फुलपाखरू.....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अंगावरचं निथळणारं पाणी टिपत ती बेडरूम मध्ये शिरली. केसांना गुंडाळलेला टर्किश टॉवेल भिजून अजूनच चिंब झाला होता. बाथकोटच्या गाठीला पुन्हा एकदा नीट बांधून तिने केस मोकळे सोडले. ओला टॉवेल तसाच कोपर्‍यात भिरकावून ड्रेसर मधून दुसरा टॉवेल काढला.

'आंघोळ केल्याकेल्या असं आरशापुढे उभं रहाणं किती मस्त वाटतं नाही?' ती मनाशीच म्हणाली. हा तिचा रोजचाच दिनक्रम असला तरी आंघोळ आणि नंतर आरश्यापुढे उभं राहून, भरपूर वेळ काढून नट्टापट्टा करणं हा तिचा छंदच होता. नव्या टॉवेलने केस झटकून पुसत तिने तो ही टॉवेल कोपर्‍यात भिरकावला. निथळणार्‍या पाण्याच्या शेवटच्या थेंबाची सुखद जाणीव होईपर्यंत तिने केसांशी खेळून घेतलं. एकादी बटा डोळ्यावर ओढून पाहिली मग ती मागे सरकवून पाहीली. मग समोर ठेवलेल्या परफ्युमच्या बाटल्यातून कालच आलेली एक बाटली निवडली. हवेत एक फवारा मारून तिने त्यातून चालण्याचा प्रयत्न केला. अंगावर फवारा मारण्यापेक्षा तिला असं करायला आवडायचं. मग परफ्युमचा एक हलकासा थर सगळ्या शरीरावर अलगद पसरायचा.

'ए बहिरट, इथे टॉवेल पडले आहेत, ते काय तुझा बा उचलणार?' दरवाजा किलकिला करत ती मोठ्याने ओरडली आणि परत धाडकन दरवाजा लाऊन घेतला. 'मुळात या म्हातारीला ऐकू येणारच नाहीय, मग सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय? काय पण एक एक नमुने कामाला ठेवलेत?' ती मनाशीच म्हणाली. 'जाऊदे ना, दुपारी परत येईपर्यंत बेडरूम काय, सगळं घर पुन्हा लख्ख झालेलं असेल,' तिने मनाची समजूत घातली. 'हा रवि पण वेडपट आहे. घरी मोलकरीण ठेवलीय ती ठार बहीरी, एक शब्द ऐकू येईल तिला तर शप्पथ. मी हे घर चालवत असते तर पहिल्यादिवशी कामावरून हाकललं असतं. हे घर माझं असतं तर....'

गेल्याच आठवड्यात आलेला एक मस्त मोरपिशी पंजाबी कुर्ता काढून ती हलकेच त्यात शिरली. पाच मिनिटात बाकी तयारी करून ती बेडरूम मधून बाहेर आली.

'मी बाहेर चालले गं,' किचनकडे बघत ती ओरडून म्हणाली. 'आली म्हातारी, बघत बसली असेल बेडरूमच्या दाराकडे,' ती मनाशीच म्हणाली. ती खोलीतून निघून गाडीत बसेपर्यंत म्हातारीने तिकडे फिरकायचं नाही अशी शिस्त तिनेच घालून दिली होती. त्यामुळे ती कितीही ओरडली तरी म्हातारी ती निघेपर्यंत आली नसती हे तिलाही माहीत होतं. पण ओरडून सांगितल्याशिवाय आपला म्हातारीला आपला अधिकार कळणार नाही असं तिला उगीचच वाटायचं.

'जानकीबाई, बेडरूम आवरून घ्या,' रविच्या हातातला पेपर जराही हलला नव्हता. कुठली तरी अतिमहत्वाची बातमी वाचावी, असा तो त्या पेपराकडे पाहत होता.
'जसं काही ऐकणारच आहे तिला,' तिचं स्वगत चालूच होतं. जानकी लगेच पुढे होऊन बेडरूम आवरायला लागली.
'ह्या म्हातारीला ऐकू येत की काय?' एक क्षण तिला प्रश्न पडला, पण समोर रविला पाहून तो तिथेच अडकून पडला.
'बाहेस निघालीस?', तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
'हो, जरा शॉपिंग करून येते,' टिपॉयवरची पर्स खांद्यावर टाकत ती घड्याळाकडे पाहत म्हणाली.
'मग एक काम कर. मी एक पार्सल ठेवलंय इथे, ते पोस्टात टाकून ये,' त्याने टिपॉयवर ठेवलेल्या लिफाफ्यांकडे बोट केलं.
'रोज रोज कसली पत्र, पाकीटं पोस्टात टाकतोस?' ती सहज म्हणाली. उत्तरादाखल त्याने फक्त स्मितहास्य केलं
'ज्यात आपला काही संबंध नाही, त्यात आपण पडू नये,' हे त्याने तिला समजावलं तर होतंच आणि लिहूनही घेतलं होतं. त्याच्या स्मितातून तिला लगेच कळलं. वाद घालण्यात काही अर्थही नव्हता. आणि पोस्टात त्याने दिलेलं टपाल टाकणं हे फारसं मोठं कामही नव्हतं. हॉलमधल्या कपाटातून मॅचिंग चपला चढवत ती निघाली देखील.

तिला तयार होऊन हॉलमधे आलेली पाहून मुक्या आधीच जागेवरून उठला होता. पटकन जाऊन त्याने मर्सिडीजचं दार उघडलं, आणि AC सुरू केला. मग ती बसायची वाट पाहत तो दाराजवळ उभा राहीला. 'निघायचं?' या तिच्या नेहमीच्या प्रश्नाला त्याने फक्त मान हलवली. तिच्या हातातली पर्स तिच्या शेजारच्या सीटवर, आणि टपाल स्वत:च्या शेजारच्या सीटवर नीट ठेवत त्याने गाडी सुरू केली. बंगल्याला एक छोटसं वळण घेत गाडी निघाली.

****************************************************

'AC चालू कर रे,' फॅमेलीरुममधे शिरत ती वेटरला म्हणाली. वेटर पटकन उठून AC लावायला गेला. 'काय सालं हॉटेल निवडलंय? AC चालू करायला सांगायला लागतो,' ती घड्याळाकडे पाहत म्हणाली. साडेबारा वाजत आले. बाहेर उन्हाची झळ बसत होती. गाडीपासून हॉटेलपर्यंत यायला तिला खरंतर चार पावलंच टाकावी लागली होती. पण तेवढंही ऊन तिला नको वाटलं होतं. मुक्याला गाडी झाडाखाली लावायला सांगून आली होती. जाताना गाडी तापलेली असली तर ते तिला आवडणार नाही हे त्याला ही माहीत होतं. ती एकदाच त्याला ओरडली होती, आणि तेव्हापासून ती बसायच्या आधी गाडी थंड हवी हे त्याला कळलं होतं. रविने दिलेले काही नियम सोडले तर ती मुक्यावर सत्ता गाजवू शकत होती.

वेटर येऊन समोर उभा राहीला. हातातल्या वहीकडे बघताना हळूच तो तिच्याकडे टक लाऊन पाहत होता, हे तिला जाणवलं.
'एक Mango-Colddrink घेऊन ये,' ती त्याच्या नजरेला पकडत म्हणाली. त्याने पटकन नजर खाली केली.
'आणि एक बीयर,' आत येता येता राजेश म्हणाला. त्याच्या आवाजातली जरब वेटरलाही जाणवली. त्याने नजर अजून खाली केली.
'आणि हे बघ, ड्रिंक इथे ठेवायचे आणि फुटायचं काय? परत आम्ही निघेपर्यंत तू इथे दिसायचं नाही,' हातातली नोट त्याच्या खिश्यात सरकवत तो म्हणाला.
'आणि दुसर्‍या कुणालाही इथे येऊ द्यायचं नाही. काय?' तिच्याकडे न बघता वेटरने मान हलवली आणि तो मागे फिरला.
'साल्याची नजर कुठे होती ते बघितलं मी,' ती फणकार्‍याने म्हणाली.
'डार्लिंग.., असं मस्त दॄश्य समोर असताना दुसरीकडे कसा बघेल तो, पुरूष म्हणतात त्याला,' तोही तिथेच बघत म्हणाला.
'पुरे. मी प्रदर्शन नाही मांडलंय,' ती तिचा कुर्ती नीट करत म्हणाली.
'तसं नव्हे, पण इतका सुंदर चेहरा पाहिला नसेल त्याने,' राजेशच्या या वाक्याने ती किंचित सुखावली.
'काय आज भर दुपारी एकदम रोमँटिक बोलतो आहेस?' त्याला चिडवत ती म्हणाली.
'डार्लिंग, तुम पर हम तो दिवाने हैं, आजच काय तू दिसलीस की नेहमीच रोमँटीक बोलतो मी,' तो तिच्या जवळ सरकत म्हणाला. पुढे होत तिचा हात तो हातात घेणार, तेवढ्यात वेटरची पावलं वाजली. वेटर येऊन ड्रिंक्स ठेऊन गेला. यावेळी ते दोघेही त्याच्याकडे नजर रोखून बघत होते. वेटरची मान वर झाली नाही.
'अगं हे काय? मस्त बीयर प्यायची सोडून मँगो काय पितेस? मला माहीत आहे तू काय सांगणार ते.'
'मग कशाला विचारतोस?'
'एकदा माझ्याबरोबर बीयर पिऊन बघ. भर उन्हाळ्यात थंड होऊन जाशील बघ'.
'आणि तुला चालेल मी थंड झालेली?' ती त्याला चिडवत म्हणाली.
'तशी थंड नाही ग. तुम आग हो आग. कसली थंड होणार तू?'
'मग मला नको सांगूस काय प्यायचं ते. देसी ठर्रा पीत नाही मी.'
'माहीत आले मला, तुझा म्हातारा उंची दारू आणत असतो तो. आपल्याला साली ही बीयर आवडते. एक, एक घोट घे ना,' तो तिच्या जवळ सरकत म्हणाला.
'हेच. हेच आवडत नाही मला. आता असाच दारू पीत बसणार आहेस की...?' ती विचारती झाली.
'आज बीयर प्यालो म्हणून जवळ येणार नाहीस का?' तो पण थोडा लाडात आला.
'ए लाडात नको येऊ इथे. ही फॅमिली रुम आहे. तुला काय मी तुझी बायको वाटले वाट्टेल तेव्हा चिकटायला?'
'शी.. काहीतरी विषय काढून मुड घालवू नकोस. वरती रूम आहे आपली. तू चल मी आलोच,' त्याने चावी पुढे केली.
'बायकोचं नांव काढल्यावर राग आला?,' ती अजून चिडवत म्हणाली. 'मग रात्री घरी जातोस तेव्हा? तेव्हा ही आग आठवत नसेलच'.
'आता पुन्हा तो विषय हवाच का?' राजेश तिला जवळ ओढत म्हणाला.
'पाच मिनीटात वर ये. शॉपिंगला जाते म्हणून सांगून आलेय. आणि येताना बडीशेप चघळ. मला नाही आवडत तो बीयरचा वास,' ती उठत म्हणाली.
'तू हो पुढे, मी आलोच,' त्याचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच तिचा सेलफोन एका नवीन गाण्याच्या रिंगटोन वाजवत कोकलू लागला. 'ह्म्मम,' रागाने तिने सेलफोनकडे नजर टाकली.
'वाजला का? च्यायला जरा रंगात आलो की वाजतो लेकाचा. बंद करून टाक ना?'
'आणि मग काय होईल? मी नाही उचलला तर मुक्याला फोन येईल आणि तो येऊन उभा राहील. Contract केलंय ना मी त्याच्याशी. लग्नाचा नवरा नाहीय तो लटकावून ठेवायला,' ती पर्स उचलत म्हणाली.
'काय ***** कटकट आहे, दरवेळी हे असंच होतं. मी कामधाम टाकून तुझ्यामागे यायचं, तुझ्याशी दोन शब्द बोलायचे, की वाजला फोन. आणि मला काय मिळतं, परफ्युमचा वास,' तो चिडला होता.
'अरे उंची परफ्यूम आहे, असला तुझ्या घरी थोडाच मिळणार आहे,' ती त्याला अजून चिडवत म्हणाली.
'आणि माझी कंपनी तुला हवीच असते ना? मग कसलं काम आणि काय धाम? पोस्टात चाललेय,' ती डोळे मिचकावत निघाली देखील.
'आणि आता पुन्हा केव्हा?' तोही उठत म्हणाला.
'गुरूवारी. येताना पोस्टात जाऊनच येईन. कुठे भेटायचं ते Text कर, आणि वेळेवर ये.'
'तुझा हा रवी जाता येता पोस्टात काय टाकत असतो एकदा शोधून बघितलंत पाहीजे मला.'
'सगळयांवर ठेव पहारा. पोस्ट तपास, गाड्या शोध, अजून काय काय करशील?'

****************************************************

रस्त्यावर गाडी लाऊन मुक्या गाडीचं दार उघडतो म्हणेपर्यंत तिला पक्याची पोरं दिसली. पक्या आधीच आलेला असावा. धावतपळत यायचं नाटक करत ती बागेत पोहोचली.
'पक्या, बाग ही काय आपण भेटायची जागा आहे?' ती थोड्याश्या रागानेच म्हणाली. पक्या तिला खूप आवडायचा. पण तो आणि त्याची गँग नेहमी बरोबर असायची. पक्याची गँग म्हणजे सगळे गावगुंड असायचे.

'आता तू म्हनतेस तर रस्त्यात भेटेन,' तो गोडसं हसला. 'हे बघ घाबरायचं नाय, काय? आजूबाजूला सगली आपलीच मानसं, कोणीबी येणार नाय इथं.'

'आणि हे बरोबर आणलेत ते कोण? तमाशा बघायला आलेले प्रेक्षक? तुझ्या चमच्यांच्या समोर काय तमाशातला नाच करायचाय?' ती उपरोधानेच म्हणाली. पण पक्याला उपरोध वगैरे काही कळण्याची शक्यता नव्हती.
'ती आपली पोरं आहेत काय? जे मी म्हनतो ते ते करनार. डोळे मिटा म्हटलं की डोळे मिटून उबे र्‍हाणार, काय प्रॉब्लेम नाही', तो म्हणाला.
'आणि त्यांनी डोळे मिटले की मी तुझ्या गळ्यात पडणार? काय पण कल्पना आहे. त्यांना सगळ्यांना आधी लांब जायला सांग.'
'अगं पण...'
'का माझी भीती वाटते? जीव घेणारेय मी तुझा?'
'तसं नाही. पण ते न्हेमी अस्तात बरोबर..'
'हे बघ, आधी त्यांना इथून निघा म्हणावं, आणि लांब हो आधी. इथे बागेत तुझ्या गळ्यात पडणार नाही मी,' त्याला जवळ सरकताना बघून ती म्हणाली. 'आणि त्या मुक्याला काही कराल तर खबरदार म्हणावं.' तिच्या आवाजाने पक्याबरोबर नेत्रपल्लवी करून आलेले एक दोन जण लगेच वाटेला लागले.
'बाकी तुज्या आवाजात जोर आहे बघ, च्यायला पोरं पण लगेच पांगली,' तो म्हणाला.
'पांगू देत. भेटायचं बोलवायचा कुठे चांगल्या हॉटेलमधे नाहीतर एकांतात, तर बागेत बोलावलंय,' ती परत म्हणाली.
'च्यायला, ती भानगड होती ना त्या शेटची. आणि तेवड्यात तुला वेळ. तुला पाच मिन्टं उशीर झाला की मोबाईल वाजतो तुजा, की तू चाल्ली लगेच. आता तू मला चिटकून बसली आनी कोनी हिकडे बगितलं ना तर मी दात काडून हातात देईन.'
'देशील देशील. माझे पण देशील. साला वैताग नुसता. भेटायला आले तरी...'
खरं तर तिला पक्या आवडायचा. गावात गुंडगिरी करायचा, पण दिसायला चिकणा होता. शाळेत असताना तो तिच्यापेक्षा मोठा आणि कितीतरी वर्षं पुढच्या वर्गात होता. पण नापास होता होता तो तिच्या वर्गात आला होता. तिची पण शाळेत प्रगती यथातथाच असायची. कशीबशी पास होत ती आठवीपर्यंत आली होती. आठवीच्या वर्गात तिची आणि त्याची मैत्री झाली. उंच आणि मोठ्ठ्या मुलाना मागच्या बाकावर बसवायची पध्दत त्यांना दोघाना आवडली. वर्गात मागे बसून टाईमपास करता करता मैत्री वाढतच गेली. वर्गातल्या मागच्या बाकावर मास्तर लोकांची टिंगल, हुशार मुलांची हेटाळणी, झोपा काढणे इत्यादी अनेक उद्योग त्यांनी जोडीने केले होते. चिंचाळकर मास्तरानी साम, दाम, दंड सगळं करून बघितलं पण तिचं लक्ष शिक्षणात नव्हतंच. पक्याच्या वाटेला जायची तर कुठल्याच मास्तरांची तयारी नव्हती. तो शाळेच्या वेळेतही गुंडगिरी करू लागला होता. शाळेत त्याला शिक्षा झाली तेव्हा संध्याकाळी एका दोघा मास्तरांना भर बाजारात कानफाडीत खायला मिळाली. प्रकरण हेडमास्तरांकडे गेलं तेव्हा हेडमास्तरांनी त्याच्या बापाला शाळेत बोलावलं. आधी दोन चारदा निरोप ठेऊनही पक्याचा बाप शाळेत आलाच नाही, आणि आला तेव्हा इतका पिऊन आला की पक्याबद्दल बोलावं की त्याच्या बापाच्या शिव्या थांबवाव्या याचा शाळेला प्रश्न पडला. हजेरीपटावरून पक्याचं नांव कमी होईपर्यंत पक्या नामक एक नवीन तरूण गुंड गावाला कायमचा मिळाला.

'बागेत नायतर काय लॅबवर बोलावू तुला शिरसाटमास्तराच्या?' तो मुद्दाम म्हणाला.
'ए, त्याचं नांव काढू नको परत सांगते.'
'का, तुजा मित्र नाय तो? आता कसले कसले धंदे करतो म्हने.'
'मला माझ्या बापाने दहावीपर्यंत पोचायची अट घातली होती. नववीच १५ मार्क कमी पडत होते मला. त्याच्याकडे मागायला जावं लागलं, आणि तो नाहीतरी माझ्यासाठी पागल झाला होता. वाट्टेल ते करायला तयार काय झाला होता.'
'पन गेला ना तो बाराच्या भावात. कोनितरी कळ लावली आसल.'
'तूच गेला असशील हेडम्याकडे. नाहीतरी डोळा ठेऊन असायचा मेला. एका मिठीत माझी नववी सुटली ना, तो गेला त्याला मी काय करू?'
'साला मला म्हनाला असता तर मी पन मिठी मारली असती त्याला,' तो हसत म्हणाला.
'अरे मग सगळ्या बाईंना मिठी मारून यायचीस ना? आठवी सुटली असती तुझी.'
'पन माझ्या नशीबाला आटवीला आले सगळे मास्तर आणि गणीताला ती म्हातारी कारेकरबाई.... नायतरी शाळा शिकून कुटे पोट भरतंय?'
'माझ्या बापाला कळलं आणि असा धक्का बसला ती सहा महिन्यात संपलं सगळं रिटायर होऊन दोन वर्ष पण झाली नव्हती.
नाहीतरी प्राथमिक शाळेच्या मास्तराच्या एवढ्याश्या पगारात कसंबसं भागत होतं. आई अजून त्यांच्या पेंशनीची वाट बघत
चपला झिजवतेय सरकारी ऑफिसातून. हा रवि भेटला नसता ना तर भीक मागत फिरायला लागलं असतं,' ती स्वतःशीच बोलत होती.
'आयला सोड ना तुझ्या त्या म्हातार्‍याला. तू फक्त हो म्हण. तुला अशी मस्त ठेवतो..'
'का? लग्न करणार माझ्याशी का तशीच ठेवणार आहेस मला? बाहेर उभी गाडी बघितलीस? मर्सिडीज आहे. गावात आहे कुणाकडे म्हातार्‍याशिवाय? परवडेल तुला?'
'तुज्यासकट गाडीच उचलतो. काय तो म्हातारा मला करनार?'
'पुरे. एवढाच पराक्रम. त्या गाडीचा एक पार्ट मोडला, तर कोणाला उचलशील? मला हे सगळं हवंय. माझ्या आईला महिन्याला दहा हजार देतो तो. माझ्यासाठी नोकरचाकर ठेवलेत त्याने. तुझ्यामागे लागून मला काय मिळणार? आपण थोडं भेटू, थोडी मज्जा करू...' ती त्याच्या जवळ सरकली. त्याने तिच्या गळ्यात हात टाकले आणि तिला जवळ ओढली. एका क्षणात तिच्या पर्स मधला सेलफोन कोकलू लागला.
'ह्येच ह्येच तर पाप. सालं इतकी वर्स तुझ्यामागून फिरतोय. एकदा पण हात लावायला देत नाही हा तुजा मोबेल. आता धावशील लगेच. मला तर वाटतं साला नजर ठेवतो तुझ्यावर. बंद कर ना तो फोन.'
'आणि काय करू? तुझ्या मागून हिंडू गावात लोकाना धमक्या देत, खंडणी मागत?'
'ते खायाचं काम नाय, तुला नाय जमनार. मी तुला शिनेमा लायनीला लाऊन दिली असती. तो तेजवानी इचारत होता, शुटींगला आलेला तेवा,' तो म्हणाला.
'मला विकणार तू त्या x.x.x.x. च्या ला? वाट बघ.'
'इकणार नाय. पण हिरोवीन झाली असती ना तू. मग झंझटच नाय बग.'
'हिरोईन? असली बरीच प्रकरणं बघितलीत मी. आधी तुम्ही पोरीला ताब्यात घेणार. वापरणार आणि मग विकणार त्या x.x.x.x. ला.'
'कायतरी बोलू नकोस. कदी तुज्याबद्दल असा ईचार पण नाय आला मनात.'
'पण गावातल्या तीन पोरी गेल्या तिकडे मुंबईला हिरॉईन व्हायला. त्या काय तुला राखी बांधून?' तो ओशाळला.
'तुमचा तो तेजवानी. पोरी नाचवणार, त्यांचे फोटो काढणार. आणि मग लाखातली एक हिरॉईन होणार. बाकीच्या जमलं तर रखेल म्हणून कुणाच्या फेकलेल्या तुकड्यावर नायतर आत्महत्या करून मरणार. नाही व्हायचं मला. मला उशीर होतोय,' ती चटकन उठत म्हणाली.
'मग परत कधी भेटनार?'
'भेटेन ना. येतोस रात्री बंगल्यावर?' ती पुन्हा त्याला चिडवत होती.
'नको. एकदा आलो होतो. तुज्या म्हातार्‍याने तुरूंग बांदलाय. जरा कुटून शिरायला लागलो तर एकदम लायटी काय, कुत्रे काय? एक कुत्रं तर असं अंगावर आलं, तारेत अडकून पँट फाटली नको तिकडे आनि लंगोटात घरी पळायला लागलं.'
'प्रेम करायला हिम्मत लागते. जाते मी,' ती चिडवत म्हणाली.
'येतो मग सगळी पोरं घेऊन आणि करतो राडा एक दिवस,' तो म्हणाला, पण तो तसं काही करणार नाही हे तिला माहीत होतं. रविने बंगला बांधताना त्यात काय काय करामती करुन घेतल्या होत्या त्या सगळ्या तिलाही माहीत नव्हत्या. पण रात्री अपरात्री कुणी आलं तर आपोआप भोंगे वाजतात, कुत्री भुंकतात, दिवे लागतात, आणि रविला आपोआप कळतं हे तिलाही माहीत होतं.
****************************************************
गाडीत बसल्या बसल्या ती एकटीच विचार करत राहीली. राजेश काय पक्या काय, तिला दोघेही आवडायचे. तसं म्हटलं तर सत्तरीला पोहोचलेला रवि पण तिला आवडायचा. जवळपास दहा वर्षांपासून ती त्याच्या बरोबर राहत होती. गम्मतीने त्याला म्हातारा म्हटलं तरी वयाच्या मानाने तो खूप तरूण वाटायचा. बोलताना वागताना तो सत्तरीला पोहोचतोय हे लक्षातही यायचं नाही. आणि तिच्या बाबतीत तर तो अजूनच जागॄक असायचा. तिच्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असायचा. तो जवळपास असला की तिला बाकी सगळ्याचा विसर पडायचा.

मग तिला ती संध्याकाळ आठवली. ती एकटीच रिक्षातून कुठेतरी निघाली होती. वडिलांच्या मृत्यूचा धक्का अजूनही ताजा होता. घरी खायला एक दाणा नव्हता. आई कुठूनतरी उधारीवर घर ढकलत होती. अजून दोनचार दिवस असेच गेले असते तर उपाशी मरणं किंवा भीक असे दोनच पर्याय उरले होते. नववी सुध्दा नीट न शिकलेल्या मुलीला कुणी नोकरी देणार नव्हतं. आपलं आणि आईचं पोट भरायची तिच्यावर वेळ आली होती.

तिच्या जवळ होतं ते रूप. त्याचाही गावात फारसा काही उपयोग नव्हता. गावातली तरूण पोरं तिच्या नुसत्या इषार्‍यावर नाचली असती. तिच्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून मुद्दाम काहीतरी कारण काढून बोलायला येत होती. एकटी भेटली तर अंगचटीलाही येत होती. तो रिक्षावाला देखील तिला एक पैसा न घेता रिक्षातून फिरवायला तयार झाला होता. पण हे सगळे तरूण म्हणजे फाटके. महिन्याला चार दोन हजार कमावणारे. त्यांच्या मागे लागून तिला फारसा फायदा होणार नव्हता. गरीबांचे संसार आयुष्यभर झोपडीतच असतात हे तिला चांगलं माहीत होतं. तिने लहानपणापासून अनुभवलं होतं. तिने स्वप्न पाहीली होती ती उंची उंची गाड्या, मोठमोठे बंगले आणि घरभरून दार ओतणार्‍या श्रीमंतीची. त्यासाठी ती काहीही करायला तयार होती, पण हाती काहीच येत नव्हतं. होतं फक्त रूप. सिनेमा लायनीला चाललं असतं. डोअरकिपरशी सलगी करुन तिने कितीतरी सिनेमे बघितले होते. त्यात आपण नायिका आहोत आणि त्यातला नायक आपल्यासाठीच झुरतोय अशी स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिली होती. आज मुंबईला जाऊन उद्या पैसे मिळणार नव्हते. सिनेमा धंद्याला भुलून मुंबईला गेलेल्या पोरींच्या गोष्टी तिने ऐकल्या होत्या.

पैसे, पैसे, पैसे.. ती विचार करत होती. तेवढ्यात रिक्षाचे ब्रेक करकचून लागले. सीटवर बसल्या बसल्या ती पुढे फेकली गेली. समोरून येणारी मर्सिडीज गाडी केव्हाच थांबली होती, पण रिक्षा तिच्यावर आदळेपर्यंतचा पूर्ण चित्रपट अगदी Slow Motion मध्ये तिच्या समोर सरकला. रिक्षावाल्याच्या खांद्यावर आपलं डोकं आपटलं हेही तिला कळलं. त्यानंतर काय झालं हे मात्र तिला कळलं नाही. किती वेळ झाला कुणास ठाऊक? पण मर्सिडीज मधून एक वयस्कर माणूस उतरला. भरभर चालत त्यांच्याकडे आला. पटकन त्याने तिला त्या कोलमडलेल्या रिक्षेतून खेचून काढलं आणि रस्त्याच्या बाजूला नेऊन गवतावर झोपवलं.

'तशीच पडून रहा, अजिबात हालचाल करायची नाही,' तो वयस्कर माणूस म्हणाला. खिश्यातून रुमाल काढून तो तिचा चेहरा पुसू लागला आणि तिची शुध्द हरपली.
चार पाच तासानी ती शुध्दीवर आली ती एका आलीशान बंगल्याच्या नटवलेल्या बेडरूम मधे. आपण स्वप्नात आहोत अशी तिची खात्रीच झाली. हिंदी/इंग्रजी चित्रपटातून दाखवतात तशी बेडरूम तिला आजूबाजूला दिसत होती. खात्री करण्यासाठी ती धडबडून उठून बसली. शेजारच्या खुर्चीत बसलेल्या माणसाने मंद स्मित केलं हातातला पेपर ठेऊन तो तिच्या शेजारी येऊन बसला.

'डॉक्टर म्हणालाय, दोन/तीन दिवस अजीबात हलायचं नाही,' तो अगदी जवळ येऊन म्हणाला.
'हा तर तो मर्सिडीजवाला,' ती मनाशीच म्हणाली.
'मी...मी, इथे कशी आले? आणि तो रिक्षावाला?'
'एका वेळी एकच. मी तुला इथे आणलं. रिक्षावाला आरामात आहे, त्याला हॉस्पीटलला नेलंय. हॉस्पीटलपेक्षा इथे तू पटकन बरी होशील. आता तू आरामात डोळे मिटून पडून रहायचं, तुला हवं नको ते मी बघणार. माझं नांव रवि आहे,' तो म्हणाला.
'मला.. मला... बाथरूम...'
'त्यासाठी मात्र उठावं लागेल,' तो हसून म्हणाला. 'घाबरू नकोस, जानकीबाई आहेत. मी त्यांना पाठवतो,' तो सहज उठून बाहेर गेला. मिनिटभरात तिच्या आईच्या वयाची एक बाई आत आली. तिने तिला हाताला धरून बाथरुममधे नेऊन बसवलं. अर्धवट गुंगीतही तिला ती बाथरूम आवडली. 'आमच्या अख्ख्या घराएवढी बाथरूम दिसतेय, इथेच या बाथरूम मधेच राहता आलं असतं तर' तिच्या मनात आलं.

अचानक मर्सिडीज वळण घेऊन एकदम गुळगुळीत रस्त्यावर आल्यागत वाटलं. गावातले खड्ड्यांचे रस्ते सोडून घर आलं हे तिला सवयीनेच जाणवलं. डोळे उघडेपर्यंत गाडी पोर्चमधे येऊन थांबली. मुक्याने नेहमीच्या शिताफीने तिची पर्स उचलून तिच्या हातात दिली. रवि हॉलमधे वाईनची बाटली उघडून वाट पाहत होता.
'आलेच, ' म्हणत ती बाथरूम मधे शिरली. तिची आंघोळ होईपर्यंत तो पेपर वाचत बसला असेल, तिला सवयीने माहीत झालं होतं.

****************************************************
'कसली रे पात्रं ठेवली आहेस कामाला? ती जानकी, तो मुक्या' ती लटक्या रागाने म्हणाली.
'मुकुंदा नांव आहे त्याचं, ' तो सहज म्हणाला.
'पण आहे मुकाच ना?'
'अगं त्यांचं काम ड्रायव्हरचं आहे, तो बोलला काय नाही बोलला काय? त्याला गाडी चालवायचं काम करता येतं ना? आणि कधी कधी मुकाच माणूस बरा. कुठे काही बघितलंन तर सांगू शकणार तरी नाही, ' तो हसत म्हणाला पण ती चमकली. 'हा आपल्याबद्दल बोलतोय की काय?' पण त्याच्या चेहर्‍यावर तिला काहीच वाचता आलं नाही. हातातला ग्लास उंचावत त्याने वाईनचा एक घोट घेतला. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघून आपण उगाचच घाबरतोय हे तिच्या लक्षात आलं. तिच्या चेहर्‍याचा रंग परतला. वाईनच्या ग्लासावरची घट्ट पकडही सैल झाली. आता मुक्याचा विषय तिला वाढवून चालणार नव्हता.

'दहा वर्षं होत आली नाही? ' काहीतरी बोलावं म्हणून ती म्हणाली.
'ह्म्म्म. कंटाळलीस?'
' छे छे. कंटाळेन कशाला? मी तर इतकी आनंदात आहे ना... ' तिने पण ग्लास ओठाला लावला.
'खोटं,' तो सहज म्हणाला. 'अगं तरूण आहेस, सुंदर आहेस, अजून खूप जगायचं तुला. माझ्यासारख्या वयस्कर माणसाकडून कसला आनंद आणि कसलं काय? जग वाट बघतंय तुझी, माझी नाही.' त्याच्या आवाजात कुठेही संशय, मत्सर, राग यातील कुठलीच भावना नव्हती.
'मग दहा वर्षानी Contract संपलं म्हणून हाकलणार की काय मला?'
'तुला कशाला हाकलेन? तूच जाशील सोडून मला. चल संपवून टाक ती वाईन.'
'मी कायमची तुझीच आहे, घालवलंस तरी जाणार नाही मी.'
'हे बघ, जेव्हाचं तेव्हा. तुझ्यासाठी काही कपडे मागवले होते ते आलेत. नेहमीच्या जागेवर ठेवलेत. बघितलेस की नाही?'
'बघेन ना. आत्ता नको. कपडे काय नेहमीचे आहेत.' त्याच्याकडे रहायला लागल्यापासून ती म्हणेल तेव्हा आणि ती म्हणेल त्याप्रकारचे कपडे तिला मिळायचे. आईकडे एक साडी घ्यायला पाचशे रुपये मागितले तेव्हा तिच्याशी झालेलं भांडण आठवलं. आणि आता? तिने शब्द टाकला की कपडे हजर. दोन तीनदा वापरायचे, मग फ्यॅशन बदलली म्हणून फेकून द्यायचे. पहिल्यापहिल्यांदा तिला असं करताना लाज वाटली. पण रवी आपल्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार आहे, आणि वाट्टेल तो खर्च तो त्यासाठी करील हे जाणवल्यावर तिची भीड चेपली.
'म्हणून तुला सारखं पोस्टात पाठवतो,' तो हसत म्हणाला.
'माझे कपडे आणायला?'
'नाही ग. पण तू एवढी खरेदी करतेस, त्याची बिलं भरावी लागतातच की.'
'रवि मला सांग, एवढे पैसे येतात कुठून?' ती त्याच्या जवळ सरकली.
'तुझ्याशी Contract करताना तुला मी आधीच सांगितलं होतं, की हा प्रश्न तू मला विचारायचा नाहीस म्हणून.'
'ते माहीत आहे रे...'
'हे बघ. तुला जे हवंय ते सगळं न मागता मिळतंय. बाकीच्याची काळजी मला करूदेत,' तिच्या हाताला धरून तो उठला. ती त्याच्यामागे बेडरूममधे गेली.
****************************************************
Accident मधून बरी झाल्यावरचे दिवस म्हणजे एकावर एक सुखाचे धक्के होते. दोन तीन दिवस राहून खरं तर तिने घरी जायला हवं होतं. पण आलिशान बेडरूम, सेवेला नोकर आणि रवि, आणि सगळ्या सुखसोई सोडून तिला जायचं नव्हतं. रवि कुठल्याही क्षणी विचारेल आणि आपल्याला जावं लागेल या भीतीने ती बहुतेक वेळा डोळे मिटून झोपल्याचं नाटक करायची. पण त्याने कधीच तिला तो प्रश्न विचारला नाही. पंधरावीस दिवस राहिल्यानंतर 'आता मात्र आपल्याला निघावंच लागेल,' हे तिच्या लक्षात आलं. अनिच्छेने हा विषय रविजवळ काढायचा विचार करत असताना, रवीने तिला अजून एक धक्का दिला. ध्यानीमनी नसताना त्याने 'तू माझ्याबरोबर कायमची रहाशील का?' असा प्रश्न टाकला.

हो म्हणायला तिला दोन सेकंदही लागले नाहीत. तिला हवं होतं ते सगळं एका क्षणात कुणीतरी तिला देणार होतं. पुढच्या पंधरा मिनिटात त्याने तिला त्याच्या अटी नीट समजावून सांगितल्या. तो तिच्याशी लग्न करणार नव्हता, पण ती त्याच्याबरोबर त्या बंगल्यावर आणि त्या श्रीमंतीत रहाणार होती. तिला लागेल ते सगळं तो पुरवणार होता. त्यात त्याच्याही काही किरकोळ अटी होत्या, पण त्याच्या अटी ह्या तिला वरदानाप्रमाणे वाटू लागल्या. लगेच वकील आला त्याने रीतसर Contract चे कागद पूर्ण केले. नववीतून शाळा सोडली तरी तिचं अठरावं सरलं होतं. वडिल हयात नव्हते, आणि आई अशिक्षीत होती. आपल्या मुलीने लग्न न करता कुणी म्हातार्‍याबरोबर रहावं हे तिला मान्य नव्हतंच, पण तिच्याबद्दल कानावर येणार्‍या बातम्या ऐकून आई पण खचली होती. एकाददिवस गावातल्या कुणा गुंड-मवाल्याबरोबर पळून जाईल अशी तिची खात्री होती. पक्या नामक गुंडाला तिने घराच्या आसपास घोटाळताना पाहीलं होतं. त्यापेक्षा हा साठ वर्षांचा म्हातारा बरा असं तिने ठरवून टाकलं. उरला सुरला विरोध तिला मिळणार्‍या पैश्यातच मावळून गेला. आताशी आई कधीतरी बाजारात दिसायची, पण बोलायची मात्र नाही. तिला आईचं प्रेम नव्हतंच. अन्नाच्या घासाला तरसलेली ती, एकदम गाडी, कपडेलत्ते, दागिने, घर बघून हरखून गेली. तो कोण होता, कुठला होता, अमेरिकेतून कश्यासाठी आला होता, तिला काहीच पडलं नव्हतं. 'पाच हजार देतो, दारात गुरखा म्हणून उभी रहा, ' म्हणाला असता तरी ती आनंदाने राहीली असती. एक वय सोडलं तर त्याच्यात काहीच कमी नव्हतं.

पहिली काही वर्ष कधी न पाहिलेल्या श्रीमंतीत गेली. दिमतीला ठेवलेले नोकरचाकर, उंची गाडी, उत्कॄष्ठ बंगला, मनाला वाटेल तसं वागणं, आणि घरमालकिणीचा तोरा. कशालाच काही बंदी नव्हती. पहिले काही दिवस ती रविला घाबरून असायची पण तोही आपल्याला कधीच कसलीच आडकाठी करत नाही हे लक्षात आल्यावर तिची तीही भीती कमी झाली.
पण आता हळू हळू तिला 'आपल्याला अजून काहीतरी हवंय' याची जाणीव होऊ लागली. जुन्या सवयी, जुन्या आठवणी परत उफाळून येऊ लागल्या. ती तेरा चौदाची असल्यापासून गावातले तरूण तिच्यावर फिदा होते हे तिला माहीत होतं. टिळकांच्या धड्यातून तिने फक्त 'चिखलात रुजलेलं कमळ आणि ती मीच,' एवढंच घेतलं होतं. रवि तिच्या आकंठ प्रेमात होता, पण कधी बंगला सोडून तो कुठेच जायचा नाही. आणि तिच्याकडून दिवसभर त्याच्या काही अपेक्षाही नसायच्या. संध्याकाळपासून रात्रीचे काही तास हे मात्र त्याचे हे त्याने तिला आधीच समजावून सांगितलं होतं. बाकी दिवसभर ती मोकळी असायची. हाती आलेली गाडी, सोबतचा मुका ड्रायव्हर आणि मिळणारा रिकामा वेळ सगळा तिचाच होता. एकदोनदा ती गाडी घेऊन बाहेर गेली आणि मुद्दाम उशीरा आली, पण रवि त्यावर काहीच बोलला अगर रागावला नाही. उलट तोच तिला काही कामं काढून बाहेर पाठवू लागला, तेव्हा तर तिला अजूनच आनंद झाला. आपण 'फुलपाखरा' सारखं जगायचं हे तिने मनाशीच ठरवून टाकलं होतं. या फुलपाखराला एकच बंधन होतं. रविचा निरोप आला की लगेच घरी परतणं. हा त्यांच्यातल्या कराराचा भाग होता. मुळचं देखणं रूप आणि आता त्यावर श्रीमंती साज याचा फायदा तिला करून घ्यायलाच हवा होता. आवडेल त्या तरूणाला ती मिळवू शकेल याची तिला खात्री वाटू लागली होती. बाहेरची कुणी माणसं बंगल्यावर येत नव्हती, त्यामुळे रविला काहीच कळायची शक्यता नव्हती.
पण... पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होतं. यार दोस्त बरेच होते पण हवं ते मिळत नव्हतं. समोर आलेला घास तोंडापर्यंत जावा पण तो गिळता येऊ नये असा खेळ नियती खेळत होती. आधी तिला वाटायचं की तिच्या वडिलांचा आत्मा तिच्या चैनीच्या वाटा बंद करतोय. पण आत्मा वगैरे गोष्टींवर तिचा कधीच विश्वास नव्हता.
'जिवंत असताना जे वडिलांना करता आलं नाही ते आता काय करणार?' तिने मनाची समजूत घातली.
'मग? मग रवि? '
पण तो तर दिवसभर बंगल्यात असायचा. त्याला गावात कुणीच कधीच बघितलं नव्हतं. घरात एकच गाडी होती, आणि मुक्या दिवसभर तिच्याबरोबर असायचा.
'मग? हा मुक्या?' तिने हळूच एक डोळा उघडून त्याला पाहीलं. तो शांतपणे गाडी चालवत होता. त्याच्याकडे बघून तो काही चुगल्या करत असेल असं वाटत नव्हतं. आणि चुगली करायला त्याला बोलता आलं तर ना....
'मग कोण? आपण याचा शोध लावायचाच,' तिने मनाशीच ठरवून टाकलं.

****************************************************
'हो मुक्याच..' राजेश पुढे होत म्हणाला. 'मला वाटतं हा मुक्याच साला हेर आहे. तुझा तो रवि, खरा आहे की नाही हे सुध्दा तुझ्याशिवाय कुणाला माहीत नाही. साल्याला गेल्या पाच वर्षात एकदाही कुठे बघितला नाही. मग त्याला तुझा माग लागतोच कसा? हे बघ. या खोलीतून तुझी गाडी आणि तुझा तो मुक्या मला आरामात दिसतोय. आज बघतोच साल्याला.'
गावाच्या दुसर्‍याच एका टोकाच्या हॉटेलवर तिला बोलावल्यामुळे ती वैतागली होती. नवीन नवीन जागी भेटायचं म्हणजे गावात अजून लोकांना कळणार हे तिलाही माहीत होतं. शहरांमधे कुणी कुणाला भेटलं तरी कुणाला काही पडलेलं नसतं. गावात कुणाची ना कुणाची ओळख निघतेच, आणि साध्या अफवेची बातमी व्हायला वेळ लागत नाही.पण हे सगळं त्या मुक्यावर हेरगिरी करण्यासाठी आहे हे ऐकून तिचा राग मावळला.

त्याने वातानुकुलीत खोलीत तिला नेल्याने तिला जरा बरं वाटलं. पर्स शेजारच्या टेबलावर टाकून तिने बेडवर झोकून दिलं. खोली मस्त थंड झाली होती. हातात दुर्बीण घेऊन राजेश तिची मर्सिडीज न्याहाळत होता. चार पाच मिनिटं वाट पाहूनही राजेश दुर्बिणीला चिकटलेला पाहून
'राजेश....,' ती काहीतरी बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. मग खूणेनेच तो तिला दुर्बीण दाखवू लागला. गाडीत बसलेला मुक्या आरामात पेपर वाचत होता. आजुबाजुच्या जगाकडे त्याचं लक्ष नव्हतं. काही मिनिटं त्याला न्याहाळून झालं तरी तो काही जागचा हालला नाही. त्याने खुणेनेच तिला जवळ बोलावलं. मुक्या अजूनही तसाच बसून होता.
'बस बोंबलत म्हणावं,' म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली, आणि पर्समधे फोन कोकलायला लागला. ती पटकन बाजूला झाली. राजेशने परत दुर्बीण हातात घेतली. मुक्या अजूनही तिथेच बसून होता. गेल्या पंधरावीस मिनिटात त्याने कोणतीच हालचाल केली नव्हती. तो हॉटेलकडे बघतही नव्हता. मग मुक्याचा फोन वाजायला लागला. आता त्याने गाडी चालू केली, आणि तो अदबीने दार उघडायच्या तयारीत उभा राहीला. ती निघून गेल्याचं राजेशला त्याच्या दुर्बिणीतूनच कळलं.
****************************************************
'आज काय वाट्टेल ते झालं तरी याचा निकाल लावायचाच,' ती स्वतःशी बोलत होती. तिच्या अंगाची होणारी तगमग तिलाच जाणवत होती. 'कपडे, दागिने, गाड्या सगळ्यावर वर पाणी सोडावं,' असे विचार तिच्या मनात डोकावत होते. पण आपल्याला या श्रीमंतीशिवाय जगता येईल याची ही खात्री होत नव्हती.
'अन्नाचा एकेका घासासाठी या गावात आपल्याला फिरावं लागलं असतं,' हा विचारही डोक्यातून जात नव्हता.
'त्याला कळतं कसं?' हा प्रश्न तिला सुटत नव्हता. बरं कळतं म्हणावं, तर त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून असं काही असावं हे कधीच जाणवत नव्हतं. संशयाची खात्री करण्यासाठी तिने कित्येकदा रात्री अपरात्री सगळं घर शोधून पाहिलं होतं. तिच्यावर पाळत ठेवता येईल असं काहीच तिला सापडलं नव्हतं. रविला घरातून बाहेर काढल्याशिवाय, तो नक्की कशी पाळत ठेवतो, हे तिला कळलं नसतं. पण तो घरातून कधीच बाहेर जात नव्हता. गाडी आणि ड्रायव्हर हे पूर्वी तिला दागिन्यासारखे वाटत होते, पण आता पिंजरा वाटू लागले होते. पहिल्या पहिल्यांदा तिला हा योगायोग वाटला. पण दहा वर्ष होत आली तरी तिला एकदाही तिच्या मनाप्रमाणे वागता आलेलं नव्हतं.

तिला राजेश हवा होता, पण त्याचा पगार तिला पुरला नसता. त्याला बायको आणि मुलगा पण होते. बदलीची नोकरी होती, आणि त्याने त्याच्या बायकोला सोडलंही नसतं. त्याला तिच्याकडून फक्त मजा हवी होती. तिला पक्याही हवा होता पण तो ही साला सतरा पोरींच्या मागे असायचा. गुंडगिरीचं राज्य चालेल तोपर्यंत ठिक पण एकदा कुठेतरी अडकला की त्याची सद्दी संपणार हे तिला माहित होतं. रवि होता चांगला, पण तो सत्तरीला पोहोचला होता. तिला सगळ्यांकडून काहीतरी हवं होतं पण एका ठिकाणी ते मिळू शकत नव्हतं.

तिरमीरीतच ती घरी आली. पायर्‍या चढून येते तर रवि समोरच बसला होता. त्याच्या हातातलं कॅलेंडर बघून तिच्या लक्षात आलं. तिने खुणा करून ठेवलेला Contract चा शेवटचा दिवस तिच्याकडे पाहत होता.
****************************************************

हातपाय धूवून कपडे बदलून ती हॉलमधे आणि तरी घुश्यातच होती.'खूप वाट पाहिलीस?'
'खूप नाही, पण वाट पहायला लावतेस खरी. मुक्या तुला सुट्टी रे,' तो ओरडून म्हणाला. ड्रायव्हरने गाडी नीट बंद केली, मग चावी जागेवर ठेवून तो जायला निघाला.
'जाताना ते पाकीट तेवढं घेऊन जा,' रविने मागे वळून न बघता त्याला सांगितलं. मुक्याने सवयीच्या ठिकाणी ठेवलेलं पाकीट उचलून खिश्यात टाकलं आणि निघाला. मुक्याच्या पावलांचा आवाज दूर जाईपर्यंत तो समोरचे कागद न्याहाळत बसला. त्याच्या शेजारी ठेवलेलं छोटं पिस्तूल तिच्या नजरेतून सुटलं नाही. स्वयंपाकघरात जानकीचाही आवाज नव्हता. म्हणजे यावेळी ती आणि रवी सोडला तर जवळपास कुणीच नव्हतं. पिस्तूल पाहताच तिच्या चेहर्‍याचा रंग उडाला. आजपर्यंत रवि तिच्यावर कधी चिडला ओरडला नव्हता, कधीच गैर वागला नव्हता. गेल्या दहा वर्षात कधी रागावला किंवा मोठ्याने बोललाही नव्हता. त्याच्याकडे एकादं पिस्तूल असेल असं तिला वाटलही नव्हतं.

'बैस. आज मला तुझाशी बोलायचं आहे, मी सांगेन ते ऐक आणि नीट विचार करून तुझा निर्णय घे,' तो म्हणाला. हे नक्की काय चाललंय तिला काही कळेना. पिस्तुलाच्या भीतीने ती तशीच उभी राहीली.
'बैस, घाबरू नकोस. आज आपल्या Contract चा शेवटचा दिवस आहे, तेव्हा पुढे काय हे ठरवायलाच हवं,' त्याने समोरच्या खुर्चीकडे बोट केलं. त्याला असं बोलताना तिने कधी पाहिलं नव्हतं. घाबरत घाबरत ती खुर्चीत बसली. आत्तापर्यंत तिला कधी त्याची भीती वाटली नव्हती.
'मला... मला... आपली बाजू मांडायचीय,' ती चाचरत म्हणाली. राजेश किंवा पक्याबद्दल काहीतरी कुणकुण त्याला लागली असावी असं तिला वाटत होतं. 'आता त्याला नक्की किती आणि काय काय माहीत आहे हे कळेपर्यंत त्याला मोगम बोलण्यात अडकवून ठेवायला हवं,' तिचा विचार ठरला.
'मी Contract केलं तेव्हा वाटलं होतं की सुखाने राहीन मी. पण तू.. तू फक्त वापरून घेतलंस मला,' तिने सुरूवात केली.

'मूर्ख आहेस. नीट ऐक. हे जे काही चाललंय ते तुझ्याबद्दल नाहीय. आणि वापरून वगैरे म्हणू नकोस. तुला जे हवं होतं ते मी देतोय, आणि मला जे हवं होतं ते तू. या पलिकडे तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती, किंवा तुझ्या कोणत्याही बाबतीत मी कसलीच आडकाठी केलेली नाही हे लक्षात घे,' तो म्हणाला.

'तुझे उमेश, प्रकाश, विकास, अनिरुध्द सगळे माहीत आहेत मला. तू कुठे जातेस, कुणाला भेटतेस, आणि काय काय करतेस याची पूर्ण माहीती आहे माझ्याकडे. तू त्यांच्यामागे लाग नाहीतर ते तुझ्या मागे लागले तरी मला त्याचाशी काही घेणं नाही. मी तुला आज गोष्ट सांगणार आहे ती माझी,' तो शांतपणे म्हणाला.

'माझ्या आयुष्याचा आज शेवटचा दिवस आहे. नाहीतरी Contract प्रमाणे उद्यापासून तू स्वतंत्र आहेस. फक्त आत मी काय सांगतोय त्यातून तुझा फायदा होईल की नाही, एवढंच ठरवण्यासाठी तुला माझी ही गोष्ट पूर्णपणे ऐकावी लागेल. या गोष्टीचा शेवट काय होतो यावर तुझ्या उरलेल्या आयुष्याचं भविष्य अवलंबून आहे. आत्ता किंवा इतर कोणत्याही क्षणी तुला निघून जावं वाटलं तर तू जाऊ शकतेस. पण मला वाटतं तू माझी ही गोष्ट नक्कीच ऐकशील. शेवटी फायद्यातोट्याचा हिशेब मांडायचाय तो तुलाच. आणि गेली दहा वर्ष ओळखतो मी तुला,' त्याने सांगून टाकले.

'मी माझ्या आयुष्याची कमावती वर्षं अमेरिकेत काढली आहेत. मी कोण होतो, तिकडे अमेरिकेत काय करत होतो, माझं खरं नांव काय? हे तुला कधीच कळणार नाही. ते शोधण्याच्या तू प्रयत्नही करू नकोस. कारण ती माहिती तुझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी कदाचित तुझा खून पडलेला असेल. पण एवढंच सांगतो, की जगात घडणार्‍या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवणार्‍या एका गुप्तहेरसंस्थेत मी काम करत होतो. तिथे काम करताना मी बरेच मित्र आणि त्यापेक्षा जास्त शत्रू जमावलेत. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी माणसात राहून भूमिगत कसं रहावं हे नीट माहीत आहे मला. आणि आजपर्यंत मी जगलो तेव्हा मला ते नीट जमलेलं आहे.'

'पण म्हणून माझ्यावर लक्ष... '

'तुझ्यावर लक्ष ठेवणं फार सोप्पं आहे तेही तुला सांगायचं आहे. मला मधेच थांबवू नकोस.'

'तर निवॄत्त झालो तरी माझे शत्रू मला जगू देतील याची खात्री नव्हती. ना लग्न झालेलं ना मुलबाळ. त्यामुळे त्याना सापडलो तर मीच. मी ठरवलं आपल्या देशात जावं. पण अश्या ठिकाणी जावं जिथे मला कुणी ओळखत नाही. ज्याठिकाणी मला कोणी पाहिलेलं नाही. आणि कुणी शोधायलाच आलं तर त्यांना मी भेटण्याआधी मला त्यांचा ठावाठिकाणा कळेल. म्हणून हे गाव शोधलं मी. इतकं मोठं आहे की मी इथे आरामात राहू शकतो, आणि इतकं लहान की मला सगळीकडे लक्ष ठेवता येतं. वाटलं तर दोन तासात मुंबई नाहीतर मुंबई पासून इतकं लांब की शहराचा त्रास नाही.'

'पण आता या सगळ्याचा माझा काय संबंध? त्यादिवशी ती रिक्षा आपटली नसती तर...'

'तो Accident नव्हता, एक नाटक होतं. मला तू हवी होतीस. रिक्षावाला दहा हजारांसाठी तयार झाला. रुमालाला Choloform लाऊन तुला बेशुध्द केली आणि इथे आणली. एकदा तुला इथे आणल्यावर पुढे सगळं अगदीच सोप्पं,' त्याच्या आवाजातला शांतपणा आता तिला जास्तच जाणवला.

'म्हणजे तुम्ही? तुम्ही मला फसवून इथे आणलंत?'

'तुला फसवण्यात आलेलं नाहीय. या घरात आल्यानंतरही तुझ्यावर कोणतीही बंधनं अगर जबरदस्ती केलेली नाही, हे विसरलेली दिसतेस तू,' यावर तिच्याकडे उत्तर नव्हतं.

'पण मी? मीच का?'

'तूच का? मला एक सेक्रेटरी, एक बायको, एक प्रेयसी, आणि एक तरूण पोरगी हवी होती. अमेरिकेत असताना काही हौशी राहिल्या होत्या त्या पुर्‍या करायच्या होत्या. पैसा होताच. त्यात जी मिळेल ती खूप हुशार असून चालणार नव्हतं. अठरा वर्ष पूर्ण झालेली, मध्यमवर्गातली, बाप नसलेली, पोटापाण्याला काही नसलेली आणि श्रीमंतीला पटकन भुलणारी इतकी सुंदर मुलगी तुला सोडून दुसरी कोण गावात होती? गावात आल्या आल्या मला तुझं नांव कळलं. तू सायन्सच्या मास्तरशी केलेली सलगी ऐकून मी ठरवलं की मी जिला शोधतोय ती हीच. त्यात तुझ्या आईला माझं म्हणणं पटलं आणि तिच्याही पोटाची सोय झाली,' तो पिस्तूलाच्या मुठीशी सहज खेळत म्हणाला.
'मी.. मी...,' त्याचा हात पिस्तूलाला लागताच ती भीतीने थरथरू लागली.
'घाबरू नकोस. दहा वर्षात तुला कधी त्रास होईल असा वागलो नाही, तेव्हा आजही तुला मी काही करणार नाही. माझ्या मिठीत मी तुला एकाद्या फुलासारखी जपतो, ते फुल कुस्करण्याएवढा नीच नाही मी. तर काय सांगत होतो, तुझी आई, तुझे वडिल, तुझे मित्र, तुझी परिस्थिती, तुझा चंचलपणा आणि तुझे छंद, तुझ्या आवडीनिवडी, तुझे पूर्वायुष्य, सगळं माहीत आहे मला. मला त्याने काहीही फरक पडत नाही. इथे आलो तेव्हाच ठरवलं की जास्तीत जास्त दहा वर्ष जगणार आहे मी. आणि मी म्हणेन त्यादिवशी मरणार आहे मी. मला म्हातारपण नकोय, मला परस्वाधीन व्हायचं नाहीय. दुसर्‍या कुणी माझी सेवा करावी हे मला मान्य नाहीय. आणि हे मला मी ज्या दिवशी इथे आलो त्यादिवशीच माहीत होतं. म्हणूनच तुझ्याशी फक्त दहा वर्षांचा करार केला मी. तो करार आज पूर्ण होतोय. तू काहीही करायला स्वतंत्र आहेस.'

'फक्त आता तुला माझं एक काम करायचं आहे. ही जबरदस्ती नाही एक विनंती आहे. मला तुझ्याकडून काहीतरी हवंय आणि ते मी विश्वासाने तुझ्याकडे मागतोय,' तो पिस्तूल तिच्याकडे सरकवत म्हणाला.

'माझ्याकडे खूप काही आहे आणि जे काही आहे ते सगळं तुझ्यासाठी आहे. त्यासाठी मी माझ्या मृत्युपत्रात सगळी तरतुद केलीय. हवं तर वाचून बघ,' त्याने एक लिफाफा तिच्याकडे सरकवला.

'मुक्या आणि जानकीला भरपूर पैसे देऊन मी मुक्त केलंय. उद्या ते कामावर आले की त्याना हे सगळं कळेलच. मात्र तुझ्यासाठी मी दोन पर्याय निवडले आहेत.'

'एक... म्हणजे तू आत्ताच्या आत्ता तुला लागतील ते कपडे घेऊन इथून निघून कुणाच्या तरी घरी जा. आईकडे जाण्यापेक्षा दुसरा कोणीतरी साक्षीदार शोध. उद्या सकाळी माझ्या मरणाची बातमी आली तरी तू रात्री तुझ्या एकाद्या मित्राच्या घरी असल्याचं सिध्द करता येईल. मी कसाही मेलो तरी त्याची झळ तुला लागणार नाही. खरं तर तू गेली काही वर्षं इथेच राहीलेली आहेस म्हणून पोलिसांना संशय येईल कदाचित, पण साक्षीदार असतील तर त्यांना काहीच करता येणार नाही. पण तू तसं केलंस तर... तर तुला यापुढे माझ्याकडून काहीच मिळणार नाही. मी रातोरात हे मृत्युपत्र फाडून टाकेन, आणि माझी इस्टेट या दुसर्‍या मृत्युपत्राप्रमाणे एका अनाथाश्रमाला जाईल,' तो तिचा चेहरा न्याहाळत म्हणाला.

'दुसरा पर्याय त्यापेक्षा बिकट आहे. मला या पिस्तुलाने तू गोळी घालायची आहेस. मग या कागदांप्रमाणे सगळी इस्टेट तुझी. फक्त पोलिसांचा ससेमिरा तुझ्या मागे लागेल कदाचित. मी कोण, कसा, इथे का आलो याची सगळी चौकशी तपासणी होईल, त्यातूनही फार काही निष्पन्न होणार नाही. पण तू इथे असल्यामुळे तुझ्यावर माझ्या खुनाचा आळ येईल. इस्टेटीसाठी तू मला मारलंस असं आरोप ठेवायला त्यांना काहीच कठिण जाणार नाही. ही सगळी भानगड तू कदाचित मिटवलीस तरी तुझ्या आयुष्यातली अजून पाच दहा वर्ष आणि इस्टेटीचा काही भाग तू गमावून बसशील.'

'यातून मला काय मिळणार? खरं तर मी माझा स्वार्थ बघतो आहे. आत्महत्या करण्याची हिम्मत होत नाहीय माझी, पण मरण्याची तयारी झालीय. ठरव काय ते. तुझं ठरेपर्यंत मला पिऊ दे. पिऊन पिऊन तरी हिम्मत येते का बघतो, Cheers,' त्याने ग्लास ओठाना लावला.

तिची जीभ खरंतर टाळूला चिकटली होती. पिस्तूल समोर असलं तरी आपल्याला तो मारणार नाही याची खात्री झाल्याने तिची खुर्चीच्या हातांवरची पकड सैल झाली. जीभेने ओठ ओले करत ती विचार करू लागली. पिस्तूलापर्यंत एक दोनदा हात पुढे करून तिने मागे आणला. त्याची नजर पिस्तुलावर असली तरी त्याच्या चेहर्‍यावर कोणताच भाव दिसला नाही.

'मला एक सांग. तू नेहमी टपाल कसलं पाठवतोस?'

'त्याचा माझ्या पूर्वजीवनाशी तसंच माझ्या आत्ताच्या जीवनाला चालवण्याशी संबंध आहे. गावातले पोस्टमास्तरच नव्हे तर इतर कितीतरी माणसं माझी पगारी नोकरदार आहेत. पण तुझा त्याच्याशी काही संबंध नाही.'

'तू माझ्यावर पाळत ठेवतोस ते या लोकांना वापरून? पण कशी? मी सगळं घर पण शोधून झालं पण मला काहीच सापडलं नाही, पण ऐन नको त्यावेळी तुझा फोन वाजतो कसा, तेवढं मला सांग.'

'अरे हो. तुला हे सांगणारच होतो. तू कितीही शोधलंस तरी तुला काहीच सापडणार नाही. मी कुठे काम करत होतो ते सांगितलंच आहे तुला. तिथे मी काय काय शिकलो आणि काय काय करत होतो या तपशीलात जायची गरज नाही. आता दोनच गोष्टी सांगतो. माझा संगणक मी आजच नाहीसा केलाय, त्याचे तुकडे करून त्यावर अ‍ॅसिड टाकून ते मी जाळून पूर्ण राख करून टाकली मी त्याची. आता उरल्यात त्या फक्त तारा. संगणकाच्या नाही तुझ्या तारा. आतून तारा असलेली ती उंची अंतरवस्त्रं तुला आवडतात ना, त्यातल्या त्या तारा फक्त काढून टाक. त्या साध्या तारा नाहीत, तर Tracking Devices आहेत. त्याचा उपयोग मी तुला Track करण्यासाठी, आणि त्याहीपेक्षा तुझ्याजवळ कुणाचे हात आल्यास मला कळण्यासाठी करत होतो,' तो शांतपणे म्हणाला.

एक क्षण तिच्यातला राग उफाळून आला. इतकी वर्ष या फुलपाखराला त्याने आपल्याला जाळ्यात ठेवलंय हे तिला चेहर्‍यावर लपवता आलं नाही. त्याच्याशी भांडण्यात, चिडण्यात, रागावण्यात आता काहीच अर्थ नव्हता. एका गोळीत त्याचा खेळ संपवून टाकण्याचा विचार मनात आला, पण आत्तापर्यंत कुणाला मारण्याचा प्रसंग तिच्यावर आला नव्हता, त्यामुळे धीर खचत चालला होता. तो अजूनही शांतपणे तिच्याकडे पाहत बसला होता.

'समोरच्या ग्लासात असलेली wine एका घोटात पिऊन टाकून काही धीर येतो का पहावं,' एक विचार आला.
'पण त्यात त्याने विष टाकलं असेल तर...,' असं वाटून तिने पुढे केलेला हात मागे घेतला. तिच्या मनातले विचार वाचल्यागत त्याच्या चेहर्‍यावर एक स्मितरेषा उमटली. एकाएकी तिचा काहीतरी निर्णय झाला. कुणीतरी आपल्याला आदेश देतंय असं वाटू लागलं. तिने पिस्तुल उचललं आणि त्याच्या छातीवर नेम धरला. गोळी सुटली तसा त्याचा बसल्या जागी तोल गेला.
'thank you, तू मला ... सोडवलंस, ' त्याची मान बाजूला कलंडली. तिच्या हातातलं पिस्तुल गळून पडलं.

****************************************************

'हॅलो... हॅलो...,' तिच्या हातातला सेलफोन कसाबसा कानापर्यंत पोहोचला.
'हॅलो, राणी तू? या नंबरवर? तुला किती वेळा सांगितलं हा नंबर वापरू नकोस म्हणून...' राजेशचा परिचित आवाज आला.
'राजेश, तू लवकर इथे ये. रवि Is no more, He.. He committed suicide ' ती थरथरत म्हणाली.
'काय?' तो ओरडलाच. 'त्याने आत्महत्या केली?'
'त्याने स्वतःला गोळी मारून घेतलीय, मला तुझी मदत हवीय,' ती कोणत्याही क्षणी रडेल असं वाटत होतं.
'ठिक आहे. कशालाही हात लाऊ नकोस, मी येईपर्यंत बाहेरच्या खोलीत बसून रहा, आणि रडू नकोस,' तो फोन ठेवत म्हणाला. 'हवालदार, Suicide केस आहे, माझी जीप काढा,' असं ओरडत जीपमधे बसला देखील. डुलक्या देत बसलेल्या हवालदाराला चालत्या जीपमधे उडी मारावी लागली.
****************************************************
फोन झाल्यावर ती भराभरा कामाला लागली. प्रथम तिने शांतपणे पिस्तुलावरचे ठसे पुसले. मग रविच्या हातात ते पिस्तुल ठेऊन त्यावर त्याचे ठसे घेतले. मग ते पिस्तुल त्याच्या हातातून गळून पडू दिलं. स्वयंपाक घरातून एक कांदा कापून डोळ्यांच्या अगदी जवळ धरला. डोळे लाल होऊन गळू लागल्यावर तो कांदा नीट कापून तो Flush करून टाकला. दुसर्‍या मॄत्यूपत्राला आग लाऊन ते पण Flush करून टाकलं. इस्टेटीचे कागद त्याच्या सेफमधे टाकून सेफ लॉक करून टाकला. Wine च्या दुसर्‍या ग्लासाला तिने स्पर्शच केला नव्हता. केस अस्ताव्यस्त करून डोळे चोळत ती पुढच्या खोलीत आपल्या एका प्रियकराची वाट बघत बसली. आता फक्त थोडं नाटक आणि तेही राजेशसाठी केल्यावर ती या इस्टेटीची कायमची मालकीण होणार होती.
****************************************************

विषय: 
प्रकार: 

छान आहे.

फक्त हाताची पोझिशन, मसल काँट्रक्शन पिस्तुल त्या हाताने ओढलं की नाही ते प्रुव्ह करू शकते. अर्थात राजेश तेवढ्यापर्यंत जाणारही नाही म्हणा. असो. पण एकंदरीच चांगली रंगवली आहे.

Interesting Observation आर्च....
मी बर्‍याच Detective Serial (NCIS, JAG...) बघतो, पण हा मुद्दा कधी बघितला नव्हता...
अर्थात राजेश तिच्या मुठीतलाच आहे..

बाकीच्या सगळ्यांना वाचल्याबद्दल धन्यवाद...

येप, माझ्याही आलेलं हे मनात. जनरली आत्महत्या करणारा स्वतःच्या छातीवर नाही, तर डोक्यात गोळी मारतो. हे ज्ञान पुस्तके व सिनेमे पाहुनच आलय. पण राजेशच इनिस्पेक्टर म्हंटल्यावर कुछभी हो सकता है.

अमॄता... ते 'नाही तर' मी 'नाहीतर' असं वाचलं. म्हणजे किंवा या अर्थाने.. Sad
तुला अणभव असेल (सिनेमे पाहुन) तर आपण डोक्यात मारू गोळी.. Happy

मस्त आहे गोष्ट ! पण एक गंमत ......

माझं खरं नांव काय? हे तुला कधीच कळणार नाही. ते शोधण्याच्या तू प्रयत्नही करू नकोस >>> पण आम्हाला कळालचं Happy (?)
..
His name was............

BOND...........JAMES BOND !

Biggrin

Pages