दर्शनमात्रे

Submitted by लसावि on 19 May, 2010 - 07:58

लहानपणी आमच्या गावातल्या घरात टिपीकल देवघर असं कधीच नव्हतं. होता तो गणपतीचा एकच मोठा फ़ोटो, तो ही पेंटर दाभोळकरांचा, अ‍ॅबस्ट्रॅक्ट वाटावा असा (हे सगळ आत्ता कळतयं, तेंव्हा मात्र बाकी लोकांच्या घरी असलेल्या चारी हात स्पष्ट दिसणार्‍या, प्रेमळ गणपतीसारखा हा नाही एवढचं वाटायचं). बाबा त्याच्यासमोर रोज संध्याकाळी अथर्वशीर्ष म्हणायचे, तेंव्हा ते माझ्यापासून खूप दूर गेले आहेत असे वाटे; मला अजिबात आवडायचे नाही ते. त्यांनीही माझ्यावर कधी कुठलं स्तोत्र म्हणण्याचे ’संस्कार’ वगैरे केले नाहीत, पण मला ते सर्व ऐकायला आवडयचं. खासकरुन अथर्वशीर्षाचा मराठी अनुवाद आणि बाबांचे त्यावरचे भाष्य; ’ही फ़लश्रुती नक्कीच प्रक्षिप्त असावी’, इ.इ. ईश्वर संकल्पना ही मानवी निर्मिती आहे ही गोष्ट तेंव्हाच कधीतरी मनात रुजली असावी.

देवळात जाऊन दर्शन घेतल्याची सर्वात जुनी आठवण माझ्या गावची, माढ्याचीच आहे. आमच्या या गावात फ़ार पावरबाज देव कोणताच नव्हता. मला नेहमी वाटते की प्रत्येक गावाची दैवतं त्या गावाची सांस्कॄतिक-सामाजिक विशेषता आणि लोकमानस प्रतिबिंबीत करणारी असतात. त्याप्रमाणे आमच्या या माढेश्वरीने कधीही काही चमत्कार केल्याची कथा नाही (तिचे देउळ ज्या कोरड्या ओढ्याच्या काठी आहे त्याला गावात मनकर्णिका नदी म्हणतात हा चमत्कार सोडल्यास!). अर्थात कोणा भक्ताच्या मागोमाग येताना त्याचा संयम संपल्याने त्याने मागे वळून पाहिले व देवी गावाबाहेरच राहिली ही अत्यंत कॉमन कथा याही देवीची होतीच. या देवळात जातानाही मूळ देवीपेक्षा बाबांचा वेळ बाहेरच्या गणपतीजवळच जायचा, गणपती त्यांचा पर्सनल गॉड होता.
यासगळ्या पार्श्वभूमीवर सोलापूरात आज्जीकडचे देवघर,त्यातले शेकडो देव आणि फ़ोटो, अनंतकाळ चालणारी पूजा मला गोंधळात टाकायची. त्यात पुन्हा ती पूजा मी करायला हवी असाही तिचा हट्ट असे जो मी कधीही पुरा केला नाही. सोलापूरचे देवही या गावासारखेच मल्टीकल्चरल, प्रत्येक क्लॅनचे देव वेगळे, त्यांच्या देवळावरही त्या त्या सांप्रदायाचा स्पष्ट प्रभाव. सहसा एकीकडचे लोक दुसरीकडे दिसणार नाहीत, काळजापूरच्या मारुतीसारखे सहमतीचे उमेदवार कमीच. पण देव’दर्शना’चा माझा पहिला जाणता अनुभव नक्कीच सोलापूरच्या तळ्यावरच्या गणपतीचा, त्या देवळाच्या लांब,रुंद दगडी पायर्‍यांवर गार वारा खाताना वेगळ्या प्रकारे छान वाटते,हे काहीतरी निराळे आहे अशी जाणिव झाल्य़ाचे स्पष्ट आठवते.
देवावर माझा विश्वास आहे का नाही हे मलाच अजून नीटसे कळलेले नाही. देवळात जाताना काही विशिष्ट भाव,मागणी,लीनता,शरणागतता वगैरे मनात असते असेही काही नाही. या सर्व भक्तीभावापेक्षा माझे तथाकथित बुद्धिवादी मन(?) ईश्वरप्रतिमा आणि संकल्पनेच्या शास्त्रिय, ऐतिहासिक, सामाजिक व्युत्पत्ती,दैवतशास्त्र, मिथ्यकथा यात जास्त रमते.मात्र या वृत्तीमुळेच मला वेगवेगळ्या देवळात जायला फ़ार आवडते.

पण हे वाटते तितके साधे प्रकरण नाही. एखाद्या देवळात गेल्यावर त्या देवाचे दर्शन होणे हे अनेक वेगळ्याचे गोष्टींवर अवलंबून असते. मुळात एखाद्या देवळात आपण कधी जाणार ही बाब इतकी लक बाय चान्स आहे की तुम्हाला दर्शन कधी होणार हेच मुळी ईश्वरइच्छेवर आहे असे वाटू लागले आहे. पन्हाळ्याच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात अंबाबाईने कायमच येता जाता केंव्हाही मनापासून निवांत दर्शन दिले, अगदी गर्दीच्या समजल्या जाणार्‍या दिवसात देखील. तर जोतिबाला जायचे बेत अनेक वेळा करुनही नेहमी काहीतरी व्हायचं आणि जाणं बारगळायचे; जोतिबाने सतत भेट टाळलीच. याउलट कसलाही विचार नसताना केवळ कोल्हापूर स्टँडवर उभी दिसली म्हणून गणपतीपुळ्याच्या गाडीत जाऊन बसलो आणि दर्शन घेउन आलो असेही झाले.
तुम्ही देवळात पोहोचल्यावरही तुम्हाला दर्शन ’कसे’ होणार याच्याही अनेक तर्‍हा आहेत. नवरात्रात सोलापूर ते तुळजापूर चालत जाउन दर्शन घेणे किंवा त्यावेळी रस्त्यावर स्वयंसेवकगिरी करणे हे कॉलेजात असताना करायचे नेहमीचे उद्योग. ग्रॅज्युएशनला असताना रामलिंग-तुळजापूर ट्रीप प्रत्येक सोलापूरी कॉलेजमधे होणारच, त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनचे फ़ारसे अप्रूप कधी वाटले नव्हते. पण एकदा आमच्या ट्रीपमधली काही पोरं-पोरी रामलिंगला मधमाश्या चावून आजारी पडल्याने आम्हाला तुळजापूरात मुक्काम करावा लागला आणि रात्री दीड-दोनच्या सुमारास मंदिरात पोचलो. कोणता विधी चालला होता आणि आम्हाला तिथे प्रवेश कसा मिळाला हे समजत नाही पण पूर्ण अनलंकृत, हळदकुंकवाच्या भारापलीकडची भवानी तिच्या अत्यंत मूळ रुपात दर्शन देती झाली. आठही भुजा स्पष्ट दाखवणारी, नेहमीपेक्षा कितीतरी लहान पण डोळ्यातून प्रकट होणारे तेच तेज, तीच ताकद; अद्वितीय होते ते दृष्य. असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यात वसंतमधे रात्रीचा शो पाहून भंकस करीत शुक्रवारातल्या खोपटात परतताना दगडूशेठ हलवाई गणपती अंगावरचे सगळे दागिने,झालरी,उपरणी उतरवून हाशहुश्श करीत रिलॅक्स बसलेला पाहिला होता!

पण या सर्वांपलिकडे जाउन, एखाद्या देवळात दर्शन घेताना मनस्थितीत होणारा (वा न होणारा) बदल हेच दर्शन खर्‍या अर्थाने झाल्याचे लक्षण आहे असे वाटते. एखाद्या देवळात आपल्याला शांत,समाधानी,प्रसन्न,आनंदी वाटू लागते यात तुमची त्या वेळची मनस्थिती,तुमचे संस्कार,वृत्ती,पूर्वग्रह, त्या स्थानमहात्म्याचा, त्याच्या इतिहासाचा जाणीव-नेणिवेवर कळत-नकळत पडलेला प्रभाव या व अशा अनेक गोष्टींचा एकत्रीत परिणाम असतो. जसे द्वारकेसारख्या देवळातल्या बडेजाव आणि भटजीबाजीने त्या स्थानाशी काही सांधा जोडूच दिला नाही, तर पन्हाळ्याजवळच्या अफ़ाट मसाई पठारावरच्या लहानखुर्‍या आदिम मसाईदेवीच्या दर्शनाचा अनुभव अत्यंत थेट,जिवंत होता. सोमनाथच्या देवळाची भव्यता आणि समुद्राची गाज त्याचा लाजिरवाणा इतिहास मनातून पुसू शकला नाही, तर पशुबळीची प्रथा असलेल्या कार्ल्याच्या देवीमागेच उभ्या बौद्ध विहारांनी सतत आंदोलित होणार्‍या समाजजीवनाचा पुरावाच दिला,आणि विचाराला खुराकही.

या सर्वांना पुरुन उरलेला अनुभव मात्र पंढरीच्या विठोबानेच दिला आहे.मित्रांबरोबर मजा करत, कसलाही गंभीर विचार मनात नसताना मी एक दिवस अचानक पंढरपूरात पोचलो. तोपर्यंत विठोबा म्हणजे अभंगवाणी,वारी आणि बडवे यापलीकडे मजल गेली नव्हती. या भेटीतून आध्यात्मिक किंवा इतर कसल्याही विशेष अनुभवाची अपेक्षा नव्हती आणि पात्रताही. जवळजवळ तीन-चार तास रांगेत उभारून आणि या वेळात खच्चून टाईमपास करीत थकून गेलेला मी जेंव्हा शेवटी विठ्ठलाच्या मुर्तीसमोर उभा राहिलो तेंव्हा त्या दर्शनाने मला एकदम अत्यंत अजबरित्या ताजेतवाने वाटु लागले. सगळा थकवा,शीण नाहीसा झाला. हा अनुभव इतका स्पष्ट, इतका खरा होता की मी त्यामुळे अत्यंत अचंबित झालो. माझे शंकेखोर मन या तात्काळ बदलाला खरे मानायलाच तयार होईना! निवांत, मंदस्मित करीत उभा असलेला तो विठ्ठल, लहानपणापासून फ़ोटोत हजारो वेळा पाहिलेला, तरीही त्यावेळी तो वाटला- आपल्या ओळखीचाच आणि आपल्याला पूर्ण ओळखून असलेला,मित्रच जणू.

कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी या अनुभवाची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही.
त्याक्षणी माझ्या मनाच्या एका कोपर्‍याला त्या अफ़ाट तत्वाचे थोडे दर्शन झाले होते एवढेच म्हणता येईल, की ते ही नाहीच?

गुलमोहर: 

कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी या अनुभवाची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही.>>>

हे असं बर्‍याचवेळा होतं रे माझंही ! मग तो पंढरीच्या विठुच्या पावलांचा स्पर्ष असो... वा शिवथरघळीतलं प्रसन्न वातावरण असो. असाच अनुभव मला अक्कलकोटी माऊलींच्या समोर उभा राहील्यावर्ही येतो. मी नास्तिक नाहीये पण देवभोळाही नाही. अधुनमधुन बायकोबरोबर सिद्धीविनायकाला जावे लागते, तेव्हा तासनतास त्या रांगेत उभे राहून दर्शन घेण्यापेक्षा मी कळसाला नमस्कार करून बाहेर वाट बघत बसतो. देवदर्शनाला लागलेल्या त्या रांगा बघितल्या की असे वाटते, बहुदा माणसाला कुठेना कुठे श्रद्धा ठेवायलाच हवी. केवळ देव म्हणुन नव्हे तर एक 'सत' म्हणून. जेव्हा जेव्हा तुम्ही बेचैन होता तेव्हा हि श्रद्धाच तुम्हाला आधार देते, आसरा देते, धैर्य देते.

मी सहसा देवळात जाणे टाळतो. पण साधी ठेच जरी लागली तरी आईगं बरोबर स्वामी समर्थ हे शब्द तोंडातून येतातच येतात. गंमत म्हणजे सोलापुरकर असुनही मी फारसा अक्कलकोटच्या मठात जात नाही. टण्याप्रमाणे मी बुद्धीप्रामाण्यवादी नाही, तरीही स्वतःच्या बुद्धीला पटल्याशिवाय काही गोष्टी कराव्याशा नाही वाटत. (अपवाद : सदोदीत ओठावर असलेले स्वामी समर्थांचे नाव Happy )

मागे एकदा पावसला गेलो होतो. तेव्हा तिथल्या एका गुरुजींनी सांगितलं होतं. देव का जवळ करायचा तर मोक्ष मिळावा म्हणुन. मोक्ष म्हणजे काय तर अशी एक अवस्था जिथे मनातल्या सर्व भावना, आशा अपेक्षा, वासना विरून जातात. आपण त्या निराकाराशी एकरुप होवून जातो. अशा अवस्थेला पोचायचे तर कुठल्यातरी सत गोष्टीवर श्रद्धा ठेवायलाच हवी. तदाकार होण्यासाठी एकाग्रता लागते, ती अंगी बाणवण्यासाठी तसे वातावरण लागते, त्यासाठी म्हणून खरेतर मंदीरांची संकल्पना आहे. (आजकाल बहुतांश मंदीरे व्यापारकेंद्र बनलीत हा भाग अलाहिदा) पण तिथली प्रसन्न शांतता तुम्हाला निराकारतेकडे, तथाकथित मोक्षाकडे घेवून जावू शकते, मदत करते. पण त्यासाठी मंदीरच हवे अशातला भाग नाही. मनात श्रद्धा असेल तर माणुस कुठेही एकाग्र होवू शकतो. अगदी खचाखच गर्दी असलेल्या लोकलमध्येही. पण हे प्रत्येक सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही. त्यासाठी मग देव, देऊळ या संकल्पना अस्तित्वात आल्या. ग्रेट ना!

बाकी जागा राखुन ठेवतोय, जसे सुचेल तसे लिहीत राहीनच. Happy

माझ्या निवडक १० त गेलं हे . Happy

खूप छान लिहिलेय. देऊळ आणि देवाचे दर्शन देवाच्या मनात असले तरच होते. खूप लोकान्चे अनुभव ऐकलेत कि इचछा असूनहि दर्शन मिळाले नाही. अमरनाथयात्रा करूनहि खूप लोकांना पिंडिचे दर्शन झालेले नाही, पायर्यांपाशीच पाय जड होतात असे ऐकले आहे.

सुंदर लिहिले आहे.. मला वाचता वाचताच एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळाली Happy मी खूप देवळात गेलेली नाही, पण अंबाबाईचे दर्शन कितीही गर्दीत झाले, तरी मस्त वाटते. देवळं दगडी असली, की आपोआपच थोडी गार होतात, त्यात उदबत्ती, धूपाचा सुगंध आणि एक गंभीरपणा.. ह्या सगळ्याचा मिलाफ म्हणजे तीच ती अनामिक शांती असावी Happy

लेख अतिशय सुंदर! आणि त्यावरील प्रतिक्रियाही!

विशाल,
***************************************************
मोक्ष म्हणजे काय तर अशी एक अवस्था जिथे मनातल्या सर्व भावना, आशा अपेक्षा, वासना विरून जातात. आपण त्या निराकाराशी एकरुप होवून जातो. अशा अवस्थेला पोचायचे तर कुठल्यातरी सत गोष्टीवर श्रद्धा ठेवायलाच हवी. तदाकार होण्यासाठी एकाग्रता लागते, ती अंगी बाणवण्यासाठी तसे वातावरण लागते, त्यासाठी म्हणून खरेतर मंदीरांची संकल्पना आहे. (आजकाल बहुतांश मंदीरे व्यापारकेंद्र बनलीत हा भाग अलाहिदा) पण तिथली प्रसन्न शांतता तुम्हाला निराकारतेकडे, तथाकथित मोक्षाकडे घेवून जावू शकते, मदत करते. पण त्यासाठी मंदीरच हवे अशातला भाग नाही. मनात श्रद्धा असेल तर माणुस कुठेही एकाग्र होवू शकतो. अगदी खचाखच गर्दी असलेल्या लोकलमध्येही. पण हे प्रत्येक सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही. त्यासाठी मग देव, देऊळ या संकल्पना अस्तित्वात आल्या.
****************************************************
इतके नेमके कुठेही आधी वाचले नव्हते. मला वाटते आता तुम्हाला आणखी आध्यात्मावर काही वाचायची गरज नाही! You got it!

धन्यवाद मनोज,
मला त्यातलं (अध्यात्मातलं) काही कळत नाही. माझ्या अल्पमतीनुसार मी अध्यात्माचा अर्थ काढलाय तो असा...
शब्दशः अध्यात्म या शब्दाचा विग्रह केला कि आधि + आत्म असा होतो. आधि म्हणजे आत , आत्म म्हणजे 'मी'. माझ्या आत दडलेला जो मी आहे त्याला शोधणे, त्याला स्वतःपासुन दुर करणे, वेगळा करणे म्हणजे अध्यात्म.
माझ्या मागच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे अंतीम ध्येय काय तर मोक्ष..ती निराकार अवस्था ! मानवी जिवनाची प्रत्येक गोष्ट, आशा, अपेक्षा, वासना, अभिलाषा, महत्वाकांक्षा ही त्याच्या 'मी' शी जोडलेली असते. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर हे विकार या 'मी' ला लागुनच येतात. तो 'मी' आपल्यातून काढून टाकला की जे उरते तो मोक्ष.
निदान मलातरी या जन्मी तरी ते साध्य होइल असे वाटत नाही, पण प्रयत्नशील राहणे आपले काम आहे आणि आपण ते करत राहूच. काय? Happy

एकाहून एक उत्तम,विचार करायला लावणार्‍या प्रतिक्रिया वाचून अत्यंत समाधान वाटलं. आपल्या लेखामुळे एवढे विविध अनुभव, विचार प्रकट झाले यापेक्षा वेगळं समाधान लेखकाला काय असू शकतं Happy

छान लिहिलं आहेत. मी धार्मिक नाही पण देवावर विश्वास असलेली आहे. मला आपलं प्रामाणिकपणे वाटतं की देवाचं बोलावणं आल्याखेरीज दर्शन घडत नाही. आणि तथाकथित सेलेब्रिटीजच्या पदस्पर्शाने पावन होणार्‍या मंदिरांपेक्षा जनसामान्यांच्या पदरवाने जीवंत राहणार्‍या मंदिरातच देव सापडतो.

सुंदर लिहिलेय..

मला देवळात जायला आवडतं ते देऊळ बघायलाम, तिथल्या वातावरणाचा फिल घ्यायला.. मुंबईच्या महालक्ष्मी किंवा सिद्दिविनायका पेक्षा प्रवासात वाटेत थांबल्यावर किंवा बाहेर कुठे गेल्यावर एखादे देऊळ दिसले तर तिथे जाऊन एकटीच उभी असलेली मुर्ती आणि तिच्यासमोर शांतपणे तेवणारा एखादा दिवा बघत बसायला आवडते. तिथेच थोडा वेळ थांबुन ते वातावरण आत भरुन घ्यायचा प्रयत्न करते.

सणांच्या दिवशी, एखाद्या देवा/वीचा वार असतो त्या दिवशी मात्र देवळात जायला मला अजीबात आवडत नाही, जायची संधी मिळाली तरी मी टाळतेच आणि टाळता आले नाही तर देवळात जाऊन तिथे आलेल्या भक्तांच्या त-हा बघत बसते. देव सगळ्या दिवशी सारखाच, त्याच्या वारी त्याच्यात जरा जास्त ताकद असते असे मला तरी वाटत नाही.

देवळात किंवा असेही देवाकडे अजुन कधीही काहीही मुद्दाम मागितले नाहीये. देव जर खरा असेल तर त्याच्याकडे मागायची गरज नाही आणि न मागता त्याला कळत नसेल तर मग मागण्यातही काही अर्थ नाही. आपण आईला कधी सांगतो काय, भुक लागली म्हणुन?आता जेवण बनव? न सांगताच ती जेवण बनवुन बरोबर भुकेच्या वेळी आपल्यासमोर ठेवते.

का माहित नाही, पण तिरुपती शिर्डी वगैरे श्रीमंत देवांना भेटण्याची इच्छा अजुन झाली नाहीये. आणि बोलावणे आल्याशिवाय भेट होणार नाही यावर माझाही विश्वास आहे. ह्यावेळी गावाहुन येताना हायवेवर जोतिबाचा नामफलक वाचला आणि गाडी वळवली. अनपेक्षितपणे, न ठरवता जोतिबाचे दर्शन घडले.

आगावा, आपल्या सोलापूरात मल्लिकार्जुनाचं एक हेमाडपंथी मंदीर आहे, तिथे कधी गेलाहेस?
अतिशय शांत आणि थंड असे वातावरण असते तिथे नेहमी. तसेच कधी तुळजापुरला गेलास की तिथे 'पापनाश तिर्थ' म्हणून एक स्थळ आहे. ते पण खुप सुंदर आहे. किंवा 'माचणूर'चे शिवशंभोचे मंदीर. या मंदीरात तर आत शिरले की सभागृहाच्या ऐवजी एक प्रशस्त गोड्या पाण्याचे कुंड आहे. चारी बाजुने ओवर्‍या आहेत, आत उतरता येते. त्याला लागुनच गाभारा असल्याने कायम थंड असे वातावरण असते.

बाळिवेसच्या तिथे आहे ते का? एकदाच गेलो होतो आता नीट आठवत नाही. अलीकडे पाहिलेले सगळ्यात अदभुत देऊळ म्हणजे कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव मंदिर.

अरे कोळीसरेला कसे पोचलास/गेलास (सहज का मुद्दामून)..?
ते आमचे कुलदैवत आहे... त्याची वारी फार वर्षापूर्वी (१९८९) घडली होती. तिथला सर्व परिसरच अतीरम्य अतीअद्भूत आहे! अजूनही तिथली जिवंत मूर्ती स्मरणात आहे. अन त्या काळी त्या मंदीराचा शोध घेत सख्खे चुलते असे मिळून मोठा परिवार गेलो तो किस्सा म्हणजे एक थरारक कहाणी आहे.

मालगुंडची मुसळादेवी बायकोच्या घरची कुलदेवता आहे त्यामुळे तिकडे गेलो होतो.तेंव्हा कोळीसर्‍याची माहिती मिळाली. अशक्य सुंदर जागा आहे ती.आता उत्तम व्यवस्था आहे पण ८९ला फारच दुर्लक्षित असावे, नाही का?

माझे शंकेखोर मन या तात्काळ बदलाला खरे मानायलाच तयार होईना! निवांत, मंदस्मित करीत उभा असलेला तो विठ्ठल, लहानपणापासून फ़ोटोत हजारो वेळा पाहिलेला, तरीही त्यावेळी तो वाटला- आपल्या ओळखीचाच आणि आपल्याला पूर्ण ओळखून असलेला,मित्रच जणू. >>> Happy

आगाऊ छान लेख.

अलीकडे पाहिलेले सगळ्यात अदभुत देऊळ म्हणजे कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव मंदिर.>>> हे आमचे कुलदैवत. Happy

मला देवळात जायला आवडतं. पण कुठल्या देवळात हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. तिरूपती शिर्डी सिद्धीविनायक हे व असले देव "माझे" नव्हेत. गणपतीपुळ्याचा गणपती जेव्हा छोट्याशा घरासारख्या मंदिरात होता तेव्हा माझा होता, आता संगमरवरी देवळातल्या मोठ्या गाभार्‍यात आणि शेकडो लोकाच्या गर्दीत हरवला, तेव्हापासून तो दुरावला.

मला कोकणातली देवळं फार म्हणजे फार आवडतात. प्रत्येक गावाचं असं एक देऊळ असतं. लांबून पाहिलं तर एखाद्या कौलारू घरासारखं दिसणारं. कोकणातला पावसाळा जसा माण्साना त्रासदायक तसा देवळाना पण. म्हणून एखाद्या छोट्याशा घरात अंधार्‍या गाभार्‍यामधे देव बसलेला अस्तो. त्याची नावं पण वेगळी. नागरी संस्कृतीपेक्षा आदिम संस्कृतीशी नातं जपणारी.

देवळामधे "देऊळ" या संकल्पनेने मनात जे काही उभं राहतं ते या देवळातून असेलच नसं नाही. पण असते ती एक प्रकारची शांतता. हे असं देऊळ जास्त करून गावाबाहेर असतात. घाट्या तुडवत तुडवत चालायला लागतं. चढ उतरण असतेच. आजूबाजूला दाट झाडी असते. त्यामधे अवचित वाटणारं असं हे देऊळ उभं असतं. देवळापर्यंत गाडी जाईलच याची खात्री नसते. त्यामुळे चालाय्ची तयरी ठेवूनच अशा देवळाच्या दर्शनाला निघायचं. या प्रत्येक देवळाची आपली अशी एक अख्यायिका असते. कुणाचा इतिहास पेशवेकालीन असतो तर कुणाचा शिवकालीन. आणि काही काही देवळं चक्क पांडवकालीन असतात.

देवळाच्या आजूबाजूला जांभ्या दगडाची पाखाडी असते. आसपास एखादा झरा पर्‍या, किंवा तळं (कित्येक ठिकाणी तर समुद्र!) असतो. काहीच नसलं तर खोल खोल जाणारी कधी रहाटाची कधी पायर्‍याची विहीर नक्कीच असते. कधी आंब्याची माडाची झाडं असतात. क्वचित एखाद दुसर्‍या ठिकाणी दीपमाळ दिसेल. मुख्य देवळाच्या आजूबाजूला छोटी छोटी देवळं असतात. बहुतेक सर्व मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेल्या... गावचा राखणदार असतो, भैरी असतो. देवी असते. गणपती असतो.

या देवळामधे क्वचित एखादा गुरव असतो. ब्राह्मण असेलच असे नाही, आणि गुरव असो वा ब्राह्मण दक्षिणेसाठी तो हात पुढे करत नाही. तुम्ही काही दिलंत तर ठिक नाहीच दिलंत म्हणून काही बिघडत नाही, कोकणाला दरिद्रीपणाची लाज वाटत नाही, मागायची मात्र नक्की वाटते!!

दर्शनाला रांगेत उभं रहावं लागत नाही. तिकिटं फाडावी लागत नाहीत. गुरव देवळाची आख्यायिका अगदी भक्तिभावाने सांगतो. मग एखाद्या गणीकेला सूर्यदेवाने स्वप्नात दर्शन दिलेले असते. एखादी झोलाईदेवी माहेरवाशिण रडली तर तिच्या मदतीला कशी धावून जाते, एखदा स्थानिक आमदार देवीला कौल लावल्याशिवाय प्रचाराला का सुरूवात करत नाही. एखाद्या देवळात भीम जेवायला बसला आणि जेवण संपलं तर द्रौपदीने काय केलं अशा स्वरूपाच्या असतात.

दुपारच्या वेळेत आलात तर गुरवाच्या घरी जेवायची व्यवस्था होऊ शकते. नाहीच तर, देवळाच्या आवारातच बसून पिकनिक लंच करता येइल. तुमच्या सोबत कंपनी म्हणून वानरं कावळे चिमण्या आनी अजून काही काही पक्षी येतील. आजूबाजूला बोकाळलेली हॉटेलं त्यात वाजणारी ती गुल्शन कुमारची सिनेमा भक्ती गीते वगैरे प्रकार अजून इथे नाहीत. देवळाच्या आजूबाजूला स्वच्छता ही असतेच. कोकनातली गावंच मुळात स्वच्छ असल्याने देवळामधे कुठेही घाण कचरा माशा अथवा उष्टे खरकटे वगैरे प्रकार दिसणार नाहीत.

अमुक रकमेची पावती फाडा, असे म्हणत पाठी लागणारे लोक इथे नसतात. गावातल्या ज्या चाकरमान्याची देवावर श्रद्धा आहे ते देवळाना भरपूर देणगी देतात. वार्षिक जत्रा, पालखी उत्सव, देवाचे कपडे वगैरे सर्वाचा खर्च भागलेला असतो. उरलेल्या पैशातून देवस्थानचे विश्वस्त मंडळ गावातच काही योजना राबवत असतं. या देवाना पैशासाठी कधी भक्ताकडे आसुसल्या नजरेने पहावे लागत नाहीत. देवाचा पैसा आपण खाल्ला तर देवाला समजेल आणि आपले काही बरे वाईट होईल ही श्रद्धा, हा विश्वास अजून इथे जिवंत असतो. तुम्ही देवाला काही दिलंत तर ते त्यालाच पोचतं.

आणि त्याहून महत्त्वाचं देव तुम्हाला काय देतो... शांतता. विलक्षण शांतता. मानसिक समाधान. आपण या देवाला भेटायला आलोय कारण आपला देवाशी तसा काही सौदा आहे, ही भावना मनाला इथे छळत नाही. "लवकर चला मागचे खोळंबलेत" म्हणून कुणी वस्सकन ओरडात नाही. गर्दीत कुणी धक्काबुकी करत नाही. जत्रेच्या वेळेला लाखोनी माणूस जमेल पण तरी सर्व काही शिस्तीत काम असेल. देवाची जत्रा म्हणजे घरचं कार्य.

आणि अशी ही देवळं कोकणात गावागावातून असतात. इथल्या लोकाना चार धाम तिरूपती शिर्डी अशा ठिकाणी जाऊन आपल्या भक्तीची ग्ग्वाही देत फिरावं लागत नाही. आणि म्हणूनच मला कोकणातली ही देवळं फार आवडतात. ती "देवाची घरे" वाटतात.

आगावू (एवढा चांगले ललित लिहिल्यावर 'आगावू' तरी कसे संबोधायचे ?)

लेख आणि प्रतिक्रिया दोन्हीही वाचनीय. वाचल्यावर आपसूकच विचार करायला लागले. मी ही बर्‍याचदा गर्दीच्या वेळा टाळूनच जाते. गेल्यावरही दर्शन घेतल्यानंतर, मला आलेल्या इतर भाविकांचे निरिक्षण करायला आवडते. ती माणसं, त्यांचे देवाशी चाललेले संवाद, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नमस्कार, त्यांची देवाच्या चरणाशी असलेली लीनता, तो पुजारी, बाहेर फूले - नारळ - प्रसाद विकणारे त्यांचे अर्थकारण खुप बघण्यासारखे असते. का कोण जाणे, खुप टोकाची श्रद्धा ठेवणे पण जमत नाही. जेवढी आहे ती केवळ आपल्या स्वतः साठी संयमित ठेवणेच मला पटते.

आगावा (?) तुझा लेख निवडक दहात बरं का ! Happy

बाळिवेसच्या तिथे आहे ते का?>>

तेच ते, बाळीवेसमधुन नवीपेठकडे येताना (चौपाडामार्गे) संपुर्ण काळ्या दगडातले, भव्य देखणे मल्लिकार्जुनाचे मंदीर. सोमवार टाळुन इतर दिवशी गेल्यास सिद्धेश्वर किंवा रेवण सिद्धेश्वरही तेवढेच प्रसन्न वाटतात. रायगडावरचा जगदीश्वरही असाच आपला वाटतो. अगदी शक्य असेल तर सात रस्त्यावरुन कंबर तलावाकडे जाताना उजव्या हातावर पुलाच्या खालच्या बाजुला एक दर्गा आहे, तो देखील असाच शांत असतो. मी तिथे नेहमी जातो सोलापूरला गेलो की.
खरं सांगू मुळात जिथे मनाला शांतता, समाधान लाभते त्या जागेला मंदीर म्हणायला हरकत नसावी. Happy मग तो एखादा शांत, एकाकी समुद्रकिनारा का असेना! Happy

आगावू सुन्दर लेख.

मंदिरात, चर्च व विहार मसजिद अश्या काही ठिकाणी पॉझिटिव एनर्जी नक्की असते. उदा सांथोम चर्च चेन्नै,
लिंगराज मंदिर भुवनेश्वर. मदुरै मीनाक्षीमंदीर. कोल्हापूर देवी. हरिपूर गणपती व शिवमंदीर. सांगलीचा गणपती. माझी आवड्ती ठिकाणे. तुम्हाला तो तसा मंदिराचा खास वास यावा यामागे प्रचंड धड्पड व ट्रायल एरर असते. उदा: भारतवासी अगरबत्ती/ पद्मिनी धूप. क्लासिक उत्पादने आहेत.

आगाऊ, पंढरपूरला प्रथम गेल्यावर मलाही असाच अद्भुत अनुभव आला.... काय जादू आहे तिथे माहित नाही.. उगाच नाही त्या मूर्तीने युगे अठ्ठावीस सगळ्यांना वेड लाऊन ठेवलं आहे. मोठमोठे संत महात्मे जिथे स्वतःला आणि घरादाराला विसरले, त्या 'काळ्या'समोर, तिथे आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा!

फार छान लिहिलंय, आवडलं.... Happy

मस्त लिहिलयस आगाऊ.. कसं माहित नाही, पण निसटलेलच वाचायचं.. लिंक दिल्याबद्दल अगदी थँक्यू..

डोक्यातला बुप्रावाद आणि मनातला भक्तीभाव याचा झगडा कधी सुटेल ते माहिती नाही >> अगदी अगदी रे..

मला कोकणातली ही देवळं फार आवडतात. ती "देवाची घरे" वाटतात. <<< अनुमोदन...

देवाच्या आणि आपल्यामधे एजंट आला की देवळात देव नाही हे आपोआप समजावे.
रांगा लावा, पावत्या फाडा, दर्शनाचे पैसे द्या असलं काही असलं की मी जाणे टाळतो.
हल्ली सिध्दीविनायकही पोलीस संरक्षणात गेल्यापासून तिथेही जावे वाटत नाही.

म्हणुन कोकणातली ही देवळं फार आवडतात..

Pages