काय रे देवा... पुन्हा सारेगमप (विडंबन)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ज्यांना ही कविता ईमेलने आपल्या मित्रमंडळींना पाठवायची आहे.. त्यांनी कृपया पीडीएफ चा वापर करावा...

kaay re deva.pdf (43.94 KB)

प्रेरणा : संदिप खरेची कविता काय रे देवा...

आता पुन्हा सारेगमप येणार
मग पल्लवीच्या जुन्या थोबाडावर जुनेच हसू फुटणार
मग अवधूत जुन्याच स्टाईल्स नव्याने मांडणार
मग जुनेच स्पर्धक येउन नव्याने बोअर करणार
मग माझी चिडचिड होणार

काय रे देवा....

पण ती चिडचिड कोणाला दाखवता नाही येणार
मग मी ती लपविणार
पण लपवूनही कुणालातरी कळावं अस वाटणार
मग मी माबोवर विडंबन लिहीणार
मग त्याची रिक्षा फिरविणार
मग काही लोक हसणार
काही नाक मुरडणार
मग नसतंच लिहिलं विडंबन तर चाललं असतं असं वाटणार
आणि ह्या सगळ्याशी ’झी’ला काहीच घेणं देणं नसणार....

काय रे देवा....

मग नेमका त्याच वेळी बायको टीवी चालू करणार
मग त्यावर सारेगमप लागलेलं असणार
पल्लवीने लाल साडी आणि निळं ब्लाऊज घातलेलं असणार
मग जुनाच स्पर्धक येऊन जुनेच गाणे म्हणणार
मग जुनेच परीक्षक मधात बुडवलेल्या, साखरेत घोळवलेल्या कॉमेन्ट्स देणार
मग पल्लवी ’एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत’ म्हणणार
मग माझे डोके उठणार
मग मीही टिव्हीपुढून उठणार

काय रे देवा...

मग मायबोलीवर कोण चांगलं... कोण वाईट चर्चा घडणार
मग कुणी साड्यांविषयी बोलणार तर कुणी गाण्यांविषयी बोलणार
मग त्यात भांडणे होणार
मग त्यासाठी १० सेमी बाय १० सेमी बाफ अपुरा पडणार
मग विपुत भांडावसं वाटणार
आपलेच कसं बरोबर हे सारे हिरिरीने पटवत जाणार
मग भांडण कसं गाण्यासारखं उत्कट उत्कट होत जाणार
हळूहळू बाफ मग थंड होत जाणार
पण बंद नाही पडणार

काय रे देवा....

पण स्पर्धा सुरुच रहाणार
मूर्ख लोक एस.एम.एस पाठवत रहाणार
आपणही शिव्या घालत पहात रहाणार
मग आपलं मन आता पुन्हा पहायचे नाही असं ठरवणार
पण त्याला ते नाही जमणार
मग ते ’आलिया भोगासी...’ म्हणणार
समोर तीच ती गाणी सुरुच असणार
रोज नवनवीन परीक्षक येणार
कुणी ’पण पण’ करणार, कुणी ’फुणफुण’ करणार
कुनी तोडलंस म्हणणार, कुणी फोडलंस म्हणणार
कुणी स्वत:ला शहाणे समजत फालतू उपमा देणार
कुणी गाणे सोडून इतर गोष्टींवर तासभर निरूपण करणार
दर आठवड्याला एक.. एक.. स्पर्धक एलिमिनेट होत जाणार
दर वेळी तीच ती रडारड होणार
जोरदार टाळ्या मात्र चालूच रहाणार

काय रे देवा...

अशातच मेगा फायनल येणार
त्याआधी कॉलबॅकच नाटक होणार
मग तीन जण फायनलला असणार
मग त्यात एक ’झी’चं लाडकं व्यक्तिमत्व असणार
मग त्यात एक हिंदी भाषिक असणार
मग स्टेजवरून पुन्हा त्याच त्याच जुन्या गाण्यांचे दळण दळणार
मग अतुल परचुरे स्टेजखालून आचरट चाळे करून वात आणणार
मग मारून मुटकून जमवलेले मान्यवर मारून मुटुकून प्रतिक्रीया देणार
’झी’ची तोंड फाटेस्तोवर स्तुती करणार
मग ताणूण ताणून दमले की एकदाचा निकाल लागणार
’झी’ चे लाडके व्यक्तिमत्व जिंकणार
’निक्काल’ बहुतेकांना अपेक्षितच असणार
मग एकदाचा हा ’जाच’ थोड्या काळासाठी संपणार

सारेगमप गेल्या वर्षी होतं
सारेगमप ह्या वर्षी आहे
सारेगमप पुढच्या वर्षीही असणार

काय रे देवा...

~मिलिंद छत्रे
(टीप : कविता कॉपी करून फॉरवर्ड करायची असल्यास कृपया पीडीफ वापरावी किंवा नावासकट कॉपी करावी ही विनंती)

प्रकार: 

आजचा सारेगमप चआ भाग बघताना अजय ने केलेलं निरूपण ऐकून मिल्याच्या ह्या विडंबनाची आठवण झाली... म्हणून हे उत्खननकार्य... Happy

Pages