मायबोली वर्षाविहार २०१० - वृत्तांत

Submitted by आशूडी on 19 July, 2010 - 02:18

१८ जुलै २०१०. मायबोलीकर ज्याची गेला एक दीड महिना आतुरतेने वाट पाहत होते तो वर्षाविहाराचा दिवस. दिवसाची सुरुवातच पहाटे पाच वाजता संयोजकांच्या 'गुड मॉर्निंग मायबोलीकर्स' अशा प्रसन्न एसेमेसने झाली. भाषा नाही भावनाओं को समझो! पुन्हा थोड्या वेळाने 'Bus is on the way as per given schedule... Please reach your given bus stop on time' असाही एसेमेस आला. ज्यांचे अलार्म वाजले नसतील त्यांना उठवण्याची ही नामी युक्ती पाहून मला भरुन आलं. पटापट आवरुन मी अगदी वेळेवर पोहोचणार इतक्यात मला वविला येऊ न शकणार्‍या माबोकरांची तीव्र आठवण झाली. ते आपल्यासोबत आहेत असं वाटावं म्हणून काय बरं घ्यावं असा विचार करत असतानाच सर्व देशा शहरात मिळणारं, सर्वांचं लाडकं लालबुंद सफरचंद दृष्टीस पडलं. ते घेऊन निघायला जितका वेळ लागला असेल फक्त तितक्याच उशीरा आम्ही दोघे स्टॉपवर पोचलो. एवढ्या तमाम माबोकरांना खिशात टाकून नेणे म्हणजे काय (सफरचंद) खायचं काम नव्हे. पण हे कुणाला पटेल तर ना! सफरचंदाचं कारण कळताच लोकांना त्या जागी काही विशिष्ट आयडीच दिसू लागले. त्यामुळे ते त्याकडे 'खाऊ की गिळू' अशा नजरेने पाहू लागले. हे (व भूक )सहन न होऊन मी च शेवटी ते खायला घेतले. तोवर बस 'किमया' ला पोहोचली. खोपोली ला जायचा रस्ता नक्की चांदणी चौकाच्या दिशेला आहे की एसएनडीटीच्या यात एकमत न झाल्याने ते लोक बरोब्बर 'किमया' च्या बाहेर पण बसच्या विरुध्द दिशेला रस्ता क्रॉस करुन थांबले होते. त्या सार्यां ना रस्ताक्रॉस करताना पहायला आम्हाला खूप मजा आली. बस हळूहळू जड होत होती. आणि बसमध्ये एक भूकबळी चढला! बसायाला जागा पहायच्या आधी तिचे 'मया, काही खायला आहे का?' अशी कार्याध्यक्षांना विचारणा झाली. तिला थोडे समजावून बस 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात निघाली. तरीही भुकेने कासावीस मीन्वाज्जींची तब्येत तोळामासाच होत होती. त्यामुळे आमचा जीव वर खाली. त्यात माझ्या हातात ते सफरचंद. वाटेत निस्सान, शेव्हर्ले चे शोरुम आल्यावर 'इथे विचारुया का काही खायला आहे का?' असे आज्जी कोमात बरळत होत्या. आम्ही त्यांना धीर देत होतो. शेवटच्या स्टॉपवर चढल्याने आम्ही सारे बसच्या शेवटच्या काही सीटांवर बसलो होतो. पूनमही आज आपण मूक पाठिंबा द्यायचा असे ठरवून बॅकसीट घेतली होती. तिच्या या निर्णयाचा आम्ही मनापासून आदर केला. परंतू मुळात मीन्वाच भूकबळी ठरत असल्याने बस इंजिनला मागून हवा तेवढा 'पुशिंग फोर्स' मिळत नव्हता. त्याअभावी अखेरीस वाकड फाट्यापुढे बसने गुडघे टेकले. विजेच्या वेगाने मीन्वाज्जी थोडी बिस्कीटे, इडल्या घेऊन आल्या. राज्याने सर्वांना गोळ्या घातल्या. खाऊ. मँगो बाईटच्या. मीन्वाज्जींची तब्येत थोडी स्टेबल झाल्यावर मात्र (त्यांची) गाडी जी काही सुसाट निघाली ती विचारु नका.

श्यामलीही आता बसमध्ये आल्याने अंताक्षरीला सुरुवात झाली. तर तिने नमनालाच स्वतःचे मायबोली गणेशोत्सव मधली गणेशवंदना गायली. यावर मिल्याने तिला 'बसमध्ये रिक्षा आणता येणार नाही' अशी प्रेमळ सूचना केली. अआंची आठवण काढून आम्ही तिला तिची ८० पानी वही उघडायला सांगितली तर तिने '८० पाने पुरत नाहीत. आता १६ जीबी, ८० जीबी, २५० जीबी असे बोला' म्हटल्यावर आम्ही घाबरुन चूप बसलो, आणि अंताक्षरीच सुरु ठेवली. वाटेत ते घाट, गाड्या, कार्स, हिरवे डोंगर, धबधबे, सुंदर वळणदार रस्ते वगैरे नेहमीचं होतंच. परंतु बोगदे आल्यावर अंधारातले फोटो काढून काही लोक कसले पुरावे गोळा करत आहेत ही माझी आणि मीन्वाची गहन चर्चा इथे सांगणं इष्ट नाही. त्यासाठी भेटा अथवा लिहा : मी किंवा मीन्वा. (ही अशी यमकं मिल्या, देवा दिवसभर जुळवून उच्छाद आणत होते.)अशा गाणीगप्पांमध्ये आम्ही यू के'ज रिसॉर्टला कधी पोहोचलो ते समजलंच नाही. मुंबईकर आधीच येऊन आमची वाट पाहत होते. मी आल्या आल्या त्यांची बस पाहिली. खरंच त्यात वर्णन करण्यासारखं काहीच नव्हतं. कबके बिछडे हुए हम आज कहां आके मिले स्टाईलमध्ये भेटाभेटी झाल्यावर बॅगा रुममध्ये टाकल्या आणि आम्ही नाष्त्याला एकत्र जमलो. पोहे, उडिदवडा सांबार, ऑम्लेट पाव ('यांपैकी कोणतेही एक खाऊन दाखवा' अशी पाटी तिथे नसल्याने) सगळंच थोडं थोडं असा भरपेट नाष्ता करुन गरम गरम \चहा प्यायलो. चहासोबत आम्हाला विशिष्ट स्फूर्ती आली असावी असे वाटून हॉटेलवाल्यांनी लगेच 'कोंबडी पळाली' गाणे लावले. संयोजकांनी दिलेल्या फोटोनुसार तिथे स्वीमिंगपूल होता. त्यातल्या त्या मशरुमच्या छत्र्या, घसरगुंड्यांसकट. उत्साही माबोकरांनी, त्यांच्या बछड्यांनी रेन्डान्स, स्वीमींग पूल येथे चिंब भिजून, नाचून मस्त मजा केली. एका बाजूला लॉन होते तिथे मी, मिल्या, देवा, किरण, साजिरा, मयुरेश, हर्षद, आणि बेस्ट फिल्डर निहिरा (वय वर्ष ३) घाम फुटेस्तोवर क्रिकेट खेळलो. पार लांबून उंचावरुन हाताशी कॅच आला की बोटाला लागेल म्हणून मी चाणाक्षपणे तो सोडायची काळजी घेत होते. असे खेळून, भिजून , नाचून थकलेले माबोकर जरा विसावताच त्यांना संयोजकांनी रिमझिम, झिम्माड, धोधो, मुसळधार अशा टीममध्ये विभागून टाकलं. ही कंपूबाजी नव्हे काय? असा खडा सवाल तिथे कुणीतरी केला त्याला अर्थातच उत्तर आले नाही. त्यानंतर स्वादिष्ट असा पंजाबी मेन्यू जेवणात होता. जेवण झाल्यावर मी ,अतुल कॅरम रूममध्ये गेलो आणि नवा कोरा गुळगुळीत बोर्ड, सर्व सोंगट्या, स्ट्रायकर, पावडर या वस्तू सापडल्यावर ट्रेझर हंट जिंकल्यावर जितका आनंद होतो तितकाच होऊन सदगदित झालो. नंतर आम्हाला आनंदमैत्री व राज्या डबल्स मध्ये जॉईन झाले. तोवर तिकडे सांस चे कार्यक्रम सुरु होत होते. व 'आपण यांना पाहिलंत का?' मध्ये आमची नावं घोषित केली जात होती. दोनोळी उखाण्यांना एक मार्क आणि माझ्या २४ ओळींच्या उखाण्यालाही एकच मार्क अशा बहुत नाइन्साफीमुळे आमची टीम मागे पडली. त्या कटु आठवणी नको म्हणून गेम्स बद्दल लिहायची मी दुसर्‍या कुणाला तरी विनंती करते. गेम्स खेळायला पाऊसही आला, आणि ववि कारणी लागला. लगेच मीन्वाज्जींनी उखाण्यात भज्यांची फर्माईश केली. आज्जीचा दरारा सर्वदूर आहे याची प्रचिती म्हणूनच की काय आम्हाला लगेच भजी आणि चहा मिळाला!

'चहा कुणी सांडला?' हा 'कोंबडीने रस्ता का पार केला?' या प्रश्नाइतकाच ऐरणीवरचा प्रश्न आता झाला आहे याची सर्व माबोकरांनी नोंद घ्यावी. 'धडपड्या वृत्तीचे उद्योजक' साजिरा यांचे हे महान कार्य असल्याचे येथे नमूद करावे लागेल. चहा तर सकाळी मी ही सांडला होता पण तो माझ्याच अंगावर. त्यामुळे निदान तो अंगी लागला असे म्हणता येईल. परंतू साजिर्‍याने गंधासारखा घट्ट चहा फरशीवर सांडून चहाबाजांचे जे भावनिक नुकसान केले त्याची भरपाई त्यात त्याने स्वत:ने रिकामे कप ठेवून, वरुन खुर्ची ठेवून होणार नाही. शिवाय वैनीने एक कागदाचा चिटोरा टाकून तो कपभर चहा शोषला जाईल अशी शक्कल लढवली. मी आणि मीन्वा तिच्याकडे संशयाने पाहत असतानाच तिला त्यात होडी करुन सोडायची असेल अशी मी आमच्या दोघींच्या मनाची समजूत करुन घेतली. यावर नंतर देवा, मिल्या, मीन्वाने 'कप मांडला, चहा सांडला' (खेळ मांडला - नटरंग), 'चहा सांडून भांडून सोडू नको', 'साजिरा रे, चहा सांडला रे' (नाविका रे) अशा विडंबनांचा बसमध्ये खच पाडला. ते आपल्याला लवकरच गुलमोहरात दिसेल अशी आशा करुया.

त्यानंतर बक्षीसवाटपाचा, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. मगाशी टीम करताना नवरा बायकोंना मुददाम वेगवेगळ्या टीममध्ये का ठेवले असावे या प्रश्नाचे उत्तर मला आता मिळाले. ४ पैकी २ टीमला (विजेते आणि उपविजेते)बक्षीस देऊन जास्तीत जास्त घरात ट्रे पोहोचावेत अशी दूरदृष्टी पाहून मला त्यांचे अपार कौतुक वाटले. यू. के. चे सर्वेसर्वा श्री. पाटील यांनी या प्रसंगी सर्व माबोकरांना १०% डिस्काऊंट देण्याची घोषणा जाहीर केली. तिथे बोर्डवर 'Maayboli vavi 2010'चे कुणीतरी खट्याळपणे 'Maayboli vavi 2001' केले होते. पण फुटलेले काचेचे ग्लास, सांडलेला चहा, सतत रुमच्या किल्ल्या हरवल्याच्या घोषणा यावरुन मलाच ते 'Maayboli vavi (इसपू) 1002' करावेसे वाटले. श्यामलीची मोठी हँडबॅग पाहून ती तेथे रहायला आली आहे का असा प्रश्न मी तिला सकाळीच विचारला होता. आता तिच्या सांत्वनपर सुरावटींची खरंच यू के वाल्यांना गरज आहे असे वाटत होते. खरोखर उत्तम व्यवस्था, उत्कृष्ट आयोजन यासाठी यू के'ज रिसॉर्ट ची टीम, ववि समिती, टी शर्ट समिती, सांस यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर ग्रुप फोटो, जय भवानी जय शिवाजी वगैरे घोषणा देऊन, एकमेकांचे निरोप घेऊन सगळे आपापल्या बसमध्ये जाऊन जागेवर बसले. बस निघाल्या. पाऊस होताच. तेव्हा शाळेच्या अ‍ॅडमिशन्स असा एकदम गंभीर गिअर कसा पडला कोण जाणे. आणि 'तुम्ही आताच अ‍ॅडमिशन घेऊन ठेवा' असा अनुभवी, मौलिक सल्ला मला मिल्याने दिला. यावर मी त्याला 'त्यासाठी मला आधी अ‍ॅडमिट व्हावे लागेल त्याचे काय?' असे विचारताच त्याने ' ते सोप्पं असतं' असं टिपिकल पुवडुवृत्तीचे उत्तर दिले. तितक्यात देवा, हिम्या आणि साजिर्‍याने 'चुपके चुपके रातदिन आँसू बहाना याद है' सुरु केल्याने मिल्या वाचला. आणि मग अशा एकेक सुरेख गाण्यांची मैफिलच जमली. गणेश कुलकर्णी, नितिनचिंचवड, सुधीर, रुमा, मीन्वा, मी, मिल्या, श्यामली, देवा, साजिरा , निळूभाऊ सगळेच एका भावविश्वात गुंग होऊन गेलो. फर्माईशी येत होत्या, दाद मिळत होती. हुजूर इस कदर भी ना, तुमको देखा तो ये खयाल आया, नीला आसमां, सांज ढले गगनतले हम कितने, दयाघना, मन क्यूं बहका रे बहका अशी एकेक रत्नंच बाहेर पडत होती. श्यामलीचा स्टॉप यायच्या आत तिच्याकडून किती गाणी ऐकून घेऊ असं प्रत्येकाला झालं होतं. सांज ये गोकुळी, फुलले रे, भय इथले संपत नाही, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.. अशी अजरामर गाणी तिने गायली. पुढे ती उतरल्यावर मग आम्ही मूड हळूहळू बदलत रिम्झिम गिरे सावन, तू ही रे वगैरे सुरु केले.मध्ये सलामे इष्क वर सगळ्यांचे गळे साफ करुन झाले होतेच. वैनीला उठवण्यासाठी मीन्वाची चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ची मात्रा मात्र करेक्ट लागू पडली. निरोपाची वेळ येतीये हे कळूनच आपोआप 'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही' ओठावर आलंच. चांदणी चौक आल्यावर 'लागा चुनरी में दाग' च्या भैरवीने मैफिलीची सांगता केली. मग मीन्वाज्जी 'काय शब्द, काय संगीत, काय आवाज रे त्या काळचे! काय कामं करुन ठेवली आहेत या लोकांनी! ' असं म्हणत भावविवश झाल्या. आम्ही त्यांना अनुमोदन दिले. पण आज अजय देवगण, अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांनाही रात्री शांत झोप लागावी म्हणून for the sake of old college-days म्हणून गोरे गोरे मुखडे पे, मैने प्यार तुम ही से, आँखो मे बसे हो तुम ही गाणीही वाचून टाकली. आणि सुनील शेट्टी अ‍ॅट द टॉप ऑफ हिज इमोशन्स(सौजन्य : साजिरा) वाले 'ना कजरे की धार' ही मोहरा मधले गाणे मनापासून म्हणून मिल्या ने पूर्णविराम दिला. जरा शांतता प्रस्थापित झाल्यावर निळूभाऊने साजिर्‍याचे एकूण चार लोकात असूनही एकटं राहणं पसंत करणे, ती मगाचची भावविवश गाणी (वो शाम कुछ अजीब थी) मनापासून आर्त स्वरात गाणे यावरुन अंदाज बांधून 'तुम्ही एकटेच असता का?' असा प्रश्न करताच हसून हसून मी आणि रुमा सीटवरुन पडायच्या बाकी होतो. तरी रुमाने लग्गेच सांगितले 'त्याच्या बरोबर एक छोटी मुलगी असते अधूनमधून. त्याचीच.' इतक्यात आमचा स्टॉप आला आणि मी भरगच्च आनंदाने भरुन पावून बसमधून उतरले. असा हा २०१० चा ववि माझ्या नजरेतून संपन्न झाला.

** 'माझ्या नजरेतून' असे लिहील्याने कुणाला काही दिवे बिवे मिळणार नाहीत. शिवाय स्मायली ज्याच्या त्याने हव्या तिथे चवीनुसार टाकून घ्या. सगळं आयतं मिळणार नाही. Proud मुख्य गोष्ट, यात बर्यााच गोष्टींचा, व्यक्तींचा उल्लेख राहिला आहे, (असेल म्हणत नाही) त्यांनी राग मानून न घेता लेखकाच्या एकूणच मर्यादेचा आदर करावा ही विनंती. Happy शिवाय, अजून वृत्तांत येऊ द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्युमा, भारी वृत्तांत.

वाटेत निस्सान, शेव्हर्ले चे शोरुम आल्यावर 'इथे विचारुया का काही खायला आहे का?' असे आज्जी कोमात बरळत होत्या. <>>>> Lol

बसमध्ये एक भूकबळी चढला>>
बसने गुडघे टेकले >>
'यांपैकी कोणतेही एक खाऊन दाखवा>>
'तुम्ही एकटेच असता का?>>
Lol
मस्त आशू. वृत्तांतातही पहिला नंबर लावलास की. Happy
--

भुकेच्या जयघोषाचा प्रताधिकार दरवेळी अरुण आजोबांचा असतो. यावेळी ती कसर कुपोषिताज्जीने भरून काढली. मयूरेशकडे ती खाऊ का गिळू नजरेने 'खायला दे' चा ओरडा करत होती. पोटात काही नसताना एवढा थयथयाट तर पोटात गेल्यावर काय- अशा भितीने की काय, मयाने 'मी कार्याध्यक्ष नाही आणि संयोजकही नाही!' असे म्हणून हात वर केले, तशी मीनू आणखीच चेकाळली. संयोजकांची अजून हाऊसमनशिप चालू आहे, अशी मनाची आणि मिनूची समजूत काढून झाल्यावर पुढे एका ठिकाणी बस थांबली, आणि मीनूचा जीव पोटातून बाहेर पडता पडता वाचला.
--
बसमध्ये पुढचे अर्धे विरुद्ध मागचे अर्धे अशी अंताक्षरी रंगली. परेशच्या 'भय्या धोतर तसेच ठेवून गावाला गेला..' यासारख्या गाण्यांनी मजा आली. मीनूच्या पोटात जीव आल्याने तिने 'केशवा माधवा..' पासून 'तुम तो टहरे परदेसी..' आणि 'परदेसी परदेसी..' पर्यंत आळवणी कम धिंगाणा चालू केला. तशात पुढे बसलेली आशू तिला जाऊन मिळाली आणि तिथे अचानक स्फोटक काँबिनेशन तयार झाले. पूनम पण तिथेच बसलेली होती, पण तिने 'या दोन अजाण बालिका..' अशा नजरेने या दोघींकडे बघत बॅकसीट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिच्युएशनचा स्फोटक ते विनाशकारी असा प्रवास टळून आमचे जीव एकाच वेळी बशीच्या भांड्यात सुखरुप पडले.
--
दरम्यान निहिरा आणि आशू या दोन बालिकांची सफरचंदे खायची स्पर्धा चालू होती. एकेका सफरचंदाचे नशीब. संदीप खरे आणि न्युटनच्या वाट्याला आलेल्या सफरचंदांचे एवढे कुठचे नशीब!
दरम्यान स्वातीला तिने लोकांना ओळखून दाखवावे, असा रॅगिंगयुक्त सल्ला मिळाला, तेव्हाही मीनू आणि आशू यांचे बस डोक्यावर घेणे चालूच होते. बदला म्हणून एकमेकांचे आयडी सांगून टाकून त्या बिचार्‍या स्वातीला त्या गोंधळात पाडत होत्या.
--

वेळ मिळेल तसा अजून लिहितो आहे..

आणि "रूम नंबर ११६ ही" सारखी हरवत होती! Biggrin कोणाकोणाकडे ह्या किल्ल्या होत्या रे? आणि मुख्य म्हणजे किल्ल्या असताना ते कुठे होते? द्या बरं खुलासा Proud

मस्त वृ आशू. पंचेस भारी. मी माझा गळा शेवटच्या टप्प्यासाठी 'एकदाच्या आशू आणि मीनू थंडावल्या की वापरू' ह्या उद्देशाने राखून ठेवला होता Proud

सांसचे वृत्तांत आले की लिहेन. मजा आली सर्व खेळ खेळताना. मला 'भारी', 'भक्कम' आणि उत्साही टीम मिळाली होती, त्यामुळे खूप एन्जॉय केल्या गेम्स. कल्पक खेळ आणल्याबद्दल सांसचे विशेष आभार Happy

स्पॉट खूप आवडला. खूपच प्रशस्त असल्यामुळे छान वाटलं. नाश्ता, जेवण उत्तम होतं.. एकूण सोय एकदम टकाटक होती Happy

अरे वा! मस्त मजा केलीत.
>>तर तिने नमनालाच स्वतःचे मायबोली गणेशोत्सव मधली गणेशवंदना गायली. यावर मिल्याने तिला 'बसमध्ये रिक्षा आणता येणार नाही' अशी प्रेमळ सूचना केली.
श्यामली, आता तरी नमनाचे गाणे बदल Happy

मस्त वृ. Happy पण फक्त आशूनेच लिहिलाय, आणि साजिर्‍याने थोडंफार लिहिलंय.
बाकीचे काय इतके दमलेत का? लिहा की पटापटा..

कल्पक खेळ आणल्याबद्दल सांसचे विशेष आभार. स्पॉट खूप आवडला. खूपच प्रशस्त असल्यामुळे छान वाटलं. नाश्ता, जेवण उत्तम होतं.. एकूण सोय एकदम टकाटक होती >>> पूनमला अनुमोदन द्यायची वेळ माझ्यावर शक्यतो येतच नाही पण यावेळच्या ववि संयोजकांनी ती आणली. पूनमला अनेक मोदक. संयोजकांचे अभिनंदन आणि आभार. Happy यात सर्व संयोजकांचे कौतुक - टी शर्ट, ववि आणि सांस.

नेहमीच्या सवयीप्रमाणे काल सकाळी (??? पहाटे) ३:३०ला उठले आणि आठवले यावेळेस मी ववीला नाही जातेय... Sad आणि या रविवारी ऑफिसातही नाही जायचेय... या सुखद विचाराने लगेच साडे तिसाव्या मिनिटाला परत झोपी गेली.... Happy

आशु मस्त वृत्तांत!!!...

मस्त वृत्तांत आशुडी. आशु तु घेतलेला उखाणा मस्त गुंफलेला होता. लिहुन ठेव ना इथे कुठेतरी.खरच ही आणि मीनु भरपुर टॅलेंटेड आहेत. काय सगळ्या गोष्टी पटापट सुचतात या दोघींना. साजीर्‍याच्या चहावर मीनु ने सुरु केलेल्या काव्यांना वैतागुन की काय पण शेवटी यमक जुळवायला साजीराच मदत करु लागला. :-). श्यामलीची सुद्दा किती गाणी पाठ आहेत. लिमये बुवांचा आवाज एकदम खणखणीत. आख्या बस ला एकत्र आणल. राज्याने अंताक्षरी खेळताना स्वःताच्या मनासारखी (??) गाणी म्हणुन करमणुक केली.

आशु तु घेतलेला उखाणा मस्त गुंफलेला होता>>>अगदी अगदी Happy

मस्त वृ Happy

पूनमने मला "ओळख पाहू" च कोडं घातल आणि मी तिला चक्क पैकी ओळखल. Proud कसं? "आवाज कुणाचा?" Proud अस मी तिला ऐकवल खरं पण तिने "मी तुला ओळखल" म्हंटल म्हणून मी आपला अंदाज केला नी बरोबर आल्यावर दिला आवाजावर ठोकून Proud रच्याकने मला पोर्णिमा/पूनम म्हणजे गोल चेहर्‍याची असणार अस उगाचच वाटलेल Proud

रच्याकने मला पोर्णिमा/पूनम म्हणजे गोल चेहर्‍याची असणार अस उगाचच वाटलेल >> आता तरी बदल गं पूनम तो आयडी आणि उभट चेहर्‍याचा वाटेल असा आयडी घे एखादा ... उदा. ?? ओवली (ओवल वरुन :P) कविता कुठलं नाव ऐकून तुला चेहरा उभट आसेल असं वाट्टं ते सांग गं.. Happy (दिवे नको ना गं ? )

>>रच्याकने मला पोर्णिमा/पूनम म्हणजे गोल चेहर्‍याची असणार अस उगाचच वाटलेल >> Lol
'पपई' असा आयडी घे. Wink Light 1 ('प' वरुन सुरु होतोय बघ)

फोटू कुठे आहेत?

Pages