जनम जनमका साथ है

Submitted by स्वप्ना_राज on 8 June, 2010 - 02:28

चल चले हाथ थामे दो कदम आसमा चुराने के लिये
के फिर सदिया लग जाये ये रिश्ता भुलाने के लिये

ह्या ओळी पहिल्यांदा ऐकल्या तेव्हा वाटलं की ह्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या दुसर्‍याच कुठल्यातरी शतकातल्या आहेत. आजकाल अग्निच्या साक्षीने घातलेली सप्तपदी पुढे दोन पावलांत संपते. दोष कधी एका बाजूचा, कधी दुसर्‍या बाजूचा, कधी दोघांचा, कधी दोघं सोडून आणखी कोणाचा आणि कधी कोणाचाच नाही. कदाचित परिस्थितीचा. स्वर्गात बांधलेल्या गाठी ह्याच जन्मात सुटतात तिथे जन्मजन्मांतरी टिकणारी गाठ मारणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही.

पण तरीही जन्माच्या सीमारेषा पार करून अभंग राहिलेलं प्रेम हे हिंदी वित्रपटस्रृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न आहे आणि ह्याच स्वप्नावर कितीतरी मधुर गाणी रचली गेली. गाणी मात्र तुम्हाआम्हा सर्वांच्या आवडीची - मग तुमचा पुनर्जन्मावर विश्वास असो वा नसो.

गंमत म्हणजे ह्या गाण्यांचा विचार करायला बसलं की मला पहिलं गाणं आठवतं ते "मेरा साया" मधलं "तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा". खरं तर ह्या चित्रपटाची कथा पुनर्जन्माची नाही. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या पत्नीच्या अचानक म्रृत्यूने सैरभैर झालेल्या आणि नंतर हुबेहूब तिच्यासारख्याच दिसणार्‍या स्त्रीला पाहून हबकलेल्या एका तरुणाची ही रहस्यकथा. पण मला हे गाणं आठवायचं कारण म्हणजे ह्या गाण्यातल्या "मेरे प्यारने दिया है तेरा साथ हर जनममे, तू कोई जनम भी लेगा मेरा साया साथ होगा" ह्या ओळी. आपली सर्वसामान्यांची प्रेमाची व्याख्या "In sickness and in health, in poverty or in wealth, 'til death do us part" ह्या पलीकडे जात नाही. निदान एव्हढं टिकवलं तरी डोक्यावरून पाणी. पण ह्या गाण्यातली नायिका मात्र "नजर आऊ या ना आऊ तेरे साथ हूंगी मैभी" असं आश्वासन देते. पुढच्या जन्मी आयुष्याची दोरी त्याच्यासोबतच बांधली जावी हा आग्रह नाही पण तरी त्याच्यावर आपल्या प्रेमाची सावली असेलच हा विश्वास जीवनाचा प्रवास जिथे संपतो त्या सीमारेषेवरून देण्याची हिंमत फक्त खरं निस्सीम प्रेमच दाखवू शकतं, हो ना? बाकी सुनील दत्त ह्या चित्रपटात नेहमीप्रमाणेच इतका देखणा दिसलाय की त्याच्यासाठी कुठलीही स्त्री यमाला (आणि त्याच्या रेड्याला) चकवून परत यावी. Happy

पुनर्जन्म होतो खरा पण कुठे होईल ते का कोणाच्या हातात असतं? मग जगाच्या पाठीवर कुठेतरी तो आणि कुठेतरी ती नवं मिळालेलं आयुष्य जगत असतात. पण नियती दुरून बघत असते. एक फासा कुठेतरी पडतो आणि वाटा एक होतात. नजरानजर होते आणि ओळख पटते - कधी त्याला, कधी तिला, कधी दोघांनाही. आता "मेहबूबा" चं उदाहरण घ्या ना. बहिणीच्या म्रृत्यूनंतर मेहुण्या-भाचासोबत सुट्टी घालवायला आलेला नायक. जीपमधून जात असताना डोंगराच्या कुशीत वसलेल्या त्या गावचा पाणवठा लागतो, तिथे पाणी भरायला आलेल्या तरुणीत "ती" दिसते, तिला कुठेतरी आधी बघितल्यासाऱखं वाटतं. पण तिला तो अनोळखीच असतो. ओळख पटते तेव्हा "बात पुरानी है, एक कहानी है" इथपासून "तडपतडपके इस बिरहनको आया चैन जरासा" इथपर्यंतचा प्रवास इतका पटकन होतो की ह्या भेटीसाठी एक जन्म घ्यावा लागला ह्याचंच विस्मरण व्हावं. दोन जीवांच्या ह्या भेटीचा साक्षीदार ठरतं ते गाणं - मेरे नैना सावन भादो.

पण दोघांचाही पुनर्जन्म झालाच पाहिजे असा कुठे नियम आहे? कधीकधी असंही होतं की एकाला नवं आयुष्य मिळतं पण दुसरा मात्र जिथे ताटातूट झाली त्या सीमारेषेवरच वाट पहात रहातो. "नीलकमल" ची कथा अशीच. राजकुमारी नीलकमलला दुसरा जन्म मिळतो पण तिच्या प्रेमात जीव गमवावा लागलेल्या चित्रसेनाला मात्र मुक्ती मिळत नाही. ती पुन्हा भेटल्याशिवाय ती मिळणार नसतेच. तिला नव्याने मिळालेल्या आयुष्यात रात्री अपरात्री घराबाहेर पडायला लावते ती त्याची आर्ततेने घातलेली साद - *****तुझको पुकारे मेरा प्यार*****

आता तुम्ही म्हणाल की पुनर्जन्माच्या गोष्टीत दाखवून दाखवून काय दाखवणार? एका जन्मीचे प्रेमी, काही कारणाने त्यांची ताटातूट होते. मग पुढला जन्म मिळतो, त्यात पुन्हा भेट होते. ह्याही जन्मात व्हिलन मंडळी थोड्याफार काडया घालतात पण शेवटी प्रेमाची सरशी होते. हाय काय आन नाय काय? खरं आहे एका अर्थी. पण तरी प्रत्येक कथा थोडीफार वेगळीच म्हणावी लागेल.

मेहबूबामध्ये गावच्या पाणवठयावर गाठ पडते तर "कुदरत" मध्ये ह्या आठवणी जागी करते ती एक हवेली. नायिका हेमामालिनी आपल्या आईवडिलांसोबत ट्रेनने एका हिलस्टेशनला जात असते. अचानक एका वळणावर दूर एक हवेली दिसू लागते आणि तिला ती आधी पाहिल्याचं आठवतं. हवेलीतल्या ठाकूरला पाहिल्यावर तर आधीच्या जन्मीच्या नकोश्या वाटणार्‍या आठवणी अजून फेर धरू लागतात. खरं तर तिचं लग्न जवळजवळ पक्कं झाल्यातच जमा. पण राजेश खन्नाला पाहिल्यावर तिला आधीच्या जन्मीची ओळख पटते. मग झाडाच्या बुंध्यावर कोरलेली नावं, त्याच बुंध्याच्या तळाशी दडवलेला हार आणि शेवटी आधीच्या जन्मीच्या त्यांच्या दुर्देवाचं साक्षी असणारं एक गाणं - हमे तुमसे प्यार कितना - शेवटी त्यालाही ओळख पटवून देतातच.

ती गरीब असेल तरी चालून जाईल एक वेळ. पण तो गरीब आणि ती श्रीमंत हे समीकरण जगाला मान्य होणं अशक्यच. म्हणून तर "सावनका महिना पवन करे" "शोर" नही, "सोर" असं आपल्या बीबीजीला समजावून सांगणारा "मिलन"मधला गरीब तरूण तिचं दु:ख पाहू शकत नाही पण तिला वाचवूही शकत नाही. "हम तुम युग युगसे ये गीत मिलनके गाते रहे है, गाते रहेंगे" असं म्हणत त्यांना परत ह्या जगात यावंच लागतं.

कधी मिलन व्हायला एकच जन्म पुरेसा असतो तर कधी जन्माच्या फेर्‍यातून दुर्देवही पाठ सोडत नाही. फॉरेस्ट खात्यात कामानिमित्त आलेला एक शहरी बाबू तिथल्याच एका मुग्ध तरूणीच्या प्रेमात पडतो. "तुम्हारी हो चुकी हू मै तुम्हारे पास हू सदा" म्हणून मधुमतीही प्रेमाची कबुली देते. ह्यातला पूर्वार्ध जरी खरा ठरला तरी उत्तरार्ध खरा ठरणं नियतीला मंजूर नसतं. मग गावच्या एका जमिनदाराची वाईट नजर मधुमतीवर पडते आणि कहाणी सुरू होण्याआधीच संपते. तिच्या दु:खात चूर होऊन जंगलात फिरणार्‍या त्या तरुणाला मग दिसते ती माधवी - आपल्या कुटूंबासोबत जंगलात फिरायला आलेली. पण ती मधुमती नसते. ओळख पटते ती चित्रपटाच्या शेवटी - जेव्हा नायकाला आपली बायकोच मागच्या जन्मीची आपली प्रेयसी असल्याचं लक्षात येतं. एका तरी कहाणीचा शेवट सुखद होतो. कदाचित ह्या असल्या अपवादांनीच प्रेम दुर्देवी असतं हा नियम सिध्द्द होत असेल. मधुमतीची "आजा रे परदेसी" ही साद मात्र अश्या अनेक अधुर्‍या प्रेमकहाण्यांची ओळख बनून राहिली आहे.

अश्यावेळी एक शेर आठवतो:

ऐसा भी इत्तफाक मुझे बरहा हुआ
तुझसे मिला हू तेरा पता पुछता हुआ

आजकाल आपण नेहमी वाचतो की लोकांना सगळं झटपट हवं असतं, कशासाठीही थांबायची म्हणून तयारी नसते. असं असताना हे जन्माचं त्रांगडं कोण ओढवून घेईल? पण काही लोकांना ताटातूट मुळी मंजूरच नसते मग त्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागले तरी बेहत्तर. "उस्तादोंके उस्ताद' ह्या चित्रपटातलं हे गाणं तेच सांगतंय. मला वाटतं हा चित्रपट पुनर्जन्मावर नाही. पण ह्या गाण्याचं चित्रिकरण त्याच पध्दतीने केलं गेलंय. नायिका शकिला एका बेगुमान कोसळणार्‍या धबधब्याच्या काठावर बसलेली आहे. तिला एक गाणं ऐकू येतंय - सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे, ऐ जानेवफा फिरभी हमतुम ना जुदा होंगे. कधी तिला पलीकडल्या तीरावर नायक प्रदीपकुमार दिसतो, तरी कधी गूढपणे गायब होतो. ह्या जन्मीच्या नात्यांचा गुंता सुटत नसताना मागल्या जन्मीची कोडी अशी पडायला लागली तर माणसाने करावं तरी काय? बिचारी कपाळाला हात लावून बसते. Happy

फक्त प्रेमच जन्माच्या सीमारेषा पार करून येतं असं नाही, कधी कधी परा़कोटीची सूडाची भावनासुध्दा एखाद्याला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते. बरोबर ओळखलंत. "कर्ज" मधला रवि वर्मा असाच सूड घ्यायला परत येतो. नाव वेगळं घेऊन, चेहेरा वेगळा घेऊन पण गतजन्मीच्या सगळ्या स्म्रृती घेऊन. ज्या कामिनीने मागच्या जन्मी आपली हत्या केली तिला तिच्या गुन्ह्याची आठवण करून देतो ते गाण्यातून - एक हसीना थी, एक दिवाना था. गिटारीची ती जीवघेणी ट्यून तिला जाणीव करून देते की मागल्या जन्मीचं देणं फेडायला रवि परत आलाय.

जो जन्माला आला त्याला आठवणी चुकल्या नाहीत. पण म्रृत्यू घेऊन जायला येतो तेव्हा तो ह्या आठवणी सोबत नाही नेऊ देत. एका अर्थी बरंच आहे. ह्या जन्मीच्या आठवणी जिथे कधीकधी पेलत नाहीत तिथे हे जन्मोजन्मीच्या आठवणींचं ओझं नसलेलंच बरं. पण जीव तोडून केलेल्या प्रेमाचा ह्याला, का कोणास ठाऊक पण, अपवाद असावा असंच वाटतंय. म्हणून तर एक शायर म्हणून गेलायः

उजाले उनकी यादोंके हमारे साथ रहने दो
न जाने किस गलीमे जिंदगीकी शाम हो जाये

-----

***** McAfee Security Warning for this site - use with Caution

वि.सू.१ - ह्या लेखात काही गाणी निसटून गेली असतील. पण ज्याला Top of the Mind Recall म्हणतात तसं आठवली त्या क्रमाने गाण्यांबद्दल लिहिलं आहे ह्याची नोंद क्रृपया घेणे Happy

वि.सू.२ - काही तपशील चुकले असतील कारण ह्यातले बरेचसे चित्रपट पाहून अनेक वर्ष झाली आहेत. चुकीबद्दल क्षमस्व.

-----

ह्याआधीचं असंच लिखाणः

मेघा छाये आधी रात

गुलमोहर: 

*****तुझको पुकारे मेरा प्यार*****
>>
माझं सर्वात आवडतं गाणं.. कधीतरी अंधार्‍या रात्री ऐकायला मस्त वाटतं..

अजुन लेख वाचला नाही, वाचते आणि सांगते.

तरीही प्रतिक्रिया द्यायची घाई एवढ्याचसाठी की आताच दोन मिनिटांपुर्वी आठवली आपली या विषयीची मेलामेली आणि लगेच तु अजुन का लिहिले नाहीस म्हणुन तुझ्या विपुत लिहायला गेले तर हा लेख दिसला.. म्हटले आधी बघते आणि मगच विपु लिहिते.. Happy

सुन्दर आणि अगदी काव्यमय लेख. अशाच गाण्यांनी आणि त्याला पोषक अशा कथानकांनी हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द झाली आहे. आजच्या कॉम्प्युटर गिमीक्स जमान्यात अशा गाण्यांची चित्रपट निर्मात्यांना गरज वाटत नाही; पण या लेखात लिहिल्याप्रमाणे यांची केवळ आठवण मन प्रसन्न ठेवण्यास मद्त करते.

लेखिकेने म्हटले आहे की, लेखाच्या गडबडीत काही गाणे सुटून गेली असतील. माझ्या मते तसे एक महत्वाचे गाणे सुटले आहे, ते म्हणजे, "आयेगा आनेवाला" लताचे मधुबालावर चित्रीत झालेले "महल" मधील अमर गीत.

असेच आणखीन एक विरहगीत आहे, फार आर्तता आहे या गाण्यात == "कही दूर से आवाज दे, चले आवो, चले आवो." = साहिब बिवी और गुलाम : गीता दत्त

वाव. मस्त वाटले वाचुन...

मला ताजमहल मधल्या गाण्याची आठवण झाली. (कथा जरी पुनर्जन्माची नसली तरीही) .... जो वादा किया वो निभाना पडेगा...

ह्म्म... मस्त लिहिलंस स्वप्ना. आयेगा आनेवाला...तर सुटलंच. पण लेखाचा शीर्षक असलेलं

जनम जनम का साथ है निभाने को सौ सौ बार मैने जनम लिया... हे पण सुटलंच Happy अर्थात हे गाणं पण पुनर्जन्मासंबंधात नाही पण विचार तर तोच आहे ना?

त्यात परत शम्मी कपूरवर चित्रीत झालेलं गाणं बघणं हा एक सुंदर अनुभव असतो. (ज्याना शम्मी कपूर म्हणजे फक्त याहू.. एवढंच माहित आहे त्यानी "एहसान तेरा होगा मुझपर" "जनम जनम का साथ" "आवाज देके हमे तुम बुलाओ" "है दुनिया उसीकी" इत्यादि गाणी अवश्य "बघावीत!!)

सगळ्यांना धन्यवाद! कालपासून काहीच प्रतिसाद नसल्याने लेख जमला नाही असंच वाटत होतं. आज जरा हुश्श वाटतंय Happy

>>मेरा साया मध्ये साधना मात्र सुनील दत्त पेक्षा थोराड दिसलीय.

अगदी अगदी! सुनिल दत्त मात्र कसला झक्कास दिसलाय नेहेमीप्रमाणेच. Wink

प्रतीक, बरोबर आहे तुमचं. महलमधलं गाणं माझ्या लक्षात होतं पण तरी पुनर्जन्मावर नसलेली पण त्याच कल्पनेची अशी २ गाणी - सौ बार जनम लेंगे आणि मेरा साया - आधीच समाविष्ट केल्याने ती घातली नाहीत. तेच "जनम जनम का साथ है" बाबत झालं.

>>कही दूर से आवाज दे, चले आवो, चले आवो
हे गाणं मात्र मी कधीच ऐकलेलं नाहिये. नेटवर मिळतं का पहाते.

नंदिनी, "जनम जनम का साथ है" हे गाणं शम्मी कपूर बबिताला ऐकवत असतो तेच ना ग? तिच्या आसपासच गात असतो आणि तरी तिला तो दिसत नाही हे फक्त हिंदी पिक्चरमध्येच होऊ शकतं Happy

हे गाणं शम्मी कपूर बबिताला ऐकवत असतो तेच ना ग?>> हो, त्यात तो मेलेला आहे असं बबिताला वाटत असतं आणि तो तिला हे "भूत टाईप" गाणं ऐकवून घाबरवत असतो.. मला हे गाणं फार फार आवडतं.

१. नंदिनी, तुम्ही उल्लेख केलेल्या "है दुनिया उसीकी" या गाण्याने काश्मिर की कली मधील गाण्याच्या चित्रीकरणाचा प्रसंग आठवला. रात्रीची वेळ, हॉटेलमध्ये कुणी गिर्‍हाईक नाही, तरीही शांत अशा एका बारमध्ये एक मिलिटरी ऑफिसर बारमनबरोबर काहीतरी शेरोशायरी करीत आहे, आणि त्यातील एक मनाला लागेल असा संदर्भ घेऊन त्याच्या शेजारी खाली मान टाकून बसलेला उदास शम्मी हे गाणे सुरू करतो. ओ.पी. नी गाण्यात वापरलेला 'सॅक्सोफोन' या वाद्याचा वापर अगदी जीवघेणा आहे.

खुद्द ओ.पी.नय्यर यांनी आकाशवाणीवरील एका कार्यक्रमात सांगितले होते की, संगीतकारांच्या मते ज्याच्यावरून गाणी जीव ओवाळून टाकावीत असा एकमेव नायक म्हणजे शम्मी कपूर. हेच मत म.रफीचेदेखील होते. (विशेषतः पडद्यावर हे गाणे रफी म्हणत नसून शम्मी कपूरच म्हणतोय असा भास होतो.)

"लुटा जो मुसाफिर दिल के सफर मे
है जन्नत ये दुनिया उसकी नजर मे
उसीने है लुटा मजा जिन्दगी का
मुहब्बत मे जो हो गया हो किसी का"

फार छान गाण्याचा उल्लेख तुम्ही केला आहात आपल्या प्रतिसादात. (आत्ता परत एकदा यूट्युब वर गाणे पाहिले - परत तोच इफेक्ट !)

२. >>कही दूर से आवाज दे, चले आवो, चले आवो

स्वप्ना_राज : मन अस्वस्थ करणारे गाणे चित्रीत केले आहे स्वर्गीय गुरु दत्त यानी. मूळ संहितेनुसार हे गाणे मीना कुमारीवर चित्रीत होणार होते, पण कथानकाला असलेली "गूढता" कायम रहावी यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक त्या जमिनदाराच्या वाड्याच्या पार्श्वभुमीवर रात्रीच्या वातावरणाचा परिणाम देवून घेतले आहे. यु ट्युबवर नसेल तर गीताच्या ऑडिओ फॉरमॅटमध्ये का होईना, जरूर ऐका.

छान लेख, सगळीच गाणी आवडती, असेच एक गाणे, लता रफी, गूंज उठी शहनाई मधले, जीवन मे पिया तेरा साथ रहे, हाथोंमे तेरे मेरा हाथ रहे.

आणि लताचेच, (बहुतेक कोहरा मधले ) खो दिये, पिछले कई जनम, तेरी तलाश मे, आजा रे आजा.

रफीचे, जनम जनम का साथ है, निभाने को, सौ सौ बार हमने जनम लिये.
नुसते शब्द आठवले तरी मन हरखते !

स्वप्ना.. कित्ती दिवसांनी आलीस.. आणी कित्तीकित्ती छान छान गाण्यांची,सिनेमांची आठवण करून दिलीस्..धन्स गं

सगळ्यांना खूप धन्यवाद Happy ही गाणी माझा जीव की प्राण आहेत. लिहिताना सुध्दा सॉलिड धम्माल येतेय Happy