मेघा छाये आधी रात

Submitted by स्वप्ना_राज on 14 May, 2010 - 00:36

झोपेतून जाग आली तीच कसल्यातरी मोठ्या आवाजाने. पहिली शंका मनाला चाटून गेली ती म्हणजे कुठे बॉम्बब्लास्ट तर झाला नाही ना. काय दिवस आलेत बघा. अंधारात चाचपड्त मोबाईल शोधला. तो रात्रिचे किंवा पहाटेचे म्हणा हवं तर ३-३:१५ दाखवत होता. कुठलाही हाडाचा अतिरेकी ह्या वेळेला ब्लास्ट करणार नाही हे नक्की. कधीही न झोपणारे शहर म्हणून ख्याती असली तरी पूर्ण सुनसान असण्याचे काही क्षण मुंबईच्या रस्त्यांच्या नशीबात दर रात्री असतातच असतात. बर एव्हढ्या रात्री कोणी फटाके वाजवणार नाही. आपण आवाज नक्की जागेपणी ऐकला का स्वप्नात असा विचार करेतो एकदम चकचकाट झाला आणि मागून "धडामधुडूम"! आता मात्र मी पांघरूण फेकून देऊन उठले. अहो, पावसाने गाढ झोपेतून उठवायचे क्षण किती वेळा आपल्या शहरात राहणार्‍यांच्या आयुष्यात येतात? आणि हा पाऊस तर मॉन्सून ऑफिशियली सुरू व्हायच्या आधीचा - म्हणूनच जास्त लाडका. त्याच्या स्वागताला गेलंच पाहिजे!

मी खिडकीत उभी राहितो पावसाने ताशा वाजवायला सुरुवात केली होती. माझी झोप कुठल्या कुठे पळाली. खिडकीला लागून केलेल्या मार्बलच्या स्लॅबवर मी ठाण मांडलं. अब मै और मेरी तनहाई - सोबतीला भुरुभुरु पडणारा पाऊस, मधूनच चमकून जाणारी विजेची पांढरीधोप रेष आणि आभाळातली गडगडणारी म्हातारी. आवडीची पावसाची गाणी अश्या वेळी कशी मागे रहातील? त्यांनीही मनात पिंगा घालायला सुरुवात केली. ह्यातली काही गाणी पावसाभोवती गुंफलेली तर काहींमध्ये पावसाची फक्त पार्श्वभूमी - पण गाणी सगळी बेहद्द आवडीची. पहाटेच्या ३-३:१५ वाजता एका सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात रंगलेल्या ह्या महफिलीचा हा व्रूत्तांत - मेरी पसंद: मेघा छाये आधी रात!

पहिलं गाणं मनात डोकावून गेलं ते "इजाजत" मधलं "छोटीसी कहानी से बारीशोके पानीसे".नसीरूद्दीन शाह आणि रेखाची स्टेशनवरच्या वेटिंग रूममधे सुरु होऊन तिथेच संपणारी ही कहाणी. गंमत म्हणजे मी हे गाणं कधी पाहिलंच नाहिये. म्हणजे पिक्चर पाहिलाय पण हे गाणं कसं काय माहित पण निसटून गेलं. ह्यातले "ना जाने क्यो दिल भर गया, ना जाने क्यो आख भर गयी" हे शब्द तर खास आवडीचे. दु:ख आणि वेदना व्यक्त करणारे शब्दच आपल्याला जवळचे का वाटतात? तेच शाश्वत सत्य असतं म्हणून? पावसाच्या पाण्याने सगळा आसमंत त्रृप्त होऊन भरून गेलेला असताना दु:खाची का बरं आठवण व्हावी हिला? पाऊस ओसरुन गेल्यावर येणारा भकास रिकामेपणा हिला आत्ताच दिसतोय का? का आनंदाचे क्षण निघून गेल्यावर मागोमाग येणार्‍या आणि दशांगुळे भरून राहणार्‍या दु:खाची चाहूल लागली आहे? मला मात्र "सारी वादी भर गयी" हे शब्द ऐकले की डोळ्यांपुढे एक खूप छान हिरवंगार रान येतं, मोठी मोठी झाडं, क्षितीजाला टेकून शतकानुशतके उभे असलेलेल पहाड आणि झाडांच्या फटीतून दिसणारं दरीमधलं एक छोटं पहाडी गाव...आणि सगळीकडे "नभ उतरू आलेलं". कधी वाटतं कुठल्यातरी सिनेमात पाहिलं असणार, कधी वाटतं "शतजन्माची खूण" ओळख पटवायचा प्रयत्न करते आहे. कधीतरी एखाद्या वेळी पहाडांची खूप आतून साद येईल आणि त्याला प्रतिसाद देऊन मी शेवटी जाईन तेव्हा मला ती ओळख पटेलही. पण तोवर "मागल्या वेळी न सांगता जावं लागलं. आता जायची परवानगी दे" म्हणून वेटिंग रूमच्या बाहेर पडणारी रेखा आठवत मी मनातल्या मनात हे गाणं गुणगुणत राहते. तुम्हाला ऐकायचंय? मग ऐका तर

विजेची पांढरीधोप रेष परत चमकून गेली, मागून कडाडून आवाज झाला आणि एक गाणं मनात डोकावलं - हसते जख्म मधलं "तुम जो मिल गये हो". खरं तर हे सुंदर गाणं नवीन निश्चल आणि प्रिया राजबंशवर अक्षरशः वाया घालवलंय. पूर्ण गाणंभर दिसत राहातात ते हातात गाडीचं स्टिअरिंग व्हील उगाच गरगर फिरवून गाडी खरंच चालत नाहिये ह्याची जणू खात्री पटवून देणारा नवीन निश्चल आणि त्याच्या शेजारी बसून अभिनय करण्याचा निष्फळ प्रयत्न करणारी प्रिया राजबंश. मी तर हे गाणं एकदाच पाहिलंय आणि मग नुस्तं ऐकलंय. गाण्यात मधून्मधून वीज कडाडल्याचा आवाज इतका खुबीने पेरलाय की भर उन्हाळ्यात आषाढाचा भास व्हावा. ह्यातल्या "एक भटके हुए राहीको कारवा मिल गया" ह्या ओळी तर जीव की प्राण. त्या प्रतिकात्मक आहेत हे ठाऊक असूनही जितेन्द्रच्या "कारवा" मधे दाखवलंय तश्या बंजारा लोकांच्या दूरपर्यंत पसरलेल्या बैलगाड्या दिसत रहातात. खरं तर ह्या दुनियेत जो तो "भटका हुआ राहीच". आपापला कारवां मिळण्याचं आणि मिळून त्यासोबत अखेरपर्यंत चालत रहाण्याचं भाग्य फार थोड्यांच्याच वाट्याला येते. म्हणून तर "किस्मतसे मिल गये हो मिलके जुदा ना हो" ही आशा आणि प्रार्थनासुध्दा. सगळं वातावरणच कसं एकदम "रुमानी" होऊन जातं ह्या गाण्याने. माझा कारवां कुठे आहे कोणास ठाऊक. हे गाणं ऐका आणि तुमचा कारवां ह्यात मिळतो का ते पहा बरं:

एव्हाना समोरच्या बिल्डिंगमध्ये १-२ दिवे लागले होते आणि बाल्कनीमध्ये डोकी दिसत होती. माझ्यासारखेच कोणी पाऊसवेडे असणार. त्यांच्याही मनात माझ्या मनातल्यासारखी मैफिल सजली असेल का? आयुष्यातल्या न सुटणार्‍या अनेक कोड्यांपै़की हेही एक. माझ्या मनातली मैफिल मात्र अव्याहत चालू होती. त्यात आता सूर होते राज कपूरच्या "प्यार हुआ इकरार हुआ" चे.

फार वर्षांपूर्वी एका जाहिरातीसाठी ह्या सुरेख गीताचा वापर केलेला पाहून माझ्या जीवाची काहिली झाली होती. त्यानंतर बरेच दिवस हे गाणं ऐकलं की ती जाहिरातच आठवायची. पण सुदैवाने आता ह्या गाण्याबरोबर आठ्वते ती एका छत्रीत भिजणारी राज कपूर आणि नर्गीसची जोडी. "प्रेमा तुझा रंग कसा" हा प्रश्न सार्थ ठरवणारी अनेक गाणी ह्या भावनेवर रचली गेली आहेत. पण ह्या गाण्यात मला प्रेमाच्या सगळ्या रंगांचं एक सुंदर इन्द्रधनुष्यच दिसतं. म्हणजे बघा हं.....सुरुवात होते ती ह्या जाणिवेतून की आपला कोणावर तरी जीव जडलाय. एक अस्पष्ट का होईना पण कबूली सुध्दा दिली आणि घेतली जातेय. पण तरीही मन कचरतंय. प्रेमाचा मार्ग सरळधोप नसतोच आणि त्यातून ज्याचा हात धरून त्यावर चालायला सुरुवात करावी त्यानेच साथ सोडली तर काय होईल ह्या भीतीचं काहूर दोघांच्याही मनात. म्हणूनच एक्मेकांना विचारतात "कहो के अपनी प्रीतका गीत न बदलेगा कभी, तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी". पुन्हा पुन्हा तितक्याच आर्ततेने जीव लावणं शक्यच नसतं. आणि नेमकं हेच व्याकूळ होऊन सांगणारे शब्द "चांद ना चमकेगा कभी". प्रेमाचा मार्ग अश्याच असंख्य विझलेल्या चंद्राच्या फुटक्या तुकड्यातून जातो.

तरीही मनाच्या कोपर्‍यात आपल्या प्रेमावर विश्वास आहे. आयुष्य नावाच्या जुगाराने फेकलेलं कुठलंही दान स्विकारण्याची त्याच्या शक्तीवर असलेली निष्ठा आहे - गीत हमारे प्यारके दोहरायेंगी जवानिया. आणि शेवटी "मै न रहुंगी, तुम न रहोगे, फिरभी रहेगी निशानिया" - रेनकोट्स घालून चाललेली ३ गोजिरवाणी मुलं दिसतात. युगानुयुगं चाललेल्या प्रेमाच्या खेळातले पुढले शिलेदार. धुवांधार पावसाच्या साक्षीने केलेला हा प्रेमाचा अक्षर उच्चार ऐकाच.

पाऊस हा आपल्या सगळ्यांच्या लेखी असा "रोमान्स" घेऊन येणारा. आता मुंबईमध्ये रहाणार्‍या लोकांना हे पटवून देणं अवघड आहे कारण "मीलन" म्हटलं की त्यांना "अब चैन पडे तबही जब उनसे मिलन हो ले" न आठवता टीचभर पावसाने भरून वाहणारा मिलन सबवे आठवतो Wink पण भूगोलात म्हणतात तसा "भारत हा क्रृषीप्रधान देश आहे"! शेतकर्‍यांइतकी पावसाची वाट फक्त चातकच बघत असेल. माझ्या मनातलं पुढलं गाणं "पलकोकी छावमे" मधलं "अल्ला मेघ दे". पाऊस पडावा म्हणून सगळे गावकरी आळवणी करताहेत.काही तर गाव सोडून शहराच्या दिशेने निघालेत. गाण्याच्या शेवटी मात्र पाऊस त्यांना निराश करत नाही. कच्चीबच्ची, म्हातारेकोतारे, बायकापुरुष सगळे बेभान होऊन पावसात नाचायला लागतात. आणि गाव सोडून जड अंतःकरणाने निघालेली पावलं आनंदाने परत गावाकडे धावत सुटतात. आता गाव सोडून जायचं कारणच काय? ऐका तर मग आणि पहा ती पावलं तुम्हालाही दिसतात का.

मी किशोरदांची जबरदस्त फॅन आहे. "चलती का नाम गाडी"ची अक्षरशः पारायणं झालीत आणि होत राहतील. त्यामुळे माझं मलाच आश्चर्य वाटलं की "एक लडकी भीगीभागीसी" मला आधी कसं नाही आठवलं. पाऊस ह्या गाण्यात येतो तोच मुळी ओल्याचिंब मधुबालाला बरोबर घेऊन. खरं तर श्रीमंताघरच्या ह्या लेकीची आणि गॅरेजमध्ये मेकॅनिक असलेल्या मन्नूची गाठ पडणं अशक्यच. पण ज्यांच्या गाठी बांधल्या गेलेल्या असतात त्यांना नियती समोरासमोर आणतेच. इथे पाऊस आणि बंद पडलेली गाडी केवळ निमित्तमात्र होतात. गाडी रिपेअर करता करता तिची थट्टा करायला मन्नूने गायलेल्या गाण्यात त्याची साथसोबत करतात ती त्याची गॅरेजमधली हत्यारं. माझ्यापुरतं म्हणाल तर ह्या सुरेख गाण्यातले "सावनकी सुनी रातमे" हे शब्द मला फार आवडतात पण बुचकळ्यात सुध्दा टाकतात. मान्य आहे की धुवांधार पाऊस पडत असताना रस्ते-गल्ल्या सुनसान होतात. पण बाहेर सामसूम असलं तरी मनात आपण एकटे नसतोच अश्या वेळी. सुखदु:खांच्या आठवणींचे लपंडाव, आवडत्या गाण्यांचे सूर आणि उगाच दाटून येणारी हुरहुर साथसोबत करतातच. खरं ना? मग भेटा की त्या "भीगीभागीसी लडकी"ला?.

एरव्ही मला रात्री झोप नाही आली तर सारखी घड्याळाकडे नजर जाते. दुसर्‍या दिवशी करायच्या कामांची यादी डोळ्यांपुढे दिसू लागते. पण त्या दिवशी मात्र घड्याळाची आठवणदेखील झाली नाही. गुढग्याभोवती हात बांधून घेऊन मी खिडकीत बसून राहिले. नजरेसमोर फक्त धाराधारांनी कोसळणारा पाऊस, कानांत भरून राहिलेला त्याचा नाद आणि मनात मधूनमधून दाटून येणारी हुरहूर. अशी हुरहूर हा सगळ्यांनाच लावतो का? बरं ही हुरहूर का ह्याचं तरी कारण कुठे सापडतं? हीच हुरहुर सोबत घेऊन आली 'चांदनी" मधलं "लगी आज सावनके फिर वो झडी है". आयुष्याच कसं असतं ना - आपलं हक्काचं, प्रेमाचं, जीव लावणारं माणूस मिळावं म्हणून आपण सगळेच किती धडपडतो. कधी कधी असं माणूस मिळतं आणि मग एका वळणावर आयुष्य अचानक दोघांच्या वाटा वेगळ्या करतं, इतक्या वेगळ्या की त्या जन्मात पुन्हा एक होणं शक्य नसतं. मग एखादं गाणं, एखादा आवाज, एखादे डोळे, एखादं हसू त्या आठवणी घेऊन येतं. इथे ही आठवण घेऊन पाऊस आलाय. बाहेर तो मनमुराद कोसळतोय पण तरीही पाऊस पडलेल्या वाळवंटासारखं मन कोरडं ते कोरडंच, डोळे मात्र काठोकाठ भरून आलेले. काळजातून उठलेला वेदनेचा जीवघेणा सूर एक आपल्याला ऐकू येतो आणि दुसरा त्या अव्याहत बरसणार्‍या पावसाला.युगानुयुगं त्याने असे भरून आलेले किती डोळे पाहिले असतील. तुमच्यासाठी हे गाणं काय आठवण घेऊन येतंय बघा पाहू.

बाहेर तो असाच बरसत राहिला आणि मनाच्या गाभार्‍यात सूर घुमत राहिले - गुड्डीतलं बोले रे पपिहरा, परखमधलं ओ सजना बरखा बहार आयी, काला बझारमधलं रिमझिमके तराने लेके आयी बरसात, मंझिलमधलं रिमझिम गिरे सावन.....उण्यापुर्‍या २०-२५ मिनिटांचा खेळ. पण तेव्हढ्यात त्याने त्याच्याबरोबर झालेल्या किती भेटी सोबत आणल्या. ह्यात कॉलेज कॅम्पसमध्ये एके संध्याकाळी एकटीच फिरायला गेले असताना अचानक येऊन नखशिखांत भिजवलं ती भेट आहे. बेळगावातल्या आजोळीच्या घराच्या अंगणात गारा बरोबर घेऊन आला होता तेव्हाची भेट आहे. संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या टॅक्सीत बसून एफएमवरची पावसाची गाणी ऐकतानाची भेट आहे. पेरियारच्या जंगलात भल्या पहाटे फिरायला गेले असताना अचानक येऊन माझ्या सगळ्या बेतावर त्याने पाणी फिरवल्याची आठवण आहे. आणि आपल्या मायभूमीपासून दूर असताना एका उदास संध्याकाळी माझी साथ करायला आला होता तेव्हाची भेट आहे.

त्या रात्री मात्र तो पडायचा थांबला तेव्हा उदास नाही वाटलं. मला माहित आहे ह्या वर्षी तो लवकर येणार आहे. गुढघाभर पाण्यात लोकांना चालायला लावून स्वतः त्यांच्या शिव्या खाणार आहे, पण तरीही त्यांना गरम चहा आणि भजी खायला लावणार आहे, ऑफिसला दांडी मारायची संधी देणार आहे आणि "वंदा नाहीतर निंदा" - काहीही झालं तरी ह्यापुढल्या प्रत्येक वर्षी उशीरा का होईना पण न चुकता येणार आहे. आजकालच्या जगात ज्याच्यावर विश्वास ठेवावा अश्या मोजक्या उरलेल्या गोष्टींमध्ये हा माझा मित्र आहे. एका जुन्या हिंदी गाण्यात थोडासाच बदल करून मी म्हणेनः

कारे कारे बादरा आ रे आ रे बादरा
मेरी अटरिया तू शोर मचा

-----

वि.सू. मला माहित आहे की ह्या लेखात काही खूप छान पावसाची गाणी निसटून गेली असतील. पण ज्याला Top of the Mind Recall म्हणतात तसं त्या वेळी आठवली त्या क्रमाने गाण्यांबद्दल लिहिलं आहे ह्याची नोंद क्रृपया घेणे Happy

हा लेख आवडला (आणि अजून वाचायची ताकद उरली असेल!) तर इथेही नजर टाका Happy माझ्या अंगणातच रिक्षा फिरवतेय Wink

गुलमोहर: 

खुप सुंदर लिहिलं आहेस स्वप्ना.... खरंच मी कितीतरी अश्या नि:शब्द भेटी अनुभवल्या आहेत पावसाच्या... एक वेगळंच स्थान आहे पावसाला माझ्या आयुष्यात.... या लेखाच्या निमित्ताने परत सगळ्या भेटींची उजळणी झाली.... Happy धन्स....

काय लिहिलंयस गं जबरदस्त....
मलाही पाऊस पडायला लागला की असेच काहीसे वाटायला लागते... आता तर खास वाटेलच...

वाह वाह मस्त लिहिलंत!

पाऊस सुरु झाला की मला ३ गाणी आठवतात.
१. सावन बरसे तरसे दिल, क्यों ना घरसे निकले दिल
२. रिमझिम गिरे सावन (लताच्या आवाजातलं)

३. आपला मायबोलिकर, प्रसाद शिरगावकर यांची पावसावरची खालील कविता -

मी नसताना जेव्हा माझ्या गावी तू गेला असशील (हे कवी पावसाला सांगतोय)
बेभान होऊन दुपारभर माझ्या अंगणात कोसळला असशील.

सांग मला..सांग मला, मी नव्हतो म्हणून थोडं जास्त दाटलं होतं का?
अंगणामध्ये नेहमीपेक्षा पाणी जास्त साठलं होतं का?

सुटला होता का मृद् गंध, जो नेहमी वेड लावायचा,
वाहिला का गार वारा, जो माझ्या मागे धावायचा

आभाळ भरून दाटला असेल, जांभळ्या मेघांचा पूर
विजांबरोबर नाचण्यामध्ये, तू झालाही असशील चूर

पहीला स्पर्श तुझ्या थेंबांचा, राहून राहून छळतो आहे,
तू नाही आलास तरी तूझ्या आठवणींचा पाऊस कोसळतो आहे
तू नाही आलास तरी तूझ्या आठवणींचा पाऊस कोसळतो आहे...

या कवीतेची त्यांच्याच आवाजातली रेकॉर्ड आहे माझ्याकडे. सादरीकरण पण खिळवून ठेवतं.

आपल्या लेखामूळं खुप सार्‍या आठवणी जागवल्यात पावसाच्या....असंच मस्त लिहीत रहा!

सुंदर लिहीलं आहे,स्वप्ना_राज. Happy

गंमत म्हणजे मी हे गाणं कधी पाहिलंच नाहिये. म्हणजे पिक्चर पाहिलाय पण हे गाणं कसं काय माहित पण निसटून गेलं >>> बहुतेक या गाण्यनेच इजाजतची सुरुवात होती.

अविकुमार,प्रसादची कविता सही! Happy

सुंदर लिहीलयं.. खुप आवडलं..

मला संदिपचं "सरीवर सर" नक्की आठवतं अशा वेळी..आणि मग "दुरवर रानभर नाचणारा निळा मोर, मोरपिस मखमल ऊतु गेलं मनभर" असं दिवसभर वाटत राहतं! Happy

गोड लिहितेस अगदी!!! Happy
स्वप्ना.. 'तुम जो मिल गये हो' .हे गाणं फक्त ऐकावच..पाहिलं तर अक्षरशः बेचव होतं .. Biggrin
माझं फेव. वारिस मधलं 'कभी कभी ऐसा भी तो,होता है जिंदगी में"आणी तू जी मेन्शन केलीयेस ती सर्व

मराठीतील तुझ्यावाचून करमेना मधील ' गूज ओठांनी ओठांना सांगायचे एका पावसात दोघांनी भिजायचे' आठवले.सगळी भांडणे, रुसवे , अबोला सोडुन परत नव्याने सुरवात्.प्रत्येक पावसात नक्की आठवते.

मंडळी, लेख बराच मोठा झाला. पण पेशन्स ठेऊन वाचलात हेच खूप आहे. Happy प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

अविकुमार, रिमझिम गिरे सावन माझंही अत्यंत आवडतं गाणं आहे. प्रसाद शिरगावकर यांची कविता पोस्ट केल्याबद्दल आभार! फार छान कविता आहे.

प्रकाश, तसंच असेल कदाचित पण मी हा पिक्चर तुकड्यातुकड्याने पाहिल्यामुळे मधे कधी तरी मिसलं अशी माझी समजूत झाली होती.

चिंगी, संदीपच्या कवितेवर तुम्हाला अनुमोदन! Happy

वर्षा, अगदी अगदी ग. प्रिया राजबंश म्हणजे ठोकळा नुसता. ते गाणं परत पहायची माझी अजिबात इच्छा नाही.

श्रावणी, मराठीतल्या गाण्यावर लिहायचं होतं पण एव्हढी माहिती नाही मला त्यांची Sad

अजय, नक्की ऐका सारी गाणी पुन्हा. आज शुक्रवार असल्यामुळे मौका भी है और दस्तुरभी Happy

मस्त लिहिलय.
मला वाटतं छोटीसी कहानी टायटल साँग आहे इजाजतचं. पण त्यात एखादच कडवं आहे. बाकीची कडवी नंतर background ला येतात का ते आठवत नाहिये.

सुरेखच लिहिलयस स्वप्ना.. Happy पावसावरची हिंदी, मराठी सगळीच गाणी नि कविताही अ प्र ति म आहेत.. Happy
अविकुमार.. प्रसादची कविता मस्त आहे.

मस्तच लेख स्वप्ना. गाणी पण खासच.
पाऊस सुरू झाला की हमखास आठवणारं अजून एक- 'जिंदगीभर नही भूलेंगी वो बरसात की रात..'
एकेक ओळ, कडवं लाजवाब.

छान लिहिलयेस गं! माझ्याही जीवनात घडणा-या प्रत्येक ब-या वाईट गोष्टीचा साक्षिदार पाऊस आहे त्यामुळे ....माझ्यासाठी पाऊस म्हणजे एक मनातला एक हळवा कोपरा....! Happy

स्वप्ना, मस्त लिहीत आहेस.
कहो के अपनी प्रीतका गीत न बदलेगा कभी, तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी". पुन्हा पुन्हा तितक्याच आर्ततेने जीव लावणं शक्यच नसतं. आणि नेमकं हेच व्याकूळ होऊन सांगणारे शब्द "चांद ना चमकेगा कभी". प्रेमाचा मार्ग अश्याच असंख्य विझलेल्या चंद्राच्या फुटक्या तुकड्यातून जातो. >> अप्रतिम! आज इथेच थांबणारे. पुढचं वाचलं की प्रतिसाद देईन अजून. Happy
एक पॉज घेऊन वाचलाच. खूपच छान लिहीलंयस. लगी आज सावनके फिर वो झडी है, रिमझिम गिरे, सरीवर सर, गारवा, कधीकधी तर गुलाम अलींच्या (पावसाशी संदर्भ नसलेल्या) गजला सुध्दा सुरेख साथ देतात आपली! Happy पुलेशु गं!

खूपच सुंदर लिहिलंय. रात्री येणारा पाऊस मला नेहमी कुणाचीतरी साथ शोधत आलाय असंच वाटतं. दिवसभर त्याच्याकडे बघायला फारच कमी लोकाना फुरसत असते म्हणून मग रात्री येउन तो आपल्यातल्या रसिकांना शोधतो. असं कोणी सापडलं की त्याला पण सार्थक झाल्यासारखं वाटत असेल. त्या रात्री तुम्ही सापडलात. सुखावला असेल तो.

मस्त गं......... असाच भन्नाट वारा सुटावा, आकाशात वीजा कडाडाव्यात, मृद्गंधाचा दरवळ रंध्रारंध्रांतून अनुभवावा आणि पावसांच्या बेभान सरींसोबत अशा अवीट गोडीच्या गाण्यांचा भिजवून टाकणारा शिडकावा!!

स्वप्ना लेखन छान झाले आहे..
आणी "छोटीसी कहानी से बारीशोके पानीसे" हे गाणे .. चित्रपटात नाहीये..
ते सुरुवातीला जेव्हा टायटल्स येतात तेंव्हा आहे Happy .

स्वप्ना, खुप मस्त लिहिले आहेस. रिमझिम गिरे सावन माझेही खुप आवडते गाणे आहे. तुझ्या लेखातली सगळी गाणी लगेच ऐकली. Happy

सुरेख लिहिलयस स्वप्ना.
आज इथे सकाळी ढगाळ होतं. तेव्हा सहजचं 'रिमझिम गिरे सावन' गाण गुणगुणु लागले. मग एकामागुन एक सुंदर गाणी ऐकली आणि आता तुझा हा लेख. Happy

Pages