बांधवगड व्याघ्रदर्शन ! ६. कल्लू आणि बल्लू

Submitted by अवल on 3 June, 2010 - 12:33

आधीचे पाच भाग - http://www.maayboli.com/node/16653

तिसर्‍या दिवशी पहाटे जंगलातला एकदम उजवी कडचा रूट आम्ही पकडला. गाईडने सांगितले, याच रूटवर तीन वाघांचा इलाखा आहे. बांधवगडचा सध्याचा वयाने, अनुभवाने आणि आकाराने सर्वात मोठ्या वाघची, B 2 ची ही टेरिटरी !

बांधवगडमधील सध्याची वाघांची वस्ती ज्या दोघांच्यामुळे "वस्ती" झाली, ते म्हणजे; चार्जर हा वाघ अन सीता ही वाघिण. यांचाच हा बी टू मुलगा. डिस्कव्हरीवर सीता अँड हर स्टोरी ( नाव थोडं वेगळे असेल, पण सीता ... असं काही तरी आहे ) अशी ३-४ भागांची मालिका लागते कधी कधी. त्यात हा बी टू इतका गोड दिसतो की काही विचारू नका. कधी मिळाली तर चुकवू नका ही मालिका. तर सीता अन चार्जरचा बी टू हा मुलगा. सध्या तोच बांधवगडचा घरप्रमुख ! त्याची मुलं कल्लू आणि बल्लू !

सहसा वाघाची पिल्ल आईच्या छ्त्राखालून स्वतंत्र झाली की एकएकटे आपला इलाखा तयार करतात. त्यातही दोन नर कधीच एकत्र राहत नाहीत. पण बांधवगडमध्ये हे आश्चर्य घडतेय. तसे दोघेही नुकतेच आईच्या पंखाखालून स्वतंत्र झालेत, पण एकमेकांची सोबत त्यांना अजून सोडवत नाहीये Happy

तर आम्ही या तिघांच्या मागावर होतो. आधी बी २ चा इलाखा होता. पण बी२ आता म्हातारा झाल्याने त्याच्या हालचाली आता कमी झाल्या आहेत. त्यामुळे एकदा शिकार केली की बराच वेळ तो एकाच जागी बसून राहतो, त्यामुळे तो दिसणे फारच अवघड होते. आम्ही पुढे पुढे निघालो. आता बी २ चा इलाका संपला.

चालकाने जीप हळू केली. " उजवी कडच्या जाळीमागे एक छोटी टेकडी दिसत होती, तशी बरीच लांब होती अन मध्ये बरीच झाडी अन वाळक्या वेलींची जाळी होती. आम्हाला ती टेकडी कशीबशीच दिसत होती. " उस में एक गुफॉ है जहॉ पर कल्लू- बल्लू रहते है " गाईडने अतिशय आल्हाददायक माहिती पुरवली. " इस टाईमपर निकलते है दोनो | देखते है आज क्या करते है | " जणूकाही तो त्याच्या दोन मित्रांचीच दिनचर्या सांगत होता Happy

आम्ही डोळे फाडफाडून पाहू लागलो. पण अहं काहीच हालचाल दिसत नव्हती. आमच्या चालकाने जीप बंद केली, जणूकाही कल्लू-बल्लूने त्याला मोबाईलवर मेसेज पाठवला होता, "यहॉ रूक | हम आहे है |" पुन्हा एकदा वाट बघणे सुरू झाले.

गाईड एकदम हलला. आमची नजर आपोआप त्याच्या हलचालींचा मागोवा घेत मागच्या बाजूला फिरली. अन जाळीतून तो दिसला ... " ये बल्लू आ रहा है ..."

आमच्या डावी कडच्या जाळीतून बल्लू रस्त्याच्या बाजूला येत होता. गाईडच्या मते आम्हाला " क्रॉसिंग" मिळणार होते. " क्रॉसींग " म्हणजे, वाघाला रस्ता क्रॉस करताना पहायला मिळणे. हे जंगल सफारीत फार फार महत्वाचे असते. एक तर आपल्याला वाघ अतिशय जवळून पहायला मिळतो. अन रस्त्यावर तो येत असल्याने, मध्ये कसलाही अडथळा नसल्याने त्याचे अगदी नीट दर्शन होते, त्याचे फोटो ही यामध्ये छान मिळू शकतात.

बल्लू पुढे पुढे येत होता. आता तो आम्हाला ओलांडून पुढे गेला. अहोहो तो आता रस्त्याच्या जवळ आला. झाडा-वेलींच्या सावलीतून तो एकदम उन्हात आला. त्याने गपकन डोळे मिटले. अन मी ही एक डोळा मिटला, माझे बोट मात्र दाबले गेले होते.

मला वाघांनी अगदी छान छान पोजेस दिल्या आहे की नाहीत ?
अरे, तो पहा तो रस्त्यावर आला. आमच्या अगदी समोर तो रस्ता " क्रॉस" करत होता.

कोवळ्या उन्हातले त्याचे राजबिंडे रूप डोळ्यात ठरेना. मागच्या हिरव्या गडद झाडांच्या पार्वभूमीवर उन्हात त्याच्या अंगावरचे चमकणारे पट्टे फारच लुभावणारे होते.आता बल्लू पुढे पुढे अन आम्ही त्याच्या मागे असे साधारण १५-२० फूट गेलो. अतिशय थरारक असा हा अनुभव. चक्क वाघाबरोबर मॉर्निंग वॉक Happy

थोडे पुढे गेल्यावर बल्लू डावीकडच्या गवतात शिरला. आता तो आत आत घुसत होता. पिवळ्या गवतात तो मध्येच दिसत होता, मध्येच लपत होता. साधारण २० फूट आत तो गेला असेल. अन तिथे आम्हाला दुसरी हालचाल दिसली.

" अरे ओ देखो कल्लू ! " आम्ही थक्क होऊन बघू लागलो. बल्लू जेथे पोहचत होता तिथे आधीच कल्लू होता. म्हणजे आम्ही यायच्या थोडावेळ आधी कल्लू याच मार्गावरून गेला होता तर. आता आमच्या समोर दोन दोन राजे उभे होते- कल्लू आणि बल्लू !

कल्लू आमच्याकडे पाहत उभा होता,जणूकाही " मी तुमच्या आधीच आलो " असं म्हणत आम्हाला जीभ दाखवत चिडवत होता . बल्लू तिथे अजून पोहचत होता म्हणून आम्हाला अजून पाठमोरा होता.

पाच सात मिनीटं दोघे आपापसात काही बोलले अन दोघांनी मिळून आगेकूच सुरू केली.

आमच्या डाव्याबाजूने ते आता मागे चालू लागले. जंगलात जीप चालवणार्‍या चालकांच्या स्किलची आम्हाला प्रचिती आली. चालकाने इतक्या कौशल्याने जीप उलटी वळवली की आम्हाला जाणवलेही नाही. आता ते दोघे आमच्या उजवी कडे होते. आम्हाला वाटलं की आता ते दोघे आत जंगलात जातील. पण आमच्या जीप चालकाने आणि गाईडने सांगितले की नाही ते पुन्हा आपल्या गुहेत जातील. म्हणजे पुन्हा क्रॉसींग ? वॉव ! पुन्हा वाघ रस्त्यावर समोर दिसणार ?

मगाशी आमची जीप पहिली होती पण आता उलटे फिरल्यामुळे आता आमच्या पुढे दोन जीप्स होत्या. सगळे जण आता घाई करत होते. ते दोघे कोठे क्रॉसींग करतील याचा अंदाज घेत घेत चालक पुढे चालले होते. थोडे पुढे गेल्यावर खरचच त्यांनी आपला मोर्चा रस्त्याच्या दिशेने वळवला. अन पुन्हा तो क्षण आला.

कल्लू पुढे होता. तो इतक्या भरकर पुढे आला अन त्याने झटकन रस्ता क्रॉस केला. पुढच्या जीपने घोटाळा केला. ती आम्हाला अगदीच आडवी आली. अन एक मस्त क्षण हातातून गेला. अ‍ॅडजेस्ट करून मी क्लिक करे पर्यंत तो कशाला थांबतोय. मला कल्लूचा चेहरा काही पकडता आला नाही.

तो झाडांतून भराभर दिसेनासा झाला. मी फारच हिरमुसले. मगाशी बल्लू मिळाला पण पाठमोरा. आता कल्लू चेहर्‍याशिवाय Sad

तेव्हढ्यात बल्लू पुढे आला. आता मात्र माझा मार्ग खुला होता. थोडी सावली होती पण मला बल्लू नीट मिळाला.

६.४० ते ७.१० केवळ आर्ध्या तासाच्या अंतरात तीन क्रॉसींग्ज आम्हाला मिळाली होती. आमचे नशिब खरच जोरावर होते.

वरचे दोन फोटो कोणाला एकाच वाघाचे वाटतील. गाईड, चालक या वाघांना कसे काय वेगवेगळे ओळखू शकतात असाही प्रश्न पडू शकतो. मी याबद्दल थोडी माहिती वाचून काढली, काही डिस्कव्हरीवर मिळाली. ती तुमच्याशी शेअर करते.

सगळ्या वाघांवर पट्टे असतात. प्रथम दर्शनी ते सगळेच आपल्याला सारखे वाटतात. पण या पट्ट्यांवरून , त्यातल्या फरकांवरून वाघ ओळखता येतात. माझ्याकडे कल्लू आणि बल्लू यांचे वेगवेगळे फोटो मी अभ्यासले. अन आता मलाही नाव न बघताही त्यांच्यातला कल्लू कोण अन बल्लू कोण हे ओळखता येते.

बघा हं, कल्लूच्या अंगावरचे, तोंडावरचे पट्टे थोडे फिक्या रंगातले अन थोडे जास्त शार्प आहेत, तर बल्लूच्या अंगा-तोंडवरचे पट्टे थोडे जास्ती डार्क अन जास्ती ठळ्ळक आहेत. कल्लूच्या डोळ्यावर अर्ध गोल अन त्यात मध्यात एक छोटी रेघ दिसतेय. तर बल्लूच्या डाव्या डोळ्यावर आडवा तीन काढल्या सारखा दिसतोय.

बल्लूच्या डोक्यावरचे पट्टे जास्त ब्रॉड अन डार्क आहेत तर कल्लूचे फिकट आणि शार्प !.
त्यांच्या पोटावरचे पट्टेही असेच वेगळेपण दाखवतात. बल्लूचे थोडे डार्क अन जवळ जवळ, तर कल्लूचे फिके अन थोडे लांब लांब.

पुढच्या भागात याबद्दल अजून सांगेन.

(पुढे चालू...)

गुलमोहर: 

सही Happy
कल्लू आणि बल्लू आवडले. बांधवगडच्या माझ्या ट्रीपमध्ये B२ ने आम्हाला दर्शन देउन धन्य केलेय. Happy

मस्त गं! क्रॉसिंग सह्ही पकडलं आहेस कॅमेर्‍यात! आणि कल्लू-बल्लू या दोघांमधला फरक पण कळतोय तू दाखवल्यासरशी!:-)

आरती,मला कल्लू-बल्लू दिसले नाहीत Sad
मी स्वत:च अ‍ॅरेंज करुन रणथंबोर-बांधवगड आणि कान्हा फिरलो होतो. पुढच्या उन्हाळ्यात परत बांधवगड-कान्हा आणि जमल्यास पेंच-नागझिरा करायचा विचार आहे.

वॉव ! माझं रणथंबोर अजून व्हायचय. बघुया कधी संधी मिळतेय. सध्या इथे लिहून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून तहान भागवतेय Happy

पण रणथंबोरपेक्षा बांधवगडलाच वाघ दिसायचे चान्सेस जास्त असतात.
बादवे,मी बांधवगडला टायगर शो पण बघितला होता. हत्तीवर बसुन उंच गवतातला वाघ बघणे हे हा एक अनुभव असतो. Happy
मला एकदा पुण्याच्या 'फोलिएज' बरोबर जायचं आहे.

वा वा!! झकासच! आम्ही रणथंबोरला गेलो होतो एप्रिलमध्ये. ३ दिवस सतत फेर्‍या करून झाल्यावर शेवट्ची फेरी ज्या रूटवर कधीच वाघ दिसत नाही अशी मिळाली. जरा नारजीनेच गेलो, पण त्याच रूट्वर जवळ्जवळ पाऊण तास एका वाघीणीने अगदी जवळून आणि मनसोक्त दर्शन दिले. नेमका माझा कॅमेरा तेव्हाच बिघडला पण Sad

हा भाग प्रथमच वाचला. आरती, सिंपली ग्रेट वर्णन, फोटो सर्वकाही. आधीचे सर्वभाग वाचुन काढतो.