अवघी विठाई माझी (९) - आर्टीचोक

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

art.jpg

आर्टीचोक भाज्यांमधली एक देखणी कलाकृति. मूठभर आकारापासून ते अगदी ओंजळभर आकारापर्यंत
आर्टीचोक मिळतात.जरी ते फ़ळासारखे दिसत असले तरी आर्टीचोक म्हणजे झाडाची कळी (कळा म्हणा
हवा तर.) याचे निळेजांभळे फ़ूलही देखणे असते, पण अंगापे़क्षा बोंगा मोठा, असा याचा पुष्पकोष फ़ूलापेक्षा
मोठा असतो आणि तो पुष्पकोषच खाल्ला जातो. वरच्या फोटोत उमललेले फूल आहे, भाजी म्हणून खाताना, आर्टिचोक उमलण्याआधीच खुडावे लागते.

इथेही आणखी एक मेख आहे. या सगळ्या आर्टीचोक मधे खाण्याजोगा भाग फ़ारच थोडा असतो.या मोठ्या
पुष्पकोषातला बराचसा भाग टाकाऊ असतो. बरं असेही नाही, कि हा आर्टिचोक काहि इतर पदार्थात वापरता येतो. चिरला आणि टाकला सुपमधे वा स्ट्यू मधे असेही करता येत नाही. (आर्टिचोक हार्ट मात्र मऊ असून काहि पदार्थात वापरतात.)

हा शिजवण्याचे पण एक तंत्र आहे. देठाकडचा भाग कापावा लागतो, आणि त्याबरोबर जी दले सुटून येतात
तीदेखील काढावी लागतात. बाकिच्या दलांची वरची टोके जर कडक झालेली असतील, तर तीदेखील कात्रीने कापावी लागतात. मग हा उकडून घ्यावा लागतो. उकडताना याचा हिरवा रंग काळसर होतो. तसे व्हायला नको असेल, तर उकडताना पाण्यात, थोडासा लिंबाचा रस टाकतात.
पाश्यात्य पुस्तकात तो नेहमी बाहेर उकडायला सांगितलेला असतो. त्याला अर्थातच बराच वेळ लागतो.
प्रेशर कूकरमधे मात्र, ५ ते १० मिनिटात (आकारानुसार) उकडला जातो. (मी कूकरमधे उकडल्याने, रंग हिरवा राहिलेला नाही. )आर्टीचोक कसा खायचा याचे एक तंत्र आहे. अगदी साहेबाला देखील तो काट्याचमच्याने खाणे शक्य नाही.

arta.jpg

उकडलेल्या आर्टीचोकबरोबर सहसा एक डीप घ्यावे लागते. वरच्या फ़ोटोतल्या डिपसाठी, मी क्रीमचीज फ़ेटून घेतलेले आहे, त्यात पाप्रिका, मिरपूड आणि सेज वापरले आहे. सजावटीसाठी वाईन चेरी टोमॆटो आणि लाल मिरच्यांचे तूकडे वापरले आहेत. (या ऐवजी मेयॉनीज पण घेता येते.)

मी मोठ्या बोलमधे या पाकळ्या सूट्या करुन ठेवल्या आहेत. पण त्या केवळ कल्पना येण्यासाठी. तो असा
सर्व्ह केला जात नाही. हाताने याचे एकेक दल ओढून काढायचे आणि मग त्याचा देठाकडचा भाग, डिपमधे
बूडवून हि पाकळी (दल) दातात धरुन बाहेर ओढायची असते. दलाच्या आतल्या बाजूला असणार गर, डिप बरोबर खायचा असतो. (जर गरमच आर्टीचोक खायला घेतला असेल, तर तो उलटा करुन, किंचीत दाबून आतले गरम पाणी काढावे लागते. आत एक पोकळी असते.)

असे करत करत सगळ्याच पाकळ्या खायच्या. आतील काहि पाकळ्या अगदी कोवळ्या असतात, आणि त्या पूर्णपणे खाता येतात.या पाकळ्या काढल्यावर आत एक टोपीसारखा भाग दिसतो. (वरच्या फोटोत आहे ) तो ओढून काढल्यावर आत बाल्यावस्थेतले केसर दिसतात. ते शिजत नाहीत आणि खाण्यागोगेही नसतात. ते चमच्याने वा सुरीने काढून टाकले (त्यांना चोक म्हणतात) कि आतमधे थोडासा खाण्याजोगा (हार्ट) भाग असतो.

आर्टीचोक मधे चवीपेक्षा, तो खाण्याच्या अनोख्या रितीमधे त्याची मजा आहे. चवीची तूलना करायची झालीच तर मी शेवग्याच्या शेंगेशी करेन. खाण्याची रितही साधारण मिळतीजूळती. पण शेवग्याच्या शेंगेत खाण्याजोग्या गराचे प्रमाण जरा जास्त असते.

आर्टिचोकचे शास्त्रीय नाव सायनारा कार्डनकुलुस. याचा उगम उत्तर आफ़्रिकेतला मानतात. त्या
भागात जंगली अवस्थेत तो अजूनही आढळतो. पण याची लागवड मात्र, जास्त करुन, दक्षिण
युरपमधे होते. दक्षिण अमेरिकेतही याची लागवड होते. आर्टिचोक हा शब्द मात्र, अरेबिल अर्द शोकि
(काटेरी जमीन) वरुन आलाय.

आर्टिचोकमधे प्रथिनांबरोबर, फ़ोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी खनिजे आढळतात.
याची लागवड बियांपासून, तसेच कलम करुन पण करता येते. शोभेचे झाड म्हणूनही हे लावतात.
आर्टिचोकमधले सायनारिन, शरिरातील बाईल फ़्लो वाढवते. पचनास मदत करते, आणि लिव्हर
ची कार्यक्षमता वाढवते.

आपण आतापर्यंत बघितले ते ग्लोब आर्टिचोक. याबरोबरच जेरुसलेम आर्टिचोक म्हणूनही एक भाजी
असते. पण ते आर्टिचोकहि नाही आणि जेरुसलेमशीही त्याचा काहि संबंध नाही. ही सूर्यफ़ूलाच्या
कूळातली एक वनस्पति आहे, आणि तिची आल्यासारखी दिसणारी मूळे खाल्ली जातात. याची
चव साधारण बटाट्यासारखी असते.

काहि पुस्तकात पण मी याबाबतीत चुकीचा उल्लेख वाचला आहे कि या जेरुसलेम आर्टिचोक मधे
इन्स्यूलीन असते (माझ्या माहीतीप्रमाणे पोटात घेण्याजोगे इन्स्यूलीन अजून सापडलेले नाही.) पण
ते इन्स्यूलीन नसून, इन्युलीन असते. त्यापासून फ़्रक्टोज तयार करतात.

विषय: 
प्रकार: 

मस्तच. आर्टिचोकला असे फूल येते हे माहित नव्हते. नेहमी कॅन्ड आर्टिचोक हार्टस घेत असल्याने, डीपबरोबर हे असे खाता येते हेही माहित नव्हते.
आजकाल इथे जांभळे आर्टिचोक्स पण दिसतात.

बाकी दिनेशदा, सुरेखच होतेय ही मालिका.

काय पण छान मालिका लिहिताय दिनेश दा.. कधीही टेस्ट न केलेल्या भाज्यांच्या कृती आणी फोटो पाहून नवीन नवीन भाज्या ट्राय करायला इन्स्पिरेशन मिळत आहे Happy

काय सुरेख फूल असतं. कृष्णकमळाची आठवण आली.

आर्टिचोक डिप छान लागतं चिप्स बरोबर.

छान मालिका लिहिता आहात. इथे पालेभाज्यांबरोबर डँडिलॉनचिपण जुडी मिळते. आपल्या नेहेमीच्या पालेभाजीसारखी लसूण मिरची आणि कांद्यावर परतून भाजी करता येईल त्याची? आपण तर डँडिलॉनला फेकून देतो.

छान माहिती दिनेशदा! इंग्रजी कथा, कादंबर्‍यांमध्ये ह्या भाजीचा उल्लेख वाचून तिची तेवढीच नाममात्र ओळख झाली होती. आज तुम्ही सचित्र सविस्तर माहिती दिलीत. धन्स! Happy

मस्त माहिती,... खाताना बराच टिपी होत असणार हे नक्कीच Happy

पुष्पकोषावरुन आठवले. नव्या मुंबईत काटेसावरीची (शाल्मली) बरीच झाडे आहेत. एकदा कॉलनीतल्या एका झाडाला एक भय्या काठीने झोडपुन मोठे झालेले कळे पाडत होता. मी विचारले काय चाललेय? तर त्याने कळा उलगडुन आतला पुष्पकोष दाखवला आणि म्हणाला आम्ही याची भाजी करतो Happy

हे आर्टीचोक, चित्रात (ज्यात फळे आणि भाज्या अशा रचना असतात त्यात ) बरेचवेळा दिसते. लँपशेड मधे पण हे डि़झाईन दिसते.
शक्यतो भाजीचे आणि तयार पदार्थाचे फोटो द्यायचा प्रयत्न करतो. सर्वजण वाचताहात, त्यामूळे लिहायला पण उत्साह वाटतोय.

छोटे मॅरिनेटेड आर्टिचोक हार्टस सॅलड मधे सुरेखच लागतात. वरच्या हिरव्या पाकळ्या मात्र नाही खाऊन पाहिल्या कधी.

मैत्रिणीने मध्ये एकदा गार्लिक बटर मध्ये आर्टिचोक हार्ट मिक्स करून ते बगेट ब्रेड वर लावलं होतं. टोस्ट करून छान लागलं. जोडीला गरम गरम सूप. हिवाळ्यातल्या संध्याकाळी मस्त वाटतं.

वॉव आतापर्यंत ही भाजी फार्मविलध्येच बघितली होते. खरी आता पहायला मिळाली. Happy ही भारतात पण असते का?

तुम्ही खूपच छान आणि माहितीने परिपूर्ण असलेले लेख लिहित आहात.. अगदी ती भाजी दिसते कशी, करायची कशी, खायची कशी आणि खाल्ल्याने होनारे फायदे देखील.. ह्या भाज्या कधी खाइन की नाही माहित नाही, पण वाचायला मजा येत आहे..

आर्टीचोक पाकळ्या पिझ्झा टॉपिंग्स मधे पण वापरतात, परवा स्पिनॅच शी काँबिनेशन असलेला पिझ्झा पाहिला, 'स्पिनॅच-गार्लिक-आर्टिचोक' पिझ्झा .

अमेरिकेत कॅनमधले किंवा फ्रोझन आर्टिचोक्स मिळतात . ताजे आणून ते 'तयार' करायाचा व्याप नको असेल तर असे आर्टीचोक्स वापरायला सोपे.
कॅनमधले किंवा फ्रोझन असतील तर थॉ केलेले आर्टीचोक्स, रोस्टेड रेड पेपरच्या स्लाइसेस, रोमेन लेटूस किंवा अरुगुला किंवा स्प्रिंग मिक्स सॅलड अन चमचाभर साखर- चिमुभर मिरचीपूड घालून परतलेले अक्रोड यांचं सॅलड मस्त लागतं. सीझर ड्रेसिंग किंवा मस्टर्ड व्हिनेग्रेट ड्रेसिंग.

दिनेशदा,
मस्त ....
पण तुमच्यामुळे आमच्या तोंडाच पाणी मात्र वाया जातय !
Happy

बापरे दिनेशदा, ही मालिका आत्ता वाचतेय... मी खादाडीतली नाही आणि खिलवडीतलीही फारशी नाही... Happy
तुमचा व्यासंग दांडगा, हो. किती मुरला आहात ह्या विषयात.... जियो, म्हणत नाही... वयाचा अडसर असावा Happy
माझ्या एका खवैय्या-खिलवैय्या दोस्ताला देतेय लिन्क.

हे आर्टीचोक प्रकरण पहिल्यांदाच बघतेय. खुप मस्त फुल आणि माहीतीही.