हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १५

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2010 - 02:18

बराच पैसा खर्च करून चाचाने बाळ्याला पंधरा दिवसांनी सोडवून आणले. बाळूच्या मावस भावाची दुष्कीर्ती प्रामुख्याने सहाय्यकारक ठरली. तो गावात मवाली म्हणून प्रसिद्ध होता. बाळू सभ्य! मावशीने एकुलत्या एका बाळूला वाढवलेले असल्याने त्याला मावशीबद्दल फार वाटायचे. मावस भाऊ दोन वर्षांनी मोठा होता. तो लहानपणापासूनच बाळूवर वक्र दृष्टी ठेवून असायचा. त्याच्यामते बाळूच्या आई वडिलांनी मधेच मरून हे कार्टं कारण नसताना आपल्या उरावर घातलं होतं!

मात्र बाळू सगळे जाणून होता. भावावरही तो जमेल तितके प्रेमच करायचा. पण मावशीसाठी मात्र जीव टाकायचा. मात्र अडीच वर्षांपुर्वी भावाचे लग्न झाल्यापासून बाळूचे तिकडे जाणे जवळपास संपलेच होते. मावशी बिचारी भाच्याची वाट पाहायची. खरे तर हल्ली हल्ली तिला स्वतःच्च्या मुलापेक्षा बाळूच आपलासा वाटू लागला होता. तिचा कोणताही निरोप तिचा मुलगा बाळूपर्यंत पोचणार नाही याची काळजी घ्यायचा. वास्तविक दोन वेळचे खाणे अन झोपायला स्वयंपाकघरातील जागा यापेक्षा बाळूने मावशीकडून काही घेतले नव्हते. सातवीपर्यंत शिकला त्या फीचे पैसेही त्याने काही ना काही कामे करून फेडले होते. उलटे जास्तच दिले होते. राम रहीम ढाब्यावर आल्यापासून कुणा ना कुणा मार्फत काही ना काही पैसे तो मावशीकडे पाठवतच होता. त्या पैशांचेच आकर्षण मावसभावाला होते. तेवढे सोडले तर बाळूबद्दल त्याला घेणेदेणेच नव्हते. तो ते पैसे मावशीपर्यंत पोचूच द्यायचा नाही. काही दिवसांनी मावशीला ते समजले की भांडणे व्हायची. पण मुलासमोर बिचारी मावशी गप्प बसायची.

मात्र यावेळेस भलताच प्रकार झाला. सतत दारू पिऊन कुठेही पडलेला असणारा बाळूचा भाऊ अचानक दुपारचा घरी आला तेव्हा त्याची बायको बाळूला प्रेमाने जेवायला वाढत होती. तिच्या बिचारीच्या दृष्टीने हा एक दीर होता जो सरळमार्गी असून आजही मावशीच्या प्रेमाखातर घरात काही ना काही पैसे पाठवत होता. या पैशांनी नाही म्हंटले तरी घरात काही जिनसा तरी आणता येतच होत्या, ज्या एरवी आणणे शक्यच झाले नसते. या उलट आपला नवरा अती व्यसनी असून आपल्यालाच कामाला लावणारा आहे ही जाणीव तिला होती. मात्र बाळू व तिच्यात एका शुद्ध नात्याशिवाय इतर काहीही नव्हते.

पण हे पाहवणार कसे? व्यसनी मावसभावाने सर्वांदेखत दोघांवर घाणेरडे आरोप केले. जेवण अर्धवट सोडून बाळू उठून जायला लागला ते भांडणे अन मारामार्‍या नकोत म्हणून! तर भावाने गल्लीतील सगळ्यांसमक्ष 'हा माझ्या बायकोचा यार आहे, माझी बायको धंदा करते अन हा वाटेल तेव्हा घरी येतो' असा ओरडा केला. अजूनही मावशी बाळूला जायलाच सांगत होती व बाळूही जातच होता. पण तेवढ्यात मावसभावाने 'आजवर या नालायकावर दौलत उधळलीस' असे म्हणून जेव्हा मावशीच्या, म्हणजे स्वतःच्याच आईच्या झिंज्या धरल्या अन तिला खाली पाडले तेव्हा बाळूचा संयम गेला. अगदीच पहिलवान नसला तरी व्यसनी मावसभावापेक्षा बाळू केव्हाही सशक्त होता. अन मुख्य म्हणजे आता क्रोधाचा लाव्हा होता मनात! त्याने मावसभावाला आयुष्यात कधी मिळाली नसेल अशी अद्दल घडवायचे ठरवले खरे, पण झाले उलटेच! आयुष्यच संपेल अशी अद्दल घडली चुकून! दोन दिवसांनी मावस भाऊ मेला. बाळूला कोठडी मिळाली. वहिनी अन मावशी रडून दिवस काढू लागल्या. पण आश्चर्य म्हणजे ऐनवेळेस वहिनीने 'माझा नवरा मेला त्यामुळे आम्ही दोघी वाचलो' असे विधान भर चौकीत केले. तपासात असे निष्पन्न झाले की बाळूचा मावसभाऊ संपूर्ण गल्लीला अन आजूबाजूच्या परिसरात नकोसा झाला होता. अंगात तर ताकद नव्हती, पण उगाच शिवीगाळ, उधारी, दारू, जुगार! अनेकदा त्याला मारही मिळालेला होता.

शेवटी जनमताचा कौल बघता खटला वेगळ्या पद्धतीने भरण्याचा मोठेपणा दाखवण्यासाठी गणपतचाचाकडून यथेच्छ 'खाऊ' घेतल्यावर पोलिसांनी स्वतःच्या अधिकारात काही किरकोळ बदल करून बाळूला मुक्त केला.

आणि बाळू ढाब्यावर परत आल्याच्या तिसर्‍या दिवशी चक्क बाळूची मावशी अन वहिनी या सामानासकट ढाब्यावर शिफ्ट झाल्या. हा प्रस्ताव अबूचा होता अन अर्थातच अबूचा प्रस्ताव चाचाला मान्य झाला नाही असे व्हायचेच नाही.

या सगळ्यात एकच झाले... काजलला अगदीच समवयीन नसली तरी दोनेक वर्षांनी मोठी मैत्रिण मिळाली..

वैशाली!

सुरुवातीला अत्यंत निराश असणारी वैशाली हळूहळू ढाब्याच्या वातावरणाला रुळू लागली. अबूच्या जोक्सना हसू लागली. मात्र संपूर्ण जेवणखाण मात्र त्या दोघी घरातच करायच्या. ढाब्यावर कधीच काही खायच्या नाहीत.

मात्र काजलच्या हसतमुख स्वभावाने अन लाघवी वागण्यामुळे वैशाली रमायला लागली. बाळू खुष झाला. आपली आईसारखी मावशी अन बहिणीसारखी वहिनी आता सुरक्षित व आनंदात आहेत हे पाहून त्याला बरे वाटले.

अन असेच एकदा...

महिन्याभराने....

दिपूच्या मेंदूत चमका निघतील असा प्रसंग घडला.

सायंकाळचे सात वाजलेले होते. दोनच गाड्या ढाब्यावर होत्या.

भटारखान्यामागे बटाट्याची साले टाकायला गेलेला असताना दिपूला काजल खूप घाबरल्यासारखी पळून आपल्या घरात जाताना दिसली. त्याला काही कळले नाही. पण त्याने दुर्लक्ष केले.

दोन, तीन मिनिटांनी चहा प्यायला आत आलेल्या झिल्याने बोलता बोलता अबूला सांगीतले की तीन मुले अन एक मुलगी गार्डनमधे बसलेत. मुले फारच दंगा करत आहेत. पीत आहेत, वेटरला शिव्या देत आहेत. टेबलवर पाय ठेवून बसत आहेत. दादागिरी करत आहेत. अबूच्या दृष्टीने ही घटना किरकोळ होती. चाचा गल्ल्यावर निवांत बसला होता. चाचाला सांगण्यासारखेही यात काही नव्हते. आठवड्यातून दोन तरी दादागिरी करणारे ग्रूप्स यायचे शिरवाड किंवा पिंपळगावमधून! पण.. एक मुलगी?

अबूने झिल्याला ही गोष्ट पद्याला सांगायला सांगीतली. पण झिल्या म्हणाला की अजून इतके काही झालेले नाही. सहज आपले सांगीतले.

मात्र पाचच मिनिटांनी आत आलेल्या दादूने अबूला सांगीतले की त्या ग्रूपमधील एका मुलाने त्याला शिव्या दिल्या. महत्वाच्या वेळी भांडण नको म्हणून दादू आत निघून आला. अबू दुर्लक्षच करत होता. पद्या असताना आपण कशाला पडायचे म्हणून!

पण दिपूला हा प्रकार इंटरेस्टिंग वाटला. सहज आपले बघावे म्हणून गार्डनमधे गेला तर...

इतका विचित्र प्रकार असेल असे त्याला वाटले नव्हते.

भयानक शॉक होता तो..

तीन मुले अन एक मुलगी...

टेबलवर पाय ठेवून बसून दारू पीत सिगारेट ओढणारा सर्वात लहान मुलगा असेल अठरा एकोणीसचा..

आणि....

.....त्याचे नाव ढाब्यावर कुणालाही माहीत नसले तरी दिपूला माहीत होते..

... विशाल... तुकारामकाकाचा विशाल...

दुसरा मुलगा कोण होता ते माहीत नव्हते..

तिसरा मुलगा कोण होता ते अतिशय व्यवस्थित माहीत होते.. त्याचे नाव दिपूला आठवत होते.. विजू

पण नाव आठवण्याचे कारणच नव्हते.. त्या मुलाला तो आयुष्यात विसरणार नव्हता...

ज्याच्यामुळे आपण रामरहीम ढाब्यावर आलो तो हाच..

ज्याला आपण बाटली मारली होती तो...

आणि...

सर्वात मोठा धक्का म्हणजे...

त्याच्या शेजारी बसून काळवंडलेली पण नटून थटून आलेली मुलगी...

जिला तो मुलगा पटाखा म्हणायचा ती होती...

मनीषाताई... मनीषा कांबळे..

वर्षानुवर्षानंतरही माणसाची चेहरेपट्टी तीच राहते. ओळखणे अजिबात अवघड नसते. दिपूला क्षणार्धात सगळे ओळखता आले.

हे काय?

हे काय झाले? कसे झाले हे? असे कसे? मनीषाताई? घरी माहिती असेल का? अन हा? ज्याला आपण मारले तो?

दिपू अंधारात उभा होता. त्यांना तो दिसत नव्हता. तेवढ्यात विकी मागून येऊन टेबलपाशी गेला. विकी जरा सणसणीत होता. पण होता पोरगाच!

विकी - टेबलपे पाव मत रखना..

विशालने खुन्नसने त्याच्याकडे पाहिले. हा कोण सांगणार? टिचकी वाजवून विशाल म्हणाला:

विशाल - सूखा चिकन हाफ.. जल्दी ला..
विकी - लाता साब.. लेकिन.. पाव नीचे करो..
विशाल - का?
विकी - इधर दुसराबी गिर्‍हाईक व्हताय..
विशाल - डोक सणकवू नको.. जा सूखा चिकन लेके आ..

बाटली डोक्यात बसलेला मुलगा, विजू, हसायला लागला. मनीषा कशीतरी हासली.

विकीचा अपमान पाहात असलेला चाचा अंधारातून पुढे आला. अतिशय शांतपणे म्हणाला..

चाचा - क्या रे .. ऐसा कायको करताय.. टेबलपे पाव नय रखनेका बेटा..

बेटा..

हा माणूस वयाने बराच मोठा आहे अन त्याचा स्वर शांत असला तरी काहीतरी उद्देशाने आल्यासारखा भाव त्याच्या डोळ्यात आहे इतके विशालला समजले. त्याने गपचूप पाय खाली घेतले. पण तो विजूला ते सहन झाले नाही. तुच्छपणे 'चल जा इथून' अशा अर्थी हात हलवत तो चाचालाच म्हणाला:

विजू - ठीक हय ठीक हय.. नय रखता पाव.. जाओ सुखा चिकन लाव जल्दी.. पेग खतम होनेसे पयले..

चाचाला वेटर समजणे ही सर्वात मोठी चूक त्याने केली होती. चाचाला स्वतःला वेटर म्हणवून घेण्यात कधीच लाज वाटली नव्हती. पण ज्यांना कस्टमरने कसे वागायला हवे हेही समजत नव्हते अशा अरेरावी करणार्‍या मुलांनी इतक्या अपमानास्पद पद्धतीने आपल्याशी बोलावे, तेही आपण ढाब्याचे मालक असताना, अर्थातच हे चाचाला पटणार नव्हते.

दिपूला अनुभवाने माहीत झालेली गोष्टच चाचाने केली. सगळ्यांनाच याचा अनुभव होता ढाब्यावर! चाचाचा शांत स्वर काय वादळे घेऊन आलेला असतो हे साखरुच्या अनुभवानंतर सगळ्यांना माहीत झालेले होते.

गणपतचाचाने विजूच्या जवळ जाऊन विजूच्या ध्यानीमनी नसताना खाडकन कानाखाली आवाज काढला.

कोलमडला अन खाली पडला तो! विजूसारखा धडधाकट पोरगा खाली पडणे ही सामान्य गोष्ट नव्हती.

ताडकन विशाल, तो दुसरा मुलगा अन मनीषा उभे राहिले. विशाल डोळे फाडून चाचाकडे पाहात होता. मनीषा विजूला उठवायला धावली. दुसरा मुलगा अचंब्याने चाचाकडे पाहात होता.

पद्या, झिल्या, विकी सगळेच तिथे एकदम जमले. मन्नूही धावत धावत आला. तो चिवड्याच्या दुकानावर यशवंताऐवजी बसला होता. यशवंत काही कामाने पिंपळगावला गेला म्हणून!

दिपू अजूनही अंधारातच उभा होता.

विजूची अन विशालची दारू क्षणात उतरली होती. मनीषा काहीतरी उगाच बोलत होती. चाचाला म्हणत होती 'मारू नका' अन विजूला म्हणत होती 'असे कशाला बोललात'...

मात्र हा अपमान विजूला सहन कसा होईल?

तो चाचाच्या अंगावर धावला खरा.. पण मधेच अडला अन पुन्हा पडला. पद्याने विजूच्या छातीवर बुक्की मारली होती.

इतक्या जणांसमोर आपला टिकाव लागणे शक्य नाही हे चौघांना क्षणात समजले. 'देखलेंगे बादमे' असे जोरात ओरडून चौघे तातडीने तिथून पळून जायच्या वेळेला मात्र विकीने विशालला धरला अन ओढत पद्यापाशी आणला. आता पळणारे सगळे पुन्हा थांबले.

विकी - ये अभी मेरेको गाली दिया.. टेबलपे पाव रखता हय ये...

पद्याने विशालच्या मुस्काडात भडकावली. विशाल चक्क रडायला लागला.

पद्या - कहांसे आये तुम लोगां? क्या नामय बे तेरा मच्छर???

विशालला आपले नाव सांगायची गरज मात्र अजिबात पडली नाही.

कारण त्याचक्षणी त्याच्या घरी एकेकाळी 'पाळलेला' दीपक अण्णू वाठारे पुढे झाला होता.

दिपू - विशाल... इसका नाम विशाल हय...

सन्नाटा! दिपू? दीपक? इथे?

विशाल गालाची वेदना विसरून डोळे फाडून दिपूकडे बघत होता. आपण? आपण ज्याला पाळला होता त्याच्या ग्रूपकडून मार खायची वेळ आली आपल्यावर?

विजूला तर काही समजतच नव्हते. या पोराला बडवायला म्हणून आपण इतका शोधला होता. हा इथे? अन तेही अशा परिस्थितीत? की आपण याला हातही लावू शकत नाही?

आणि मनीषाताईच्या मनात मात्र प्रचंड उलथापालथी घडल्या होत्या. दिपूसमोर असे यायची तिला भयंकर लाज वाटली होती. ती नुसतीच अवाक होऊन नौजवान अन राकट झालेल्या दिपूकडे बघत राहिली होती.

अचानक विशाल बोलला..

विशाल - दिपू?
दिपू - हा...
चाचा - तुम इसको जानताय?
दिपू - हा.. इसकेच घरपे संभालके रख्खा था मेरेको घरसे निकलने के बाद.. और.. बादमे.. इसके
चाचा - इसके??
दिपू - हा.. ये भोतही अच्छी दीदी हय.. मनीषादीदी.. इसके घरवाले बी भोत अच्छे हय..
चाचा - और ये?
दिपू - ये विजू हय.. ये इसको छेडता था.. करके मैने बोतल फेका इसके भेजे मे..
चाचा - फिर?
दिपू - मेरेको डर लगा की मरतो की काय.. म्हणून पळून हितं आलो.. ढाब्यावर
चाचा - त्या दिवशी.. तू..
दिपू - हा...
चाचा - याला मारून भाग्या था??
दिपू - हा
चाचा - कायको?
दिपू - दीदीको बहुत छेडता था ये.. दीदीपे पटाखा लगाके फेका उस दिन... दिपावलीमे..

मनीषाताई स्फुंदून रडू लागली. तेवढ्यात चिवड्याच्या दुकानावर बसलेला मन्नू तिथे आला. त्याला अंदाज आलेला होता. ज्या अर्थी पद्यादादाने त्या मुलाला धरले आहे अन बाकीचे हादरून बघतायत त्या अर्थी चाचाने चांगलेच दमात घेतलेले असणार. मन्नू म्हणाला...

मन्नू - ये काजलको छेडरहा था अबी.. वो डरके भागी..

विशालने काजलला छेडलेले आहे ऐकल्यावर मात्र पद्याने त्याला जवळपास मिनिटभर बुकलून काढला. विशाल खूप ओरडत होता. आता ढाब्यावरची काही गिर्‍हाईकेही जमा झाली. स्टाफ तर सगळाच तिथे आला. अबू निवांत बघत होता तो प्रकार!

पद्या - चल **** चौकीपे.. लडकीको छेडता हय..

विशाल माफी मागून कर्कश रडत होता. चाचाने पद्याला थांबवले.

चाचा - क्या रे दिप्या... ये इसको छेडता था तो इसीके साथ कैसे आगयी हय ये ढाबेपे..

सगळ्यांची दृष्टी आता मनीषाताईकडे वळली. तिला आत्ताच्या आत्ता आपला जीव जावा असे वाटू लागले.

विजू जबाबदारीने म्हणाला.

विजू - शादी बना रहे हय हम.. आपको क्या उससे?

हे वाक्य बोलताना विजू चाचापासून दोन पावले मागेच सरकला होता. अजून चाचाच्या तळहाताचा फटका गालावर हुळहुळत होता त्याच्या. मात्र दिपूला ते विधान सहन होईना... तो आपला जुन्याच विश्वात रमल्यासारखा निरागसपणे म्हणाला..

दिपू - मनीषाताई.. तू याच्याबरोबर कस्काय शादीला तयार झाली??

आत्तापर्यंत दु:खाचे सगळे आवेग रोखून धरणारी मनीषा आता अनावर होऊन रडू लागली. एका खुर्चीवर बसून तिने चेहरा झाकून घेतला व हुंदके देऊ लागली.

हा प्रकार फक्त चाचा, अबू किंवा पद्याने मधे पडण्यासारखा होता. पण सीमाकाकू प्रवेशली. तिच्या प्रवेशामागचे कारण हे होते की काजलला छेडणारे कोण आहेत ते बघावे अन साधेसुधे असले तर चाचाला सांगावे की काय हे तपासावे. पण ती गरजच पडली नाही. ती काजलला घेऊन तिथे आली. मागोमाग वैशाली, बाळूची वहिनीपण आली.

सीमा - बेटी.. रो मत.. क्या हुवा.. तेरेको भगालेजारहे क्या ये लोगां?

'नाही नाही' अशा अर्थी जोरात मान हलवत मनीषा रडत होती.

सीमा - तू.. खुद.. भागरही हय? घरपे मालूम हय तेरे??

यावर मनीषा जास्तच रडू लागली.

चाचा मधे पडला. जरब बसेल अशा आवाजात तो म्हणाला..

चाचा - अय झिल्या.. जा शिरवाडसे डिपार्टमेंट लेके आ.. लडकीको भगारहे ये लोगां..

विजूने सर्वांदेखत अक्षरश: चाचाचे पाय धरले.

विजू - हम नय भगारहे जी.. हम शादी कररहे हय..
चाचा - तो लडकी रो कायको रहेली हय ये???

आता विजू गप्प झाला.

दिपू - मनीषाताई इसके साथ शादी करच नय सकती.. ये मवाली हय.. मनीषाताई अच्चे घरकी हय..

मनीषा अजूनच रडू लागली.

सीमाकाकू तिला धरून स्वतःच्या खोलीत निघून गेली. काजल अन वैशालीही पाठोपाठ गेल्या. त्या आत गेल्यामुळे विजू अन बाकीच्यांना ढाब्यावरून जाता येईना.

आत गेल्यावर मनीषाताईने सगळी कहाणी सांगीतली. चाचा, अबू, पद्या, झिल्या अन अर्थातच दिपू ते ऐकत होते. बाकी सगळ्यांनी ढाबा अन विजू वगैरे पोरांना सांभाळाण्याचे काम घेतले होते.

मनीषा - न सांगता आलीय आई बाबांना.. मला आधी आवडायचा नाही विजू.. छेडायचा रस्त्यात.. पण हळूहळू माझ्याशी बोलू लागला.. मदत करू लागला.. एकदा फुलेबिले दिली.. मीही सोचने लग गयी.. उसको नौकरी वगैरे कुछबी नय.. मिलेगा वो काम करताय.. लेकिन मेरेको.. प्यार.. होगया.. बाबांकडे पैसेच नव्हते लग्नाला.. फार तर वीस हजार जमवले होते.. आणि वीस हजार ठेवले होते त्यांच्या दोघांच्या दवापाणीसाठी.. ताईचे लग्नच कसेबसे झाले.. अच्छे घरके लोग देखने आते थे मेरेको.. पसंद बी होती थी मै.. लेकिन पैसाच नय.. मग.. मीपण ठरवले.. हा आपल्याला आवडतो तर.. निघून जाऊ याच्याबरोबर.. चांगली चवदाव्वीपर्यंत शिकली मी.. पण.. ग्रॅज्युएट नाही होता आले.. याने मागणी घातली तर बाबा अन आई नय म्हणाले.. याचा अपमान नय केला.. पण जमणार नय असे स्पष्ट सांगीतले..

पण तोवर मला विजू आवडू लागला.. आम्ही ठरवले.. पळून जायचे.. विशाल अन बेरी आमच्याबरोबर येणार.. बेरी त्याच गल्लीत राहतो.. त्याचा मित्र नाशकाला आहे.. मॅरिड आहे.. नाशिकलाच लग्न करून त्या मित्राच्या घरी राहायचे असे ठरले.. सुरुवातीला मी नोकरी करायची.. विजू मिळेल ते काम करणार.. मग पैसे साठले की एखादे दुकान काढायचे असे ठरले..

आज संध्याकाळी निघालो.. पण.. हे सगळे इतकी दारू पितात माहीत नव्हते.. मला ते वागणे पसंतच नव्हते.. पण.. झाले ते झाले... आता आम्हाला जाऊदेत.. मी खुषीने चाललीय.. '

कधी न बोलणारी वैशाली बोलली.. आणि अशी बोलली की मनीषाताईचे सगळे विचारच बदलावेत.. चवताळून तीव्र भाषेत बोलली ती..

वैशाली - म्हंजी आईबापाला न सांगता दारूड्याशी शादी करणारे नय का? अन त्यांनी शिकवले.. वाढवले.. वीस हजार का होईना.. जमवले.. गेले पाण्यात.. आ?

थोरल्या बहिणीची अब्रूबी गेली पाण्यात.. धाकटी पळून गेली समजल्यावर तिलाबी छळतील.. आई बाप तर अन्नपाणी सोडून देतील.. व्हय ना? चालतंय सगळं.. हो की नय?

हा दारुडा मिळेल ते काम बघणार.. त्याच्या इश्कात तू नोकरी करणार.. ज्यांच्याशी संबंध नय त्यांच्याकडे राहणार.. ते कामवालीसारखे वागवणार.. हा दारुडा तुला पैसे मागणार पिण्यासाठी.. तुला हवी तशी वागवणार..

शानी हो शानी.. हे असले फाटके मवाली सुधरणारे न्हायत.. काय काय घेऊन निघालीस घरनं? दागिने? पैसे? काय काय आणलंस?? यडे.. माझा नवरा असाच व्हता.. प्येताड.. अख्ख्या चांदवडला नकोसा.. पिऊन येणार.. मला मारणार.. सासू.. ही सासूय माझी.. हिलाबी मारणार.. यांना जेवायला वाढायचं.. हातपाय चेपायचं.. निजायचं यांच्या शेजारी.. सकाळी हे तयार पुन्हा दारू प्यायला.. आपण जायचं घरकामे करायला.. थितं शिव्या खायच्या... कसाबसा पगार मिळवायचा.. त्यातले निम्मे पैसे मारामारी करून नवरा नेणार दारूत उडवायला.. दोन वेळचं धड मिळत न्हय.. अन प्रेमं करतीय.. अक्कल हाये का तुला?? .. उद्या याला दुसरी आवडायला लागली की तुझं झालं पायपुसणं.. नाय म्हायेरी जाता येत न्हाई नांदता येत.. जग इश्कावर नय चालत अक्कलशुन्य पोरी.. पोटात कावळे कोकलतात अन तरी नवर्‍याच्या लाथा खाऊन उधारीवर भाकरी करून पुन्हा त्याच्याच समोर पाय फाकावे लागतात ना.. तेव्हा कळतं.. जग इश्कावर चालत नय.. '

सभोवती पुरूष आहेत, सासू आहे, आपण ढाब्यावर नवीन आहोत, आपली भाषा काय, आपल्याला इथे बोलणं तरी शोभेल का???

कसलाही विचार न करता डोळ्यातून अंगार बरसवणारी वैशाली मनीषाला जगाचे धडे अत्यंत खुल्लेआम भाषेत देत होती.

आणि तिच्या चेहर्‍याकडे पाहून सीमा अन काजलच काय, खुद्द तिची सासू अन चाचा ते दिपूपर्यंत सगळे पुरुषही नि:शब्द झाले होते. वास्तव होतं ते! फक्त बायकांनी बोलायचं नसतं असा अलिखित नियम आहे म्हणून! जर हा अलिखित नियम रद्द केला आपल्या संस्कृतीने.. तर कित्येक वैवाहिक आयुष्यांमधील वास्तव चव्हाट्यावर येईल अन बायकांचे खून करतील त्यांचे नालायक नवरे! भारतीय संस्कृती! मेरा भारत महान! साठ वर्षे झाली जन्माला येऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून! अजून पाणी प्रश्न आहे, वीजेचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, लोकसंख्या अव्याहत वाढत आहे, शिक्षणे मिळतच नाहीत, शिकलेच पाहिजे हा कायदा नाही, आनि वाढदिवसाची भलीच्या भली मोठी होर्डिंग्ज लागतात रस्त्यांवर.. नेत्यांच्या मुलांचीसुद्धा!

मेरा भारत महान! किती महान आहे हे पुलाखालच्या खोपट्यात बसलेल्या बायकोसाठी गिर्‍हाईक शोधणरा अन त्याच पैशांवर आयुष्य काढणार नवरा बघितला की कळते.

बाळूच्या मावसभावाने स्वतःच्या वैवाहिक आयुष्याचे गटार केले होते. आणि मनीषा आता तेच करायला चालली होती.

दहा मिनिटे! तब्बल दहा मिनिटाम्च्या सुनसान शांततेचा भंग झाला तो मगाशी असलेल्या दोन एस्.टी. गाड्यांपैकी एक गाडी जाताना रमणने वाजवलेल्या शिट्टीमुळे!

मनीषा भयाण डोळे करून भिंतीकडे पाहात होती. अचानक अत्यंत विषारी शब्दात ती बोलली.

मनीषा - दिपू.. जा विजू को बोल... मै नही आरही... वापस जारही हय मै.. आणि.. त्याच्याकडे दोन तोडे दिलेत मी सोन्याचे.. ते परत घेतल्याशिवाय त्याला सोडू नकोस..

फक्त दोन तास! परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला होता.

तीनही पोरे मार खाऊन शिरवाडच्या बसमधे बसून पळून गेली होती. कारण नाहीतर त्यांना वडाळी भुईच्या चौकीवर नेण्यात येणार होते.

पद्या अन बाळूची वहिनी वैशाली यांच्या सुखरूप हातांमधून मनीषाला पुन्हा वडाळी भुईला तिच्या घरी नेऊन सोडण्यात आले होते.. वैशालीने सगळी कथा मनीषाच्या आईवडिलांना सांगीतल्यावर ते मनीषाला जवळ घेऊन खूप रडले होते.. त्यांनी वैशाली अन पद्याचे जन्माचे ऋण आहेत हे मान्य केले होते.. आणि वैशालीने अचानक त्यांना 'माझा दीर बाळासाहेब लग्नाचा आहे, फारसा शिकलेला नसला तरिही अतिशय सभ्य, कष्टाचे कमवणारा अन अजिबात हुंडा घेणार नाही असा आहे' हे सांगून परस्पर ठरवून टाकले होते. आपल्या सासूला विचारायला पाहिजे हेही तिच्या मनात आले नव्हते.

...आणि.. हेच सगळे होत असताना प्रवासात अचानक..

प्रदीप डांगे अन वैशाली यांच्यात एक हळूवार नाते निर्माण झाले होते..

है मुबारक आज का दिन.. रात आयी है सुहानी
.. शादमानी .. हो .. शादमानी...

एक महिन्यानंतर आलेल्या एका शुभ दिनी.. खरे तर शुभ रात्री..

आजवर कधीच सजला नसेल ...रामरहीम ढाबा तसा सजला होता...

चेष्टा आहे का??

दिपूची 'मानलेली' बहीण मनीषा हिचा विवाह सगळ्यांचा आवडता बाळू हिच्याशी ...

आणि...

सगळ्यांचा हिरो प्रदीप डांगे याचा शुभविवाह वैशाली हिच्याशी... एकाचवेळी.. एकाच ठिकाणी..

राम रहीम मंगल कार्यालय..

रमण शिट्ट्या फुंकून फुंकून ढाब्याच्या बाहेर लावलेल्या मोठ्या पाटीकडे आलेल्या प्रत्येक गाडीचालकाचे लक्ष वेधत होता...

आज ढाबा बंद रहेगा.. शादीमे शामील होना हय तो आवो.. अबूबकर यांच्या हुकुमाने...

आणि कुठलीही गाडी जेवायला अजिबात थांबणार नसली तरी प्रत्येक ड्रायव्हर, कंडक्टर, एक्स्ट्रा ड्रायव्हर, ट्रक असला तर क्लीनर.. सगळे उतरून आत येऊन वधूवरांचे अभिनंदन करून जात होते.

शिरवाड अन पिंपळगाव (बसवंत) येथील रेग्युलर व नीट वागणार्‍या गिर्‍हाईकांना, स्थानिक दैनिकाच्या मालकांना, नेत्यांना, पोलिसांना अन महत्वाच्या माणसांना विवाहाचे आमंत्रण होते.

चाचाचे कुटुंब, पत्नी अन अमित नाशिकहून दोन दिवसांपासून येऊन राहिले होते. चाचाची पत्नी स्वतः जबाबदारी घेऊन सगळे बघत होती. सीमा तिला यथोचीत मान देत होती.

अबूबकर चाचाच्या बायकोची वाट्टेल तशी थट्टा करत होता. 'क्या भाभी, कैसा नवरा तुम्हारा, हसताच नय..' वगैरे वगैरे! चाचा अजूनही हसत नव्हता. त्याही बायको मात्र अबूच्या जोक्सना खळखळून हसत तर होतीच, वर स्वतःच त्याची थट्टाही करत होती. त्या दोघांचे मैत्रीचे नाते पाहून चाचा अन अमित सोडून सगळेच अवाक झाले होते.

झरीनाचाचीने ठेवणीतल्या साड्या नेसायला सुरुवात केली होती.

स्वातीताई आपल्या पती व मुलाबरोबर पाच दिवस आधीच प्रकट झाली होती. मनीषाचे आई बाबा अन त्यांचे एकंदर पस्तीस जवळचे नातेवाईक ढाब्यात येऊन मधल्या हॉलमधे दोन दिवसांपासून राहात होते.

बाळूच्या मावशीचे अन वैशालीचे मात्र अगदी जवळचे असेच एकंदर आठ लोक आले होते. वैशालीचे पुन्हा लग्न करणे हे खरे तर मावशीचे कर्तव्य नव्हते. पण आपला जावईच मेला अन मुलीचे पुन्हा लग्न करतोय अशा भावनेने ती सहभागी झाली होती.

अबूच्या पिण्यावरून चाचाची बायको थट्टा करत होती. साखरूने कधी नव्हे ती 'काहीही काम सांगा, मी करेन' अशी भूमिका घेतली होती. समीर दिपू अन काजलला विसरून शिरवाडहून सगळी खरेदी करण्याच्या मागे लागला होता. यशवंतबरोबर सतत शिरवाड ते रामरहीम मंगल कार्यालय अशा फेर्‍या मारूनही तो दमलेला नव्हता.

मन्नू रमणला ढाबा सजवण्यामधे मदत करत होता. सीमाकाकू सगळ्यांचे खाणेपिणे याकडे लक्ष पुरवत होती. पण अख्ख्या बारातीचा स्वयंपाक अबू एकटा करत होता. चाचा आर्थिक बाबी बघत होता.

दादू अन विकी अखंड स्वच्छता अन पाणी भरणे यात गुंतलेले होते. झिल्या फक्त पाहुण्यांच्या सोयीकडे अन रुसव्या फुगव्यांकडे बघत होता. पण रुसणार कोण अन फुगणार कोण? इतक्या मस्त ठिकाणी भरपूर प्रशस्त जागेत चार वेळा जर चविष्ठ आहार अन सोबत हव्या त्या सोयी मिळत असतील तर कोण कशाला रुसणार अन फुगणार?

वैशालीचे दुसरे लग्न असले तरी आत्ता कुठे खरेखुरे लग्न ठरल्यासारखे वाटत होते तिला.

अगदी नववधूसारखी लाजत नसली तरी खुषीत होती बिचारी! सासूलाच आई समजत होती. बाळूची मावशीही आनंदात होती.

झरीनाचाचीचा मुलगा चित्रविचित्र पक्षी वगैरे आणून सगळ्यांना आश्चर्यचकीत करत होता.

आज अब्दुल असता तर?

प्रत्येकाच्या मनात नाही म्हंटले तरी हा विचार येतच होता. मात्र त्याची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून झिल्याची बहीण रेहाना उर्फ मेहरुन्निसा मात्र आली होती. तिचा नवरा येऊ शकला नव्हता. रेहाना अब्दुलच्या मोडक्या दुकानाकडे पाहून गलबलत होती. अबू तिला धीर देत होता.

दिपूने खास आपल्या आईला, म्हातार्‍या आक्काला, मन्नूचाचाला अन मुस्तफाला बोलावले होते.

लग्नाच्या निमित्ताने मुस्तफा अन अबू व पद्या यांची कायमची दिलजमाई झाली होती. काजलची आजी मात्र आलेली नव्हती.

दिपू स्वतः चाचाकडून लग्नानिमित्त मिळालेल्या सहाशे रुपयांमधून कपडे वगैरे आणून सजला होता.

आणि काजल तर स्वतःच कोणत्याही वेषात वधूच वाटायची. पण यावेळेस ती जशी दिसत होती...

आजवर ती कधीच तशी दिसली नव्हती..

लग्नाचा मुहुर्त संध्याकाळी आठला होता. आत्ता संध्याकाळचे सहा वाजले होते. रमणही आता आत आला होता. येताना त्याने ढाब्याचे गेट बंद केले होते..

आणि... तितक्यात तो प्रकार झाला... तो प्रकार झाला हे कळल्यावर मात्र ढाब्यावर अभुतपुर्व जल्लोष झाला...

कुणीतरी दांपत्य अचानक ढाब्याच्या व खोल्यांच्या मधे असलेल्या जागेत सगळे बसलेले असताना उपटले..

अन तो माणूस तीव्र स्वरुपात चिडल्यासारखा ओरडत होता..

"क्या रे? दोस्त दोस्त कहेतां तुम लोगां मेरेको.. स्सालो.. इतनेमे भूलबी गये क्यां??? आं??? स्साला.. इन्सानियत नाम का चीज नय आजकल दुनियामे.. पद्या का शादी हय तो मेरेको बुलायेगा बी नय?? हरामी? गाडीवाले बॉम्बे आग्रा रोडके मालेगावके आगेके ढाबेपे मेरेको रुक रुकके पुछरहे.. तुम नय गयें??स्साले.. पुरा ढाबा चलाता था मय उसवक्त.. शरम बिरम हय का नय??? आं???'

त्या माणसाला पाहून अन त्याने उच्चारलेले वाक्य ऐकून सगळे नाचायलाच लागले. अबू, चाचा अन सगळ्यांनीच त्याला मिठ्या मारल्या.. काही फुटांवर त्याची बायको खुषीत लाजून बघत होती.. तिला सीमाकाकू बायकांमधे घेऊन गेली..""

हाफ राईस दाल मारकेचा आजवरचा सगळ्यात निष्णात बल्लवाचार्य...

काशीनाथ.... परत आला होता.. काशीनाथ... आणि अंजना...

गुलमोहर: 

खरं आहे बेफिकीर... रिमा, १००% अनुमोदन Happy सगळ्यांची चिडचिड बघता तुमच्या लेखनाच्या प्रेमात ते किती अखंड बुडालेले आहेत हेच प्रतिबिंबीत होत आहे.
प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. पण बेफिकीर, तुम्हाला हे आम्ही सांगायची काहीच गरज नाही, नाही का? तुमचा माणसाच्या स्वभावाविषयीचा अभ्यास बर्‍यापैकी सुक्ष्म आहे.
तुम्हाला सगळ्या वैयक्तिक अडचणींशी सामना करण्याचं बळ मिळो आणि असंच छान लिहित राहण्याची उर्मी तुमच्यात कायम राहो, हिच प्रार्थना...पुन्हा एकदा. Happy

आजचा भाग...परत एकदा...सुखद अनुभूती देणारा...खुप ऊन पडल्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसाव्या, असा...
धन्यवाद Happy

अरे एवढ्या चांगल्या साहित्याचे सुजाण वाचक आपण....
आपापल्यात भांडायचे का ?
बेफिकीर .... तुम्ही बेफिकीर होऊन आपल्या सवडीने लिहीतच रहा.
आणि आधी आईची काळजी घ्या.

नमस्कार बेफिकीर... खूपच छान चालू आहे ही कादंबरी....पहिले सगळे भाग एकदम वेळेत दिलेत त्यामुळे तुमच्याकडुन वेळेत लिखाण मिळण्याच्या अपेक्षा वाचक ठेवुन आहेत....तुमच्या आईची तब्येत बरी नसल्याने तुम्हाला सलग लिहिता येत नसेलही कदाचित, पण तुमच्या उदंड वाचक परिवारासाठी निदान दोन भागांच्या प्रकाशनामधील कालावधी कमी करायचे प्रयत्न मात्र नक्की करा.... तुमच्या आईची तब्येत लवकर सुधारावी हीच तुमच्या वाचक परिवाराची सदिच्छा!!!

Pages