तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by ह.बा. on 26 July, 2010 - 04:53

तुझ्याहून मोठा गुन्हेगार आहे
तुला लोकशाही नमस्कार आहे

जरी देश दिसला कफल्लक तुला हा
तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

किती मर्द झिंगून मेले तरीही
बुळ्याचीच बाईल गरवार आहे

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे
घरी लोड शेडींग... अंधार आहे!!!

अशी टाळते का मला भेटणे ती?
(तिला मी असे काय करणार आहे?)

तिला मारले अन हिचा रेप झाला
तिलाही मलाही भिती फार आहे

कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे?

-ह. बा.

गुलमोहर: 

डॉ.राऊत साहेब, बेफिकीरजी,शरदजी
मनपुर्वक धन्यवाद.

तुमचे गझलेविषयीचे मत आणि दृष्टीकोण लेखी स्वरूपात मांडल्याशिवाय इतरांना कळणार नाही.
त्यामुळे नुसत्या अपे़क्षा व्यक्त करून भागणार नाही तर ते सविस्तर मांडायला हवे, एवढीच माझी विनंती होती व आहे.

बेफिकिर,

'गझल सहयोगच्या' मुशायर्‍यांच्या पत्रिका थोड्याविलंबाने का होईना पण मला मिळतात.

माझ्या ई-मेलवर तुमच्या गझलाही मी वाचतो.

ह्या चर्चेच्या निमित्ताने ‘विजा घेऊन येणा-या पिढीशी’ संवाद झाल्याचा मलाही आनंद झाला.

तुमची नवी पिढी आमच्या गझला वाचते.त्यावर गंभीरपणे चर्चा करते, हे खरे शुभ वर्तमान.

ह्या चर्चेच्या निमित्ताने

‘अक्षरछंद’ दुरुस्त होऊन ‘आक्षरछंद’ झाला.

हेही नसे थोडके!

गझलेचा आशय' तुमच्या प्रत्यक्ष जीवनात खूप पुर्वीपासून आहे म्हणता!

त्यामुळे तुमचे साहस स्वाभाविक आहे!

‘आनंदकंद - सरळ साधा आशय, काही वेळा सामाजिक आशय अधिक

भुजंगप्रयात - अधिक संवादात्मक! 'बोलल्याप्रमाणे'!

कालगंगा - उदासी!

कलिंदनंदिनी - रोमॅन्टिक!

व्योमगंगा - आशयाचा अधिक आवाका, काही वेळा आक्रमक!

वियदगंगा व स्त्रग्विणी - नृत्य करण्यायोग्य’

हे तुमचे विश्लेषण थोड्या वेगळ्या त-हेने मराठी ‘पंत’ काव्यात

बरेचसे होते.

तुम्हाला माझी रचना व्यक्तिश: आवडली नाही.किंवा ती गझल नाही

नाही,असे तुमचे व्यक्तिगत मत असले तर त्या मताला लोकशाही

मध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणून निश्चितच स्थान असले पाहिजे.

तुमची पिढी तारुण्यसुलभ आग्रहाने गझलच्या सौंदर्याची चिकित्सा

करू बघते. ह्या आदान-प्रदानातून काही सत्वे-काही तत्वे नव्या-

जुन्या पिढीच्या हाती लागली तर त्यासारखे चर्चेचे फलित नाही.

सौंदर्यावरून सहजपणे एक शेर आठवला-

‘सौंदर्य आपले ती सांभाळते असे की-
नाहीच लेकराला पाजीत माय आता.’

कधी प्रत्यक्षात भेट झाली तर अधिक बोलता येईल.

आपल्या गझल लेखनाला (आणि चिकित्सेलाही)
मन:पूर्वक शुभेच्छा.

-डॉ.श्रीकृष्ण राऊत

श्रीकृष्ण राउतजी,
आक्षरछंदात गझल नसावीच असे नाही.... आणि गझल कितीही आक्षरछंदात केली गेली तरी ती पुन्हा वृत्तांकडे वळणार हे निश्चित.... फक्त आक्षरछंदातील गझल उच्चारताना/बोलताना ओढून-ताणून लय बसविली नाही पाहिजे हे या निमित्ताने अधोरेखित झालं....

हजल आणि गझल या वादात मी आपली ''गझल'' इथे पोस्ट करण्याची (आपल्या परवानगी विना ).. आगळिक केली..... ते विसरुन आपण आम्हास जे अनमोल मार्गदर्शन केले,त्याबद्दल मी व्यक्तिशा: आपला मनःपूर्वक आभारी आहे.

डॉ.कैलास

डॉ. श्रीकृष्ण राऊतजी,

माझाही एक तसा शेर आहे.

विरू नये डौल या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे पगारवाढी, स्तनात नाकाम क्षीर आहे

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

रश्मी,
तुला कुतूहल आहे आणि जाणून घ्यायची इच्घ्छा आहे यास्तव आनंद झाला.तुला हवी असलेली माहीती इथे मिळेल.

http://gazalakar.blogspot.com/

http://www.sardesaikavya.com/

१) गझलचे दोन प्रकार - अक्षर गण वृत्त आणी मात्रा वृत्त
२) एका गझलेत किमान ५ शेर असावेत आणी नसलेत तर ती गझल अपूर्ण म्हणून स्वःताच्या वहीतच राहू द्यावे आणी प्रदर्शित करण्याची घायी करू नये
३) गझल अक्षर गण वृत्तात बांधणे ही अपेक्षा पण अट्टाहास नको. एका गझलेला गझल म्हणून मान्यता मात्रा वृत्तात बांधली तरी पावते.
४) गझल लिहा हा आग्रह आणी लिहीतांना कोणत्या वृत्तात बांधल्या नाही गेली तरी चालेल पण लिहीत रहा ही कळकळीची विनंती. सरावानेच तंत्र अवगत होत असतात
५) आणी हो! भट साहेबांच्या चरणी माफी मागून ही विनंती करतो की कोणी त्यांची ठेकेदारी घेवू नये. कारण इथे बरेच चांगली आणी सकस गझलकार आहेत. उदा - इलाही जमादार
टिप- भट साहेब आणी मी, दोघेही अमरावतीचेच, त्यामूळे कोणीही प्रांतवादाबद्दल शंका घेवू नये. (आजकाल ही वृत्ती फोफावत चालली आहे)
६) गझलेत शक्यतोवर सांसदीय भाषेचा प्रयोग करावा
७) शेवटचे ! जर कोणाला (गैर) समज असेल की त्याला गझल फारच कळते आणी टीका करण्याचा अधिकार आहे, त्या सर्वांना आर्जवाची विनंती की टीका करण्यापेक्षा मार्गदर्शन करावे. न जाणो, आपल्या पैकी कूणातही भटसाहेबांसारखी प्रतीभा असू शकते ('भटसाहेबांपेक्षा' असे म्हणन्याची माझी हिंमत आणी कूवत नाही)

टीप - काही चूकले असेल तर माफी असावी

एक गझल लिहायला काय लागतं?

प्रतिभा! प्रतिभा!! प्रतिभा!!!
आणी जे काही लिहितोय ती गझलच आहे हे समजण्या इतपत सामान्यज्ञान!

बाकी सर्व मराठी डॉक्टरेट करायला कामी येतं.

अजून्ही काही उरलेलं कामी येतं गझलेची चिरफाड करण्यासाठी ????????????????

आदरणिय गंगाधरजी,

सर्व प्रथम सर्वांची माफी मागून लिहिण्याचे धाडस करतोय कारण इथे गैरसमज फार होतो.

तुमच्या मताशी सहमत आहे पण मराठी गझलेचा स्त्रोत फारशी गझलच आहे (माझे सामान्यज्ञाने). मग आपण स्वतःची नियमावली बनवून मराठी गझल मर्यादीत करण्या पेक्षा फारशी गझलेच्या तंत्रालाच हात घालून मराठी गझलेची व्यापकता का वाढवू नये. मराठी गझलेची व्यापकता पूढच्या १०० वर्षांत असे व्हावे की हेच कळू नये की गझल हा प्रकार फारशी भाषेतून मराठीत आला की मराठीतून फारशी भाषेत गेला.

निलयजी,

गझल फारशी भाषेतून आली की अरबी भाषेतून, याच्याशी मला फारसे देणेघेणे नाही.
कारण एवढ्या खोलात जाऊन गझल लिहिणे मला तरी अशक्य आहे.
कारण मुळातच गझल हा प्रकार "बाई आणि बाटली" याभोवतीच पिंगा घालत असावा, असे मान्य करण्याइतपत पुरावे आढळतात.

जेव्हा प्रगत समाज थेट चंद्रावर पाऊल ठेवण्याइतपत ज्ञान प्राप्त करत होता आणि थेट चंद्रावर पाऊल ठेवत होता तेव्हा अरबी/फारशी समाजातला हा थोर गझलकार एखाद्या मदिराक्षीचा मुखडा हातात घेऊन
"चंद्र गवसला ..... चंद्र गवसला" म्हणून गझला पाडत होता.

तात्पर्य हेच की गझल अप्रगत समाजात जन्माला आली आणि तिने रसिकांना शिक्षण सुद्धा त्याच तर्‍हेचे दिले.

म्हणून आपणही तीच री ओढत बसायचे काय?

की नव्या तंत्रज्ञानाकडे, प्रगतीकडे समाज झेपावेल अशा तर्‍हेने गझलेला घडवायचे????

किमान एवढातरी विचार मला एक गझलकार म्हणून पडतोच. Happy

श्री गंगाधर मुटे,

आपला वरील प्रतिसाद 'कणखर' यांनी सुरू केलेल्या 'गझल चर्चा' या धाग्यावर अधिक महत्वाचा ठरला असता असे वाटते.

(अवांतर - उर्दू / फारसी शायरी म्हणजे फक्त गझल असे नसावे. त्यात नझ्म, रुबाया, वासोख्त, मर्सिये वगैरे इतरही काही प्रकार असावेत. पण विषय गझलेचा आहे तर 'गझल हा प्रकार बाई बाटली भोवती पिंगा घालतो' या मतावर एक दिलचस्प चर्चा अशीही घडू शकेल की मराठी काव्य व परभाषिक 'किंवा विशेषतः उर्दू' काव्य यांच्यातील क्वालिटेटिव्ह तुलना करता येईल का? पण तो 'उर्दू व्हर्सेस मराठी' हा विषय कणखर यांच्या धाग्यावरील विषय ठरू शकणार नाही. मात्र ' गझल म्हणजे बाई बाटली भोवती पिंगा' हा विषय त्यांच्या धाग्यावर नक्कीच येऊ शकावा. म्हणून या प्रतिसादाद्वारे मी कणखर यांना अशी विनंती करतो की तुमचा प्रतिसाद तेथे कॉपी पेस्ट करावात व तेथे अधिक चर्चा घडवून आणावी. ह बा यांच्या या रचनेवरील चर्चा पुढे अनेक विषयांवर गेली व अश्या चर्चेसाठी धागे उपलब्ध असतानाही गेली.)

चुभुद्याघ्या

-'बेफिकीर'!

(अती अवांतर - प्रगत संस्कृतीची गझल कशी असावी याचे काही ढोबळ निकषही त्या चर्चेत निघतात का बघुयात. त्यातही मग पुण्यापेक्षा मुंबई प्रगत, सातार्‍यापेक्षा पुणे प्रगत, खटाव पेक्षा सातारा प्रगत आणि नेमाडेवस्तीपेक्षा खटाव प्रगत असेही घटक कदाचित निघू शकतील.)

(अती अती अवांतर - गझल हा 'प्रामुख्याने' पुरुषानेच रचण्याचा / रचलेला काव्यप्रकार आहे का / असावा का यावरही चर्चा तेथे होऊ शकेल. तसेही ते पान 'वाहते पान' नाहीच आहे. कारण तो विषय 'विरंगुळ्याचा' नसावा हे अ‍ॅडमीनला माहीत असावे. हा 'पुरुषानेच रचण्याचा' विषय काढण्याचे कारण प्रामुख्याने असे आहे की स्त्री गझलकारा सहसा बाई आणि बाटली भोवती पिंगा घालणार नाही. अर्थात, पुरुष गझलकार समलिंगी संभोगी होते व ते त्या संस्कृतीत मान्य होते हे स्पष्ट आहे. मात्र तीच सवलत संस्कृतीने स्त्रियांना दिलेली होती की नव्हती हे स्पष्ट नाही. काही स्त्रिया स्वतःहून तशी सवलत घेत असतील तर गोष्ट वेगळी! पण तसे नसल्यास स्त्री गझलकारांची गझल पुरुष आणि स्वयंपाक वगैरेभोवती पिंगा घालते का हेही चर्चिले जाईलच.)

(प्रचंड अवांतर - गझलेने रसिकांना काही शिक्षण दिले किंवा नाही याचीही चर्चा होऊ शकेल.)

(पूर्ण अवांतर - तांत्रिक प्रगतीकडे झेपावणारी गझल कशी असावी याची उदाहरणेही तेथे काहीशी स्पष्ट करता येऊ शकतील.)

आदरणिय गंगादरजी,
धन्यवाद!
मला इथे गझलेचा विषय अभिप्रेत नाही तर अरबी/फारशी गझलेतील तंत्राबद्दल बोलतोय. माझ्या सामान्यज्ञानानुसार गझलेचे प्रकार फक्त अक्षरगण वृत्त आणी मात्रावृत्त या तंत्रापर्यंत सिमीत नाही, त्यात फार आणी खूप विवीधता आहे. ते सर्व फारशी/अरबी गझलेचे प्रकार मी कधीतरी नंतर share करेन आणी त्या तंत्रात बसणारी प्रत्येक गझलेची validity नक्कीच असेन.

जेथवर एखाद्या गझलेच्या विषयाचा प्रश्न आहे तो फारच वैयक्तिक आहे. शेवटी हे सर्व कला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. तुम्हाला विदर्भच्या एका कोपर्‍यात शेतकरी करीत असलेल्या आत्महत्येचे चटके बसत असतील आणी मला इथे बसून नौकरीची insecurity भेडसावत असेल, अजून कोणाला त्याच्या प्रेयसीने केलेल्या विश्वासघाताचे महत्व असेल.

भावना आणी विषय वेगवेगळे असू शकतील पण गझलेचे तंत्र मात्र valid असावा आणी त्याची व्यापकता असावी.

(टिप - परत इथे सर्वांची माफी मागून लिहीण्याचे धाडस केले)

<<कारण मुळातच गझल हा प्रकार "बाई आणि बाटली" याभोवतीच पिंगा घालत असावा, असे मान्य करण्याइतपत पुरावे आढळतात. >>>
माफ करा पण हे विधान मला थोडेसे अवास्तव वाटतेय. फारशी किंवा अरबी गझलकारांच्या (तत्कालीन) बाबतीत हे सत्य असु शकेल कदाचित पण म्हणून सरसकट गझलांना किंवा गझलकारांना त्या पंक्तीत बसवता येणार नाही. अगदी 'जफर'पासून ते रघुपति सहाय, डॉ. इकबाल, मीर, साहीर यांच्या गझला काही वेगळेच सांगतात. या क्षेत्रातला माझा अभ्यास अगदीच तोकडा आहे. पण जाणकार काय ते सांगतीलच. Happy

फार टेक्निकली जाता बुवा तुम्ही लोक्स. मला तर त्यातले भावच आवडतात.
>> कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे? >> सगळेच सही होते

भारी!:)

https://mazigazalmarathi.blogspot.com/2008/06/blog-post_14.html?m=1

तुह्या डोयात बसावं,माह्या जिवाले वाटते
नाही जगाले दिसावं,माह्या जिवाले वाटते

तोंड लपवण्यासाठी मले नाही कुठे जागा
तुह्या मनात लपावं,माह्या जिवाले वाटते

तुह्या मुचूक जगणं,वाटे जह्यराची पुडी
तुह्या संगंच मरावं,माह्या जिवाले वाटते

माह्या मनातलं गूज्,कसं मोठ्यानं मी बोलू?
तुह्या कानात सांगावं,माह्या जिवाले वाटते

माह्या नावापुढे मले,लावू वाटे तुहं नाव
तुहं नाव मिरवावं,माह्या जिवाले वाटते

ही रचना '' गझल'' आहे किंवा कसे?

श्रीकृष्ण राऊत यांनी याठिकाणी आक्षरछंदात गझल याविषयी लिहिले आहे.

Pages