पैल पाऊस

Submitted by जया एम on 31 July, 2010 - 10:33

पाऊस डोंगरावरती, पाऊस दरीच्या पोटी
थेंबाची अवखळ गुपिते नाचली झ-याच्या ओठी

पाऊस कोसळे तेंव्हा धारांचा गुंता होतो
पाण्याची अवघड कोडी डोळ्यांना घालत जातो

पाऊस गर्द झरताना करतो तो प्रश्न मनात
मी घनभर बरसत आहे का फक्त तिच्या डोळ्यात

पाऊस प्रौढ बहराचा प्राणांना भिजवून गेला
जन्माच्या पार तटाला आत्म्याला अंकुर आला

ती ऋतू ओंजळीत धरते, पाऊस असा येताना
तो पैलतीरावर थांबे वादळे शांत होताना

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस प्रौढ बहराचा प्राणांना भिजवून गेला
जन्माच्या पार तटाला आत्म्याला अंकुर आला

विलक्षण कल्पना, अफाट प्रतिभा आणि अफलातून शब्दयोजना... यावर गेयतेची ट्रीट म्हणजे काय बोलायचं अजून ?

Pages