लता revisited...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

२० वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये, लतादीदींचा साठावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
'महाराष्ट्र टाईम्स' तर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या वक्तृत्व स्पर्धेत त्या वर्षी विषय होता - आमच्या मनातील लता मंगेशकर. निमित्त होतं अर्थातच लताबाईंच्या साठाव्या वाढदिवसाचं.
एका शाळकरी मुलीनं ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. हे भाषण तयार करण्याच्या निमित्तानं तिनं सगळ्या वर्तमानपत्रातून छापून आलेले 'लता मंगेशकर' हा शब्द असलेले सगळे लेख वाचले. पुस्तकं वाचली. घरी आई-वडीलांशी, मोठ्या बहिणीशी, शाळेत शिक्षकांशी, मित्र-मैत्रीणींशी ह्या विषयावर गप्पा मारल्या, त्यांना खूप प्रश्ण विचारले.... ह्या सगळ्या वाचनातून, गप्पांमधून तिला 'तिच्या मनातली लता मंगेशकर' शोधून काढायची होती... शब्दातून साकार करायची होती.

'महाराष्ट्र टाईम्स' च्या ह्या स्पर्धेत तिला पहिलं बक्षिस मिळालं नाही.... तिला तिसरं बक्षिस मिळालं, पण त्याच जोडीला तिला अजून एक खास बक्षिस मिळालं. परिक्षकांनी दिलेली " ह्या मुलीच्या मनातली लता मंगेशकर तिच्या मनातली होती, तिच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मनातली नव्हती" ही त्यांच्या भाषणातून दिलेली पावती, आणि तिच्या हाताच्या छोट्याश्या मुठीत ठेवलेली ५ रूपयांची नोट.

ह्या खास बक्षिसाची किंमत, त्या शब्दांचा अर्थ तिला तेव्हा किती कळला माहित नाही... पण आजही परिक्षकांचे ते शब्द आणि ती ५ रूपयांची नोट तिच्याकडे जपून ठेवलेली आहे, आणि त्या शब्दांची, त्या बक्षिसाची किंमत आज तिच्यासाठी 'अमूल्य' आहे.

शाळकरी वय सरलं... वाढत्या वयाबरोबर, अनुभवांबरोबर जाणीवा बदलल्या, समज बदलली...
संगीत, गाणी, चित्रपट ह्यावर ती भरभरून प्रेम करू लागली, त्याबद्दल विचार करू लागली... तिच्या जगण्याचा तो एक अविभाज्य भाग बनला. इतर संगीतकार, गायक, कवी ह्यांच्या जोडीनं ह्या सगळ्या प्रवासात 'लताही' तिला अनेकदा भेटली...वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या परिस्थीतीत, वेगवेगळ्या वयात 'लता' समोर तिच्या समोर आली आणि दरवेळी तिनं नव्या जोमानं विचार करायला भाग पाडलं.
जेव्हा जेव्हा तिला लता पुसटशी का होईना दिसली, जाणवली...तेव्हा तेव्हा तिला परिक्षकांच्या " ह्या मुलीच्या मनातली लता मंगेशकर तिच्या मनातली होती, तिच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मनातली नव्हती" या शब्दांची आठवण झाली... आज २० वर्ष झाली ती मुलगी 'लताच्या प्रत्येक भेटीतून' ह्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतीये.

मे २०१०... नुकतीच एका व्यक्तीने त्या लहानश्या मुलीच्या २० वर्षापूर्वीच्या त्या भाषणाची तिला आठवण करून दिली. 'महाराष्ट्र टाइम्सला लतावरती तूच बोलली होतीस ना.. तुझं ते लतावरचं भाषण...धीटपणानं शब्दांतून आणि डोळ्यातूनही - तुझ्या मनातली लता व्यक्त करणारी तू... मला लताची गाणी ऐकताना अनेकदा आठवण होते तुझ्या त्या भाषणाची'.
..... आता हे शब्द ऐकणा-या तिच्या चेह-यावर आणि डोळ्यातही अविश्वास... २० वर्षापूर्वीचं ते भाषण कोणाच्यातरी अजूनही लक्षात आहे...my god.. तिला केवळ आणि केवळ आश्चर्यच वाटतंय....

ती आता २० वर्षापूर्वीच्या, त्या शाळकरी वयातल्या तिच्या मनातली लता मंगेशकर आठवायचा प्रयत्न करतीये. आता तिची तिलाच गंमत वाटतीये. तिला जाणवतंय की स्मरणशक्तीला थोडा ताण दिला तर परत एकदा नव्यानं तिच्या डोळ्यासमोर तेव्हाची तिच्या मनातली लता हळुहळू साकारतीये... २० वर्षांनी 'ती लता' तिला आज परत भेटतीये !!
...............................................

माननीय परिक्षक, आदरणीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रीणींनो. माझा आजचा विषय आहे 'आमच्या मनातील लता मंगेशकर'.
"लताचा आवाज हा मानवी ध्वनींच्या सृष्टीतला अद्भूत चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रूणझुण आणि कृष्णाच्या मुरलीची साद हे सगळं एकवटून विधात्याने लताचा कंठ घडवला असला पाहिजे"

श्रोतेहो, हे उद्गार आहेत महाराष्ट्राचे लाडके लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांचे आणि अर्थातच ज्या व्यक्तीविषयी हे उद्गार काढले आहेत ती व्यक्ती म्हणजे तुमच्या, माझ्या सगळ्यांच्या हृदयाचा आपल्या सूरांनी ठाव घेणारी लता मंगेशकर.

लता मंगेशकर.. आमच्या मनातली लता मंगेशकर.. हे शब्द उच्चारताच लताबाईंची, अगदी घरगुती भाषेत बोलायचं झालं तर लतादीदींची अनेक रूपं डोळ्यासमोर उभी राहतात.

बलवंत संगीत मंडळींचे मालक दिनानाथराव मंगेशकर यांची ही थोरली मुलगी. बालपणचा काही काळ अगदी सुखात गेला आणि अचानक नियतीची मर्जी फिरली. दिनानाथरावांचा अकाली मृत्यू झाला आणि मंगेशकर कुटुंबावर अक्षरशः दुर्दैवाचे दशावतार भोगण्याचा प्रसंग आला.
ज्या वयात भातुकली खेळायची, चिंचा आवळे यांची आंबट चव चाखायची, दंगामस्ती करायची, मोठ्यांकडून लाड करून घ्यायचे त्या वयात सगळ्या भावंडांची, कुटुंबाची जबाबदारी छोट्या लतावर येऊन पडली. लहानशी लता केवळ एकाच आधारावर हा भार पेलत होती. तो आधार म्हणजे वडिलांनी दिलेल्या सुरांचा.. मागं ठेवलेल्या तानपु-याचा !

ज्या घरात एका वेळी तीस-तीस माणसं पंचपक्वानांचं जेवण जेवायची त्याच घरात वडिलांच्या मृत्यूनंतर चणे, मुरमुरे आणि पाणी पिऊन पोट भरायचे दिवस आले. लतादिदीची धाकटी बहिण, गायिका आशाताई त्या वेळच्या परिस्थितीबद्दल म्हणतात - " आमचे बाबा गेले तेव्हा आम्ही निराधार झालो असं वाटलंच नाही कारण आमचे दुसरे फक्त १३ वर्षाचे बाबा, परकर-पोलकं नेसून आम्हाला सांभाळायला सज्ज होते".
माझ्याच वयाच्या लहानश्या मुलीला इतकी समज कशी आली असेल? माझ्या मनातली लता मंगेशकर माझ्याच वयाची असली तरी पण खूप मोठी झालीये ती तिच्या बालपणीच्या वडिलपणानं !

मग इतकी जबाबदारी सांभाळणा-या लतालादीदींना कधी मस्ती करावीशी वाटली असेल का? दंगा करायला मिळाला असेल का? लताबाईंबद्दल विचार करताना माझ्या मनात ह्याविषयी खूप कुतुहल आहे.

इतकं खडतर आयुष्य जगत असतानाही लताबाईंनी आपला खोडकरपणा, मिश्कीलपणा, वाचनाची खेळाची आवड आणि स्वाभिमान कधीच सोडला नाही. मला लतादीदी जवळच्या वाटतात ते यासाठी.
कितीतरी उदाहरणं देता येतील त्यांच्या खोडकरपणाची, मिस्कील स्वभावाची. अगदी लतादीदींच्याच शब्दात सांगायचं म्हणजे " मास्टर विनायकांपुढे मी अगदी देवासारखी गप्प बसून राही. पण इतर वेळी माझ्या इतक्या खोड्या चालत की देवसुद्धा मला गप्प करू शकला नसता".

लताबाई खोडकर होत्या पण त्यांच्या खोड्यांमधे पण एक प्रकारची कल्पकता होती.
मास्टर विनायकांकडे स.अ. शुक्ल हे कथा, संवाद गाणी लिहिणारे लेखक आणि ते उतरवून घेणारे ग.दि. माडगूळकर हे लेखनीक. माडगूळकरांचं नाव गजानन आणि आकारही गजाननासारखाच.
स.अ.शुक्ल सांगताहेत आणि माडगूळकर लिहून घेताहेत हे दृष्य छोटी लता नेहेमी बघायची. एके दिवशी हे दोघे खोलीत नसताना लताबाईंनी आपल्या जवळंचं एक चित्र भिंतीवर चिकटवलं. थोड्या वेळानं शुक्ल आणि माडगूळकर आले आणि ते चित्र पाहून पोट धरधरून हसायला लागले. कारण ते चित्रं होतं 'व्यासमुनी महाभारत सांगताहेत आणि गणपती ते उतरवून घेत आहे' असं. या दोन्ही महान कलाकारांनी लहानग्या लताच्या या कल्पक खोडीचं कौतुकचं केलं.

गरीबीतही लताबाईंनी आपला स्वाभिमान कधीही सोडला नाही. कधीकधी या स्वाभिमानाला तलवारीची तिखट धार यायची. विनायकरावांच्या कंपनीत संगीत विभागात एक चुगलखोर माणूस होता. तो कंपनीतल्या लोकांबद्दल खोटंनाटं रचून विनायकरावांना सांगायचा त्यामुळं विनायकराव लोकांना रागवायचे. या माणसामुळे लताबाईंनीही विनायकरावांची अनेकदा बोलणी खाल्ली होती. या माणसाला चांगली अद्दल घडवायचं लतादीदींनी ठरवलं तो दिवस होता नागपंचमीचा. एका वाटीत दुध, चार पाच तांब्याचे पैसे घेऊन फुलं हळदकुंकू घेऊन लता त्या माणसासमोर गेली, हे सगळं साहित्य त्याच्यासमोर ठेवलं आणि गंभीरपणे हात जोडून म्हणाली "आज नागपंचमी आहे. हे दूध पिऊन टाका आणि विनंती करते इकडे तिकडे विष ओकू नका. एवढी आमच्यावर कृपा करा".

आता मला सांगा, आपल्यासारखीच खोड्या करणारी, मुलासारखा ड्रेस घालून भन्नाट वेगानं सायकल चालवणारी, कधीकधी भावंडांना बागुलबुवा दाखवून त्यांच्या चकल्या पळवून खाणारी आणि त्याबद्दल आपल्यासारखीच आईची बोलणी खाणारी लता मंगेशकर तिच्या गाण्याइतकीच तिच्या ह्या स्वभावामुळे आपल्या मनात घर करणार नाही का?

लताबाईंच्या सुराबद्दल, गाण्याबद्दल मी काही बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास किंवा आकाशाला गवसणी घालण्याचा प्रकार आहे.

सारा खेळ पाहात होतं एक माळरान उजाड
उगवलं त्यावर एक गाणारं झाड

मित्रहो, हे गाणारं झाड गेली अनेक वर्ष गातच आहे आणि आपल्याबरोबर इतरांनाही गायला लावत आहे. आकाशाचं वर्णन आपण अथांग, विशाल असं करतो, कधी ते गुढही वाटतं आपल्याला. पण नेमकं आकाश म्हणजे काय हे नाही सांगता येत. माझ्यासाठी लतादीदीचा आवाज हा आकाशासारखा आहे, अथांग, सुंदर, गूढ.. पण तरीही नक्की कसा हे सांगता न येणारा.

अजून गाणं म्हणजे काय? संगीत म्हणजे नक्की काय? हे ही माहित नसलेली मी, बहिणीनं अदालत- अनपढ ची कॅसेट लावली की आपसूकच त्या आवाजाकडे ओढली जाते. मैत्रीणीच्या घरी असलेली आह-आग ची गाणी 'घरचा अभ्यास' लवकरात लवकर संपवून परतपरत ऐकावीशी वाटतात. तुकारामांचे अभंग, ज्ञानेश्वरांच्या रचनांचे अर्थ समजत नसले तरी हे अभंग त्यांनी लतादीदींनी गाण्यासाठीच लिहिले असावेत असं मला वाटत राहतं. शाळेला जाताना उशीर होत असला तरी 'विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला' किंवा 'मुली तू आलीस अपुल्या घरी' ही रेडिओवर लागलेली गाणी संपेपर्यंत घरातून पाय निघत नाही, आणि उशीर झाल्यामुळे दुप्पट वेगानं सायकल हाणतानाही ही गाणी डोक्यातून जात नाहीत.... असा हा लताचा आवाज. बांधून ठेवणारा.

'ए मेरे वतनके लोगो' हे गाणं ऐकून पंडित नेहरूं गहिवरले तर रणमैदानावरून देशासाठी लढणा-या सैनिकांनी लतादीदींना पत्र पाठवली - "लताबाई, तुमच्या गाण्यात आम्हाला आमची घरं दारं दिसतात. नातेवाईकांचे आवाज ऐकू येतात. बाल बच्चांचे बोबडे बोल त्यातून उमटतात आणि त्यात आमचं एकाकीकपण विरून जातं."
मला सांगा, एखाद्यानी त्याच्या गाण्याबद्दल यापेक्षा आणखी कोणतं मोठं बक्षिस, प्रशस्तिपत्रक मिळवायचं बाकी आहे.
थोडक्यात, माझ्यासारख्या संगीतातलं ओ-का-ठो कळत नसणा-यांपासून ते या क्षेत्रातल्या पंडितांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि मनाला मोहून टाकणारा, आपलासा करणारा स्वर म्हणजे लता मंगेशकर.

लताबाईंनी आयुष्यात खूप पैसा मिळवल, किर्ती मिळवली, चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त साम्राज्य उपभोगलं पण त्या आपलं लहानपण, साधेपणा, माणुसकी कधीही विसरल्या नाहीत. आपल्या मैत्रीणीनं बालपणी दिलेल्या कोटाची ऊब त्यांना आजही जाणवते आणि तशीच ऊब वेगवेगळया मार्गांनी त्या समाजाला देण्याचा प्रयत्न करत असतात.
'देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे' हा लताबाईंच्या दातृत्वाचा गुण त्यांच्या सूराइतकाच सच्चा आहे आणि म्हणूनच मनाचा ठाव घेणारा आहे.

'मोगरा फुलला... फुले वेचिता बहरु कळियासि आला' अशा या सुरांनी बहरलेल्या मंगेशकर कुटुंबियांच्या पुण्यात झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. आत मैदानावर जाण्यासाठी लोकांची रेटारेटी आणि पोलिस त्यांना दंडुके उगारून गप्प बसवत होते. लोकांचा आरडाओरडा वाढलेला आणि इतक्यात आसमंतात लताबाईंचे मधुर स्वर निनादले.. बघता बघता सगळा जमाव चित्रासारखा स्तब्ध झाला. जे दंडुक्याच्या धाकाला जमलं नाही ते लताबाईंच्या मधुर सुरांनी साधलं होतं.

आता या सुरांच्या सम्राज्ञीला साठ वर्ष पूर्ण झाली आहेत. एकेकाळी आपल्यासारखीच लहानगी असलेली आपली लतादीदी आता साठ वर्षाची झाली आहे.

इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी

मित्रहो, आज माझ्या मनातली लतादीदी ही माझ्यासारखीच अल्लड आहे, खट्याळ आहे. ती दानशूर आहे तितकीच स्वाभिमानी आहे... स्वरसम्राज्ञी तर आहेच आहे. पण लतादीदीचं हे माझ्या मनातलं चित्रं माझ्या सारखंच 'इवलंसं' आहे. लतादीदीसारखी मी जेव्हा साठ वर्षाची होईन तेव्हा तरी हा 'गगनावेरी गेलेला वेलू' मला दिसावा ही इच्छा, हे स्वप्न मनाशी ठेवून मी माझं भाषण संपवते.

धन्यवाद.
-------------------------------------------
लहानपणीची शाळकरी वयातली लता परत भेटली आज २० वर्षांनी... ह्या भाषणाच्या आठवणीच्या निमित्तानं ती आज परत एकदा शब्दातून उतरली.... तसं पाहायला गेलं तर हे शब्दही आज 'माझे' म्हणता येणार नाहीतच.... ते '२० वर्षापूर्वीच्या त्या शाळकरी मुलीचे' !

हे भाषण आठवत असताना जाणवलं की आज लिहायला/बोलायला सांगितलं लताविषयी तर 'आपल्या मनातली लता' किती वेगळी असेल ना! आता माझ्या विचारात, लिखाणात - लता आणि तिची गाणी असतील कदाचित. त्यातली अदाकारी असेल, त्यातला प्रसंगी डोळ्यातून टचकन पाणी काढणा-या आर्त स्वरात लपेटलेल्या भावना असतील... ही लता माझ्याकडून आज शब्दांत उतरेल.. की ती ही अशीच अजून २०-३० वर्षांनी मला 'revisit' करेल... मी साठ वर्षाची झाल्यावर Happy

(समाप्त)

प्रकार: 

पुढचं सगळं भाषण post करावं का नाही याचा विचार करतीये. समजत नाहीये. २० वर्षापूर्वीचं ते भाषण वाचायला कसं वाटेल लोकांना याचा .. .. !!

जरूर पूर्ण भाषण पोस्ट करा. "लता" हा विषय अमर आहे, त्या स्वर्गीय आवाजासारखाच, त्यामुळे दोन पाने काय दोनशे पाने लिहिली तरी "लता" नावाने वेडे असलेल्या सगळ्यांना ती पर्वणी वाटेल. किती आठवेल तितके लिहा, हवेतर नव्यानेही त्यात भर घाला. इथले सदस्य त्या लिखाणाचे निश्चितच स्वागत करतील.

रार,
लहानपणीची भाषणं हा बीबी सुरु करायचा का :)?
मजा येइल वाचायला.. जी आठवतील ती भाषणं टाकतील सगळे वक्तृत्व स्पर्धां मधली किंवा शाळेत इतर कार्यक्रमात केलेली, इथल्या पालकांनाही उपयोग होईल मुलां साठी भाषणं तयार करण्यासाठी. :).

डीजे, हे संपलं की मी यानंतर लिहिणार आहे ते याच विषयावर. लिहायला सुरुवातही केलीये.
"सन्माननीय परिक्षक आणि रसिक श्रोतेहो..." या नावाचा लेख.
माझ्या वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धां, त्यातली भाषणं आणि अनुभव असं काहीसं Happy
आधी हे पूर्ण करते... मग ते Happy
माझ्या मनात ही सगळी भाषण record करायचा विचार चाललाय... पुढचा project तोच आहे डो़क्यात !
झाला कोणाला उपयोग ह्या अनुभवाचा तर झाला, नाहीतरी आपल्यासाठी आपलं लहानपण परत अनुभवायची एक संधी !
काही दिवसांपूर्वी "आतिथी कब आओगे" पाहताना माझ्या ४थी तल्या "नको ते पाहुणे" भाषणाची आठवण झाली. गंमत वाटेल पण ते भाषण पळवून सिनेमा बनवलाय की काय असं वाटलं पाहताना .. lol..lol.. Happy

रार आणि तिची बहीण शाळेत असताना सगळ्या वक्त्रुत्व स्पर्धांमधे हमखास बक्षिसं मिळवायच्या! "आंतरशालेय - 'रानडे' वक्तृत्व स्पर्धा = रानड्यांची मोनोपली असलेली स्पर्धा असं झालं होतं तेव्हा ! Happy टाक गं इतर भाषणं इथे!

मस्त!

झाला कोणाला उपयोग ह्या अनुभवाचा तर झाला, नाहीतरी आपल्यासाठी आपलं लहानपण परत अनुभवायची एक संधी !
>>>>>>> आमच्या ग्रूप चा स्पर्धा करण्याचा काळ संपल्यावर ' इथे भाषणे तयार करुन मिळतील' अशी एक टपरी टाकायचा विचार करत होतो! Happy

लै भारी दिवस होते पण ते!

मी शाळेत असताना आणि महाविद्यालयात देखील -- प्रत्येक निबंध स्पर्शेत पहिले बक्षिस मिळायचे.

आमच्या ग्रूप चा स्पर्धा करण्याचा काळ संपल्यावर ' इथे भाषणे तयार करुन मिळतील' अशी एक टपरी टाकायचा विचार करत होतो!>> चंपक... मी प्रेमपत्रे लिहून द्यायचा उद्योग केलाय. Happy एका पानाला वीस रूपये.

रार, छान भाषण. जमलं तर ऑडिओ (आत्ता रेकॉर्ड केलेला) पण टाक ना!!

ही स्पर्धा कोल्हापूरला होती का? आणि त्या स्पर्धेत "१८ वर्षे वयाचा मतदार - आपत्ती की इष्टापत्ती" हा पण विषय होता का?

ही स्पर्धा दोन पातळ्यांवर घेतली जात असे.
आधी विभागीय आणि मग प्रत्येक विभागातले विजेते राज्यपातळीवर. मी पुणे विभागात होते.
त्यामुळे कोल्हापूर विभागात हीच स्पर्धा नक्कीच झाली असणार !

रार.. मस्तच.. सगळ भाषण आठवुन लिहीलस.. हॅट्स ऑफ!

तुझ्याशी बोलताना वक्तृत्व स्पर्धेत तु भाग घ्यायचीस हे कधी सांगीतले नाहीस. अजुन तुझी अशी भाषणे असतील तर तीही वाचायला आवडतील. तुला ऑडिओ टाकण्यास जमले तर.. ऐकायलाही आवडतील या नंदिनी व शैलजाच्या मागणीला माझाही दुजोरा..:)