मासे ८) कालवं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2010 - 03:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालवाचे सुक्याचे साहित्य :
कालव १ ते दोन वाटे
१ मोठा कांदा
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळ्द
मसाला १ ते २ चमचे
चविपुरते मिठ
१टोमॅटो किंवा ३-४ कोकम
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल

कालवांच्या वड्यांचे साहित्य
कालव १ वाटा
१ कांदा बारीक चिरुन
बेसन १ छोटी वाटी
२ चमचे तांदळाचे पिठ
आल लसूण पेस्ट १ चमचा
थोडा गरम मसाला
मसाला १ चमचा
हिंग, हळद
थोडी कोथिंबीर चिरुन
चविपुरते मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

कालवांच्या सुक्याची पाककृती:
प्रथम कालव साफ करायची. कालवांमध्ये दगडी कच असतात ते कालव हातात घेतली की हाताला लागतात. ते काढायचे. कालव धुवायची आणि कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. आता त्यावर हिंग, हळद, मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजु द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनीटांनी त्यात चिरलेला टोमॅटो किंवा कोकम घाला व मिठ घाला. जरा परतुन कोथिंबीर घाला थोडावेळ वाफेवर ठेउन गॅस बंद करा.

कालवांच्या वड्यांची पाककृती :
कालवांच्या वड्यांचे दिलेले वरील तेल सोडून सर्व साहित्य कालवांसकट एकत्र करा थालीपिठाप्रमाणे घट्ट पिठ मळा जर कालव टाकुन पातळ होत असेल तर त्यात अजुन बेसन घाला. आणि चांगल मळून छोट्या छोट्या वड्या तव्यावर शॅलोफ्राय करा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

कालव समुद्राच्या खडपातील दगडाला चिकटलेल्या कवचीत असतात. कोयत्याने टोचून कवचीचे आवरण फोडून आतील कालव काढतात. त्यामुळे त्याला चिकटलेली कच राहते. म्हणून कालव व्यवस्थित साफ करावित. एकादा कच राहीला तर दाताखाली येतो.
कालवांचे कालवणही करतात पण त्यापेक्शा वड्या किंवा सुकेच चांगले लागते.
कालव मोठ्या आकाराचीही येतात. ती कापुन घ्यावी लागतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालवं शिजलेली आहेत. आता लसूण कांदा टॉमेटो शिजवून त्यात मसाला टाकून कालवं टाकून खाणार मस्त.. (जिभल्या चाटणारी बाहुली). जागू धन्स ग..

आई कोकणी असल्याने कालवं अनेकवेळा घरी व्हायचीच... गरम्मसाल्याचं कालवाचं आणि आंबोळ्या. त्या "कच" प्रकर्णामुळे आई स्वहस्ते'च साफ करायची कालवं.
इथे ऑस्ट्रेलियात एकदा अतिशय ताजी कालवं कच्ची खाल्ली होती. लिंबू पिळून केवळ अप्रतिम.
मुळात ते "गिळगिळित्"बघून माझी भावजय तोंड वाकडं करीत होतीच. तिनं खाल्लं तर नाहीच पण आम्ही ते चवीनं खाताना बघून (भाऊ जरा जास्तच चघळत होता... मुद्दाम अर्थात)... आधीचं खाल्लेलं बाहेर पडेल असं वाटून ती पळून गेली होती. Happy

इथे बाजारात स्वच्छं केलेली कालवं बघून... सकाळी चहाबरोबरही मासा खाऊ इच्छिणारा माझा मावसोबा हरख हरख हरखला होता.

जागू... तुझ्या माश्श्यांच्या रेसिपीजने हे असलं काय काय आठवत रहातं बघ.

दाद, वेल Happy

कच्ची कालवे बरीच जण खातात. मी अजून नाही खाल्ली कधी. डेरींग नाही होत. Lol
ह्यातल कच प्रकरणामुळे मी पण स्वतःच साफ करते.

जागू ताई, मी केळवे बीचला रहात असल्या मुळे आमच्या कडे बाजार भरपूर कालवे मिळतात. आमच्या कडे कालवाची भजी नेहमीच बनते. पण बनविण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.
आल,लसूण, हिरवी मिरची, कोथिम्बिर, ह्याचे मिक्सरला लाऊन वाटण केले जाते. हे वाटण + मीठ + हळद + गरम मसाला + बेसन आणि कालवे एकत्र करून एक,एक कालवाची भजी(deep fry ) काढली जाते. खूपच चविष्ट..........!

Pages