जुनं सोनं - गाडी बुला रही है

Submitted by स्वप्ना_राज on 2 August, 2010 - 00:54

वादा तो यही था की कभी फिरसे मिलेंगे
मै पूछने आया हू की भूले तो नही हो

माणसाला कश्यामुळे काय आठवेल ह्याची काही खात्री देता येते का? का कोणास ठाऊक पण गुलजारच्या ह्या ओळी मला खूप मागे एप्रिल-मेच्या सुट्टीत घेऊन गेल्या. घरच्या बेडरूममध्ये उघडून ठेवलेल्या ट्रंका, त्यात दररोज...अगदी निघायच्या दिवसापर्यंत भरल्या जाणार्‍या वस्तू, माहेरी जायचं म्हणून आनंदाने फुललेला आईचा चेहेरा, तिथे गेल्यावर काय काय मजा करायची ह्याचे बेत करणारे आम्ही दोघे बहिण-भाऊ - सगळं सगळं कसं लख्ख दिसायला लागलं. मग दिसायला लागली व्हीटीपर्यंत नेणारी टॅक्सी आणि तिथे उभी असलेली ट्रेन. स्टेशनवरून निघताना तिने दिलेली जोरदार शिट्टी कानात स्पष्ट ऐकू यायला लागली. खिडकीतून मिट्ट अंधाराशिवाय काहीही दिसत नसतानाही न झोपता बाहेर बघत राहण्याचा केलेला अट्टाहास आठवला. सकाळी सकाळी दिसू लागलेली तांबडी माती, आजोळ जवळ यायला लागताच ट्रेन दुप्पट वेगाने जातेय असं वाटायला लावणार्‍या, पळणार्‍या स्टेशनाच्या पाट्या दिसायला लागल्या. धुराची रेषा सोडत पुन्हा एकदा दिलेली शिट्टी मला माझ्या बालपणात घेऊन गेली.

ह्याच शिट्टीची, दुरून दिसणार्‍या काजळी धुराच्या रेषेची, एका लयीत चालणार्‍या ट्रेनच्या चाकांच्या ठेक्यांची भुरळ हिंदी सिनेमाला, गीतकारांना, संगीतकारांना आणि दिग्दर्शकांना न पडती तरच नवल. त्यातूनच जन्माला आली काही अविस्मरणीय गाणी. ऐकायची आहेत? चला तर मग, बसा ट्रेनमध्ये. Happy

ट्रेनचा प्रवास म्हटलं की पहिला विचार डोक्यात कोणता येतो ते कदाचित माणसाच्या वयावर अवलंबून असावं. हेच बघा ना. मुलांना खिडकीजवळची जागा मिळेल ना ह्याची चिंता. वयाने जरा मोठ्या माणसांना आपण स्टेशनात वेळेवर पोचू ना, ट्रेन वेळेवर येईल ना, वेळेवर पोचेल ना, आपल्या जागेवर कोणी आधीच बसलं नसेल ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहप्रवासी कोण असणार असले घोर. वयोव्रृध्द प्रवासी खालचा बर्थ मिळेल ना ह्या फिकिरीत. तर प्रेमात पडायचं ज्यांचं वय आहे (किंवा जे जन्मभर मनाने ह्याच वयाचे रहातात!) त्यांना मात्र आशा की ह्या प्रवासात आपल्याला कोणीतरी "खास' माणूस भेटावं. पण बिचार्‍या राजेश खन्नाचं नशीब बघा. त्याच्या स्वप्नांची राणी साक्षात ट्रेनमध्ये बसलेय आणि हे बच्चंमजी मात्र ट्रेनच्या बाहेर जीपमध्ये आहेत. मग करायचं काय? तर आहे तिथूनच तिला साद द्यायची आणि वाट पहायची प्रतिसादाची. ही साद देतंय "आराधना" तलं "मेरे सपनोंकी रानी". आणि गाडीतली हातातलं पुस्तक वाचायचा निष्फळ प्रयत्न करत, गालाला गोड खळी पाडत हसणारी नायिका आहे शर्मिला टागोर. राजेश खन्नाला मुली स्वतःच्या रक्त्ताने प्रेमपत्रं का लिहायच्या हे अजून कळलं नसेल तर पहाच तो ह्या गाण्यात किती क्यूट दिसलाय. Happy

पण कधीकधी ह्या प्रेमवीराचं नशीब कसं असतं बघा. त्याच्याच कम्पार्टमेन्टमध्ये 'ती' असते. पण ह्याच्याकडे ती ढुंकूनही बघत नाही. वरच्या बर्थवर जाऊन बसते. आणि ह्याच्यासमोर बसते तिच्याबरोबर असलेली तिची आई. मग आपल्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोचवायच्या कश्या? ते सुध्दा तिच्या आईच्या नकळत. गहन प्रश्न खरा. पण असल्या अडचणींना घाबरेल ते प्रेम कसलं? हे महाशय ह्यावरही तोडगा काढतात आणि सुरू करतात चक्क एक भजन. फक्त त्यातल्या ओळी आकाशातल्या देवाला आणि वरच्या बर्थवर असलेल्या 'ति'ला सारख्याच लागू पडणार्‍या. आई बिचारी डोळे मिटून भक्तीत दंग पण 'ती" मात्र काय ते ओळखते आणि गाल फुगवून लटक्या रागाने त्याच्याकडे बघत रहाते. हा प्रेमवीर आहे आपला चॉकलेट हिरो देव आनंद, 'ती' आहे वहिदा रेहमान आणि गाणं आहे 'काला बझार' मधलं 'अपनी तो हर आह एक तुफान है उपरवाला जानकर अंजान है'.

आपल्यावर रागावलेल्या तिचा राग घालवायला ट्रेनसारखं उत्तम ठिकाण नाहिये. बिच्चारी जाऊन जाऊन जाणार तरी कुठे? Wink तिला ह्या प्रेमवीराचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागतं - तिची इच्छा असो वा नसो. परत ट्रेनमध्ये जे सहप्रवासी असतात त्यांची सहानुभूती त्यालाच असते. बिच्चारा! किती मनधरणी करतोय पण ही बया ऐकतच नाहिये असाच त्यांचा एकूण सूर असतो. नेमका हाच सूर पकडलाय देव आनंदने आशा पारेखच्या नाकावर आलेला राग घालवायला. गाणं आहे 'जब प्यार किसीसे होता है' मधलं "जिया ओ जिया ओ जिया कुछ बोल दो". ऐकून तर बघा, तुमच्या नाकावरचा राग पण धूम पळून जाईल.

बरं ती इतकी सुंदर की तिच्यावर लट्टू झालेल्यांची संख्या कमी नाही. त्यातल्याच एखाद्याबरोबर तिला पाहिलं तर खरं तर ह्याच्या अंगाचा तिळपापड व्हायला हवा, नाही का? पण आपला हिरो अफलातून आहे. आपलं तिच्यावर प्रेम आहे ह्याची कबूली तर देतोच वर साळसूदपणे त्याचा ठपका आपल्या ह्र्दयावर ठेवून मोकळा. 'मी पामराने काय केलंय? जे काही केलंय ते ह्या माझ्या ह्र्दयाने. बघा ना, माझं काही ऐकतच नाहिये, म्हणूनच ते कधी आणि कोणावर खूश होईल काही सांगता येत नाहिये.' खट्याळ हसत "है अपना दिल तो आवारा" म्हणणार्‍या देव वर लुब्ध झाली नाही तर ती हसीना खरंच "पत्थरदिल" म्हणायला हवी, नाही का? Wink

एक ट्रेन, पण किती तर्‍हेतर्‍हेच्या लोकांना घेऊन जात असते. त्यात कोणी शिक्षणासाठी निघालेले विद्याथी असतात, कामानिमित्त जाणारे चाकरमानी असतात, कुठे सुट्टीला निघालेलं कुटुंब असतं तर कुठे तीर्थयात्रेला निघालेले आजी-आजोबा असतात. आणि कधीकधी प्रेमासाठी घरातून पळालेलं प्रेमी जोडपं असतं - घरातून निघालेलं पण कुठे जाणार, काय करणार ह्याची क्कचितच कल्पना असणारं. गाडीने वेग घेताच खिडकीतून दिसणारी द्रृष्यं जशी झराझर बदलतात तसेच मग मनात विचार येऊ लागतात. ती आईवडिलांचं घर मागे सोडून आलेली असते पण ते आठवत रहातंच, काळीज कुरतडत रहातं. खरं तर कुठे जायचंय हा प्रश्नच निरर्थक, ट्रेन जिथे घेऊन जाईल तिथेच त्यांना जावं लागणार असतं. तरीही तो तिला विचारतोच. तिचा आपल्या प्रेमावरचा विश्वास अढळ. तीही सांगते - तू जिथे नेशील तिथे यायला तयार आहे मी. पण हा जोश थोडा वेळ टिकतो. मग मनात शंकाकुशंका फेर धरून नाचायला लागतात. प्रेमाची, मायेची माणसं सोडून एका क्षणात ज्याच्याबरोबर बाहेर पडलो त्यानेच आपल्याला वार्‍यावर सोडलं तर? कुठे जायचं? काय करायचं? कावरीबावरी होऊन ती त्याला विचारतेसुध्दा. काय बरं सांगतो राजेश खन्ना झीनतला? आगगाडीच्या शिटीचा संगीतात चपखलपणे वापर करून घेतलेलं हे गाणं आहे "अजनबी" मधलं "हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले".

'गाडीच्या टपावरून प्रवास करणं धोकादायक आहे" - असं रेलवे सांगते. तरीही आपले अनेक देशबांधव जीवावर उदार होऊन असला प्रवास करतातच. पण एखाद्या गाण्यात हिरॉईनच ट्रेनच्या टपावर बसलेली असेल तर? कोण ही महान हिरॉईन? अहो, आपली पद्मिनी कोल्हापुरे. पण ती तिथे एकटी नाहिये हं. तिला आपल्या प्रेमाची खात्री पटवून द्यायला ॠषी कपूर पण मौजूद आहेच. डोंगरदर्‍यातून वाट काढत जाणार्‍या टॉय ट्रेनचे हवाई शॉटस आणि अभिनेता डॅनीने केलेलं पार्श्वगायन ह्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेलं हे गाणं आहे "जमानेको दिखाना है" मधलं 'होगा तुमसे प्यारा कौन'.

अनेक हिंदी चित्रपटात ह्या ट्रेनने कथानक पुढे नेण्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडलेली आहे. "कटी पतंग" मध्ये आशा पारेख आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी लग्न करायचं नाही म्हणून घर सोडून आपल्या प्रियकराकडे पळून जाते पण तिथे गेल्यावर तिला कळतं की आपली निवड चुकली आहे. घरी परत जाता येत नसतं म्हणून ती एका ट्रेनमध्ये बसते. तिथे तिला भेटते तिची एक जुनी मैत्रीण. ह्या ट्रेनला अपघात होतो आणि आशा पारेखचं जीवन बदलून जातं, दोर कापलेल्या दिशाहीन पतंगासारखं होऊन जातं. "घुंगट" मध्ये नुकतंच लग्न झालेल्या दोन नवपरिणीतांच्या जीवनाला कलाटणी देतो असाच एक ट्रेन प्रवास. 'शोले'मधला इन्स्पेक्टर असलेल्या ठाकुर बलदेवसिंगचा जय-विरुसोबतचा ट्रेनमधला सीन कोण विसरु शकेल?

पण एका चित्रपटात मात्र बरीचशी कथा घडते ती ट्रेनमध्येच. एका इंजिनीयरने तयार केलेली ही नवीकोरी सुपरफास्ट ट्रेन तिच्या पहिल्या प्रवासाला निघालेली असते. प्रवाशांमध्ये ट्रीपला निघालेली लहान मुलं असतात, जलसा करायला निघालेले कव्वाल असतात. एकमेकांपासून गैरसमजुतीमुळे ताटातूट झालेले प्रेमी असतात आणि असतो त्याच इंजिनियरचा लहान मुलगा. केवळ मत्सरापोटी ह्या ट्रेनला घातपात केला जातो आणि मग ही सुपर एक्सप्रेस सुसाट वेगाने धावत सुटते - कधीही न थांबण्यासाठी. "द बर्निंग ट्रेन' नावाच्या ह्या चित्रपटात एक सुंदर कव्वाली आहे. म्हटलं तर ती ट्रेनच्या प्रवासाबद्दल आहे पण जीवनाच्या प्रवासाला त्यातला शब्द न शब्द चपखल लागू पडतो. आपल्या सगळ्यांचाच प्रवास जन्माने सुरू होतो आणि म्रृत्यूपर्यंत येऊन संपतो. ह्या प्रवासात अनेक सहप्रवासी भेटतात. काही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत बरोबर राहतात पण बरेचसे त्यांचं स्टेशन आलं की मध्येच उतरुन जातात. आपण एकत्र असतो खरं पण ही सोबत क्षणांचीच ठरते - पल दो पलका साथ हमारा, पल दो पलके याराने है. खरं ना?

माणसाच्या जीवनाचं ट्रेनच्या प्रवासाशी असलेलं साम्य मात्र इथे संपतं. का सांगा. कारण ट्रेन अमक्याला घेऊन जायचं आणि तमक्याला नाही असा भेदभाव मुळीच करत नाही. मित्र असो वा शत्रू, सगळ्यांना बरोबर घेउन जाते. पण आपण माणसं काय करतो? लोकांना लेबलं लावतो आणि आपल्या मनाच्या कंपार्टमेन्टची दारं बंद करुन घेतो. विश्वाच्या अफाट पसार्‍यात एक पळमात्र असलेल्या ह्या आयुष्याच्या प्रवासात "आपला" आणि "परका" ह्या लेबलांना खरं तर काही अर्थ नसतो. पण हे लक्षात येईतो शेवटचं स्टेशन आलेलं असतं. प्रवास संपलेला असतो. इच्छा असो वा नसो, आपल्याला उतरायला लागणार असतं. ह्यापुढे कधीही आगगाडी पाहिलीत तर तिची शिट्टी कान देऊन ऐका. ती नक्की हेच सांगणार - गाडी बुला रही है, सीटी बजा रही है, चलनाही जिंदगी है, चलतीही जा रही है.

ह्या प्रवासातलं हे शेवटचं गाणं आहे. खात्री आहे तुम्ही नक्की ओळखाल. एक तवायफ. ट्रेनच्या प्रवासात कुठे भेटलेला कोणी एक. ही नखशिखांत बुरख्यात. तिचं नखही दिसणंही दुरापास्त. त्याला दिसतात ती फक्त तिची गोरीपान पावलं. आणि तो वेडा काय म्हणतो माहित आहे? 'आपके पांव देखे. बहोत खुबसुरत है. इन्हे जमीपे मत उतारियेगा, मैले हो जायेंगे". ही कोठ्यावर परतते. पुन्हा नेहमीसारख्या महफिली सुरू होतात. पण तिच्या सुरांना छेदून जाते, त्याची आठवण घेऊन येते ती दूरवरून जाणार्‍या ट्रेनची शिट्टी. ओळखलंत ना? चित्रपट आहे मीनाकुमारीचा "पाकिझा" आणि गाणं आहे "चलते चलते यूही कोई मिल गया था".

लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करून ४-५ वर्ष झाली आहेत. पण अजूनही कधी रात्री पाऊस पडून जातो आणि दूरवरून ट्रेनची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. कोण बरं प्रवास करत असेल ह्या ट्रेनने असा विचार मनात चमकून जातो. आणि मग मिटल्या डोळ्यांसमोरून सुळेभावी, सुलढाल, सांबरा अश्या कित्येक वर्षात न पाहिलेल्या स्टेशनांचे फलाट पळत जातात. दूर कुठेतरी एक किल्ला दिसायला लागतो. सामान कंपार्टमेंटच्या दाराशी नेऊन ठेवायला सगळ्यांची लगबग सुरू होते. त्यातच मी, आई आणि भाऊ दिसायला लागतो. काही मिनिटांनी आणखी एक बोर्ड दिसतो - आमच्या आजोळच्या स्टेशनाचा. गाडी हळूहळू जात फलाटाला लागते आणि पुन्हा एकदा जोराची शिट्टी देते. जणू म्हणत असते - "आलं रे तुमचं मुक्कामाचं ठिकाण. बघा, तुम्हाला नीट आणून पोचवलं ना". पण माझं लक्ष कुठे असतं? मी तिथल्या गर्दीत रूमाल हलवून आमचं स्वागत करणार्‍या आजोबांना शोधू लागते. आपल्यातून गेलेली आपली प्रेमाची माणसं स्वप्नातच भेटतात ना?

सामान घेऊन आम्ही स्टेशनाच्या बाहेर पडतो तरी ट्रेन तिथेच उभी असते. सुखरूप पोचवल्याबद्दल तिचे कोणीच आभार मानलेले नसतात. आजोळच्या आठवणींनी पाणावलेल्या माझ्या डोळ्यांसमोर ती अजूनही माझ्या स्वप्नातल्या स्टेशनवर उभी आहे. हे डोळे कायमचे मिटायच्या आधी तिला "थॅंक्यू" म्हणायला मला एकदा जायचंच आहे. खात्री आहे की ती शिट्टी वाजवून मला प्रतिसाद देईल आणि कोणा शायराच्या ओळी मला त्या शिट्टीतून ऐकायला येतील:

जाते है शाख-शाखको देते हुए दुआ
आंधीसे बच गये तो इसी रूतमे आयेंगे

-----

वि.सू.१ - ह्या लेखात काही गाणी निसटून गेली असतील. पण ज्याला Top of the Mind Recall म्हणतात तसं आठवली त्या क्रमाने गाण्यांबद्दल लिहिलं आहे ह्याची नोंद क्रृपया घेणे Happy

वि.सू.२ - काही तपशील चुकले असतील कारण ह्यातले बरेचसे चित्रपट, गाणी पाहून अनेक वर्ष झाली आहेत. चुकीबद्दल क्षमस्व.

-----

ह्याआधीचं असंच लिखाणः

१. मेघा छाये आधी रात
२. जनम जनमका साथ है
३. गुमनाम है कोई

गुलमोहर: 

लिहिलंयस मस्तच. घरी जाऊन परत वाचेन लिंक्ससोबत.. इथे लिंक्सवर बॅन आहे ना... Happy

गाडी बुला रही है माझे आवडते गाणे...

मी प्रवासाला निघाले की जाताना अगदी उत्साहात निघते पण ठिकाण जवळ यायला लागले की एक विचित्र हुरहूर दाटायला लागते. जिथे निघालेय तिथे पोचायची उत्सुकता असतेच पण त्यासाठी प्रवास सुरू केलाय तो आता संपतोय याचे वाईट वाटायला लागते... Happy कधी वाटते की ठिकाण येऊच नये आणि प्रवास असाच सुरू राहावा... Happy

स्वप्ना - सुरेख झालाय लेख ..
विशेष करून "आपल्यातून गेलेली आपली प्रेमाची माणसं स्वप्नातच भेटतात ना?" खूपच भावलं नी भिडलं !
अशीच मस्त मस्त लिहित रहा! खूप शुभेच्छा!

आपल्यातून गेलेली आपली प्रेमाची माणसं स्वप्नातच भेटतात ना?>>>अगदी अगदी

मस्त लिहिलयस Happy

ट्रेन मधलं अजून एक प्रसिद्ध गाणं.. शाळेत असताना दर शनिवारी पीटी झाल्यावर वर्गात जाताना लावायचे.. शाळेतले शिक्षक मुलांना सहलीसाठी घेऊन जाताना त्यांनी केलेलं भारताच वर्णन..
चित्रपट - जागृती(१९५४)
आओ बच्चों तुम्हे दिखायें झाँकी हिंदुस्थान की...

मस्तंच....खरं म्हणजे....ट्रेन मधिल गाण्यांचा कुठलाही लेख...पल दो पलका साथ हमारा, पल दो पलके याराने है या गाण्याच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होऊ शकत नाही...

स्वप्ना, परत एकदा मस्त लेख.
बदल जाये अगर माली, चमन होता नही खाली
बहारे फिरभी आयेगी, बहारे फिरभी आती है

हे पण ट्रेनमधले आहे का ?
आणि नव्या परिणीता मधे पण आहे ना एक सैफचे गाणे ?
आणि आशिर्वाद मधले, अशोककुमारचे, रेलगाडी, रेलगाडी ? (यात खेळातली गाडी आहे)
श्रीदेवी आणि ऋषि कपूरचे, जयपूरसे निकली गाडी (यातपण मिनिएचर ट्रेन आहे.)
अमोल पालेकर आणि टीना मुनीम चा कुठला तो सिनेमा, त्यात पण एक आहे ना लोकल मधले गाणे. (उठे सबके कदम, का ?)
शाहरुख, उर्मिला चे बिच्छु मुझे काट खायेगा...
ऋषि कपूर, नीतू सिंगचे एक मजेशीर गाणे, त्यात तो मुलीच्या वेशात असतो ते....

आठवणींची गाडीच सुटली की !!!

रेव्यु, reshmasandeep, सुमेधा, मी_प्रिया, कविता,हिम्सकूल, iam_1june, दिनेशदा, sneha1 खूप खूप धन्यवाद!

हिम्सकूल, हे गाणं लेखाची लांबी वाढेल म्हणून शेवटी घातलं नाही.

दिनेशदा, हो ते गाणं ट्रेनमधलंच आहे, धर्मेंद्र आहे त्यात. मला फार आवडतं ते. हेही गाणं लेखाची लांबी वाढेल म्हणून शेवटी घातलं नाही. "रेलगाडी, रेलगाडी", "उठे सबके कदम" मात्र मिस झाली.

बाकीची गाणी थोडी अलिकडली म्हणून घातली नाहीत. शक्यतो ७० आणि आधीच्या दशकातली गाणी मी लेखात घालते.

आर्डीने गायलेले, किताब मधले, धन्नो कि आँखोंमे प्यार का सुरमा ..(का चुम्मा...)
सचिन आणि रजनी शर्माच्या बालिका वधू मधे पण, बडे अच्छे लगते है, मधे लांबवरुन जाणार्‍या एका ट्रेनचा शॉट आहे ना....

तीन गाणी आठवली होती. त्यातलं एक दिनेशने वर दिलंय म्हणून देत नाही.

चील चील चिल्लाके कजरी सुनाए (हाफ टिकट ) - http://www.youtube.com/watch?v=DaEfs46zXRU&feature=channel

ये है जीवनकी रेल - http://www.youtube.com/watch?v=f1RANM_kNbs

धन्स ...
<<गाडी बुला रही है माझेही अतिशय आवडते गाणे..., धर्मेंद्रच्या आवडलेल्या मोजक्या चित्रपटापैकी 'दोस्त' हा एक चित्रपट होता. खुप खुप आभार Happy

शम्मी कपूर आणि अमिताचे एक गाणे ट्रेन मधे आहे का ? (देखोजी एक बाला जोगी ?)
बंदीनी मधल्या, मेरे साजन है उसपार मधे पण ट्रेन ची महत्वाची भुमिका आहे.

राजेश खन्ना, नंदा आणि हेलनचा, दि ट्रेन मधे एकही गाणे, ट्रेनमधे नव्हते, नाही ?

चिमण, विशाल, फारएण्ड धन्यवाद Happy

दिनेशदा, बालिका बधू मधलं ते गाणं कदाचित "बडे अच्छे लगते है" असेल कारण त्यात "तुम इन सबको छोडके कैसे कल सुबह जाओगे" अशी ओळ आहे. तसंच "इजाजत" मध्ये ट्रेनस्टेशनवरची वेटिंग रूम कथानकात महत्त्वाची आहे. "विधाता" मध्ये "हातोकी चंद लकीरोंका" हे गाणं रेल्वे इंजिनमध्ये चित्रीत झालंय.

'मामाच्या गावाला जाऊ या..!'.. आपलं लहानपणीच सर्वांत आवडतं बालगीत. हे पण झुकझुक गाडीशी निगडीत आहे.