बाप.

Submitted by ट्यागो on 3 June, 2010 - 08:55

तू गेलायस वाटत नाही कधीच,
देवघराच्या तुळईला टेकून उभा हसतोस आजही,
पोरगं मोठ्ठ झालं म्हणत.
देवीच्या आरजात,
गुरवांच्या गोंगाटातही ऐकतो
तुझा स्वर...
"बाय, सोमजाय, महालक्ष्मी..." म्हणत
काळीज चिरत नेणारा..

आजही चार घास तुझ्या नावाचे काढते ती काकविळ भरून...
आणि मी निरखतो कावळे तुझ्या चेहर्‍याचा शोध घेत...
वेडा पाडा ही मुका भासतो,
तुझा रख-रखीत हात न फिरल्याने.

आणि ती...
ती तर टच्च हिरव्या शिरा जोपासते,
पांढर कपाळावर.
तिच्या आयुष्याची लालिमाच पुसलीये
बोटभर कुंकू नसण्याने...
उजळ माथ्याने फिरणारी ती
पांढरफटक कपाळ दाखवते,
खोल अर्थहीन डोळ्यांसोबत...
आटल्या विहारीसारख्या.

जड होऊन निरोप घेतो,
घराचा, दाराचा, कण-कण मातीचा...
मग तिच्या पायाला हात लावला की
सरावाची किण-किणहि ऐकू येत नाही...
दचकतो, क्षणभर...
रडू कोसळतं...
तिच्या मिठित शिरून लहान व्हावं वाटतं...
पण नाहीच;
एव्हाना तिचा थरथरता हात
पदर घेऊन पुसतो माझा कढ...
आणि मी वळतो,
तूच दिलेल्या पोटासाठी!!

मयूरेश चव्हाण, जेजुरी, पुणे.
३१.०५.१०, १९.३०.

गुलमोहर: 

ही मिसली होती. कविता आवडली.
लिहित रहा भौ...
गुलमोहर कडे परत यावंसं वाटेल अश्याने.

मयु, आज पुन्हा वाचली कविता, काय व्यक्त झालायस रे..!! खरा प्रामाणिक प्रतिसाद डोळ्यातून थेंब ओघळतो तोच..

ही कविता जगल्यासारखी वाटते..........
तुम्ही कविता नेमाने लिहित जा..........
बाप या प्राण्याची कोणीतरी कदर करतं तर.....

काळजाला भिडली यार.............

Sad

::-(:

बापाला आपण नेहमीच गृहीत धरतो......संदीप खरेंनंतर ट्यागोच ! शब्दांचा अतिशय तरल उपयोग......खूप संवेदनशील कविता........... शब्द अपूरे पडताहेत...........

काय बोलावे ट्यागो? खरेच स्पीचलेस!!
सहजतेने लिहीलीस त्यामुळे निरातिशय सुंदर उतरली आहे!

खरा प्रामाणिक प्रतिसाद डोळ्यातून थेंब ओघळतो तोच.. >>>+१

प्रतिसाद टाईपच करता येत नाहीये Sad

Pages