२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 3 June, 2010 - 06:09

नाना साठे गाजलेला ग्राहक समजला जाण्याची दोन भिन्नच कारणे होती. केवळ मजा मारायला येणार्‍या अन पैसे फेकून जाणार्‍या अनंत ग्राहकांऐवजी नाना साठे पैसे तर द्यायचाच पण आठवणीने येताना काही ना काही भेटवस्तू आणायचा. अगदीच मौल्यवान नसली तरीही त्या काळातही पाच सहाशेची वस्तू असायचीच! पैसे वेगळे! आणि दुसरे कारण म्हणजे झोंबाझोंबी करून स्वतःला हवे तेवढे मिळवून निघून जाणे असे तो वागायचा नाही. त्याच्याबरोबर रत असलेल्या वेश्येला जणू आपण याची प्रेयसीच आहोत असा भास व्हायचा.

हे दोन, खरे तर नाना साठेचे बुधवार पेठेवर उपकारच होते म्हणायला पाहिजेत! ठरलेल्या दरापेक्षा काही अधिक पैसे टीप म्हणून देणारे आजवर हजारो येऊन गेले असतील, पण कुणालाही सहज आवडू शकेल अशी एखादी वस्तू आणणे हे नानाचे कृत्य नाही म्हंटले तरी इंप्रेसिव्ह होते. त्याचा फॅन क्लब निर्माण झाला होता त्या एरियात! आणि त्यात आणखीन कोणतेही वचन न देता, आणाभाका न खाता, उगाच दारूबिरू पिऊन न जाता.. तो तास दोन तास असा काही वागवायचा की त्या मुलीच्या दृष्टीने तो कालावधी परमोच्च सुखाचा ठरायचा.

साहूला सात ते एक डिस्कोत बसायचे नाही असे सांगीतले होते. पण नाना ललिताकडे पावणेदोन वाजता आला होता. आणि नाना ललिताकडे पहिल्यांदाच आला होता.

त्याच्या स्पर्शांमधे वेगळेपण आहे हे जाणवेपर्यंत ललिता पटकन दूर होत साहूकदे अंगुलीनिर्देश करत म्हणाली होती की 'बच्चा है.. अंदर चलिये'! तिला वाटले मुलगा आहे म्हंटल्यावर हा माणूस वैतागून निघूनच जाईल. नानाने तिसरेच केले. त्याच्या खिशात असलेला एक बाजा, जो तो स्वतःच वाजवायचा, त्याने साहूला देऊन टाकला. साहू खुष, ललिताही खुष! साहू लगेच तो बाजा वाजवू लागला. गंगाबाईने झापल्यावर साहू गल्लीत बाजा वाजवायला जातो म्हणाला.

उघड होते! नाना कोठ्यावर येणे हा एक प्रकारचा सोहळा असू शकत होता. ललिताकडे असूयेने पाहात पोरी कॉरिडॉरच्या दुतर्फा थांबलेल्या होत्या. संगीतासकट सगळ्या! आणि गंगाबाईने ओरडून कुणालातरी सांगीतले होते. नानाशेठ आये है.. कमरेमे बैठेंगे.. कमरा खाली है ना?

आजवर तो संगीताकडेही आला नव्हता. खरे तर माधवी नावाच्या डिस्कोच्या पुर्वीच्या टॉपच्या वेश्येने डिस्को सोडल्यापासून नाना डिस्कोत आलाच नव्हता. चक्क चार वर्षापासून! पण मुंगुसने त्याला सांगीतले. ललितासे मिलके आईये सेठ.. खुद होके मेरेको तीनसौ देंगे आप! आणि नानाने अ‍ॅडव्हान्स म्हणून आधीच दिडशे मुंगुसच्या हातावर ठेवले होते.

साहूच्या गालांवरून प्रेमाने हात फिरवत नानाने त्याला वर आणखीन वीस रुपये दिले अन साहू आनंदात ललिताकडे न बघताच खाली धावला! हवे ते खाता येणार होते आज!

आणि बरेच दिवसांनी ललिता त्या खोलीत पुन्हा अभिमानाने चालली होती.

संगीताला हे बघवणे शक्यच नव्हते. काही झाले तरी ललितापेक्षा तरुण होती, सुंदर होती, मॉडर्न होती, नानाबद्दल ऐकून होती आणि सध्या डिस्को गाजवत होती.

संगीताने नानाचा डावा हात धरला अन स्वतःच्या गालावरून फिरवला.

नाना - नाना पटानेकी चीज नही है रानी.. राजा आदमी है नाना! जिसके लिये आयेगा.. उसीकाही होगा!

नानाने हसत हसत व संगीताचा मुळीच अपमान न करता उद्गारलेल्या या वाक्याने ललिताला कोण अभिमान वाटला स्वतःचा!

आणि साडे चारला जेव्हा नाना बाहेर पडला तेव्हा ललिताने कित्येक वर्षांनंतर खरेखुरे सुख अनुभवले होते. आजवर लचके तोडणारेच भेटले होते! अगदी भानूसकट! नानाने तिला स्वर्गात नेऊन आणले होते. वर नेहमीपेक्षा जास्त पैसे तर दिलेच होते आणि.. एक चारशे पाचशेचा नेकलेसही!

नाना साठे आपल्याकडे आला या गर्वात ललिता बाहेर पडली अन ... पच्च!

दारात उभ्या असलेल्या संगीताने तोंडातला सगळा गुटखा ललिताच्या अंगावर थुंकला!

संगीता अत्यंत अपमानीत झालेली होती. तिचे दिवस जाऊन पुन्हा रेश्माचे दिवस येतात की काय याची तिला फिकीर पडली होती. आणि..

ललिता उर्फ रेश्मा संगीताच्या त्या कृत्याने बेभान झाली होती. काहीही पुढचे मागचे न बघता तिने खाडकन संगीताच्या कानाखाली आवाज काढला.

फारच मोठे भांडण झाले. तेराजणी संगीताच्या बाजूने तर पाचजणी रेश्माच्या बाजूने होत्या. इस्माईल चक्क रेश्माच्या बाजूने होता. आणि गंगाबाई मात्र संगीताच्या!

अजब प्रकार घडला साडे सहा वाजता उजाडताना..

सगळ्यात पुढे मुंगुस.. रेश्माच्या दोन बॅगा घेऊन..

मधे साहू..

आणि मागून आळीतल्या सगळ्या मुलींच्या नजरा झेलत ललिता गल्लीतून बाहेर पडली.. ती थेट ...

वेलकम!

जोरदार वेलकम झाले ललिताचे तिथे! जुनाट बायकांनी साहूला लगेच लाडप्यार वगैरे सुरू केले. ललिताची मर्जी आपल्यावर असावी म्हणून! जेवढे जण ललिताच्या मर्जीत असणार होते त्यांना शरीफाबी नीट वागवणार हे उघड होते.

फक्त... डिस्कोला एकच संगीता होती... इथे दोन संगीता होत्या..

डिंपल आणि सुनंदा!

उदासवाणा चेहरा करून डिंपल ललिताकडे पाहात होती. तर सुनंदा त्वेषाने अन द्वेषाने! त्यांच्या नजरांचे अर्थ ललिताला व्यवस्थित समजत होते. आणि आणखीन एक तत्व तेव्हाच पचनी पडत होते. ते म्हणजे..

.. सतत गाजत राहायचे असेल तर.. सतत ठिकाण बदलणे आवश्यक होते.. आणि संगीता मुंबईहून इथे का आली ते लक्षात येत होते..

मात्र! एक प्रॉब्लेम नव्यानेच समजला! तेवढ्यातच!

इमारत बदलून काय होणार आहे? या भागात येणारे लोक तेच तेच असणार की? फक्त अर्धा पाऊण किलोमीटर लांब जाऊन उपयोग नाही.

वेलकमला तिला डिंपलची खोली मिळाली. वर्षभरापुर्वी सुनंदा त्या खोलीत असताना डिम्पल आली तेव्हा सुनंदाने शरीफाबीशी भयानक भांडण केले होते. मुंगुसला फक्त स्वतःचा फायदा समजायचा!

आज डिम्पलने भांडण काढले.

डिम्पल - शरीफाबी.. मेरा कमरा कैसे क्या दिया इसको?

यावर शरीफा काही बोलणार त्याआधीच सुनंदाने विधान केले.

सुनंदा - तू कौन मुमताझ महल है री ***?? आं?? तेरा कमरा? मां के पेटसे लेके आयी क्या ये कमरा? तेरा ** फुटा नही था तबसे इस कमरे मे मै रहती हुं! शरीफा.. ये नयी लडकी उस कोनेमे बिठा.. मेरे ग्राहक नाराज होगे इसको कमरेमे देखकर!

सुनंदा ही एकच अशी बाई होती जी शरीफाला शरीफा म्हणायची! मात्र! शरीफाबीने उच्चारलेले वाक्य ऐकून अचानक भांडणावर पडदाच पडला. कोण बोलणार?

शरीफा - और जब तेरेको येभी एहसास नही था के लडके और लडकीमे क्या फर्क होता है.. इस कमरेमे मै राज करती थी.. समझी?? चुपचाप अपनी औकादपे आ सुनंदा.. तेरे दिन रहे नही है अब!

अभद्र रडण्याचे सूर येत होते ललिताला खोलीत जाताना मागून!

तेरे दिन नही रहे है अब!

म्हणजे काय? ललिताने हळूच दारातून रडणार्‍या सुनंदाकडे पाहिले.

पस्तीस वय असावे. सगळे जिथल्या तिथे! पण.. कळत होते.. वय जास्त आहे हे! एक प्रकारचे रापलेपण होत्ये त्या धगधगत्या सौंदर्यात!

डिम्पल! अशीच तिशीची असेल! गोरीपान! पण.. पदराआडून दिसणार्‍या पोटावरच्या वळ्या सांगत होत्या. डिम्पल बॉबीतील डिम्पल राहिलेली नाही.

आपले वय? आपले वय तेवीस आहे. म्हणजे.. चार पाचच वर्षे? नंतर? नंतर काय?

साहूकडे हतबुद्ध नजरेने पाहताना ललिताच्या पायाखालची वाळु सरकली.

हीच ती... हीच ती चार पाच वर्षे! यातच काय ते! आपल्याशी लग्न तर एखादा दलालही करणार नाही आता! खरे प्रेम वगैरे सब झुठ आहे. शरीर आहोत आपण एक शरीर! आणि हे शरीर गुबगुबीत, लोभसवाणे, कोवळे कोवळे आहे तोवरच आपण आहोत! नंतर... नंतर काहीही नाही. सडलेले शरीर अन वाढलेले वय घेऊन श्रीनाथ टॉकीजपाशी उभे राहायचे! हमाल तर हमाल! मजूर तर मजूर! अर्धे पैसे तर अर्धे पैसे! फक्त... उधार परवडायची नाही.

या चार, पाच वर्षात जर कोणतेही कुरूप होण्याचे कारण घडले नाही.. म्हणजे भाजणे, कापणे वगैरे अन शरीराला कोणताही रोग झाला नाही.. तर आजही आपण हव्याहव्याश्या वाटणार्‍या आहोत. आणि.. हवीहवीशी वाटणारी हीच चार, पाच वर्षे आहेत. या कालावधीत एक तर किमान दोन ते तीन लाख कमवून स्वतंत्र खोली घ्यायची अन दोन पोरी ठेवून आपणच परमिट काढून धंदा काढायचा.. किंवा.. राउरकेला! नाहीतरी.. इथे पैसे देऊन शरीर भोगणारे येतातच! आपल्याच भागात कुणीतरी आपल्याला वापरले अन त्याबदल्यात जेवणखाण, कपडेलत्ते पाहिले की बास! फक्त... साहूला शिकवायला पाहिजे!

त्यावेळेस साहूच्या मनात तिसरेच विचार चाललेले होते.

सिटि पोस्टासमोरच्या अरुंद अन घाणेरड्या गल्लीतून लक्ष्मी रोडवर तो पहिल्यांदाच आलेला होता.

केवढा रस्ता! केवढी अफाट गर्दी! कसली कसली दुकाने! आणि या बायका.. या त्याच की.. ज्या रोज गल्लीत दिसतात. आत्ता इथे उभ्या आहेत. लोक बघतायत.. अरे? आपल्याला ओढत ओढत आईने रस्ता ओलांडलासुद्धा! आता? आता ही गल्ली लागली..

अच्छा! इथेही अशाच बायका असतात होय? शी! काय घाणेरडी गल्ली आहे ही.. अरे? व्वा! केवढा रस्ता आला पुन्हा! केवढ्या बायका इथे तर!

ओहो! या बिल्डिंगमधे जायचंय होय? ही तर आपल्या बिल्डिंगपेक्षा मोठी आहे. शेजारीच आणखीन एक बिल्डिंग.. जवळपास तेवढीच मोठी! ..

म्हणजे.. म्हणजे इथे येण्यासाठी आई गंगाबाईशी भांडत होती बहुतेक ... आणि संगीतादीदीला यायचं असाव इथे! बरं झालं! आपल्यालाच यायला मिळालं!

साहूच्या ज्ञानात आणखीन एक अमूल्य भर पडली.

दोन गल्ल्यांच्या मधे एक प्रचंड व प्रचंड गर्दी असलेला रस्ता आहे.. आणि..

त्या रस्त्यावर असलेल्या माणसांच जग हे आपल्या जगापेक्षा खूप लहान आहे.. कारण..

त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपलं जग आहे.. त्यांना फक्त एकच रस्ता तेवढा!

ते जग वेगळं आहे हे मात्र.. आठव्याच वर्षी त्याला समजू शकत होतं! कारण त्या रस्त्यावरून जाणार्‍या कित्येक बायका अंगभर कपडे घालून इकडे न बघता घाईघाईत निघून जात होत्या. म्हणजे.. काहीतरी वेगळं निश्चीत होतं! अशापण बायका असतात.

आपल्या खोलीत बॅगा ठेवून साहूला पलंगावर बसायला सांगून ललिताने सहज खिडकीतून मागच्या बाजूला नजर टाकली.

बुधवारपेठेला...... नरक का म्हणतात हे तिला आता लक्षात आलं!

नरक! अ‍ॅबसोल्युट नरक!

वेलकमच्या मागे असलेल्या दोन मजली बिल्डिंगच्या सगळ्या खोल्या वेलकममधून दिसत होत्या तिला. खालील दोन्ही इमारतीतील मोकळ्या जागेत काही नाणीच खिशात असलेली अत्यंत किळसवाणि गिर्‍हाईके वरच्या बाल्कनीतील वेश्यांशी आंखमिचौली करून मग एकमेकांना काहीतरी रहस्ये सांगत होती. 'मी गेलोय हिच्याकडे, पालथी नाय होत' वगैरे वगैरे! ते शब्दप्रयोग ऐकूनच वेलकमचा निर्णय पूर्णपणे चुकला की काय असे ललिताला वाटत होते. बाल्कनीतील स्त्रियांना मात्र त्यात काहीही वावगे वाटत नव्हते. त्या वरूनच आपली साडी वगैरे वर करून कठड्याच्या लाकडी काठ्यांमधून आपले गुप्त भाग दाखवून खालच्या घृणास्पद कस्टमर्सना चेतवायचा प्रयत्न करून खळखळून हसत होत्या.

एका खोलीत सरळ सरळ पलंगावर चाललेला कामसुत्राचा धडा दिसत होता. अंधार असूनही! कारण हा दिवस होता, रात्र नव्हती! या खिडकीत साहूला कधीही उभे राहू देण्यात अर्थ नाही हे ललिताने ओळखले. ज्या बाईबरोबर तो माणूस समोर झोपलेला दिसत होता ती मधेच काही कारणाने उठली तेव्हा ललिता शहारली. किमान पंचावन्न वर्षाची अत्यंत बेढब अन किळसवाणी व नग्न बाई होती ती! तिच्या उघड्या खिडकीतून तो प्रकार पाहावा असे एकाही बाहेरच्या बाईला वाटत नव्हते. ती खिडकी झाकावी असेही कुणाला वाटत नव्हते. खालील मोकळ्या जागेत एक जण तिथेच सरळ लघवी करत उभा होता. त्याच जागेत कॉन्डोम्स, दारूच्या रिकाम्या बाटल्या, कागद, सिगारेटची थोटके अन अनंत वस्तूंचा कचरा होता. खालच्या मजल्यावरील मुली वरच्या मजल्यावरील मुलींची वाट्टेल ती थट्टा करत होत्या. खाली दोन माणसे काही कारणावरून बाचाबाची करून एकमेकांना ढकलत होती. सकाळी केवळ सात वाजता हे चाललेले होते.

त्या इमारतीला लागून एक बोळकांड होतं! एक अत्यंत म्हातारी बाई एका तितक्याच म्हातार्‍याला तिकडे घेऊन जाताना दिसली. त्यांच्यात काही नाण्यांचा व्यवहार झालेला होता.

आणखीन एक किळसवाणी म्हातारी, जिच्या अंगाला कित्येक महिन्यात पाण्याचा स्पर्श झालेला नसावा, एका कोपर्‍यात बसलेली होती. वरच्या एका मुलीने 'ए बुढ्ढी.. ये ले.. चर' म्हणून टाकलेला अर्धा बटाटेवडा तिने कसातरी हातात घ्यायचा प्रयत्न केलेला असताना एका संभाव्य ग्राहकाचा त्यावर पाय पडल्याने ती चवताळली व शिव्या द्यायला लागली. इतक्या घाणेरड्या बाईने आपल्यासारख्या प्रतिष्ठीत नागरिकाला शिव्या द्याव्यात हे सहन न होऊन त्या माणसाने तिच्या तोंडावर खच्चून लाथ मारली व तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. ती बाई अक्षरशः किंचाळून बेशुद्ध पडायच्या मार्गावर असताना त्या माणसाला कोणीतरी आवरले. वरची एकही बाई किंवा मुलगी त्या म्हातारीला वाचवायला आली नाही. कुणीतरी कुणालातरी दुसर्‍या मजल्यावर हसून फक्त इतकेच म्हणाली.. 'ए देख ना अन्घा.. बुढ्ढी फिर रोरही है.. आजा आजा'! ती अनघा का अन्घा कोण ती साडी वगैरे अंगावर नसताना तशीच खिदळत बाहेर आली अन त्या म्हातारीला उद्देशून काहीतरी चेष्टा करून आत गेली.

केवळ पंधरा सेकंद! केवळ पंधरा सेकंदात इतके प्रकार घडलेले ललिताने पाहिले होते.

कुठे जगता तुम्ही? पुण्यात? कर्वे रोड? पटवर्धन बाग? प्रभात रोड? कोरेगाव पार्क? औंध?

मुंबई? दादर? पार्ले? कुलाबा?

की.. भारतात नसताच? सिंगापूर? एन. झेड.??.. ऑस्ट्रेलिया?? 'यो'रोप?? की.. स्टेट्स..??

जगा जगा! आरामात जगा! आणि...

.... या कथानकाकडे बघून हसा.. नाक मुरडा.. थट्टा करा..

बुधवार पेठ! या नावाची एक शाळा आहे पुण्यात! जन्माला येणे ही चूक आहे हे तिथे शिकवले जाते.

ललिताच्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. गर्रकन ती मागे वळली अन पुन्हा शहारली.

कबीर! तोंडावर असंख्य व्रण! एक डोळा गेलेला! उघडाबंब! रानटी दिसणारा... आणि बोलला काय??

अवाकच झाली ललिता.. त्याचे बोलणे ऐकून..

कबीर - दुनियाके सबसे गंदे माहौलमे आगयी है बहन तू.. जिसको वेलकम कहते है.. उसके पासमे तोहफा नाम की एक बिल्डिंग है.. वो और वेलकम छोडके.. सब दोजख है दोजख.. और.. आहिस्ता आहिस्ता येभी जानजायेगी.. के वेलकम.. और तोहफा.. दोजखसे बढकर कुछ नही.. दरस्सल.. उससेभी खतरनाक है.. उससेभी घटिया किसमका दोजख है ये.. कबीर कहते है मुझे.. पचास साल का हूं.. पिछले चालीस सालसे यही हूं.. किसीभी वक्त जरूरत पडे... सिर्फ पुकारना..

कबीर गर्रकन वळून जात असताना दारापाशी पुन्हा थांबला.. ललिताकडे बघून बोलू लागला..

कबीर - शरीफासे बचके रहेना.. और मुंगुससे.. शरीफा औरतकेही साथ सोती है.. और मुंगुस कुत्ता है... और एक बात.. बच्चेको जितने जल्द हो सके.. भगादे यहांसे.. किसीभी भले इन्सानके साथ.. नही तो.. भडवा बनेगा ये.. ज्यादा टाईम नही लगता यहांपर.. दलाली सीखनेमे..

'भडवा बनेगा ये'... 'भडवा'...

कबीर काय बोलला त्यातील अक्षरही साहूला समजले नव्हते. आणि कबीर काय बोलला ते ऐकून ललिता मुळासकट हादरली होती.

साहूला कितीतरी क्षण मिठीत घेऊन ती मूक रडत दाराकडे बघत होती. उघड रडणे शक्यच नव्हते. साहूने भोकाडच पसरले असते आई रडते म्हंटल्यावर..

निर्णय... निर्णय... निर्णय!

अत्यंत जलदगतीने निर्णय घ्यायला हवेत. ललिता कन्व्हिन्स्ड होती.

पहिले म्हणजे.. गंगाबाईशी पुन्हा सूत जुळवायचा प्रयत्न करणे.. अगदी.. संगीताची माफी मागायला लागली तरी चालेल..

कारण डिस्को.. कसेही असले तरी व्यवस्थित माहीत होते.. अनुभव होता तिथला..

दुसरा निर्णय म्हणजे.. मुंगुस अन शरीफाबी.. अत्यंत जपून अन लांब राहायचे यांच्यापासून..

तिसरा निर्णय फारच महत्वाचा.. येणार्‍या प्रत्येक गिर्‍हाईकाचे मन तपासायचे.. चांगला माणूस वाटला की साहूचा विषय काढून पाहायचा.. शपथ द्यायची शरीफाबीशी बोलू नको याची.. कारण साहू गेला तर आपण इथून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करू हे सगळ्यांनाच माहीत आहे.

आणि.. खरे म्हणजे.. चवथा निर्णय.. योग्य आहे की नाही माहीत नाही.. पण.. आपल्या सुरक्षिततेसाठी तरी घ्यायलाच हवा..

कबीर! कबीर हा माणूस चांगला आहेच हे इतक्यात मान्य करायचेच नाही.. हा तो निर्णय..

नाना साठे! तो माणूस परत इथे आला तर?? किती बरे होईल! कदाचित तो साहूला तरी निदान घेऊन जाईल..

एकदा साहू निघून गेला की मग आपल्याला पळायला प्रॉब्लेम यायचा नाही..

ललिता वेलकममधे आल्याक्षणापासून बिथरलेली होतीच.. कबीरने आणखीनच घाबरवून सोडले.. त्यातल्यात्यात दोनच गोष्टी जरा तरी बर्‍या होत्या...

कबीर तिला 'बहन' म्हणाला होता.. आणि 'सिर्फ पुकारना' असेही म्हणाला होता..

इस्माईल अन कबीर .. खूपच फरक होता दोघांमधे!

'वेलकम और तोहफा पीछलेवाली बिल्डिंगसेभी घटिया किस्मका दोजख है.. '

कबीरच्या या विधानाचा अर्थ समजला असला तरी 'असे कसे असेल' हे लक्षात येत नव्हते. कुठे मागची ती घाणेरडी बिल्डिंग आणि कुठे हे वेलकम!

क्षणार्धातच पहिली चुणूक दिसली..

जीवाच्या आकांताने कुणीतरी मारलेल्या किंकाळीने ललिता प्रचंड भेदरून बाहेर धावली तेव्हा..

एका पन्नाशीच्या पुढच्या बाईला स्वतःच्या गुडघ्याने जमीनीवर दाबून ठेवून हातातील सिगारेट तिच्या तळहातावर विझवणारा अन क्रूर चेहर्‍याने खर्जातल्या आवाजात बोलणारा पंचविशीचा रॉकी म्हणत होता...

रॉकी - ***** तेरी वजहसे नौकरीभी नही मिलरहेली है मेरेको... रंडीकी औलाद कहके मजाक करके निकालदेते है ऑफीससे.. कोई प्यून भी नही बनानेको मंगता मेरेको.. किसलिये बनी धंदेवाली जवानीमे?? आं? किसलिये?? मेरा बाप मरगया था क्या?? स्साली.. ****** .. तू अगर मेरी अम्मा नही होती यहांपर गला काटदेता था तेरा.. शरम कररहा हूं इसलिये बचगयी तू ***...

आणि ती बाई अतीव वेदनांमधूनही आवाज काढून म्हणत होती..

ती - तेरे बापनेही लगायारे बेटा धंदेपर.. मै कैसे क्या आऊंगी खुद होके.. मत मार.. मुझे ...

कबीर तिला वाचवायला धावल्यावर रॉकी घाबरून उठला. कबीरने खाडकन त्याच्या कानाखाली आवाज काढला.

आणि.. त्याचक्षणी साहूने ललिताला विचारलेल्या प्रश्नावर ललिताच्या मनात सहस्त्रावधी आक्रंदने झाली.. जी चेहर्‍यावर दाखवणे शक्य नव्हते..

साहू - बेटा माको मारभी सकता है मां.....???

गुलमोहर: 

नको बेफिकिरजी , लिखाण अजिबात थांबवू नका... जर अ‍ॅडमिनला काहिच हरकत नसेल तर खरच नका बंद करू..
अहो हा असा विषय आहे की , तुम्हि जरी ईथे लिहायचा थांबवलात तर काय हा विषय संपुष्टात येणार नाही, म्हणजे दुसरीकडे ईतर कोठेही वाचण्यात येऊ शकतो, पेपरमध्ये, एखाद्या कादंबरीतच.. कितीजणांना थांबणार ?

बापरे भयंकर...
बेफिकीर..तुम्ही म्हणता तशा पांढरपेशा जगातील मी एक. पूर्वी गणपती मंडळाचे काम करताना ढोल-ताशाच्या कामासाठी त्या भागात जावे लागायचे. त्यावेळी आम्हाला बजावले असायचे इकडे तिकडे भटकायचे नाही..फक्त काम करायचे आणि परत. तरीही आम्ही हळूच नजर चोरून इकडे तिकडे पहायचो. त्यावेळी अर्थात काही कळायचे नाही कि या बायका अशा खाणाखुणा करून का बोलावतात ते. नंतर मग काही लेख,या बायकांच्या समस्या यावर कधीतरी वाचल्यानंतर वास्तवतेची जाणिव झाली.
पण पोटात कालवाकालव झाली तो एक प्रसंग मला आठवतो...
रात्री उशीरा कामावरून घरी जाताना लक्ष्मी रोडने चाललो होतो. पावसाळा होता आणि नुकताच जोरदार पाऊस पडून गेला होता. आणि त्यावेळी माझे लक्ष रस्त्याच्या बाजूला गेले. तिथे तिन-चार जणी अक्षरश कुडकुडत गिऱ्हाईक पटवत होत्या.
काय वाटत असेल त्यांना त्यावेळी. मला माहिती होते माझे उबदार घर माझी आत्ता वाट पहात असेल. मी भिजून येईन हे माहीती असल्यामुळे आईने गरमा-गरम काहीतरी बनवले असेल. ते खाऊन, छानपैकी पांघरूण घेऊन मी सुखात झोपणार आहे. यांच्या आयुष्यात असे काय सुखाचे असेल.
आपण कल्पनाही करू शकणार नाही असे भिषण असेल असे वाटत होते तुमच्या लेखनामुळे त्याची यर्थाथ कल्पना आली.
तुमचे लिखाण असेच चालूंद्या...

कुठे जगता तुम्ही? पुण्यात? कर्वे रोड? पटवर्धन बाग? प्रभात रोड? कोरेगाव पार्क? औंध?

मुंबई? दादर? पार्ले? कुलाबा?

की.. भारतात नसताच? सिंगापूर? एन. झेड.??.. ऑस्ट्रेलिया?? 'यो'रोप?? की.. स्टेट्स..??

जगा जगा! आरामात जगा! आणि...

.... या कथानकाकडे बघून हसा.. नाक मुरडा.. थट्टा करा

>>>> तुमची कथा आवडली. तुम्ही नेहमीप्रमाणेच चांगल, वेगवान लिहीत आहात.

पण ह्या वरिल वाक्यांची काही जरुरी नाही. ह्यामुळे कथा लेखकाला कथा लोकांना आवडेल की नाही ह्याचाच प्रश्न पडला आहे असे वाटते. (नाक मुरडा, थट्टा करा) तुम्ही कथेशी प्रामाणिक आहात तर लोकांना आवडायचा प्रश्न का पडावा? शिवाय बघा तुमच्या पेक्षा एक वेगळे जग दाखवुन देतो अशी एक दर्पोक्ती त्यावरुन दिसते.
तुम्ही कथा लिहा. कुणी म्हणल्यामुळे थांबवू नका. पण वरिल वाक्यांसारखे वाक्य कथेत लिहू नका. त्यामुळे फ्लो बिघडतो. ( व्यक्तीगत मत कथेवर हावी होते). तुम्ही हे मत जरुर प्रतिक्रियात मधून मांडा.

३ भाग सलग वाचुन काढले आहेत. हादरणे म्हणजे काय ते अनुभवतो आहे.
कस काय सुचत हो तुम्हाला इतक लिहायला??

Pages