वेदकालीन संस्कृती भाग ३

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

वेदकालीन संस्कृती भाग १
वेदकालीन संस्कृती भाग २

मागील भागात आपण आर्यन थेअरी, आर्य-अनार्यांचे देव ह्या बद्दल माहिती पाहिली. ह्या भागात हिंदू धर्मग्रंथाची व त्यावर आधारीत साहित्यप्रकारांची थोडक्यात ओळख पाहू.

हिंदू संस्कृती म्हटले की वेद, वेदांत, वेदांगे हे लगेच समोर येते. बर्‍याच जणांना केवळ चार वेद आहेत, व ते अपौरुषेय आहेत एवढेच माहिती असते, पण वेदांशिवाय जे काही साहित्य आहे ते देखील हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे.
चारही वेद (ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद), वेदांग, वेदांचे उपग्रंथ, जैमिनीची धर्म मीमांसा, बादरायणाची ब्रह्ममिमांसा, अशा काही मिमांसा, वेदांवर आधारित उपनिषदे, व प्रत्येक वेदांचे उपग्रंथ जसे ब्राह्मण आणि आरण्यक, काही उपवेद जसे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, पुराणवेद इ इ असे सर्व मिळून आपली आजची संस्कृती वा धर्म बनला आहे.

वेद म्हणजे ज्ञान. प्रत्येक वेदाच्या पठणानुसार व तत्वज्ञानानुसार अनेक शाखा होत गेल्या. चारी वेदांच्या एकूण ११८० शाखा आहेत व एक लाखापेक्षा जास्त ऋचा त्यात होत्या. ज्यातील २०,३७९ ऋचा आज अस्तित्वात आहेत. सर्वात जास्त, ऋग्वेदाच्या १०,५५२ ऋचा, ह्या दहा मंडलांत आज अस्तित्वात आहेत. ऋग्वेदाच्या मुख्य संहितेमध्ये मधून मधून जी काही परिशिष्टे जोडली आहेत, त्यांना खिलसूक्ते म्हणतात. कारण ही सूक्ते मूळ भाग नाहीत, तर पदपाठकार शाकल्य ऋषींनी हे जोडले आहेत. अशी एकंदर २६ खिलसूक्ते आहे. पुरूषसूक्त, श्रीसूक्त हे ह्याचाच भाग आहे. कधीकधी नारायण ऋषी असाही उल्लेख आढळतो.

ऋग्वेद : ऋग्वेद या सामासिक पदातील ऋग् म्हणजे ॠचा म्हणजेच पद्यात्मक मंत्र. हे मंत्र छंदंबद्ध असतात.वेदोत्तर साहित्यात अशा रचनेस श्लोक हे नाव प्राप्त झाले. एका सूक्तात साधारण तीनपासून ते ५६ पर्यंत ऋचा असू शकतात. एकू्ण १५ छंद, त्यापैकी गायत्री, अनुष्टुप, जगती , त्रिष्टुप, पंक्ती , उष्णिक व वृहती हे वारंवार आढळतात. व्याकरणावरील लेखात ह्यावर जास्त चर्चा करु. गायत्री ह्या छंदात २४५० ऋचा आहेत.
ऋग्वेदामध्ये पहिल्या आठ मंडलात देवांची स्तुती आढळते. ऋग्वेदातील अनेक देवता ह्या निसर्गाशी संबंधित आहेत, वायू, वरुण, सूर्य, नद्या, उषा, अग्नी, गाय इत्यादी. निसर्ग स्तुती व निसर्गातील बदलांमुळे जीवनसृष्टी कशी प्रभावीत झाली आहे हे त्यात प्रामुख्याने मांडले आहे. अनेकदा एका देवाची स्तुती दुसर्‍या देवाला पण लागू होते, जसे अग्नी. अग्नीची स्तुती करताना त्याला, तू आधी तू वरुण होतोस, मग धगधगलास की सूर्य होतोस, असे वर्णन जागोजागी आढळते. सुरुवातीच्या काळात वरुणाला दिलेले महत्व नंतर इंद्र ह्या देवतेस दिलेले दिसते, कारण संकरकाली अनेक युद्धे होत होती व त्यात इंद्रदेव पराक्रम गाजवत होता. ९ व्या मंडलात सोमयागाबद्दलचे विवेचन आहे तर दहाव्या मंडलात विविध सूक्ते व ऋचा आहेत. व्यावहारिक वा लौकिक जीवनातली सूक्तेही १० व्या मंडलात आढळतात. पहिल्या मंडलातील काही ऋचा ह्या रामायणाचा संबंध दाखविणार्‍या आहेत असे काहींचे म्हणणे आहे. रामायण विषय मी थोडा विस्तृतपणे नंतर मांडेन.

वाचस्पती, विश्वकर्मा, गंधर्व, अप्सरा, हिरण्यगर्भ, भूतपती या दुय्यम देव व अप्सरांसंबंधीची माहिती व सूक्तेही ही ॠग्वेदात आढळतात. ऋग्वेदकालीन समाजरचना जातिभेदात्मक नव्हती असे जातींच्या अनुल्लेखावरुन मानता येते. ब्रह्म, क्षत्र व विश् असे व्यवसायभेद मात्र आढळून येतात. ह्यांना वर्ग म्हणता येईल. दहाव्या मंडलातील काही ऋचा हे स्पष्ट करतात. जसे 'इन्द्रायेन्दो परिस्त्रव' वरवर पाहता ह्याचा अर्थ फार सोपा वाटतो, पण इतर ऋचांसोबत जोडल्यावर त्याचा अर्थ असा निघतो, " माणूस विविध व्यवसाय करीत असतो व त्याच्या विविध धारणा असतात. सुताराला मोडलेले लाकूड, वैद्याला रोगी, पुरोहिताला सोमयाजी, सोनाराला चमकदार हिरे बाळगणारा श्रीमंत, घोड्याला चांगला रथ आणि बेडकाला पाणी पाहिजे, यास्तव सोमा, तू इंद्राकरता वाहत राहा. सांसारिक लोकांना जुगारी होउ नका ही शिकवणही त्यात आहे. संपत्ती असेल तिथेच गाय व बायको रमते असे सवितादेव सांगतो. अन्नदानसूक्तात स्वार्थीपणा हा वधाचा एक भाग आहे असे म्हटले असून, स्वार्थी व अप्पलपोट्या माणसाची निंदा केली आहे.

सामवेद : ऋग्वेदातील ज्या ऋचांवर गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद. एकूण १६०३ ऋचा आहेत, ज्यातील ९९ ऋचांचा समावेश ऋग्वेदात नाही. सामाचे म्हणजे गायनाचे अनेकविध प्रकार व शाखा ह्यांचे विस्तृत वर्णन ह्या वेदात आहे. जैमिनिय शाखेत एकू्ण गानप्रकार ३६८१ एवढे सांगितले आहेत. गायनाचा इतका समग्र अभ्यास जगातील कुठल्याही धर्मग्रथांत झाल्याचे मला आढळलेले नाही!

यजुर्वेद : यजुर्वेद हा अध्वर्यू नामक ऋत्विजाचा वेद आहे. यजुष् म्हणजे यज्ञात म्हणावयाचे गद्य मंत्र. पातंजल महाभाष्याप्रमाणे एकूण १०१ शाखा आहेत असे मानले जाते, पण आज सहा आढतात. त्यात दोन मुख्य भेद. कृष्ण व शुक्ल. तैत्तरीय, काठक, मैत्रायणी, कापिष्ठल ह्या कृष्ण यजुर्वेदाच्या उपशाखा तर काण्व व माध्यंदिन ह्या शुक्ल पक्षाच्या शाखा. महाराष्ट्रात काण्व चे कण्व व माध्यंदिनाचे माध्यांजन ब्राह्मण आजही आढळून येतात. शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेस वाजसनेयी संहिता असेही म्हणतात. वाजसनेय म्हणजेच वाजसनी ऋषींचा पुत्र याज्ञवल्क्य. ह्या याज्ञवल्क्य ऋषीने पुढे उपनिषदांत मोठे कार्य करुन ठेवले आहे. यजुर्वेद, एकूण अध्याय ४०. सुप्रसिद्ध अश्वमेध यज्ञ ह्या वेदातील २२ व २३ व्या अध्यायात आहे. तसेच पुरुषमेध हा देखील यज्ञ आहे. मेध चा अर्थ वध असला तरी पुरुषमेधात पुरूषवध नाही तर त्यातील वाईट प्रवॄत्तींचा वध अशी कल्पना केलेली आहे. संन्यासासाठी हा यज्ञ आवश्यक समजला गेला. प्रत्येक हवी देताना 'स्वाहा' हे पद उच्चारायचे इतके सोपे मंत्र ह्या वेदात आहेत. उदा अग्नेय स्वाहा, इंद्राय स्वाहा. वगैरे. खांडवनवनाची कथा सगळ्यांना आठवत असेल इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहाची. ह्यावरुन महाभारत होण्यापूर्वी यजुर्वेद असावा काय? ( हे माझे मत वा कयास Happy )

अथर्ववेद : अथर्ववेदात विविध प्रकारचे शत्रूनाशक मंत्र व इतर मंगल / अमंगल मंत्रांचे संकलन आहे. बहुसंख्य ऋचांची रचना अथर्वण ऋषींनी केल्यामुळे अथर्ववेद असे नाव आहे. पण आधी लिहिल्याप्रमाणे त्या ऋषीच्या शिष्यसमुदायला पण तेच नाव प्राप्त होई. म्हणून अथर्वऋषीनी व त्यांचा शिष्यांनी मिळून लिहलेला वेद असे मानावयास हरकत नसावी. अथर्ववेदाच्या एकून ९ शाखा. पिप्पलाद, तौद, मौद, शौनक, जाजल, जलद, ब्रह्मवद, देवदर्श आणि चारणवैद्य. पैकी पिप्पलादाचे उपनिषद फारच प्रसिद्ध आहे.
अथर्ववेदातील कर्मे एकून दहा विभागात मांडली गेली आहेत. १. भैष्यजकर्मे २. आयुष्यकर्मे ३.अभिचारकर्मे, ४ स्त्रीकर्मे ५ सांमनकर्मे ६ राज्यकर्मे ७ ब्राह्मण ८.पौष्ठिककर्मे ९. शांतिकर्मे आणि १०. विश्वोप्तती व अध्यात्म.

पैकी भैष्यजकर्मात विविध रोगांच्या निर्मूलनासाठी वापरायचे मंत्र, निदाने व उपचार आहे. ज्वर, अतिसार, मूत्ररोध, नेत्ररोग, वातपित्तकफादी दोष, ॠदय्रोग, कावीळ, कोड, यश्मा, जलोदर इ सांठी चे उपाय व मंत्र ह्यात मांडले आहेत. पुढे जाऊन आयुर्वेद ह्या वेदांग निर्मितीसाठीची तयारी म्हणजेच भैष्यजकर्मे. वरील प्रत्येक कर्मात खूप माहिती आहे व त्याचा विस्तार पुढील काळात होत गेला. इथे मी सर्व कर्मांची ओळख करुन देऊ शकतो, पण प्रत्येक कर्मावर त्रोटक लिहायचे तरी एक एक लेख होऊ शकतो, विस्तारभयामुळे व वेद साहित्याची ओळख एवढीच व्याप्ती ठरवल्यामुळे पुढे जाऊयात.

संहिता : म्हणजे संग्रह. वेगवेगळ्या ऋषींनी रचलेले गद्य व पद्य एका विषयाला धरुन एकत्रित केले की त्याला संहिता म्हणतात. उदाहरणार्थ मैत्रायणी संहिता.

ब्राह्मण ग्रंथ: ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण इ इ हे गद्य साहित्य आहे. त्यात विविध यज्ञ कसे करायचे ह्याचे तपशिलात विवेचन असते, यज्ञातील अधिकारी, यज्ञकर्मे, इच्छित देव, करावयाची कामे इ इ सोबतच धर्माचे व जीवनाचे तत्वज्ञान ह्या ब्राह्मण ग्रंथांतून मांडले आहे.

आरण्यक - प्रत्येक शाखेचे एक ह्याप्रमाणे ११८० आरण्यके एकेकाळी अस्तित्वात होती. त्यातील केवळ बोटावर मोजण्याएवढी आरण्यके आज उपलब्ध आहेत. मात्र आरण्यकातील मुख्य भाग, म्हणजे उपनिषदातील ज्ञान मात्र आज बर्‍यापैकी उपलब्ध आहे. आरण्यकांमधून देवाबद्दल व एकूणच तत्वज्ञानाबद्दल विवेचन आहे. देवाची भक्ती कशी करावी, मन, काया, आत्मा, परलोकीचे जीवन, पुर्नजन्म, इत्यादींचा वेध त्यातून घेतला आहे. उपनिषदांसह आरण्यके म्हणजेच, 'वेदान्त' अथवा वेदांचा अखेरचा भाग. पाणिनी व बुद्ध यांच्यापूर्वीच आरण्यके व मूळ १३ उपनिषदे निर्माण झाली असे आता बहुतेक सर्व संशोधक मानतात. आज मुख्यत्वे सहा आरण्यके आढळतात. ऋग्वेदाचे ऐतरेयारण्यक व कौषतकी किंवा शांखायनारण्यक, कॄष्णयजुर्वेदाचे तैत्तरीयारण्यक, शुक्लयजुर्वेदाचे बृहदारण्यक, सामवेदाचे जैमिनीय उपनिषदब्राह्मण आणि कृष्णयजुर्वेदाच्या मैत्रायणी शाखेचे आरण्यक उपनिषत्.

उपनिषदे : उपनिषदांतील तत्वज्ञान हे दोन प्रकारचे आहे. एक उपदेशात्मक व दुसरे युक्तीवादात्मक. काहीकाही ठिकाणी सरमिसळ आहे. तर्क व युक्तीवादावर भर असला तरी मात्र कठोपनिषदात आत्मज्ञान तर्काने प्राप्त होत नाही असेही सांगीतले आहे. एकूनच अध्यात्म, दैव, तत्वज्ञान ह्यांची चर्चा विविध उपनिषदांतून आढळते. एकूण १३ मुख्य उपनिषदे आहेत.

१. छांदोग्योपनिषद - सामवेद व छांदोग्य ब्राह्मणाचा मिलाफ होऊन हे उपनिषद तयार झाले आहे. ॐ मंत्राचा महात्मा ह्यात वर्णन केलेला आहे. कर्माचे फल व पुनर्जन्मावरील भाष्य देखील ह्यात आढळते. मानव धर्म, त्याचे साध्य, ध्यानधारणा व ध्यानाचे रोजच्या जीवनातील महत्व ह्यावर विवेचन ह्या उपनिषदात आहे.

२. केनोपनिषद - केन म्हणजे कोण? ह्या सर्वसृष्ठी पाठीमागे कोण आहे. केनोपनिषदात ब्रह्मज्ञान कसे प्राप्त करावे ह्याचे विवेचन आहे. उदा. पहिलाच प्रश्न पाहा.
केनेषितं पतति प्रेषितं मनः
केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः |
केनेषितां वाचमिमां वदन्ति
चक्षु: श्रोत्रं क उ देवो युनक्ति ||१||
अर्थात कोणामुळे प्राण शरीरातून वाहतो, मन म्हणजे काय? कोणामुळे वाणी बोलते? कोणामुळे नेत्रानी पाहता येते वा ऐकता येते? ह्या व अशा प्रश्नांवर आधारित भाष्य केनोपनिषदात आहे.

३. ऐतरेय उपनिषद - हे उपनिषद ऋग्वेदासंबंधी आहे. केनोपनिषदाप्रमाणेच जीवनावरील भाष्य, प्रश्न, विविध अवयव व त्यांचे इत्सित कार्य ह्यात चर्चिले गेले आहेत.

४. कौषतकि - ह्या उपनिषदात हिंदू तत्वज्ञातील पुनर्जन्माबद्दलची चर्चा आहे.

५. कथोपनिषद - ह्या यजुर्वेदीय उपनिषदात, ऋग्वेदातील एका कथेच्या आधाराने प्रश्नोत्तर आहेत. भगवद्गीतेतील बराचसा भाग ह्या उपनिषदाशी मिळता जुळता आहे.

६.मुंडकोपनिषद - मुंडक म्हणजे टक्कल. त्याअर्थाने हे टकलूउपनिषद. Happy वेदांगे व ब्रह्मज्ञान ह्यावरील भाष्य व फरक ह्यात आहे.

७. तैत्तरेय उपनिषद - तीन भागात असलेल्या ह्या उपनिषदात पहिल्या भागात वाणी, उच्चार, व्याकरण ह्याबद्दल चर्चा तर दुसर्‍या वर तिसर्‍यात परमार्थ ज्ञान ह्या संकंल्पनेवर चर्चा केलेली आढळते.

८.बृहदारण्यकोपनिषद - ह्या उपनिषदाचे तीन कांड आहेत. पहिल्या मधु कांडात माणसाची स्वतःची विश्वशक्तींशी ओळख ह्याची चर्चा आहेत. दुसर्‍या मुनीकांडात तत्वज्ञानावर भर आहे तर तिसर्‍या खिलकांडात उपदेश, उपासना, ध्यान व भक्ती ह्याचे विवेचन आहे.

९. श्वेताश्वतर उपनिषद - ह्या उपनिषदाचा उद्गाता खुद्द शिव आहे असे मानले गेले पण त्यावचेळी श्वेताश्वतर नावाचे ऋषी पण आहेत त्यांनीही हे लिहिले असेही मानले जाते. मनुष्यात असलेल्या ईश्वराबद्दलचे चिंतन ह्याउपनिषदात आहे.

१० प्रश्नोपनिषद - ह्यात वेगवेगळे सहा प्रश्न कर्ते पिप्पलादाला प्रश्न विचारतात. ते सहा प्रश्नकर्ते हे क्षत्रिय वा ब्राह्मण आहेत. भारद्वाजपुत्र सुकेश, शिबीपुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू गार्ग्य, अश्वलापुत्र भार्गव, कात्यपुत्र कंबंधी हे पिप्पलादाकडून ज्ञानप्राप्त करुन घेतात. विविध तत्वज्ञानसंबंधी प्रश्न व त्याचे उत्तर म्हणजेच प्रश्नोपनिषद.

बाकीची मुख्य उपनिषदे म्हणजे इशाव्यास, मांडूक्य व मैत्री. प्रत्येक उपनिषदात आत्मज्ञान, ध्यान, इश्वर, भक्ती, मनुष्यजीवन, शरिरासंबंधी प्रश्न इत्यादीचे विवेचन आहे. हिंदू संस्कृतीच्या तत्वज्ञानाचे सार म्हणजे ही उपनिषदे होत.

आदि श्रीशंकराचार्यांनी ईश, ऐतरेय, कठ, केन, छांदोग्य,प्रश्न, तैत्तिरीय, बृहदारण्यक, मांडूक्य आणि मुंडक ह्या उपनिषदांवर भाष्य केलेले आहे.

उपनिषदातील भूगोल हा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत आहे. उदा. - प्रश्नोपनिषदातील भार्गव हा विदर्भाचा होता अशी सुरुवात पहिल्या मंत्रापासूनच आहे. ॠग्वेदासारखे इथे भूगोलाबाबत अनिश्चितता नाही.

वेदांगे : - एकूण सहा वेदांगे आहेत. जसे व्याकरण, ज्योतिष्य, निरुक्त, शिक्षा, छंद, आणि कल्पसूत्र. वेदागांमध्ये ह्या प्रत्येक अंगाची विस्तृत माहिती व त्यावरील भाष्य आहे. ज्योतिष्यांतर्गत खगोल शास्त्र, बीजगणित ह्यांचा अभ्यासही वेदांगांतून दिसतो.

फक्त ह्या वेदांगांवर मिळून एक वेगळा लेख लिहायचा मनोदय आहे. त्यात बीजगणित, भूमिती, आर्युवेद, खगोलशास्त्र इत्यांदींचा आढावा घ्यायचा आहे.

स्मृती : वैदिकांच्या समाजसंस्थेत वेदपूर्वकालापासून सूत्रकालापर्यंत जे सामाजिक व धार्मिक आचार विचार रुढ होते त्यांचा संग्रह म्हणजे स्मृती. गृहसूत्रे, धर्मसूत्रे व व्यवहार केवळ स्मरणाने लक्षात व सुरक्षित रहात नव्हते म्हणून ते ग्रंथ रुपाने पुढे आले. विविध विधिनिषेधांची, कर्मकांडांची, आचाराची आणि सामाजिक रुढींची मांडणी ह्या स्मृतींमध्ये आहे. आश्वलायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक, बौधायण अशी १७ मुख्य धर्म व गृह सूत्रे आहेत व ह्या स्मृती त्यावर आधारीत आहेत. लक्ष्मणशास्त्री जोश्यांनी आजपर्यंत संपादित वा ज्ञात नसलेल्या ४६ स्मृतींचे संपादन, संग्रह केला आहे. ह्यावरुन एकू्ण स्मृतींचा विस्तार लक्षात यावा. सध्या एकच प्रसिद्ध वा कुप्रसिद्ध स्मृती आहे ती म्हणजे मनुस्मृती. मुख्य म्हणजे ह्यात इतर काही ग्रंथांप्रमाणेच काही पाठांत चातुर्वर्ण्याचे रुप दाखविले आहे, ते पाठ आजच्या दॄष्टीने जातीभेदवाचक मानले तरीही इतर खूप मोठा भाग तत्कालीन धर्माचे विवेचन व इतर रुढींची मांडणी असा आहे.

पुराणे : नावाप्रमाणे पुराण म्हणजे जुने, जुन्याकाळचे. पुराणांची निर्मिती विश्वनिर्मितीच्या रहस्य उकलीपासून ते आजपर्यंत इतिहासाची नोंद घेण्यासाठी केली आहे. हे विश्वनिर्मितीचे रहस्य आजच्या भाषेत वैज्ञानिक आधार असलेले असेल असे नाही, तर तत्कालीन तत्वज्ञानावर आधारित असलेली विश्वनिर्मिती, इतिहासाचे वर्णन करणे, वेगवेगळ्या राजांची वर्णने, वंशावळ्या ठेवणे, भूगोल, काळ इ सर्वांचा उल्लेख पुराणात आहे. त्यातही महापुराणे व उपपुराणे असा भेद आहे. महापुराणांचे प्रकार १८.
१. ब्रह्य २. पद्म ३. विष्णु ४. शिव ५. भागवत ६ भविष्य ७ नारद ८ मार्कंडेय ९ अग्नी १० ब्रह्मवैवर्त ११ लिंग १२. वराह १३. स्कंद १४.वामन १५. कूर्म १६ मत्स्य १७ गरुड १८ ब्रह्मांड

पुराणांमध्ये देव-असुरांची युद्धे, भूगोल इ चे वर्णन आहेच पण त्याशिवाय विविध चरित्रे, व्रतवैकल्य, स्मार्त, धर्मशास्त्र, तीर्थस्थाने इ विषय पण आहेत.

पुराणातील इतिहास हा विविध देवांची अदभूत वर्णने, अतिशयोक्ती व कल्पनाविलासाने भरला आहे त्यामुळे बरेचदा कालमापन करुन इतिहासाशी पडताळणे अवघड होऊन बसते. काल्पनिक काय व खरे काय ह्याची सांगड त्यामुळे लागत नाही. भूगोलातील वास्तू, पण अतिशयोक्त वर्णन, ह्यामुळे इतिहासकारांची मोठी गोची होते. उदाहरणच द्यायचे झाले तर आपण दोन मोठी उदाहरण बघू. वेदांत मनुष्याचे साधारण वय १०० सांगीतले आहे परंतु,

१. पुराणात दशरथ राजाने ६०,००० वर्षे राज्य केले, रामाने ११,००० वर्षे राज्य केले व विश्वामित्राने १०,००० वर्षे तप केले. ह्या उदाहरणात कालगणनेला एक वेगळा अन भलताच अतिशयोक्तीपूर्ण अर्थ पुराण लिहिणार्‍यांनी देऊन ठेवला आहे.

वि का राजवाड्यांनी ह्याची फोड फार मस्त करुन दाखवली आहे. ती कशी ते पाहू. पुराणांप्रमाणे, कलियुग ४३२००० वर्षे, द्वापारयुग ८६४०००, त्रेतायुग १२९६००० व कृतयुग १७२८०००, महायुग ४३२०००० वर्षे होतात. कोणाही इतिहासकाराला व व्यक्तीला हे खोटे आहे हे लगेच लक्षात येऊ शकते. ह्या गणिताप्रमाणे जामदग्न्यकुलोत्पन्न परशुराम हा दाशरथीरामापर्यंत जिवंत होता (त्यांच्या युद्धाची कथा आहे) असे लिहिले आहे, तर मग परशूरामाचे वय दोन कोटी सोळा लाख वर्षे भरते. हे शक्य असेल का? ह्यावर उत्तर तो देव आहे, जगू शकतो हे असेल तर पुराणातले सर्वच बरोबर ठरेल हे म्हणण्याआधी एक क्षण थांबा, मी दुसरे उदाहरण महाभारतातले देतो.

२. महाभारतात पांडवांना १२ वर्षे वनात राहण्यास भाग पडले आहे हे तर सर्वज्ञात आहे. लोमेश ऋषी हे युधिष्ठिरासोबत तीर्थयात्रेस होते. वनपर्वात एके ठिकाणी ( वनपर्व १२१ | १९ ) लोमेश ऋषी युधिष्ठिरास म्हणतो की हा त्रेता व द्वापार युगाचा संधी आहे. ही पर्वणी सोडू नको. पुढे एके ठिकाणी पण हाच उल्लेख तीर्थस्थानी आहे. (वनपर्व १२५ | १४ ). ह्याच वनवासात हनुमानाची व भीमाची गाठ पडते. ती कपिध्वजाची कथा व भीमाचे गर्वहरण हनुमानाने कसे केले व पुढे हनुमानाचे गर्वहरण कृष्ण कसे करतो ती कथा सर्वांना माहित असेलच असे धरुन चालतो. तेथे उल्लेख आहे की 'एतत्कलियुगं नाम अद्चिराद्यत्प्रवर्तते' (भारत १४९ | ३७ ) म्हणजे तेंव्हा द्वापार व कलीचा संधी होता. थोडक्यात १२ वर्षात एकदा त्रेता व द्वापार व एकदा द्वापार व कलीचा संधी होता. शिवाय पुढे जाउन भारतीय युद्धानंतर २६ वर्षांनी कृष्ण इहलोक सोडतो. हे सव्वीसावे वर्ष फार महत्वाचे आहे, कारण युद्ध चालू असताना देखील बलराम श्रीकॄष्णाला म्हणतो , " प्राप्तं कलियुगं विद्धि" (शल्यपर्व ६० | २५ ) व जेंव्हा कृष्ण गेला (२६ वर्षानंतर) तेंव्हा कलियुग प्रवृत्त झाले असे म्हणतात, ह्यावरुन कलीयुगाची तीन वेळा आवृत्ती झाली असे स्पष्ट होते. जर वरील कालावधी (तो अनेक हजारो वर्षांचा) घेतला तर ह्या संधी कश्या होतील? ही केवळ देवांचे महात्म्य ठासून सांगण्यासाठी केलेली अतिशयोक्ती ठरु शकते. खरी कालगणना नाही. ह्या गणितानुसार प्रथम वेदकाळात चार वर्षांचे युग होते व नंतर ते ५ वर्षांचे झाले असा निष्कर्ष राजवाड्यांनी काढला आहे, जो आता सर्वमान्य ठरावा.

असे असले तरी पुराणांतून असेलेल्या वंशावळी व इतर घटना तत्कालिन समाजाचे दर्शन घडवतात. त्यामुळे पुराणातले सर्वच फेकुन देण्याजोगे नाही.

हिंदू साहित्य म्हटले की महाभारत व रामायण हे दोन्हीही त्यात येतात. ह्या लेखात आधीच तो खूप मोठा होत असल्याकारणाने ह्या दोन्हींची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही, कारण हे दोन्ही बहुतेक हिंदूंना माहिती असतात. रामायणा संबंधी अनेक विवाद आहेत. राम कोण होता, तो हिंदू तर सोडा, आर्य ही नव्हता, ह्यापासून तो चांगला होता, वाईट होता, विष्णूचा अवतार होता असे अनेक मतप्रवाह आहेत. रामायणातातील राम कोण? ह्यावर माझा पुढचा लेख लिहायचा विचार आहे.

ही होती आपल्या हिंदू साहित्याची तोंडओळख. ह्यात मी अजून जैन आणि बौद्धसंप्रदाय त्यांचे तत्कालीन लोकांवर परिणाम, संस्कृतीमधील बदल व साम्य, श्रीशंकराचार्य, भागवत संप्रदाय साहित्य, कालिदास, भवभूती इ लोकांचे साहित्य ह्यांचा आढावा घेतला नाही. जसेजसे लेखनकाल पुढे जाईल तसेतसे ते साहित्यही मांडायचा विचार आहे.

प्रकार: 

वेदांगे सहा आहेत की दहा? दशग्रंथी (ब्राह्मण) हा शब्द कसा आला? ते १० ग्रंथ कोणते?

Pages