श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १४

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2010 - 06:48

श्री - अरे शंभर रुपये म्हणजे चेष्टाय का गट्टू?
गट्टू - नाही.. मी जाणार..
श्री - गट्टू.. वेडायस का? अरे या सहली वगैरे श्रीमंतांसाठी असतात.. शाळा पैसे कमवायला असल्या सहली काढते..
गट्टू - सगळे चाललेत...
श्री - कोण कोण चाललंय?
गट्टू - निलेश, अभी, जया, श्रीकृष्ण, रागिणी, नीता, बबली, मकरंद.. सगळे..
श्री - बरं.. बघू..
गट्टू - सगळ्या गोष्टींना बघू काय हो बाबा? मला काहीच करू देत नाही तुम्ही..
श्री - असं कसं म्हणतोस? आता मेकॅनो आणला, बुद्धीबळ आणलं..
गट्टू - एक वर्ष झालं त्याला..
श्री - सहलीत खूप दमायला होतं..
गट्टू - नाही होत..
श्री - आणि अभ्यास किती मागे राहिलाय..
गट्टू - झालाय सगळा..
श्री - बर! आत्ता झोप.. उद्या पाहू..
गट्ट - काही उद्या पाहात नाही तुम्ही.. उद्या परत हेच म्हणाल..
श्री - असं नाही म्हणायचं..
गट्टू - उद्या पैसे भरायचेत.. उद्या पैसे नाही भरले तर जाताच येणार नाही..
श्री - उद्या पैसे भरायचेत??
गट्टू - मग?
श्री - अरे उद्या कुठून आणणार मी इतके पैसे??
गट्टू - मी केव्हापासून सांगीतलेलंय तुम्हाला..
श्री - अरे हो पण.. माझ्या..माझ्या लक्षात नव्हतं ते..
गट्टू - तुम्हाला पाठवायचंच नव्हतं.. म्हणून लक्षात नव्हतं...
श्री - किती जणं जाणारेत सहलीला??
गट्टू - सगळे जाणारेत.. मग मी काय एकटा बसू वर्गात?
श्री - किती जणंयत?
गट्टू - सगळे.. बेचाळीस..
श्री - असं कसं? एखाद्याला नाही परवडलं तर??
गट्टू - तुम्हाला काहीच कधी परवडत नाही..

श्रीला हे वाक्य ऐकून दु:ख झालं! खरंच होतं ते! अत्यावश्यक बाबी आणि शिक्षणाचा खर्च, तसेच ऑकेजनली काहीतरी भेटवस्तू किंवा खाद्यपदार्थ आणणे या व्यतिरिक्त तसं काहीच परवडू शकत नव्हतं! पंधराशे पैकी दिडशे भाडे, अकराशे घरखर्च, शंभर लग्नाच्या वेळेस काढलेल्या सॅलरी अ‍ॅडव्हान्सचा हप्ता आणि दिडशे बचत! ती बचतही दर महिन्याला व्हायचीच असेही नाही. कधी झाली, कधी नाही. काही ना काही अवांतर खर्च उपटायचेच! बूट, युनिफॉर्म काही ना काही असायचंच! औषधे चालू असायची.

आपण एका, तेही आपल्याच स्वतःच्या मुलाला आनंदी आयुष्य द्यायलाही कमी पडत आहोत आणि हे मुलाला व्यवस्थित माहीत आहे यापेक्षा अपमानास्पद बाब बापासाठी काय असणार?

कोणतेही व्यसन नाही, कोणताही वरचा खर्च नाही, तरीसुद्धा आपली क्षमता नाही की साधे त्याला एखाद्या ट्रीपला पाठवावे.

श्री मनातच पेटला. काहीही झाले तरी उद्याच्या उद्या मी शंभर रुपये शाळेत भरणारच! त्याने मनाशी निर्धार केला.

श्री - ठीक आहे.. उद्या मी शाळेत येऊन भरतो पैसे..
गट्टू - बाबा.. रागवलात ना?
श्री - नाही रे.. तुझ्यासाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं?
गट्टू - बाबा.. इकडे बघा ना..
श्री - काय?
गट्टू - मी मोठा झालो की.... तुम्हाला खूप पैसे मिळवून देईन..

यापेक्षा अधिक काय पाहिजे असते बापाला तरी? पैसे नकोच असतात. मुलगा फक्त एवढंच बोलतो आहे हेच खूप असते.

श्रीने गट्टूला जवळ घेतले. आता दोघेही स्वतंत्र झोपत होते. गट्टू पलंगावर आणि श्री खाली! श्रीने त्याला पलंगावर आडवे केले अन थोडेसे थोपटले.

गट्टू - बाबा.. तुम्ही गेलायत कधी? दौलताबादला?
श्री - अंहं..
गट्टू - का?
श्री - नाही गेलो.. शाळा तिकडे होती .. कर्‍हाडला..
गट्टू - मग? तिकडे नाही निघायच्या सहली?
श्री - अंहं!
गट्टू - का?
श्री - शाळा गरीब होती.. गरीब मुलांची..

गट्टूच्या चेहर्‍यावर खूप पश्चात्ताप होता. पण श्रीने तो पाहिलाच नव्हता. गट्टूच्या मनात येत होते की 'तुम्ही मला काहीच करू देत नाही' असे आपण म्हंटल्यामुळे बाबा निराश झाले आहेत आणि आता कुठूनतरी पैसे आणून देतील. त्याचा त्यांना खूप त्रास होईल.

गट्टू - बाबा?..
श्री - काय?
गट्टू - मला... मला भीती वाटते जायची...
श्री - भीती???? का??
गट्टू - तुम्ही नसणार तिथे..
श्री - हा हा हा हा! मग काय झालं? सगळे मित्र आहेत ना? आणि बाई पण असणार! आता शूरपणे वागायचं! बर का?

श्रीने दुसर्‍या दिवशी सप्रेंच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे दुप्पट गुंतागुंतीचे करून शंभर अ‍ॅडव्हान्स घेतला अन दर महिना दहा परत करीन असे लिहून दिले. तिथून तो तडक शाळेत आला आणि गट्टूला न भेटताच पैसे भरून थेट घरी आला. संध्याकाळी गट्टू घरी आला. बाबा घरी कसे काय हे त्याला समजेना! पण त्याची आत्ता बाबांशी बोलायची इच्छाच नव्हती.

श्री - अरे?? या या, आले का गट्टू महाराज??
गट्टू - .....
श्री - दूध देऊ ना?
गट्टू - ....
श्री - हे घे.. आणि ही एक पोळी पण खाऊन घे..
गट्टू - ...
श्री - गट्टू? अरे तुझ्याशी बोलतोय?
गट्टू - मला नकोय दूध अन पोळी..
श्री - का?
गट्टू - नको आहे
श्री - का?
गट्टू - नकोय हो..
श्री - कुठे निघालास?
गट्टू - ...
श्री - गट्टू.. कुठे चाललायस तू?
गट्टू - अहो काय हो? जाऊदेत ना खेळायला..
श्री - अरे येडचाप.. मग बॅग कोण भरणार दोन दिवसांची? ट्रीप आहे ना उद्या..
गट्टू - नको ट्रीप बीप... मी नाही जाणार..
श्री - का?
गट्टू - न को....
श्री - बर.. मग उद्या शाळेत गेलास की आज भरलेले पैसे परत घेऊन ये हां????
गट्टू - .....
श्री - ....
गट्टू - कसले पैसे?
श्री - हेच आपले? ट्रीपचे..
गट्टू - भरले?
श्री - भ र ले..
गट्टू - कुणी?
श्री - बा बा..
गट्टू - कधी?
श्री - आ ज
गट्टू - भरलेत होय.. बरं.. मग आता काय! जावंच लागणार..
श्री - तेच ना.. किती त्रास..

"अं बाबा! काय चिडवता हो" करून गट्टू जो बिलगला श्रीच्या डोळ्यातून एकेक थेंब येईपर्यंत बिलगूनच बसला.

सप्रेंच्या आठ्या या स्पर्शासमोर तुच्छ होत्या. 'माझ्या मुलाला जे हवे ते मी देऊ शकलो' ही भावना 'मला हवे ते मी करू शकलो' याहीपेक्षा महान असते हा अनुभव श्रीने आज घेतला.

पुणे - शिर्डी - नाशिक - अजंता लेणी -औरंगाबाद - दौलताबाद - शनि शिंगणापूर - पुणे

दोन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम! उद्या सकाळी सातला जे निघायचे ते परवा रात्री नऊ वाजता शाळेत परत! उद्याचा हॉल्ट नाशिकला!

डबा देण्याचा प्रश्नच नव्हता. शाळेने सर्व व्यवस्था केलेली होती.

बॅग भरण्यात श्रीच्या अपेक्षेपेक्षा बराच अधिक वेळ लागला. त्याला वाटले होते पंधरा मिनिटांत बॅग भरून होईल. पण सहा वाजता जो बॅग भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला तो रात्री नऊ वाजता आटोपला. कारण दहा वेळा ती बॅग उलटी करून पुन्हा त्यातल्या वस्तू विविध पद्धतीने ठेवणे हे गट्टूसाठी एक मनोरंजनाचे कृत्य झालेले होते. त्यात मधेच मावशींनी रव्याचे लाडू आणून दिले अन प्रमिला काकूने चिवडा! थोड्या वेळांनी मानेकाकांनी एक वेताची छडी आणून दिली. म्हणे ही जवळ असली की काही त्रास होत नाही. चितळे आजोबांनी दोन गोळ्यांचे पुडे दिले. चितळे आजोबा अटक झाल्यापासून अत्यंत निराश झालेले होते. आर एस एस वर झालेल्या आरोपांमुळे 'आपले आयुष्यच हकनाक गेले' व आपण या देशाच्या दृष्टीने एक गुन्हेगार ठरू शकतो ही भावना प्रबळ झालेली होती त्यांच्या मनात! आता ते घरातच बसून राहायचे. शाखेलाही जायचे नाहीत. मोतीबागेतील काही जुने मित्र त्यांच्या उदरनिर्वाहाचे सगळे बघायचे. म्हणजे, मोतीबागच बघायची, पण काही जुन्या मित्रांना ते कर्तव्य लावून दिलेले होते. चितळे आजोबांच्या दृष्टीने यापुढील आयुष्य हे बोनस होते.

मात्र आणीबाणीचा देशाला झालेला एक छोटासा फायदा म्हणजे निगडे काका अन निगडे काकू दहावर थांबले होते.

एकंदरीत दास्ताने वाड्यात 'गट्टू उद्या ट्रीपला जाणार' ही बातमी पसरायला लागलेली सात ते आठ मिनिटे सोडली तर जणू अख्खा वाडाच ट्रीपला निघालेला आहे असा उत्साह निर्माण झालेला होता. समीरच्या एक दोन 'ट्रीपा' झालेल्या असल्यामुळे तो 'इंपॉर्टंट टिप्स' देण्यात गढला होता. त्यातही तो 'गट्टूची ट्रीप साधीसुधी आहे' हे दाखवायची संधी सतत शोधत होता. राजश्रीताईकडे आता तिच्या लहान भावाची म्हणजे गणेशची जबाबदारी असल्यासारखी ती सतत त्याला घेऊन एखाद्या पोक्त स्त्रीसारखी वावरत असायची. हे पुण्यात शक्य असते. 'वय वर्षे किती' या प्रश्नाला पुण्यात 'शुन्य' महत्व आहे. माणूस पुण्यातला आहे आणि 'सध्या' जिवंत आहे याचा अर्थ तो सर्वज्ञानी आहेच!

(मी स्वतः जातीवंत, जन्माने शनवारीय व संस्कारांनी सदाशिवीय पुणेकर असल्यामुळे हे विधान मी अधिकाराने करू शकतो.)

आयुष्यात पहिल्यांदाच गट्टूला 'उद्याची सकाळ कधी एकदा येतीय' या विचारांनी झोपच आली नाही. कदाचित आपण शांत झोपलो तर उद्याची कंटाळवाणी सकाळ येणारही नाही अशा कल्पनेने तो एरवी दहालाच झोपायचा. पण आजची गोष्ट निराळी होती. आज श्रीच आधी झोपला. आपले बाबा घोरतात हा शोध गट्टूला आज आयुष्यात पहिल्यांदा लागला. आणि 'हे एक झोप न येण्याचे' कारण ठरू शकते याची त्याच्या बालमनाने तेव्हाच नोंद घेतली. पुढेमागे लागलेच तर हे अस्त्र वापरता येईल म्हणून त्याने ते मनात नोंदवून घेतले.

आली एकदाची सकाळ! सकाळ म्हणजे काय? पहाटच आली. पण 'हीच सकाळ आहे' हे गट्टूने बाबांना पटवून दिले समर्थपणे! साडे तीन वाजलेले होते. 'मला आता आवरायला पाहिजे, वाड्यातील सगळ्यांना एकदा भेटायला हवे, इतक्या लांब जाणार, सगळं घातलंय की नाही बॅगेत ते पुन्हा एकदा तपासायला हवे, अजून आंघोळ राहिलीय' वगैरे विधाने तो एकटाच करत होता. श्री त्याच्या त्या कटकटीने शेवटी उठला अन त्याने स्वत:चा चहा टाकला.

रात्री दिड वाजता पेशवे पार्कमधील दोन सिंह लागोपाठ आरोळ्या ठोकतात अन त्या पार शनिवार पेठेत ऐकू येतात हे गट्टूला पहिल्यांदाच समजले. पहाटे पाच वाजता लकडी पुलावरील एका मशीदीतून बांग ऐकू येते हे एक नवीन ज्ञान आज गट्टूला मिळाले. तसेच, पावणे सहा वाजता बाबा दूध आणायला जातात आणि त्याचवेळेस आजी गॅलरीत त्या दिवशीचे पहिले आगमन करून समोर दिसेल त्याला फैलावर घेते आणि मग वाडा जागा होतो हेही त्याला समजले.

पावणे सहालाच शेजारच्या दारातून गट्टू बाहेर आलेला पाहून प्रथम पवार मावशींना काय बोलावे हेच समजेना.. त्या आधीच नंदाच्या नावाने ओरडत होत्याच, त्याला पाहून त्या अधिकच भडकल्या. हा कोण एवढ्या सकाळी उठणार मोठा! जणू नोकरीलाच जाणार आहे.

मावशी - उठले.. दीपक उठले पेंढारकरांचे.. चालले देश सावरायला.. काय रे अंगठ्याच्या.. झाली नाही पहाट अन उभी केली खाट? बघतोस काय नाकतोड्यासारखा.. ?? आं? वय आहे का तुझं आत्ता उठायचं? आं? जमत नाही उभं राहायला अन एकटे गेले मुतायला? बाप कुठेय तुझा? का घोरतोय अजून? दार उघडतायत पावणे सहालाच.. लाज लज्जा नाही वाटत? वाडा म्हणजे जायदाद आहे का आज्याची?

त्या बराच वेळ बोलल्यावर गट्टू हळूच 'ट्रीप आहे आज' म्हणाला अन मग त्या शांत झाल्या. तोवर चितळे आजोबा अन प्रमिला उठलेले होते. चितळ्यांची पहिली बादली लागायची नळावर! त्या पाठोपाठ मावशी, मानेकाका अन प्रमिला! प्रमिला सूज्ञ होती. या तीनही चक्रमांचे 'पाणीभरण' झाल्यावर आपण पाणी भरले की आपला उगाचच उद्धार होत नाही हे लग्न झाल्याच्या पाचव्याच वर्षी तिच्या लक्षात आलेले होते.

सकाळी नळावर मात्र भांडणे होणे तसे जरा अवघडच होते. कारण एकाचवेळेस मानेकाका अन मावशी रांगेत असल्यामुळे होणारी धुमशचक्री टळावी असे इव्हन त्या दोघांना स्वतःलाही वाटायचे.

चितळे आजोबांनी गट्टू निघाला त्यावेळेस ओरडून सांगीतले..

"गट्टू पेंढारकर यांच्या या शालेय सहलीच्या प्रस्तावाला मी दास्ताने वाड्यातर्फे अनुमती दर्शवत असून हे सव्वा तीन रुपये त्यांच्याकडे देत आहे जे त्यांनी साईबाबांसमोर माझ्या नावाने ठेवावेत व प्रसाद आणून तो मला द्यावा"

त्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण 'प्रस्तावाला दास्ताने वाड्यातर्फे अनुमती देणे' हे विधान चितळे आजोबांनी गेल्या वर्षभरात आज प्रथमच केलेले होते. त्यांना अटक झाल्यापासून सगळ्यांना चुकल्याचुकल्यासारखेच वाटायचे. चितळे आजोबांचे हे बदललेले रूप वाड्याला फारच शुभ वाटले. सगळ्यांनी उत्स्फुर्त टाळ्या वाजवल्या. मानेकाकांनी आणि घाटेंनी चितळे आजोबांची गळाभेट घेतली. चितळे आजोबाही थोडेसे हेलावलेलेच होते. अपराधी नजरेने सगळ्यांकडे पाहात होते. त्यांच्या संघातील अस्तित्वाबद्दल व मोतीबागेच्याच अस्तित्वाबद्दल पवार मावशींना पुर्वी भयंकर ऑब्जेक्शन्स होती. मावशींकडे आजोबा आणखीनच अपराधी व व्यथित नजरेने बघत होते. शेवटी साधीच माणसे ती! अटक बिटक झाल्यावर बिचारी घाबरणारच की! आजोबांकडे पाहात मावशी म्हणाल्या..

मावशी - आजोबा.. झाले ते झाले..

बहुधा कित्येक वर्षांमधे मावशींनी चितळे आजोबांचा उल्लेख 'आजोबा' असा केला होता. आजोबा आणखीनच हेलावले.

मावशी - अहो काय सांगता येतंय काय होईल ते! तुम्ही मनापासून काम केलेत ना तुमचे? कुणाचे कधी वाईट केले नाहीत, उलट मदतच केलीत.. मनाचे समाधान झाले की बास! काय?

पुन्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मानेकाका उद्गारले.

मानेकाका - गट्टू परत आल्यानंतर चितळे आजोबांच्या आजवरच्या देशसेवेचा सत्कार करण्याचा मी दास्ताने वाड्यातर्फे प्रस्ताव मांडत आहे ...

लगेच नंदा ओरडली..

नंदा - आणि मी दास्ताने वाड्यातर्फे या प्रस्तावाला?????

कोरस - मंजुरी देत आहे....

आज पहिल्यांदाच ब्रह्मचारी चितळे आजोबांनी नंदाला, आपल्या एकट्या राहणार्‍या शेजारणीला जवळ घेऊन थोपटले. ते दोघेच काय, सगळेच ओलावले होते. बाप मुलीचे प्रेम वाहात होते स्पर्शांमधून!

पावणे सात वाजता सगळ्या वाड्याला 'बाय' करून गट्टू शाळेत निघाला. आज तो 'जगाला प्रेम अर्पावे. जय बोलो हनुमानकी' वगैरे काहीही म्हणत नव्हता. आज फक्त 'जय साईबाबा' हा एकच जयघोष चाललेला होता.

शाळा बाग फुलल्यासारखी फुललेली होती. बाबांना सोडून जाताना आज गट्टूने एकदाही वळून पाहिले नाही. श्रीनिवासला दु:ख झाले! पण आता काही उपयोग नव्हता. सोडायला आलेल्या बाबांना निदान 'येतो' तरी म्हणावे हे त्याला शिकवायला हवे होते खरे, पण शिकवणार कोण? एकटेच बाबा असल्यावर?

मात्र! बस निघाली तेव्हा खिडकीतून गट्टूने बाबांचा खूप शोध घेतला. 'आपले बाबा बस निघेपर्यंतही थांबले नाहीत? याला काय अर्थ आहे?' त्याच्या मनात येत होते. पण नळस्टॉपजवळ बस डेक्कनच्या दिशेला वळताना कॉर्नरवर सायकल घेऊन थांबलेले बाबा दिसले आणि काय जल्लोष केला त्याने! आधी दोघे एकमेकांना दिसण्याचा आनंद, मग वेग घेणार्‍या बसमुळे लांब लांब चालल्याचे दु:ख अनुभवताना जोरजोरात हात हलवणे आणि मग.. शेवटी एकमेकांना ठिपका झालेले पाहाणे आणि.. शेवटी... शेवटी त्या बसचाही एक ठिपका होत होत ती अदृष्य होणे..

श्रीने आधी ठरवले होते. बसच्या बरोबर जमेल तितकी सायकल चालवून गट्ट्च्या मनात आपल्याबद्दल असलेले प्रेम अन अभिमान वाढवायचा! सगळ्या मित्रांना सांगेल तो, बघा बघा, माझे बाबा किती फास्ट सायकल चालवतात. पण गेले काही दिवसांपासून त्याला दम लागू लागला होता. त्यामुळे त्याने तो वचार रद्द केला.

आणि मग... श्रीनिवास पेंढारकर... एक बाप.. आपल्या घरी निघाले..

आज आयुष्यात पहिल्यांदाच.. गट्टू शिवाय आपल्या घरी दिवस काढायचा होता. ऑफीसमधे थांबणे ठीक होते. पण घरी आल्यावर मात्र वेळ जाणे शक्य नव्हते. रात्री तर फारच आठवण येणार होती. कसा राहील तो तिकडे? झोपेल का? खायला व्यवस्थित असेल का? आपली आठवण आल्यामुळे रडेल का?

हाच तो कर्वे रोड! हाच! त्याला शाळेत सोडून परत जाताना याच रस्त्यावर आपण किती वेगात सायकल चालवायचा प्रयत्न करतो. कधी एकदा घरी जाऊन आवरून ऑफीसला जातोय अन पुन्हा संध्याकाळी घरी यून गट्टुला जवळ घेतोय! आज? आज नाही वाटत सायकल चालवावीशी! असं वाटतंय की इथेच थांबावं! आणि उद्या रात्री गट्टू परत आला की इथून त्याला घरी न्याव, तेव्हाच घरी जावं!

आणि इकडे बस सुसाट वेगात नगर रोडला लागलेली होती. नवीन नवीन भाग बघायला मिळत होते पुण्याचे! 'आम्ही तारे अभिनवचे' हा जयघोष चाललेला होता. एक शिपाई, दोन लेडीज शिपाई आणि तीन शिक्षिका या बेचाळीस मुलांना घेऊन जात होत्या. ड्रायव्हरबरोबर त्याचा एक सहाय्यक होता. बसमधे नुसता धुमाकूळ चाललेला होता. सगळे उत्साहात गाणी म्हणत होते, चर्चा करत होते, वाद घालत होते, खात होते आणि रस्त्याकडे टक लावून बघतही होते. रस्त्यावरून जाणार्‍यांच्या जवळून बस गेली की ते दचकत होते. कारण प्रचंड आवाज अचानक कानांवर पडत होता. ते पाहून मुले चेकाळत होती आणि मुद्दाम आवाज करत होती. शिक्षिका आणि शिपाई एकमेकांशी बोलत होते. मुलांना गप्प बसा असे सांगण्याच्या मूडमधे कुणीही नव्हते.

प्रचंड धुमाकुळात बसने येरवडा ओलांडला अन थंड हवेमुळे सगळ्या खिडक्या लावून घेतल्या मुलांनी! आता भेंड्या सुरू झाल्या. गावांच्या नावाच्या, मुलामुलींच्या नावांच्या आणि गाण्याच्या! काही जण भेंड्यांमधे माहीर होते. काही नुसतेच हसत भाग घेत होते. येथल्या इस्पितळात भरती होण्याची तुझी पात्रता आहे हे प्रत्येक जण दुसर्‍याला पटवून देत त्याला चिडवत होता.

मग कुणाचीतरी तात्पुरती मारामारी वगैरे झाली. ती मुलांनीच सोडवली. पुन्हा गट्टी झाली. आता सगळ्यांना एक एक सँडविच वाटण्यात आले. या निमित्ताने गट्टूला सॉस नेमका कसा लागतो हे अनुभवायला मिळाले. त्याच्या मनात विचार आला की आपल्या बाबांना तर ही चव माहीतही नसेल. शाळा सँडविच वाटू शकते म्हंटल्यावर आपल्या बाबांना ते का परवडू नये हे काही समजत नाही. असो!

भेंड्या खेळून त्यातील रस संपेपर्यंत अन गम लागेपर्यंत गाडीने रांजणगाव ओलांडलेही होते. येथे शेळीपालन करतात ही अमूल्य माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यातच अष्टविनायकांपैकी एक गणपतीही तिथेच आहे व 'हा बघा, हा बघा तो गणपती' ही माहिती ओरडून सांगीतल्यावर 'प्रथमं वक्रतुंडं च' हे स्तोत्र ज्यांना येत होते त्यांनी म्हंटले. त्यात त्यांना भाव खाऊन घेता आला. सगळे टकामका स्तोत्र म्हणणार्‍यांकडे बघत होते. सरदवाडीपाशी गाडी थांबली.

तेथे एका टपरीवर ड्रायव्हर अन 'किन्नर' यांनी चहा बिडी केली. तोपर्यंत काही मुलांचे शू वगैरे प्रकरण उरकले. त्याच टपरीवर ग्लुकोजच्या बिस्किटांचे मिनी पुडे विकत घेतले गेले सर्व विद्यार्थ्यांसाठी ते पुडे गाडी निघून एक किलोमीटर जाईपर्यंतच संपले.

शिरूरच्या अत्यंत खराब रस्त्यावर बसलेल्या धक्क्यांमुळे पेंगणारी मुले उठली. आणि मग पुन्हा दंगा सुरू झाला.

हा दंगा काही थांबेना! आता शिक्षिका झोपलेल्या होत्या. लेडीज शिपाई पेंगत होत्या. जेन्ट्स शिपाई केबीनमधे तंबाखू या पदार्थात भागीदारी मिळतीय का व ते झोपलेल्या शिक्षिकांना समजत तर नाहीयेना हे तपासण्यात आपले कौशल्य पणाला लावत होता.

अहमदनगर क्रॉस करताना सगळी मुले टकामका बघत होती. हे शहर तर पुण्यापेक्षा बरेच लहान आहे याचा अभिमान निर्माण होईपर्यंत गाडी साईबाबांच्या ओढीने शिर्डी रोडला लागलीही होती.

शिर्डीला खूपच गर्दी होती. शालेय विद्यार्थी म्हणून जरासे तरी प्राधान्य मिळाले. मग सगळ्यांनी आपापली प्रार्थना वगैरे केली. साईबाबांची मूर्ती बघून सगळेच प्रभावित झालेले होते. प्रत्येकाने आपापल्या पालकांनी दिलेली नाणि वगैरे ठेवली. नमस्कार झाल्यावर बाहेर आले आणि मग एका हॉटेलात जेवणावर तुटून पडले. हे हॉटेल म्हणजे एका कुटुंबाने चालवलेली खानावळ होती व अभिनव विद्यालयाने या खानावळीशी वार्षिक करार केलेला असायचा. या ठराविक ट्रीपमधील सर्वच खानावळींशी करार केलेला होता. मुलांना सोसेल असे सौम्य जेवण व शुद्ध पाणी!

गाडी निघाली. आता भरल्या पोटाने उत्साहात गप्पा अन दंगा सुरू झाला. त्यात कुस्तीचे फॅड निघाले. चालू गाडीतच मधल्या मोकळ्या जागेत लागोपाठ बारा कुस्त्या झाल्या. त्यात जिंकलेल्या मुलाने अभिमानाने सर्वांकडे पाहिले. शिक्षिकाही कुस्ती पाहातच होत्या.

आता दर वर्षी या ट्रीपसाठी ठरवलेल्या गेम्स सुरू झाल्या. क्लॅप अ‍ॅट सेव्हन वगैरे! कोडी, विनोद सुरू झाले. पुन्हा पेंगापेंग होईपर्यंत गाडी नाशिकमधे! व्वा! काय शहर आहे! माणसे अगदी पुण्यासारखीच! (दिसायला! वागायला पुण्यातल्यासारखे असणे ही पुणे सोडून इतरत्र ठिकाणी एक निंदा समजली जाते हे वेगळे!)

द्वारका, पंचवटी, त्र्यंबकेश्वर! दर्शन वगैरे होईस्तोवर मात्र मुले दमलेली होती. आता कुणालाच उत्साह राहिलेला नव्हता. खायला प्यायला व्यवस्थित होते तसे! पण किती फिरणार ती तरी! शेवटी गोदामाईचे दर्शन घेऊन एका शाळेत सगळे सायंकाळी जमले! सगळेच दमलेले होते. मात्र त्या शाळेत मिळालेले अगदी साधे जेवण, पिठले, भात, उसळ, कांदा, पोळ्या आणि एक चटणी! आहाहाहा! पुन्हा वारे भरल्यासारहे सगळे हुंदडू लागले. आता झोपायच्या जागा वगैरेवरून किरकोळ वादावादी झाल्यानंतर सगळे गुपचूप झोपून गेले.

ट्रीपचा एक दिवस पार पडलेला होता. रात्री साडे नवाला दमून झोपलेली मुले सकाळी पाचला अतिशय व्यवस्थित झोप झालेली असल्यामुळे ताजीतवानी होऊन उठून उभी राहिली. आणि बघतच बसली.

ही शाळा इतकी फालतू आहे? आपण काल इथे झोपलो? काय हे? यापेक्षा आपली शाळा कितीतरी छान आहे. असो!

आंघोळी पांघोळी होऊन टोस्ट, चहा झाले अन अत्यंत रमणीय हवेत गाडी मस्तपैकी पुढच्या प्रवासाला, म्हणजे अजंता लेण्यांना जायला निघाली. जिल्हा नाशिक येथून जिल्हा औरंगाबाद! सात वाजता श्रीराम हॉटेलमधे नाश्ता ठरलेला असायचा. पण आज काही कारणाने श्रीराम हॉटेल बंद होते. मग ड्रायव्हरने 'पुढे रस्त्यात एखाद्या ठिकाणी थांबू' असा विचार प्रदर्शित केला आणि सर्वानी अनुमती दर्शवली कारण दुसरे काही हातातच नव्हते.

पण... ड्रायव्हरचा तो निर्णय अचूक ठरला..

आहाहाहा! काय हॉटेल होते ते!

सकाळी अकरा वाजता गरम गरम रोटी आणि शेव टोमॅटो! शेव टोमॅटो ही एक अप्रतिम भाजी असते हे मुलांना पहिल्यांदाच समजले. शिक्षिकांनीही या नाश्त्याला 'जेवण कम नाश्ता' असे समजून भरपूर हादडले.

फक्त! एकच झाले.. सगळे बाहेर आल्यानंतर गाडीत बसायच्या आधी रस्त्यावर उभे होते... आणि..

एक अतिशय सुंदर मुलगी स्वतःचा पाय धरून ओरडत होती अन तिघाचौघांनी तिला अन एका मुलाला एका जीपमधे बसवले..

मात्र! जीप सुरू झाल्यावर त्या मुलीने त्या मुलाकडे बघून डोळा मारलेला किमान सहा मुलांनी तरी पाहिला.. ज्याला डोळा मारला तो मुलगाही डोळे विस्फारून तिच्याचकडे पाहात बसला होता... हा काय प्रकार आहे ते समजेना कुणाला... असो! 'आपल्याला काय करायचंय' म्हणून सगळे गाडीत बसले.

गाडी बाहेर पडल्यावर उजवीकडे वळल्यावर सगळ्यांना हॉटेलच्या नावाची पाटी वाचता आली..

'राम रहीम ढाबा'

चांदवड रस्त्याने गाडी आता अजंता लेण्यांच्या रस्त्याला लागणार होती.

'आता खूप मोठा आहे हे ठीक आहे पण... आपल्या वयाचा असतानाही साईबाबांपेक्षाही अफाट चमत्कारी असलेल्या एका हिर्‍याला, 'दीपक अण्णू वाठारे' याला आपण आत्ताच जीपमधे पाहिले' याची गट्टूला काहीही कल्पना नव्हती...

==========================

आणि इकडे??

दास्ताने वाडा म्हणजे पुण्यातले नंदनवन व्हायच्या मार्गावर आलेले होते.

काल सायंकाळी 'आज घरी गट्टू नसणार' या व्यथेत निराशपणे परत आलेल्या श्रीला स्वयंपाकच करावा लागला नाही. त्याची अत्यंत आवडती असलेली आर्वीची झणझणीत भाजी सात वाजताच घरी घरपोच आली. खरे तर तो पेशवाईमधे जाऊन मिसळ भुरकून झोपी जायच्या विचारात होता. पण सात वाजता घरात आलेल्या भाजीच्या घमघमाटाला अनुभवावे की बिनदिक्कत वाड्याच्या डोळ्यासमोर ती भाजी घेऊन आत आलेल्या प्रमिलाच्या घमघमाटाला अनुभवावे हे त्याला समजेना!

प्रमिला - आर्वीची भाजी.... आवडते ना?

आवडते ना म्हणताना जणू 'मी आवडते ना तुम्हाला' असेच विचारत असावी असा चेहरा करून ती विचारत होती. आणि 'आपण वेड्यासारखे बनियनवर काय बसलो आहोत' याचा विचारही मनात येऊ न शकल्यामुळे वेंधळ्यासारखा श्री तिच्याकडे पाहात बसला होता.

ती आली काय अन गेली काय! मावशींना तरी समजले होते की नाही कुणास ठाऊक?? आणि मध्या लेकाचा आहे कुठे? अर्थात, दास्ताने वाड्यात कुणीही कुठेही जाऊ शकते म्हणा... पण.. आपली गोष्टच वेगळी आहे. आपण एक विधूर!

ती गेल्यानंतर श्रीने त्या भाजीचा वास घेतला. प्रियकर जसा एकांतात प्रेयसीचे केस ओंजळीत धरून ते फुफ्फुसे ओव्हरफ्लो होईपर्यंत हुंगतो तसा त्याने तो वास घेतला.

या बयेला काय माहीत मला आर्वीची भाजी आवडते? रमानेच सांगीतले असेल कधीतरी! दुसरे काय!

आता आले का? पोळ्या लाटणे? ही गेली देऊन भाजी आपली! कणीक भिजवण्यापासून सगळे आता आपल्यालाच करावे लागेल. बर! ही भाजी उद्या डब्यात न्यावी अन आत्ता पेशवाईत जावे तर दोन अडचणी! आर्वी उद्यापर्यंत टिकेल की नाही याबद्दल आपल्याला खात्री नाही आणि आपण जेवायला बाहेर गेलेलो तिला समजले तर नाराज व्हायची.

पण आपल्याला काय देणे घेणे तिच्या नाराजीशी? एक विवाहीत स्त्री आहे ती! आपल्या लहानपणापासूनच्या मित्राची बायको आहे. आपली वहिनी आहे. मोठ्या भावाची बायको आईच्या ठिकाणी असते. ही लहान भावाची बायको आहे म्हणा, पण निदान लहान बहिणीच्या ठिकाणी तरी? नाही वाटत पण असलं काहीतरी! उगाच बहीण बिहीण मानायला.. नकोच वाटतं!

व्वा! काय भाजी झालीय! अगदी हवी तशी! पण... पोळ्या लाटायलाच हव्यात...

श्रीने चार पोळ्या केल्या. आज एक पोळी जास्त केली त्याने स्वतःसाठी! पोळ्यांबरोबर आर्वी भुरकताना तो सभ्यपणे विचार करत होता.

प्रमिला मधूसूदन कर्वे!

असा त्याच्या विचारांचा विषय होता.

काय काय झाले बुवा आजवर! तर एकदा वर्षभरापुर्वी तिला आपण तिच्या खिडकीत केस हलवताना पाहिले होते. त्यावेळेस नजरानजर झाली अन क्षणभराचसाठी आपल्या मनात डोकावलेले विचार तिने नेमके त्या क्षणभरातच वाचले. पण.. ती नाराज झाली नाही. आता मावशी बिवशींनी पाहू नये म्हणून पडदा ओढून घेतला म्हणा! पण ते तर काय? कोणतीही बाई करणारच! तेवढं स्वातंत्र्य बायकांना द्यायलाच हवं! त्या काय बघत बसणार की काय आपल्याकडे आपण बघतो तसे?

हं! दुसरं काय झालं? तो त्या दिवशी आपण एक नॉन व्हेज जोक टाकला तेव्हा ती आपल्यासमोरच होती अन अगदी मनापासून लाजली. मग त्यात काय? या जोकवर निगडेकाकूही लाजल्या असत्या. त्या प्रसंगात काही दम नाही.

तिसरं? तिसरं म्हणजे जेव्हा गट्टू काहीतरी हसीना रूठजायेगी वगैरे बडबडत होता तेव्हाही ती आपल्याकडे पटकन पाहात हसत हसत निघून गेली. यातही तसा काही अर्थ नाही खरे तर! 'मुले मोठी झाली आता' एवढेच सांगायचे असावे तिला त्या हसण्यातून!

चवथं काय? हां! हा चवथा प्रकार पहिल्या प्रकारासारखाच जरा गंभीर आहे. कशात काही नसताना नेमकी आजच आपली आवडती भाजी कशी काय केली तिने? आणि आपली आवड तिला माहीतच कशी काय? आजवर इतक्या वर्षात असे कसे नाही झाले? गट्टू असल्यामुळे?

वाट्टेल ते विचार करत श्री जेवत होता. भाजीचे पातेलेही चाटून पुसून संपवल्यानंतर मग त्याने तोंड बिंड धुवून भांडी घासून टाकली. उगाच उद्यावर नको हे काम टाकायला.

आता एक नवीनच प्रश्न! हे पातेले परत देताना यात काहीतरी देणे हे संस्कारांना धरून दिसते! आपण काय द्यायचे? समीरसाठी काहीतरी खाऊ आणावा उद्या संध्याकाळि अन देऊन टाकावे. पण...

पण तिला बिचारीला हे तरी सांगायला पाहिजे की भाजी म्हणजे एकदम सॉलीडच झालेली होती.

बिचारी? ती कशी काय बिचारी? हां! आता लक्षात यायला लागले. आपल्यासारख्याला अगत्याने भाजी आणून दिली म्हणून लगेच झाली ती बिचारी!

श्रीने सहज खाली नजर टाकली. सामसूम! ... अरे तिच्यायला.. हे काय? काय झालं काय?

मधूला बहुतेक भयंकर राग आलेला असणार आहे तिने आपल्याला भाजी दिली म्हणून! त्यामुळेच वाद झालेले असणार आणि त्यामुळेच सामसूम!

अत्यंत टेन्शनमधे पाच एक मिनिटे गॅलरीतच उभे राहिल्यावर 'आपल्या इमेजचे मधूच्या मनात पार खोबरे झालेले असणार' या भयाने श्री उगाचच नळापाशी जाऊन पुन्हा वर आला. काही वाद बिद ऐकू येतायत का हे बघायला.. ऐकू नाही आले काही.. पण.. नक्कीच.. काहीतरी घोळ आहे झालेला हे खरे!

प्रमिलाने कशाला द्यायची आपल्याला भाजी? आणि मुख्य म्हणजे तिने कशाला यायला हवे? समीरला पाठवायचे! मधूला पाठवायचे! आली आपली! आता झाली का पंचाईत???

परिस्थिती फारच गंभीर झालेली आहे हे लक्षात आले तसा बिचारा ढेपाळला. उगाचच मावशींच्या दारासमोर उभा राहिला अन दार वाजवले.

मावशी - काय रे बामणा.. ही वेळ आहे का एका एकट्या बाईच्या घराचे दार वाजवायची.. ??? आं??

आपण 'बामण' आहोत, मावशी एकट्या राहतात व त्यांना अब्रूची भीती वाटावी असे आपण आहोत आणि आपण अत्यंत चुकीच्या वेळेला त्यांचे दार वाजवले आहे यातील कोणताही थर मनावर अजिबात न बसता श्रीने विचारले..

श्री - सगळं बरंय ना? नाही.. आज गट्टू नाही.. म्हंटलं एकेकटं वाटत असेल तुम्हाला..
मावशी - झोपल्या बाईला उठवलं अन पुर्वेला तांबडं फुटवलं?? लाज लज्जा वाटत नाही तुला?
श्री - मी सहज आलोवतो.. हे.. कर्व्यांकडचेही.. झोपले इतक्यात??
मावशी - मी गुरखाय का वाड्याची? कर्वे झोपूदेत नाहीतर बर्वे उठूदेत.. मला काय विचारतोस?
श्री - सहज विचारलं! मधू.. इतक्या लवकर झोपत नाही कधी... म्हणून..
मावशी - असलेली माणसं झोपतात.. नसलेली नाही...
श्री - म्हणजे?
मावशी - मध्या गेलाय त्याच्या दिवट्याला घेऊन अलिबागला.. परवा येणारे..

ढिप्पांग ढिपांग ... ढिप्पांग ढिपांग..

असंय होय! अरे तिच्यायला.. मी इथे उगाच टेन्शनमधे..

मावशी - काय गिळलंस रात्री?
श्री -पोळ्या अन आर्वीची भा........ मेथीची भाजी
मावशी - अन मी इथे पोळी भाजी केली नसती का? नालायक कुठला..
श्री - असूदेत.. पडा आता जरा..
मावशी - आर्वीची भाजी तुला येते?
श्री - आर्वी कुठली आलीय? तोंडात आलं आपलं! मेथीची केलीवती..
मावशी - तेच म्हंटलं! आर्वीची भाजी करायला बाईमाणूसच लागतं!

'अहो बाईमाणसानेच केली होती' असे उड्या मारून सांगावे अशी इच्छा होत असलेला श्री कृत्रिम दुर्मुखलेला चेहरा करून घराकडे वळताना मावशींनी खाडकन त्यांचे दार लावले आणि..

श्रीची नजर खालच्या खिडकीकडे वळली तेव्हा अंधारातही..

एक उजळलेला गोड गोड चेहरा त्याहूनही गोड गोड हसत खिडकीचा पडदा लावून घेण्याऐवजी उघडून ठेवत होता....

त्या दिवशी रात्री रमाच्या फोटोकडे पाठ करूनच झोपला.. झोपला म्हणजे?? रात्रभर जागला..

खरे तर त्यानेही आपली गॅलरीकडची खिडकी उघडी ठेवली होती म्हणा.. पण परत त्या खिडकीत जायचे धाडस काही त्याला रात्रभर झाले नाही..

पावणे सहाला तो जेव्हा दूध आणायला निघाला तेव्हा प्रमिलाच्या घराचे दार उघडेच होते. तो दूध घेऊन आला तरी त्याला ती दिसेना! दार तर उघडे! नळावर पाणी भरलं तेव्हाही दिसली नाही. आला की काय मध्या लेकाचा.. काही सांगता येत नाही..

श्री हा जणू प्रमिलाचा ओरिजिनल कुणीतरी आहे आणि मधूने तिथे येणे हे कायदेशीर असले तरीही भावनेच्या दृष्टीने ते अयोग्य आहे असे वाटायला लागण्या इतपत एका रात्रीत प्रगती झाली होती श्रीची!

आता च्यायला झाली का ऑफीसला जायची वेळ? संध्याकाळी एकदा गट्टूला आणले की त्याच्याबरोबर राहावे लागणार आणि उद्या सकाळपासून तर मध्या अन समीरच येणार! संपलं सगळं!

तर????

दारात प्रमिला..

प्रमिला - डबा केलाय.. रात्री जेवायचं पाठवते हं दोघांचं? मावशींचंही आता वय झालंय..
श्री - अहो.. हे.. वहिनी हे कशाला सगळं.. ???
प्रमिला - असूदेत..
श्री - अहो मी.. हा बघा.. मी डबा केला होता माझा...
प्रमिला - आजच्या दिवस मी केलेला न्या ना... डबा..

बायका कोणत्याही वयाच्या असल्या तरीही 'असे असे करा ना' म्हणताना त्या 'ना' या अक्षराचा उच्चार एक तर आधीच असा काही करतात की पुरुष कोणत्याही वयाचा असला तरी बिचारा त्या 'ना' मुळे ते करायला धजावतोच!

त्यात ही या वयाची अन हाही याच वयाचा! पाघळायला काय लागतंय श्रीला?

प्रमिला - कालची आवडली?
श्री - काय?
प्रमिला - भाजी..??
श्री - शंभर नंबरी..
प्रमिला - मावशी काय म्हणाल्या?
श्री - त्यांना नाही दिली..
प्रमिला - त्याच्याबद्दल नाही.. मी भाजी देण्याबद्दल..??
श्री - मी नाही सांगीतले..
प्रमिला - बरं झालं..
श्री - का?
प्रमिला - नकोच.. जाहिरात...

या वाक्याचा अर्थ कळायलाही जरासा वेळच लागेल इतका भोळसट होता बिचारा श्री!

प्रमिला दारातून बाहेर निघताना तो तिच्या त्या वादळी वेगाचा अन पाठमोर्‍या रुपाचा विचार करायला लागणार तोच ती वळून म्हणाली..

प्रमिला - किती वाजता येणार??
श्री - अं? हेच.. सहा साडे सहा..
प्रमिला - हं! लवकर या..

सुळ्ळकन निघून गेलेल्या प्रमिलाच्या वागण्याचे आता श्रीला खरेखुरे टेन्शन आले होते. अगदी खरेखुरे!

ही अशी काय वागते? शोभते का हिला? प्रॉब्लेम काय आहे? आपण आपल्या वागण्यातून कधीच असे जाणवू दिले नाही.. तरीही?

श्रीने एकदा स्वतःला आरशात बघितले. कपाळावरून दोन सेंटिमीटर मागे गेलेले केस हा एक घटक सोडला तर अजून तो तसाच दिसत होता. अगदी हिरो मुळीच नाही.. पण.. 'बर्‍याच्यापेक्षा जरा वरचा'!

प्रमिला अशी का वागतीय? हा एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकेल पुढे! वेळीच सावरायला पाहिजे आपण..

एवढे सगळे विचार विवेकबुद्धीने करूनही...

श्रीच्या मनाला दिवसभर प्रमिलानेच व्यापले होते आणि...

गट्टू ट्रीपला गेलेला असूनही आज दोन वाजता त्याने सप्रेंकडे 'चार वाजता जायचे आहे' असा अर्ज पाठवलेला होता आणि तो... सॅन्क्शनही झाला होता..

मात्र! सगळ्याच आनंदावर विरजण पडले..

पाच वाजताच वाड्यात प्रवेशलेल्या श्रीला समोरच राजश्रीबरोबर समीर खेळताना दिसला आणि...

प्रमिलाच्या घराचे दार आणि खिडकी बंद होती...

बहुधा दिड दिवसाच्या विरहावर इलाज केला जात असावा..

अत्यंत नाराज मनस्थितीत घरी आलेल्या श्रीने जरा वेळ विश्रांती घेतली अन तो सरळ पेशवाईत निघून गेला.

आपण आपल्या मुलाला हॉटेलमधे आणत नाही कारण इथले सगळे अन्न अत्यंत जहाल तिखट असते असे त्याचे मत होते. पण आज मात्र त्याला स्वतःला वाड्यात क्षणभरही थांबावेसे वाटत नव्हते. म्हणून तो स्वतःच पेशवाईत आला होता.

त्याने दोन मिसळ आणि दोन चहा ढोसले अन इकडे तिकडे फिरून शेवटी सायकलवरून शाळेकडे निघाला...

नऊला येणारी बस तब्बल पावणेदहाला आली आणि अत्यंत दमलेली, थकलेली बिचारी मुले कशीबशी बसमधून खाली उतरली.

गट्टूला ओढून जवळ घेताना श्रीला इतके बरे वाटले की... बास्स्स्स!

आपला मुलगा! आपल्या रमाला आपल्यापासून झालेला आपला स्वतःचा मुलगा..

हा जवळ असल्यावर कशाला कुणाची गरज आहे आपल्याला??

कुणाचीही नाही.. अगदी.. मावशी.. चितळे आजोबा.. माने काका... मधू... आणि.. प्रमिलावहिनींचीही!

डुलक्या घेत असलेल्या गट्टूला वाड्यात आणले आणि..

झोपच उडाली गट्टूची...

समोरचे दृष्यच तसे होते...

ते पाहून उन्मळून जावेसे वाटत होते...

"श्री आणि गट्टू यायच्या आधी माझा निष्प्राण देह दास्ताने वाड्यातून स्मशानाकडे नेण्याच्या प्रस्तावाला मी दास्ताने वाड्यातर्फे... नामंजूर करत आहे"

चितळे आजोबा... वॉझ नो मोर..

गट्टुच्या आयुष्यातील डोळ्यासमोर घडलेली वाड्यातील पहिली डेथ....

नंदा, मधू आणि मानेका आजोबांच्या प्रेतावर कोसळून कोसळून आक्रोश करत रडत होते...

प्रमिलाची तर पुढे यायचीही हिम्मत नव्हती...

सगळा वाडा रूदन करत होता.. सगळ्या भिंती निराश होत्या...

श्रीला तो धक्का पचवताच आला नाही.. त्याने सायकल तशीच टाकत आजोबांच्या देहाला मिठी मारली...

गट्टू भीतीने अन आश्चर्याने रडत होता.. सगळी लहान मुलेही रडत होती...

मोतीबागेतील किमान पंधरा माणसे आलेली होती...

आणीबाणीमुळे बसलेला मानसिक धक्का आजोबांना सहन झालेला नव्हता..

श्रीने साईबाबांचा प्रसाद गट्टूच्या पिशवीतून काढून रडत रडत आजोबांच्या निष्प्राण ओठांवर ठेवला..

"श्री राम जयराम जयजय राम"

आर एस एस च्या वृद्धांचा घनगंभीर आवाज वाड्यात घुमला..

बायका आणखीनच रडू लागल्या. पुरूषही कोसळून प्रेताला हात द्यायला धावले...

अर्थातच... अशा प्रसगी पवार मावशी कधीच...

चार चौघात नसायच्या...

आता यापुढे किमान पंधरा दिवस त्यांचे दर्शन तरी होईल की नाही माहीत नव्हते कुणालाही...

आणि प्रेताला खांदा देताना मानेकाका गदगदून म्हणाले.....

... म्हणाले कसले... कसेतरी ते शब्द आले त्यांच्या तोंडातून.. जे ऐकून मधू अन निगडेकाकूंनीही मानेकाकांना त्याच अवस्थेत मिठी मारली अन सगळेच भेसूर रडले.. मानेकाका म्हणत होते...

"आपल्या सगळ्यांच्या ... लाडक्या.... चितळे आजोबांच्या आत्म्याला.. शांती मिळो... या प्रस्तावाला.. मी दास्ताने वाड्यातर्फे... "

आज .. आज कोरस उमटला.. पण.. अश्रूंच्या स्वरूपात!

गुलमोहर: 

प्रियकर जसा एकांतात प्रेयसीचे केस ओंजळीत धरून ते फुफ्फुसे ओव्हरफ्लो होईपर्यंत हुंगतो तसा त्याने तो वास घेतला. >> क्या बात है.

चितळे गेले, विश्वासच बसत नाहि हो.
पण आता मला तुमच्या असल्या धक्क्यांची सवय झाली.
लगे रहो.

बेफिकिर,

kharach tumche koutuk,
1. mavashi chya manhi manje tar greatch
2. tumhi tumchya reader's na itke khilun thevata ki ase watale ki ti Kajal ch asel manun. ani dusri line Ram Rahim Dhaba.
3. Shri ani Pramila, kai lihile le rao tumhi. Priyakar jasa Preyshi chya .. overflow ... - mala kharach itke hasayala ale ki majhaya Reporting Manager ne mala bher(out) jayala sangitale. ek diwas nokari jail hoooo
4. Chitale ajo gele he ek wait
pan apratim manje apratim....

बेफिकिर,

तुम्ही उत्क्रुष्ठ लेखक आहात. प्रत्येक पात्रास तुम्ही योग्य न्याय देतात. ३० वर्षापुर्वीचे वातावरण मोठ्या
सामर्थ्याने उभे केलेत तुम्ही.

आभारी.

raj-nanda,
"गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन" असे जिथे लिहिलेय, त्याच्या वरच
कथा | कादंबरी | लेख | कविता | विनोदी लेखन | बालसाहित्य | विविध कला | जुन्या गुलमोहरकडे |
मुख्यपृष्ठ

असे टॅब्स आहेत, त्यापैकी " कादंबरी" वर क्लिक केले, तर हे सगळे भाग मिळतील.
तरीही, तुमच्या सोयीसाठी ही लिंक देत आहे. http://www.maayboli.com/gulmohar/marathi_kadambari

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनःपुर्वक आभार! ऋण आहेत तसेच ठेवावेत माझ्यावरती!

-'बेफिकीर'!