सारे तुझ्यात आहे...... एक स्वप्नवत् प्रवास !!

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 31 March, 2008 - 10:52

२० मार्च २००८ ला मी लिहिलेल्या गाण्यांचा अल्बम "सारे तुझ्यात आहे" हा प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झाला. ह्याचे संगीतकार आहेत आभिजीत राणे आणि गायक आहेत सुप्रसिद्ध देवकी पंडित, वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर.

माझ्या या स्वप्नवत वाटणा-या प्रवासात मला माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींची प्रचंड मदत झाली. त्यांच्याच आग्रहास्तव माझा हा प्रवास मी पुन्हा एकदा जगणार आहे…. तुमच्यासोबत !

अभिजीत राणे कडे माझी कवितांची फ़ाईल अगदी सहज घेऊन गेले. राजेश (माझ्या बहिणीचा नवरा) होता सोबत. माझ्या मीटरमधे लिहिलेल्या कविता त्याच्या आईकडे दिल्यात. अभिजीतशी तर भेट सुद्धा झाली नाही. दुपारी साधारण ४ वाजले असतील आणि मग त्याबद्दल विसरुन मी भारत भेटीत जे सगळ्यात महत्वाचं कार्य असतं…….शॉपिंगचं त्यात बुडून गेले. दुस-या दिवशी काकू म्हणजे अभिजीतच्या आईचा फ़ोन आला…….तेव्हाही मी साड्‍यांच्या दुकानातच होते. काकू म्हणाल्या……
"अगं, तू आज जाते आहेस ना नागपूरला….. जायच्या आधी येऊन जाशील का थोडा वेळ? अभिजीतने चाली दिल्या आहेत तुझ्या चार कवितांना…… " आई गं……..मी तर चाटच पडले. फ़क्त चोवीस तासात या अभिजीतनं चक्क माझ्या चार कवितांचं गाण्यात रुपांतर केलं होतं. मी तर हरखलेच. लग्गेच राजेश ला फोन केला आणि त्याच्याकडे जायची वेळ ठरवली.

मनातलं कुतूहल आतच ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होते. शेवटी अभिजीतकडे पोचलो. उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. अभिजीतने त्याच्या गोड आवाजात एका पाठोपाठ एक अशी गाणी म्हणून दाखवलीत. ह्यावेळी राजेशने त्याची गाणी रेकॉर्ड केली होती. प्रत्येक गाण्यानंतर त्याला काय प्रतिक्रिया द्यावी कळेचना. इतक्या सुरेख चाली होत्या…..!! आता हे सगळं ऐकायला माझे पती अविनाश नव्हते त्यामुळे पुढे काय हे पण काही ठरवता येत नव्हतं. शिवाय अदितीच्या ऍडमिशनची पण धावपळ होती. अभिजीतला शेवटी सांगितलं…… की आपण काहीतरी नक्की करुयात पण काय आणि केव्हा हे मात्र ठरवायला तू आम्हाला वेळ दे. त्यालाही काहीच घाई नव्हती. रात्रीच्याच विमानाने नागपूरला जायचं होतं. मनात एक गोड हुरहुर सुरु झाली होती.

नागपूरला पोचल्यावर मात्र आम्हाला दुसरा काही विचार करायला वेळच नव्हता. ऍडमिशन चं महत्वाचं मिशन डोळ्यापुढे होतं. असाच एक आठवडा गेला. पुन्हा एकदा फ़ोन वाजला……….. अभिजीतचा Happy काहीशा कुतूहलानेच उचलला. "जयश्री….. अगं, अजून ४ गाणी झालीयेत" मी तर वेडीच व्हायची बाकी होते. त्याने फ़ोनवरच चाली ऐकवल्या. अगदी मनापासून आवडल्या होत्या. पुन्हा मुंबईत येईन तेव्हा तुला भेटते असं बोलून फ़ोन ठेवला. कशीबशी दाबून ठेवलेली हुरहुर पुन्हा जागी झाली. अवी सोबत नसल्यामुळे काहीच ठरवता येत नव्हतं. तगमग सुरु होती नुसती.

आम्ही एका आठवड्‍यासाठी पुन्हा एकदा कुवेतला जाणार होतो आणि परत येताना अवी सोबत असणार होते. जायच्या आधी आभिजीतला भेटायला गेले तर त्याची अजून ४ गाणी तयार होती. स्वारी एकदम फ़ार्मात होती त्याला अक्षरश: साष्टांग दंडवत घालावासा वाटला. कुवेतला गेल्यावर ह्यांच्याकडे विषय काढला. सध्या अदितीची धावपळ असल्याने हे बघूया असं बोललेत. मुंबईत गेल्यावर नागपूरला जायच्या आधी पुन्हा एकदा अभिजीतच्या घरी ह्यांना घेऊन गेले. आता सगळी मिळून चक्क १४ गाणी झाली होती. आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो. नागपूरचं काम आटोपून मग काय ते ठरवू असं बोलून आम्ही नागपूरला गेलो. अदितीची मनासारखी व्यवस्था करुन पुन्हा मुंबईत आलो.

आता निवांतपणा होता. शेवटी अल्बम काढूयात असं ठरलं. पण केव्हा……. हा एक मोठा प्रश्न होता. त्याला म्हटलं साधारण दिवाळी नाहीतर डिसेंबरमधे मी येण्याचा प्रयत्न करते. प्रशांत लळीत हा आभिजीतचा नेहेमीचा संगीत संयोजक. त्याला फ़ोन करुन विचारलं की तुला चाली करायला किती वेळ लागेल…. तो बोलला साधारण एका महिन्यात सगळं तयार होईल.

आता एक दिशा मिळाली होती एका मोठ्‍या प्रोजेक्टला आणि माझ्या स्वप्नाळू मनाला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन!!!! छान लिहिते आहेस. पण हा प्रवास अजून अपूर्ण आहे ना? म्हणजे लिहायचं बाकी आहे ना अजून?

अल्बम कुठे वाचायला आणि प्रसिद्ध झाला असेल तर खरेदी करायला मिळेल का? किंवा सीडी वगैरे खरेदी करायचे ठीकाण?

कृपया मी आताच ही बातमी वाचली तेव्हा काही कल्पना नाही आहे ह्याबद्दल आधी काही प्रकाशीत असेल तर.

मनु..... अगं महाराष्ट्रात सगळीकडे मिळेल. आणि परदेशात रहाणार्‍यांसाठी..... मायबोलीवरही उपलब्ध करणार आहोत.

कुवेतला परत आल्यावर मनात सगळे हेच विचार सुरु होते. अभिजीतने प्रशांत लळीतशी ओळख करुन दिली. ऑर्कुटवर प्रशांतशी मस्त गट्टी झाली. बोलता बोलता असं लक्षात आलं की ही सगळी फ़ार ग्रेट मुलं आहेत. एकदम जबरदस्त कलाकार मंडळी. इतके उच्च कलाकार असूनही खूप साधे. डिसेंबर पर्यंत आम्ही सगळे एकमेकांचे चांगले मित्र झालो. आता ह्या कामात मज्जा वाटायला लागली.

सगळ्यात मोठं काम होतं ते गाणी निवडण्याचं. १४ सुंदर चालींमधून ८ गाणी निवडणं सोपं नव्हतं. आम्ही त्यावर खूप चर्चा केली. अभिजीतला आवडणारी आठ गाणी, प्रशांतला आवडलेली आणि मला आवडलेली अशा याद्या केल्यात. त्यातली कॉमन गाणी निवडलीत. देवकी पंडित, वैशाली सामंत ह्या दोन गायिका आधीच निश्चित केल्या होत्या. पण अल्बम मधे फ़क्त गायिकाच असणं कदाचित एकसुरी वाटू शकतं म्हणून एक पुरुष गायक हवा होता. पहिला आमचा चॉईस अभिजीतच होता आणि त्यानंतर स्वप्निल बांदोडकर. पण अभिजीतला ह्यावेळी फ़क्त संगीतकाराच्याच भूमिकेत बागडायचं होतं......त्यामुळे स्वप्निल बांदोडकर हे नाव निश्चित झालं. आता अजून एक प्रश्न होता. निवडलेल्या गाण्यांमधे फ़क्त एकच गाणं पुरुषाचं होतं. मग एक युगल गीत का असू नये...... असा विचार मनात आला. तो प्रशांत आणि आभिजीतला पटला सुद्धा. ओला वारा हे गाणं आधी फ़क्त वैशाली साठी ठरवलं होतं.... त्याच गाण्याचं युगलगीत केलं.

आता आठही गाणी नक्की झाली होती. चार गाणी देवकीताईंची, एक सोलो स्वप्निल चं, दोन सोलो वैशालीची आणि एक युगल गीत वैशाली आणि स्वप्निलचं. माझी भारतात जायची तारीख सुद्धा ठरली. इकडे आभिजीत आणि प्रशांत ने देवकीताई, स्वप्निल आणि वैशाली शी बोलून त्यांचा होकार मिळवला होता आणि तारखाही निश्चित झाल्या. अंधेरीचा बझ-इन स्टुडियो निवडला होता ध्वनिमुद्रणासाठी. मी २० दिवसांसाठी भारतात जाणार होते. सगळं रेकॉर्डिंग वगैरे आटोपून जमलंच तर काही म्युझिक कंपनींना भेट देणार होते. जर छानशी ऑफ़र मिळाली तर कॉन्ट्रॅक्ट साईन करुनच येणार होते. नाहीतर मग पुन्हा जूनमधल्या भारत भेटीत नव्या जोमाने कंपन्यांकडे जाणार होते. माझा मुलगा अद्वैत कुवेतला पप्पांसोबत एकटा रहायला एका अटीवर तयार होता आणि ती म्हणजे त्याच्या वाढदिवशी म्हणजे २७ जानेवारीला मी परत कुवेतला यायला हवी. त्यावेळी त्याला "हो" म्हणताना मला पूर्ण कल्पना होती...... मी त्याला फ़ार दुखावणार होते.

शेवटी मी ६ जानेवारीला कुवेतहून डोळ्यात खूप सारी स्वप्नं आणि प्रचंड कुतूहल घेऊन निघाले. माझ्या आयुष्यातल्या एका सुरेल प्रवासाला निघाले होते. ७ ला सकाळी पोचले. आता माझा मुक्काम होता माझ्या नणंदेकडे.....चेंबूरला. माझ्या ह्या प्रोजेक्ट मधे माझी नणंद अर्चना आणि तिचा नवरा प्रकाश माझ्याइतकेच उत्सुक होते. कारण सगळ्यांसाठीच हा एक वेगळाच अनुभव असणार होता.

थोडा आराम केला...... अभिजीतचा फ़ोन आलाच. ८ पासून स्टुडिओ बुक केला होता. आम्ही ८ आणि ९ तारखेला सगळे ट्रॅक्स तयार करणार होतो. प्रशांतने सगळी अगदी चोख तयारी करुन ठेवली होती. ७ ला रात्री माझी पण तयारी सुरु होती. माझा डिजीटल कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा दोन्ही चार्ज करुन ठेवलेत. पूजेसाठी नारळ, हार, पेढे...... !! सकाळी साडे दहाला स्टुडिओत पोचायचं होतं. मी नणंदेच्या सासूबाईंना नमस्कार करुन, त्यांचे आशीर्वाद घेऊन सकाळी साडे आठला निघाले. आभिजीतकडे ९ ला पोचले. तिकडून सरळ पार्ला.....बझ-इन !

छातीत धडधड होत होती.....कसा असेल स्टुडिओ..... कसं करत असतील काम..... एकीकडे खूप खूप आनंद आणि तितकीच उत्सुकता. ११ वाजेपर्यंत सगळे जमले. सगळ्यात पहिले प्रशांत आपले दोन कीबोर्ड्स घेऊन आला. त्याच्या पाठोपाठ अभिजीत नार्वेकर, विजय शिवलकर आणि भीमराव मोहिते ही ताल वाद्यांमधली दादा मंडळी आपापली आयुधं घेऊन पोचलीत. सगळ्यांशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत सगळे मनापासून आवडलेत. आत गेल्यावर भेटले रेकॉर्डीस्ट सत्यजीत चिखले. त्यांनीही छान स्वागत केलं सगळ्यांचं. ह्या सगळ्या लोकांमधे फ़क्त मीच नवखी होते. फ़क्त अभिजीत ओळखीचा होता आणि प्रशांतशी ऑर्कुटवर जी काय थोडीफ़ार ओळख होती तीच. पण ह्या सगळ्या कलाकारांनी मला अजिबातच नवखेपणा जाणवू दिला नाही.

आल्या-आल्याच माझे शब्द त्यांना खूप आवडले आणि चालीही छान आहेत हे त्यांनी अगदी मनापासून सांगितलं त्यामुळे माझी भीड जरा कमी झाली. तशी मी बडबडीच म्हणायला हवी. कोणाशीही मी मस्तपैकी गप्पा हाणू शकते. पण इथे ही मंडळी फ़ारच वेगळी होती. पण फ़ार फ़ार तर १५-२० मिनिटांचंच होतं हे अवघडलेपण. मग मस्तपैकी हा हा-ही ही ..... खिदळणं सुरु झालं.

विजय शिवलकरांनी नारळ फ़ोडून मुहूर्त केला. मग पूजा करुन, सगळ्यांना पेढे वाटले. सुरवात तर गोड झाली Happy

मला इतकी उत्सुकता होती ना.... की गाणं बनतं कसं....? माझ्या डोळ्यात इतके सारे प्रश्न बघून प्रशांत म्हणाला," अगं, जरा धीर धर. आता तुझ्याच समोर घडणार आहेत तुझी सगळी गाणी" मी माझा कॅमेरा घेऊन तयार झाले. एका वेगळ्याच विश्वात मी पाऊल टाकलं होतं. समोर जे काही घडणार होतं ते माझं एक स्वप्न.... प्रत्यक्षात उतरणार होतं.

प्रशांत ने "धुंद तेच चांदणे" पासून सुरवात केली. त्याने त्याच्या कीबोर्डवर सिक्वेन्सिंग केलं होतं म्हणजे गाणं कसं सुरु होणार.... कुठे कुठे कोणची वाद्यं वाजणार.... मधले पीसेस.... आणि तो कॉर्ड्स देऊन त्यावर अभिजीत गाणार होता. ह्याला "क्यु ट्रॅक" म्हणतात. म्हणजे गाण्याचं बेसिक फ़्रेमवर्क. एका पाठोपाठ एक असे सगळ्या गाण्यांचे क्यु ट्रॅक्स बनलेत. मग सुरु झाली ताल वाद्यांची करामत. अभिजीत नार्वेकर हा आमचा ताल संयोजक होता. एकेक गाणं घ्यायचं आणि त्यात तबला, ढोलक, डफ अशी मुख्य ताल वाद्यं टाकायची. ह्यात प्रचंड मेहेनत असते. प्रत्येक वाद्याचं नोटेशन असतं. विजय ते लिहून घेत होता आणि भीमराव वाजवत होते. असं करत करत प्रत्येक पीस ठरला. तबला विजय आणि भीमराव दोघेही वाजवत होते. म्हणजे थोडक्यात दोन तबले एकाच वेळी वाजणार होते. ह्यात प्रचंड सिन्क्रोनायझेशन हवं. ही जोडगळी एकदम जबरी होती. एकाच फ़टक्यात त्यांचे टेक्स होत होते. मधे मधे त्यांची चर्चा...... नेहेमी पेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं.

मग झाले मनिष कुळकर्णीचे आगमन. मुंबईचा नंबर वन बेस गिटार वादक. प्रत्येक गाण्याच्या आधी सगळे आम्ही असे गोल करुन बसायचो......अभिजीत गायचा...... प्रशांत मधले पीसेस तोंडानेच बोलून दाखवत होता आणि अभिजीत नार्वेकर, विजय आणि भीमराव....... त्यात आपापली भर टाकत होते. मनिषचे गिटारचे वेस्टर्न सूरही होतेच साथीला मला तर काय काय साठवून घेऊ आणि काय काय नको असं झालं होतं. माझ्या कॅमे-यात जेवढं काही टिपता येईल तेव्हढं टिपून घेत होते.

अचानक एक खूप छान सरप्राईज मिळालं....... देवकाका मला भेटायला आले होते. त्यांना असं अचानक बघून खूप आनंद झाला. देवकाकांना पहिल्यांदाच भेटत होते. मला भेटायला ते मुद्दाम इतक्या दुरुन आलेत.......खूप छान वाटलं.

दुपारचे ३ वाजले....तेव्हा सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली. बझ-इन स्टुडियो मधला छोटा आणि चुणचुणीत मुकेश आमची खूप काळजी घेत होता. चहा, खाणं सगळं तोच बघत होता. आम्ही सगळ्यांनी जेवणावर मस्तपैकी ताव मारला. हसत खेळत जेवणं झाली. मला कुठेही मी इथे वेगळी आहे असं जाणवलं नाही किंबहुना कोणीच मला तसं जाणवू दिलं नाही. कित्येक दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही वावरत होतो. माझा कॅमेरा पण सुरुच होता.

जेवणानंतर पुन्हा एकदा उत्साहाने सगळे गाण्यात, वाद्यात बुडाले. रात्रीचे ९ वाजले तशी माझी बॅटरी डाऊन व्हायला लागली. पण बाकी लोकांच्या उत्साहात किंचितही फ़रक पडला नव्हता. ते तितक्याच जोमाने काम करत होते. मला माझीच लाज वाटली. मला बसल्या बसल्या दमायला काय झालं..... ! असं करता करता रात्रीचे चक्क १२.३० झालेत. मग मात्र माझी हालत बघून प्रशांत बोलला....... "तू निघ आता..... उद्या पुन्हा सकाळी ९ वाजेपासून यायचंय. आम्हाला अजून वेळ लागेल." माझा खरं तर तिकडून पाय निघत नव्हता. पण शरीर खरोखरच थकलं होतं. प्रकाश चेंबूरहून मला घ्यायला आले होते. मी माघार घेऊन घरी परतले. जाताना एक प्रचंड मोठी चूक करुन बसले. त्याची फळं भोगावी लागली दुस-या दिवशी.

खरोखर खुप छान वर्णन केलेत तुमच्या या स्वप्नवत प्रवासाचे. परंतू तुम्ही हे सर्व प्रतिसादमध्ये का लिहिता? लिहा लिहा आम्ही आहोतच शोधुन काढायला व वाचायला. लवकर लिहा काय चुक केली ते.

अरे वा! आली की इकडे लगेच. धन्यवाद.
-लालू

झक्कास लिहितेयस.
हे कविता लिहिणं, हे ध्वनिमुद्रण, ते चित्रण, हा एकूणच प्रवास... हा एक नुस्ता एकच मोठ्ठा ठेवा न होता... पुढल्या अशा अनेक यशस्वी ट्प्प्यांसाठी पाथेयही व्हावे, जया बाई!
आगे बढो. (म्हणजे पुढे लिही लवकर लवकर असही म्हणायच मला :))

धन्यवाद !
सायोनारा, मनु, किशोर, लालु, दाद....... आभार दोस्तांनो....!
लिहितेय पुढचा भाग... Happy

.....५

आदल्या दिवशी मी माझे दोन्ही कॅमेरे तिथेच ठेवून गेले होते कारण दुस-या दिवशी पुन्हा सकाळीच यायचं होतं. ती माझी मोठ्ठी चूक होती हे दुस-या दिवशी कळलं. दुस-या दिवशी सगळ्यात पहिले प्रसिद्ध संतूर वादक पं. उल्हास बापट येणार होते. म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो. त्या दिवशी नेमका ट्रॅफिक जॅम. आम्ही साडे नऊच्या ऐवजी ११ ला पोचलो. तोपर्यंत उल्हासजींचं बरचंसं रेकॉर्डींग आटोपलं होतं. आम्हाला जेमतेम १५-२० मिनिट त्यांचं वाजवणं बघायला मिळालं. इतकी चिडचिड झाली ना.....! मधे थोडा वेळ ब्रेक झाला तेव्हा मी माझे कॅमेरे कुठे आहे म्हणून विचारलं तर ते कुणालाच माहीत नव्हतं. माझं तर धाबंच दणाणलं. कालचं संपूर्ण रेकॉर्डींग आणि यापुढे होणारं सगळं....... कसं करणार मी.........मला तर रडूच यायला लागलं. माझी ती अवस्था बघून उल्हासजी म्हणाले..... "अगं, तू नंतर माझ्या घरी ये वाटल्यास.....आपण पुन्हा करुयात रेकॉर्ड". माझं मनच लागेना. इथे सगळं घडत असताना रेकॉर्डींग करणं आणि नंतर बळेबळे केलेलं ह्यात खूपच फ़रक होता. उल्हासजींचे संतूर वाजवताना होणारे आविर्भाव, आमच्या सगळ्यांचं ते साठवून घेणं..... हे नंतर कसं अनुभवणार? मी माझ्यावरच चिडले. शेवटी प्रशांतकडून कळलं की काल तालवाद्यांसोबत माझी कॅमेरा असलेली स्ट्रॉलर सुद्धा अभिजीतच्या माहीमच्या रुमवर गेली होती. म्हणजे तिकडे जाऊन आम्ही ती आणेपर्यंत उल्हासजी निघून जाणार होते....मी अगदीच रडवेली झाले होते. शेवटी उल्हासजी म्हणाले," तुझ्या मोबाईल मधे करुयात रेकॉर्डींग" त्यांनी पुन्हा बैठक घेतली आणि आमच्यासाठी पुन्हा एकदा सूरांची सफ़र घडवली. ते गेल्यावर मात्र मी आणि अभिजीत लग्गेच माहीमला जाऊन कॅमेरे घेऊन आलोत.

आज निरनिराळे वादक येणार होते त्यामुळे खूप उत्सुकता होती. सुरवातीला आले संदीप कुळकर्णी, प्रसिद्ध बासरी वादक. आपल्या सूरांच्या भात्यामधून त्यांची स्वरनिर्मिती ऐकताना, बघताना....... एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटलं. प्रत्येक गाण्यावर एक वेगळाच रंग चढत गेला.

त्यानंतर आले शुक्लाजी. त्यांची सतार सगळ्यांवर कळस होती. संदीपजी आणि शुक्लाजी ह्यांची जुगलबंदी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती. त्यांनी वाजवलेली हार्प तर अविस्मरणीय ! एकेका वाद्याच्या दालनात एकेक अद्भूत सफ़र घडत होती...... त्याची साक्षीदार होण्याचा मला सन्मान मिळाला होता. हे सगळं माझ्या शब्दांसाठी घडत होतं...... ही जाणीवच फ़ार सुखद होती.

त्यानंतर आले मंचेकर. क्लॅरिनेट वादक. हे वाद्य मी पहिल्यांदाच वाजवताना बघत होते. लावणीच्या सूरात सूर मिसळून त्यांनी अगदी डोलायला लावलं. संदीपजींसोबतचे त्यांचे लावणीतले पीसेस ऐकताना जाम धम्माल आली.

सगळ्यात शेवटी आलेत महेश खानोलकर. हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध व्हायोलीन आणि स्वरलीन वादक आहेत. "हुंदका साधा तुझा" आणि "तुझा हळवा पाऊस" ह्या दोन गाण्यांमधे त्यांनी अक्षरश: बहार आणली. अतिशय संवेदनशील अशा ह्या दोन वाद्यांनी एकाचवेळी डोळ्यात आसू आणि हसू आणले.

वेळेकडे कोणाचंच भान नव्हतं. एकेक सुरांचा जादूगार येत होता आणि जादूची छडी फ़िरवून जात होता.... आम्ही त्या सूरांमधे नखशिखान्त न्हाऊन निघत होतो. अतिशय तॄप्त दिवस संपला होता.

अभिनंदन गाण्याच्या सिडीबद्दल !
जयवी, कधितरी गाण्याचे रेकॉर्डींग बघायला मिळावे असे मनात होते. ते तू खूपच छान वर्णन केले आहेस.

.....६

दोन दिवसांमधे जवळजवळ सगळे ट्रॅक्स तयार झाले होते. फ़क्त मनिषचं मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचं काम बाकी होतं. आता वेध लागले होते वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर ह्यांच्या रेकॉर्डींगचे. ह्यावेळचं रेकॉर्डींग बझ-इनच्याच दुस-या स्टुडिओत होतं. इथला रेकॉर्डीस्ट होता सौरभ काजरेकर. अतिशय हसतमुख मुलगा.

स्वप्निल सकाळी साडे नऊला पोचलेत. आम्हाला प्रचंड कुतूहल होतं की स्वप्निल कसे गातात. सगळ्यात पहिले अभिजीतने त्यांना गाणं ऐकवलं. त्यांनी अगदी मनापासून दाद दिली.....शब्दांना आणि सुरावटीला. गाण्याचं रेकॉर्डींग करताना त्यांचे असे काही आविर्भाव होत होते ना......... की मला रेकॉर्ड करु की त्यांना बघू की त्यांना ऐकू.........काही सुचेनाच. सगळे म्हणत होते, अगं जरा दमानं.... जरा बस आता...." पण मला दुसरं काहीच सुचणार नव्हतं. समोर इतकं काही घडत असताना..... कोणाला कसं स्वस्थ बसवेल ? स्वप्निलजींना ऐकणं जेवढं सुखद आहे त्यापेक्षाही जास्त ते गातांना बघणं हा एक जबरदस्त अनुभव आहे. ते समोर गात असताना तुमची दृष्टी त्यांच्यावरुन हलूच शकत नाहीत. आधी "ओला वारा" गाणं झालं. त्याचे सूर मनात साठवून घेतो आहोत तोच दुस-या गाण्याची वेळ आली. हे शिर्षक गीत " सारे तुझ्यात आहे" ह्या गाण्याबद्दल काय लिहू मी.....इतकं अप्रतिम गायलेत ना स्वप्निलजी....... की माझे शब्द अगदी धन्य धन्य झालेत. गाण्यात पूर्णपणे बुडून......स्वत:ला हरवून...... आई गं.... मी तर पारच हरवून गेले होते. हसत खेळत रेकॉर्डींग करुन आम्हाला त्यांच्या सूरांवर रेंगाळत ठेवून ते निघूनही गेलेत.

वैशाली १ वाजता येणार होती. तोपर्यंत आम्ही आमचं जेवण आटोपलं. आपल्या आवाजाची मोहिनी जनमानसावर गाजवणारी वैशाली सामंत खूपच गोड आणि हसरं व्यक्तिमत्व आहे. आल्यापासूनच तिने वातावरण अगदी हलकं-फुलकं केलं होतं. हिची रेकॉर्डींगची पद्धत स्वप्निल पेक्षा वेगळी होती. ही संपूर्ण गाणं शिकून मग एकाच टेकमधे गायली आणि नंतर करेक्शन्स केलेत. पूर्ण गाणं ऐकून त्या गाण्याच्या मूडमधे जाऊन ती ते गात होती. अतिशय तयार आवाज आणि लाघवी व्यक्तिमत्व Happy

वैशालीची एकेक गाणी होत होती आणि सोबतच तिच्या अतिशय साध्या स्वभावाचं आम्हाला अगदी जवळून दर्शन होत होतं. रेकॉर्डिंग झाल्यावर तिने इतक्या सहज पणे मला विचारलं की आता आपल्या अल्बम बद्दल तुझा काय प्लॅन आहे पुढचा....? तिचं ते "आपला अल्बम" असा उल्लेख करणं मनाला अगदी स्पर्शून गेलं. ही इतकी मोठी गायिका इतक्या साधेपणाने विचारत होती पुढचे प्लॅन. मग मी तिलाच विचारलं की काय करायला हवंय. तिने खूप चांगलं मार्गदर्शन केलं. पुढे फ़ाऊंटन म्युझिक कंपनीच्या कांतिभाईंशी तिनेच माझी भेट घडवून आणली. वैशालीसारख्या इतक्या मोठ्‍या पण अतिशय साध्या आणि गोड कलाकाराला भेटून खूप खूप आनंद झाला.

माझा प्रवास अगदी राजमार्गावरुन होत होता. वाटेत भेटणारी सगळीच माणसं अगदी मनापासून मदत करत होती माझ्या पुढच्या प्रवासाला...... !

वैशालीचं रेकॉर्डिंग झाल्यावर प्रशांत म्हणाला की आपण कोरसचंही रेकॉर्डिंग आजच करुयात. दीपा बर्वे आणि भाग्यश्री महाजन ह्या दोघी बहिणी कोरस गायला आल्या. सोबत अभिजीत, प्रशांत आणि मी. आम्ही पाच जणांनी मिळून कोरस गायला. धम्माल आली अगदी.....!! कोरस का होईना.....मला स्टुडिओत गायला मिळालं........ह्याचाच जास्त आनंद झाला.

दिवसभराचा शीण ते सगळं रेकॉर्डिंग ऐकताना कुठल्या कुठे पळाला.

साव्यसाची, धन्यवाद....!!
अरे हे लिहिताना मला पण पुन्हा त्या जगात फिरुन आल्यासारखं वाटतंय रे Happy

अभिनंदन. छान वर्णन केले रेकॉर्डिंगचे. परंतु शेवटचे ५ व ६ हे भाग खुपच पळवले तुम्ही. आता गाणी ऐकायला आणखी मजा येईल. धन्यवाद.

जयुताई, किती छान वाटतेय ही सफर.
असा सुखाचा प्रवास पुनः पुन्हा घडु दे.

क्या बात है. ह्या सफरीमुळे आमच्या सारख्यांना रेकॉर्डींग कसे होत हे पण कळतयं.

......७

आता थोडं थोडं काम बाकी होतं ट्रॅक्स चं. मनिषचे मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचे पीसेस राहिले होते. देवकीताईंची तारीख २० जानेवारी होती. आम्हाला मधे भरपूर वेळ होता. ह्या दिवसात मी आणि अभिजीत नं बाकीची कामं केलीत. म्हणजे अजून कुठल्या कंपन्या आहेत.....त्यांची नावं, फ़ोन वगैरे ची जमवाजमव केली. माहीमच्या अभिजीत नार्वेकर च्या खोलीत कमालीची निर्मिती होत असते. हे तालवाद्यातले उस्ताद लोक ह्या खोलीत नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांच्याच संदेश हाटे नावाच्या मित्राशी ओळख झाली. हा कीबोर्ड तर वाजवतोच पण स्वत: संगीत संयोजनही करतो. ह्या संदेशची आम्हाला प्रचंड मदत झाली. त्याच्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग तर झालाच पण त्याच्यातल्या माणुसकीचा पण फ़ार जवळून परिचय झाला.

एक दिवस मनिषचे मेंडोलीन आणि इलेक्ट्रीक गिटारचे पीसेस झालेत दुस-या दिवशी बेस गिटारचे व्हायचे होते. पण काहीतरी प्रॉब्लेम होत होता. कसलातरी आवाजही रेकॉर्ड होत होता. सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले पण त्या दिवशी काही जमलंच नाही. मनिषची डोंबिवली पासून माहीम पर्यंतची चक्कर वाया गेली. दुस-या दिवशी तो दुसरी गिटार घेऊन आला...... तरी तोच प्रॉब्लेम. कुणाला काहीच कळेना काय होतंय. मग बझ-इन मधे रेकॉर्ड करायचं ठरलं.... पण स्टुडिओ रिकामा नव्हता. आता काय करावं...... कारण मनिषला बाहेर कार्यक्रम होता. आजच रेकॉर्डींग व्हायला हवं होतं. तेवढ्यात संदेशचा फ़ोन आला की तो चहा आणि पोहे घेऊन येतोय आमच्यासाठी. आता काय म्हणावं अशा दोस्तांना. इतकी मनापासून काम करत होती ना ही मुलं माझ्यासाठी.....मलाच गहिवरल्यासारखं झालं. त्यावेळी संध्याकाळचे ७ वाजले होते.

प्रशांतला ऑडिओजेनिकच्या अविनाश मोनेंची आठवण झाली. त्यांना फ़ोन केला तर त्यांचा स्टुडिओ रिकामा होता. आम्ही आमचा सगळा डेटा घेऊन तिकडे पोचलो. पण तिथे गेल्यावर कळलं की आमचा डेटा न्युएंडो-३ मधे आहे आणि ते न्युएंडो-२ वापरतात. काही काही फ़ाईल्स त्यांच्याकडे उघडेचनात. आली पंचाईत. मग संदेश पुन्हा धावून आला मदतीला. त्याने खटाटोप करुन फ़ाईल्स उघडल्या. अभिजीत पुन्हा माहीमला गेला......तिकडून पुन्हा डेटा पाठवला.... शेवटी सगळ्या फ़ाईल्स एकदाच्या उघडल्या. रेकॉर्डिंग सुरु झालं तेव्हा चक्क साडे नऊ झाले होते रात्रीचे. अविनाश मोने आपला स्टुडिओ बरोब्बर साडे-दहा ला बंद करतात अशी ख्याती आहे. पण त्या दिवशी त्यांनी आमच्यासाठी साडे अकरापर्यंत काम केलं. मनिष सुद्धा अगदी न कंटाळता रेकॉर्डींग करत होता. मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार मी.........म्हणूनच इतकी जीव तोडून ही सगळी मंडळी माझं काम करत होती.

किशोर, चिन्नु, केदार..... अरे मला पण हे पहिल्यादाच अनुभवायला मिळत होतं.... !!
तुम्ही लोक वाचताहात ना.... अजून आहे पुढे खूप Happy

हो तर. मी चातकासारखी वाटच पाहत असतो. असे अनुभव खुपच प्रेरणादायी असतात. शुन्यातुन सारे काही निर्माण करणे म्हणजे काही सोपे नाही. येणार्‍या अडचणी फार अनपेक्षीत असतात. तुमचे ते फाईल ओपन न होणं वगैरे अनुभव फारच मनाला दु:ख देतात. आपल्या चेहर्‍यावर निराळेच चिंतेचे भाव असतात परंतु यातील पारंगत मंडळी मात्र सहज वावरत असतात. खरोखर अशी माणसेही भेटणे म्हणजे तुमचे भाग्यच. असेच लिहित रहा पण भरपुर.

तुम्ही लोक वाचताहात ना.... अजून आहे पुढे खूप

जया ! वाचतो आहोतच शिवाय ,आम्हालाहि हि वेगळि सफर घडतेय... पुढे लिहि कि..

जया,

छान चालू आहे... ते सारं पुन्हा इथे जगताना (लिहीताना) तुला अधिक nostalgic झाले असेल...:) तुझ्या energy level ची दाद द्यावी लागेल.. खूप धावपळ अन खटाटोप केलेस. आता ही वाट्चाल थाम्बवू नकोस. अशीच यशस्वी होत रहा आणि आम्हाला तुझ कौतूक भरभरून करण्याची सन्धी देत रहा!

जयावी,

परवाच मी "सारे तुझ्यात आहे" ची सीडी विकत घेऊन (पूनम कडून विकत घेतली) ऐकली. मस्त आहेत गाणी. एकापेक्षा एक सरस आहेत. आणि मुख्य म्हणजे, त्या त्या गायकांनी गाण्यांना पुर्णपणे न्याय दिल्याचे पदोपदी जाणवतय. खुपच आवडली मला सगळी गाणी. एखादं दुसरं गाणं बेस्ट म्हणून वेगळं काढताच येणार नाही, कारण सगळीच गाणी बेस्ट जमली आहेत. तू लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला नादमय न्याय देण्याचं काम या गायकांनी केलं आहे.

त्याच प्रमाणे, मला अजून आवडलेली गोष्ट म्हणजे शब्दरचना. केवळ अप्रतिम. आपली मराठी भावगीतं ही शब्दप्रधान असतात. तू लिहिलेली गाणी ही मला त्याच पठडीतील भासली. केवळ शब्दापुढे शब्द जोडून कविता होत नाही, तर त्या शब्दरचनेला एक गेयता, एक अर्थ असावा लागतो. तो या कवितांमधून प्रामुख्याने खुलून आला आहे. केवळ कविता म्हणून गुणगुणायला पण तितकीच मजा आली. खरच सांगतो, गाणं हा काही माझा प्रांत नाही, पण या कविता गुणगुणायचा प्रयत्न मी केला.

तर अशा कविता लिहिल्याबद्दल आणि त्यांचा असा सुरेख अल्बम काढल्याबद्दल तुला आणि तुझ्या सगळ्या टीम चे मनापासून हार्दिक अभिनंदन.

--
अरूण

तहे दिल से शुक्रिया Happy

किशोर, प्राजक्ता, योग, अरुण...... तुम्ही इतक्या उत्सुकतेने हा प्रवास वाचताय्........ खूप आनंद झाला रे !! मला वाटलं ही माझीच एक्साईटमेंट आहे फक्त. पण तुम्हीही तितक्याच आतुरतेनी वाट बघताय्......सगळं भरुन पावलं रे Happy

अरुण..... इतक्या सविस्तर अभिप्रायाबद्दल मनापासून आभार Happy तुला सांगू...... आपण जेव्हा एखादा मोठा प्रकल्प हातात घेतो ना तेव्हा आपल्यापुढे खूप सारे प्रश्नचिन्ह असतात. पण आपण जेव्हा त्या प्रश्नाच्या जवळ पोचतो तेव्हा असं जाणवतं की हा प्रश्न नव्हताच मुळी..... तो कधीचाच सोडवला गेलाय. असेच अनुभव येत गेले. पुढचं पाऊल टाकायच्या आतच पुढली वाट समोर तयार होत गेली.

ह्या प्रकल्पाने आम्हाला अगदी परिपूर्ण समाधान दिलं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या ना माझ्या सोबत Happy

.....८

आता फ़क्त देवकीताईंचं रेकॉर्डींग राहिलं होतं आणि मग मिक्सिंग. देवकीताईंचं रेकॉर्डिंग रविवारी होतं. देवकीताई यायच्या आधी आम्ही माझं काव्यवाचन रेकॉर्ड केलं. लग्नाआधी केलेल्या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमानंतर इतक्या दिवसांनी प्रथमच स्टुडिओत उभी होते. मनासारखं झालं हे ही काम Happy

पप्पा म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे सुद्धा मुद्दाम आले होते रेकॉर्डिंग बघायला. देवकीताईंचं गाणं ऐकायला मिळणं हिच फ़ार मोठी गोष्ट होती. आम्ही सगळेच फ़ार उत्सुक होतो. अभिजीत तर फ़ारच उत्साहात होता..... त्याने कंपोझ केलेली गाणी आज देवकी पंडित गाणार होत्या.

बारा वाजता त्या आल्यात. त्या आल्यावर वातावरण थोडंसं गंभीर होतं.....पण त्यांनीच तो तणाव दूर केला. त्यांचं गाणं ऐकून अक्षरश: अंगावर काटा येत होता. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. माझ्या आयुष्यातला एक अतिशय मोलाचा क्षण होता हा. आम्हाला आपल्या स्वरमोहिनीत गुंतवून देवकीताई जेव्हा गेल्या तेव्हा आम्ही भानावर आलोत.

आता मिक्सिंग. आम्ही ३० जानेवारीला स्टुडिओ घेतला होता मिक्सिंग साठी. मला त्याच संध्याकाळच्या विमानानं नागपूरला जायचं होतं. माझ्या नणंदेच्या नव-याचा वाढदिवस होता पन्नासाव्वा. मी सकाळी घरातून माझी पेटी घेऊनच निघाले. स्टुडिओत मिक्सिंग झाल्यावर तिकडूनच मी एयरपोर्ट वर जाणार होते. सत्यजीतनं एकेक गाणं करायला घेतलं. प्रत्येक गाण्यासोबत त्या त्या वेळच्या आठवणी जाग्या होत होत्या. आमची सगळी गाणी तयार झाली. थरथरत्या हाताने मी तो अनमोल ठेवा हातात घेतला. जे काही झालं होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता. अतिशय तृप्त मनाने मी नागपूरकडे जाणा-या विमानात चढले.

सीडीचं काम तर अगदी मनासारखं झालं होतं. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम होतं पुढे. कंपन्यांना भेटणं. वैशाली सामंतांना पुन्हा फोन केला. त्यांनी कबूल केल्याप्रमाणे फ़ाऊंटन म्युझिकच्या कांतिभाई ओस्वालांशी बोलून अपॉईंटमेंट ठरवली होती. मी दुस-याच दिवशी पुण्याला निघाले.

पुण्याला सकाळी ११ ला पोचले भावाकडे. कांतिभाईंना फ़ोन केला तेव्हा ते म्हणाले संध्याकाळी चार वाजता भेटूयात. मनातून आनंद तर झाला होता पण प्रचंड धडधड होत होती. पहिल्यांदाच असं काही काम करायला निघाले होते. जाताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि धडधडत्या अंत:करणाने फ़ाऊंटनच्या ऑफ़ीसमधे प्रवेश केला. अतिशय हसतमुख असलेल्या कांतिभाईंनी आमचं स्वागत केलं. छातीतली धडधड जरा कमी झाली होती. त्यांना मी माझी डेमो सीडी दिली. त्यांनी ती त्यांच्या ऑफ़ीसच्या म्युझिक सिस्टीमवर वाजवऊन बघितली. त्यांच्या चेहे-यावरुन काहीच कळत नव्हतं. पण सीडी संपल्यावर अगदी लग्गेच ते बोलले.....(माझे प्राण अगदी कंठाशी आलेले) " मला तुमची सीडी आवडली. आपण काढूयात तुमची सीडी" हे त्यांचे शब्द ऐकून माझा विश्वासच बसेना. सोबत माझा भाऊ प्रसाद होता. तो मला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता. मी अगदी जीवाच्या आकांताने चेहेरा शांत ठेवायचा प्रयत्न करत होते. त्यांनी दिलेली ऑफ़र ऐकून "तुम्हाला फ़ोन करते" असं सांगून बाहेर पडले.

बाहेर पडल्यावर लग्गेच अवी आणि अभिजीतला फ़ोन केला.....वैशाली सामंतला फ़ोन केला....ह्यांनी तिकडे विवेकला फ़ोन केला...... सगळ्यांचं म्हणणं हेच होतं..... कसलाच विचार करु नका. कॉन्ट्रॅक्ट साईन करा. त्यादिवशी शुक्रवार होता. भरपूर विचार करुन सोमवारी पेढे घेऊन कांतिभाईच्या ऑफ़ीसमधे गेले. कॉन्ट्रॅक्ट साईन केला.......तोंड आधीच गोड झालं होतं.... अतिशय समाधानाने परत मुंबईला निघाले. एका महिन्याच्या आत आपण अल्बम काढूयात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्णही केलं.

पुन्हा पुन्हा अभिनंदन. आता माझे काम मुंबईला गेल्यावर तुमचा हा अल्बम ऐकणे. छान मांडलात तुमचा अनुभव. पुढच्या वाटचालीला शुभेच्छा.

......९

कांतिभाईंशी भेट झाल्यानंतर दुस-या दिवशी पुण्यात "शाकाहारी रविवार" ह्या मायबोलीच्या गेट टू गेदर ला "वैशाली" मधे ब-याच मायबोलीकरांशी भेट झाली. मी पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत होते. इतक्या दिवसांच्या रुजलेल्या नात्याचं असं मूर्त स्वरुप...... खूप खूप आनंद झाला.

पुणं सोडून मुंबईला जाणा-या बसमधे मनात गोड आठवणी जागवत मी प्रवास करत होते. देवाने तुला जे काय हवं ते मिळो असं जणू काही वरदानच दिलं होतं मला ! जे जे मी इच्छित होते त्या सगळ्या मागण्या देव पुरवत होता. आजचा दिवस अगदी परिपूर्ण वाटत होता. अवीची खूपच आठवण येत होती. आज त्यांच्या भरवशावरच मी इतकं सगळं करु शकले होते. इतका चांगला नवरा दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले Happy

मुंबईत पोचले. आता माझ्याकडे पुढच्या हालचाली करायला फ़क्त २ दिवस होते. कांतिभाई एका महिन्यात सीडी काढणार होते. म्हणजे साधारण १० मार्च पर्यंत सीडी हातात येणार होती. मी २ दिवसांनी म्हणजे १५ फ़ेब्रुवारीला कुवेतला परत जाणार होते. त्या दिवसातच हॉल वगैरे बघून सीडी प्रकाशनासाठी नक्की करावा लागणार होता. तिकडे माझ्या अद्वैतची वार्षिक परिक्षा १६ मार्चला संपणार होती म्हणजे प्रकाशनाची तारीख त्यानंतरच ठरवावी लागणार होती. माझे सगळे नातेवाईक मुंबईला कार्यक्रमाला येणार म्हणजे त्यांच्या सोयीनेच तारीख ठरवावी लागणार होती.

अभिजीत होताच सोबत. ह्या अभिजीतची पण कमालच म्हणायला हवी. हा मुलगा......इतका मोठा संगीतकार...... माझ्या प्रत्येक कठीण वेळेला माझ्या सोबत होता. प्रत्येक ठिकाणी अगदी जातीने बरोबर होता. आतापर्यंत त्याला कुठल्याही गीतकाराने किंवा निर्मात्याने इतका त्रास दिला नसेल इतकं छळलं मी त्याला. तोसुद्धा अगदी तेवढ्याच आपुलकीने माझी सोबत करत होता.... अगदी प्रत्येक ठिकाणी.....प्रत्येक कामात. आम्ही ठरवलं की उद्या आपण सगळे हॉल बघायला जायचं. पण कसचं काय.... राज ठाकरेंच्या अटक प्रकरणामुळे मुंबईत इकडे तिकडे प्रवास करणं धोक्याचं होतं. तो दिवस घरीच नुस्ता चुळबुळत काढला. दुस-या दिवशी मात्र अगदी अट्टाहासाने बाहेर पडलो. ४-५ हॉल बघितले..... पण तारखांचा भरपूर घोळ होता. त्यामुळे दादर-माटुंगा कल्चरल सेंटर निश्चित केला. मी त्याच रात्री कुवेतला वापस आले. जातांना कांतिभाईंना पुन्हा एकदा फ़ोन केला. त्यांनी निश्चिंत रहायला सांगितले. त्यामुळे जरा शांत मनाने कुवेतला परतले.

कुवेतला सुद्धा नुस्तं बसून रहायचं नव्हतं तर प्रकाशनाची सगळी तयारी करायची होती. इकडे अद्वैतची वार्षिक परिक्षा पण सुरु होणार होती. पाहुण्यांची यादी, हॉलवर न्यायच्या सामानाची यादी, निवेदक हेमंत बर्वे शी बोलणं, कार्यक्रमाची क्रमवार आखणी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायकांशी बोलून तारीख पक्की करणे. ते सगळं अभिजीतनेच केलं. एकदा गायकांच्या तारखा मिळाल्यावर प्रमुख पाहुणे अशोक पत्की ह्यांची तारीख ही पक्की केली. सगळ्यांच्या मते २० मार्च ही तारीख ठरली. नंतरचे दोन दिवसही सुट्ट्या असल्यामुळे हाच दिवस निश्चित केला. तसा प्रकाश ने हॉलही बुक केला. एक मोठ्ठं काम झालं होतं.

मी तिकडे रेकॉर्डिंगला काढलेले फ़ोटो अभिजीत धर्माधिकारी (माझा अजून एक ऑर्कुटवरचा मित्र) ला पाठवले आणि त्याने ते चांगले सुधारुन परत पाठवले. त्यांचे प्रिंट घेतले. ते सगळे फ़ोटो मला प्रकाशनाच्या वेळी छानपैकी क्रमवार चार्ट पेपरवर लावायचे होते. शिवाय माझ्या कविता सुद्धा. त्याचे सगळे प्रिंट आऊट्स, अल्बमचं राईट-अप, टिव्ही चॅनेल्स ना पत्रं....अशी बरीच कामं होती. माझ्या ऑर्कुटवरच्या ब-याच मित्र मैत्रिणींची फ़ार मदत झाली. तुषार शेटे हा झी २४ तास मधला रिपोर्टर. त्याने त्याच्या चॅनेल शी बोलून ठेवलं होतं. कधीही न भेटलेले हे मित्र अतिशय आपुलकीने आपल्या परीने जी मदत होईल ती करत होते.

एका आठवड्‍यात कांतिभाईंची कव्हर डिझाईनची मेल आली. त्यात काही करेक्शन्स करुन कव्हर डिझाईन फ़ायनल केलं. अगदी मनासारखं, फ़्रेश डिझाईन झालं होतं. आता आमंत्रण ! छानसा मजकूर तयार केला आमंत्रणाचा आणि कांतिभाईच्या आर्टीस्ट ने आमंत्रण पत्रिका ही अगदी छान बनवली. सगळ्यांना आमंत्रणं पाठवली. सगळ्यांच्या भरभरुन शुभेच्छा आल्या. माझी इकडे स्वत:ची तयारीही सुरु होती. कुठली साडी, कुठली ज्वेलरी....... Happy बॅगा आठवडा आधीच भरुन ठेवल्या होत्या. मी १० मार्चला जाणार होते आणि अवी आणि अद्वैत त्याची परिक्षा संपल्यावर १८ ला सकाळी पोचणार होते. मी तिकडे बाकीची सगळी तयारी करुन ठेवणार होते. अगदी आठवणीने सगळं सामान, सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी मुंबईत पोचले.

व्वा! व्वा! वर्णनात्मक प्रकाशनसोहळा जवळ येत आहे. उत्कंठा वाढली आहे.

जयू,
eprasaran (marathi.eprasaran.com) वरुन या सीडी वरची गाणी प्रक्षेपित करता येतील का? 'आपली आवड' मध्ये विनंती केली तर ते लावतील. Happy पण त्यांना उपलब्ध करुन द्यावी लागतील.

Pages