अवघी विठाई माझी (६) - बेबी कॉर्न

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

babycorn.jpg

मक्याच्या झाडाला कणसे लागलेली अनेकजणांनी बघितली असतील.
मक्याच्या झाडाची नरफ़ूले हि झाडाच्या शेंड्याला तूर्‍याने लागतात, आणि कणसे हि मध्यावर लागतात. त्यातून बाहेर येणारे रेशमासारखे धागे परागनलिकेचे काम करतात. आणि ते झाले कि या नलिका
सुकतात. म्हणजे चमकदार सोनेरी रंगाच्या असतात त्या तपकिरी होतात.

एका झाडाला दोन चार कणसे लागू शकतात, पण मोठ्या कणसांच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी कणसे लागतात. ती क्वचितच पूर्ण वाढतात. पण आपण खुडू गेल्यास लहानमोठी मिळू शकतात.
बेबी कॉर्न म्हणजे काही वेगळे झाड वा पिक नाही, मक्याच्या झाडाला लागणारी कणसेच, अगदी कोवळी असताना तोडली जातात.
फ़क्त हे पिकही महत्वाचे असल्याने, काही जाती केवळ यासाठी तयार केल्या गेल्या आहेत. थायलंड आणि तैवानमधे हे महत्वाचे पिक आहे.

पण मका हे मुख्य अन्न असलेल्या पूर्व आफ़्रिकेत मात्र, ती लोकप्रिय नाहीत.

साधारण चायनीज फ़ूड आपल्याकडे लोकप्रिय झाल्यावर, आपल्याकडेही हि कणसे मिळू लागली आहेत. आपल्याकडे ताजी मिळतात, पण थायलंड कडून टीनमधे ती निर्यातही होतात.

हि कणसे कच्ची खाल्ली तरी चालतात. स्टर फ़्राय केली तरी चालतात वा थोडी उकडली तरी चालतात. नवल म्हणजे शिजवूनही चवीत फ़ारसा फ़रक पडत नाही. (सजावटीच्या बीबीवर मी स्टर फ़्रायचा फ़ोटो टाकला होता, इथे जरा वेगळा प्रकार देतोय.)

babycorna.jpg

हा प्रकार करायला सोपा तर आहेच, शिवाय चवीवर पुर्ण नियंत्रण ठेवता येते. या कणसाचे तूकडे करून घ्या. उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवा (टीनमधली वापरलीत, तर शिजवायची गरज नाही.) मग त्याच पाण्यात तयार टोमॅटो सूप पावडर टाका. या सूपचे साधे आणि क्रिमी असे दोन प्रकार
मिळतात. मी क्रिमी वापरला आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण निवडू शकता.
यात आपल्या आवडीप्रमाणे, लाल तिखट, मिरपुड वा पाप्रिका टाका. हवे तितके दाट करा.
आता गाजरे जाडसर किसून घ्या. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर व मिरपूड टाका.
थोड्या तूपावर परतून घ्या. त्यातच थोडे तीळ टाका. गाजराला सूटलेले पाणी आटवून
घ्या. थोडेसे लालसर होऊ द्या.
मग वरीलप्रमाणे सजावट करा. माझ्या छोट्या दोस्तमंडळींसाठी हा प्रकार केला होता.
चट्टामट्टा करुन टाकला, त्यांनी. मुलांना लाल रंगाचे आकर्षण असतेच. शिवाय चव पण त्यांना
आवडू शकते.

बेबी कॉर्न मधे ब, ब६ आणि क जीवनस्त्वे असतात. फ़ोलेट, रिबोफ़्लेवीन आणि पोटॅश पण
बर्‍यापैकी असते. पण या सगळ्यापेक्षा ते इवले रुप आणि चव जास्त महत्वाची ठरते.

विषय: 
प्रकार: 

मस्त! Happy

छानच.
मी बर्याचदा बेबी कॉर्न, शिमला मिरची, ओले वाटाणे, गाजर, बटाटा, टोमॅटो अशी मिक्स भाजी बनवते. (अर्थात जितके जिन्नस उपलब्ध असतील ते वापरून). बेबी कॉर्नच्या क्रंची चवीमुळे छान लागते ही भाजी.

पण मका हे मुख्य अन्न असलेल्या पूर्व आफ़्रिकेत मात्र, ती लोकप्रिय नाहीत.
दिनेशदा, याला दिव्याखाली अंधार म्हणायच का ? Happy
आमच्याकडे नेहमी मक्याच पीक घेतल जात ...पण शिजवुन खाणे सगळ्यात आवडता आणि सोपा मार्ग !
आम्ही लहाणपणी मात्र घरच्यांची नजर चुकवुन ही कोवळी कणसे खायचो,पण शिव्या ही खायचो !