तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by ह.बा. on 26 July, 2010 - 04:53

तुझ्याहून मोठा गुन्हेगार आहे
तुला लोकशाही नमस्कार आहे

जरी देश दिसला कफल्लक तुला हा
तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

किती मर्द झिंगून मेले तरीही
बुळ्याचीच बाईल गरवार आहे

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे
घरी लोड शेडींग... अंधार आहे!!!

अशी टाळते का मला भेटणे ती?
(तिला मी असे काय करणार आहे?)

तिला मारले अन हिचा रेप झाला
तिलाही मलाही भिती फार आहे

कसा माग काढू खर्‍या माणसांचा
कुणाच्या घराचे खुले दार आहे?

-ह. बा.

गुलमोहर: 

फारच गंभीर बाबी चर्चिल्या जातात येथे!

एकदा मात्रा समान असुनही केवळ अक्षरछंदात आहे एवढ्या कारणासाठी रचनेला गझलेचा दर्जा द्यायचा नाही म्हटल्यावर निष्कारण मात्रा मोजत बसणे ही विसंगती

अक्षरछंदात मात्रा मोजूच नयेत! माझे असे म्हणणे आहे की अक्षरछंदात मात्रा समान असल्या तरीही ती जर 'अक्षरछंदाच्या लयीव्यतिरिक्त लयीत किंवा वृत्तात' वाचता येत नसेल तर ती रचना आपोआप फसेल!

वरील पोष्टमध्ये आपण
"माझे असे म्हणणे आहे की"
असे म्हटले त्यामुळे ते तुमचे व्यक्तिगत मत आहे. ते राखण्याचा ,प्रदर्शीत करण्याचा तुमचा आधिकार आहे.
आणि या मतांशी इतरांनी बांधिल असणे/नसणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.

गझल अक्षरछंदात लिहीत नाहीत !

अभ्यास म्हणून पहावेसे वाटते की, गझल हा प्रकार पारसी -> उर्दू आणि नंतर मराठीत आला असे म्हटले जाते. पारसी आणि उर्दू या भाषांमध्ये अक्षरछंद आहेत का मुळात? मराठीमध्ये अक्षरछंद आहे. तसा या भाषांमध्ये नसेल तर तेथील गझल कधीच अक्षरछंदामध्ये होणार नाही. त्यामुळे गझल हा काव्यप्रकार स्वतंत्रपणे न स्वीकारता केवळ उर्दूकडून आलेली भेट म्हणून स्वीकारला तर मराठीमध्ये गझल लिहिताना अक्षरछंद स्वीकारावा का हा प्रश्नच आहे. डॉ. राऊत गझलेसाठी छंदांबद्दल कायमच फ्लेक्झिबल बोलले आहेत. मराठी गझलेने अक्षरछंद स्वीकारला तर डॉ. राऊतांचा कधीच विरोध असणार नाही. मराठी भाषेने सर्व प्रकारच्या लयबद्ध काव्यासाठी स्वीकारलेला अक्षरछंद फक्त गझलेसाठी परका ठरतो. हे बरोबर की चूक मला माहीत नाही.
मात्रांबद्दल बोलायचे झाले तर लयीबद्दलही बोलावे लागेल. अमक्या-अमक्याला लयीत वाचता आले नाही की ती गझल नाही असे काहीसे चालले आहे सध्या. तो विषय न संपणारा आहे. तसेच, गझलेसाठी ठराविक नियमावली करणे मला अवघड वाटते. कारण, परंपरेने आलेल्या गोष्टीसाठी नियमावली करणे हे अतिशय अवघड काम असते.
असो.

गंगाधर मुटे!

सहमत आहे! कुणीही काहीही मानावे!

सदर रचना 'माझ्यामते' हझल नाही. 'माझ्यामते' ती गझलही नाही. आणि ' ती गझलही नाही' हे माझे 'जुने' मत मला आठवून द्यायला माझे 'जुने' मित्र 'ज्ञानेश पाटील' यांनी हातभार लावला त्याबद्दल त्यांचे आभार!

अक्षरछंदातच काय! मुक्तछंदातही गझल करा!

"मी मुक्तछंद घेतो, अन तो विडीत भरतो
अन 'बेफिकीर' हसतो, फेकून थोटकांना"

-'बेफिकीर'!

मी मुक्तछंद घेतो, अन तो विडीत भरतो

अहो तुम्ही घेऊन विडीत तरी भरला पण काव्यरसिक 'फालतू' रचना/कविता/गझलांकडे ढूंकून देखिल पाहत नाहीत.

त्यामुळे सर्व निर्णय काव्यरसिकावरच सोपविलेले बरे.

शशांक धन्यवाद!!!

बेफिकीरजी,
आपण जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा चर्चा(भांडणे)च होतात. आपल्या अनुभवाचा आदर ठेऊन मी आपल्याशी बोलत आलो आहे. पण आता मलाही बेफिकीर व्हायला आवडेल...
आपण माझ्या गझलेला गझल नाही असे म्हणाला असाल तर....आणि तरच या प्रश्नांची उत्तरे द्या.
१. मुशायर्‍यात ऐकवली तेव्हा मानेला त्रास होत असल्याने मान हलवून दाद दिलीत का?
२. आपला पहिला प्रतिसाद ही गझल आपल्याला खूप आवडल्याचा होता. तो नशेत दिलेला होता का?
३. माझी गझल दिसली की तुमच्या लहान मेंदूत कळा सुरू होतात का? त्या थांबवण्यासाठी मी आपली काही मदत करू शकतो का?
४. आपल्या जुन्या मित्रानी आपणास आठवायला हातभार लावला असे म्हणालात म्हणून विचारतोय, आपल्याला वारंवार विस्मरणाचा, मतबदलाचा काही त्रास होतो का? डॉक्टरला दाखवले का?
५. या गझलेला गझल म्हणाला नाहित तर तुम्हाला तुमच्या गझल संग्रहाला बंडल ललित संग्रह म्हणावे लागेल असे तुम्हाला वाटते का? मला वाटते. (कारण त्यातील बहुतांश सामाजिकच आहेत. त्याही गझलेकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण न करणार्‍या.)
६. मी आपणास एक मार्ग दोनदा सांगितला आहे. ते लक्षात ठेवण्यास तुम्हाला काय त्रास होतोय?

एक मिनीट! हे मी भोचकपणे विचारत नाही. आपल्याबद्दलचा आदर मनात ठेऊन हे मला स्पष्ट होत नाहिये म्हणून विचारतोय.

अरे लोक्स, एवढी एनर्जी वादावादीत घालवण्यापेक्षा दर्जेदार रचना करा आणि सादर करा Happy कशाला एकमेकांना खाली खेचण्याच्या प्रयत्नात स्वतःला मिळालेली दैवी देणगी, प्रतिभा देखिल तुम्ही मातीत लोळवताय असं नाही का वाटत? इथे सगळे कवीच चर्चा करताय तर ती चर्चा एकमेकांची प्रतिभा अधीक कशी बहरेल यासाठी व्हायला हवी नं?

मला गझल मधलं काहिही कळत नाही, आशय फारतर कळतो. तरीही सिरियसली लिहिणार्‍या लोकांकडून एवढे प्रतिसाद फक्त शाब्दिक वरकडी करण्यासाठी यावेत ह्याचा खरंच खेद वाटला म्हणून लिहायचे प्रयोजन.

हलकेच घ्या असं अज्जिबात म्हणणार नाही. सिरियसलीच घ्या आणि एकमेकांच्या टॅलेंटची चिरफाड थांबवा.

---
अझल = अनाकलनीय गझल
बझल = बटबटीत / बकवास गझल
कझल = कळेलशी गझल
डझल = डबडा गझल
पझल = परफेक्ट गझल
फझल = फसलेली गझल
भझल = भक्तीमय गझल
मझल = मनस्वि गझल
हझल = हसवणारी गझल

बास आता ! (हे मी स्वतःलाच म्हटले आहे Happy )

अश्विनी के

Happy Lol

....................................................
एवढे वाद होण्याचे कारण की

सुरेश भटानंतर कुणालाही गझल कळलीच नाही.
आणि सुरेश भटांची बाराखडी कुणी अंतीम मानायला तयार नाहीत.
प्रत्येक गझलकार आपापल्या परीने वेगवेगळे निकष लावतो.
दस्तुरखुद्द त्यांच्यातच एकमत नाही.

सामुहिक प्रयत्नाने नियमावली करायची तयारी नाही.

या सर्वांचा परिणाम नव-गझलकारांना भोगावा लागतो.
नवकविंना मार्गदर्शन करण्याऐवजी त्यांना नाउमेद करणारे प्रतिसाद लिहून
स्वतःचे मोठेपण सिद्ध करणे हे काही अनुभवी (त्यात काही उत्कृष्ठ गझला लिहिणारे सुद्धा)
गझलकारांचे जिवितकार्य झाले आहे. Sad

ईथे वाद कशाला ? ...
रसिकांना रचनेचा आनंद घेउ दया.

संबधीत जाणकारांनी एखादया कार्यशाळेत ह्यावर वाद्/चर्चा करावी .... Happy

ईथे वाद कशाला ? ...
रसिकांना रचनेचा आनंद घेउ दया.

सामान्य माणसाला तसेच वाटते.
कुठे काय करावे याचेही भान सामान्य माणसाला असते.

असामान्यांना तेवढेही भान नसते.
त्यामुळे सचिन तुमच्या म्हणण्याचा किती उपयोग होईल सांगणे कठीण आहे. Happy

क्या बात है हबा...एकदम फर्मास... तुमची लिखाणाची स्टाईल मला आवडतेय... लिहीत रहा !

गझलेच्या छंदाबद्दलचे माझे मत मी नवीन धाग्यावर देत आहे. इथे प्रतिसाद वाढवण्यात अर्थ नाही. कारण प्रतिसाद वाचतान मूळ रचनेचा विसर पडतो आहे.
धन्यवाद!

ज्ञानेश्वरांनी जे काव्य लिहिल आजा सातशे वर्षांनंतर एकतरी ओवी अनुभवावी ही किंमत नुसत्या काव्याची नसुन त्यामागच्या ज्ञानाची, अनुभुतीची आहे.

एक हजार वर्षांपुर्वी लिहिल्या गेलेल्या कालीदासाच्या मेघदुतावर जेव्हा पुण्याच्या एका डॉक्टर सर्जन ( बहुदा डॉ. भावे ) असलेल्या महोदयांनी संशोधन केले तेव्हा त्यांना हे नुसत काव्य नसुन हा एक चमत्कार असल्याचे दिसले. या काव्यात शापित गंधर्व मेघाला तु कोणत्या मार्गाने हिमालयात जा सांगतो हा आजचा व अनेक वर्षांचा मान्सुनचा प्रचलित मार्ग आहे. हे संशोधन इथे संपत नसुन मध्यप्रदेशात आकाशातुन नर्मदा नदी कशी दिसते ह्याच वर्णन ह्या काव्यात आहे. माननीय डॉक्टर साहेबांनी जेव्हा ढ्गांच्या उंचीवर विमानाने जाऊन ( जो आजचा विमानांचा प्रचलित मार्ग नाही. ) संशोधन केले तेव्हा त्यांना असे जाणवले की जे दृष्य साधारण एक हजार फुट उंचीवरुन आज दिसते ते एक हजार वर्षांपुर्वी कालिदासाने विमाने नसताना कसे पाहिले ? ही केवळ कवी कल्पना म्हणावी तर आजच्या वास्तवाशी त्याचे साम्य आहे. म्हणजे कालीदासाला एक दिव्य दृष्टी असावी की काय ?

अनेक सिनेमांची गीत आली आणी अजरामर झाली. त्यांनी नुसती गीतच अजरामर झाली नाही तर ते सिनेमेही त्या गीतांमुळे लोकांच्या लक्षात राहिले.

काय तत्व आहे या सगळ्यामागे ? याचा विचार करुयात का ? या समान तत्वांना धरुन जर आपण सर्वांनी गजल लिहील्यात तर त्या दिर्घकाळ लक्षात राहतील. मायबोलीच्या प्रांगणात त्या जन्माला आल्या तर मायबोलीचीही महती वाढेल.

खरे आहे नितीन! ह.बा. याम्नी खरे तर अत्यंत सामाजिक कविता रचलेली आहे. (म्हणून माझी मान त्यादिवशी हालत होती हे अवांतर!)

(मी फारसे पाळलेले नाही, पण सामाजिक खरच लिहायला हवेच!)

भाकरीसाठी निघाले तालुके शहराकडे
राहिली ओसाड गावे बाजरी पिकवायला

हा शेर मी 'ह. बा.' त्यांची 'सदर' रचना मुशायर्‍यात ऐकवणार आणि घनश्याम धेंडे विडंबन ऐकवणार म्हणून मुद्दाम ऐकवला होता हे आत्ता आठवले.

डॉ.कैलास, बेफिकिर, गंगाधर मुटे,ह.बा.

ह्यांची ही चर्चा छान रंगली. तिघांचेही मन:पूर्वक अभिनंदन.
आजकाल एवढे छंदशास्त्रीय तपशील
कोणी समजून घेण्याचा प्रयत्नही करीत नाही.

आक्षरछंदातल्या(माझ्या माहिती प्रमाणे ‘अक्षरछंद’ असा तो शब्द नसून ‘आक्षरछंद’ असा आहे.) ‘रचनेला’ गझल म्हणावे की नाही?
या बद्दल त्या रचनेचा कर्ता ह्या नात्याने माझी भूमिका अशी-

वृत्तांच्या संदर्भात आता एक शेवटचा मुद्दा. रचना अधिक सुकर, अधिक सहज करण्यासाठी आक्षरछंदात गझल रचता येईल का? काफिया, रदीफ, दोन दोन ओळींची स्वतंत्र कविता असे बाकीचे नियम पाळले जात असतील तर आक्षरछंदातील कवितेला गझलच म्हणायला पाहिजे.आक्षर छंदात अक्षरगणवृत्तासारखा ‘लघु-गुरू’ क्रम नसतो. मात्रावृत्तासारखे मात्रांचे मापन नसते. केवळ अक्षरसंख्याच मोजली जाते.
छंदशास्त्राच्या नियमानुसार आक्षरछंदातील प्रत्येक अक्षर दीर्घोच्चारी असते. म्हणजे प्रत्येक अक्षरांच्या दोन मात्रा मोजल्या जातात. उदा. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ह्या तुकारामांच्या अभंगातील चरणात - ‘द’ ‘त’ आणि ‘ग’ ही तिन्ही अक्षरे ‘अ’ ह्या -हस्व स्वरांची असली तरी त्यांचा उच्चार दीर्घ स्वराइतक्या दोन मात्रांच्या कालावधीत करावयाचा असतो. म्हणजे आक्षर छंदाचा छंदशास्त्रीय आधार देखील अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्ताप्रमाणे उच्चाराधिष्ठितच आहे. आठ-आठ अक्षरांची दोन आवर्तने एकाच ओळीत असतील. प्रत्येक अक्षर दोन मात्रांचे मोजून १६-१६= ३२मात्रा होतात. या आक्षर छंदात प्रस्तुत लेखकाची व-हाडी बोलीतली एक गझल-

माह्या जिवाले वाटते

तुह्या डोयात बसावं माह्या जिवाले वाटते;
नाही जगाले दिसावं माह्या जिवाले वाटते.

तोंड लपवण्यासाठी मले नाही कुठी जागा;
तुह्या मनात लपावं माह्या जिवाले वाटते.

तुह्या मुचूक जगणं वाटे जह्यराची पुडी;
तुह्या संगंच मरावं माह्या जिवाले वाटते.

माह्या मनातलं गूज कसं मोठयान मी बोलू;
तुह्या कानात सांगावं माह्या जिवाले वाटते.

माह्या नावापुढे मले लावू वाटे तुहं नावं;
तुहं नावं मिरवावं माह्या जिवाले वाटते.

(‘यक्ष’ दिवाळी २००४, पृ. १०४)

रचना अधिक सहज होण्यासाठी अक्षरगणवृत्तातून गझल जर मात्रावृत्तात येऊ शकते, तर तिला आक्षरछंदात प्रवेश करण्यासाठी कोणाच्याही मान्यतेची वाट पहावी लागणार नाही. भलेही ती आक्षरछंदात फारशी रमणार नाही, परत मात्रावृत्ताकडे आपला मोर्चा वळवेल, कारण चांगली कविता जेव्हा काही मोजकी बंधने स्वत:हून स्वीकारते तेव्हा त्या तिच्या पायात रुमझुमणा-या तोरडया असतात, तर छंदशास्त्राने बाहेरून लादलेले जाचक नियम ह्या तिच्या लालित्यपूर्ण पदन्यासाला अवरूद्ध करणा-या बेड्या असतात.

अधिक तपशीलाकरिता -

http://mazigazalmarathi.blogspot.com/2008/06/blog-post_14.html

डॉ.श्रीकृष्ण राऊत

डॉ. श्रीकृष्ण राऊतजी,

मला पहिल्यांदाच, या चर्चेच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधायची संधी मिळाली व मी खरोखरच त्याबाबत आनंदी आहे. आपल्याला आमच्या 'गझल सहयोगच्या' मुशायर्‍यांच्या पत्रिकाही कदाचित मिळत असतील पण भेटण्याची, बोलण्याची संधी मिळत नव्हती. आपण जुने आहात व या चर्चेत सहभागी झालात त्यामुळे बरे वाटले.

मी २००८ मधे गझलेचे तंत्र शिकलो. मात्र 'गझलेचा आशय' माझ्या जीवनात खूप पुर्वीपासून आहे. (प्रत्यक्ष जीवनात). त्यामुळेच आपल्या प्रतिसादावर प्रतिसाद द्यायचे साहस करत आहे. कृपया लोभ असावा.

१. आशयाच्या दृष्टीने मला आपली रचना गझलेसारखी वाटत नाही. साधारण विसाव्या वर्षी एखाद्या तरुणाने एखाद्या मनात भरलेल्या तरुणीला उद्देशून रचल्यासारख्या या रचनेत काँट्रॅस्ट साधायची ओढ दिसत आहे. 'मला कशी कळणार गझल जर दु:खच नाही कुठलेही' हा मी नुकताच रचलेल्या एका रचनेतील एक मिसरा मला या निमित्ताने आठवला. उदासीची जाणीव व्हायलाच हवी असा आग्रह असू शकत नाही. मात्र या रचनेत विचारांची खोली जाणवली नाही. गुंगायला झाले नाही. क्षमस्व! त्यामुळे, तंत्राबाबत चर्चा करण्यापुर्वी मला असे नमूद करावेसे वाटते की या रचनेत गझलियत जाणवली नाही. हे व्यक्तीगत मत आहे. ज्येष्ठ व वरिष्ठ गझलकारांना मुद्दाम दुखावून प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करणे असा 'हे मत मांडण्यामागील' माझा हेतू अजिबात नाही.

२. कला या क्षेत्रात जर स्वातंत्र्य नसेल तर कला बहरणार नाही हे निश्चीत! एखाद्या कवीला जर 'आक्षरछंदात' गझलेप्रमाणे (गझलेचे इतर नियम पाळून) रचना करावीशी वाटली तर 'असे करूच नका' किंवा 'हे चुकीचे आहे' असे दुसरा माणूस म्हणू शकत नाही. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या दृष्टीने या रचनेला गझल म्हणणे किंवा गझल नाही असे म्हणणे ही दोन्ही मते समान महत्वाची आहेत. मात्र! 'मी आपल्यासमोर हे लिहीणे लहान तोंडी मोठा घास' असले तरीही शालेय परीक्षेच्या पेपरप्रमाणे गझलचे काहीसे आहे हे आपल्याला मान्य व्हावे. प्रश्न सर्व विद्यार्थांना तेच, मात्र प्रत्येकाची लिहिण्याची पद्धत, उत्तराची अचूकता, अक्षराचे सौंदर्य, पेपर संपवायला लागलेला वेळ, ऑप्शनल सकट सर्व प्रश्न सोडवले की नाही हा घटक, झालेली खाडाखोड, कॉपी न करणे, पेपर सोडवणे सोपे किंवा अवघड जाणे या सर्व बाबतीत विद्यार्थ्या-विद्यार्थ्यात फरक पडतो. अक्षरगणवृत्तात किंवा मात्रावृत्तात गझल लिहीताना वृत्त, मात्रा (मात्रावृत्त असल्यास), लय (मात्रावृत्त असल्यास), काफिया, रदीफ, अलामत, काफियाची आशयाशी बसणारी सांगड, रदीफची सांगड व आशयाची खोली या सर्व बाबी सांभाळून , मतला रचून वर चार शेर रचणे यात कस लागतो व त्यामुळे या काव्यप्रकाराचे स्वरूप बहरते. आक्षरछंदात ठराविक लय असल्यामुळे गझल रचणे (किंवा आक्षरछंदात गझलेचे इतर नियम पाळून केलेल्या रचनेला गझल ठरवणे) यात गझलेचे मूळ सौंदर्यच हरवते असे मला वाटते. किंवा, काही विद्यार्थ्यांना अवघड व काहींना त्याचवेळेस त्याच विषयावरचा वेगळा व सोपा पेपर लिहायला लावल्यासारखे वाटते. सौंदर्याबाबतीत तडजोड होऊ नये यासाठी आजवर झालेल्या सर्व ऐतिहासिक गझलकारांचे मला समजलेले मत 'आक्षरछंदात गझल रचू नये' याला मी प्रमाण मानत आहे. 'भटपूर्व' रचना काही ना काही कारणांनी 'गझल' ठरू शकल्या नाहीत यात भटसाहेबांनी काटेकोरपणे प्रचलीत गझलतंत्रच वापरले हे महत्वाचे कारण आहे. अन्यथा तीन मिसर्‍यांचा शेर, चार शेरांची गझल असे करता करता गझल अधिकाधिक डायल्यूट होत गेली असती.

३. कवितेत वापरलेल्या वृत्ताचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो असे मला नुसते जाणवते. या मताला पुष्टी तर कदाचित कुणी देणारच नाही, पण हे मत कदाचित हास्यास्पदही ठरवून टाकतील. माझे मत अधिक स्पष्ट करत आहे.

आनंदकंद - सरळ साधा आशय, काही वेळा सामाजिक आशय अधिक

भुजंगप्रयात - अधिक संवादात्मक! 'बोलल्याप्रमाणे'!

कालगंगा - उदासी!

कलिंदनंदिनी - रोमॅन्टिक!

व्योमगंगा - आशयाचा अधिक आवाका, काही वेळा आक्रमक!

वियदगंगा व स्त्रग्विणी - नृत्य करण्यायोग्य!

वगैरे वगैरे! असे काहीच नाही, कोणत्याही वृत्तात काहीही लिहिता येते हे मला माहीतही आहे व मी हे वरील मत ठामपणे मांडतही नाही आहे. मात्र मला तसे जाणवत राहते.

त्याचप्रमाणे आक्षरछंद हा मला संतकाव्य (भक्तीरस), ग्रामीणता, कविता सहज रचण्यास उपयुक्त असे रंग असलेला वाटतो. हे सर्व 'मला वाटते' म्हणून आक्षरछंद गझलेसाठी वापरू नये असे म्हणायचे नाही. कारण ज्यांना गझल म्हणजे काय याचा सुगावाही लागलेला नाही ते लगेच सही, शिक्के, पुरावे, निकष वगैरे मागून गझला करू लागतात.

पण मला सूर, लय, वृत्त, मनस्थिती या सर्वांमधे आतून काहीतरी रहस्यमय सांगड / संबंध आहे असे जाणवते.

या कारणासाठी व्यक्तीशः 'आक्षरछंदात गझलेचे इतर नियम पाळून रचलेली रचना' मला वाचायला / ऐकायलाच गझल वाटत नाही.

अधिक / उणे लिहिले असल्यास क्षमस्व! आपल्याकडून ऐकायला आवडेल.

बरेच झाले लिहून माझे, कुणास काही दिसेचना
खडूच काळा असेल तर मग हवाच ना पांढरा फळा

-'बेफिकीर'!

श्रीकृष्ण राऊतजी,
चर्चेच्या निमीत्ताने चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.

बेफिकीर,

बरेच झाले लिहून माझे, कुणास काही दिसेचना
खडूच काळा असेल तर मग हवाच ना पांढरा फळा

शेर छान आहे!!!

बेफिकीरला अनुमोदन देत असताना आणखी काही गोष्टींचा संदर्भ ग़ज़लच्या बाबतीत मला महत्वाचा वाटतो.

१. आपल्याकडे ग़ज़ल हिन्दी-उर्दूतून आली. त्या भाषांमधे रचल्या गेलेल्या ग़ज़ला या आक्षरछंदात नाहीत. त्या भाषांमध्येही आक्षरछंद आहे. दोहे, फटके हे काव्यप्रकार आक्षरछंदात आहेत. पण त्यांनी ग़ज़लसाठी ही सवलत घेतली नाही.

२. मात्रावृत्त आणि आक्षरछंद यांची तुलना होऊ शकत नाही. कारण आक्षरछंदात मुळातच ओढून ताणून लय आणलेली असते. मात्रावृत्त मात्र तसे नाही. यति येईपर्यंत अक्षरांचा क्रम अक्षरगणवृत्तात राखला जातो तर क्रम मात्रावृत्तात राखला जात नाही; इतकाच फरक आहे. आणि तो फरकसुद्धा हिन्दी-उर्दूत मान्य केला आहे म्हणूनच आपणही मराठी ग़ज़लेच्या बाबतीत घेतला आहे.

चू.भू.दे.घे. लोभ असावा! Happy

शरद

Pages