बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग )

Submitted by अवल on 19 May, 2010 - 22:38

लेकाची दहावी संपली आणि हुश्य झालं. दहावीची मांडवपरतणी म्हणून आम्ही बांधवगडचा बेत केला. मागे 'फोलिएज' बरोबरचा कान्हाचा अनुभव फार छान होता, त्यामुळे पुन्हा त्यांच्याबरोबरच जायचे नक्की केले. एकतर त्यांची सगळी सोय मस्त होती, सोबतही छान होती. पन सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचा "पायगुण" मस्त होता कारण कान्हाला आम्हाला नऊ वेळा व्याघ्रदर्शन घडले होते. पहिल्यांदाच जंगलात जाऊन इतक्यांदा वाघ पहायला मिळाला होता त्यामुळे आम्ही फारच नशिबवान ठरलो होतो. त्यात त्या वेळेस गाईडच्या अनुभवामुळे एका ठिकाणी अगदी तासभर काही दिसत नसताना त्याच्यावर विश्वास ठेऊन थांबून राहिल्यावर फार मोठे घबाड मिळाले होते.

झालं काय, आम्ही एका टेकडीवरच्या वळणाच्या रस्त्यावर होतो. उजवी कडे छोटी टेकडी होती, अन डावी कडे खाली नदी होती. डावी कडे थोडे खोल असल्याने अन तिथे खुप झाडी असल्याने काहीच दिसत नव्हते. थोडे लांबवर नदीपलिकडचा चढ अन तिथली छोटी टेकडी दिसत होती. मागे साधारण दहा फुटाचा रस्ता दिसत होता अन पुढे लगेच वळण. आम्ही जरा साशंकच होतो, इथून काय अन कोठे दिसणार? पण आपल्यापेक्षा गाईडचा जंगलचा अनुभव मोठा, या विचाराने गप्प बसलो. आर्धातास झाला पण तरी काही घडेना. बरं जंगलात बोलायला बंदी. निसर्ग बघत अन जंगलाची निरव शांतता ऐकत बसून राहिलो. मध्येच गाईडकडे काय अशी नजरने, मानेने विचारणा करत होतो. तो हळूच म्हणाला, " इधरसे बाधिन जायेगी | निचे पानी है और सामने एक गुफा जैसे दिख रहा है ना | " आम्हाला फारसे कळले नाही. पण समोरच्या टेकाडावरती थोडी गुहेसारखी जागा आता सांगितल्यावर आम्हाला दिसली. खरच मस्त गुहा होती ती !

अन मग अचानक जंगलाला जाग आली. चितळाने पहिला कॉल दिला. कॉल म्हणजे; वाघ, बिबळ्या वगैरे शिकारी प्राणी शिकारी साठी हालचाल करू लागले की इतर प्राण्यांना त्यांचा सुगावा लागतो. अन मग ते इतर प्राण्यांना सावध करण्यासाठी विशिष्ठ आवाज काढतात, त्याला कॉल असे म्हटले जाते. एरवी माकड, सांबर, चितळ ओरडताना जसा आवाज काढतात त्यापेक्षा; हा कॉल देताना ते वेगळे आवाज काढतात. जसे माकडे एरवी हुप असे ओरडतात तर कॉल देताना खॉक खर असा काहीसा खोकल्यासारखा आवाज काढतात. जंगलात लक्ष देऊन एक दिवसजरी फिरलात की हे कॉलस कळायला लागतात. अर्थात खरा कॉल कोणता, फॉल्स कॉल कोणता हे कळायला जरा वेळच लागतो. पण हे कॉल ट्रेस करायला मजा येते.

तर आता जंगल जिवंत झाले. आमच्या मागच्या बाजूने चितळाने कॉल दिला. आमच्यात लगेच चैतन्य आले. लगेचच माकडाने खॉक केले. जंगल भराभर हालू लागले. गाईडने कानोसा घेउन जीप चालकाला जीप हळूहळू मागे घे असे सांगितले. " बच्चेवाली आ रही है| " आम्ही थक्कच ! चक्क वाघिण अन तिची पिल्ले एकत्र ? एकदम गाईड म्हणाला, " जल्दी कर "

जीप झटक्यात मागे गेली. पण जsssssरा उशीर झाला. आम्ही चकीत होऊन बघत राहिलो. मगाशी येताना आमच्या जीपच्या टायरचे ठसे होते त्यावर आता वाघिणीच्या पावलांचे ठसे होते. " बच्चेवाली यहाँसे अभी निचे गयी " आम्ही ते ठसे पाहून मंत्र मुग्ध झालो., इतके की त्याचे फोटोही काढायचे विसरलो.

" अरे आगे ले, जहाँ पर खडे थे" गाईडने जीपचालकाला ऑर्डर दिली . आता आम्ही त्याच्या माहिती, अनुभव अन ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवला. तरी मनात खुटखुटत होते, बच्चे वाली? पण पिल्लांचे ठसे तर नव्हते.....
" वो देखो, सामने देखो, ऊस गुफाँ के सामने देखो...." आता गाईडही उतावळा झाला होता. आम्ही समोर बघितलं. तसं जवळ जवळ ४० एक फूट अंतर होतं. आम्ही गाईड दाखवत होता तिथे प्राण डोळ्यात आणून पहात होतो. आम्हाला तिथल्या झुडुपांमध्ये हालचाल दिसली. अन अहो आश्चर्य तिथे दोन अगदी छोटी पिल्ल खेळत होती. अजून काळी-पांढरीच होती, एक क्षण मला ती मांजराची पिल्लच वाटली, इतकी छोटी होती ती ! अन तेव्हढ्यात एक मोठा वाघ गुहेतून बाहेर आला. " वो देखो बडा बेटा आ गया | " आम्ही थक्क झालो. म्हणजे ही वाघिण नव्हती, तिचा मोठा मुलगा, छोट्या भावंडांना सांभाळत गुहेत बसला होता , अन आई आल्यावर हे सगळे कुटुंब बाहेर खेळायल आले होते, आईच्या छ्त्रा खाली सुरक्षित वाटल्याबरोबर ! वाघिण मात्र दिसत नव्हती . कारण ती खाली दोन टेकड्यांच्या खालच्या घळीत होती. आता पिल्ल अन त्यांचा दादा थोडे अजून खाली उतरले. आता ते आम्हाला दिसत नव्हते. पण त्यांचे म्यॉव म्यॉव अन गुर्गुर ऐकू येत होते. फारच मजा वाटत होती.

तेव्हढ्यात आमच्या पुढून आता कॉल देणे सुरु झाले. वाघिण तिथे न थांबता पुढे निघाली होती. गाईडने विचारले, इथेच थांबायचे का? खरं तर पिल्ल, त्यांचा दादा दिसत नव्हते. पुढे गेलो असतो तर वाघिण दिसण्याची शक्यता होती. पण गाईड म्हणला, त्याने त्याच्या १४ वर्षांच्या जंगल अनुभवात इतकी छोटी पिल्ल पाहिली नव्हती. जेमतेम महिन्याची होती. त्यामुळे त्याला त्या पिलांना पाहण्याचा मोह सुटत नव्हता, खरं तर मोठा वाघ पाहण्याची संधी सोडून या न दिसणार्‍या पिल्लांसाठी बसण त्याच्या कर्तव्यात बसणारे नव्हते. वाघ दाखवा असा टुरिस्टांचा हेका असतो. असे असताना हातातला वाघ सोडणे त्याला योग्य वाटेना. पण मग आम्ही त्याला सांगितले की वाघ नाही दिसला तरी चालेल पण हा अनुभव घेउ यात. तो फारच खुश झाला. अन मग जवळ जवळ २५ मिनिटं आम्ही त्या तिघांचा खेळ नुसता अनुभवत बसलो. ती २५ मिनिटं मी आयुष्यात विसरणार नाही. ते निर्व्याज्य म्यॉव अन गुरगुर अजूनही माझ्या कानात गुंजतय. एक अविस्मरणीय प्रसंग !

मग त्यांची ही जुगलबंदी एकदम थांबली. बहुतेक आई थोडी लांब गेल्या मुळे ती शांत झाली असतील किंवा दमली असतील. आम्ही अजून दहा मिनिट वाट बघितली. पण सारं काही शांत होतं. मग तिथे न थांबता गाईडने जीप पुढे काढायला सांगितली. मनात अजूनही तेच आवाज रुणझुणत होते. साधारण पाच एक मिनिटं आमची जीप पुढे जात राहिली. सगळे जण त्या पिल्लांची भाषा ऐकून शांत झाले होते.

पण पिक्चर अभी बाकी है दोस्तो Happy

गाईडही तो अनुभव मनात साठवत शांत बसला होता. अन एकदम तो उभा राहिला. एव्हाना आम्हाला त्याच्या देहबोलीवरून कळून चुकले .... वाघिण आमच्या भेटीला येतेय......

समोरुन वानराने खॉक केले. अन डावीकडच्या झाडीत हालचाल दिसली. साक्षात वाघिण आपल्या मोठ्या मुलासाठी त्याचा खाऊ घेऊन येत होती. अन आम्हाला दर्शन देण्यासाठीच जणू त्या वाटेवरून परत येत होती. मधल्या पाऊण तासात शिकार करून ती परतत होती. अन तिच्या कामाच्या वेळात आम्ही तिच्या बाळांचे बेबीसिटिंग केले म्हणून ती आम्हाला भेटायला आली होती जणू ! क्षणात तिने दिशा बदलली अन झाडांमधून आपल्या गुहे कडे दिसेनाशी झाली. अक्षरशः २ मिनिटांचा खेळ ! पण डोळे निवाले अगदी. परतीच्या प्रवासात आम्ही सगळे अगदी अगदी तृप्त-तृप्त, शांत-शांत होतो.

(....पुढे चालू )
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16317
बांधवगडचे व्याघ्रदर्शन (३. दुसर्‍या दिवशी सकाळीच "कथा सफल-संपूर्ण" ) : http://www.maayboli.com/node/16366
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ४. टायगर शो ! ) : http://www.maayboli.com/node/16543
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16598
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679

गुलमोहर: 

वॉव!!! आरती मस्तच वर्णन पुढचे भाग लवकर येऊ देत.
वृतांतसोबत थोडे फोटो असते तर अजुन मजा आली असती.

कान्हाला आम्हाला नऊ वेळा व्याघ्रदर्शन घडले>>>> खरंच नशिबवान आहात तुम्ही.

दहावीची मांडवपरतणी म्हणून आम्ही बांधवगडचा बेत केला>>>> Happy Happy

तिच्या कामाच्या वेळात आम्ही तिच्या बाळांचे बेबीसिटिंग केले म्हणून ती आम्हाला भेटायला आली होती जणू>>>> Happy

मांडवपरतणी>>>>मस्त वाटला हा शब्द तिथे Happy

लेख मस्तच. काय सह्ही अनुभव आहे हा Happy

पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतेय Happy आणि हो ब्लॉग देखील वाचते आता. धन्स लिंक दिल्या बद्दल Happy

अजून काळी-पांढरीच होती, एक क्षण मला ती मांजराची पिल्लच वाटली, इतकी छोटी होती ती ! अन तेव्हढ्यात एक मोठा वाघ गुहेतून बाहेर आला
आरती जी , मस्त अनुभव !

मस्त! मी कधि जंगलात गेले नाहिये पण तुमचे वर्णन वाचुन चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले एकदम. पुढच्या भागाचि वाट बघतेय.

वाव... मस्तच.. आम्ही ताडोबाला गेलो होतो, तासतास तोंडे बंद करुन बसलो पण आमच्या गृपला काही वाघाने दर्शन दिले नाही Sad तुम्ही खरेच नशिबवान.. पुढचे लिही लवकर लवकर...

मस्त गं! छानच लिहिलं आहेस आणि अनुभवही फार रोचक!

<< म्हणजे ही वाघिण नव्हती, तिचा मोठा मुलगा, छोट्या भावंडांना सांभाळत गुहेत बसला होता , अन आई आल्यावर हे सगळे कुटुंब बाहेर खेळायल आले होते, आईच्या छ्त्रा खाली सुरक्षित वाटल्याबरोबर ! वाघिण मात्र दिसत नव्हती . कारण ती खाली दोन टेकड्यांच्या खालच्या घळीत होती. आता पिल्ल अन त्यांचा दादा थोडे अजून खाली उतरले. आता ते आम्हाला दिसत नव्हते. पण त्यांचे म्यॉव म्यॉव अन गुर्गुर ऐकू येत होते. >> Happy

आरती, मस्त एकदम! खरंच लकी तुम्ही लोक. पण काही फोटो असतील तर टाक ना. अजून छान वाटेल. रच्याकने, हे "'फोलिएज" काय आहे? वाईल्डलाईफ टूर कंपनी आहे का? डिटेल्स दे ना. तुमचा अनुभव चांगला असेल तर बरंच आहे. पुढचा लेख टाक लवकर. आणि ह्या लेखाची लिंक तिथे दे म्हणजे सगळे नंतर एकदम पण वाचता येतील. पु.ले.शु. Happy

आरती मस्त अनुभव ग. फोटो असते तर मजाच आली असती.
मी अजुन कधीच वाघ बघितला नाहिये. पण लहानपणी माझ एक स्वप्न होत वाघाच्या पिल्लाला पाळायच! कित्ति गोजिरवाणि दिसतात नाहि. ती हौस मांजरिवर भागवावि आता Wink

सर्वांना मनापासून धन्यवाद ! खरं तर गेल्यावर्षी मे महिन्यात गेले होते, तेव्हापासून लिहू लिहू असं म्हणत होते. पण वर्ष असच गेलं. हा लेख लिहिला, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया इतक्या छान, उत्साहवर्धक होत्या म्हणूनच पुढचे भाग लिहित गेले. माझं हे सर्व लिखाण तुम्हा सगळ्यांना सानंद अर्पण ! पुढे मागे याचे पुस्तक केले तर तेही तुम्हालाच Happy