नागदर्शने!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कोकणामधे राहिल्यावर सर्वात जास्त सवय कशाची झाली असेल तर ती जनावराची. महिन्याभरात तरी कुणाकडे जनावर निघालं, मग ते जातिवंत होतं का, त्याला कसं पकडलं वगैरे चटपटीत गॉसिप ऐकलं नाही असं होतंच नाही.

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे त्याचे बाहेर पडायचे दिवस. नेहमीचं दमट हवामान त्याला मिळालं नाही की तो स्वतःच शोधत निघतो, मग कुणाच्या कपाटात, संडासात, मोरीत, बेसिनमधे आलेला दिसला, की समोरच्याची हबेलहंडी उडालीच.

हो, इथे सापाला, नागाला "जनावर" किंवा "लांबडं" असंच म्हणायचं असतं. त्याचं नाव घ्यायचं नसतं, कारण नाव घेतलं की तो येतो. त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं नाही. आणि नाव घेतलं नाही म्हणून तो यायचं काही थांबत नाही. Proud नाग असेल तर "जातिवंत". असाच काही धामण वगैरे साधा प्रकार असेल तर "आदलं".

एकतर कोकण म्हटलं की भुताखेताच्या, नागाच्या वगैरे आख्यायिका आल्याच. त्यात परत हा तर सतत दर्शन देणारा प्राणी. याच्याविषयीच्या गप्पा एकदा चालू झाली की संपता संपत नाहीत, मग कुणाच्या घरात कसा आला होता, ते पासून तो कुणाचा पूर्वज आहे... अशा चर्चा चालतात. थोडाफार श्रद्धेचा विश्वासाचा विषय आहेच.. पण तरी नागाचे अथवा सापाचे जिवंत दर्शन यासारखा दुसरा अनुभव नाही. प्राणिसंग्रहालयात ठेवलेले ते कोमेजलेले साप वेगळे आणि डोळ्याच्या समोरून पापणी लवेल ना लवेल असा पळालेला साप वेगळा. त्याचे दर्शन कितीवेळा अनुभवावे तितके थोडेच!!

हे सर्व किस्से अर्थात मी स्वतः डोळ्यानी पाहिलेल्या सापांचे. अजून गाडीच्या समोरून गेलेल्या, असेच रस्त्यावर फिरताना दिसलेले नाग किन्वा साप चिक्कार आहेत. त्यामधला एक मात्र चांगलाच लक्षात आहे. काळे पांढरे ब्लॉक्स एकासमोर एक ठेवल्यावर कसा दिसतो तसा होता तो. आणि दिसला होता मध्यरात्री बारा वाजता!!

ऐकीव किस्से तर भरपूर आहेत. पण ते ऐकायला मस्त वाटत असले तरी त्याची सत्यासत्यता माहित नसल्यामुळे इथे टाकलेले नाहीत.

अशाच काही सापाच्या दर्शनाचे हे किस्से.

=============================================
आमचे मोरे म्हणून एक शेजारी होते. ,त्याच्या घरात आतापर्यंत कितीवेळा साप नाग विंचू निघाले असतील याची कल्पनाच नाही. आणि दरवेळेला काहीतरी विनोदी किस्सा हा घडलाच पाहिजे!!! त्यातला हा सर्वात धमाल किस्सा.

त्या वेळेला मी साधारण सातवीमधे असेन. मोरे व आम्ही तेव्हा भाड्याच्या घरात राहत होतो. ही घरे बर्‍यापैकी प्रशस्त होती पण चाळ टाईप एकाला एक लागून अशी होती. एकदा त्याच्या घरामधे एक जातिवंत नाग निघाला. आरडाओरड करून आजूबाजूचे बरेच जण जमले. नागमहाशय ट्युबलाईटच्या पाठी जाऊन लपले. वेळ संध्याकाळची. म्हणजे अंधार व्हायच्या आत त्याला पकडायला हवाच. बरं, नाग तिथे आहे हे दिसतोय. म्हणजे गाफीलगिरी करून चालणार नव्हतं. ट्युबलाईट चालू बंद करून पाहिली. बराचे वेळ काठीने टाकटून करून शुक शुक करून पण काहीच हालचाल होइना. शेवटी माझ्या पप्पानी हिम्मत करून ट्युबलाईट काढली. आणि मग रिकाम्या रॉडच्या बाजूने तिघाचौघानी काठी मारायला सुरूवात केली.
असाच एक अर्धा पाऊण तास गेल्यावर नागाला बहुतेक जाग आली. (बुधवास असावा असं मला अंधुक आठवतय)...

तवर बराच वेळ त्याला मारायचं की नाही यावर चर्चा चालू होती. बाया आणी आमच्यासारखी लहान मुलं यानी या चर्चेला नवनविन रंग भरायला सुरूवात केली होती. "या नागाने एखाद्या पिक्चरमधे काम केलेलं असेल का?" हा चर्चेचा प्रमुख मुद्दा होता.

नागाला त्या चर्चेमधे सहभागी व्हावंसं वाटलं म्हणून तो सुम्मकन आमच्या दिशेने आला. अवघं पाच दहा फुटाचं अंतर होतं. दोघा तिघानी काठ्या हाणल्या. बहुतेक कुणाकडे तरी कामेरू होतंच आणि त्याने तो नाग मेला. Sad कसले सॉल्लिड घाबरलेलो होतो आम्ही त्या वेळेला. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय ते तेव्हाच समजलं.

आमचे तेव्हाचे घरमालक पण ग्रेटच होते. नागाला अग्नि देणे वगैरे त्याना काही मान्य नव्हतं. गर्दीची बरीच पांगापांग झाल्यावर त्यानी सरळ तो नाग काठीवर उचलला. आणि रस्त्यावर फेकला. नाग आपसूक रस्त्यावरून जाणार्‍या एस टीमधे. लोकाचा किंचाळायचा आवाज आणि एसटीने करकचून ब्रेक मारल्याचा आवाज..

आणि आम्ही सर्वजण सुमडीत घरामधे!!!! आजतागाय्त त्या एसटीमधल्या लोकाना तो मेलेला नाग कुठून आला ते समजलेलं नाही!!
=================================================

याच मोरेकाकूनी नंतर थोड्या दिवसानी रत्नागिरीच्या थोडं बाहेर घर बांधलं. तेव्हा अजून रेल्वे स्टेशन वगैरे झालं नव्हतं. त्यामुळे हा भाग बराचसा जंगली होता. (होता काय, अजून आहे!!) त्यानंतर तीन वर्षानी आम्ही पण इथेच जवळपास घर विकत घेतलं. अर्थात वस्ती वाढायला लागली तशी हे "भूमिपुत्र" वारंवार आंदोलनं करताना दिसायचे. त्यात परत मोरेकाकूकडे तर बघायलाच नको.

आम्ही असेच केव्हातरी एकदा त्याच्याकडे गेलो होतो. काकूनी दरवाजा लावला, तिथे बसलेला एक साप सरळ त्याच्या गळ्यात!!!! अगदी शंकराच्या फोटोमधे असतो तस्साच. त्याना घाबरून एक शब्द बोलता येइना. आणि त्याच्या मुलाला आणि मला हसू आवरेना. आदलं होतं म्हणून बरं आहे नाही तर काही खरं नव्हतं. एक अर्ध्या मिनिटाने बिच्चारा निघून गेला. तवर काकू अगदी "स्टॅच्यू!!"

=================================================

हे नाग दर्शन नव्हे.. पण तरी रोमांचक.

एकदा आमच्याकडे यल्लम्माच्या डोंगरावरून आलेली एक बाई आली. कानडी बोलत होती. ती बाई आमच्या अंगणात बसली. जवळ जवळ अर्धा तास डोळे मिटून बसली होती. तशी माझी आई श्रद्धाळू!! त्यात परत आमचे पप्पा खूप आजारी होते. डोक्याला मार लागल्याने तीन महिने कोमामधे आणि नंतर शुद्धीत आल्यावर सुद्धा डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागायचे. आईने तिला शिधा दिला. बाकी काहीच बोलली नाही. ती बाई म्हणाली, तुझा नवरा आजारी आहे का?

आई जरा चकितच झाली कारण पप्पा सतत घरातच होते.. ते अजिबात बाहेर आलेलेच नव्हते. त्या बाईने आईला एक साडी आणून दे, पुढे काही बोलू नकोस असं सांगितलं. आईने एक चांगल्यातली नेसायची कॉटनची साडी आणून दिली. त्या बाईने त्या साडीची चुंबळ केली आणि पायाखाली तुडवली. आईला म्हणाली की, "तुझ्या घरात तो नाग होऊन बसलाय. जसा जसा तो वेढा आवळेल तसा तुझा नवरा सुकतोय, मी त्याला बाहेर नेऊन जाळते. जसा तो जळेल तसा तुझा नवरा माण्सात येइल, येत्या पुनवेला तो तुझ्या टाचेखाली येइल की नाही बघ" तिच्या मते, पप्पावर बाहेरची करणी वगैरे असा प्रकार झालेला होता.

आई आमची तशी देवभोळी. त्यात परत पप्पाचे असे चालू असल्याने तिचे आपले नवस वगैरे चालूच होते. आता साक्षात देवीची बाई येऊन धीर देते म्हटल्यावर तिला अजूनच बरं वाटलं. तिला पैसे वगैरे काही देऊ का? आईने विचारलं. त्या बाईने सांगितलं "पैसे वगैरे काही नको तुझ्याकडून. तुझ्या लेकीच्या लग्नानंतर ओटी भरायला येशील तेव्हा बांगड्या फक्त चढव मला." आणि ती निघून गेली.

आईने हा किस्सा आम्हाला सांगितला तेव्हा मी आणि भावाने तिला वेड्यात काढलं. चांगली साडी घेऊन ती बाई लुबाडून गेली हेही पटवायचा प्रयत्न केला. नंतर तीन चार दिवसाचीच गोष्ट. पप्पाना चेकपसाठी हॉस्पिटलला घेऊन जात होतो. जिथे पप्पाचा अपघात झाला त्याच ठिकाणी ड्रायव्हरने गाडीला ब्रेक मारला. खाली उतरून पाहिलं तर एक भला मोठा सहा फुटी नाग चाकाखाली आलेला. आईला घरी येऊन सांगितलं तर आईने लगेच कालनिर्णय पाहिलं... पौर्णीमाच होती त्या दिवशी.

त्यानंतर पप्पाची तब्बेत खूप सुधारली. किंबहुना, हा माणूस "असा" झाला होता यावर देखील कुणाचा विश्वास बसणार नाही इतकी!!!

=================================================

आमच्या गल्लीत वायंगणकर म्हणून एक कुटुंब राहते. त्याच्याकडे एकदा एक साप निघाला. गल्लीत साप निघाला म्हटलं की बघायला जायलाच हवे. त्यात परत वायंगणकरकाका सर्पमित्र. त्यामुळे गल्लीत कुठेही साप निघाला की, सापाला न मारता त्याला बरणीत अथवा पोत्यात घालून ते कुठेतरी दूरवर नेऊन सोडतात.

इतका सुंदर साप मी आयुष्यात कधी बघितला नसेल. अगदी सोन्याच्या साखळीसारखा दिसत होता. वायंगणकरकाका त्याला अगदी एका रुमालाच्या मदतीने खेळवत होते. साप बिनविषारी असल्याची माहिती त्यानी दिली त्यामूळे आम्हीपण जरा धीर करून साप जवळून बघत होतो. अवघा दोन अडीच फूट लांब आणि पाव फूट रूंदीला. अगदी चपळ साप होता. काका त्याला बरणीमधे घालायच्या प्रयत्नात होते. पण पठ्ठ्या काही केल्या दाद देत नव्हता. आणि मधेच एक क्षणभर काकाचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले... त्याबरोबर तो जो काही गायब झाला!! अगदी आम्ही समोर उभे असून पण आम्हाला तो अदृश्य झाल्यासारखा वाटला, इतक्या वेगाने तो निघून गेला. त्यानंतर आजतागायत कधीच आमच्या गल्लीत परत कुणाला दिसला नाही.

=================================================

आमच्याच घराजवळची ही गोष्ट. राणे म्हणून एक कुटुंब आहे, एकदा एक नागमहाराज त्याच्या संडासात पहाटेच आले. सर्वात आधी राणेकाकू गेल्या, लाईट लावल्यावर त्याने एकदम "हिस्स्स" करून फणा काढला. आता राणेकाकू काय आत जातील??? अख्खी गल्ली जमा झाली. नागोबाचा फणा काही खाली येइना. आणि आपली जागा काही ते सोडेनात. बराच वेळ त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचे प्रयत्न झाले. नाग पकडणार्‍या तज्ञ व्यक्तीना फोन करून वगैरे बोलावलं. शेवटी कुणाचेच लक्ष नसताना नागोबा निघून गेले. गल्लीतले सर्वजण "आयला आपल्या घरात तर नासेल ना घुसला" ही शंका मनात ठेवून.

राणेच्या घरातला दिवस चालू झाला. राणेकाका, त्याची दोन मुलं "जाऊन" आली. नंतर राणेकाकू परत गेल्या. तर नागोबा परत तिथेच हजर!!!!

परत पहाटेचाच प्रसंग रीपिट. अख्खी गल्ली हजर. वायंगणकरकाका पोतं घेऊन हजर. पण तेवढ्याशा जागेत त्याला पकडायला जमलं नसतं. आणि तो तिथून बाहेर यायला तयार नाही. बरं नाग अगदी चिडलेला. साट साट फणा आपटत होता.

काकू अगदी हात जोडून त्याला म्हणाल्या "कारे बाबा छळतोयस मला? काय पाप केलय मी?" आम्ही सर्वजण फिदीफिदी हसतोय!!!

शेवटी नागोबाला दया आली आणि मग काकानी त्याला पोत्यात भरून नेलं आणि दूर जंगलात सोडून आले.
================================================

आमच्याच गल्लीत आणेराव म्हणून एक गृहस्थ भाड्याने होते. त्याचे मूळ गाव संगमेश्वरमधलं आंबवली. ते मार्लेश्वर या कोकणातल्या देवस्थानचे मानकरी आहेत. हा मार्लेश्वर साप आणि नागासाठी खूप प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की, नाग चावलेला माणूस जर मार्लेश्वरच्या गाभार्‍यात गेला तर त्याचं विष लगेच उतरतं.

तसे हे आणेराव वयाने चांगले सत्तरीचे आहेत. त्याना नुकतेच मधुमेहाचे निदान झाले होते. पण पथ्य औषधे वगैरे ते काहीच पाळत नव्हते. एकदा असेच त्याचे सुनेबरोबर काहीतरी भांडण झाले. आणि त्यानी मधुमेहावरच्या तीन की चार गोळ्या एकदम घेतल्या. त्याची शुगर अचानक डाऊन झाली. डोळे पांढरे केले. आणि खाली पडले.

त्याना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी म्हणून गल्लीतले सर्वजण जमले. त्याच्या मुलाला फोन केला. गल्लीमधेच एक इनामदार म्हणून डॉक्टर आहे, त्याने ग्लूकोमीटरवर चेक केले तर शुगर २९. माझा भाऊ गाडी काढतच होता. इतक्यात त्याच्या कंपाऊंडमधे एक नाग आला. आणि फणा काढून उभा राहिला. जिथे आजोबा खाली पडले होते त्याच्या मागेच!!!

त्या म्हातार्‍याला उचलून गाडीत घालायची घाई. त्यात परत हे अजून एक!!! त्याच्या सुनेने नमस्कार केला. "मार्लेश्वरा, तुझी कृपा झाली. तू आलास. आता काही होत नाही माझ्या सासर्‍याला" असं म्हणाली.

अर्थात दवाखान्यात नेइपर्यंत काहीच खरं नव्हतं, तिथे नेऊन देखील डॉ़क्टर काहीच खात्री देत नव्हते. चार दिवसानंतर आजोबा टुणटुणीत होऊन घरी परत आले. वर माझ्या भावाला म्हणाले "मार्लेश्वर जवर सांगत् नाही मला इथून जा म्हणून तवर मी काय मरत नाही."

=================================================
आमच्या बाजूला जो बंगला आहे तो आहे एका मुंबईकराचा. ते वर्षभर इथे नसतात, उन्हाळ्यामधे अथवा क्रिसमसच्या सुट्टीलाच इथे येतात. पण एकंदर त्याचा रूबाब आपण "मुंबईकर" अस्ल्याचा आणि आजूबाजूचे सर्वजण "गावातले" अस्ल्याचा जास्त आहे. त्यामुळे सर्वाशीच त्याची भांडणे झालेली आहेत.
नेमके हे लोक रत्नागिरीतच होते आणि त्याच्या कंपाऊंडमधे जनावर निघालं.

चांगलं दहा फूट लांब आणि धिप्पाड जातिवंत जनावर होतं, काळं कुळकुळीत आणि फणा काढून ताठ बसलं होतं. सकाळी सात साडेसातची वेळ असेल. कितीतरी वेळ ते माडाच्या खाली बसून होतं. मुंबईकरानी ताबडतोब "त्याच्या ओळखीतल्या" माणसाला मारायला बोलावून घेतलं.

आमच्या गल्लीतले वायंगणकरकाका आणि पिलणकर म्हणून एक आहेत ते त्याना समजावत होते की याला मारू नका, हा राखणदार आहे.

मुंबईकराचे म्हणणे असे की हा आमच्या कंपाऊंडमधे निघालाय, आम्ही मारू नाहीतर अजून काही करू.. विचारणारे तुम्ही कोण? (याला फ्लॅट संस्कृती म्हणतात!!!)

ज्या ठिकाणी आमची हाऊसिंग सोसायटी उभी आहे ती जागा आधी पिलणकराची होती, आणि त्याच्या मते हा त्या जागेचा राखणदार आहे. रक्षणकर्ता आहे, त्याला अजिबात मारायचे नाही. पण मुंबईकर ऐकतच नव्हते. शेवटी "बाचाबाची" चालू झाली. आणि तो नाग हे सर्व अगदी शांतपणे बसून ऐकत होता.

कितीतरी वेळ भांडण चालू होतंच. शेवटी नाग कंटाळला बहुतेक.. आणि समोरच्याच्या कंपाऊंडमधून निघून गेला. Happy

=================================================

Happy

विषय: 
प्रकार: 

कोकणातलाच नव्हे तर देशावरचा पण माणूस अशा गप्पा मारतोच.

आम्ही १९७४ साली कुर्ल्याला रहायला आलो, तर त्यावेळी तिथे खुप साप दिसायचे. एकदा रस्त्याच्या कामावरचा मोठा दगड मी शोभेसाठी म्हणून घरात आणला. बाल्कनीमधे बहीणीला त्यावर पाणी घालायला सांगून धूत होतो. तर तिला अचानक खाली साप दिसला, ती ओरडली, आणि मी दगड खाली टाकून दिला.
त्याखाली सापडून साप मेला. अशा अपघाताची त्याने पण कधी कल्पना केली नसेल.

एकदा दोन मायबोलीकरांसोबत सावंतवाडीच्या नरेंद्र डोगरावर गेलो होतो. एक जण पाठ करुन लघुशंकेला उभा राहिला, आणि आम्हा दोघाना मोठा साप दिसला, "त्या" ला ओरडून असे साप साप सांगू लागलो, पण तो वळेपर्यंत, साप निघून गेला होता. (तो म्हणाला, तूम्ही उगाच ओरड्लात आणि माझी घाई झाली.)

गोव्याला माझी आणि गिरिराजची बाईकवरुन खुप भटकंती व्हायची. एकदा उतारावरुन भन्नाट वेगाने येत होतो तर आडवा जाणारा मोठा साप मला दिसला. ब्रेक लावणे गिर्‍यालाही शक्य नव्हते आणि सापालाही.
अक्षरशः दोन फुटासाठी आमची चुकामूक झाली.
पण हे मात्र खरे, कि साप एकदा गुडुप झाला, कि कुठे गेला ते कळतच नाही.

नन्दिनी, एकेक ष्टोरी जबर्‍याच! Happy
माझी आज्जी कोकणातली.... अगदी सहज साप हाताळायची. आपण मांजर वगैरे हाताळू ना, इतक्या लीलया. तिला त्याची भीतीच नसायची. आणि त्याचा उल्लेख ''जनावर'', लांबडं, किरडू, वळवळं असा करायची.... तिचे त्याबाबतचे किस्से खरोखरी लिहिण्यासारखे आहेत!

सापाचा/नागाचा जनावर असा उल्लेख आमच्याकडे (देशावर/घाटावर काय असेल ते) पण होतो. आमराई असेल तर हमखास धामण निघते. आमराईतुन चालत जाताना खांद्यावर/गळ्यात धामण पडल्याचे अनेक किस्से गावात ऐकायला मिळतात. ऊसाच्या रानात पण साप आणि धामणी दोन्ही निघतात.

श्रीरामपूरला आमच्या कॉलनीत एक साप मुक्कामी आहे. एकच आहे की अनेक काही माहिती नाही. पण साधारण मनगटाएव्हढा रुंद आणि पाचेक फूट लांब साप नेहेमी दिसतो. एकदा सोनी (मांजरी) शेपूट फुगवून फिसकारत होती म्हणून बघितले तर गेट आणि कंपाउंड वॉलच्या मधल्या खाचेत आराम चालला होता. बरेचदा बागेत कात मिळते.

बाकी कोकणातली लोकं बरीच अंधश्रद्धाळु म्हणायची.

बाकी कोकणातली लोकं बरीच अंधश्रद्धाळु म्हणायची.

>> अर्थातच.. पण याच अंधश्रद्धेमुळेच बर्‍याचदा इथे जनावरं मारत नाहीत. एका अर्थाने ते बरंच आहे. Happy

..

>>नाग आपसूक रस्त्यावरून जाणार्‍या एस टीमधे.<<

>>आम्ही असेच केव्हातरी एकदा त्याच्याकडे गेलो होतो. काकूनी दरवाजा लावला, तिथे बसलेला एक साप सरळ त्याच्या गळ्यात!!!! अगदी शंकराच्या फोटोमधे असतो तस्साच.<<

का फेकताय? Biggrin

सही आहेत किस्से
माझ्या लहानपणी पुण्याला आमच्याही कॉलनीत अधूनमधून साप निघायचे.
विशेषतः पावसाळ्यात बेडूक खूप असायचे आणि मग अधूनमधून सापही दिसायचेच.
आमच्या शेजारच्याच घरात फुरसं निघालं होतं आणि दादा-काका लोकांनी त्याला दोन्ही बाजूंनी दाबून ठेवलं होतं ते चांगलं आठवतंय.
सुदैवाने श्री. निलिकुमार खैरे आमच्या जवळच रहायचे त्यामुळे जनावर दिसलं की पळत पळत त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलावून आणण्यातही जणू आपणच साप पकडल्याचा आनंद व्हायचा Happy

मंगलोर, कर्नाटक जवळील केक्के सुब्रमण्यम देवळात पाच डोक्याचा नाग/साप निघाला म्हणे.
त्याचा फोटो मला इथे देता येत नाही, पण कुणि जर इ-मेलचा पत्ता दिला तर मी इ-मेल फॉरवर्ड करीन.

नंदिनी, सॉलिड किस्से आहेत एकेक.
तुझ्या पप्पांच्या आजारपणामधील किस्सा वाचून मात्र खरंच काटा आला !

नंदिनी, सहीच किस्से आहेत गं सगळे. तो गळ्यात साप पडल्याचा तर एकदम भारी. विषारी असो वा बिनविषारी, माझ्याबाबतीत असं झालं तर जागीच हार्टअटॅक नक्की.

माझंही गाव कोकणातलं, त्यामुळे हे जनावर सापडणं वगैरे खूपच परिचयाचं. लहान असताना सुट्टी लागली की मुक्काम कोकणातच. मला आठवतंय, माझी आज्जी शेजारच्या काकूच्या घरात झोपली होती तेव्हा तिच्या पासून हाताच्या अंतरावर मण्यार सापडला होता. मग काय, त्याला पकडून मारेपर्यंत आमच्या जिवात जीव नव्हता.

छानच वाटलं वाचताना.

पण याच अंधश्रद्धेमुळेच बर्‍याचदा इथे जनावरं मारत नाहीत. एका अर्थाने ते बरंच आहे.>>>>>अगदी अगदी