दर्शनमात्रे

Submitted by लसावि on 19 May, 2010 - 07:58

लहानपणी आमच्या गावातल्या घरात टिपीकल देवघर असं कधीच नव्हतं. होता तो गणपतीचा एकच मोठा फ़ोटो, तो ही पेंटर दाभोळकरांचा, अ‍ॅबस्ट्रॅक्ट वाटावा असा (हे सगळ आत्ता कळतयं, तेंव्हा मात्र बाकी लोकांच्या घरी असलेल्या चारी हात स्पष्ट दिसणार्‍या, प्रेमळ गणपतीसारखा हा नाही एवढचं वाटायचं). बाबा त्याच्यासमोर रोज संध्याकाळी अथर्वशीर्ष म्हणायचे, तेंव्हा ते माझ्यापासून खूप दूर गेले आहेत असे वाटे; मला अजिबात आवडायचे नाही ते. त्यांनीही माझ्यावर कधी कुठलं स्तोत्र म्हणण्याचे ’संस्कार’ वगैरे केले नाहीत, पण मला ते सर्व ऐकायला आवडयचं. खासकरुन अथर्वशीर्षाचा मराठी अनुवाद आणि बाबांचे त्यावरचे भाष्य; ’ही फ़लश्रुती नक्कीच प्रक्षिप्त असावी’, इ.इ. ईश्वर संकल्पना ही मानवी निर्मिती आहे ही गोष्ट तेंव्हाच कधीतरी मनात रुजली असावी.

देवळात जाऊन दर्शन घेतल्याची सर्वात जुनी आठवण माझ्या गावची, माढ्याचीच आहे. आमच्या या गावात फ़ार पावरबाज देव कोणताच नव्हता. मला नेहमी वाटते की प्रत्येक गावाची दैवतं त्या गावाची सांस्कॄतिक-सामाजिक विशेषता आणि लोकमानस प्रतिबिंबीत करणारी असतात. त्याप्रमाणे आमच्या या माढेश्वरीने कधीही काही चमत्कार केल्याची कथा नाही (तिचे देउळ ज्या कोरड्या ओढ्याच्या काठी आहे त्याला गावात मनकर्णिका नदी म्हणतात हा चमत्कार सोडल्यास!). अर्थात कोणा भक्ताच्या मागोमाग येताना त्याचा संयम संपल्याने त्याने मागे वळून पाहिले व देवी गावाबाहेरच राहिली ही अत्यंत कॉमन कथा याही देवीची होतीच. या देवळात जातानाही मूळ देवीपेक्षा बाबांचा वेळ बाहेरच्या गणपतीजवळच जायचा, गणपती त्यांचा पर्सनल गॉड होता.
यासगळ्या पार्श्वभूमीवर सोलापूरात आज्जीकडचे देवघर,त्यातले शेकडो देव आणि फ़ोटो, अनंतकाळ चालणारी पूजा मला गोंधळात टाकायची. त्यात पुन्हा ती पूजा मी करायला हवी असाही तिचा हट्ट असे जो मी कधीही पुरा केला नाही. सोलापूरचे देवही या गावासारखेच मल्टीकल्चरल, प्रत्येक क्लॅनचे देव वेगळे, त्यांच्या देवळावरही त्या त्या सांप्रदायाचा स्पष्ट प्रभाव. सहसा एकीकडचे लोक दुसरीकडे दिसणार नाहीत, काळजापूरच्या मारुतीसारखे सहमतीचे उमेदवार कमीच. पण देव’दर्शना’चा माझा पहिला जाणता अनुभव नक्कीच सोलापूरच्या तळ्यावरच्या गणपतीचा, त्या देवळाच्या लांब,रुंद दगडी पायर्‍यांवर गार वारा खाताना वेगळ्या प्रकारे छान वाटते,हे काहीतरी निराळे आहे अशी जाणिव झाल्य़ाचे स्पष्ट आठवते.
देवावर माझा विश्वास आहे का नाही हे मलाच अजून नीटसे कळलेले नाही. देवळात जाताना काही विशिष्ट भाव,मागणी,लीनता,शरणागतता वगैरे मनात असते असेही काही नाही. या सर्व भक्तीभावापेक्षा माझे तथाकथित बुद्धिवादी मन(?) ईश्वरप्रतिमा आणि संकल्पनेच्या शास्त्रिय, ऐतिहासिक, सामाजिक व्युत्पत्ती,दैवतशास्त्र, मिथ्यकथा यात जास्त रमते.मात्र या वृत्तीमुळेच मला वेगवेगळ्या देवळात जायला फ़ार आवडते.

पण हे वाटते तितके साधे प्रकरण नाही. एखाद्या देवळात गेल्यावर त्या देवाचे दर्शन होणे हे अनेक वेगळ्याचे गोष्टींवर अवलंबून असते. मुळात एखाद्या देवळात आपण कधी जाणार ही बाब इतकी लक बाय चान्स आहे की तुम्हाला दर्शन कधी होणार हेच मुळी ईश्वरइच्छेवर आहे असे वाटू लागले आहे. पन्हाळ्याच्या तीन वर्षाच्या वास्तव्यात अंबाबाईने कायमच येता जाता केंव्हाही मनापासून निवांत दर्शन दिले, अगदी गर्दीच्या समजल्या जाणार्‍या दिवसात देखील. तर जोतिबाला जायचे बेत अनेक वेळा करुनही नेहमी काहीतरी व्हायचं आणि जाणं बारगळायचे; जोतिबाने सतत भेट टाळलीच. याउलट कसलाही विचार नसताना केवळ कोल्हापूर स्टँडवर उभी दिसली म्हणून गणपतीपुळ्याच्या गाडीत जाऊन बसलो आणि दर्शन घेउन आलो असेही झाले.
तुम्ही देवळात पोहोचल्यावरही तुम्हाला दर्शन ’कसे’ होणार याच्याही अनेक तर्‍हा आहेत. नवरात्रात सोलापूर ते तुळजापूर चालत जाउन दर्शन घेणे किंवा त्यावेळी रस्त्यावर स्वयंसेवकगिरी करणे हे कॉलेजात असताना करायचे नेहमीचे उद्योग. ग्रॅज्युएशनला असताना रामलिंग-तुळजापूर ट्रीप प्रत्येक सोलापूरी कॉलेजमधे होणारच, त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनचे फ़ारसे अप्रूप कधी वाटले नव्हते. पण एकदा आमच्या ट्रीपमधली काही पोरं-पोरी रामलिंगला मधमाश्या चावून आजारी पडल्याने आम्हाला तुळजापूरात मुक्काम करावा लागला आणि रात्री दीड-दोनच्या सुमारास मंदिरात पोचलो. कोणता विधी चालला होता आणि आम्हाला तिथे प्रवेश कसा मिळाला हे समजत नाही पण पूर्ण अनलंकृत, हळदकुंकवाच्या भारापलीकडची भवानी तिच्या अत्यंत मूळ रुपात दर्शन देती झाली. आठही भुजा स्पष्ट दाखवणारी, नेहमीपेक्षा कितीतरी लहान पण डोळ्यातून प्रकट होणारे तेच तेज, तीच ताकद; अद्वितीय होते ते दृष्य. असेच एकदा उन्हाळ्याच्या दिवसात पुण्यात वसंतमधे रात्रीचा शो पाहून भंकस करीत शुक्रवारातल्या खोपटात परतताना दगडूशेठ हलवाई गणपती अंगावरचे सगळे दागिने,झालरी,उपरणी उतरवून हाशहुश्श करीत रिलॅक्स बसलेला पाहिला होता!

पण या सर्वांपलिकडे जाउन, एखाद्या देवळात दर्शन घेताना मनस्थितीत होणारा (वा न होणारा) बदल हेच दर्शन खर्‍या अर्थाने झाल्याचे लक्षण आहे असे वाटते. एखाद्या देवळात आपल्याला शांत,समाधानी,प्रसन्न,आनंदी वाटू लागते यात तुमची त्या वेळची मनस्थिती,तुमचे संस्कार,वृत्ती,पूर्वग्रह, त्या स्थानमहात्म्याचा, त्याच्या इतिहासाचा जाणीव-नेणिवेवर कळत-नकळत पडलेला प्रभाव या व अशा अनेक गोष्टींचा एकत्रीत परिणाम असतो. जसे द्वारकेसारख्या देवळातल्या बडेजाव आणि भटजीबाजीने त्या स्थानाशी काही सांधा जोडूच दिला नाही, तर पन्हाळ्याजवळच्या अफ़ाट मसाई पठारावरच्या लहानखुर्‍या आदिम मसाईदेवीच्या दर्शनाचा अनुभव अत्यंत थेट,जिवंत होता. सोमनाथच्या देवळाची भव्यता आणि समुद्राची गाज त्याचा लाजिरवाणा इतिहास मनातून पुसू शकला नाही, तर पशुबळीची प्रथा असलेल्या कार्ल्याच्या देवीमागेच उभ्या बौद्ध विहारांनी सतत आंदोलित होणार्‍या समाजजीवनाचा पुरावाच दिला,आणि विचाराला खुराकही.

या सर्वांना पुरुन उरलेला अनुभव मात्र पंढरीच्या विठोबानेच दिला आहे.मित्रांबरोबर मजा करत, कसलाही गंभीर विचार मनात नसताना मी एक दिवस अचानक पंढरपूरात पोचलो. तोपर्यंत विठोबा म्हणजे अभंगवाणी,वारी आणि बडवे यापलीकडे मजल गेली नव्हती. या भेटीतून आध्यात्मिक किंवा इतर कसल्याही विशेष अनुभवाची अपेक्षा नव्हती आणि पात्रताही. जवळजवळ तीन-चार तास रांगेत उभारून आणि या वेळात खच्चून टाईमपास करीत थकून गेलेला मी जेंव्हा शेवटी विठ्ठलाच्या मुर्तीसमोर उभा राहिलो तेंव्हा त्या दर्शनाने मला एकदम अत्यंत अजबरित्या ताजेतवाने वाटु लागले. सगळा थकवा,शीण नाहीसा झाला. हा अनुभव इतका स्पष्ट, इतका खरा होता की मी त्यामुळे अत्यंत अचंबित झालो. माझे शंकेखोर मन या तात्काळ बदलाला खरे मानायलाच तयार होईना! निवांत, मंदस्मित करीत उभा असलेला तो विठ्ठल, लहानपणापासून फ़ोटोत हजारो वेळा पाहिलेला, तरीही त्यावेळी तो वाटला- आपल्या ओळखीचाच आणि आपल्याला पूर्ण ओळखून असलेला,मित्रच जणू.

कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी या अनुभवाची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही.
त्याक्षणी माझ्या मनाच्या एका कोपर्‍याला त्या अफ़ाट तत्वाचे थोडे दर्शन झाले होते एवढेच म्हणता येईल, की ते ही नाहीच?

गुलमोहर: 

आगाउ हे तू इतक्या प्रामाणिकपणे लिहू शकतोस हीच फार मोठी गोष्ट आहे.. लेख तर सुरेख लिहिलाच आहेस..

मसाईच्या पठारावरचं ते बारकुस देउळ, तिथे बरेचदा नवसाला कोंबडं कापणारी माणसं हे अगदी स्पष्ट आठवलं.. पंढरपूरचा विठोबा ही तर अजबच चीज.. विशेषतः वारीत चार दिवस तंगडतोड केल्यावर काय होते कोण जाणे पण विठोबाची मुर्ती आणि तिच्या पायांची अचाट गुळगुळीत स्पर्श हे शब्दातीत..

मी टोकाचा बुप्रा झाल्यापासून मात्र देउळ एन्जॉय करु शकत नाही.. एक भयानक चीड दाटून येते देवळात गेले की.. ही बहुतेक आता आयुष्यभराची खोड होणार..

छान लिहीलय Happy

मी अजुनही कुठच्या एका मताला पोहोचु शकले नाही म्हणा किंवा मी मुळातच अधली मधली आहे म्हणा त्यामुळे जशी शांतता अनुभवलेय तशीच चीडचीड देखील

नुकतेच महबळेश्वरला जाऊन आलो फेब मधे. तेव्हा अचानक त्या दिवशी दुसरा प्रोग्रॅम कँसल झाला म्हणुन योगायोगाने गोकर्णच्या शंकराच्या मंदीरात पोहोचलो. असं निमित्त साधुन वगैरे मुद्दाम जाणार्‍यातली मी नाही. उलट शक्य तेव्हा असे स्पेशल दिवस टाळुनच जाते (गर्दी टाळायला) पण त्या दिवशी अचानक ठरल नी गेलो. मंदीरात मधे हौद होता (जे आठवतय ते लिहीतेय) लोकं (बाया पुरुष दोन्ही) पापक्षालनासाठी तिथे गोमुखातुन आलेल्या पाण्यात डुबकी मारुन बाहेर येत होते कुणी भट्जींना सांगून पाणी भरुन घेत होते घरी नेण्यासाठी. बापरे मला फक्त त्या मुळे निसरड्या झालेल्या जागेवरुन माझा नी लेकीचा पाय घसरण्याची भिती वाटत होती. मला अजिबात शांती अनुभवाला आली नाही. अर्थात त्यात ना महादेवाचा दोष होता ना भक्तांचा. ते त्यांच्या रिती सांभाळत होते, मी मंदीर शांतपणे बघायचा भाव मनात घेऊन तिथे गेलेले.

अतिशय सुंदर लिहिलं आहेस. Happy लिंक दिल्याबद्दल अनेक आभार.

>>कशाही पद्धतीने पृथ:करण केले तरी या अनुभवाची कारणमिमांसा मला आज इतक्या वर्षांनीही देता येत नाही.
त्याक्षणी माझ्या मनाच्या एका कोपर्‍याला त्या अफ़ाट तत्वाचे थोडे दर्शन झाले होते एवढेच म्हणता येईल

इश्वरी तत्वाच्या अस्तित्वाची अनुभूती अशीच येत असावी बहुतेक Happy

ट्ण्या, सॉरी, पण
>>>मी टोकाचा बुप्रा झाल्यापासून मात्र देउळ एन्जॉय करु शकत नाही.. एक भयानक चीड दाटून येते देवळात गेले की.. ही बहुतेक आता आयुष्यभराची खोड होणा>>>>>>

या वाक्याचा अर्थ कळला नाही >>>टोकाचा बुप्रा>>> म्हणजे काय?

सुंदर लेख आगावा .. Happy

मी पण कवितेच्याच कॅटेगरीतला..
गर्दीमध्ये देवाचे दर्शन घेणे मलाही नाही आवडत जरी तो कुठलाही सण/दिवस असो. तसच सगळ्याच देवळात तुम्हाला शांत, सुंदर अनुभव येईलच असं नाही.

छान लिहिलं आहे, अगदी प्रामाणिकपणे! मला त्यातला काहीसा गोंधळलेला प्रामाणिक भाव आवडला.

मला आजतागायत देवळांचे खूप सुंदर सुंदर अनुभव आलेत. पण ते तिथे गर्दी नसताना! गर्दी असली की मी दुरूनच देवाला नमस्कार ठोकते आणि सूंबाल्या करते. पण शांत वेळी देवळात गेल्यावर मनात कधी प्रसन्न, कधी गंभीर, कधी शांत - तृप्त भाव निर्माण करणारे देवदर्शन मला खूप आवडते!

पुण्यातले शनवारातले ओंकारेश्वराचे देऊळ, जंगलीमहाराज रोडवरचे पाताळेश्वर मंदिर, सोमवारातला त्रिशुंड्या गणपती, अजिबात गर्दी नसताना दगडू हलवाई गणपती व जोगेश्वरी, सारसबागेचा तळ्यातला गणपती ही माझी पुण्यातली आवडती देवळे. कधी ओंकारेश्वराच्या घुमटाखाली बसून डोळे बंद केले की आपोआप ध्यान लागते. तर पाताळेश्वराला असाच अनुभव येतो. स्वतःतल्या मौनाशी एकरूप होता येते. तसे ते एरवीही होता येते....पण इथल्या वातावरणात, शांत तृप्ततेत आपोआप मनातले विचार शांत होतात.

पुण्याबाहेर मला गर्दी नसतानाचे नाशिकचे त्र्यंबकेश्वराचे देऊळ, मुंबईचा सिध्दीविनायक, कार्ले-भाजे येथील बौध्द लेणी व गुंफा, अकोले (जि. नगर) येथील अगस्ती ऋषींचे मंदिर, मथुरेचे कृष्णमंदिर, दिल्लीचे बहाई लोटस टेंपल, कोल्हापुरातील अंबाबाईचे देऊळ, सातारजवळच्या एका गावात (नाव आठवत नाही) कृष्णेकाठी असलेल्या जोगियांच्या समाध्यांच्या येथे बांधलेले जुने शिवमंदिर....अशी सर्व देवळे आठवू लागतात. अनेकदा गर्दीच्या वेळी गेल्यावर त्या देवळात जाऊन मला काहीच आनंद होत नाही. उलट तेथील बजबजाटाने कधी एकदा येथून पळ काढते असे होते. त्यापेक्षा निवांतपणे जावे, निवांत दर्शन घ्यावे, मस्तपैकी देवादारी बसावे, तेथील शांतता - सुगंध - तृप्ती अनुभवावी व मन आटोकाठ भरून माघारी फिरावे! तेव्हा कोठे देवळात गेल्याचा आनंद लुटता येतो.

ऑस्सम लिहीलंस रे भौ.
पंढरपूर मी पाहिलेले नाही. तरी शांतादुर्गेच्या मंदिरात भावना अतिशय उचंबळुन येउन अश्रु आल्याचा अनुभव आहे. तिरुपती आणि रामेश्वराला मात्र देवबीव सगळं झुट हा समज दृढ झाला, तो सिद्धीविनायकाला सिद्धांतात बदलला. देवस्थान जितकं श्रीमंत, तितकं तिथे जाण्याचे अपनेको काम नाय, अशी एक माझ्यापुरती खुणगाठ आहे.

अनाम आणि शांत, थंड फरशीची आणि आपल्या अशा वासाची देवळं मला तुफान आवडतात. देवाबीवाचं माहित नाही, शांतीचा शोध मात्र किंचीत सुफळ संपुर्ण होतो.

छान लिहिलय.. Happy

मला पुण्याला मृत्यूंजयेश्वर आणि दशभुजा गणपतीच्या देवळात जायला खूप आवडतं... एकदम शांत वाटतं तिथे...
मृत्यूंजयेश्वराचं देऊळ रस्त्यापासून थोडं आत आहे. बाहेर झाडी आहे. खूप प्रसन्न आणि शांत वाटतं तिथे. रोजची धावपळ, गर्दी, गोंधळ, आवज ह्यापासून थोड्याकाळाकरता दूर जाता येतं.

नववी किंवा दहावी ला 'दर्शनमात्रे' नावाचा एक धडा होता.. >>>>> दहावीत... सुनिताबाईंचा.. Happy

खूपच आवडलं.. खूपच सुरेख मांडलय .. गणपती त्यांचा पर्सनल गॉड होता>> माझा नेहमी गोंधळ असतो कारण मला गणपतीशिवाय दुसर्या कुठल्या देवाच्या मंदिरात शांत वगैरे वाटत तर नाहीच पण अपराधी वाटतं.. मी इथे का उभी आहे... तरी चतुर्श्रुंगी आणि सप्तशृंगी देवीची ठिकाण मला खूप आवडतात..

फार फार फार सही लिहीलेय !! असले काही काही अनुभव आठवले.. जोतिबाचे दर्शन माझ्याही नशिबात नसते फारसे! तुळजापुर,पंढरपुर मी ७-८वीत असताना इतक्यांदा झाले! बाबा सोलापूरला होते तेव्हा. जितक्या वेळेस बाबांकडे जायचो तितक्या वेळेस ही देवळं.. कधीही शांत वाटलं नाही असं झालं नाही.. गणपतीबाप्पाची कुठलीही मूर्ती असो, ती दिसली मन प्रचंड शांत होते.. मी १२वीत असताना, आमच्या कॉलनीमध्ये देऊळ उभारणे सुरू होते. आमच्या बिल्डींगच्या शेजारीच. विठ्ठलाचे. प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत मूर्ती आमच्याच घरात होत्या, पण जेव्हा शंकराचार्‍यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होऊन मूर्ती गाभार्‍यात गेल्या तेव्हा मात्र इतक्या तेजाने झळकत होत्या..की बस रे बस..

रैना ..
अनाम आणि शांत, थंड फरशीची आणि आपल्या अशा वासाची देवळं मला तुफान आवडतात. देवाबीवाचं माहित नाही, शांतीचा शोध मात्र किंचीत सुफळ संपुर्ण होतो.>>>
या वाक्याबद्दल तुला हजार मोदक!

छान ललित... इतस्तता विखुरलेली फुले, फोडलेले नारळ, सांडलेले पाणी, पाण्याच्या सानिध्यातील खडीसाखर पेढे , उदबत्ती ह्या गोष्टी टाळल्यास अजुन चांगले स्वच्छ वातावरण (मनाला प्रसन्न वाटायला पोषक) तयार करता येईल असे वाटते.

लहान असतांना भितीपोटी हात जोडायचो (तशी आज्ञाच होती), जस-जसी शिंगे फुटत गेली, विश्वासाच्या जागी अविश्वासच दाटायला लागला... आता तर तो आणखिनच गडद झालेला आहे.

टोकाचा बुप्रा>>> म्हणजे काय?
--- बुद्धी प्रामाण्यवाद, आता पुढचा प्रश्न टाळा (कारण वादाचा विषय आहे)

छानच लिहिलय. अगदी पटलं.

प्राचीन दगडी देवळं, त्यांची प्रांगणं, आवारातली जुनी झाडं, पाण्याच्या टाक्या, ओवर्‍या, खांब, गाभार्‍यातल्या त्या गुढ मुर्ती, पितळी समया, त्यांना जोडलेल्या दंतकथा, मिथके हे सगळं फार फार सुंदर, आकर्षक वाटतं. इतकं वैभव आहे खरं तर आपल्याकडे अशा सुरेख देवळांचं. फक्त त्यांच्या कळसांवर, खांबांवर तो घाणेरडा ऑईलपेन्ट फासलेला नसावा, नुतनीकरणाच्या नावाखाली जुन्या थंडगार फरशा काढून स्पार्टेकच्या टाईल्स घातलेल्या नसाव्यात, बेंगरुळ सिमेन्टचे जोड दिलेले नसावेत, स्वच्छता असावी, प्रसादांचे अवशेष, तेलाचे चिकट हात पुसलेले नसावेत, टपर्‍या, लाऊडस्पीकर्स नसावेत इतकंच. दुर्दैवाने अशी मंदीरं सापडणं हल्ली दैवदुर्लभ योग झालेला आहे.
औंधच्या डोंगरावरचं यमाई देवीचं प्राचीन मंदीर मात्र अपवाद आहे. अतिशय सुरेख मेन्टेन केलय.
मला बिर्ला स्टाईलची किंवा संगमरवरी भपक्याची आधुनिक(!) देवळं अजिबातच आवडत नाहीत. भक्तीभाव वगैरे राहूचद्या. शांतही वाटत नाही.

क्या बात है! बरेच दिवसांनी काही छानसं वाचायला मिळालं..
गर्दी असलेल्या देवळातून एकंदरीत मनःशांती मिळत नाही असा बरेच जणांचा अनुभव दिसतोय..
बु.प्रा. असो वा नसो आपण देवळात का जातो हाच खरा प्रश्ण आहे. तीरुपती, सिध्धीविनायक वगैरे सारख्या पवित्र देवळांचे बाजारीकरण पहावत नाही तसेच काही ऐतिहासीक द्रूष्ट्या अतीसुंदर असलेल्या मंदीराची दुरावस्था ही पहावत नाही..
दर्शनमात्रे मनःकामनापूर्ती असे खरेच ज्याला झालेले आहे त्याच्या मनात त्या (जे काही असेल) दर्शनानंतर काही कामना तरिही शिल्लक राहतात का हा प्रश्ण मला नेहेमीच पडतो. नाहीतर एरवी वेगवेगळ्या कामनापूर्तीसाठी वेगवेगळ्या देव देवतांना भेट देणारा तोच मनुष्य पाहिला की असाही प्रश्ण पडतो की प्रुथ्वीतलावरील ईतक्या वेगवेगळ्या कामना पुरवायला देवांनी विभाग वाटून घेतले आहेत?
एकाच दगडातून विठोबा घडतो त्याच दगडातून मारूती, त्यातूनच देवी, त्यातूनच महादेव आणिक कितीतरी.. प्रत्त्येकाचा रंग वेगळा, रूप वेगळे, आवड्-निवड सुध्धा वेगळी. पण तीच मनःशांती, तोच अनुभव, तेच एक गूढ तादात्म्य, तीच एक अंतरीची आस्था सर्वत्र तशीच मिळेल का? गटाराशेजारी वसवलेला देव अन डोंगरावर बसवलेला तोच देव अनुभवण्याईतके निर्वीकार होता येईल का? अन असे निर्वीकार निष्काम झाल्यावर अशा अनुभवाच्या शोधात फिरायची गरजही भासेल का?
माणसांच्या गर्दीत माणूस सापडेना
देवांच्या गर्दीत काय शोधावे ????

मस्त लिहिलयसं आगाऊ !
गणपतीबाप्पाचा आणि माझा ३५ चा आकडा आहे , अजुन ३६ चा आकडा झाला नाही Proud

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
डोक्यातला बुप्रावाद आणि मनातला भक्तीभाव याचा झगडा कधी सुटेल ते माहिती नाही.

डोक्यातला बुप्रावाद आणि मनातला भक्तीभाव याचा झगडा कधी सुटेल ते माहिती नाही.>>>>>हम्म हेच तर माझ्या भाषेतलं माझ्या बाबतीतल लिहीलेलं अधले मधले पण

अनाम आणि शांत, थंड फरशीची आणि आपल्या अशा वासाची देवळं मला तुफान आवडतात. देवाबीवाचं माहित नाही, शांतीचा शोध मात्र किंचीत सुफळ संपुर्ण होतो.>>>अगदी हेच म्हणायच होत मला Happy

Pages