शाळा कशी निवडावी ???

Submitted by अमोल कुलकर्णी on 21 June, 2010 - 13:52

सियोना आता दिड वर्षाची झाली. आता ती पुढच्या वर्षी शाळेत जायला लागणार. कसे पटापट दिवस जातात कळतच नाही. असे विचार चालू असतानाच, एकदम क्विक फ्लॅशबॅक मध्ये गेलं मनं ..... डॉ. दाबकेंनी पहिल्यांदा हातात दिलेलं एवढसं पिल्लू, पाळण्यातलं पिल्लू, कुस बदलायला लागलेलं, पालथं पडायला लागलेलं, रांगायला लागलेलं, बेबी स्टेपस् टाकत हळूहळू चालायला लागलेलं पिल्लू, एक एक शब्द ऐकून किंवा स्व्तःच कुठलातरी शब्द तयार करून बोलायला लागलेलं पिल्लू ........ असं सगळं डोळ्यासमोरून जातं होतं आणि एकदम मूळ विचारात परत आलो ...... हेच ते माझं छोटसं पिल्लू आता शाळेत जाणार ...... Happy
हा विचार करुन खुपच वेगळ वाटत होतं, पण एकदम मस्त वाटत होतं. आता काही जणं म्हणतील ह्यात काय ते वेगळं, मस्त वाटायचंय, सगळीचं मुलं शाळेत जातात, आमची मुलं नाही गेली शाळेत .... पण माझ्याकरता हे प्रथमच होतं ना ..... आलं मला एकदम वेगळं फिलींग .....

तर आता माझी सिनू शाळेत जाणारं ..... मग ठिक आहे ना ..... एखादी चांगली शाळा बघू आणि अ‍ॅडमिशन घेऊ. त्यात काय एवढं ....... हे बोलताना सोपं वाटलं पण नंतर मित्र मैत्रिण, नातेवाईक, शेजारी पाजारी ह्यांचे ह्या बाबतीतले अनुभव ऐकले तर जाणवलं ...... खरचं जरा विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागणार शाळेचा.
आणि मग माझी विचारचक्र सुरु झाली, शाळा कशी निवडावी ..... सियोनाला कुठल्या शाळेत घालावं .....
विचार करता करता ह्यावर अजुन काही लोकांचे अनुभव जाणून घ्यावे असं वाटलं, तेंव्हा मायबोली वर मंजीचा (मंजिरी सोमणचा) लेख वाचत होतो, 'परिक्षा असाव्यात की नसाव्यात' आणि तेंव्हा सुचलं, अरे यार ..... इथे मायबोलीवर रोज इतक्या लोकांशी बोललं जातं, अनेकांचे लेख, विचार वाचले जातात ..... आपल्या मनातले विचार इथे मांडून बघू. मायबोलीकरांचे अनुभव ऐकून नक्कीच आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायला मदत होईल. Happy

तर, शाळा कशी निवडावी .....
पहिला विचार आला तो, सियोना आत्ता तर दिड वर्षाची आहे, अजुन एक ते सव्वा वर्ष आहे तिला शाळेत जायला. पन त्याआधी तिला शाळेची ओळख करुन द्यायला, प्री स्कूल मध्ये तर घालावं लागेलच ना. तर पहिला प्रश्न .....

(१) प्री स्कूल साठी कुठे ? .....
ह्या बाबतीत मला वाटतं, आपल्या घराजवळची एखादी घरगुती स्वरुपात असलेली शाळा असावी. जिथे मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण होईल, शाळेतल्या वातावरणाची ओळख होईल.
आजकाल अशी प्री स्कूल्स् सुध्दा खुप निघाल्या आहेत. त्यातल्या एका प्री स्कूल मध्ये चौकशी ला गेलो होतो, जे की भारतातील सगळ्यात मोठी प्री स्कूल चेन आहे, असा त्यांचा दावा आहे. शाळेबाबत असे शब्द ऐकताना जरा विचीत्रच वाटलं. तर त्या प्री स्कूल मधल्या बाई म्हणाल्या ...... नाही मिस म्हणायला हवं, मिस म्हणाल्या आमच्या प्री स्कूल मध्ये लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन शिकवलं जात. का माहीत नाही, पण मला ते वातावरण, ते बोलणं एवढं काही रुचलं नाही.
मला वाटलं शाळेची ओळख करुन देणारी ही प्री स्कूल्स् कशी, आपल्या घरात कसं वातावरणं असतं
तशी हवी, तीथे मिस .... मिस .... करण्यापेक्षा आजी किंवा मावशी अशी हाक मारली जावी, तरचं ह्या लहान मुलांमध्ये शाळेबद्दल पहिल्यापासून एक आपुलकीचं नातं निर्माण होईल.

(२) शिक्षणाचे माध्यम .....
हा पण खुप विचार करण्यासारखा प्रश्न वाटतो. खरं तर, कुठल्याही माध्यमातून शिक्षण घेतलं तरी प्रगतीपासून कोणीच रोखु शकत नाही. पण आजकाल, मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याच प्रमाण मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात खुपचं कमी झालयं. आणि त्याला कारणं आहे, मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि तिथलं वातावरणं. खुपच कमी मराठी माध्यमांच्या शाळा त्यांचा पूर्वीचा दर्जा टिकवून आहेत. दुसरं माध्यम, कॉन्व्हेंट .... तिथला प्रॉब्लेम वेगळाच वाटतो. तिथली संस्कृती आणि संस्कार आपल्या मध्यमवर्गातल्या लोकांपेक्षा खुपच भिन्न वाटते. म्हणजे, घरी एक वातावरण असतं, मराठमोळं ही म्हणू शकता आणि शाळेत एकदम त्याच्या विरुध्द. मला असं वाटतं अश्या परस्परविरोधी वातावरणाचा मुलांच्या विचारसरणीवर खुप फरक पडतो. ह्या सगळ्याचा विचार करता, इंग्लिश माध्यमाच्या शाळांचा पर्याय योग्य वाटतो.

(३) SSC / CBSE / ICSE Board .....
कुठल्या बोर्डात मुलं शिकणारं .... खरचं फरक पडतो का ह्यानी .... असं म्हणतात, SSC पेक्षा इतर बोर्डातली मुलं दोन वर्ष अ‍ॅडव्हान्स शिकतात, ज्याचा की त्यांना नंतर खुप फायदा होतो. पण फायदा, in terms of what, परीक्षेत मिळणारे मार्कसच ना .... म्हणजे परत आपण मुलांना त्याच rat race मध्ये धावायला भागं पाडतोय, परीक्षार्थी बनवतोय, विद्यार्थी नव्हे. मला असं वाटतं की कुठल्याही बोर्डाच्या शाळेत मुलं गेली तरी त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये काही फरक पडत नाही.

(४) वर्गातल्या मुलांची संख्या .....
काही शाळांमध्ये एका वर्गात ६० मुलं असतात तर काही शाळांमध्ये २० च मुलं असतात. कमी मुलं असतील तर खरचं काही फरक पडतो का?

(५) शाळेत फक्त अभ्यास .... का .... अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकास करणारी शाळा .....
आजकाल सगळ्याच शाळांमध्ये अभ्यासाबरोबर इतर काही उपक्रम (activities) राबवल्या जातात. पण काही शाळांमध्ये ते नुसतेच राबवायचे म्हणून राबवले जातात .... फोकस वाटत नाहीत किंवा प्रत्येक मुलाची आवड बघून त्यांचे समान आवडीच्या मुलांबरोबर ग्रुप करुन त्यांना ती अ‍ॅक्टीव्हीटी दिली पाहीजे. ह्यात शाळांची आणि शिक्षांची काही प्रॅक्टीकल डिफीकल्टी पण असू शकते. मुलांचा सर्वांगीण विकास करणारी, फक्त अभ्यासाचा बाऊ न करणारी, ढेर सारा घ. अ.; होम वर्क न देणारी, फक्त अभ्यासात बांधून न ठेवता अभ्यासाबरोबर मुलांच्या कला, क्रीडा अशा गुणांना वाव देणारी शाळा पाहीजे.

(६) शाळा घराजवळ असावी का? .....
मला हा खुप महत्वाचा विषय वाटतो. मी आणि माझी बायको दोघही दिवसभर ऑफिसमध्ये असतो. माझा बिझनेस आहे आणि ऑफिस पण घराजवळ आहे, त्यामुळे सियोनाला शाळेत सोडणं, घेऊन येणं सहज शक्य आहे. माझे आई बाबा माझ्या घराजवळच राहतात. त्यामुळे वाटतं शाळा घराजवळ असेल तर सियोनाला तिचे आजी आजोबा पण कधीतरी आणू शकतात.
आता शाळा घराजवळ नसेल तर मुलांना व्हॅन किंवा स्कूल बस मधून पाठवण्याशिवाय पर्याय नाही.
पण ते थोडफार मला पटत नाही कारण की आजकाल पुण्यात ट्रॅफिक एवढं असतं की जाऊन, येऊन जर दोन तास मुलं प्रवास करणार तर दमून जाणार. दुसरं, व्हॅनमध्ये मुलं शांत काही बसत नाहीत, दंगा करत राहतात आणि व्हॅनकाका ते प्रत्येक वेळेस गाडी चालवता चालवता कंट्रोल करु शकत नाहीत. परवाच ह्याबद्दल दोन घटना ऐकल्या त्या अश्या.
एका ५- ६ वर्षाच्या मुलीला व्हॅन मधल्या मुलांनी खेळता खेळता इतकं मारलं की तिच रक्त साखाळलं. व्हॅन मधली सगळी मुलं त्याच वयाची, कुठल्यातरी छोट्या कारणावरुन सुरुवात झाली आणि २-३ मुला मुलींनी मिळून त्या मुलीला CID आणि कार्टून नेटवर्क बघून त्या स्टाईलनी मारलं. ( सध्याच्या लहान मुलांचा आवडता कार्यक्रम कुठला तर CID. )
दुसरा किस्सा. माझ्या मैत्रिणीच्या मुलीबाबत घडलेला. तिचा शाळेचा आणि व्हॅन मधून शाळेत जाण्याचा पहिलाच दिवस. ती शाळेत व्यवस्थित गेली पण येताना तिला तीचे व्हॅनकाका शाळेतून घ्यायला विसरुन गेले. किती हा निष्काळजीपणा. नंतर एका तासानी फोनाफोनी झाल्यावर ती मुलगी व्यवस्थित घरी आली पण तो एक तास त्या मुलीला आणि तिच्या पालकांना किती टेंन्शन.
अर्थात प्रत्येक वेळेस असचं काही घडेल असं काही नाही, पण असे काही किस्से ऐकले की घराजवळचं शाळा असेल तर जास्त बरं राहील का असा विचार येतो.

(७) ऑफिस टायमिंगवाली शाळा .....
काही शाळांच्या वेळा ऑफिसच्या वेळांप्रमाणे असतात, सकाळी ९ ते संध्याकाळी ६. खरं तर, ज्यांच्या घरी आई बाबा दोघही नोकरी करतात, त्यांच्या दृष्टीने ही खुपच फायद्याची गोष्ट आहे. आधी शाळा आणि मग पाळणाघर, दोन्ही ठिकाणी त्यांची ने-आण करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ती मुलं जास्त सुरक्षित राहतात. बरं, इथे ब्रेकफास्ट, लंच, मुलांना दुपारी थोडी रेस्ट अश्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यामुळे अशी शाळा खरचं विभक्त कुटूंब पध्द्तीत आणि जिथे आई बाबा दोघही नोकरी करत असतील त्यांना फायद्याची.
पण, दुसरा विचार असा येतो की, मुलं सकाळी ९ ला शाळा म्हणजे घरातून ८ ला बाहेर पडणार आणि शाळा सुटल्यावर परत घरी यायला त्यांना ६ - ७ वाजणार. त्यांना शाळा हेच जगं. किती मेकॅनिकल लाईफ होत असेल त्यांच. आणि घरी आल्यावर पण आई बाबा त्यांच्या कामात व्यस्त मग ही मुलं घरात संवाद न साधता टी.व्ही. पाहात बसणारं.
त्यापेक्षा नेहमीप्रमाणे ६ तासांची शाळा असेल तर, मुलं थोडा वेळ पाळणाघरात, किंवा घराच्याइथे खाली इतर मुलांबरोबर खेळू शकतात. त्यांची एखादी आवड, एखादी कला, एखादा छंद जोपासू शकतात. आठवड्यातून २ -३ दिवस संध्याकाळी संगीत, चित्रकला असं काहितरी शिकू शकतात. महत्वाचं म्हणजे, शाळा आणि घराव्यतिरीक्त एक वेगळं जगं निर्माण करु शकतात.
सो, ऑफिस टायमिंगप्रमाणे असलेल्या शाळेत ५ - ६ वर्षाच्या मुलाला पाठवून, लहानपणापासून त्याला मेकॅनिकल लाईफ जगायला लावायचे का?

(८) फी, डोनेशन आणि त्याव्यतीरिक्त पण अजून काही पैसे काढू शाळा .....
सध्या शाळांच्या फीज् ऐकल्या की असं वाटतं, अरे पहिलीतल्या मुलाची एका वर्षाची फी ३० ते ३५ हजार रुपये. बरं बाकीचा खर्च वेगळाचं. मी माझा १ ली ते १२ वी पर्यंतचा शाळेचा सगळा खर्च, फी, युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या काढला तरी तो एवढा येणार नाही. Happy
बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पहिल्या वेळेस अ‍ॅडमिशन घेताना डोनेशन नावचं एक गोंडस शब्द सांगून पालकांना लुबाडणे. मग न राहावून वाटतं, आता शाळा हा सुध्दा एक धंदा झाला आहे का ???

(९) पालकांचा इंटरव्ह्यू .... पालक पास तर मुलं पास .....
हे एक नविनच आहे ना .... म्हणजे तसं आता हे जुनं झालं, पण माझ्याकरता पहिल्यांदाच ना, मग नविनच.
हे परीक्षा, इंटरव्ह्यू ह्या सगळ्याचा जाम कंटाळा येतो मला तर. जाम वैताग. अरे इतकी वर्षा ते झालं ना, आता दोन वर्षाच्या मुलीच्या अ‍ॅड्मिशनला कसला इंटरव्ह्यू घेता. आधी आई बाबांचा इंटरव्ह्यू घेणार, मग त्या दोन वर्षाच्या मुलीचा, मग लिस्ट लावणार आणि त्यात नावं आलं तर अ‍ॅडमिशन.

असे अनेक प्रश्न डोक्यात चालू आहेत. ह्या सगळ्याचा विचार करून मी अती विचार करतोय का ?? ..... इथे माबो वर खुप अनुभवी पालक आहेत, तसेच काही शिक्षक देखील असतील त्यांची ह्या बाबतीतली मतं आणि प्रतिसाद जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. Happy

ह्या माझ्या विचारांमध्ये नक्कीच काही गोष्टींचा विचार झाला नसेल, काही बाजू माझ्याकडून चुकीच्या पध्द्तीने पण मांडल्या गेल्या असतील, तरी ते माझ्या जरूर लक्षात आणून द्यावे.

कुठलीही शाळा, शिक्षणपध्द्ती किंवा शिक्षक कधीच वाईट नसतात आणि ते ठरवण्याचा आधिकार माझा नव्हे. तरी ह्या लिखाणामध्ये कुठल्याही शाळेबद्दल, शिक्षणपध्दतीबद्दल किंवा शिक्षकवर्गाबद्द्ल जर काही चुकीचे लिहीले गेले असेल तर त्या सर्वांची विनम्र माफी.

माबोकरांचे अनुभव, सल्ले आणि अजुन काही गोष्टी असतील ज्यांचा माझ्याकडून विचार झाला नसेल, तर हे सगळं ऐकण्यास मी उत्सुक आहे. Happy

गुलमोहर: 

.

शाळा घराजवळ असावी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे..... पटकन कधी शाळेतून फोन येतो, पाल्य आजारी आहे, घेऊन जा, अशावेळी लांब शाळा सोयीची होत नाही. आणि शेवटी कुठल्या शा़ळेत शिकला यापेक्षा त्याला किती नी काय आकलन झालं हे महत्त्वाचं......
अजून विचार करून अभिप्राय कळवीन Happy

धन्यवाद मंजे ..... तुझ्या सूचना, अभिप्राय, सल्ले ह्यांचा मी जरुर विचार करीन. Wink आणि हा छोटासा प्रतिसाद ... मला वाटलं तुझ्याकडून भलामोठा निबंध येईल. सध्या तू शाळा ह्या विषयावर जबरी फॉर्मात आहेस ना. Wink

अमोल, माझ्या मनातले नेमके विचार (अगदी शब्दन् शब्द) तू मांडलेस इथे. मी आणि मोदक या विषयावर चर्चा करू लागलो की नेमके हेच मुद्दे येतात फिरून फिरून. माझं पिल्लू अजून ९च महिन्यांचं आहे. पण २ एक वर्षांनी आम्ही ही याच फेज मधून जात असू. आणि माझ्याही मनात अगदी अशाच प्रकारचा एक बाफ सुरु करण्याची आयडीया आली होती. पण अजून घाई नाही म्हणून थांबले होते. आता तू चालू केलाच आहेस तर मला पण सर्वांचे प्रतिसाद जाणून घ्यायचेत. जेणेकरून आम्हाला पण आमची मनोभुमिका ठरवण्यासाठी मदत होईल. Happy

मंजीच्या बाफ वर पण प्रतिसाद द्यायचा राहून गेलाय माझा. पण परिक्षा वगैरे नंतरच भाग आहे. आधी शाळा कोणती व कशी याच मुद्द्यावर गाडी अडकली आहे माझी. म्हणून मंजीच्या बाफ वर माझ्या डोक्यात अजून विचार प्रक्रिया चालू झाली नाही. Uhoh

मांडलेच आहेस की तू पुरेसे मुद्दे Happy

१) घर -शाळा अंतर किती?
२) माध्यम
३) ने आण करायची सोय
४) डोनेशन, फी स्ट्रक्चर
५) मुलांच्या संख्येने फरक पडतो. ६० मुलांचा एक वर्ग १ शिक्षिका १ तासिका किती अटेंशन देऊ शकेल? आणि त्यापेक्षा कमी असतील तर किती?
६) शाळा कोणत्या भागात आहे. (हे मुद्दाम लिहायचं कारण माझ्या गावातल्या काही शाळा ह्या नाल्याच्या (ज्यात कंपनीची रसायनं सोडली जातात) जवळ आहेत. तिथे केमिकलच्या वासाने मोठ्यांचाच जीव हैराण होतो. मुलांना सवय होते म्हणतात पण आपण ती सवय करायची की दुसरा पर्याय निवडायचा हे आपण ठरवायचं)
७) कधी कधी नुसत्या नावावर जाऊ नये. नाव मोठ लक्षण खोट असाही अनुभव येऊ शकतो.
८) प्रत्येक शाळेचे काही प्लस मायनस पॉईंट्स असणार आपण आपली प्रायॉरिटी ठरवून त्याप्रमाणे एकदा निर्णय घेतला की जे मायनस पॉईंट्स असतील शाळेत ते आपण आपल्या परिने वेळ देऊन भरुन काढायचे.

पोदार (की पोतदार??) इंटरनॅशनल स्कूल छान शाळा आहे असे ऐकले आहे. कल्याण ला हल्लीच निघाली आहे. कुणाला काही अनुभव आहे का?

निंबे ते poddar आहे (पोद्दार/पोड्डार) छान आहे का नाही माहित नाही पण भरपूर पैसे खर्च करावे लागतील अशी आहे हे नक्की Proud तुझी तयारी असेल पैसे खर्चायची तर कल्याण्-डोंबिवलीच्या मधे गुरुकुल स्कूल पण आहे की. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे (जे मुलखतीत त्यांनी सांगितले त्यावरुन सांगतेय) पण फी स्ट्रक्चर भरभक्कम आहे अर्थात poddar पेक्षा कमी असेल

पुण्यातली गुरुकुल पण चांगली आहे असं ऐकलं आहे.... तिथे अभ्यासाव्यतिरीक्त इतर अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज घेतात, पूर्ण दिवसभर असतं.... त्याची चौकशी करायला हरकत नाही तुला अमोल Happy

माझ्या ऑफिस मध्ये एक कलिग आहे. तिचा मुलगा CBSE board वाल्या शाळेत आहे. ४-५ वर्षाचा आहे आता. त्या मैत्रिणीची कामाची शिफ्ट दु. १२ ते रा. ९ किंवा दु. १ ते रा. १० अशी असते. तिचा मुलगा मॉंटेसरीत असतानाचा अनुभव असा की शाळेतून मुलांच्या नोटबुक मध्ये शिक्षक काही ना काही लिहून पाठवतात. "उद्या triangular shape चा टिफिन पाठवा" किंवा "उद्या टिफिन मध्ये ब्रेडचा काही तरी आयटम पाठवा" किंवा "उद्या टिफिन मध्ये sprouts पाठवा" किंवा तत्सम काही तरी सूचना असतात. ही मैत्रिण सेपरेट फॅमिलीत राहते. त्यामुळे घर आणि मुलगा यांच्या देख्भालीसाठी घरी मेड ठेवली आहे. जी गावाकडून आणलेली बाई आहे. तिच्या मराठी वाचण्याचे सुद्धा वांदे आहेत तिथे मुलाच्या नोटबुक मध्ये लिहिलेले english ती बाई काय वाचणार!!! मग ही मैत्रिण रात्री १० नंतर घरी पोचली की मुलाच्या नोटबुक मध्ये पहाणार आज काय वाढून (आय मीन लिहून Wink ) ठेवलंय. ऐन वेळी उद्याच्या डब्यासाठी सांगितलेले उत्पन्न कुठून कराय्चे असा यक्ष प्रश्न पडतो तिला. Sad आणि सांगितलेले आणले नाही (म्हणजे डब्यात काही दुसरे घालून पाठवले) तर शाळेत मुलाला डबा खाऊ देत नाहीत म्हणे. Uhoh

आणि बरे एकत्र फॅमिली असली तरी मुलाचे आई-बाबा ऑफिसला असताना आजी-आजोबांच्या पिढीतले या सगळ्याला कसे कोप्-अप करू शकतील प्रश्नच आहे. Uhoh

http://www.maayboli.com/node/8609 हा धागा वाचून पहा, अतिशय उपयुक्त चर्चा आहे.

http://www.maayboli.com/node/7805 हा धागा अगदी शाळेशी संबंधित नाही पण निर्णय घेण्यासाठी काही मुद्दे पुरवू शकेल.

ह्या प्रश्नावर चर्चा अपेक्षित असेल तर हा धागा http://www.maayboli.com/node/2600 इथे हलवा.

पुण्यात रविशंकर यांची (तेच ते श्री श्री रविशंकर) शाळा चांगली आहे असं ऐकलेलं मध्यंतरी(गुरुकुलच का?)
तिथे म्हणे मंडई वगैरे भरते, मग मुलांनी स्वतः आकडेमोड करायची आणि आपली आपली भाजी विकत घ्यायची असले काय काय प्रकार असतात..

माझी ती मैत्रिण म्हणते की CBSE board मध्ये २ वर्षे पुढचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे मुले स्मार्ट होतात हे तर खरेच. पण त्या मुलांचा अभ्यास घ्यायला बसलो तर मुलेच आपला अभ्यास घेतात. कारण आपल्या लहानपणी आपण जे आणि जसे शिकलो त्यापेक्षा यांची शिक्षण पद्धती यात vast difference आहे. त्यांच्या अभ्यासातलं म्हणे मला ओ की ठो कळत नाही. Uhoh

आमच्या फॅमिलीत कुणी इतकं लहान नाहीये सध्या त्यामुळे हल्लीच्या शिक्षण पद्धतीत कशा टाईपचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे मला काही आयडीया नाहिये. पण माझी मैत्रिण म्हणते त्याप्रमाणे खरंच खूप कठिण आणि आपल्या सारख्या corporate world मध्ये वावरणार्‍या पालकांच्या पण आकलनापलीकडे खरंच आहे का गेलेलं सगळं ?? Uhoh

निंबुडे, माझ्या घरी ये तुला पहिली दुसरीची cbsc वाली maths, english, science ची पुस्तक आणि jr sr kg ची state board वाली पुस्तक दाखवते Proud

मलातरी खूप फरक नाही वाटला. (अजून तरी) CBSC असली तरी तिला मराठी विषय १ ली पासून आहे. प्रोजेक्ट्स फार नाहीत, आहेत ते त्यांना झेपतील तेच आहेत. डबा शाळेतूनच देतात ४थी पर्यंत त्यामूळे आज हे पाठवा, उद्या ते हा प्रकारच नाही. जे मुलं खातात तेच शिक्षक खातात.

पोदार (की पोतदार??) इंटरनॅशनल स्कूल छान शाळा आहे असे ऐकले आहे. >>>> निंबे, खरचं छान आहे ती शाळा. पण, कवे च्या म्हणण्याप्रमाणे महाग पण आहे.

सांगितलेले आणले नाही (म्हणजे डब्यात काही दुसरे घालून पाठवले) तर शाळेत मुलाला डबा खाऊ देत नाहीत म्हणे >>>>> निंबे, अश्या शाळेत माझ्या मुलीला मी घातले आणि तिच्या बाबतीत असं काही झालं तर माझी त्या शाळेत रोज भांडण होतील. Happy ..... अरे हा कसला अत्याचार ......

पुण्यात रविशंकर यांची (तेच ते श्री श्री रविशंकर) शाळा चांगली आहे. >>>> नानबा ती शाळा खरचं चांगली आहे पण तिथे एकच प्रॉब्लेम आहे, तिथे सांगतात काहीही झालं तरी मुलांना ओरडायचं नाही, मारायचं नाही, डोळे मोठे करुन बोलायचं नाही, शाळेत आणि घरी सुध्दा. माझ्या एका मैत्रिणीने शेवटी तिच्या मुलाची शाळा बदलली. कारण कितीही ठरवलं तरी शेवटी घरी कधी ना कधी तरी मुलांना ओरडावं लागतचं ना.

पुण्यातली गुरुकुल पण चांगली आहे असं ऐकलं आहे.... तिथे अभ्यासाव्यतिरीक्त इतर अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज घेतात, पूर्ण दिवसभर असतं.... >>>>> मंजे, गुरुकुल शाळा चांगलीच आहे ग .... पण एक तर ती शाळा माझ्या घरापासून खूप लांब आहे आणि दुसरं शाळेचं टायमिंग .... १ ली पासूनच ९ ते ६ .... म्हणजे .... सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पोरगी बाहेर.

कवे, राधाच्या शा़ळेत तर ९वी पर्यंत शाळेतच डब्याची सोय आहे..... आणि चांगले न्युट्रीशस पदार्थ देतात, थालिपीठ, डोसा, उत्तप्पा, इडली, परोठा, पोळी-भाजी, भाताचे प्रकार ते फार सोयीचं पडतं म्हणजे मुलं घरी येऊन गपगुमान जेवतात Happy आणि सकाळी डब्याची घाई पण होत नाही. पुण्यातल्या बहुतेक सगळ्या शाळांमधून आता ही प्रॅक्टिस सुरू केली आहे.

आणि सकाळी डब्याची घाई पण होत नाही. >>>> मंजे, म्हणजे आयांना पण बरं ना Happy ..... आणि तरीच तू माबो वर पडिक असतेस तर ..... Wink

मुलांच्या वडिलांनी अंथरुणात लोळत पडण्यापेक्षा फक्त मुलांची तयारी करायची जबाबदारी घेतली ना तर सगळ्या आयांना वरण भात पोळी भाजी असा चार खणी डबा मुलांना देता येईल हो Wink

मंजू, तुला २००% अनुमोदन आणि १०० मोदकांचं ताट Happy याबाबतीत माझ्या नवर्‍याला मी विश्वेश कडे (कवीच्या नवर्‍याकडे) शिकवणीला पाठवणार आहे. Proud

चांगला बाफ आहे.

सध्या तरी मी लेकीला (२ वर्षे ४ महिने) रेनबो नावाच्या प्री-स्कूलमध्ये ( १व. ८ महिनेपासून) पाठवते. तिला शाळा आवडते. (मिस आणि टिचर असूनही) शाळेत ती रंग ओळखणे, मनाविरूद्ध काही झाले की किंचाळणे, ऑथरीटिव आवाजात काही सांगितलं तर ऐकणे, खूप सगळ्या पोएम्स, १ ते १० आकडे तोंडी, निरनिराळ्या प्रकारचे रंगकाम आणि रेघोट्या मारणे एवढे शिकलीये. ह्या शाळेत येणारी बरीच मुले आमच्या वर्गातली नाहीयेत. म्हणजे आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, वै. (वार्षिक फी २१,०००/- खाऊ धरून)

पुढच्या वर्षी मला नर्सरीपासून कुठची तरी एक शाळा निवडावी लागेल. माझ्या मनात मूळ काही प्रश्ण आहेत ते कुठचे बोर्ड बरे ह्या बद्दल. माझे नविन घर सगळ्या प्रकारच्या बोर्डंच्या शाळांपासून १५ मि अंतरावर आहे. त्यामुळे जिथे ती रमेल आणि जो अभ्यास्क्रम तिला झेपेल अश्या शाळेत घालावेसे वाटते.

ठाण्यात पोखरण रोड १/२ च्या आसपासच्या डी.ए.व्ही., वसंत विहार, जेके, लोकपुरम, हिरानंदानी अश्या शाळांबद्दल कोणाला काही अनुभव आहेत काय?

नक्कीच चांगला बाफ आहे.
पण अमोल तुम्ही तर इतका सारा विचार ,तोही इतक्य आधी ..! वा !
मला तर अस वाटतं की आपली मुलं कोणत्या शाळेत शिकली,किती फी भरली... हे जरी महत्वाच असलं तरी आयुष्यात ताठ मानेन जगायला,लढायला बळ देणारं शिक्षण हे तुमच्या घरच्या संस्कारात, शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जास्त मिळत !

जाजू, माझी मुलगी वसंत विहारला ज्युनिअर केजीला आहे. मी त्या शाळेबद्दल पूर्ण समाधानी आहे. तुला काही विचारायचं असेल तर संपर्कमधून मला मेल टाक. Happy

मी माझ्या पोराला जवळच्याच एका घरगुती नर्सरीमध्ये घातले आहे. विशेष म्हणजे मी या नर्सरीचा पहिला विद्यार्थी होतो. आणि अजूनही त्याच बाई चालवतात. त्यामुळे मी एकदम निर्धास्त होतो. पोरग्यालाही ती शाळा जाम आवडली आहे. विशेष म्हणजे तिथे ब्रेड-बटर, बिस्किटे असा खाऊ देण्यापेक्षा वेगवेगळ्या भाज्या, उसळी, पोळी-भाकरी असा डबा देण्यासाठी सांगितले जाते आणि एकमेकांच्या नादाने ही मुले खातातही. खरोखर मुलांमध्ये फार फरक पडतो या गोष्टीमुळे.
आता तो अडीच वर्षांचा झाला आहे. पुढच्या वर्षी त्याला मान्यताप्राप्त शाळेत घालावे लागणार याचे टेन्शन आहे.
घरापासून जवळ, इंग्लिश माध्यम, आणि कमी खर्चिक असा क्रम लावल्यानंतर खूपच कमी ऑप्शन उरतायत.
मला विचारायचे आहे, सध्या होमलर्निंग प्रकाराचा मोठा प्रसार सुरू आहे. त्याचा फायदा सगळेजण सांगत आहेत. त्याचे तोटे कोणाला माहिती आहेत का.

Pages