्दल मागच्या लेखात मी मांडले आहे. वैवस्वत मनु नंतरचा त्याचा कालावधी आहे. ( मॅक्स मुलर किंवा इतर विद्वान जसे मांडतात तो इ स पूर्व १२०० ते १५०० नाही!) ३. सरस्वती ही रौद्र, विशाल नदी होती व वैदिक जनतेला प्रिय अशी ( उत नः परिया) नदी म्हणजे सरस्वती.

उत नः परिया परियासु सप्तस्वसा सुजुष्टा |
सरस्वती सतोम्या भूत || (ऋग्वेद ६ | ६१ | १०)

सरस्वतीमध्ये सामवणार्‍या सात नद्यातील (सप्तस्वसा) दोन नद्या ह्या ऋग्वेदातील आणखी एका श्लोका मध्ये आहेत.
नि तवा दधे वर आ पर्थिव्या इळायास पदे सुदिनत्वे अह्नाम |
दर्षद्वत्यां मानुष आपयायां सरस्वत्यां रेवदग्नेदिदीहि || (ऋग्वेद ३ | २३ | ४)

त्या म्हणजे दर्षद्वत्यां आणि आपया. दर्षद्वत्यां ही आजची चौतंग, आणि आपयाला ओळखण्यासाठी महाभारतातील एका श्लोकाचा आधार घेतला तर ती कुरुक्षेत्रामधील एक नदी आहे असा निष्कर्ष निघतो.
१७८८ मध्ये सर विल्यम जोन्स ह्यांनी एशियाटिक सोसायटी स्थापन करुन वेदांचे भाषांतर केले, त्यांनी असे अनुमान काढले की, संस्कृत, ग्रीक व लॅटिन ह्या एकसारख्या भाषा आहेत. हे अनुमान काढताना त्यांना संस्कृतमध्ये सरस्वती तीन स्वरुपात व पुढे विद्येची देवी म्हणून येते ह्याचा अंदाज आला नाही हे सांगावे लागेल, कारण संस्कृतचे भांषातर करताना इंग्रची विद्वान चुकतच आले आहेत. ह्या अनुमाना नंतर अगदी १९८०-८५ पर्यंत वेद कुठले, आर्य कोण, ओरिजनल होम ऑफ आर्याज, इन्वेजन थेअरी असे लिहण्याची जणू अहमहमिकाच लागली व अनेक पंडितांनी अनेक थेअरी मांडल्या. पण त्या मांडताना वेदातील सरस्वतीला भारतीय भूगोलाप्रमाणे एकदा उलगडून बघावे असे मात्र त्यांना वाटले नाही. शिवाय भारताला इ स पूर्व ३२६ (म्हणजे अलक्षेंद्राचा कालावधी) सालापूर्वी इतिहास नाही असेही थोर मत बर्‍याच इंग्रजी विद्वानांनी मांडले. पण सुदैवाने पुढे १९२१ मध्ये हडप्पाचा व नंतर मोहंजदाडोचा शोध लागला व ही चुकीची मत खोडली जायला सुरुवात झाली. आजही काही विद्वान हेलमंड ( अवेस्ता मधिल हरहवती नदी) म्हणजेच सरस्वती असे मानून बसले आहेत.

आता आपण थोडे आर्य म्हणजे इराणी ह्या दावा कसोटीवर उतरतो का ते पाहूयात. झोराष्टियन धर्माचा निर्माता झोरोस्टर आहे त्याचे वैदिक नाव झरतुष्ट्र आहे. तो इराण मध्ये होता. त्यानेच अवेस्ता लिहली असे झोराष्ट्रीय म्हणतात. त्यांचा अवेस्ता ह्या धर्मग्रंथामधील काही गोष्टींचा आपण अभ्यास केला तर हे कोडे सोडवण्यासाठी मदत होईल. गणितासाठी हडप्पा कालाला बेस धरुयात व प्रि, प्रोटो हडप्पन व पोस्ट हडप्पनकडे वळूयात.

१. अवेस्ता मधिल हरहवती -हेलमंड थेअरी : हरहवती म्हणजेच हेलमंड असा निष्कर्ष काढणे चुकीचे कसे ठरते ते बघुयात .

अ. एकाचेतत सरस्वती नदीनां शुचिर्यती गिरिभ्य आ समुद्रात | ह्या श्लोकाप्रमाणे सरस्वती समुद्रात विलीन होते. आजची हेलमंड व जुनी हरहवती समुद्रात विलीन होत नाही, इथे चित्र टाकण्यापेक्षा इच्छुकांनी नेट वरुन शोध घ्यावा. हिचे पाणी शेवटपर्यंत गोडच राहते, ती एका सरोवरात विलीन होते. मात्र सरस्वती जिथे विलीन होते त्या कच्छचा रणात मात्र मिठाचे साठे आहेत,तिथे समुद्र होता, हरहवती समुद्राला मिळत नसल्यामुळे हा दावा खोटा ठरतो. शिवाय वर उल्लेख केलेल्या दोन नद्या (दर्षद्वत्यां आणि आपया) ह्या आजच्या हरयाणामध्ये आहेत. उत्खननात त्या नदिकिनारी प्रि व मॅच्युअर हडप्पन संस्कृती सापडली आहे. हेलमंड नदी ऋग्वेदातील ह्या मुख्य दोन ऋचांची अट पूर्ण करु शकत नाही, त्यामुळे हा दावा खोटा ठरतो.

ब. आता थोड आर्कियालॉजीकडे वळूया. हेलमंड पात्रात उत्खनन झाले. जे अतिशय महत्वाचे आहे. कारण आर्य लोकं जर इराण मधून आले असतील तर इराणमध्येही तशी नगरं, पाणी वापरण्याची पद्धत, ते ही नसेल तर निदान पॉटरी इ इ हडप्पाशी मिळते जुळते वा रेडिओकार्बन डेटिंगनुसार आणखी मागच्या कालावधीचे असायला हवे. तसे नाही. श्री आर एस शर्मा व श्री एस पी गुप्ता हे हरहवती म्हणजेच सरस्वती अशा मताचे होते, त्यांनी हेलमंड पात्राच्या आजूबाजूच्या शहरांच्या उत्खननाला अभ्यासले, अगदी सरस्वती भारतात आहे ह्याचा विरोध करणारे ते, त्यांनी असे लिहले आहे. " But the archaeology of the Helmand vally in the second millennium BC needs a adequate attention. Its two large cities Shahr-I-Sokkta and Mundigak show decay in this period. In place of wheel-turned pottery Mundigak V showsa hand turned pottery. The users of this pottery (wheel turned) may have come from outside, but we need more information about that. म्हणजे हेलमंड हीच हरहवती म्हणून
पुरस्कार करणार्‍यांना अजूनही हडप्पा, लोथल, कुणाल सारखे पुरावे सापडले नाहीत, इतकेच नाही तर तशी पॉटरी तिथली नाही हे ही मत आले आहे. मग ही पॉटरी कुठली असावी? हडप्पन, लोथल, भिरन्ना, कुनाल मध्ये तर पूर्णाकृती पुतळे, ब्रॉन्झ धातूच्या मूर्ती, अनेक सील सापडली आहेत. मग ह्याला मिळतेजुळते काही तरी तिकडे सापडायला हवे? तसे इतक्या मागे जाणारे काहीही तिथे सापडत नाही.

क. ग्रिफिथ ह्यांनी जे भाषांतर केले त्याला प्रमाण धरुन श्री इरफाण हबिब व श्री फैझ हबिब असे मांडतात की एकूण तीन सरस्वती आहेत. एक अफगाण्/इराण मधील हेलमंड, दुसरी सिंधू व तिसरी आज भारतीय ज्या सरस्वतीला सरस्वती म्हणतात ती. गंमत म्हणजे भाषांतर करताना ग्रिफिथ ह्यांनी आजची छोटी नदीच सरस्वती गृहित धरुन भाषांतर केले व हबिब त्याला प्रमाण मानतात.
पण परत ऋचा वाचा . ..
इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि सतेमं सचता परुष्ण्या |
असिक्न्या मरुद्व्र्धे वितस्तयार्जीकीये शर्णुह्यासुषोमया ||
तर्ष्टामया परथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया |
तवं सिन्धो कुभया गोमतीं करुमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे
ह्या मध्ये सरस्वती व सिंधू ह्या दोन वेगळ्या नद्या आहेत, एक नाहीत हे बहुदा त्यांना कळले नसावे.हेलमंड थेअरी किती 'फूलप्रुफ' आहे ते वाचकांचा लक्षात आले असेल. वर पुरावे आहेतच, पण आपण आता खुद्द सरस्वतीकडे वळू, जो पुरावा आणखी महत्वाचा ठरावा.

१. इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि प्रमाणे ती यमुना व सतलज च्या मध्ये वाहायला पाहीजे. आज आपण जी लुप्त सरस्वती मानतो ती अगदी ह्या दोन नद्यांच्या मध्ये आहे. सरस्वतीचा उगम शिवालिक पर्वतरांगामध्ये झाला व हरयाणात ती दक्षिणवाहिनी होऊन पिपली, कुरुक्षेत्र व पिहोवा ह्या गावातून जाउन घग्गरला मिळते व सिरसा इथे प्रवाह खंडित होतो. हा आजचा भूगोल आहे.
२. आजच्या सुरतगडपाशी ह्या नदीला वेदात वर्णन केलेल्या दोन नद्यांपैकी दर्षद्वत् (चौंतग) येऊन मिळते.
३. घग्गर बेसिनचे सॅटेलाईटद्वारे चित्र पाहिले तर तिचे पात्र ६ ते ८ किलोमिटर लांबिचे भरते. सरस्वतीचा प्रवाह कसा होता ह्या वर्णनाशी मिळते.
४ आजची सरस्वती पालिओ चॅनल मधून जाते पुढे तिला मरकंद नदी शत्रनाचॅनल मध्ये मिळते. सतलज व यमुनेच्या मध्ये ही सरस्वती येते व ह्या नद्या पण मध्येच येउन मिळतात.
५. रन ऑफ कच्छ हा पूर्वी समुद्र होता. एकूण १०,००० स्वे माईल्स मध्ये हा समुद्र पसरला आहे. येथील पाणी खारे होते. हेलमंडचे पाणी शेवटपर्यंत गोड राहते, ती समुद्रात विसर्जित होत नाही. मोठ्या तलावसदृष्य जागेत होते. इतके मोठे पात्र अन तेवढे पाणी कसे येऊ शकते? कारण शिवालिक पर्वतापाशी उगम झाला तर इतके पाणी नदिला मिळने अवघड आहे, पण ह्याचे उत्तर आपल्याला श्री व्हि एम के पुरी आणि बी सी वर्मा ( १९९८) ह्यांचा अलिकडचा शोधनिबंध देते. हे दोघेही glaciologist आहेत. त्यामुळे त्यांनी सादर केलेला पेपर हा अतिशय
वैज्ञानिक आहे. " a detailed survey of the mountainous region lying between the Yamuna and the Markanda rivers has revealed four terraces which have been labelled as T1, T2, T3, T0, from the top downwards, emnants of the terrace, T0 identified about 2 Km southward of Sudanwala, rise to a height of 660 M above the mean sea level. The most noteworthy
point about this terrace is that it contains, besides other material,pebbles of quartzite and metamorphic rocks. Similer high terraces and with almost identical lithological composition have also been identified in the area.

ह्यातून सरळ निष्कर्ष निघतो की घग्गर बेसिन व यमुना बेसिन मध्ये कुठून पाण्याचा पुरवठा होत होता. ह्या टेरेसेसच्या वर हिमालय आहे, हिमनगातून वा सरस्वस्तीला ज्या नद्या मिळतात (वेदातील ऋचेतल्या माहितीतून ) ह्या नदीचे पात्र ७-८ किमी असावे व सरस्वती / धग्गरचे ते आजही आहे ह्या वैज्ञानिक निष्कर्षातून सरस्वती कुठली व कुठे हे सिद्ध व्हावे.

चित्र : सरस्वती ड्रेनेज पॅटर्न

Water Pattern_Saraswati.jpgSarasvati_basin.jpg

ह्या नकाशाप्रमाणे सरस्वती आणि तिच्या उपनद्या ह्या हरयाणा, पंजाब, राजस्थान ह्या भागातून वाहत होत्या.

चित्र ३.

Saraswati Sites.GIF

वरील चित्रात ह्या नद्याकाठी असलेल्या काही साईटस, जिथे उत्खनन झाले वा चालू आहे, ते दिसेल. त्या सर्व काळ्या ठिपक्यांमध्ये ह्या चित्रात दिसतील.

मग असे सर्व असताना सरस्वती अचानक लुप्त का व्हावी? केंव्हा हे सर्व झालं असावं? ह्या प्रश्नातील 'केंव्हा'चे उत्तर थोडेफार मिळाले आहे. कच्छ रणात जायच्या आधी ती मोठी असताना तिच्या किनार्‍यावर एक शहर होते, त्याचे नाव कालिबंगन! रेडिओकार्बन डेटिंग पद्धतीनुसार कालिबंगन येथील वसाहत इ स पूर्व १९०० च्या आसपास किंवा आधी तिथून स्थलांतरीत व्हायला सुरुवात झाली. लोथल येथे ह्या नदीवर मोठे बंदर सापडले आहे, हडप्पापेक्षा जास्त मोठे हे शहर आहे. एक मुख्य उल्लेख इथे द्यावा वाटतो तो म्हणजे पंचवीस ब्राह्मण ह्या ग्रंथात सरस्वती लुप्त होतानाचे संकेत मिळतात, एका श्लोका प्रमाणे ४० दिवसांच्या यात्रे नंतर प्लक्ष प्रसर्वणा ह्या ठिकाणी गेल्यावर सरस्वती रागात येऊन निघून गेली. म्हणजेच लुप्त झाली, वा पात्र कोरडे पडत गेले. ह्या चाळीस दिवसांची यात्रा कुठून सुरु होते ह्याचा मात्र उल्लेख नाही.
असे का घडले असावे? हिमनगातून मिळणारे पाणी अचानक का थांबले? ह्याचा शोध घेतला असतात साईस्मिक व टॅक्टोनिक मुव्हमेंटस मुळे हिमालयात भुकंप झाला व त्याचा परिणामामुळे मर्कंद डिव्हाईड निर्माण झाला जो उंचीने ३० मिटर आहे. ह्यामुळे हिमायलातून येणार्‍या सरस्वतीला दक्षिणवाहिनी होऊन आदि बद्री कडे जाता आले नाही, तर उलट पूर्वे कडे वळावे लागले. चित्रात आपण पाहिले तर पूर्वेकडे वळले तर यमुनेच पात्र मिळते, तिथून तीचे पाणी यमुनेत जायला सुरुवात झाली. आदि बद्री पासून यमुनेला मिळते हेच आजचे सत्य होय. आणखी एक सरस्वतीचा पुरावा श्री यश पाल (१९८४) ह्यांचा लॅन्डसेट इमेजरी टेक्नीक वापरुन केलेल्या शोधनिबंधाचा.
१. " The ancient bed of the Ghaggar hasa constant width of about 6 to 8 km from shatrana in Punjab to Marod in Pakistan. The bed stands out very clearly having a dark ton ein the black and while imagery and reddish one in flase colour composites"
२. "There is a clear paleeo-channel southeast of the river Markanda which joins the ancient bed of the Ghaggar near Shatrana Channel (Y1). The present Saraswati mostly flows through this channel. ( आजही सरस्वती आहे, पण ती पुढे लुप्त होते, ती पात्र अरुंद आहे)
३. " Another channel, Y2 which corresponds to the present Chautang, seems to join the Ghaggar near Sutargardh." "Our studies thus show that the Satluj was the main tributary of the Ghaggar and that subsequently the tectonic movements may have forced the satluj westward and the Ghaggar dried"

अनेक इंग्रजी विद्वान व भारतातील साम्यवादी चष्म्याने पाहणार्‍या इतिहासकारांच्या थेअरीप्रमाणे वेदकाल १२०० ते १५०० च्या मागे नाही? पण रेडिओकार्बन डेटींग आणि ग्लेशिओलॉजिस्ट हे सिद्ध करते की २००० च्या आधी
प्रवाह बदलला व कालिबंगन सारखी ठिकाणं ओस पडली. आता प्रश्न असा आहे की सरस्वती जर इ स पूर्व २००० ला लुप्त झाली, तर ही संस्कृती सुरु कधी झाली? तसेच वेद काल हा सरस्वतीशी निगडीत असल्यामुळे वेद पण जुनेच आहेत हे ही लक्षात येते. किती जुनी ह्याचा शोध घेणे सुरु आहे. सरस्वतीचा शेवट राजस्थान नंतर आजच्या पाकिस्तानातील चोलिस्तान इथे होतो. पाक मध्ये १९९२, १९९७ च्या उत्खननात (ज्याचे प्रमुख श्री मुघल होते) हाक्रा (म्हणजेच सरस्वती बेसिन) मध्ये ९९ साईट सापडल्या आहेत. त्यांचा कार्बन
डेटिंग कालावधी इ स पूर्व ३७००- ४००० च्या आसपास भरतो. ह्या साईटस लोथल एवढ्या प्रगत नाहीत, ब्रॉन्झ एज इथे सुरु झाले नव्हते, त्यापैकी जलवाली ही २२.५ हेक्टर तर गमणवाला ही साईट २७.३ हेक्टरची आहे.
भारतीय पुरातत्व खात्याच्या अख्यत्यारीत असलेल्या ह्या काही वस्तूंची कार्बन डेटिंग काय सांगते ते बघा.

सॅम्पल नं BS 2314 कॅलिब्रेटेड एज: १ सिग्मा ४७७० (४५३६,४५०६,४५०४) ४३५३ BCE
सॅम्पल नं BS 2318 कॅलिब्रेटेड एज: १ सिग्मा ५३३६ (५०४१) ४७२१ BCE
सॅम्पल नं BS २३३३ कॅलिब्रेटेड एज: १ सिग्मा ६६४७ (६४३९) ६२२१ BCE

भिरन्ना, हरियाणा इथे हे सॅम्पल सापडले आहेत. हे संशोधन इ स २००५ म्हणजे केवळ ५ वर्षांपूर्वीचे आहे. व एल एस राव हे संशोधन करत आहेत. वादासाठी शेवटचे सॅम्पल सोडले (म्हणजे प्रि म्हणून) तरी ४७०० च्या आसपाच्या वस्तू सापडल्या आहेत !! आणि सरस्वती जर २००० बिसी मध्ये लुप्त झाली तर साहजिकच
तिच्या कितीतरी वर्षे आधी तिथे संस्कृती होती. धरण बांघने, बंदर बांधणे, (खालची लिंक बघा), नगर उभे करणे ह्या सर्वांना गणित आवश्यक आहे. नसेल तर त्या गोष्टी केंव्हाच पडल्या असत्या. हे गणित इथे निर्माण झाले आहे. इराणच्या हेलमंड मध्ये अश्या गोष्टी अजून सापडल्या नाहीत! कालिबंगन, राखिगरकी, भिरन्ना, बानेवाली, कुनाल, लोथल ही सर्व ठिकाणं सिंधू नाही सरस्वतीचा, जी भारतातून वाहते तिचा भाग आहेत, त्यामुळे संशोधकांनी सिंधू संस्कृती न म्हणता सरस्वती-सिंधू म्हणावे असा आग्रह आहे. कारण सरस्वती
बेसिन मध्ये सिंधूसंस्कृती पेक्षा जुन्या वस्तू सापडत आहेत.आणखी दोन महत्वाचे पुरावे ह्या संदर्भात देऊ इच्छितो

.श्री B E Hemphil ह्यांच्या ह्युमन बायलॉजी अभ्यासाचा संदर्भ देऊ इच्छितो सिंधू-सरस्वती मध्ये सापडलेल्या सर्व मृतदेहांच्या ह्युमन बायलॉजी चा अभ्यास त्यांनी व त्यांचा टीम ने केला. १९९१ मध्ये हा अभ्यास संपला त्याचा थोडक्यात आशय, " As for the question of biological continuity within the Indus Valley, two discontinuities appear to exist. The first occurs between 6000 and 4500 BC, the second after 800 BC but before 200 BC. " ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की इस पूर्व ४५०० ते इ स पूर्व ८०० ह्या कालावधी
मध्ये कुठलेही इमिग्रेशन झाले नाही. मग वेदांचा कालावधी, मायग्रेशन झाले म्हणने वैज्ञानिक दृष्ट्या कितपत उचित ठरते?
दुसरा अभ्यास DNA चा आहे. संघमित्रा साहू ह्यांनी २००६ मध्ये हा पेपर सादर केला. त्या म्हणतात " The sharing of some Y-chromosomal haplogroups between Indian and central Asian population is most parsimoniously explained by a deep common ancestry between the two regions, with the diffusion of some Indian specific lineages northword. The Y-chromosomasal data consistantly suggest a largely South Asian origin for Indian cast communities and threfore argue against any major influx, from regions north and west of India, of people associated either with the development of agriculture or the spread of the Indo-Aryan language family"
ह्या DNA व ह्युमन बायलॉजी अभ्यासानंतर पण "नाही, आर्यन इन्वेजन होतेच" असे म्हणायचे असेल म्हणा बापडे, जागे कसे करणार?

सरस्वती इ स पूर्व १९०० मध्ये लुप्त झाली हे वरच्या रेडिओकार्बन पुराव्यांवरुन सिद्ध झाले आहेच, म्हणजे सर्व वेद त्याआधी तयार झाले हे ओघाने आलेच. ऐतरेय ब्राह्मणात व्हर्नल इक्विनॉक्स मार्गशिषापासून रोहिणी
नक्षत्रात गेल्याच्या उल्लेख आहे. भारतीय पंचागावर शंका घेण्यास फारशी जागा शिल्लक नाही. पंचाग मागे नेत गेले तर ह्या उल्लेखामुळे ऐतरेय ब्राह्मण काल ३५०० BCE ठरतो. मग त्यावरुन अशी सांगड सहज लावता येते की वेद कालावधी इ स पूर्व ३५०० ते ४५०० च्या मधिल असावा. तेंव्हाच्या सरस्वतीचे वर्णन मग बरोबर
लागू होते.हा सगळा वैचारिक गोंधळ विल्यम्स, मॅक्स मुलर ह्या लोकांनी निर्माण केला आहे. त्यांच्या त्याच त्या जुन्या थेअरीचा उल्लेख १९९० मध्ये देखील पुरावे उपलब्ध असताना शर्मा, रोमिला थापरांसारखे लोक देउन परत परत गोंधळ घालतात. आता तो गोंधळ थांबविण्याची गरज आहे. कझान्स सारखे विदेशी विद्वान ह्या
पुराव्यांना समोर ठेवून वेद कालावधी ३५०० च्या ही आधीचा आहे असे आता मानतात, पण काही ऐतद्देशीय विद्वानांना आर्य बाहेरुन आले हे अजूनही ठासून सांगायचे आहेच.

२. अवेस्ता मधिल हओम. म्हणजेच आपले सोम. हओम आणि सोम ह्यावरुन वादंग आहे म्हणून ह्याविषयीच्या एका पुराव्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. ह्या थेअरीवर अजूनही संशोधन चालू आहे, पण सध्या मिळालेल्या पुराव्याबाबतीत आपण बोलू. खूप सारे आर्य हे बॅक्टेरिया, मार्जियाना आर्कियालॉजीकल कॉम्प्लेक्स (BMAC)
मधले आहेत व तेथून मुळ लोकं निघून काही भारतात व काही इराणमध्ये गेले असं मानतात. भारतीय आर्यांच्या बाबतीत ही थेअरी लागू होत नाही हे आता उघडकीस येत आहे, कारण तिथे उत्खनन झालेल्या ठिकाणी सोमरस सदृष्य ट्रेसेस आढळले. त्यावर संशोधन झाले. ऋग्वेदातील सोमरसा साठी लागणारी सोमवल्ली म्हणजे Ephedra नावाची पर्णहीन वनस्पती, असे काही संशोधक माणतात. यात ephedrin हे alkaloid असतं.* हॅरी नायबर्ग ह्यांनी १९९५ मध्ये जे संशोधन केले त्यातील एक परिच्छेद मी इथे देतो. " Remains of ephedras have also been reported from the temple fortress complex of Togolok 21 in the Merv oasis along with the remains of poppies. In 1990 I received some samples from the site (forwarded by Dr Fred Hiebert of Harvard University) which were subjected to pollen analysis at the Dept of Botany, University of Helsinki. The largest amount of pollen was found in the bone tube from Gonur 1, but even in this sample, which had been preserved in a comparatively sheltered position when compared with the other investigated samples, only pollen of the family Carophyllaceae was present. No pollen from ephedras or
poppies was found and even the pollen left in the samples showed clear traces of deterioration. Our pollen analysis was carefully checked for any methodological errors, but no inaccuracies were found."

म्हणजे सोम आणि हओम मध्ये काय साम्य आहे व काही नाही हे लक्षात यावे.

३. वेदांमधील घोडा हा प्राणी : सुरकोटडा येथे इ स पूर्व २००० तारिख ठरविता येतील इतकी जुनी घोड्याची हाडं सापडली आहेत. फक्त सुरकोटडा येथेच नाही तर लोथल, सुपेर, माळवा व महागड, अलाहाबाद इथेही उत्खननात ही हाडं मिळाली आहेत. महागड येथे मिळालेल्या हाडांचे कार्बन डेटिंग केले असता ते इ स पूर्व २२६५ ते १५८० असे येते. हलुर, कर्नाटका येथे मिळालेल्या घोड्यांच्या हांडाची तारीख ही इ स पूर्व १५८० ही भरते. हे आर्य जर बाहेरुन आले इ स पूर्व १२०० ते १५०० मध्ये आले असं मानलं तर ह्या तारखा कशा जुळतील? आर्कियालॉजिस्ट ए के शर्मा व जोशी ह्यांच्या "हॉर्स इव्हिडन्स" ह्या पेपर मध्ये लिहलेली काही वाक्य मी इथे देतो, " It is really strange that no notice was taken by archaeologists of these vital findings, and the oft-repeated theory that the true domesticated horse was not known to the Harappans continued to be harped upon, coolly ignoring these findings to help our so-called
veteran historians and archaeologists of Wheeler’s generation to formulate and propagate their theory of ‘Aryan invasion of India on horse-back’ ए के शर्मा व जोशी ह्यांच्या संशोधनाला श्री संदोर बोयान्की ( डायरेक्टर ऑफ आर्कियालॉजीकल इन्स्टिट्युट, बुडापेस्ट, हंगेरी ) ह्यांनी अनुमोदन दिले आहे. ते म्हणतात, "Through a thorough study of the equid remains of the prehistoric settlement of Surkotada, Kachchha, excavated under the direction of DR J.P.Joshi, I can state the following: The occurrence of the true horse (Equus Caballus L) was evidenced by the
enamel pattern of the upper and lower cheek and teeth and by the size and form of incisors and phalanges (the bones). Since no wild horses lived in India in post Pleistocene times, the domestic nature of Surkotada horses s undoubtful. This is also supported by an intermaxilla fragment whose incisor tooth shows clear signs of crib bitting, a bad habit only existing amoung domestic horses." घोडा भारतात निर्विवादपणे होता. पाळीव घोडे होते, जंगली घोडे नव्हते असे
अनुमान ह्यावरुन निघते.

मोहंजदाडो येथील उत्खननात सापडलेल्या घोड्यांचे चित्र (टेराकोटा मूर्ती).

horse-mohanjadaro.jpg

लोथल येथील उत्खननात सापडलेल्या घोड्यांचे चित्र (टेराकोटा मूर्ती).

horse-lothal.jpg

एका रथाच्या चाकाच्या आरीचे चित्र.

terracotta-wheels-1.jpg

४. मोहंजदाडोचे युद्ध : आर्यन इन्वेजन थेअरी मांडणारे वेदामधिल १०० पुरांचा नाश करणार्‍या इंद्राचा उल्लेख नेहमी करतात. माझ्या मागच्या लेखात मध्ये मी त्या थेअरीचा उल्लेख केला आहेच. आज थोड्या वेगळ्या म्हणजे वैदिक दृष्टीतून आपण ती थेअरी पडताळू.
इंद्राचे दुसरे नाव पुरन्धर. पुरन्धर म्हणजे ज्याने पुरे फोडली असा तो इन्द्र. माउंड ऑफ डेड म्हणजे मोहंजोदारो इथे त्याने ही पुरं फोडली असे सर्व विद्वान लिहतात. मग माउन्ड ऑफ डेड ह्या ठिकाणी खूप प्रेते मिळायला हवीत,
कारण तिथले उत्खनन झाले आहे. किती प्रेत मिळाली? ३७, एकूण ३७ फक्त!! आणि त्या सर्व प्रेतांचे कार्बन डेटिंग केले असता जुन्या आणि नविन प्रेतात ५-७०० वर्षांचा फरक आहे. ज्याला माउंड ऑफ डेड म्हणतात तिथे एकदम खूप प्रेत मिळायला हवीत? ती मिळत नाहीत. त्यांचा मृत्यू हा शस्त्राच्या माराने झालेला नाही, नॅचरल आहे. मोहंजदाडोला युद्ध झाले असले तर युद्धाच्या खुना मिळाव्यात, मिळाल्या नाहीत, उलट योगमुद्रेत असणार्‍या मूर्ती, बांगड्या घातलेली नाचणारी बाई, पाकिस्तानामधिल नौशारो इथे तर भांगेत कुंकू दाखविणार्‍या टेराकोटाच्या मूर्ती (कार्बन डेटिंग इ स पूर्व २८००) असे हिंदू संस्कृतीच्या जवळ जाणारे साहित्य सापडले आहे. मग ज्या भौगोलिक जागेत हे तथाकथित बाहेरचे आर्य राहिले तिथे इ स पूर्व २८०० मधील बांगड्या व कुंकू
लावलेली मूर्ती कशी सापडावी? की हा केवळ विरोधासाठी विरोध? इन्द्र कथेचा वापर आर्यन इन्वेजन थेअरी मांडण्यासाठीच तर करुन घेण्यात नाही आला? ही शंका येतेच. इन्द्राने ही पुर फोडली म्हणूनच तो पुरन्धर, पण ती पुर फोडण्यासाठी तो इराण मधून आलेला नाही हे लक्षात घ्यावे. युद्ध तर पेशवे व देशपांडे, पेशवे व रुघूजी भोसले असे एत्तदेशीयांमध्ये पण झालेले आहे हे लक्षात घ्यावे.

चित्र : नौशारो मध्ये सापडलेली टेराकोटाच्या मूर्ती. भांगेत लक्ष देऊन पाहा.

Women.jpg

मोहंजदाडो इथे सापडलेली हातात बांगड्या घातलेली मूर्ती.

Dancing_Dall_0.jpg

चित्र लक्ष देउन पाहीले असता भांगेमध्ये लाल रंग आढळतो, कपड्यांच्या जागी पिवळा (सोन्याचे अलंकार) व केसांचा रंग काळा, हातात बांगड्या हे रुप जगात फक्त भारतीय स्त्रिचे असू शकते. आर्य बाहरचे असले असते तर जगात कुठेतरी असे रुप नक्की दिसले असते, तसे दिसत नाही!

५. अवेस्ता मधिल देव : झोराष्ट्रीयन लोकांचा धर्म ग्रंथ अवेस्ता आहे त्यांचा धर्मग्रंथात त्यांचे मुख्य शत्रू हे देव आहेत. तर वेदांमधिल मुख्य शत्रू दानव, राक्षस, असूर अशा अनेक जमाती / गण आहेत. अवेस्ता वाचली तर पहिल्याच चरणात खालील संदर्भ येतात.
I profess myself a Mazda-worshipper and a Zoroastrian, opposing the Daevas, accepting the Ahuric doctrine
23. I would confess myself a Mazda-worshipper, of Zarathushtra's order, a foe to the Daevas, devoted to the lore of Ahura
असे लिहायची गरज केंव्हा पडते? थोडा विचार केला तर आपणही इंग्रजांना खत्म करण्याच्या आणाभाका केवळ ६५ वर्षांपूर्वी घेत होतो, म्हणजे इंग्रज आपले शत्रू होते, त्यांचे उच्चाटन करणे तत्कालिन भारतीयांचे जिवीत कार्य होते, तसेच देव (म्हणजे वैदिक) हे झरतुष्ट्रचे शत्रू होते. हे शत्रू का असावेत? तर ते येथे राज्य करत असावेत असा कयास सहज निघू शकतो वा त्यांचे राज्य झोराष्ट्रीयन लोकांना जिंकायचे असा तरी असू शकते. कालीदासाने रघूवंश लिहीले आहे, त्यात तो रघूचे साम्राज्य कोसला पासून पुढे उत्तरेला उत्तर कोसला पर्यंत होते असे लिहितो. इराण म्हणजे उत्तर कोसला असे विद्वान म्हणतात. हा झरतुष्ट्र आजच्या इराणमधील आहे.

वरच्या पहिल्या मुद्याच्या (शेरे ए शुक्ता किंवा मुंडिगक मध्ये आलेले हे आउडसाइडर्स कोण?) प्रश्न तसेच झरुतुष्ट्राचा प्रश्न -देव त्याचे शत्रू का असावेत हे उरतात. ते बघू. भारतीय वैदिक लोक साम्राज्य वाढविन्यासाठी स्वतः बाहेर गेले असे होऊ शकते का? का नाही? बुद्धाच्या काळात ह्या सर्व देशांमध्ये तसेच थायलंड,चिन, मलेशिया, सिंगापुर इथे भारतीय लोक बौद्धधर्मप्रचारासाठी गेल हे सर्वज्ञात आहे, त्यावर वाद नसावा? मग त्या आधी गेले नसतीलच असे ठामपणे म्हणता येईल का? उत्तर हो कदाचित गेले असावेत असेच येऊ शकते. ह्याला पुष्टी वा पुरावा म्हणून
मी बौद्धायणाशी जोडतो. पुराणात तर असे वंशावळीचे उल्लेख आहेतच, पण बौद्धायणात पण आहेत.

प्राणायु: प्रवव्राज तस्यैते कुरुपांचाल: काशिविदेहा इत्येतदायवं प्रवाजं |
प्रत्यडःमावसुस्तस्यैते गान्धाराय स्पर्वसो अरट्टा इत्येतदामावसवम ||
( बौद्धायण श्रौतसूत्रम (१८ | ४४ आणि ४५ )

आयु पूर्वेकडे गेला. त्याचे वंशज हेच कुरु-पांचाल आणि काशि-विदेह हे आहेत. त्यातील अमावसू पश्चिमेकडे गेला, त्याचे वंशज म्हणजेच गांधार, पर्सू आणि अरट्ट आहेत. काशि विदेह म्हणजे आजचे हरयाणा, उत्तर प्रदेश व बिहार मधिल पश्चिमी भाग. महाभारतात गांधार, अरट्ट इत्यादी सर्व राज्यांनी भाग घेतला आहे ह्यावर दुमत
नसावे. गांधारी, गंधार देशाची राजकन्या होती, शकुनी तिथला राजपुत्र. आता थोडे लक्ष दिले तर ह्यातील गांधार म्हणजे आजचे कंदहार (अफगाण) आहे. पर्सू हा नामापासून पर्शिया हे राज्य होऊ शकते. कालचा पर्शिया म्हणजे आजचा इराण व इराक आहेत हे अमान्य नसावे, कारण इराण हा देश केवळ १९३५ मध्ये निर्माण झाला. त्या आधी तो पर्शिया म्हणून ओळखला जात होता. आणि अरट्ट ह्या देशाबद्दल काही लोक कोसलाच्या वर आहे असे मानतात. मला ह्यावर पुस्तकात काही माहिती मिळाली नाही, पण मी अरट्ट ह्या नावावर गुगल सर्च केला तर एक जुना राजा ज्याने मुस्लिम धर्म स्विकारला ह्याची नोंद आहे. म्हणजे अरट्ट हा भाग नक्कीच अफगाण
व पर्शिया (इराण- इराक) च्या आजूबाजूस असावा. अरट्टा ह्या देशाबद्दल पर्शियामध्ये पण साहित्य उपलब्ध आहे, म्हणजेच माझा कयास खरा ठरावा.
गांधार - अफगाण
अरट्ट - पर्शियाचा काही भाग
पर्सू - म्हणजे पर्शिया (इराण, इराक)

बोधझ गई येथे हिताईत राजा सुप्पिलुलूमा व मित्तनी राजा मातिवाझा ह्यांच्यात जो करार झाला त्या करारावर इन्द्र, मित्र व वरुण ह्या देवांचा उल्लेख आहे. हा तह कालच्या पर्शियाच्या बाजूला म्हणजे (पर्सू म्हणजे आयु राजाचे वंशज) झाला. तो संदर्भ लक्षात घेतला तर व पूर्ण जोड लावली तर सरळ हे मायग्रेशन भारतातून बाहेर, बाहेरुन भारतात नाही, असा निष्कर्ष निघतो. (पश्चिमेकडून भारतात का होउ शकत नाही, ह्या साठी, ह्याच लेखातील हेलमंड पात्रातील उत्खननाचा संदर्भ लक्षात घ्यावा.) एक मुख्य गोष्ट लक्षात घेता यावी की तह करायाला खुद्द हे देव तिथे हवेत असे नाही. अकबर, औरंगजेब हे राजे सुद्धा फर्मान काढत व ते राजाच्या म्हणजे अकबराच्या नावाने असे व ते स्विकार करायला फर्मान बाबडी उभी केली जात असे, दरवेळी हे अकबराच्या नावाचे फर्मान द्यायला अकबराला यावे लागले नाही, तसेच मराठा साम्राज्य वाढीस लागल्यावर छत्रपतीच्या
व पेशव्यांच्यां नावाने मराठा सरदारांनी कित्येक तह उत्तरेत केले आहेत. असेच वैदिक देवांच्या बाबतीत पण होऊ शकते.
पुष्टी म्हणून आणखी एक पुरावा पाहा. त्या करारा मध्ये देवांनी घोडे युद्धात कसे वापरायचे ह्याचे प्रशिक्षण ह्या राजांना द्यावे असेही लिहले आहे. त्यात, "एकवर्तन, त्रिवर्तन, पन्चवर्तन" हे संस्कृत उल्लेख आहेत. श्री टी. बुरो ( T
Burrow) त्यांचा लेखात लिहीतात की ," The Aryans appear in Mitanni from 1500 BC as the ruling dynasty, which means that they must first have entered the country as conquerors"
आता हे कॉन्करर्स कोण असावेत, ते अवेस्ता मधिल लोक तर नाहीतच कारण अवेस्ता देवांना शत्रू मानते व इ स पूर्व १५०० मध्ये ह्या नावाचे वैदिक देव जगाच्या पाठीवर केवळ भारतात आहेत. अर्थ उघड आहे. बौद्धायण, पुराणे जे म्हणतात तेच भारतीय आर्य इराण मध्ये पण राज्य करत असावेत. भौगोलिक दृष्ट्या हे अजिबात
अवघड नाही कारण अफगाणच्या वरचा भाग म्हणजे इराण, व त्याच्या वरचा भाग म्हणजे तुर्कस्थान (बोधझ गई). फार दुर नाही अगदी १७६० मधिल भारताचा इतिहास पाहिला, तर मराठे लोक दिल्लीची चौथाई वसूल करत, दिल्ली वाचविन्यासाठी मराठ्यांनी दिल्लीपती बरोबर करार केला, त्यामुळे पानपतावर लढाई खेळण्यास मराठे गेले होते. अगदी तसाच प्रकार मागच्या इतिहास होऊ शकत नाही का? युरोपियन आधी पर्शियात होते, तिथे अवेस्ता मिळाली, पुढे भारतात आल्यावर वेदांचे इंग्रजीत रुपांतर झाले व अवेस्ताला मुख्य माणून लगेच वैदिक साहित्य डावे ठरवले गेले. सदर लेखातील पुरावे पाहता, आता अवेस्ता मधील सोम (हवोम), देव (दैवस), सरस्वती (हरहवती-हेलमंड), असूर (अहूर) हे सर्व कुठले हे लक्षात यावे. मॅक्स मुलर, ग्रिफिथ अशा विद्वानांनी आर्यन इन्वेजन इ स पूर्व १२०० ते १५०० साली का लिहले ह्याचे अनुमान सहज काढता येते कारण झोराष्ट्रीयन धर्म संस्थापकाने अवेस्ता लिहिली असे मानले जाते व त्याचा कालावधी इ स पूर्व १७५० ते १५०० आहे, साहजिकच मग हे इन्वेजन / मायग्रेशन निदान २०० वर्षांनंतर सुर झाले असावे असा साधारण कयास त्यांनी बांधला असावा व हा कालावधी निश्चित केला. ऐतरेय ब्राह्मण प्रमाणे हा कालावधी इ स पूर्व ३५०० च्या आधीचा आहे, कारण ॠग्वेद आधी निर्माण झाले. आजपासून ४८०० वर्षे आधी कुंकू लावलेल्या व हातात बांगड्या असलेल्या टेराकोटा व ब्रॉन्झ प्रतिमा मिळाल्या आहेत, इतकेच नाही तर एका साईट वरुन शिवलिंग ही मिळाले आहे. जर आर्यन इन्वेजन जर बाहेरुन असले असते, तर ज्या देशातून असे इन्वेजन झाले त्या देशात असे हातात बांगड्या वा भांगेत कुंकू लावणाऱ्या प्रतिमा मिळावयास काय हरकत आहे? BAMC देशात अश्या प्रतिमा मिळाल्या नाहीत! आज ४८०० वर्षांनंतर देखील भारतात बांगड्या, कुंकू वापरात आहे, मग ज्या देशातून हे आयात झाले तसा कुठला देश आज तरी पृथ्वीतलावर दिसून येत नाही.
वेदांचे रुपांतर इंग्रजीत होताना खूप चुका झाल्या आहेत. आर्य ही भारतीय रेस म्हणून वेदात उल्लेख नाही, आर्य ह्या शब्दाचा संबंध इंग्रजांनी एरियन ह्या वंशवाचक शब्दाशी लावल्यामुळे आर्यन इन्वेजन आधी नॉर्मडिक लोक, नंतर इराणी, नंतर BMAC असे विविध वळणं घेत आहे. संस्कृत मध्ये एका नामाचे अनेक अर्थ होउ शकतात. उदा ब्राह्मण, म्हणजे ज्ञानी व ब्राह्मण ही जात. पण रुपांतरीत होताना बहुतेक वेळी ब्राह्मण हा शब्द जातीवाचक रुपांतरीत झाल आहे, आर्याचेही तसेच. वैदिक आर्य खुद्द भारतातले आहेत असे हे पुरावे दर्शवितात असा निष्कर्ष मी काढत आहे. मागच्या चारही लेखात मी निष्कर्ष काढले नव्हते, अनेक थेअरी मांडत होतो. ह्या लेखात तसे नाही. इथे मी सरस्वती, अवेस्ता, इन्द्र, आयु हे सर्व मुद्दे इन्व्हेजन थेअरीच्या विरोधात मांडत आहे. कुणीतरी उगाच कुठली तरी थेअरी माडंतो, व त्यावरुन गहजब माजतो. गेल्या २० वर्षातील ( मुख्य करुन १९९५ ते २००६) च्या दशकातील आर्कियालॉजीचे पुरावे वरिल आर्यन इमिग्रेशनच्या अगदी विरोधात आहेत. लोथल, कालिबंगन, भिरन्ना अश्या मोठ्या साईटस व शेकडोत असलेल्या छोट्या ( हो, शेकडोत, वर ते चित्र पाहा ) साईटस ह्यांचे उत्खनन झाले आहे, तिथे प्रि हडप्पन, हडप्पा आणि पोस्ट हडप्पन वस्तू मिळाल्या आहेत, रेडिओकार्बन वर शंका
असेल तर मग गोष्टच वेगळी. काही काही ठिकाणी उदा कालिबंगन इथे दोन साईटस आहेत, एक प्रि स्टेजची व तिथून त्याच लोकांनी १२० किलोमिटर पश्चिमेकडे येऊन परत नविन वसाहत जी मॅच्यूअर हडप्पन कालावधीत जाते. भिरन्ना येथे तर इ स पूर्व ४५०० ते ६००० चे पुरावे पण आहेत.

सरतेशेवटी इतकेच म्हणेन की वेदकालीन भारताचा भूगोल ठरवायला वेदांचा अभ्यास व त्यावरुन भूगोल मांडणे आवश्यक आहे, उलट असता कामा नये. १९९० च्या नंतरचे संशोधन हे सर्व ठरवायला ग्राह्य धरावे, त्या आधीच्या संशोधनात्मक तर्कांना आता मूठमाती द्यायला हरकत नाही.

संदर्भ

अवेस्ता
ऋग्वेद
India: New light on the Indus Civilization - B B Lal
The Saraswati B B Lal
How Deep Are The Roots Of Indian Civilization B B Lal
India and the Indus Civilization - J P Joshi
Ancient shorelines of Gujarat, India, during the Indus civilization (Late Mid-Holocene): A study based on archaeological evidences (http://www.ias.ac.in/currsci/jul10/articles29.htm )

श्री बी बी लाल आर्कियालॉजी सर्व्हे ऑफ इंडिया चे १९६८ ते १९७२ ह्या कालावधीत डायरेक्टर जनरल होते . त्यांना ह्या नविन उत्खनना बद्दल पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
श्री जे पी जोशी हे आर्कियालॉजी सर्व्हे ऑफ इंडिया चे १९८७ ते ९० व १९९४ ते ९५ ह्या कालावधीत डायरेक्टर जनरल होते.
ह्या शिवाय मागील लेखाच्या प्रतिक्रियेत दिलेली अनेक पुस्तकं, त्यांचा देखील उपयोग झाला आहे.

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २
वेदकालीन संस्कृती भाग ३
वेदकालीन संस्कृती भाग ४

प्रकार: 

आर्यांच्या शोधात
हे मधुकर केशव ढवळीकर ,यांचे पुस्तक वाचा त्यात केदारांपेक्षा अधिक प्रामाणिक पुरावे देऊन आर्य भारताबाहेरून आले निर्विवादपणे मांडले आहे .

५ व्या लेखातील चित्र घोडे नसून खेचर आहे.हे निलीमाचे मत रास्त आहे.
मी लेख क्र ४ पान न ४ वर कॅलीफोर्निया विद्यापीठाचा जग मान्य झालेला रिपोर्ट मांडला आहे.त्यात या सापडलेल्या अवशेषांचा कालखंड ठरविला आहे. तो पहा

अहो केदार, कशाला इतके गंभीरपणे घेता सगळे प्रतिसाद? ते सुद्धा 'अमेरिकेत बसून भारतातले काय कळते म्हणाणार्‍यांशी?'

त्यापेक्षा केदार, तुम्ही हे सगळे भारतात जाऊन लिहा. म्हणजे मतभेद झाले तरी चालेल, पण 'अमेरिकेत बसून भारतातले काय कळते?' असा भारतीय विद्वानांचा निरुत्तर करणारा प्रश्न ऐकावा लागणार नाही!

भलेहि तुम्ही कुठे बसून लिहीता याला महत्व नाही, पण भारतीय असून अमेरिकेत बसून लिहीता? छे: छे:!
असे नाही.

निदान माझा अमेरिकन मित्र 'झिबिन्यू ब्रेझिन्स्की' यांनी लिहीलेल्या मूळ पोलीश लेखाचा अनुवाद, असे लिहा, म्हणजे लग्गेच 'श्री. म. के. ढवळीकर यांचे मत खोडून काढणारा पुरावा आमच्या निदर्शनास आला आहे' असे लिहीतील काही लोक. क्कैच्च्या क्कैच्च!
Proud Proud Proud

Pages