गाभारा

Submitted by जया एम on 28 June, 2010 - 06:32

लख्ख झळकले नथीतले मोती
देवी उंब-यात थांबलेली होती
युगांची शांतता ओंजळीत भरे
कोण कुळवंती देवळात शिरे

गाभा-यात दाटे मंद ओला गंध
फुलांची अंतरे झाकोळली कुंद
वात होते शांत समईच्या पोटी
सवाष्ण वळते भरुनिया ओटी

पारावरी स्तब्ध पिंपळ एकटा
वारा त्याला सांगे एक गूढ कथा
पुण्ये फळतात वर फांदीवरी
कुणकुण लागे मातीलाही तरी

डोंगरावरती एका गुहेमधी
योग्याने लावली विमग्न समाधी
ओंकार उमटे तिच्या मेन्दीवर
नथीतले मोती त्याच्या मनभर

गुलमोहर: 

जी .ए ची कविता अशीच उतरली असती नाही?
कुलवंती पेक्षा कुळवंती हा नेमकेपणा आवडला
-अनंत खासबारदार

पुण्ये फळतात वर फांदीवरी
कुणकुण लागे मातीलाही तरी

ओंकार उमटे तिच्या मेन्दीवर
नथीतले मोती त्याच्या मनभर
!!!!
शब्द नाहीत...
फक्त
देवी उंब-यात थांबलेली होती
ही ओळ अगदी गद्य झालीय...

सर्वान्चेच मनःपूर्वक आभार. कशी सुचली ते नाही सान्गता येत, के. अन्जली, एक एक ओळ लिहीत तीन दिवस चालले होते मन्थन. भरत, तुमचे म्हणणे कळले, पण मी एकदा सुचले की लिहून टाकते, डागडुजी नाही करत. त्यामुळे या कवितेला एक गद्य ओळ पेलायला हवी आता जन्मभर...आणि पहिल्या ओळीपाठोपाठ हीच आली. अशीच.

जी.ए. आणि काफ्का हा माझ्या साहित्य संस्काराचा प्राण आहे, अनंत खासबारदार. तोच सूर उतरला असेल कवितेत.