दर्शनमात्रे

Submitted by लसावि on 19 May, 2010 - 07:58

लहानपणी आमच्या गावातल्या घरात टिपीकल देवघर असं कधीच नव्हतं. होता तो गणपतीचा एकच मोठा फ़ोटो, तो ही पेंटर दाभोळकरांचा, अ‍ॅबस्ट्रॅक्ट वाटावा असा (हे सगळ आत्ता कळतयं, तेंव्हा मात्र बाकी लोकांच्या घरी असलेल्या चारी हात स्पष्ट दिसणार्‍या, प्रेमळ गणपतीसारखा हा नाही एवढचं वाटायचं). बाबा त्याच्यासमोर रोज संध्याकाळी अथर्वशीर्ष म्हणायचे, तेंव्हा ते माझ्यापासून खूप दूर गेले आहेत असे वाटे; मला अजिबात आवडायचे नाही ते. त्यांनीही माझ्यावर कधी कुठलं स्तोत्र म्हणण्याचे ’संस्कार’ वगैरे केले नाहीत, पण मला ते सर्व ऐकायला आवडयचं. खासकरुन अथर्वशीर्षाचा मराठी अनुवाद आणि बाबांचे त्यावरचे भाष्य; ’ही फ़लश्रुती नक्कीच प्रक्षिप्त असावी’, इ.इ. ईश्वर संकल्पना ही मानवी निर्मिती आहे ही गोष्ट तेंव्हाच कधीतरी मनात रुजली असावी.

देवळात जाऊन दर्शन घेतल्याची सर्वात जुनी आठवण माझ्या गावची, माढ्याचीच आहे. आमच्या या गावात फ़ार पावरबाज देव कोणताच नव्हता. मला नेहमी वाटते की प्रत्येक गावाची दैवतं त्या गावाची सांस्कॄतिक-सामाजिक विशेषता आणि लोकमानस प्रतिबिंबीत करणारी असतात. त्याप्रमाणे आमच्या या माढेश्वरीने कधीही काही चमत्कार केल्याची कथा नाही (तिचे देउळ ज्या कोरड्या ओढ्याच्या काठी आहे त्याला गावात मनकर्णिका नदी म्हणतात हा चमत्कार सोडल्यास!). अर्थात कोणा भक्ताच्या मागोमाग येताना त्याचा संयम संपल्याने त्याने मागे वळून पाहिले व देवी गावाबाहेरच राहिली ही अत्यंत कॉमन कथा याही देवीची होतीच. या देवळात जातानाही मूळ देवीपेक्षा बाबांचा वेळ बाहेरच्या गणपतीजवळच जायचा, गणपती त्यांचा पर्सनल गॉड होता.
यासगळ्या पार्श्वभूमीवर सोलापूरात आज्जीकडचे देवघर,त्यातले शेकडो देव आणि फ़ोटो, अनंतकाळ चालणारी पूजा मला गोंधळात टाकायची. त्यात पुन्हा ती पूजा मी करायला हवी असाही तिचा हट्ट असे जो मी कधीही पुरा केला नाही. सोलापूरचे देवही या गावासारखेच मल्टीकल्चरल, प्रत्येक क्लॅनचे देव वेगळे, त्यांच्या देवळावरही त्या त्या सांप्रदायाचा स्पष्ट प्रभाव. सहसा एकीकडचे लोक दुसरीकडे दिसणार नाहीत, काळजापूरच्या मारुतीसारखे सहमतीचे उमेदवार कमीच. पण देव’दर्शना’चा माझा पहिला जाणता अनुभव नक्कीच सोलापूरच्या तळ्यावरच्या गणपतीचा, त्या देवळाच्या लांब,रुंद दगडी पायर्‍यांवर गार वारा खाताना वेगळ्या प्रकारे छान वाटते,हे काहीतरी निराळे आहे अशी जाणिव झाल्य़ाचे स्पष्ट आठवते.
देवावर माझा विश्वास आहे का नाही हे मलाच अजून नीटसे कळलेले नाही. देवळात जाताना काही विशिष्ट भाव,मागणी,लीनता,शरणागतता वगैरे मनात असते असेही काही नाही. या सर्व भक्तीभावापेक्षा माझे तथाकथित बुद्धिवादी मन(?) ईश्वरप्रतिमा आणि संकल्पनेच्या शास्त्रिय, ऐतिहासिक, सामाजिक व्युत्पत्ती,दैवतशास्त्र, मिथ्यकथा यात जास्त रमते.मात्र या वृत्तीमुळेच मला वेगवेगळ्या देवळात जायला फ़ार आवडते.

पण हे वाटते तितके साधे प्रकरण नाही. एखाद्या देवळात गेल्यावर त्या देवाचे दर्शन होणे हे अनेक वेगळ्याचे गोष्टींवर अवलंबून असते. मुळात एखाद्या देवळात आपण कधी जाणार ही बाब इतकी लक बाय चान्स आहे की तुम्हाला दर्शन कधी होणार हेच मुळी ईश्वरइच्छेवर आहे असे वाटू लागले आहे. पन्हाळ्याच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात अंबाबाईने कायमच येता जाता केंव्हाही मनापासून निवांत दर्शन दिले, अगदी गर्दीच्या समजल्या जाणार्‍या दिवसात देखील. तर जोतिबाला जायचे बेत अनेक वेळा करुनही नेहमी काहीतरी व्हायचं आणि जाणं बारगळायचे; जोतिबाने सतत भेट टाळलीच. याउलट कसलाही विचार नसताना केवळ कोल्हापूर स्टँडवर उभी दिसली म्हणून गणपतीपुळ्याच्या गाडीत जाऊन बसलो आणि दर्शन घेउन आलो असेही झाले.
तुम्ही देवळात पोहोचल्यावरही तुम्हाला दर्शन ’कसे’ होणार याच्याही अनेक तर्‍हा आहेत. नवरात्रात सोलापूर ते तुळजापूर चालत जाउन दर्शन घेणे किंवा त्यावेळी रस्त्यावर स्वयंसेवकगिरी करणे हे कॉलेजात असताना करायचे नेहमीचे उद्योग. ग्रॅज्युएशनला असताना रामलिंग-तुळजापूर ट्रीप प्रत्येक सोलापूरी कॉलेजमधे होणारच, त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनचे फ़ारसे अप्रूप कधी वाटले नव्हते. पण एकदा आमच्या ट्रीपमधली काही पोरं-पोरी रामलिंगला मधमाश्या चावून आजारी पडल्याने आम्हाला तुळजापूरात मुक्काम करावा लागला आणि रात्री दीड-दोनच्या सुमारास मंदिरात पोचलो. कोणता विधी चालला होता आणि आम्हाला तिथे प्रवेश कसा मिळाला हे समजत नाही पण पूर्ण अनलंकृत, हळदकुंकवाच्या भारापलीकडची भवानी तिच्या अत्यंत मूळ रुपात दर्शन देती झाली. आठही भुजा स्पष्ट दाखवणारी, नेहमीपेक्षा कितीतरी लहान पण डोळ्यातून प्रकट होणारे तेच तेज, तीच ताकद; अद्वितीय होते ते दृष्य. असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यात वसंतमधे रात्रीचा शो पाहून भंकस करीत शुक्रवारातल्या खोपटात परतताना दगडूशेठ हलवाई गणपती अंगावरचे सगळे दागिने,झालरी,उपरणी उतरवून हाशहुश्श करीत रिलॅक्स बसलेला पाहिला होता!

पण या सर्वांपलिकडे जाउन, एखाद्या देवळात दर्शन घेताना मनस्थितीत होणारा (वा न होणारा) बदल हेच दर्शन खर्‍या अर्थाने झाल्याचे लक्षण आहे असे वाटते. एखाद्या देवळात आपल्याला शांत,समाधानी,प्रसन्न,आनंदी वाटू लागते यात तुमची त्या वेळची मनस्थिती,तुमचे संस्कार,वृत्ती,पूर्वग्रह, त्या स्थानमहात्म्याचा, त्याच्या इतिहासाचा जाणीव-नेणिवेवर कळत-नकळत पडलेला प्रभाव या व अशा अनेक गोष्टींचा एकत्रीत परिणाम असतो. जसे द्वारकेसारख्या देवळातल्या बडेजाव आणि भटजीबाजीने त्या स्थानाशी काही सांधा जोडूच दिला नाही, तर पन्हाळ्याजवळच्या अफ़ाट मसाई पठारावरच्या लहानखुर्‍या आदिम मसाईदेवीच्या दर्शनाचा अनुभव अत्यंत थेट,जिवंत होता. सोमनाथच्या देवळाची भव्यता आणि समुद्राची गाज त्याचा लाजिरवाणा इतिहास मनातून पुसू शकला नाही, तर पशुबळीची प्रथा असलेल्या कार्ल्याच्या देवीमागेच उभ्या बौद्ध विहारांनी सतत आंदोलित होणार्‍या समाजजीवनाचा पुरावाच दिला,आणि विचाराला खुराकही.

या सर्वांना पुरुन उरलेला अनुभव मात्र पंढरीच्या विठोबानेच दिला आहे.मित्रांबरोबर मजा करत, कसलाही गंभीर विचार मनात नसताना मी एक दिवस अचानक पंढरपूरात पोचलो. तोपर्यंत विठोबा म्हणजे अभंगवाणी,वारी आणि बडवे यापलीकडे मजल गेली नव्हती. या भेटीतून आध्यात्मिक किंवा इतर कसल्याही विशेष अनुभवाची अपेक्षा नव्हती आणि पात्रताही. जवळजवळ तीन-चार तास रांगेत उभारून आणि या वेळात खच्चून टाईमपास करीत थकून गेलेला मी जेंव्हा शेवटी विठ्ठलाच्या मुर्तीसमोर उभा राहिलो तेंव्हा त्या दर्शनाने मला एकदम अत्यंत अजबरित्या ताजेतवाने वाटु लागले. सगळा थकवा,शीण नाहीसा झाला. हा अनुभव इतका स्पष्ट, इतका खरा होता की मी त्यामुळे अत्यंत अचंबित झालो. माझे शंकेखोर मन या तात्काळ बदलाला खरे मानायलाच तयार होईना! निवांत, मंदस्मित करीत उभा असलेला तो विठ्ठल, लहानपणापासून फ़ोटोत हजारो वेळा पाहिलेला, तरीही त्यावेळी तो वाटला- आपल्या ओळखीचाच आणि आपल्याला पूर्ण ओळखून असलेला,मित्रच जणू.

कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी या अनुभवाची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही.
त्याक्षणी माझ्या मनाच्या एका कोपर्‍याला त्या अफ़ाट तत्वाचे थोडे दर्शन झाले होते एवढेच म्हणता येईल, की ते ही नाहीच?

गुलमोहर: 

आगाऊ, इतकं प्रामाणिक आहे की, पोचलच.
देव आहे का नाही... वगैरे खूप गहन अरण्यं आहेत.
प्रश्नं आपल्या मनाला काय स्पर्शतं आणि त्याचा मनावर काय परिणाम होतो ह्याचा आहे.
दुसर्‍या दिवशी सकाळची पुजा ठरलेली असतानाही (म्हणजे बुक केलेली असताना Happy ), गणपतीपुळ्याच्या देवळात अगदी पायही न धुता, सामान ओसरीवर ठेऊन, संध्याकाळी गेलो होतो. (ह्याला धूळभेट म्हणतात हे सुद्धा नंतर कळलं.)
तेव्हा अगदी कडकडून भेटला... वाटच बघत असल्यासारखा.
दुसर्‍यादिवशी पुजेच्या ऐनवेळी, सगळ्या धामधुमीत मात्रं कुठे गुल झाला होता कुणास ठाऊक Wink
आमच्याबरोबर पुजेला बसलेल्या दुसर्‍या जोडप्याला मात्रं कृतार्थं वगैरे वाटत होतं.
दुसर्‍याच दिवशी पहाटे प्रदक्षिणा करायची म्हणून लवकर उठलो. कल्लाकार असल्याने घड्याळं वगैरे बाळगत नाही जवळ. यडपटासारखे पहाटे साडेतीनलाच आंघोळी वगैरे उरकुन काळोखातच प्रदक्षिणा करायला सुरूवात केली. कितीतरी वेळ उजाडेनाच Happy . मग दमून वेळेवर जाऊन बसलो, समुद्राकडे तोंड करून... मग तो एकटाच मागे देवळात बसलाय असं इतकं प्रकर्षानं जाणवलं की, शेवटी त्याच्याकडे तोंड करून बसलो... तो त्यादिवशी दोन यडपटांच्या खुळेपणाला, सांसारिक गप्पांना हसला असणार... बहुतेक Happy
टोकाचे बुप्रा असा किंवा दुसर्‍या टोकाचे कर्मकांडी... तुम्हाला कळत असताना किंवा कळत नसतानाही तुमच्या चित्ताला काय स्पर्शतंय ते तुमच्या हातात असेलच असं नाही... कदाचित हातात नाहीच.

आगावा काय मस्त लिहिलंस रे. घाईघाईने वाचून टाकण्यापेक्षा रवंथासाठी ठेवलं ते बरं झालं. Happy

>>देवावर माझा विश्वास आहे का नाही हे मलाच अजून नीटसे कळलेले नाही. देवळात जाताना काही विशिष्ट भाव,मागणी,लीनता,शरणागतता वगैरे मनात असते असेही काही नाही. या सर्व भक्तीभावापेक्षा माझे तथाकथित बुद्धिवादी मन(?) ईश्वरप्रतिमा आणि संकल्पनेच्या शास्त्रिय, ऐतिहासिक, सामाजिक व्युत्पत्ती,दैवतशास्त्र, मिथ्यकथा यात जास्त रमते.मात्र या वृत्तीमुळेच मला वेगवेगळ्या देवळात जायला फ़ार आवडते.<<
>>पण या सर्वांपलिकडे जाउन, एखाद्या देवळात दर्शन घेताना मनस्थितीत होणारा (वा न होणारा) बदल हेच दर्शन खर्‍या अर्थाने झाल्याचे लक्षण आहे असे वाटते. <<
>>कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी या अनुभवाची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही.
त्याक्षणी माझ्या मनाच्या एका कोपर्‍याला त्या अफ़ाट तत्वाचे थोडे दर्शन झाले होते एवढेच म्हणता येईल, की ते ही नाहीच?<<
हे तर अगदी अगदी...

आवड्याच... जियो दोस्त!!

अतिशय सुंदर लेख...

अनाम आणि शांत, थंड फरशीची आणि आपल्या अशा वासाची देवळं मला तुफान आवडतात. देवाबीवाचं माहित नाही, शांतीचा शोध मात्र किंचीत सुफळ संपुर्ण होतो>>>रैनाच्या वाक्याला १००० मोदक...नाशिकच्या एका तळाकाठच्या गणेश मंदीरात (नाव आठवत नाही, पण तिथे मी आता पर्यंत पाहिलेली सर्वात भव्य गणेश मुर्ती आहे) आणि कलकत्त्याच्या बेलुर मठात हा अनुभव तंतोतंत मला आला होता. पंढरपुरच्या विठोबाबद्दल तर काय बोलावं हेच सुचत नाही..तुम्ही लिहीलेलं सगळं अगदी मनातलंच होतं..

आत्ता परत वाचल्यावर प्रतिक्रियाही वाचल्या.
>>मला कोकणातली ही देवळं फार आवडतात. ती "देवाची घरे" वाटतात.<<
याला खूप खूप अनुमोदन.

लहानपणापासून नाळ जुळल्याने म्हणा किंवा अजून काही. पर्वतीवरचं देवदेवेश्वराचं मंदीर आवडतं माझं. पर्वतीवरची सगळीच मंदीरं. अगदी कार्तिकेयाच्या देवळात जायचं नाही असं घरून बजावलेलं असल्याने आतमधे काय असेल या कुतूहलासकट अजूनही गूढच असलेलं कार्तिकेयाचं देऊळ सुद्धा. Happy
आणि ही सगळी तेव्हातरी (जेव्हा सुट्टीचा उपयोग रोज सकाळी भावंडांनी मिळून पर्वतीवर जाण्यासाठी केला जाई तेव्हा...) देवाची घरं वाटायची. हल्ली कैक वर्षात पर्वती चढलेच नाहीये... Sad

मी धड आस्तिकही नाही आणि धड नास्तिकही. ह्या विश्वाला निर्माण करणार्‍या आणि चालविणार्‍या पण त्या अचाट शक्तीवर माझा नक्कीच विश्वास आहे. कर्मकांड, मुर्तीपुजा ह्यांवर जास्त विश्वास नाही पण.. तरिही काही काही देवळात गेल्यानंतर एक खुप आत्मिक आनंद किंवा एक खुप मंगलमय अथवा शांत जरुर वाटतं.
माझ्या एका वडीलांच्या मित्रानी (जे व्यवसायाने सर्जन आहेत आणी धर्माने मुस्लीम) मला ह्या धार्मिक स्थळांबद्दल, (मग ते मंदिर असो वा मशिद वा चर्च वा गुरुद्वार वा इतर कुठलेही धार्मिक स्थान ) खुप छान सांगितले होते. ते म्हणाले कि आपण सर्व जणं तिथं जमतो, काहीतरी मागणी मागतो, चांगले विचार ऐकतो, मनात आणतो, मंत्र म्हंटले जातात.. तेव्हा तीथे एकत्रित अशी एक खुप positive energy तयार होते. आणि त्या positive waves, vibrations मुळे तिथे खुप पवित्र आणि शांत वाटतं आणि साक्षात देव तिथे वसतो असे आपल्याला वाटते.
शेवटी हे सगळे magnetic waves, vibrations ह्यांच्याशी आणि पर्यायाने आपल्या आत्मा आणि मनाशी निगडीत असते. आपले मनःस्वास्थ्य सुद्धा खुप सारे आपल्या आत निर्माण होणर्‍या electromagnetic waves वर अवलंबुन असते. हे आता science सांगते. (मी ह्यांविषयावरची authority नाही, पण माझे जे काही वाचन आणि ज्ञान आहे त्यावरुन मी हे लिहीले आहे).

तर असो.. थोडक्यात मला देखिल असा अनुभव येतो काही मंदिरात, देउळात गेल्यावर आणि जर मंदिर खुप पुरातन असेल तर एक वेगळाच अदभुत आंनद मिळतो (आणि असा आनंद मला कुठल्याही ऐतिहासिक अथवा पौराणिक जागी जाउन मिळतो.)
प्रवास करतांना दुर कुठल्या डोंगरावर एखादे मंदिर असेल तर तिथे जावेसे वाटते, का मला सांगता येणार नाही

फार छान, आगाऊ.

देवाचं दर्शन होणं हे देवाच्याच मनात असतं.. Happy
<अंबाबाईचं दर्शन घडतं, पण ज्योतिबा टाळतच राहतो... > खरंच!

खूप छान लिहिलं आहेस. आवडलं. Happy

तिरुपती, शिर्डी, पंढरपूर, सिद्धीविनायक सारख्या ठिकाणी नुसतेच उपचार पार पाडल्यासारखे वाटले. एखाद्या खेड्यातल्या शांत, एकाकी, छोट्या देवस्थळाला भेटल्यावर देवत्वाशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो, तसं काही वाटलंच नाही.

एक लहानसा अध्यात्मिक अनुभवच आहे हा, काही वादच नाही... हा विषय लेखातून मांडल्याबद्दल अभिनंदन, अजून लिहावे ह्या विषयावर... आज समाजाला आणि आपण सर्वांना ह्या विषयावरील लेखनाचीच अधिक गरज आहे.. चराचरात जे चैतन्य भरले आहे त्याची प्रचिती 'तो' आपल्याला कधी आणि कशी आणून देईल, ह्याचा अदमास बांधणे कठीण आहे.
-मानस६

भारीच लिहलय....

इस्लाम्पुर जवळ 'नरसिंगपुर' म्हणुन एक गाव आहे (ताकारी रस्त्यावर). तिथे 'नरसिंहाचे' देउळ आहे (बहुतेक १४ व्या शतकातलं). जमिनीखाली १४ फूट. ती मुर्ती बघितल्यावर कोणी बनवली असेल यावर विश्वास्च बसत नाही. (ती कृष्णेच्या पात्रात सापडली असे तिथे लिहले आहे). शक्यतो पुजेच्या वेळी गेलात तर मुर्ती पुर्णपणे बघता येते.

लेख 'निवडक दहा'त केव्हाच टाकला आहे. प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती. Happy

आगाऊ, खूप सुरेख लिहिलं आहेस. पंढरपुरातल्या अनुभवाबद्दलचा परिच्छेद फार सही!

डोक्यातला बुप्रावाद आणि मनातला भक्तीभाव याचा झगडा कधी सुटेल ते माहिती नाही.>>>>> माझा सुटला आहे !! डोक्यातला गुंता किती कमी होतो याचा अनुभव गेले काही वर्षे घेत आहे.

मध्यंतरी मला कुणीसं म्हटलं की - "मग एके दिवशी कळलं की देव आहे तर?" ... म्हटलं "सर्वात प्रथम तिथे मी नमस्कार करीन..." Happy त्यात लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही.. हा काही माझ्या इज्जतीचा प्रश्न केलेला नाहीये. माझं एवढंच म्हणण आहे की ही कल्पना सर्वस्वी मनुष्यनिर्मित आहे. जर देव असेल तर मनुष्याबरोबर तो इतर प्राण्यांना सुद्धा अनुभवता आला पाहिजे आणि अगदी रोज नाही, अगदी प्रत्येकाला नाही तरी अनेक लोकांना, ब-याच वेळा दिसलाच पाहिजे... आणी मुख्य म्हणजे सिद्ध करता आला पाहिजे... बास !

मला वाटते की, देवळात एखाद्याला काय वाटते ते सुद्धा लहानपणी झालेल्या संस्कार, ठोकून ठोकून ठसवलेल्या गोष्टी याचा परिपाक असतो. जसे तुम्हाला हिंदु असल्यामुळे देवळात वाटते तसे चर्च मध्ये वाटेल का ? किंवा ख्रिश्चन माणसाला हिंदु देवळात "तसे" वाटेल का जे त्याला चर्च मध्ये वाटते? २००-३०० वर्षांपूर्वी त्याचे पूर्वज हिंदू होते पण त्याचा काहीच परिणाम या व्यक्ति वर होत नाही... यातच सगळे येत नाही का? असो. विषय फार मोठा आणि वादाचा आहे Happy

पंढरपुरला मलाही हा वेगळा अनुभव आला. माझ्या डोळ्यातुन अश्रु येऊ लागले. डोळ्यातले पाणी बाहेर येऊ द्यायचे नाही हा माझा नेहमीचा प्रयत्न तोकडा पडुन अनंत अश्रुधारा वाहु लागल्या. परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती मानावी असा हा अनुभव होता.

विठोबाचे दर्शन अजून झालेले नाही पण अस काही वाचल तर अंगावर काटा येतो आणि डोळ्यातून आपोआप अश्रू पण. तोच जाणे कधी भेटेल.

कसला सुंदर लेख आहे हा, कसा काय राहिला होता वाचायचा देव जाणे Happy नंदीनीचा प्रतिसादही सुरेख
पंढरपूरला मला पण असा वेगळा अनुभव आला होता. लहानपणापासून पुण्यातल्या घराजवळच्या विठ्ठलाच्या देवळात खूप वेळा गेलो होतो पण पंढरपूरला अगदी नोकरीला लागून दहा वर्षे झाली तरी गेलो नव्हतो. मग एकदा मॉरिशस मधल्या विठ्ठलाच्या देवळात गेल्यावर मला लाज वाटली की साता समुद्रापार प्रतिकूल परिस्थितीत राहून तिकडे आपल्या लोकांनी देवाला धरून ठेवलंय आणि आपण महाराष्ट्रात रहात असूनही पंढरपूरला अजून गेलो नाहीये. अगदी मनापासून वाटल्याने असेल तिकडून परत आल्या आल्याच पंढरपूर ला जायचा योग आला. तेव्हा गेलो तो पहिल्यांदाच आणि त्यामुळे किती आत आहे, कधी दिसेल असं काही माहित नव्हतं, असंच भुलभुलैया मधून जात जात अचानक आलाच की तो समोर आणि न कळत डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. घळाघळा का ते कळलंच नाही अजूनही विचार करता समजत नाही.

नंतर इतक्यात दोनेक वर्षांमागे सायकलवर गेलो होतो तर निघताना एका मित्राची सायकल अनेक वेळा पंक्चर झाल्याने पोचायला उशीर झाला आणि देऊळ बंद झाले होते. रजा नव्हती त्यामुळे मुक्काम न करता लगेच निघायचे होते त्याकारणाने त्या खेपेस पंढरपूरला जाऊनही दर्शन झाले नाही. परत येताना आमच्या सायकली ज्या टेम्पोत घालून आणत होतो त्याला अपघात झाला. दारू पिऊन गाडी चालवणार्‍या, समोरून येणार्‍या गाडीवानाने आमच्या पुढेच असलेल्या टेम्पोला धडक दिली. असो. तो एक वेगळा विषय होईल.

मुद्दा देवाच्या मनात येईल तेव्हाच तो दर्शन देतो हे पटावं असा अनुभव

<<< जवळजवळ तीन-चार तास रांगेत उभारून आणि या वेळात खच्चून टाईमपास करीत थकून गेलेला मी जेंव्हा शेवटी विठ्ठलाच्या मुर्तीसमोर उभा राहिलो तेंव्हा त्या दर्शनाने मला एकदम अत्यंत अजबरित्या ताजेतवाने वाटु लागले. >>>
तीन-चार तास हायकिंग करून एकदा समिट गाठले की तेव्हा पण असेच वाटते. आपले उद्दिष्ट गाठले याचा आनंद असेल तो, देवाच्या दर्शनाचा काही संबंध नाही असे वाटते.

डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या हे वर्णन सगळ्यात भारी वाटले.

वर काहींनी लिहिलय मीही लिहावं का? लिहितोच.
आराध्य रामराया असल्याने विठोबाशी फारशी सलगी नाही. एकदा मित्रासोबत पंढरपुरला गेलो. मला विठोबापेक्षा मंदिरात जास्त रस होता. मित्राला म्हणालो तू जाऊन भेट विठ्ठलाला मी मंदीर पहातो. पण त्याने ओढून नेले. समोर काही मुली भजने गात होत्या. कन्नड असावे. पण फार सुरेख. मी चक्क विठ्ठलाकडे पाठ फिरऊन त्यांचे भजन ऐकत उभा राहीलो. मित्राने खांद्याला धरुन मागे वळवले. अनिच्छेने मागे वळलो आणि पहातच राहीलो. मला पाया पडायचेही भान राहीले नाही. कसला आनंद झाला समजेना. नंतर मित्राने सांगीतले की त्याने मला पुढे न्यायचा प्रयत्न केला पण पुजाऱ्यांनी त्याला तसे करु दिले नाही. घरी आल्यावर वडीलांना हे सर्व सांगीतलं तर ते काही बोलू नको म्हणत चक्क पाया पडले माझ्या. पंढरपुरात काहीतरी ताकद आहे हे नक्की.

हर्पेन आणि शाली, सुंदर अनुभव.
पंढरपूरला अजून गेले नाहीये. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात दर्शनाचा असा काही विशेष अनुभव आल्याचं आठवत नाही.
जगन्नाथपुरीला प्रचंड गर्दीतून लांबूनच जेमतेम दर्शन झालं. त्या ठिकाणाबद्दल, देवस्थानाबद्दल मनात खूप उत्सुकता होती, त्यामुळे असेल, पण ते जेमतेम दर्शनही समाधान देऊन गेलं.
गावातलं गावदेवीचं देऊळ, गावाजवळचं एक महादेवाचं देऊळ अशा देवळांमध्ये देवदर्शनापेक्षा तिथे नुसतं बसणं आवडतं. शांत वाटतं.

Pages