अजि म्या पु.ल. पाहिले

Submitted by मंदार-जोशी on 11 May, 2010 - 06:55

महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"

वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.

पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.

मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........

..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.! Happy

मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.

"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.

थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.

गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.

तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता Proud

आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.

माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.

"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.

"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"

"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.

मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.

pula04061996_01.JPG

मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.

मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.

PuLaSketch01.jpg

गुलमोहर: 

मंद्या लेख मस्त लिहिला आहेस, आवडता लेखक भेटला आणि तो क्षण कायमचा
मनात कोरला गेला. तुझ्या लेखामार्फत माझ्याही डोळ्यासमोरून तुमची भेट एक क्षण
तरळून गेली...

पु.ल. मी खुप उशिरा म्हणजे पुण्यात आल्यावर वाचायला सुरवात केली. तेव्हा नुकतंच मी जयवंत दळवी लिखित (संग्रहीत) पु.लं. एक साठवण वाचून काढलं होतं.
ते प्रयाग मध्ये अ‍ॅडमिट होते रोज अपडेट्स मिळत होते बातम्यांमधुन. एक दिवस दुपारी कोणितरी सांगितलं की ते गेले म्हणून Sad मी तडक गाडी घेऊन मालती-माधव कडे धावले ... एका विशिष्ट ठिकाणापर्यंत पोचले पण पुढे जाऊ शकले नाही. अख्खा भांडारकर रस्ता फुलून गेला होता; तेव्हा मला समजलं की महाराष्ट्रातली अमाप जनता त्यांच्यावर किती प्रेम करते ते... त्यांचं अंत्यदर्शनही न झाल्याने प्रचंड निराश होऊन मी घरी परतले आणि खूप रडले... Sad

तू भाग्यवानच रे... Happy

पु ल न प्रत्यक्ष नाही पाहता आले कधी पण एक गम्मत म्हणून सांगते

मी रुपाली च्या समोर च्या " कौस्तुभ " बंगल्यामध्ये गेली २ वर्षे राहत होते . ते माझ्या बाबांचे स्नेही !! शिक्षणाची २ वर्षे मी तिथे राहिले . एक दिवस फिरताना मी तिथे बोर्ड वाचला रुपाली मध्ये आणि समजले इथे पु ल राहतात. ते गेले आहेत हे लक्षात आले नाही आणि मी त्या इमारतीत शिरले इम्रातीतल्या एका आजींचा आणि माझा संवाद

" काकू पु ल कुठे बाहेर गेलेत का ?? " ..... काकू : " अगं बाई जागेवर आहेस का ?? ते जाऊन किती वर्षे झाली माहित आहे का ?? "

पु ल मी दहावीत असताना गेले मला आठवते . पण ते तेव्हा खरच लक्षात आले नव्हते. मी तोंड लहान करून बाहेर आले आणि स्वतःवर हसू कि रडू कळत नव्हते .

आणखीन एक संवाद

त्या घरातला मुलगा आणि मी

" माझे बाबा खूप हुशार आहेत तू आहेस ? "
" हो "
" माझे बाबा चौथीत मेरीट मध्ये आले होते आणि ७ वीत पण .. तू आलीस ? "
" मी पण "

असे खूप प्रश्न त्याला मी हो हो म्हणाले मग त्याने मला विचारले
" माझ्या बाबांच्या लग्नात पु ल देशपांडे आले होते. तुझ्या लग्नात आले होते ? "
" अरे पण माझे लग्न नाही झालेले "
" तू त्यांना पहिले आहेस ? "
" नाही "
" त्यांनी मला हातात घेतले आहे . मो छोटा बाळ होतो न तेव्हा ते आमच्याकडे आले होते "

याच्यावर माझ्याकडे " आमचे ते भाग्य नाही " हे एकच उत्तर होते .

तुमच्या माहिती साठी. भांडारकर रोड वर ते कसले क्लास आहेत न ?? IELTS चे !!! मालती-माधव वास्तूला शासनाने निळ्या पाटीने येथे पु ल देशपांडे राहत होते असे जाहीर केले आहे . आणि रुपाली पाशीच वसंतराव देशपांडे पण राहायचे. त्याच भागात हिराबाई बडोदेकर यांचे पण घर आहे. या सगळ्या वास्तुना बाहेरूनच पाहून समाधान मानावे लागते . असे दिग्गज सगळे एकत्र कमला नेहरू पार्क मध्ये फिरायला आल्यावर गप्पा मारत असतील अशी कल्पना मी कायम करत असायचे.

व्वा!! मंदार , मस्तच रे.. प्रत्यक्ष पुलं..
कधी कधी अश्या माणसांना आगाऊपणा करणारे फॅन्स आवडतही असतील ना??
तुला पाहून त्यांना आपल्या सखाराम गटण्याची आठवण झाली असेल रे कदाचित Happy

@ रुपाली, मस्त मनोगत Happy

>>"त्यांनी मला हातात घेतले आहे. मी छोटा बाळ होतो न तेव्हा ते आमच्याकडे आले होते " => Rofl

@ वर्षू, सखाराम गटणे बरोबरच त्यांना 'म्हैस' कथेतला मधू मलुष्टे आठवला असावा Lol

अगदी अगदी मला पण गटणेच आठवला. पण मंद्याने तो अविस्मरणीय क्षण गाठला असता तर कीती बहार आली असती ह्या स्वप्नांत ईतका रमलो की हा गटण्याचा तपशील द्यायचा विसरलो. शेवटी ह्याने त्याच्या प्रतिभासाधनेत व्यत्यय आणलाच. Proud

मंदारच कौतुक अपार्ट, पण मीही कदाचीत एक द्राक्षे आंबट असलेला कोल्हाच आहे. ते पुस्तकांत जसे भेटतात तसेच ते भेटणं मला जास्त आवडेल. साधनानं एका फोटोग्राफरला सांगितल होतं, 'या वयात माझे फोटो काढुन प्रसिद्ध करु नको म्हणून'. का? तर, लोकांच्या मनात माझी जी छबी आहे ती तशीच कायम राहू दे म्हणून. अर्थात त्यांच्या खाजगी बैठकीत त्यांच्याशी मोकळेपणानं गप्पा होणं हे नक्कीच खूप काही देउन जाणार ठरेल. पण फक्त हस्तांदोलनातला आनंद मला तरी कळला नाही.

एखाद्या दिग्गजाला, कलाकाराला असं आणि एव्हडच भेटल्याने आयुष्य समृद्ध होतं म्हणजे नक्की काय होतं? कलाकाराला त्याची कला सादर करत असताना अनुभवणं हे समृद्ध करणार असू शकतं. तो क्षण अलौकीक असू शकतो, नव्हे, असतोच. एरवी सामान्य माणसांत आणि त्यांच्यात फरक कसा काय करणार? कलाकाराच्या आयुष्यातही असे परीसस्पर्श झालेले क्षण फार थोडे असतात. जो क्षण उत्कट अभिव्यक्तीचा असतो, सृजनाचा असतो. मंथनातून अमृत मिळाल्याचा आनंद देणारा क्षण तोच. असे अलौकीक प्रतिभेची साक्ष ठरणारे थोडेच क्षण आपल्या सामान्यांचं अवघ आयुष्य उजळून टाकतात. हे क्षण पकडता आले तर ते नक्कीच दिव्यत्वाची प्रचिती आणून देणारे ठरतात.

गावस्करला, मार्शल-होल्डींग-गार्नरच्या तोफखान्यासमोर खणखणीत फटकेबाजी करताना किंवा पाय रोवुन उभ राहाताना साक्षीदार ठरणं, त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह याची देही याची डोळा बघणं समृद्ध करणार की घरात चट्टीरी -पट्टेरी अर्धी चड्डी घालून रोहनच्या लेंग्याची नाडी बांधताना त्याला बघणं समृद्धीत भर घालणारं ?
अब्दुल कादीरने टिंगल केल्यावर चवताळून सलग तीन वेळा स्टेडीयमबाहेर भिरकावून देणारा १७ वर्षाचा, मिसरुड पण कोवळी असलेला, जिगरबाज तेंडुलकर बघण्यात गम्मत आहे की त्याच्या घरात 'बेडशीट घट्ट ताणून धर ग जरा तिकडून' अस अंजलीच्या अंगावर खेकसताना बघण्यात कौतुक आहे? असो.

त.टी : हा वाद नव्हे. कुणाच्याही पोस्टला आव्हान देण्याचा प्रयत्न नव्हे, मंदारच्या आनंदावर विरजण घालणे नव्हे. पूर्ण वैयक्तीक असं हे 'मला असं वाटतं' एवढ्यापुरतच मर्यादीत आहे.

Proud Happy

पर्‍या तू पहिल्यांदाच एका वाक्यापेक्षा जास्त काही टाईप केलयस Proud (अजि म्या मोठ्ठी पोस्ट टाकलेला पर्‍या पाहिला :P) आम्ही कायम अधले मधले...ह्याचेही पटते आम्हा त्याचेही पटते Proud

आम्ही कायम अधले मधले...ह्याचेही पटते आम्हा त्याचेही पटते >> अगदी अगदी ग कवे..

परेशची पोस्ट संपूर्ण पटली नाही तरी आवडली. कारण त्याने अत्यंत विचारपूर्वक हे सगळे लिहिलं आहे.

परेश, हे सगळे विचार आपल्याला आत्ता सुचतात, पण महाविद्यालयीन जीवनात अनेक गोष्टींचे अप्रुप वाटत असतं की! शिवाय मी लेखाच्या सुरवातीला "महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात" असं म्हटलं आहेच की Happy

एखाद्या दिग्गजाला, कलाकाराला असं आणी एव्हढंच भेटल्याने आयुष्य समृद्ध होत नसेलही कदाचीत, पण फक्त हस्तांदोलन करणं किंवा पाया पडणं यातला आनंद वेगळाच असतो, कारण अशा भेटी वारंवार होत नसतात, दुर्मिळ असतात, तेव्हा त्या शक्य झाल्या की आनंद होणारच. आणि सगळे आनंद शब्दात वर्णन करून सांगता येत नाहीत.

असो. पर्‍या तुझी पोस्ट खरंच आवडली. धन्यवाद Happy

परेश तू म्हणतो आहेस अगदी तस्स पुलंनीच कुठेतरी म्हट्लयं.- "कोणत्यातरी जागतिक किर्तीच्या भरतनाट्यम वाल्याला हॉटेलात इडली खाताना पाहून आपल्याला काय मिळणार कलाकराचं दर्शन त्याची कला सादर करताना व्हायला हवे." Happy

लेख मस्त लिहिला आहे!
>>आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. >>> हे खरंच आवडलं.

*** माझ्या मते ***
** अजिबात वाद घालायचा नाहीये कशावरुनही **

फोटो न काढण्याचं पटलं.
१) त्यांच्या विनंतीचा मान.
२) आजारी माणसाचा काय फोटो काढायचा?
३) हस्तांदोलन सुद्धा पुष्कळ झालं.
फोटो नसला तरी आता जवळपास १५ वर्षांनंतरही लोकांना सांगुन त्यांना हेवा वाटेल अशी आठवण आहे ही...
पुष्कळ आहे माझ्याही दृष्टीने...

*** माझ्या मते ***
** अजिबात वाद घालायचा नाहीये कशावरुनही **

मंदार मस्तच Happy

मला ही भाग्यवान म्हणा लोकहो, मी ही पु. लं ना भेटल्येय Happy एकदा नाही दोनदा Happy

एकदा सकाळी सकाळी शाळेच्या जवळ मी आणि माझ्या २ मैत्रिणी गेटजवळच्या बुचाच्या झाडाची फुलं वेचत होतो.. पु ल आणि सुनीताताईंनी सकाळचा फेरफटका मारताना आम्हाला पाहिले. पु ल पुढे येऊन म्हणाले, "काय गं पोरीनो, वर्गात आज पिपाण्या वाजवायचा तास आहे का" ?? आम्हाला आधी कळलेच नाही हे कोण आमच्याशी बोलतायत ते, कारण त्यांच्या डोक्यावर टोपी होती. मग थोड्यावेळाने ट्युब पेटली. पण तोवर ते चालत चालत खुप पुढे गेले होते आणि शाळेची घंटा पण वाजली नेमकी तेव्हढ्यात Sad

असच परत एकदा शाळेच्या एका समारंभात पु ल प्रमुख पाहुणे होते. पण बोलण झालच नाही कारण आमचे हेडमास्तर आणि अजुन एक सर सदैव त्यांना बॉडीगार्ड सारखे चिकटुन होते. पण स्टेजवर बक्षिस घेताना त्यांना नमस्कार केलेला आठवतोय Happy

मंदारा, तुझ्यासारखी सही नाही रे पण माझ्याकडे. यु आर सो लक्की Happy

मंदार छान आठवण..
माझा एक मित्र म्हणतो "तुम्हा मराठी माणसांची दैवतं दोन.. एक शिवाजी महाराज आणि पुल देशपांडे"
मलाही (सगळ्यांप्रमाणेच) त्यांना भेटायची इच्छा होती..
ते गेले तेव्हा पुण्यात होते.. बहिण विचारत होती जायचय का..
पण समहाऊ नकोच वाटलं.. असं वाटलं की त्यातल्या ज्या चैतन्यावर आपण प्रेम करत होतो, तेच नसेल तर जाऊन काय उपयोग..

अशीच अवचटांना भेटायची प्रचंड इच्छा होती.. एखादा माणूस इतक्या लोकांशी इतक्या सहज कसा वागू शकतो - ह्याच आश्चर्य वाटायचं..
त्यांच्या घरी गेले तेव्हा 'गप्पांचा फड' असा जमला नाही (ताई-तिचा नवरा नियमित व्हिजिटर्स होते...त्यांच्याच बरोबर गेलेले)
पण त्यांनी मला ओरिगामीतले काही काही सोपे प्रकार शिकवले..मस्त गाणी म्हटली.. बासरी वाजवली..
त्यांचे लेख तर आपण वाचतोच -- पण त्यांनी काढलेली चित्र, केलेली स्कल्पचर्स, लाकडातलं कार्व्हिंग, काढलेले फोटोज, त्यांच गाणं, त्यांची बासरी.. त्यांच्यातला जिवंतपणा..
ह्या जिवंतपणाची मलाही लागण झाली..त्यानंतर मी अचानक शिवणकाम, सुतारकाम, चित्र काढणं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले... मी काही उत्तम दर्जा प्राप्त नाही केलेला ह्यात कशातच अजून, पण njoy करतेय हे सगळं..

पुण्याला परत गेले की नक्की पुन्हा जाणार आहे..तो जिवंतपणा जर माझ्यात कायम जागता राहिला ना, तर भरून पावलं म्हणेल!

मंद्या.... जोरदार अभिनंदन....
खरच खुप लकी आहेस... किती हे आम्हीच समजु शकतो... त्यांना भेटु न शकलेले...

खूप भारी! पुलंना आपण भेटायला हवं असं फारसं कधी वाटले नाही, पण भेटले असते तर अर्थातच सही वाटलं असतं. ते गेले तेव्हा मात्र मी प्रचंड रडले होते..

Pages