प्रतिसाद, हास्यचित्रे (स्माईलीज), रंगीत शाई, सही

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवर पुढील सुविधा का नाही किंवा कधी देणार याबद्दल नेहमी विचारणा होत असते.

१) अधिक हास्यचित्रे:
२) रंगीत शाई:
३) सहीची ( Signiture) ची सोय:

या सुविधा दिलेल्या नाहीत कारण मायबोलीवरच्या संवादांमधे/हितगुज मधे त्या बाधा आणणार्‍या आहेत. या सुविधांमुळे प्रतिसाद देणार्‍या व्यक्तीचे वेगळेपण दिसते पण प्रत्यक्षात ज्या विषयावर संवाद सुरु असतो त्यात काहीही भर पडत नाही.

१) अधिक हास्यचित्रे:
टायपून लिहलेल्या लेखनात सगळ्या भावना थोड्या शब्दात व्यक्त करणे नेहमीच शक्य होते असे नाही. त्यामुळे एका मायबोलीकराचे भाव दुसर्‍याला कळावे म्हणून काही ढोबळ हास्यचित्रे दिली आहेत. पण एका ठराविक मर्यादेबाहेर ही हास्यचित्रे संवादाला मारक ठरतात. तुम्हाला नवीन हास्यचित्रे शोधून काढता येतात या पलिकडे त्या संवादात काही भर पडत नाही. कल्पना करा तुम्ही कुणाशी तरी बोलत आहात आणि जर तुम्हाला उत्तर जर प्रत्यक्ष शब्दात न मिळता जर समोरची व्यक्ती सारखे मुखवटे घालून करत असेल तर तुम्हाला काही वेळ मजा येईल. पण त्यामुळे संवाद कुठेही पुढे जाणार नाही. उलट संवादात काही बोलण्यासारखे नसले तरी हास्यचित्रे टाकून उगीच संवाद चालू असल्याचा भास तयार होईल.

२) रंगीत शाई:
यात पुन्हा प्रतिसाद देणार्‍या व्यक्तिचे वेगळेपण दिसते. पण असे लक्ष वेधून घेण्यापेक्षा तुमच्या प्रतिसादाच्या मजकुरामुळे तुम्ही जास्त वेगळे दिसणे जास्त योग्य नाही का? पुन्हा काही व्यक्ती गप्पा मारत आहेत अशी कल्पना करू. जर मधेच एक व्यक्ती मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी गेंगाण्या आवाजात बोलत असेल तर सुरुवातीला थोडी गंमत येईल पण नंतर ते त्रासदायक वाटेल. संवादाची गम्मत काय बोलले जात आहे यामुळे वाढते. कश्या आवाजात (गरज नसताना) बोलले जात आहे यामुळे नाही.

३) सही:
पुन्हा माझी वेगळी सही या पलिकडे त्या संवादात सहीने भर पडत नाही. उलट झाला तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. वरचे उदाहरण पुन्हा घेऊ. काही व्यक्ती एका विषयावर बोलत असताना, एक व्यक्ती प्रत्येक वाक्यानंतर एकच वाक्य म्हटत असेल तर तेही त्रासदायक वाटेल. अगदी दु:खद विषयावर बोलताना आनंदाच्या सहीचे वाक्य असे झाले आहे. किंवा सारखे दुसरीकडे जाऊन माझ्या ब्लॉगला भेट द्या हे ही त्रासाचे होते. म्हणजे चालू असलेल्या संवादात भर घालण्याची इच्छा असणार्‍या व्यक्ती त्या पानावर येण्यापेक्षा स्वत:ची जाहिरात करणार्‍या व्यक्ती येण्याचे प्रमाण वाढते.

थोडक्यात या सुविधा त्या त्या व्यक्तीपुरत्या हव्याश्या वाटल्या तरी एकूणात समूहातल्या संवादाला/हितगुजला मारक ठरणार्‍या आहेत. म्हणून त्या दिलेल्या नाहीत.

विषय: 
प्रकार: 

Pages