ती स्वप्नसुंदरी

Submitted by अभय आर्वीकर on 29 July, 2010 - 10:16

ती स्वप्नसुंदरी

'सात' खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
.
. गंगाधर मुटे
………………………………….…

गुलमोहर: 

वा वा मुटेजी......

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

हा शेर आणि काही सुटे मिसरे फारच छान आहेत.

डॉ.कैलास

१. चवथ्या शेराचा अर्थ कोणाला तरी लावता येईल.याची मला खात्री आहे.

२. कंसातील प्रश्नचिन्हाचे' आविर्भाव कसे करावे ते शिकावे लागेल. गझल पुढे न्यायची ना? मग एकेविसाव्या शतकात चौदाव्या शतकाचे आविर्भाव कसे चालणार?

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

या शेराचा मला लागलेला अर्थ...... मानवाने इतकी प्रगति केलीय्,की अवकाश क्षेत्रातील मंगळ्,चंद्र आदिंवर मानवाची पावले पोचली आहेत..... पण तरीही इतकी विषमता आहे की कित्येक ठिकाणी दोन वेळचे खायला मिळत नाही इतके दारिद्र्य आहे.

बाकी एखादी गोष्ट कंसात का लिहावी हे मला खरंच माहित आहे का या विषयी मी साशंक आहे....... उद्गार असतील किंवा एखादे सुभाषित असेल तर ते कंसात लिहावे असा माझा समज आहे... जाणकारांनी कृपया अजून प्रकाश टाकावा.

डॉ.कैलास

<<आकार घटत चोळी, जाते सरासरी! दोन्ही! हझलीश प्लस सामाजिक वगैरे वगैरे!>>

बेफिकीरजी,

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

हा हझलेचा नव्हे तर गझलेचा शेर आहे. १०१% खात्री.

गंगाधरजी मस्त गझल.
खेड्याकडूनचे मी चुकून खेकड्याकडूण वाचले... तसे खेकडे आहेतच म्हणा भोवती... असो....
गंगाधरजी तुमचा एक चाहता म्हणून विनंती आहे. वादात पडू नका. आज अशी बातमी एकली की फाटक्या कपड्याची माणसं दिसेल त्याचे कपडे फाडत चाललियेत. रसिक म्हणून सांगतोय बरका... नाहीतर तुम्हाला राग यायचा.

कैलासजी,
अर्थाचा उलगडा केल्याबद्दल आभारी आहे.

पुर्वी शालेय अभ्यासक्रमात एक धडा होता. काहीसा असा.

भैरू पहाटे उठतो.शेतात जातो, बांधावर बसून कांदाभाकरीची न्याहारी करतो.

तेंव्हा माणसाची झेप मंगळापर्यंत पोचलेली नव्हती.

,,,,,,,
ते चित्र पाहतांना दिसते समानता(?)
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

हा शेर

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

असा वाचला तरी चालेल.
...................................................
अवांतर.
हबा.
त्या बातमीला फाटक्या कपड्याची माणसं घाबरतील. माझा काय संबध? Happy

@ सिंडरेला

रेड--- रेडीश
ग्रे----ग्रेयीश
ब्लू----ब्लुयीश... तसंच्,हझल----- हझलीश

डॉ.कैलास

चवथ्या शेराचा डॉ.कैलास यांनी लावलेला अर्थ मलाही 'ज्ञात' होता (हे म्हणणे आता 'साळसूदपणा' वगैरे ठरू शकेल.)

पण हा 'भैरू' कोण ते काही समजेना! आमच्या शालेय अभ्यासक्रामत कुणीही 'भैरू' नव्हता हा प्रॉब्लेम असावा.

तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी
मीटर बरोबर वाटत नाहीये (गा गा ल गा ल गा गा | गा गा ल गा ल गा ; हो ना?)
लघु-गुरु चा क्रम बरोबर असेलही, पण पंचमधला पं हाही गुरू बनूनच आलेला आहे.

आनंदयात्री!

बहुधा आपल्याला 'पंच' मधील 'च' बद्दल म्हणायचे असावे!

पण गंगाधर मुटे अनेकदा 'गा' मधील एक 'ल' एका शब्दात व दुसरा 'ल' दुसर्‍या शब्दात घेत आलेले आहेत.

'पं' गुरूच असणार असे वाटते!

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. Happy

गंगाधर मुटे अनेकदा 'गा' मधील एक 'ल' एका शब्दात व दुसरा 'ल' दुसर्‍या शब्दात घेत आलेले आहेत.

हे खरे आहे. ते योग्य नसेल तर यापुढे नक्किच काळजी घेईन. चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.

>>> हे खरे आहे. ते योग्य नसेल तर यापुढे नक्किच काळजी घेईन.
योग्य नाही असे नाही...

"इतकेच मला जाताना सरणावर कळले होते" - सुरेश भटसाहेब
(हे उदाहरण पटकन आठवले म्हणून दिले आहे)
इथे च आणि म मिळून एक गुरू झालाय... तात्पर्य, उच्चारामध्ये अडचण येत नसेल तर गुरु split करता येतो..

तुम चा ल वा द आ हे, पं चतु म चे घ री
आपले मीटर बरोबर आहे, पण म्हणून बघताना तिथे अडखळायला होतंय.. Happy

"मात्र उघड्यावर" इथेही - मा त्रउ घ ड्या व री असा क्रम बरोबर दिसतोय. पण "मात्र" यात आपण मा चा उच्चार स्वतंत्र आणि त्र चा उच्चार स्वतंत्र करत नाही, तर त्र मधला त् आधीच्या मा बरोबर येतोच. अशावेळी वाचताना अडखळायला होते.

अगदी सोपं करून सांगायचं तर,

शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी
आकार घटत चोळी, जाते सरासरी
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी
हे पाच सानी मिसरे आणि

भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

हे एकापाठोपाठ वाचत सुटा... शेवटचे दोन वाचताना तो उच्चाराचा मुद्दा आपोआप कळेल...
गझल लिहिताना मीटरप्रमाणेच या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे.
धन्यवाद!

फारच सुंदर

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

__/\__

आनंदयात्रीजींचे प्रतिसाद फार आवडले... त्या बद्द्ल धन्यवाद

_____________________________________________________
अवांतर :
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते.....

मी अगदी चार दिवसांपुर्वीच ह्या ओळी माझ्या आवडत्या ओळी म्हणून लिहिल्या होत्या... पहिली ओळ चुकली होती ती आता दुरुस्त केली आहे... त्याबद्दल आभार...

<<मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी >> अतिशय छान अर्थपुर्ण लिहल आहेत . Happy

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.

आनंदयात्रीजी, आभारी आहे. Happy

हवा तसा आशय राखण्यासाठी लयीवर अन्याय होतो.
आणि लय राखायचे म्हटले तर आशयावर अन्याय होतो.
काहीसं असं चाललंय माझं.

मुटेजी,
तुम्ही नेहमीप्रमाणे सुंदरपणे,मार्मीकपणे वास्तव फोडुन काढलयं !
जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी

भारत हा एकमेव असा देश असेल की जिथे अशी अवस्था असेल !!

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. Happy

अनिलजी,
त्याशेराच्या संदर्भात दुसरा एक मुद्दा बघा.

पालेभाज्या घाणेरड्या जागेत विकल्या जातात.
पालेभाज्यांचा संबंध मानवी आरोग्याशी आहे.
परंतू

पालेभाज्या किमान स्वच्छ,निर्जंतूक जागेवर
एसी जाऊ देत पण चांगल्या काचेच्या कपाटात विकणे आवश्यक/बंधनकारक आहे असे मत या देशातल्या एकाही पुढार्‍याने, एकाही आरोग्य तज्ज्ञाने व्यक्त केल्याचे माझे ऐकण्यात/वाचण्यात नाही. Happy

Pages