शाळा कशी निवडावी ???

Submitted by अमोल कुलकर्णी on 21 June, 2010 - 13:52

सियोना आता दिड वर्षाची झाली. आता ती पुढच्या वर्षी शाळेत जायला लागणार. कसे पटापट दिवस जातात कळतच नाही. असे विचार चालू असतानाच, एकदम क्विक फ्लॅशबॅक मध्ये गेलं मनं ..... डॉ. दाबकेंनी पहिल्यांदा हातात दिलेलं एवढसं पिल्लू, पाळण्यातलं पिल्लू, कुस बदलायला लागलेलं, पालथं पडायला लागलेलं, रांगायला लागलेलं, बेबी स्टेपस् टाकत हळूहळू चालायला लागलेलं पिल्लू, एक एक शब्द ऐकून किंवा स्व्तःच कुठलातरी शब्द तयार करून बोलायला लागलेलं पिल्लू ........ असं सगळं डोळ्यासमोरून जातं होतं आणि एकदम मूळ विचारात परत आलो ...... हेच ते माझं छोटसं पिल्लू आता शाळेत जाणार ...... Happy
हा विचार करुन खुपच वेगळ वाटत होतं, पण एकदम मस्त वाटत होतं. आता काही जणं म्हणतील ह्यात काय ते वेगळं, मस्त वाटायचंय, सगळीचं मुलं शाळेत जातात, आमची मुलं नाही गेली शाळेत .... पण माझ्याकरता हे प्रथमच होतं ना ..... आलं मला एकदम वेगळं फिलींग .....

तर आता माझी सिनू शाळेत जाणारं ..... मग ठिक आहे ना ..... एखादी चांगली शाळा बघू आणि अ‍ॅडमिशन घेऊ. त्यात काय एवढं ....... हे बोलताना सोपं वाटलं पण नंतर मित्र मैत्रिण, नातेवाईक, शेजारी पाजारी ह्यांचे ह्या बाबतीतले अनुभव ऐकले तर जाणवलं ...... खरचं जरा विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागणार शाळेचा.
आणि मग माझी विचारचक्र सुरु झाली, शाळा कशी निवडावी ..... सियोनाला कुठल्या शाळेत घालावं .....
विचार करता करता ह्यावर अजुन काही लोकांचे अनुभव जाणून घ्यावे असं वाटलं, तेंव्हा मायबोली वर मंजीचा (मंजिरी सोमणचा) लेख वाचत होतो, 'परिक्षा असाव्यात की नसाव्यात' आणि तेंव्हा सुचलं, अरे यार ..... इथे मायबोलीवर रोज इतक्या लोकांशी बोललं जातं, अनेकांचे लेख, विचार वाचले जातात ..... आपल्या मनातले विचार इथे मांडून बघू. मायबोलीकरांचे अनुभव ऐकून नक्कीच आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायला मदत होईल. Happy

तर, शाळा कशी निवडावी .....
पहिला विचार आला तो, सियोना आत्ता तर दिड वर्षाची आहे, अजुन एक ते सव्वा वर्ष आहे तिला शाळेत जायला. पन त्याआधी तिला शाळेची ओळख करुन द्यायला, प्री स्कूल मध्ये तर घालावं लागेलच ना. तर पहिला प्रश्न .....

(१) प्री स्कूल साठी कुठे ? .....
ह्या बाबतीत मला वाटतं, आपल्या घराजवळची एखादी घरगुती स्वरुपात असलेली शाळा असावी. जिथे मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण होईल, शाळेतल्या वातावरणाची ओळख होईल.
आजकाल अशी प्री स्कूल्स् सुध्दा खुप निघाल्या आहेत. त्यातल्या एका प्री स्कूल मध्ये चौकशी ला गेलो होतो, जे की भारतातील सगळ्यात मोठी प्री स्कूल चेन आहे, असा त्यांचा दावा आहे. शाळेबाबत असे शब्द ऐकताना जरा विचीत्रच वाटलं. तर त्या प्री स्कूल मधल्या बाई म्हणाल्या ...... नाही मिस म्हणायला हवं, मिस म्हणाल्या आमच्या प्री स्कूल मध्ये लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन शिकवलं जात. का माहीत नाही, पण मला ते वातावरण, ते बोलणं एवढं काही रुचलं नाही.
मला वाटलं शाळेची ओळख करुन देणारी ही प्री स्कूल्स् कशी, आपल्या घरात कसं वातावरणं असतं
तशी हवी, तीथे मिस .... मिस .... करण्यापेक्षा आजी किंवा मावशी अशी हाक मारली जावी, तरचं ह्या लहान मुलांमध्ये शाळेबद्दल पहिल्यापासून एक आपुलकीचं नातं निर्माण होईल.

(२) शिक्षणाचे माध्यम .....
हा पण खुप विचार करण्यासारखा प्रश्न वाटतो. खरं तर, कुठल्याही माध्यमातून शिक्षण घेतलं तरी प्रगतीपासून कोणीच रोखु शकत नाही. पण आजकाल, मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याच प्रमाण मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात खुपचं कमी झालयं. आणि त्याला कारणं आहे, मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि तिथलं वातावरणं. खुपच कमी मराठी माध्यमांच्या शाळा त्यांचा पूर्वीचा दर्जा टिकवून आहेत. दुसरं माध्यम, कॉन्व्हेंट .... तिथला प्रॉब्लेम वेगळाच वाटतो. तिथली संस्कृती आणि संस्कार आपल्या मध्यमवर्गातल्या लोकांपेक्षा खुपच भिन्न वाटते. म्हणजे, घरी एक वातावरण असतं, मराठमोळं ही म्हणू शकता आणि शाळेत एकदम त्याच्या विरुध्द. मला असं वाटतं अश्या परस्परविरोधी वातावरणाचा मुलांच्या विचारसरणीवर खुप फरक पडतो. ह्या सगळ्याचा विचार करता, इंग्लिश माध्यमाच्या शाळांचा पर्याय योग्य वाटतो.

(३) SSC / CBSE / ICSE Board .....
कुठल्या बोर्डात मुलं शिकणारं .... खरचं फरक पडतो का ह्यानी .... असं म्हणतात, SSC पेक्षा इतर बोर्डातली मुलं दोन वर्ष अ‍ॅडव्हान्स शिकतात, ज्याचा की त्यांना नंतर खुप फायदा होतो. पण फायदा, in terms of what, परीक्षेत मिळणारे मार्कसच ना .... म्हणजे परत आपण मुलांना त्याच rat race मध्ये धावायला भागं पाडतोय, परीक्षार्थी बनवतोय, विद्यार्थी नव्हे. मला असं वाटतं की कुठल्याही बोर्डाच्या शाळेत मुलं गेली तरी त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये काही फरक पडत नाही.

(४) वर्गातल्या मुलांची संख्या .....
काही शाळांमध्ये एका वर्गात ६० मुलं असतात तर काही शाळांमध्ये २० च मुलं असतात. कमी मुलं असतील तर खरचं काही फरक पडतो का?

(५) शाळेत फक्त अभ्यास .... का .... अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकास करणारी शाळा .....
आजकाल सगळ्याच शाळांमध्ये अभ्यासाबरोबर इतर काही उपक्रम (activities) राबवल्या जातात. पण काही शाळांमध्ये ते नुसतेच राबवायचे म्हणून राबवले जातात .... फोकस वाटत नाहीत किंवा प्रत्येक मुलाची आवड बघून त्यांचे समान आवडीच्या मुलांबरोबर ग्रुप करुन त्यांना ती अ‍ॅक्टीव्हीटी दिली पाहीजे. ह्यात शाळांची आणि शिक्षांची काही प्रॅक्टीकल डिफीकल्टी पण असू शकते. मुलांचा सर्वांगीण विकास करणारी, फक्त अभ्यासाचा बाऊ न करणारी, ढेर सारा घ. अ.; होम वर्क न देणारी, फक्त अभ्यासात बांधून न ठेवता अभ्यासाबरोबर मुलांच्या कला, क्रीडा अशा गुणांना वाव देणारी शाळा पाहीजे.

(६) शाळा घराजवळ असावी का? .....
मला हा खुप महत्वाचा विषय वाटतो. मी आणि माझी बायको दोघही दिवसभर ऑफिसमध्ये असतो. माझा बिझनेस आहे आणि ऑफिस पण घराजवळ आहे, त्यामुळे सियोनाला शाळेत सोडणं, घेऊन येणं सहज शक्य आहे. माझे आई बाबा माझ्या घराजवळच राहतात. त्यामुळे वाटतं शाळा घराजवळ असेल तर सियोनाला तिचे आजी आजोबा पण कधीतरी आणू शकतात.
आता शाळा घराजवळ नसेल तर मुलांना व्हॅन किंवा स्कूल बस मधून पाठवण्याशिवाय पर्याय नाही.
पण ते थोडफार मला पटत नाही कारण की आजकाल पुण्यात ट्रॅफिक एवढं असतं की जाऊन, येऊन जर दोन तास मुलं प्रवास करणार तर दमून जाणार. दुसरं, व्हॅनमध्ये मुलं शांत काही बसत नाहीत, दंगा करत राहतात आणि व्हॅनकाका ते प्रत्येक वेळेस गाडी चालवता चालवता कंट्रोल करु शकत नाहीत. परवाच ह्याबद्दल दोन घटना ऐकल्या त्या अश्या.
एका ५- ६ वर्षाच्या मुलीला व्हॅन मधल्या मुलांनी खेळता खेळता इतकं मारलं की तिच रक्त साखाळलं. व्हॅन मधली सगळी मुलं त्याच वयाची, कुठल्यातरी छोट्या कारणावरुन सुरुवात झाली आणि २-३ मुला मुलींनी मिळून त्या मुलीला CID आणि कार्टून नेटवर्क बघून त्या स्टाईलनी मारलं. ( सध्याच्या लहान मुलांचा आवडता कार्यक्रम कुठला तर CID. )
दुसरा किस्सा. माझ्या मैत्रिणीच्या मुलीबाबत घडलेला. तिचा शाळेचा आणि व्हॅन मधून शाळेत जाण्याचा पहिलाच दिवस. ती शाळेत व्यवस्थित गेली पण येताना तिला तीचे व्हॅनकाका शाळेतून घ्यायला विसरुन गेले. किती हा निष्काळजीपणा. नंतर एका तासानी फोनाफोनी झाल्यावर ती मुलगी व्यवस्थित घरी आली पण तो एक तास त्या मुलीला आणि तिच्या पालकांना किती टेंन्शन.
अर्थात प्रत्येक वेळेस असचं काही घडेल असं काही नाही, पण असे काही किस्से ऐकले की घराजवळचं शाळा असेल तर जास्त बरं राहील का असा विचार येतो.

(७) ऑफिस टायमिंगवाली शाळा .....
काही शाळांच्या वेळा ऑफिसच्या वेळांप्रमाणे असतात, सकाळी ९ ते संध्याकाळी ६. खरं तर, ज्यांच्या घरी आई बाबा दोघही नोकरी करतात, त्यांच्या दृष्टीने ही खुपच फायद्याची गोष्ट आहे. आधी शाळा आणि मग पाळणाघर, दोन्ही ठिकाणी त्यांची ने-आण करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ती मुलं जास्त सुरक्षित राहतात. बरं, इथे ब्रेकफास्ट, लंच, मुलांना दुपारी थोडी रेस्ट अश्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यामुळे अशी शाळा खरचं विभक्त कुटूंब पध्द्तीत आणि जिथे आई बाबा दोघही नोकरी करत असतील त्यांना फायद्याची.
पण, दुसरा विचार असा येतो की, मुलं सकाळी ९ ला शाळा म्हणजे घरातून ८ ला बाहेर पडणार आणि शाळा सुटल्यावर परत घरी यायला त्यांना ६ - ७ वाजणार. त्यांना शाळा हेच जगं. किती मेकॅनिकल लाईफ होत असेल त्यांच. आणि घरी आल्यावर पण आई बाबा त्यांच्या कामात व्यस्त मग ही मुलं घरात संवाद न साधता टी.व्ही. पाहात बसणारं.
त्यापेक्षा नेहमीप्रमाणे ६ तासांची शाळा असेल तर, मुलं थोडा वेळ पाळणाघरात, किंवा घराच्याइथे खाली इतर मुलांबरोबर खेळू शकतात. त्यांची एखादी आवड, एखादी कला, एखादा छंद जोपासू शकतात. आठवड्यातून २ -३ दिवस संध्याकाळी संगीत, चित्रकला असं काहितरी शिकू शकतात. महत्वाचं म्हणजे, शाळा आणि घराव्यतिरीक्त एक वेगळं जगं निर्माण करु शकतात.
सो, ऑफिस टायमिंगप्रमाणे असलेल्या शाळेत ५ - ६ वर्षाच्या मुलाला पाठवून, लहानपणापासून त्याला मेकॅनिकल लाईफ जगायला लावायचे का?

(८) फी, डोनेशन आणि त्याव्यतीरिक्त पण अजून काही पैसे काढू शाळा .....
सध्या शाळांच्या फीज् ऐकल्या की असं वाटतं, अरे पहिलीतल्या मुलाची एका वर्षाची फी ३० ते ३५ हजार रुपये. बरं बाकीचा खर्च वेगळाचं. मी माझा १ ली ते १२ वी पर्यंतचा शाळेचा सगळा खर्च, फी, युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या काढला तरी तो एवढा येणार नाही. Happy
बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पहिल्या वेळेस अ‍ॅडमिशन घेताना डोनेशन नावचं एक गोंडस शब्द सांगून पालकांना लुबाडणे. मग न राहावून वाटतं, आता शाळा हा सुध्दा एक धंदा झाला आहे का ???

(९) पालकांचा इंटरव्ह्यू .... पालक पास तर मुलं पास .....
हे एक नविनच आहे ना .... म्हणजे तसं आता हे जुनं झालं, पण माझ्याकरता पहिल्यांदाच ना, मग नविनच.
हे परीक्षा, इंटरव्ह्यू ह्या सगळ्याचा जाम कंटाळा येतो मला तर. जाम वैताग. अरे इतकी वर्षा ते झालं ना, आता दोन वर्षाच्या मुलीच्या अ‍ॅड्मिशनला कसला इंटरव्ह्यू घेता. आधी आई बाबांचा इंटरव्ह्यू घेणार, मग त्या दोन वर्षाच्या मुलीचा, मग लिस्ट लावणार आणि त्यात नावं आलं तर अ‍ॅडमिशन.

असे अनेक प्रश्न डोक्यात चालू आहेत. ह्या सगळ्याचा विचार करून मी अती विचार करतोय का ?? ..... इथे माबो वर खुप अनुभवी पालक आहेत, तसेच काही शिक्षक देखील असतील त्यांची ह्या बाबतीतली मतं आणि प्रतिसाद जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. Happy

ह्या माझ्या विचारांमध्ये नक्कीच काही गोष्टींचा विचार झाला नसेल, काही बाजू माझ्याकडून चुकीच्या पध्द्तीने पण मांडल्या गेल्या असतील, तरी ते माझ्या जरूर लक्षात आणून द्यावे.

कुठलीही शाळा, शिक्षणपध्द्ती किंवा शिक्षक कधीच वाईट नसतात आणि ते ठरवण्याचा आधिकार माझा नव्हे. तरी ह्या लिखाणामध्ये कुठल्याही शाळेबद्दल, शिक्षणपध्दतीबद्दल किंवा शिक्षकवर्गाबद्द्ल जर काही चुकीचे लिहीले गेले असेल तर त्या सर्वांची विनम्र माफी.

माबोकरांचे अनुभव, सल्ले आणि अजुन काही गोष्टी असतील ज्यांचा माझ्याकडून विचार झाला नसेल, तर हे सगळं ऐकण्यास मी उत्सुक आहे. Happy

गुलमोहर: 

जुई, सद्यपरीस्थितीत मराठी मिडीयम शाळांची अवस्था बघता, ईंग्लिश मिडियममम्ध्ये (कॉन्व्हेट नको ) घालणेच योग्य वाटते. (वैयक्तिक मत.)

इन्ग्लिश मीडीअम मध्ये घालून घरी सर्व मराठी शिकवावे. पुढे मुले हिंदीसंस्क्रुत च्या नादाने देवनागरी शिकतात मग त्यांना सोपे मराठी वाचायला द्यावे.

आम्ही दोन वर्षया पुर्वी बिबवेवाडीत रहायला आलो. त्यावेळी मुलाला घराच्या एकदम जवळ म्हणुन 'Vidyaniketan English Medium school' च्या नर्सरी स्कुल मधे घातले Jr Kg ला, आत्ता तो Sr Kg मधे आहे. पुढ्च्या वर्षी पहिली ते दाहवी ची शाळा Canaara bank च्या (बिबवेवाडीत ) जवळ आहे.
आत्तापर्यंत आम्ही शाळे बाबत समाधानी आहोत.

पहिली साठी शाळा बदलावी का आसा विचार चालु आहे. मुक्तांगण शाळा हा दुसारा ऑप्शन आहे.
'Vidyaniketan English Medium school' पहिली ते दाहवी शाळा कशी आहे ? मुक्तांगण शाळा कशी आहे ?

कोणाला माहीत आसेल तर जरा महीती द्या.

हो माझा पण तोच विचार चालू आहे, पण माझ्या नवर्‍याला कदाचित मनापासून आवडला नाही हा निर्णय त्यांच अस म्हणण आहे, मुलाची शिकण्याची कुवत चांगली असेल तर मराठीतून शिकला तरी काही फरक पडत नाही. एकमत एवढच आहे की त्याला S.S.C. Board ला टाकायचय ,

मला पण पटतय , पण मी बघितल आहे, दहावीपर्यंत मुलांची प्रगती अगदी उत्तम असते पण जेव्हा ते कॉलेजला जातात तेव्हा एकदम सगळ ईंग्लिशमध्ये असल्यामुळे थोडाफार न्युनगंड , घाबरेपणा येतोच. अपवाद असू शकेल नाही अस नाही .

आम्ही मुंबईत परळला राहतो , तिथल्या शाळांबद्द्ल माहिती द्याल का? S.S.C. Board असेल तर उत्तमच

जुई हाय.
परळवरुन तुम्हाला "किंग जॉर्ज" बरी पडेल. बसेस भरपुर आहेत जर घराजवळच हवी असेल तर माहित नाहिय.. Sad

बिबवेवाडी - पुणे येथील 'Vidyaniketan English Medium school' पहिली ते दाहवी शाळा कशी आहे ? मुक्तांगण शाळा कशी आहे ?
कोणाला माहीत आसेल तर जरा महीती द्या.

CBSE / ICSE Board मधल्या शाळांमध्ये कुणाचे पाल्य असेल तर एकंदरीत अनुभव कुणी लिहिल का??
हल्ली डे बोर्डींग स्कूल म्हणून एक प्रकार ऐकला आहे. त्याची माहिती कुणाला आहे का? कितपत उपयोगी असते?

मी कुणाकडून तरी ऐकले की CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड आणि ICSE म्हणजे इंटरनॅशनल स्कूलिंग. ICSE ला ग्लोबली जास्त प्रेफरन्स दिला जातो. जरा कुणी यावर प्रकाश टाकेल का? SSC पेक्षा CBSE / ICSE Board चा अभ्यासक्रम २ वर्षे पुढे असतो व क्वचित प्रसंगी जड पडतो असेही काही पालकांकडून ऐकले. कुणाचे काय अनुभव आहेत?

ICSE म्हणजे इंटरनॅशनल स्कूलिंग नव्हे. ते इंडीअन सर्टिफिकीट ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे. हा भारतीय सीलॅबसच आहे.
भारतात सध्या असलेले खर्‍या अर्थाने इंटरनॅशनल सिलॅबस दोनच-
IGCSE (International General Certificate of Secondary Education) हा केंब्रिज युनिव्हर्सिटीचा आहे. आणि
IB (International Baccalaureate) हा IBO या जिनिव्हास्थित संस्थेचा सिलॅबस आहे.

आयसीएसई आणि सीबीएसई मधला नेमका फरक माहीत नाही. पण ग्लोबल चेंजेस प्रमाणे आयसीएसई चा सिलॅबस अपडेट राहतो इतकंच माहीत आहे..

एसएससी चा अभ्यासक्रम ग्रासरूट ला डोळ्यापुढं ठेवून आखण्यात आलेला आहे. सर्वांपर्यंत पोहोचणारा अभ्यासक्रम म्हणून तो यशस्वी आहे. अर्थातच स्पर्धा परिक्षा या केंद्रीय अभ्यासक्रमावर आधारित असल्याने तिकडे प्रवेश घेण्याकडे कल आहे. एसएससीच्या मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी जी वेगळी तयारी करावी लागते तितकीशी या मंडळींना नाही करावी लागत..

ICSE म्हणजे इंटरनॅशनल स्कूलिंग नव्हे. ते इंडीअन सर्टिफिकीट ऑफ सेकंडरी एज्युकेशन आहे. हा भारतीय सीलॅबसच आहे.
>>>
धन्स, आगाऊ Happy
ICSE चा फुल फॉर्म कळल्यावर माझा गोंधळ उडला होता. म्हणून कंफर्म करायचे होते.

पण ग्लोबल चेंजेस प्रमाणे आयसीएसई चा सिलॅबस अपडेट राहतो इतकंच माहीत आहे..
>>>
हे CBSE च्या बाबतीतही ऐकले आहे.

मी स्वतः तरी कोणत्याही अति महान आणि हायफंडू हायटेक सतराशे साठ कागदावर भारी वाटणार्‍या शाळेत शिकलो नाही, तरी माझ्या करीअरमध्ये मी उत्तम मनुष्य आहे. माझ्याकडे माझ्या विषयांचे उत्तम ज्ञान आहे माझ्या वर्गातील ७५-८०% मुलांचे करीअर छान घडले आहे. >>>>
माझ्या बाबतीतही सेम असेच आहे. पण मी ज्या शाळेत (मराठी माध्यम) शिकले त्याच शाळेतले आजघडीचे शिक्षक पाहून मला त्या शाळेत माझ्या मुलाला पाठवायची इच्छा होत नाही. Sad

फुल्या, चांगले पोस्ट Happy

एसेस्सीच्या शाळांमध्येही हल्ली पूरक म्हणून सीबीएससीच्या पॅटर्नची पुस्तकं असतात. सुरूवातीला थोडं जड पडतं ते शिकायला, पण मुलं करतात पिक अप.

पुण्यात CBSE and ICSE चा चागल्या शाळा कुणी सागू शकेल का प्लिज? औन्ध, बाणेर, कोथरुढ, वाकड परिसरातील

ईथे चर्चा आणि बरीच उपयुक्त माहिती आहे. पण बहुतेक सगळी देशातली आहे.

अमेरिके मधे शाळा ( आपल्या एरिया प्रमाणे मिळते हि गोष्ट वेगळी) पण काही वेळा आपण निवडु शकतो / लॉटरी सिस्टिम / कि प्रायव्हेट.... ई ई बद्दल चर्चा आहे का कोठे?

@juyee

मराठी माध्यमाची स्थिती गेल्या १०-१५ वर्षात अतिशय खराब झाली आहे .
आणि आधी हि फार चांगली नव्हती

अगदी ३० वर्षा पूर्वी १९९१ ला मुंबई मधील एक फार चांगली शाळा पार्ले टिळक मधून १ किंवा २ जण आयआयटी मध्ये गेले होते
माझया २ क्लासमेट्स बोर्डात आल्या होत्या - त्यातील एक व्हीजेटीआय ला गेली , दुसरी ला सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये मुंबईत मिळली नाही , ती मुंबई बाहेर शिकली .
तसेच त्यावेळी मराठी मुले बोर्डात यायची पण मी फारच चांगल्या बी स्कुल मध्ये होते - जमनालाल बजाज -१९९७-९९ - त्यावेळी मुंबईत असून मराठी माध्यमाची १४-१५ मुले होती १२० मुलात
माझा भाऊ १९९७-९९ ला आयआयएम कोलकता ला होता ( भारतात दुसरे / तिसरे बी स्कुल ) त्याच्या सिनिअर आणि ज्युनिअर बॅच मध्ये तो एकटा मराठी माध्यमाचा होता .
आता हे होते २५ वर्षा पूर्वी आता फार फार वाईट आहे
आता हेच पाहिजे का तर नाही पण इतर क्षेत्रात हि हे दिसत आहे

साहित्य वगैरे विषयात तर मराठी मध्ये आपले पैसे आणि वेळ खर्च करण्याची गोष्ट आहे - आणि वडील अनेक पुस्तके आलेले साहित्यिक आहेत म्हणून अनुभवा ने सांगत आहे . १९९९ ला माझे एक पुस्तक आले होते आनि ग्रँथाली असल्याने ३ वर्षात मला पैसे मिळाले २२०० रुपये! त्या काळात इंग्लिश पेपर मध्ये एक कलीग लिहायचा त्याला काहीतरी दीड हजार मिळायचे
इंग्लिश मेडिया मध्ये मराठी च्या दुप्पट / तिप्पट पगार आहेत
त्यामुळे परवडत असेल तर मराठी माध्यमात घालू नका

Pages