अजि म्या पु.ल. पाहिले

Submitted by मंदार-जोशी on 11 May, 2010 - 06:55

महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"

वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.

पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.

मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........

..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.! Happy

मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.

"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.

थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.

गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.

तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता Proud

आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.

माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.

"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.

"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"

"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.

मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.

pula04061996_01.JPG

मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.

मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.

PuLaSketch01.jpg

गुलमोहर: 

आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!">>>>>>>>>>> मंदार नशिबवान आहात तुम्ही.

पुलं चे गारुड अजून मनावरुन उतरले नाही. दूरदर्शनवर सुरवातीला त्यांचे अनेक कार्यक्रम सादर होत असत. त्यांचे प्रत्यक्ष नाटक नाही बघायला मिळाले, तरी या कार्यक्रमांनी आम्हाला फार आनंद दिला होता.
त्याच्या सीड्या मिळत असाव्यात.

मी पुण्यात बी.एम्.सी.सी. मध्ये शिकत असताना पु. लं. नेहेमी महाविद्यालयाच्या मैदानावर फिरायला यायचे. खूप वेळा त्यांना पाहिलंय. कधी कधी आम्ही त्यांच्याशी बोलायचोही. आमचा तेव्हा खेळाचा तास असायचा. सकाळी साडेसहाला थंडीत सायकल हाणत खेळाच्या तासाला जाण्यामागे, गाउंडवर पु. लं. भेट्तील हे खरं कारण असायचं. अजिबात गर्व नव्हता त्यांना. पुढे पुढे ते थकल्यावर बाकावर बसून राहायचे. नंतर त्यांचं चालणं एकदमच कमी झालं.
सुधीर गाडगीळ, अरुण दाते, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे यांची भेटही बी.एम्.सी.सी. मुळे झाली.

पुलंना जे प्रत्यक्ष भेटले ते खरेच भाग्यवान.

माझे वडील त्यांना भेटले होते. पुलंनी वडिलांकडे हार्मोनियमची ऑर्डर कोणा दुस-याकरवी दिली होती आणि बनल्यावर ती घ्यायला पु.ल. स्वतः आले होते. ते येतील ही कल्पना वडलांना नव्हती. जेव्हा त्यांनी घरी येऊन, आज पुल दुकानात आले होते म्हणुन आम्हाला सांगितले तेव्हा आम्ही इतके हळहळलो की बस्स.. वडलांना पण वाईट वाटले, पण त्यांचाही नाईलाज होता....

आणि वाईटात वाईट हे की, वडील म्हणाले, तुमच्यासाठी मी त्यांची स्वाक्षरी घेतलीय, दुकानात आयत्यावेळी कागद सापडेना म्हणुन १० रुपयांच्या नोटेवरच स्वाक्षरी घेतली. ते ऐकुन आईने कपाळावर हात मारला. तिने वडलांच्या खिश्यातुन १० रुपये घेऊन त्याचा ब्रेड आणला होता... माझा भाऊ लगेच दुकानदाराकडे धावला, पण ती दहा रुपयांची नोट काही मिळाली नाही Sad

त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.
Happy छान वाटलं वाचून मंदार. त्यांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं.

चिन्नु, काही सिद्धपुरूष असे असतात की प्रसाद म्हणून चक्क छडी मारतात!!! मी त्याच अर्थाने "चालते व्हा" हे शब्द आनंदान स्वीकारले असते Happy

साधना, ज्याला त्या दहा रुपयांच्या नोटेचं मोल समजेल तो खरा भाग्यवान Happy

प्रमोद, तुमचं 'स्वप्न' वाचलं ब्लॉग वर. का कोण जाणे डोळ्यांत पाणी आलं.

susmita मी पण बी एम मधेच होतो... आम्ही मुद्दाम भांडारकरवरून मालती माधव समोरून जायचो, हेतू हा की कधीतरी पु.ल. दिसतील. पण एवढे भाग्यवान नव्हतो कदाचित... बी एम मुळे सुधीर गाडगीळ, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, भक्ती बर्वे ह्यांना मात्र पाहता आले, भेटता आले..

माझेही बाबा, आजोबा पु. लं. ना भेटले आहेत. पु. लं. जेंव्हा कीर्ती कॉलेज ला शिकवायला होते तेंव्हा आजोबा प्रिंन्सीपॉल होते कीर्ती कॉलेज ला. पण मी नाही पु. लं. ना पहिलय नाही आजोबांना. फक्त आठवणी एकल्या आहेत बाबांकडून.

बस्के मी पण रडले होते. आणि नंतर विचार केला होता जाउदे पु. लं. नाही तर कधी सुनिता बाईंना भेटू पण तेही नाही जमलं Sad

आधी कधी हिम्मतच नव्हती....
माझं पहिलंवहिलं पुस्तक प्रसिध्द झाल्यावर (२००५) मात्र रहावलं नाही. देवळात पेढा ठेवायला जातात तसा त्यांच्या घरात वेळ मागून गेलो.
सुनिताबाई सवयीप्रमाणे आंघोळ करून तयार होऊन बसल्या होत्या. पु. लं. विषयी फोन, पत्र इत्यादी सगळं नेहमीच चालत असल्याने त्या सकाळीच तयार होऊन बसत असत.
मी पुस्तक तिथे ठेवलं.
'हल्ली मला दिसत नाही, मी वाचू शकत नाही फार, मी सगळी पुस्तकं दान करते, ' त्या म्हणाल्या.
'पुस्तक या घरात आलं, मला समाधान मिळालं. त्यानंतर तुम्ही त्याचं काहीही करा, ' मी म्हणालो.
अर्धा तास त्यांच्याशी गप्पा झाल्या. 'वाघ आणि डुक्कर' ही गोष्ट त्यांनी सांगितली....
आयुष्यभर लक्षात राहील असा तो अर्धा तास होता...

मस्त लिहिलस मंदार !
Lucky You! Happy
माझे बाबा मागच्या आठवड्यात सचिनला भेटले. त्याच्या सोबत फोटो आहेत पुष्कळ, पण सही घ्यायची राहुन गेली. Sad
आय विश मी तेव्हा त्यांच्या सोबत असते!

सही. किती भाग्यवान आणि धाड्सी आहेस ! मी पुण्यात असूनही कधी नाही भेटू शकले. मी शाळेत होते तेव्हा. पण मलाही अशीच अतीशय इच्छा होती त्यांना भेटायची . पु.ल गेले तेव्हा मी आणि माझी मैत्रीण रड्त बसलो होतो. Sad Sad Sad Sad

मंदार : चांगला बाफ चालु केलाय.
सर्वांप्रमाणे मला पण त्यांना भेटायचे होते. ती इच्छा अपुर्णच राहिली. Sad
पण सचिनची भेट कधी ना कधी होईल असे नक्की वाटते. मला असे कळाले की पुढच्या वर्षी शिकागो मधे होणार्‍या बी.एम. एम. च्या अधिवेशनाला सचिनला बोलवायचा प्रयत्न चालु असे कळाले.

खूपच छान....... लिंक पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...... नविन लिखाण नक्की कळवत जा...... कल्पना

छन लिहिलंय .
एखाद्या दिग्गजाला, कलाकाराला असं आणि एव्हडच भेटल्याने आयुष्य समृद्ध होतं म्हणजे नक्की काय होतं? कलाकाराला त्याची कला सादर करत असताना अनुभवणं हे समृद्ध करणार असू शकतं. तो क्षण अलौकीक असू शकतो, नव्हे, असतोच. एरवी सामान्य माणसांत आणि त्यांच्यात फरक कसा काय करणार?>>>>अगदी .. मला कधीच अप्रूप वाटत नाही .. कधी तरी आजू बाजूला मला अमिताभ ला, सचिन ला , अनिल कुंबळे ला भेटायचा स्वर्ग सुख मिळेल.. अशी जेव्हा लोक बोलतात तेव्हा मीच का वेडी आहे ते कळत नाही .. पिक्चर बघावा, त्यांचा खेळ बघावा..त्यांचं मोठेपण अनुभवावं.. माझा अहंकार, छोटेपण आड येतो का असा हि वाटतं कधी..
माफ करा विषय नाही बदलायचा .. पण पुलंबद्दल तसा नाही म्हणता येणार बहुदा ते फ़क़्त लेखक, कलाकार नसून समाज सुधारक किवा अगदी साधारण व्यक्ती बनूनच राहिले..

मी सुद्धा एक पु. ल. चा चाहता. मला त्यान्ना भेटायचि खुप इच्छा होति. पुन्यामधिल त्यन्च्या घरि जान्याच निश्फळ प्रयत्न पन केलेला. शेवट्च्या दिवसांत ते डेक्कन ला सुजोग मध्ये होते, तिथे पण भेटायाला जाऊ शकलो नाहि. आनि मग शेवटि त्यन्च्या अंत्यात्रेलाच जावे लागले. मी नवीपेठ ला राहयचो आनि तिथेच वैकुंठ ला त्यान्ना नेले होते.

पुलंचे income tax return मी जिथून CA चे articles केले तेथून जायचं
संध्याकाळी उशीरा पुल यायचे. त्यांना एकदा रिक्क्षा आणून दिली, पण बोलण्याचा धीर व्हायचा नाही.
रिटर्न वरच्या सहीवरच समधान मानले -(

लकी आहेस रे मंदार .. आणी ते सर्वजण ज्यांनी पुलं ना पाहीलयं..
माझी ही इच्छा कधीच पुर्ण नाही होणार.. Sad

तेंडुलकरला बघायचं या एकमेव कारणाने यावर्षी IPL, semifinal बघितली.. भरपुर फोटो काढले आणि मध्यंतरात नवर्‍याने खिशात ठेवलेला कॅमेरा चोरला कुणीतरी......... Sad Sad

<<आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.>>

खरच आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मला खरेच खूप चांगल्या/ थोर व्यक्तीना पाहण्याचा, त्यांच्या सानिध्यात थोडा का होईना राहण्याचे भाग्य मिळाले. पुलंबद्दलच सांगायचे झाले तर ते प्रचारासाठी दौरे करायचे, त्यावेळी जवळून पाहिलेले. यादी सांगीतली तर आपणां सर्वांना आश्चर्यच वाटावे.
अशा व्यक्तींचे जेव्हा जेव्हा दर्शन झाले, तेव्हा तेव्हा ते थोरच होते; म्हणजे असे नाही की पुढे जाऊन मोठे झाले, वगैरे. माझ्यातले अन त्यांच्यातले अंतर वाढतच राहीले! त्यांची स्वाक्षरी घ्यायची राहून गेली; फोटो नाही काढता आले, असे वाटले तरी अंतरी त्यांचे वागणे, बोलणे, राहणी, विचार ह्या सर्वांचा पगडा राहतोच आणि तोच महत्वाचा, नाही का? गंमत म्हणजे त्यांच्या साधेपणामुळेच आणि उच्च विचारसरणीमुळेच ते थोर होते/ आहेत हे लक्षात येते. मी देवाचे नेहमी आभार मानते की मला असे क्षण मिळाले आणि असे नेहमीच मिळावेत असेही वाटते.
मंदारजी- आभारी, काही सुखद क्षणांची आठवण करुन दिल्याबद्दल.

Pages