सारे तुझ्यात आहे...... एक स्वप्नवत् प्रवास !!

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 31 March, 2008 - 10:52

२० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम "सारे तुझ्यात आहे" हा प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झाला. ह्याचे संगीतकार आहेत आभिजीत राणे आणि गायक आहेत सुप्रसिद्ध देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर.

माझ्या या स्वप्नवत वाटणा-या प्रवासात मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींची प्रचंड मदत झाली. त्यांच्याच आग्रहास्तव माझा हा प्रवास मी पुन्हा एकदा जगणार आहे…. तुमच्यासोबत !

अभिजीत राणे कडे माझी कवितांची फ़ाईल अगदी सहज घेऊन गेले. राजेश (माझ्या बहिणीचा नवरा) होता सोबत. माझ्या मीटरमधे लिहिलेल्या कविता त्याच्या आईकडे दिल्यात. अभिजीतशी तर भेट सुद्धा झाली नाही. दुपारी साधारण ४ वाजले असतील आणि मग त्याबद्दल विसरुन मी भारत भेटीत जे सगळ्यात महत्वाचं कार्य असतं…….शॉपिंगचं त्यात बुडून गेले. दुस-या दिवशी काकू म्हणजे अभिजीतच्या आईचा फ़ोन आला…….तेव्हाही मी साड्‍यांच्या दुकानातच होते. काकू म्हणाल्या……
"अगं, तू आज जाते आहेस ना नागपूरला….. जायच्या आधी येऊन जाशील का थोडा वेळ? अभिजीतने चाली दिल्या आहेत तुझ्या चार कवितांना…… " आई गं……..मी तर चाटच पडले. फ़क्त चोवीस तासात या अभिजीतनं चक्क माझ्या चार कवितांचं गाण्यात रुपांतर केलं होतं. मी तर हरखलेच. लग्गेच राजेश ला फोन केला आणि त्याच्याकडे जायची वेळ ठरवली.

मनातलं कुतूहल आतच ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होते. शेवटी अभिजीतकडे पोचलो. उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. अभिजीतने त्याच्या गोड आवाजात एका पाठोपाठ एक अशी गाणी म्हणून दाखवलीत. ह्यावेळी राजेशने त्याची गाणी रेकॉर्ड केली होती. प्रत्येक गाण्यानंतर त्याला काय प्रतिक्रिया द्यावी कळेचना. इतक्या सुरेख चाली होत्या…..!! आता हे सगळं ऐकायला माझे पती अविनाश नव्हते त्यामुळे पुढे काय हे पण काही ठरवता येत नव्हतं. शिवाय अदितीच्या ऍडमिशनची पण धावपळ होती. अभिजीतला शेवटी सांगितलं…… की आपण काहीतरी नक्की करुयात पण काय आणि केव्हा हे मात्र ठरवायला तू आम्हाला वेळ दे. त्यालाही काहीच घाई नव्हती. रात्रीच्याच विमानाने नागपूरला जायचं होतं. मनात एक गोड हुरहुर सुरु झाली होती.

नागपूरला पोचल्यावर मात्र आम्हाला दुसरा काही विचार करायला वेळच नव्हता. ऍडमिशन चं महत्वाचं मिशन डोळ्यापुढे होतं. असाच एक आठवडा गेला. पुन्हा एकदा फ़ोन वाजला……….. अभिजीतचा Happy काहीशा कुतूहलानेच उचलला. "जयश्री….. अगं, अजून ४ गाणी झालीयेत" मी तर वेडीच व्हायची बाकी होते. त्याने फ़ोनवरच चाली ऐकवल्या. अगदी मनापासून आवडल्या होत्या. पुन्हा मुंबईत येईन तेव्हा तुला भेटते असं बोलून फ़ोन ठेवला. कशीबशी दाबून ठेवलेली हुरहुर पुन्हा जागी झाली. अवी सोबत नसल्यामुळे काहीच ठरवता येत नव्हतं. तगमग सुरु होती नुसती.

आम्ही एका आठवड्‍यासाठी पुन्हा एकदा कुवेतला जाणार होतो आणि परत येताना अवी सोबत असणार होते. जायच्या आधी आभिजीतला भेटायला गेले तर त्याची अजून ४ गाणी तयार होती. स्वारी एकदम फ़ार्मात होती त्याला अक्षरश: साष्टांग दंडवत घालावासा वाटला. कुवेतला गेल्यावर ह्यांच्याकडे विषय काढला. सध्या अदितीची धावपळ असल्याने हे बघूया असं बोललेत. मुंबईत गेल्यावर नागपूरला जायच्या आधी पुन्हा एकदा अभिजीतच्या घरी ह्यांना घेऊन गेले. आता सगळी मिळून चक्क १४ गाणी झाली होती. आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो. नागपूरचं काम आटोपून मग काय ते ठरवू असं बोलून आम्ही नागपूरला गेलो. अदितीची मनासारखी व्यवस्था करुन पुन्हा मुंबईत आलो.

आता निवांतपणा होता. शेवटी अल्बम काढूयात असं ठरलं. पण केव्हा……. हा एक मोठा प्रश्न होता. त्याला म्हटलं साधारण दिवाळी नाहीतर डिसेंबरमधे मी येण्याचा प्रयत्न करते. प्रशांत लळीत हा आभिजीतचा नेहेमीचा संगीत संयोजक. त्याला फ़ोन करुन विचारलं की तुला चाली करायला किती वेळ लागेल…. तो बोलला साधारण एका महिन्यात सगळं तयार होईल.

आता एक दिशा मिळाली होती एका मोठ्‍या प्रोजेक्टला आणि माझ्या स्वप्नाळू मनाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार जयुताई,

आज बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर येता आलं आणि पेजेस चाळता चाळता 'सारे तुझ्यात आहे..' दिसले. म्हटलं चला पाहुया तरी काय आहे हा स्वप्नवत प्रवास. पहिल्यांदा मला वाटलं की कोणीतरी कुठेतरी ट्रिपला वगैरे गेले असेल आणि त्याचा अनुभव लिहिला असेल. पण हा प्रवास तर भन्नाटचं निघाला. अनुभवाचं इतकं छान शब्दांकन मी कधीच वाचलं नव्हतं. तु तो प्रवास अक्षःरशा घडवुन आनलास. तुझ्या शब्दांमागचा प्रामाणिकपणा वाक्यावाक्याला दिसुन येतो. तुला असेच अनुभव येत राहोत आणि आम्हाला ते वाचायला मिळोत. लवकरच सी. डी. घेईन. तुला खुप खुप शुभेच्छा!

सारे तुझ्यात आहे. हे नावच मुळी हा अनुभव वाचयला आणि गाणी ऐकायला लावते. खरंच, मी पण आता लवकरच घेईन सीडी.खूपच सुरेख वर्णन!! तुमच्या अनुभवावरुन एकच कळते की..सारे आपल्यातच असते.. आणि ते ओळखून जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा शंभर मदतीचे हात पुढे येतात तुम्हाला सावरण्यासाठी..

मराठी वाचका, के महेन्द्रा, आशु........ मनापासून धन्यवाद Happy
सीडी ऐकल्यानंतर तुमचा अभिप्राय नक्की कळवा मात्र Happy

वाह मस्त.. तुझे लिखाण प्रतिक्रिया मधुन काढुन एक सलग लेख कर ना.. वाचायला सोप जाईल. बाकी खरच स्वप्नवत..
युट्युब वर ऐकली गाणी मस्त... बंगळुरात कुठे सीडी मिळेल का?

तुझे मना पासुन अभिनंदन.. अभिमान वाटतो तुझा... पुढिल उपक्रमांसाठी हार्दीक शुभेच्छा...

-सत्यजित,

सत्यजित...... मनापासून आभार Happy
बंगळुरात जरा कठीण आहे रे.... पुण्याहून मागवता येईल तुला.

मयूर... खूप खूप धन्यवाद....अरे तुझ्यामुळे मी सुद्धा पुन्हा दोन वर्ष मागे गेले......... Happy

Pages