दोन दिवसांनी शुद्धीवर आलेल्या समीरने पुटपुटत सांगीतले. रस्त्यापलीकडे तो काही टेबलांवरचे उरलेले अन्न टाकायला गेला होता. पण तो खोटे बोलत आहे हे चाचा, अबू अन पद्या या तिघांनाही समजले होते. एकतर मधेच जाऊन अन्न तिथे टाकायची गरज नव्हती. त्यात पुन्हा ते काम सहसा झरीनाचाची करत असे. त्यात पुन्हा अपघात झाला त्यावेळी समीरच्या हातात कोणतेही घमेले वगैरे नव्हते ज्यातून त्याने भांडी किंवा उरलेले अन्न नेलेले असावे.
काजलची आई मात्र शहारून बेशुद्धच पडली होती त्या अपघाताचे दृष्य बघून! काजल बोलेनाशी झाली होती. इतकेच काय, अबू, चाचा, यशवंत अन पद्या जरा मोठे होते म्हणून! बाकीच्या पोरांचीही दातखीळ बसायची वेळ आली होती.
अपघात झाल्यावर सर्व प्रथम थांबलेल्या चार गाड्यांच्या चालकाने वाहतूक तुंबायच्या आत आपल्या गाड्या कशाबशा हायवेवर योग्य दिशेला तोंड करून उभ्या केल्या. ढाब्यावर या चार गाड्या खरे तर लवकर येणार होत्या अन साडे बारा पर्यंत जाणारही होत्या. पण मॅरेज पार्टी असल्यामुळे भलताच उशीर होऊन त्या ढाब्यावर मुळी पोचल्याच रात्री दिड वाजता होत्या. येतात की नाही या चिंतेत स्टाफ पेंगुळलेला असताना अचानक जोरात हॉर्न वाजवत एक गाडी आली अन मग एक एक मिनिटाच्या अंतराने सगळ्या गाड्या प्रकट झाल्या. अक्षरशः बाजार झाला ढाब्याचा! रमणला आजवर इतके काम एकदम मिळाले नव्हते. कुणालाच मिळाले नव्हते. मॅरेज पार्टीतील काही जण पिणारे होते. त्यांची खास सोय होती. बायका मुले वेगळ्या ठिकाणी होत्या. मुले त्याही वेळेस हुंदडत होती.
गाड्या यायच्या आधीपर्यंत जेमतेम दहा एक गिर्हाईक असल्याने सगळे निवांत होते. आणि गाड्या आल्यावर कुणाला काही सुधरेनासेच झाले होते. अबूला मात्र दिपूची अनुपस्थिती प्रकषाने जाणवत होती. अनेक दिवस नुसतेच मद्यपान केल्यामुळे व कामाला हातही न लावल्यामुळे त्याच्या हालचाली सुस्तावलेल्या होत्या. पण कसलीही कसर न ट्।एवता त्याने अजस्त्र खाना बनवलेला होता. रात्री बासुंदी पुरी मात्र बंद ठेवलेली होती. करणार कोण पुर्या? सीमाकाकू अबूला जमेल तेवढी मदत करत होत्या. यशवंतही आत बाहेर करून पुन्हा स्वतःचे दुकानही बघत होता.
त्या रात्री अक्षरशः विक्रमी विक्री झाली.
मॅरेज पार्टीला नुसता ऊत आला होता. पिणार्यांचे पिणे चालू असेपर्यंत गाड्या हलणारही नव्हत्या अन रुसवे फुगवे नकोत म्हणून भर गार्डनमधेच अनेक बायका लवंडलेल्या होत्या. मुले पेंगुळायला येत असतानाच नवे खेळ सुरू करत होती. आणि...
पहाटे सव्वा तीनला तो भयानक अपघात झाला.
चार वाजता एक अॅब्युलन्स अन तीन पोलीस आले. पाच वाजेपर्यंत तीन अॅम्ब्युलन्स अन आठ पोलीस आले. मृतांना ताबडतोब शिरवाडला हलवले. जखमींपैकी काही शिरवाड तर काही पिंपळगाव (बसवंत) येथे हलवण्यात आले.
आक्रोश बघवेनासा होता.
ढाब्यावरील गाड्या ते भयाण दृष्य पाहून जमेल तेवढी मदत करून चार वाजता मार्गालाही लागल्या होत्या.
ढाब्याच्या स्टाफपैकी तीन जण समीरला घेऊन शिरवाडला गेले होते. बाकीचे जमेल ती मदत करत होते. पाणी, चहा, दूध, खायला... औषधाच्या गोळ्या वगैरे! जे जमेल ते!
आणि अपघात झाला त्याचक्षणी काजल अन दिपूही आले होते.
मध्यरात्री ढाब्याचा असलेला उत्सवाचा मूड पहाटे सुतकी झालेला होता. ट्रक ड्रायव्हरला अटक झाली होती. उजादेपर्यंत समजले होते की ढाब्याची गेटची भिंत जराशी पडली होती अन अब्दुलचे दुकान मात्र पूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
ट्रक ड्रायव्हर अजिबात प्यायलेला नव्हता. एस्टी.चा ड्रायव्हर तर प्यायलेला असणे शक्यही नव्हते.
एकंदरीत, अपघात अत्यंत दुर्दैवी होता! सकाळच्या शिरवाडच्या अन पिंपळगावच्या दैनिकांमधे तर अगदी नाशिक अन मालेगावच्याही दैनिकांमधे बातमीला बर्यापैकी स्पेस मिळालेली होती.
त्या विचित्र गोष्टीत एक मात्र झालं होतं! प्रत्येक बातमीत राम रहीम ढाब्याचं नाव प्रामुख्याने आलं होतं!
दिपू अन मन्नू रडवेले झाले होते. साखरू मात्र आश्चर्यकारकरीत्या मदतीसाठी धावाधाव करत होता. त्याच्या उत्साहाकदे बघत इतरांनाही स्फुर्ती येत होती. चाचाचे साखरूकडे जातीने लक्ष होते. अपघातग्रस्तांचे पाकीट वगैरे तर मारत नाही ना याच्याकडे! पण आज साखरू तसले काहीही करताना दिसत नव्हता. उलट वादळी वेगाने मदत करत होता.
दिड दिवस! दिड दिवसांनी समीर शुद्धीवर आल्यावर त्याने सांगीतलेले कारण खोटे आहे हे समजल्यामुळे चाचा, अबू अन पद्या आणखीनच चिंतेत पडले. की ठीक आहे! अपघात झाला त्यामुळे बिचार्याला लागलंय! पण.. हा खोटे का बोलतोय? आणि तो तिथेच होता हे समजल्यावर दिपू हादरला होता. काजलला त्याने हळूच सांगीतले होते अन ती तर पूर्णच काळजीत पडली होती.
दोन दिवस ढाबा फक्त चौकशी करणारे पोलीस, वार्ताहर अन कुतुहल म्हणून आलेले स्थानिक लोक यांच्यापुरताच चालू होता. अवजड क्रेनने गाड्या योग्य ठिकाणी हलवण्यात आल्या होत्या.
तब्बल दहा दिवसांनी समीरला सोडले. समीरबाबत ढाब्यावर अजून कुणाच्या काही लक्षातच येत नव्हतं! समीर हा मुलगा अपघाताला कारणीभूत आहे हेच डोक्यात शिरलेलं नव्हतं! तो खोटे का बोलला असावा यावर तिघे विचार करत होते. मुख्य म्हणजे, कोणत्याही गोष्टीसाठी तो तिकडे गेला असला तरीही धावत हायवे का क्रॉस केला असावा हे समजत नव्हते. असे त्याने काय बघितले? पण त्याची तब्येत बरी नव्हती. त्याला मार लागला होता. त्याची शुश्रुषा चालू होती. सीमाकाकू स्वतःच त्याच्याकडे बघत होत्या.
मात्र या दहा दिवसात दिपू अन काजल एकमेकांच्या खूप जवळ आले. ती रात्र तर अशीच गेली होती. दुसर्या रात्रीही मनात सारखे अपघाताचेच विचार होते सगळ्यांच्या. बरेच दिवसांनी दिपू मन्नू अन साखरूबरोबर झोपायला गेला होता. तिसर्या दिवसापासून मात्र रात्री त्याला झोप येईनाशी झाली!
आहाहाहा! काय तो स्पर्श होता. काय ओठ... काय.. काय स्वाद... काय मलमल नुसती...
इतकं गोड असतं प्रेम? .. इतकं?
काजलला काय वाटत असेल? पश्चात्ताप होत असेल की काय? पण.. ती तर अजूनही 'खास आपल्यासाठी' अशाच प्रकारचं हसतीय!
महिन्याभरात सगळं सुरळीत झालं! एस्टीने आपली मोडकी बस क्रेनला लावून नेली होती. ट्रकच्या मालकाने सर्व्हेयरला वगैरे बोलवून विम्याचे कागदपत्र तयार करून फोटो वगैरे काढून ट्रक गॅरेजला पाठवला होता.
हायवेवर आता खाणाखुणाही उरलेल्या नव्हत्या अपघाताच्या!
अबू आता पुन्हा जोक्स मारायला लागला.
रामरहीम ढाबा पुन्हा रंगात यायला लागला.
तसतसे काजल अन दिपूही जरा मोकळेपणे वागू लागले.
खिडकीतून एकमेकांकडे चोरून पाहणे, खिडकीत येण्याची वाट पाहणे, सगळ्यांमधे असताना एकमेकांकडे हळूच बघणे, काहीतरी कारणे काढून एकमेकांशी बोलणे!
समीर आता पुर्ववत काम करू लागला होता. तरी त्याचा एक डोळा या दोघांवर होताच.
मात्र या प्रक्रियेत एक गोष्ट झाली होती. सीमाकाकूंनी यशवंतशी दुसरी जागा बघण्याचा मुद्दा काढणं संपवलं होतं!
अचानक त्यांना साक्षात्कार झाला होता की त्यांचे ढाब्यावरील महत्व प्रचंड आहे. मुख्य म्हणजे इतकी मुले असूनही काजलबाबत काहीही भीती वाटत नव्हती.
राखी पोर्णीमा आली.
दीपक अण्णू वाठारे रक्षाबंधनाच्या कालावधीत गडप झाले ढाब्यावरून! आणि त्याचे कारण अर्थातच काजलला माहीत होते. समीर दिपू कुठे चालला हे बघायला मागोमाग गेला होता. सगळ्यांना लायनीत बसवून काजलकडून राखी बांधून घ्यायची होती. सगळ्यात मोठा भाऊ म्हणून पद्या, नंतर बाळ्या, झिल्या, विकी, दादू अशा क्रमाने काजल येत असताना दिपू अन समीर नाहीत यावर चर्चा झाली.
काजलने सांगीतले की दिपू झरीनाचाचीच्या वस्तीवर जातो म्हणाला. समीरबद्दल तिला काही माहीत नव्हते.
दोन तासांनी प्रेमवीराचा भाऊराया होऊ नये या भीतीने पळालेले दीपकराव हळूच प्रवेशले तेव्हा काजलने अलगद 'झाले' अशी मान हलवून त्याचा जीव भांड्यात पाडायला त्याला सहाय्य केले.
एकंदर दिवस सुगंधी होते. भुलोबाच्या सहलीसारखा चान्स कसा येऊ शकेल याचा दिपू त्याच्या परीने विचार करत होता. दोन महिन्यांनी, दिवाळी वगैरे उरकल्यावर नाश्त्यासाठी सगळे जमलेले असतानाच्या चर्चेत त्याला संधीची चाहुल लागली.
यशवंतने केलेले एक विधान त्याल कारणीभूत ठरले. तो म्हणाला की तो काजलला घेऊन दोन दिवसांसाठी टहेर्याला जाणार आहे. उद्याच!
आता आली का पंचाईत? एक तर दोन दिवस काजल दिसणार नाही. त्यात तिला घेऊन जाणार तिचेच वडील! मग आपण करायचे काय? दिड ऑम्लेट संपताना दीपकरावांना आठवले.
'आपल्याकदे बुद्धी नावाचा प्रकार असला तर आपल्याला जगात कशाचीही गरज भासत नाही'!
दिपू काहीतरी युक्ती करण्याच्या विचारात आहे हे त्याच्या चेहर्यावरून काजलला समजत होते. तिलाही तेच हवे होते.
दिपूने तोंड उघडले.
दिपू - यशवंतचाचा, आप जाही रहे है.. तो...
यशवंत - क्या?
दिपू - म्हौर्वाडीला जाल काय?
यशवंत - महुरवाडी? का?
दिपू - अंहं!... परवा वस्तीतला वसंत आलावता.. म्हन्तो आईची तब्येत बिघडलीय..
यशवंत - तुझ्या?
दिपू - हं!
आता चाचा मधे पडला.
चाचा - तो जाके क्युं नय आया तू पयलेच? ऐसे छोडनेका नय मां को..
दिपू - छोडा नय मै मां को.. लेकिन ढाबेपे फिर..
आता अबू बोलला.
अबू - ढाबेपे क्या ढाबेपे? तू जन्मा नय होएंगा तबसे खाना बनाता मय.. चल निकल.. मांको मिलके आ
दिपू - लेकिन..
चाचा - आता काय?
दिपू - मै.. अकेलाच.. मेरेको तो रास्ताबी मालूम नय..
चाचा - आता अकेला कशाला? यशवंतचाचा हय ना? उसकेच साथ जा रहा ना तू?
दिपू - मैबी जाऊ क्या यशवंतचाचाके साथ?
अबू - तो फिर?
ऑम्लेटचा पुढचा तुकडा तोंडात कोंबताना अत्यंत निरागस नजरेने त्याने काजलकडे पाहिले. ती गालातल्या गालात हसत होती.
हे काही समीरला बघवेना.
समीर - आजतक मां बीमार हय तो गया नय.. आजहीच कैसा निकला?
दिपू - कल तो पता चला... लेकिन अकेला कैसे जायेंगा.. मै कबी गयाच नय तो..
तेवढ्यात बाळ्या उद्गारला.
बाळ्या - मलाही चांदवडला जायचंय...
एक शांतता पसरली. आता कुणाकुणाला आपापले घर आठवते हे चाचा अन अबू तपासायला लागले. मात्र बाळ्याबद्दल त्यांच्या मनात तसले काही नव्हते. बाळ्या मोठा होता, सीनियर होता. तो उगाच सुट्टी घेणार्यातला नव्हता.
अबू - तुम सब घर जायेंगे तो मै और गणपत यहा कायको रयेंगे?
सगळे हसायला लागले.
आता सीमाकाकू म्हणाल्या.
सीमा - मी काय म्हणते.. बाळू चाललाच आहे तर तोच सोडेल की या दोघांना टहेर्याला.. तुम्ही शिरवाडला जाऊन बँकेचं काम नाही का करू शकणार?
दिपू अन काजलची नजरानजर झाली. संदेश पाठवण्यात व मिळवण्यात आले.
हो मग? आता वडीलच रद्द झाले तर नुसती धमालच की राव?
बाळ्या काय? चांदवडपर्यंत! पुढचा प्रवास दोघांनीच करायचा. दुसर्या दिवशी पुन्हा चांदवडला यायचं सायंकाळी सहा वाजता अन बाळ्याबरोबर परत ढाब्यावर यायचं! व्वा!
आशेने दीपकराव यशवंतकाकाच्या चेहर्याकडे बघू लागले. काजलने खाली बघत तिच्या कानांचे डोळे केले.
आता काजल चांगली सतरा वर्षाची घोडी, हे दिपटलंच जरा बारकंय, पण बाळ्या चांगला चोवीस पंचवीस वर्षाचा! सीमा म्हणतीय ते बरोबरच आहे. यशवंतरावांनी विचार केला.
यशवंत - हरकत नाय म्हणा..
ऑम्लेट आहे की पुरणपोळी? इतकं गोड कसं लागतंय? च्यायला!
कुणीच नसतं तर बसल्या बसल्या मांडी घालूनच दिपूने दोन फूट उंच उडी मारली असती. म्हणजे, निदान त्याला तसं वाटत तरी होतं!
तर काजलने अनावश्यक गाढवपणा केला.
काजल - पुढच्या हप्त्यात जाऊ ना? उद्याच कशाला?
आता हिचं काय बिघडत होतं उद्या जायला? चांगला चान्स आलाय तर म्हणे पुड्।अच्या हप्त्यात जाऊ!
दिपूला समजलं! काजल आपल्याला चिडवण्यासाठी हे म्हणतीय! त्याला आता राग आला. काजल मिश्कील चेहरा करून ब्रेड खायला लागली.
सीमा - अंहं! उद्याच्या उद्या जायचं! परत ते लोक निघून गेले गावी की भेट व्हायची नाही. आणि साडी नेसता आली नाही तर आजीला सांग नेसवायला. नीट वाग! हसू नकोस मुलाकडे पाहून!
मुलाकडे? म्हणजे? हिचा बघण्याचा कार्यक्रम आहे टहेर्याला? च्यायला! आपण उगाचच चाललोयत मग!
पण क्षणभराने दिपूच्या लक्षात आले. काजललाच जर आपल्याबद्दल वाटतं तर ती त्या मुलाला कसे काय पसंत करेल? मग ट्युब पेटली त्याची! कसलाका कार्यक्रम असेनात! काजलच मनाने आपली आहे तर भर लग्नातूनही पळून येईल ती!
चाचा - लडका देखने जा रहे क्या?
सीमा - नय! लडकेके पिताजी हय्. हम मिले हय उनसे.. पण काजललाच पाहिलं नव्हतं त्यांनी!
अबू - तुम लोगांकोबी जाना चाहिये...
सीमा - चाहिये... लेकिन कल बँकमे इनको दस्तखत करनेका हय लोन के पेपर पे.. और आजी हय वहापे.. काजल गयी तो बी चलेगा.. बात नय करनेका कुछ बी.. बात बादमे करनेका हय.. पयले पसंती असली तर.. म्हणून बोलवलंय हिला...
पसंती कसली बोडक्याची? त्यांना काजल पसंत आहे की नाही याचा प्रश्नच कुठे येणार आहे? काजललाच ते पसंत नसले तर? दीपकराव आपल्या परीने विचार करत होते.
शेवटी ठरलं! बाळ्या या दोघांना चांदवडपर्यंत सोबत करणार! चांदवड ते टहेर कोणत्याही जीप किंवा बसमधून ते जाऊ शकले असते. तिथे दिपूने काजलला तिच्या घरी सोडून मग महुरवाडीला जायचं! दुसर्या दिवशी दिपूने महुरवाडीहून टहेर्याला येऊन काजलबरोबर पुन्हा सहा वाजता चांदवड स्थानकावर उभं राहायचं! तिथून बाळ्या यांना घेऊन आठपर्यंत ढाब्यावर!
दिपूला चाचाने पगारातून कट बिट न करता स्वतःच्या खिशातले पाचशे रुपये दिले. अबूनेही पाचशे दिले. काजलला पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता. तिला वडील होते. मग दिपू बाळ्याबरोबर शिरवाडला गेला. आईसाठी शंभर शंभरच्या दोन साड्या, मन्नूचाचासाठी एक स्वेटर, आक्कासाठी एक स्वेटर अन वस्तीत त्याला हाकललेले असताना ज्या रेहानामौसीकडे तो झोपायचा तिच्यासाठी एक शंभरचे पातळ एवढे घेऊन तो ढाब्यावर आला. मात्र येताना त्याने स्वतःसाठी चाळीस चाळीस चे दोन शर्ट, एक पंचवीसचा टीशर्ट अन एक ऐंशी रुपयांचा बुटाचा जोडही आणला. एक टोपी आणली. एक पेन व खिशात मावेल अशी छोटी डायरी आणली. उरलेल्या पैशातून त्याने कंगवा, पावडर व एक आरसा आणला.
रात्री स्वतःच्या खोलीत त्याने सगळे कपडे एकेकदा घालून पाहिले. आपल्यात बराच बदल पडलेला आहे हे त्याला जाणवत होते. नव्या कपड्यांमधे तो चांगलाच आकर्षक दिसत होता असे त्याचे स्वतःचेच मत निर्माण झाले.
नऊ! तब्बल नऊ वर्षांनी... जगाच्या शाळेत क्रूरपणे ढकलण्यात आलेले निरागस दीपक अण्णू वाठारे... पुन्हा आपल्या गावी.. महुरवाडीला.... पहिल्यांदाच चालले होते.. पण आता.. त्यांचा रुबाबच वेगळा होता...
झोपच आली नाही. कशी येणार? एरवी काजलच्या विचारांनी झोप उडायची! आजची झोप वेगळ्याच कारणाने उडली होती. खरे तर काजलबरोबर प्रवास करता यावा म्हणून त्याने महुरवाडीची शक्कल लढवली होती. पण आता महुरवाडीच्या विचारांनी काजलच्या विचारांना मनातून दूर ढकलले होते अन दिपूच्या मनावर महुरवाडी व्यापली होती.
त्याला आठवत होते. ती काळोखी रात्र! अचानक जाग आलेली असताना काळाकभिन्न मन्नूकाका दिसल्यामुळे आपण घाबरलो. मन्नूकाकाने अक्षरशः जीव खाऊन पाठीत मारलेली लाथ! केवढेसे होतो आपण! कसं सहन झालं आपल्याला? आई काहीच मदत करत नव्हती. का? का करत नव्हती? आपण नकोच होतो तिथे! मग वस्ती जमेपर्यंत किती मारलं चाचाने आपल्याला! आईगं! आईगं तरी कसं म्हणायचं! आई आठवायला आई मदत करणारी असायला हवी! आपल्या आईने तर मन्नूकाकाचा हातही धरला नाही. रेहानामौसीने कसे का होईन .. आपल्याला घरात रात्रीचे ठेवून तरी घेतले... मग आक्का म्हातारीने काहीतरी निर्णय घेतला बहुधा! कारण सगळेच तिचं ऐकायचे. आपल्याला फसवून एका बसमधे बसवलं! आवाजच फुटत नव्हता रडण्यामुळे! अजून मन्नूकाकाच्या लातेचा स्पर्श पाठीला जाणवतो. का हाकललं असेल आपल्याला? आपली चूक काय होती? सावत्र असली तरी आधी आई आपल्यावर प्रेम करायची. मग त्याचदिवशी काय झालं! आणि... इतक्या .. इतक्या वर्षांनी काही महिन्यांपुर्वी पहिल्यांदाच ती ढाब्यावर भेटली तेव्हा... किती रडली आपल्याला पाहून!
आपण का चाललो आहोत महुरवाडीला? आपल्याला कुठे कुणी सांगीतलं की आईची तब्येत बिघडलीय? खोटं बोललो आपण चाचाशी अन अबूशी! काजलबरोबर फिरता यावं म्हणून! पण.. जायची वेळ आल्यावर असं वाटतंय की... नकोच होतं खोटं बोलायला.. काय करणार तिथे जाऊन?
आई, रेहानामौसी ठीक आहे... पण आपण... मन्नूचाचासाठी स्वेटर का घेतला??
का घेतला? भीती वाटली म्हणून? की त्याला काही घेतलं नाही तर पुन्हा मारेल?
छे:! भीती कसली? आता हात लावला तर उलटा करेन त्याला..
मग? मग का घेतला? कोण लागतो तो आपला?
दिपू रात्रभर तळमळत होता. काजलचे विचार अत्यंत पुसट, जवळपास नष्टच झाले होते. महुरवाडीला जायच्या कल्पनेने एकाचवेळी तो गलितगात्रही झाला होता अन दुप्पट उत्साहातही आला होता.
जिथून हाकलून दिले आहे, तेही इतक्याशा वयाचे असताना, तिथे पुन्हा सन्मानपुर्वक व तेही लोकाग्रहास्तव अन जवळपास नऊ वर्षांनी जाताना कसं वाटतं याचा अनुभव घेतलायत कधी?
मन भरून येत असावं! दिपू एक क्षण झोपला नाही रात्री! आणि पहाटे साडे चारला पद्याने दारावर थाप ठोकून 'उठ बे दिप्या, गाडी आयेंगी सादे पाचको, साडे चार बज्या' म्हणून सांगीतले..
एकच क्षण त्याला वाटले की पद्यादादाला सांगून टाकावे की मी नाही जाणार!
पण आता तो वेडेपणा ठरला असता. आईची तब्येत बरी नसताना जात कसा नाहीस म्हणून पद्यानेच झापला असता.
दिपू उठला.
पहाटे साडेपाचला जेव्हा चांदवडला सोडण्यासाठी पिंपळगाव (बसवंत)च्या एका माणसाची जीप आली...
बाळ्या एक बॅग घेऊन उभा होता..
दिपू तीन पिशव्या घेऊन नवीन कपडे घालून काजलची वाट पाहात होता...
आणि
गर्द हिरव्या मखमली साडीत गोरीपान काजल सुगंधी शिडकावे मारत जीपपाशी हजर झाली होती.
का कुणास ठाऊक! दिपूने निघताना चाचा अन अबूला वाकून नमस्कार केला.
बाळ्याची एकमेव मावशी चांदवडला राहात होती. तिच्याकडेच तो वाढलेला होता. आता ती म्हातारी झाली होती. मावसभाऊ होता एक बाळ्याला! पण त्याचे अन बाळ्याचे फारसे जमायचे नाही. बाळ्या हळूच मधूनच कुणाच्यातरी मार्फत मावशीसाठी पैसे वगैरे पाठवायचा. आज बाळ्यालाही खूप ओढ लागली होती मावशीला भेटायची.
घर्र आवाज करत जीप सुरू झाली अन ड्रायव्हरच्या शेजारी बाळ्या बसला. मागच्या सीटवर काजल अन दिपूचे सामन ठेवले. अन सगळ्यात मागे जे सीट असते, ज्यावर बसणारे लोक एकमेकांकडे तोंड करून व ड्रायव्हरला पर्पेंडिक्युलर असे बसतात त्या दोन सीट्सवर काजल अन दिपू समोरासमोर बसले होते.
जीप निघाली. केवळ सात आठ मिनिटातच ढाबा दिसेनासा झाला.
आणि मग दिपूने जी नजर काजलकडे वळवली ती मुळी तो हटवेचना!
एरवी खळखळून हसणारी अन थट्टामस्करी करणारी काजल अशा एकांतसमयी अशी लाजरी अन नि:शब्द का होते हे दिपूला समजायचे नाही.
जीपच्या धक्क्यांमुळे एकमेकांवर आदळण्याचा प्रश्नच नव्हता. बाळ्या ड्रायव्हरशेजारी बसूनच झोपून गेला होता. अजून नीटसे उजाडले नव्हते.
आणि न राहवून दिपूने आपल्या पायांच्या बोटांनी काजलच्या पायाच्या बोटांशी चाळे सुरू केले. काजलने सुरुवातीला पाय किंचित आक्रसून घेतले.. पण कुणालाच काही समजणे शक्य नाही आहे हे समजल्यावर मग ती तिच्या नखांनी दिपूच्या पायाला गुदगुल्या करू लागली.
पावणे सात वाजता जेव्हा प्रवासाला सव्वा तास झाला होता...
सूर्याच्या किरणांनी बॉम्बे-आग्रा नॅशनल हायवे संपूर्ण उजळला होता..
वाहतूक तेव्हाही अत्यंत मंद गतीने जात होती...
आणि काजलचे गोरे गाल गुलाबी झालेले होते...
नजर ड्रायव्हरसमोरच्या काचेतून पुढच्या रस्त्यात गुंतल्यासारखी...
लज्जेने डोळे अर्धवट झुकलेले..
ओठांवर ओले अन मंद हसू..
संपूर्ण शरीरावर रोमांच...
आणि दीपकरावांना सूर्य नेमका आत्ताच कशाला उगवला याचा राग आला होता..
कारण भुलोबाच्या उरुसाहून परत येताना केलेला पराक्रम त्यांना आज फक्त क्षणभरच करता आला होता मागे बसून..
पण तेवढ्यानेही त्यांना सगळ्या जगाचा विसर पडला होता...
आठ वाजता अत्यंत अडकत अडकत चाललेल्या वाहतुकीतून एकदाचे चांदवड आले..
जीप थांबली.
काजलला हात देऊन खाली उतरवाताना कोण पुरुषार्थ वाटला दिपूला.
बाळ्याला या सगळ्याशी काही देणेघेणेच नव्हते. तो आपला त्याची जबाबदारी पार पाडत होता.
त्याने कुठूनतरी चौकशी करून आणखीन एक शेअर तत्वावर चालणारी जीप अडवली. ड्रायव्हरशी व्यवस्थित बोलून दोघांना जीपमधे बसवले.
बाळासाहेब आपल्या मावशीकडे जात असताना ही दुसरी जीप डेहराडूनची महाराष्ट्रातील प्रतीकृती असलेल्या चांदवडमधून धीम्या गतीने राहूरबारी घाटाकडे निघाली होती...
आणि राहूरबारी घाटाच्या अप्रतीम सौंदर्याने काजल मोहीत झालेली असली तरी त्या घाटातील 'थांबायलाच पाहिजे' अशी भावना ज्या देवळाबद्दल आहे त्या रेणूका देवीला हे दोघे नमस्कार करत असताना मात्र काजलच्याच अप्रतीम सौंदर्याने आजूबाजूचे लोक अवाक झाले होते. दिपूचा तर प्रश्नच नव्हता. कदाचित देवीही स्वतःच बघत बसली असावी.
त्यात काजलने हिरवी गर्द साडी नेसली होती. तिचा गोरा गुलाबी रंग मगाशीच दिपूने केलेल्या मधूर खोड्यांनी चढलेल्या लज्जेमुळे अधिकच खुलत होता.
मात्र ही जोडी इतक्या लहाव वयात कशी काय बांधली गेली हे पब्लिकला समजत नव्हते. कारण काजलच्या चेहर्यावरचे भाव तर अगदी वधूसारखेच होते. अन पोरगा तर जरा बारकाच वाटत होता.
राहूरबारी घाटातून जीप उतरून उमराणं, सौंदाणं करत डकाव डकाव चालली होती. प्रवाशांची चढ उतार चाललीच होती.
आणि असेच वीस किलोमीटर आणखीन गेल्यावर एकदाचे टहेरे आले.
चांदवडला असताना दिपूला काहीच आठवले नव्हते.
पण टहेर्यातील एक वेस पाहून व त्यावरील खंडोबाचे छोटे देऊळ पाहून मात्र त्याला कसलीतरी आठवण झाली.
आपल्याला खूप मारले होते अन एका टेंपोत घालून नेत असताना पुन्हा सगळे याच देवळापाशी थांबले होते अन आपल्या कुणीतरी गोळी अन चिक्की दिली होती इतके त्याला आठवले.
मनावर खूप भार आला त्याच्या!
त्याच्या आयुष्याचीच दिशा बदलणार्या ठिकाणी त्याचा प्रवेश आता होत होता. आणि काजल कधी एकदा आजी भेटतीय या ओढीने झपाझप पावले उचलत होती.
ठरले होते ते असे... की काजलच्या आजीला एक पाच मिनिटे भेटून दिपूने महुरवाडीला निघून जायचं..
ते एकदम दुसर्या दिवशी तीन वाजताच पुन्हा काजलकडे यायचं...
पण...
होणार काहीतरी वेगळंच होतं!
टहेर्याची माशुका काजल टहेर्याला आली होती खरी..
पण आपल्या भावी सासूकडे तिला जावच लागणार होतं...
महुरवाडीला...
चालता चालता ती दिपूला एका टेकडीकडे हात दाखवत सांगत होती ..
ती तुझी वस्ती दिपू... महुरवाडी... तिथे राहायचास तू... तेव्हा...
आणि त्याचवेळेस नऊ वर्षांनी पहिल्यांदाच आपल्या वस्तीकडे टेकडीच्या तळापासून बघताना...
दीपक अण्णू वाठारे यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या..
बिचारं बाळ.. हाकलून दिलं होतं त्याला अर्धवट वयात... आज स्वतःच परत आलं होतं.. पण राहणार मात्र नव्हतं पुन्हा तिथे...
या भागाच्या निमित्ताने दोन
या भागाच्या निमित्ताने दोन गोष्टी नमूद करण्याची इच्छा होती. मला या कथेबाबत, तसेच सोलापूर सेक्स स्कँडल या आधीच्या कथेबाबतही काही वाचकांकडून / प्रतिसादकांकडून काही शंका विचारण्यात आल्या होत्या.
१. मी ही कादंबरी मायबोली या स्थळावर ऑनलाईन लिहीत असून रोज जेवढी लिहितो तेवढी प्रकाशित करतो. माझ्याकडे कादंबरी संपूर्ण तयार असते व त्यातील एक एक भाग मी हळू हळू प्रकाशित करतो असे नाही. मी ते भाग त्याचदिवशी मायबोलीवरच लिहिलेले असतात. त्याचमुळे काही गफलती, काही किरकोळ चुका व काही संदर्भ अर्धवट येणे असे होत असेलही. हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे मला काहीजणांनी या कादंबरीचा एन्ड विचारला. तो जर मलाच माहीत नाही तर मी सांगणार कसा?
२. दिपूचे वय वाढणे यासाठी मी सण, महिना असाच गेला, चार महिन्यात तो रुळला असे संदर्भ मुद्दाम वापरत आहे. माझ्या अंदाजाने त्याच्या वयात आत्तापर्यंत बहुधा मेजर गफलत झाली नसावी. पण नोंदीस आणून दिल्यास आभारी राहीन.
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे त्यांच्या प्रेमळ प्रोत्साहनासाठी मनापासून आभार!
-'बेफिकीर'!
व्वा.. खूप उत्सुकता लागलीये
व्वा.. खूप उत्सुकता लागलीये दीपू-काजल चं पुढं काय होणार याची.हा भागही खूप आवडला
मस्त चालु आहे कादंबरी....
मस्त चालु आहे कादंबरी....
वाचायच्या आधी... आत्ताच बघून
वाचायच्या आधी...
आत्ताच बघून गेलेले... दिसली नव्हती... कायए रूटिन झालेय ना... हाफीसात आल्या आल्या चालू केलं की मेल्स वर एक नजर टाकायच्या आधी हाफ राईस दाल मारके चा नाष्टा करण्याचं... धन्यवाद... फुल्ल स्पीड ने पोस्टताय ते...
वाचून प्रतिक्रिया नोंदवतेच... तेवढं छन जमतं आपल्याला...
बेफिकीर... मला नाही वाटत कि
बेफिकीर...
मला नाही वाटत कि तुम्ही संपूर्ण कादंबरी तयार केली असेल.. व त्यातील एक एक भाग मी हळू हळू प्रकाशित असाल..
शीवाय तुम्ही नियमित नवीव भाग देता हि खर तर कौतुकाची गोष्ट आहे..निदान पुढील भागाची जास्त वाट पहावी लागत नाही.. असे कही लेखक आहेत जे दर्जेदार लेखन करतात पण फक्त प्रसिद्धीसाठी क्रमशः ... निदान तुम्ही त्यातले नाहीत हेच खुप आहे...तुम्ही लिहीत रहाव बस्स...
लिखान खुप सुंदर, वातावरण निर्मिति छान..आनि हो ह्या कथेत भाशेचा बाज उत्तम राखला आहात..
हा भाग सुधा आवडला..
तुम्ही या कादंबरीचा प्रत्येक
तुम्ही या कादंबरीचा प्रत्येक भाग सुंदर प्रकारे मांडला आहे . आम्हाला जराही शंका वाटली नाही.............तुम्ही लिहित रहा ............दिपू आणि काजल .........
खरंच भावूक आणि हळूवार
खरंच भावूक आणि हळूवार प्रेम.... चोरट्या कटाक्षांची, स्पर्शाची आणि प्रेमाची मजा काही औरच असते :इश्श:... छान चालू आहे...
आजच सकाळी विचार डोकावून गेला मनात की एवढ्या पटापट पोस्टताय.. कदाचित लेखन तयार असावं, योगायोगानं विचारायच्या आधीच शंका निरसन करून टाकलंत... मी ही कादंबरी मायबोली या स्थळावर ऑनलाईन लिहीत असून रोज जेवढी लिहितो तेवढी प्रकाशित करतो. >> रोज डायरेक्ट छापणे म्हणजे
पण खरंच छान चालू आहे. खुप्प्प्प्प्प्प्प उत्सुकता आहे पुढे काय घडतंय त्याची... असंच पटापट टाका भाग प्लीज....
झक्कास............ पु.लेशु.
झक्कास............
पु.लेशु.
बेफिकिर, तुमच लेखन खुपच छान
बेफिकिर,
तुमच लेखन खुपच छान चालु आहे. वाचक कथेत गुंतत जावेत असा वेग तुम्हि ठेवला आहे. आणि वाट पहायला लावत नाहि या बद्दल विषेश आभार. दीपु आणि काजलची आता सगल्यांनाच काळजी लागुन रहिली आहे.
पण... होणार काहीतरी वेगळंच
पण...
होणार काहीतरी वेगळंच होतं!
टहेर्याची माशुका काजल टहेर्याला आली होती खरी..
पण आपल्या भावी सासूकडे तिला जावच लागणार होतं...
महुरवाडीला... >>>>>>
हे वाचून फार म्हणजे फार फार आनंद झाला...
एक खास सांगवसं वाटतंय तुम्हाला आज....तुमच्या कथेत एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी असते...त्यामुळेच ती वाचत असतांना 'पुढे काय घडणार?' यापेक्षा 'मनाला आनंद देणारं असं तुम्ही आता काय लिहिणार?' याची उत्सुकता जास्त असते...
आणि सुजा , अनुमोदन. मलाही पूर्ण खात्री आहे की बेफिकीर आज लिहून आज प्रकाशित करणार्यांपैकी एक आहेत...म्हणूनच त्यांच्या वेगाचं कौतुक वाटतं...ते स्वतःच्या आनंदासाठी लिहितात आणि वाचणार्यांना निस्सिम आनंद देऊन जातात...आजचा भाग त्यातलाच एक!
सर्वांच्या प्रेमळ
सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!
ड्रीमगर्ल, सुजा, प्रवीण २८, शिरीन व सानी,
आपल्या प्रतिसादांनी पुन्हा हुरूप आला.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अतिशय सुरेख चाललीये
अतिशय सुरेख चाललीये कादंबरी...सुजा ला १००% अनुमोदन्...इतके भाग झाले तरी आजिबात असं वाटत नाहीये की लवकर संपावी कादंबरी..उलट प्रचंड उत्सुकता लागते नेहमी
छ्या...भाग १४ आला नाही
छ्या...भाग १४ आला नाही अजून्!!...काहीतरी चुकल्यासार्खेच वाटते आजकाल्..'हाफ राईस दाल मारके ' वाचले नाही की..............
हो ना मी पन् वाट पाह्ते
हो ना मी पन् वाट पाह्ते आहे.....
आणि मी पण............
आणि मी पण............
मी पण
मी पण
simply superb.... मी सगळे भाग
simply superb.... मी सगळे भाग एकदम वाचुन काधले. खुप मजा आली. पुधच्या भागाची आतुरतेने वाट बघते आहे. please लवकर पोस्टा.
खरेच लवकर पोस्टा
खरेच लवकर पोस्टा
पुढचा भाग कधी येतोय... दोन
पुढचा भाग कधी येतोय...
दोन दिवसात कितीतरी वेळा बघुन गेले मी....
अगदी अगदी आधि बेफिकीर यांनी
अगदी अगदी आधि बेफिकीर यांनी रोज कथेचा नविन भाग वाचायला द्यायची सवय लावली. आणी आता ३ दिवस काहीच नाही.
आहत कुठे तुम्ही बेफिकीर?? दिपु च काय झाल पुढे??
पुढ्चा भाग प्लिज...... वाट
पुढ्चा भाग प्लिज...... वाट पाहातोय आम्हि......
पुढच्या भागाची आम्ही सर्व
पुढच्या भागाची आम्ही सर्व वाचक अतुरतेने वाट पाहतो आहे .....................तर...........प्लिज्................. पुढील भाग लवकर ...........लवकर..............येऊदे .
सर्वांचे आभार! उगाचच भाव
सर्वांचे आभार! उगाचच भाव खाण्यासाठी वेग कमी करण्याची माझी प्रवृत्ती नाही. खरे तर मिळणार्या प्रतिसादांमुळे मी स्वतःला सुदैवीच समजत आहे.
कनेक्शन नसल्यामुळे भाग लिहिलाच नव्हता. बहुधा आज लिहिता येईल.
प्रोत्साहनाचे अनेक आभार!
लवकर लिहा. हाफ राईस दाल मारके
लवकर लिहा. हाफ राईस दाल मारके नसल्या मुळे "ऊपासमार" होते आहे:-)
आजपण खुप वेळा चेक केले मी .
आजपण खुप वेळा चेक केले मी . लवकर टाका प्लीज.
हाफ राईस दाल मारके नसल्या
हाफ राईस दाल मारके नसल्या मुळे "ऊपासमार" होते आहे >>>> खरोखर खुप भुक लागलीय...
पुढचा भाग प्लीज
पुढचा भाग प्लीज