सोलापूर सेक्स स्कँडल - ४८२ पानांची बारा भागांमधे विभागलेली ही कादंबरी २८ दिवसात लिहून झाली. पंचवीस दिवसांपुर्वी, म्हणजे २६ मार्च २०१०ला मी ती मायबोलीवर प्रकाशित करायला सुरुवात केली.
हा शेवटचा भाग आहे.
मायबोलीचे निर्माते, विश्वस्त, प्रशासक, संपादक यांचा मी ऋणी आहे. अनेक इंग्लिश शब्द (शीर्षकासह) असूनही मी ते दैनंदिन वापरातील भाषेतील असल्यामुळे वापरले होते. मला हे स्वातंत्र्य उदार मनाने दिले, कादंबरीच्या भागांचे व्यवस्थित व्यवस्थापन केले व विषयातील कित्येक उल्लेख धीट असूनही केवळ वास्तवाच्या जवळ जाणारे आहेत याचा मान ठेवून मला काही उल्लेख मांडायला आवश्यक ते स्वातंत्र्य दिले याबद्दल त्यांचे नम्र व मनापासून आभार!
वाचक व प्रतिसादकांचे जे प्रोत्साहन लाभले त्यामुळे मलाही रोज पुढचा भाग लिहायची इच्छा व्हायची. विश्वास ठेवा, मला खरच चवथ्या भागानंतर मी काय लिहिणार आहे ते माहीत नसायचे. चारच भाग आधी लिहून झाले होते. (२३ मार्च ते २६ मार्च). यातून मी प्रवाही लिखाण करू शकतो असे दाखवायचे नसून आपल्या प्रेमळ प्रोत्साहनामुळे मला प्रेरणा मिळायची. शेवटी आंतरजालीय लिखाणाची स्फुर्ती लिखित प्रतिसादांमुळे वाढते हे सत्य आहेच.
ज्यांना कादंबरी वाचूनही काही कारणामुळे प्रतिसाद देणे शक्य झाले नसेल त्यांचेही आभार!
सोलापूर या शहराचे नाव केवळ 'एस' पासून चालू होते व ते लगेच आठवले म्हणून 'एस्.एस्.एस' असे म्हणणे सोयीचे होईल म्हणून मी ते नाव घेतले. अर्थातच भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता.
काही वाचकांनी सांगीतलेल्या काही सुचवणींचा नक्कीच विचार करतो आहे. कादंबरी पुस्तक स्वरुपात आणणार आहेच. मात्र या कादंबरीत काही अॅडिशन्सही करणार आहे. घटनांच्या प्रचंड वेगामुळे पात्रांच्या मनातील विचार विस्तारायला जमले नाही. तेही अॅड करणार आहे.
एकदा सर्वांचे मनापासून आभार! उद्या किंवा परवाच नवी कादंबरी सुरू करत आहे. खालीलपैकी एकः
हाफ राईस दाल मारके - ढाब्यावरील वेटरची प्रेमकहाणी
किंवा
राहणार डिस्को, २०३ बुधवार पेठ, पुणे २ - वेश्येच्या मुलाची कहाणी
दोन्ही कल्पना मनात रूप घेत आहेतच. बघू काय लिहावेसे वाटते. आपल्याही विषयाच्या निवडीबाबतची व प्रेमळ प्रोत्साहनाची अभिलाषा!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
------------------------------------------------------------------------------------
गंभीर जखमी असलेले आरोपी आरोग्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्याच रुग्णालयात दाखल होते. तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. सोलापूर खवळलेले होते. हे एरवी शांत असणारे शहर खवळले की कसे होते याची संपूर्ण शासकीय यंत्रणेला भयानक कल्पना आलेली होती. डॊक्टर्स आरोपींवर गतिमान उपचार करत होते. बहुतेक वाघमारे, माधव, भाऊ हे तिघे वाचण्याची शक्यता होती. मणी, मेहता बहुधा काही तासांचेच साथीदार होते. वाघमारे एकटाच शुद्धीत होता.
नेमाडे कमिशनर ऒफ़ीसमधे किमान सात वरिष्ठ अधिकारी लोकांच्या जहाल प्रश्नांना कशीबशी उत्तरे देत होते. त्यांचा राजीनामा तर केव्हाच मागीतला गेला होता. शहरात सर्वत्र बंदोबस्त झाला होता.
मानेकाका सोलापुरात पोचल्यावर प्रथम कार्यालयात जावे या विचारात असतानाच त्यांना बातमी मिळाली की आमदारांनी तुफ़ान उभे केले आहे. काय प्रकार आहे हे बघण्यासाठी ते सभेला गेले. आमदारांचे ओघवते जहाल वक्तृत्व अन देहबोली पाहून स्वत: मानेकाकाच थिजले होते. कित्येकशे लोकांचा जमाव स्तब्ध होता. आमदार बेभानपणे सर्वांना माहिती देत होते. सोलापुरातील हे प्रकरण आम्हाला आज सायंकाळी समजले. आम्ही आरोपींना जास्तीतजास्त शिक्षा देणार आहोत. त्यात विरोध करणारी कुचकामी कायद्याची यंत्रणा ठेचून काढू! आमच्या सोलापुरातील माय भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे. मी स्वत: राजीनामा दिलेलाच आहे. अहिंसा क्रान्ती पक्षाला प्रथमच अहिंसेचा मार्ग सोडावा लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो सोडावा लागला तरी बेहत्तर! पाप्यांना नष्ट करण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायला इतिहास मंजूरी देतो याची अनेक उदाहरणे आहेत. पक्षाचे नाव बदलायला लागले तरी चालेल, पक्षाच्या नावाला काळिमा लागला तरी चालेल, पण या प्रकरणातील सर्व आरोपींना शक्य ती सर्वात मोठी शिक्षा दिल्याशिवाय हा आमदार बंडाभाऊ सुखाचा श्वास घेणार नाही. मला जरूर आहे तुमच्या सहकार्याची, साथीची! आमच्याच पार्टीतील ही आम्हाला माहीत नसलेली घाण काढून टाकून पक्ष शुद्ध करण्याच्या कामी आम्हाला हात द्या मित्रांनो! हा सोलापूरचा भाऊ तुम्हाला आवाहन करत आहे. प्रत्येक मातेच्या चरणांची धूळ, प्रत्येक भगिनीने बांधलेली राखी ही आमच्यासाठी आमचा प्राण आहे. त्यावर आम्ही घाला घातला जाऊ देणार नाही...
आरोग्यमंत्री कोणत्याही फ़्लाईटसाठी न थांबता त्यांच्या पंधरा गाड्यांच्या ताफ़्यासह थेट सोलापूरला निघालेले होते. त्यांच्या एकट्य़ाकडेच त्या वेळी मोबाईल होता. तो त्यांच्या पर्सनल असिस्टंटकडे असायचा. मानेने आमदारांचा अवतार पाहून सरळ मंत्र्यांना फ़ोन लावला.
माने - दादा,
दादा - ..हं!..
माने - सोलापूर जिंकलंय आपण..
दादा - म्हणजे???
माने - बंडाभाऊंनी नुसतं वादळ केलय सोलापुरात
दादा - म्हणजे??
माने - बंडाभाऊ सोलापुरच्या गळ्यातले ताईत झालेत.
मानेंनी सगळा प्रकार सांगीतला तेव्हा दादासाहेबांच्या चेहरा खूपच शांत झाला होता. आपला मुलगा आपल्याहूनही भारी बोलतो या मानेच्या विधानाचा त्यांना राग आला नव्हता. उलट तो आपल्याही पुढे जाणार हे वाटून ते मनातच खुष झाले होते. ते रात्री बारालाच पुण्याला पोचणार होते.
सोलापूरची सकाळी प्रकाशित होणारी जी दैनिके होती त्यांना शेवटची, म्हणजे सगळ्यात ताजी बातमी काय द्यायची हेच समजत नव्हते. एकतर मोठे वासनाकांड उघड झाले. आरोपींना मारहाण झाली. नेमाडेंनी राजीनामा दिला. आमदार युद्धभूमीवर फ़िरल्यासारखे फ़िरत होते. बनसोडेंसकट सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. आमदारांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. बातमी काय द्यायची???
बातमी मिळणार होतीच. तिसरीच!
तिकडे चंदीगडला बग्गाची कसून चौकशी झाली होती. त्याच्या घरी मिळालेल्या संदिग्ध वस्तूंवरून त्याला अटक करून मुंबईच्या फ़्लाईटने मुंबईला आणून सकाळी तिथून निघून दुपारपर्यंत सोलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात येणार होते. बग्गाच्या चौकशीतून निपजलेल्या बातम्या अजूनपर्यंत सोलापुरात नीट पोचल्या नव्हत्या. काहीतरी काळबेरं वाटावं अशा वस्तू त्याच्याकडे आहेत एवढेच समजत होते.
रात्री सव्वा दहाला रेव्हन्सवर परतलेल्या आमदारांना माहीत होते. आजची रात्र, उद्याचा संपूर्ण दिवस अन उद्याच्या रात्रीचा निदान अर्धा भाग, इतका वेळ झोप नशीबात नव्हती. आज रात्रभर पेपरवाले काय छापणार आहेत यावर विचारविनिमय चालणार होता. प्रभाव पाडणे होणार होते. पहाटे पहाटे बाबा येणार होते. ते आले की पहिल्यांदा पत्रकार धावणार होते. बाबा त्यांना कसेबसे टाळून मानेकाका अन आपण यांच्याकडून सगळा अहवाल घेणार होते. त्यानंतर ते परिषद बोलवून भाषण देणार होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता कमिशनर ऒफ़ीसमधे सर्व पक्षश्रेष्ठी, अधिकारी, नेते, दोन सी.डी. तञ, दोन इलेक्ट्रॊनिकचे तञ, दोन वकील आणि काही महत्वाची माणसे यांच्यात दोन तास मीटिंग होणार होती. कोणत्याही स्त्रीला तेथे प्रवेश नव्हता. आमदार हे मंत्र्यांचे चिरंजीव असल्याने आमदारांनाही प्रवेश नव्हता. त्या मीटिंगमधे दोन सी.डी. पाहिल्या जाणार होत्या. नंतर त्यात बाबा पक्षाचे धोरण मांडणार होते. असल्या नालायक लोकांना तर पक्षातून काढलेलेच आहे, पण यापुढे असे काहीही जाणवल्यास पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सरळ ऎक्शन घ्यायची होती असे ते सांगणार होते. शेवटी लोकनेते म्हंटल्यावर चारित्र्यवान असल्याचे दाखवावे लागतेच! प्रकर्षाने दाखवावे लागते. त्यानंतर सायंकाळी सोलापुरातील एका मोठ्या मैदानावर बाबा नागरिकांना उद्देशून भाषण करणार होते. तोपर्यंत परिस्थिती बरीच निवळलेली असणार होती.
आज रात्री वर्तमानपत्रांना काय सांगायचे या कामासाठी मानेकाका रात्रभर फ़िरणार होते. आमदारांना काही क्षण तरी विश्रांती मिळणार होती.
त्यांनी रूमवर आल्याआल्या मोरेला थंड आवाजात प्रश्न विचारला:
बंडा - मीना कुठे आहे?
मोरे घाबरला होता. त्याला आमदारांचा हा आवाज नीट माहीत होता. आता आपले काही खरे नाही हे त्याला समजले.
मोरे- सर... तुम्हीच संध्याकाळी त्यांना जायला...
बंडा - आत्ता ती कुठे आहे..???
मोरे - सर.. लगेच चौकशी क..
बंडा - चौकशी? अख्खं सोलापूर हादरलंय, पक्ष राहील की नाही हे माहीत नाही, अन पक्षाची उपप्रमुख कुठे आहे याची चौकशी करणार आहात आता??
मोरे - सर... म्हणजे.. मी सारखा तुमच्याच बरो.
बंडा - मोरे (आमदार आता गरजले. मोरे पूर्ण हबकलेला होता.) बाबांना कुणी सांगीतलं?
मोरे - काय.. सर??
बंडा - ती आमच्या गेस्ट हाऊसवर आलेली.. चार दिवसांपुर्वी... रात्री...???
मोरे - सर.. शक्यच नाही सर... मी कसा सां...
बंडा - त्यांना कळलं कसं??
मोरे - शक्यच नाही सर.. विश्वास ठेवा सर.. मी असलं काहीतरी कसं सांगेन...
आमदारांना विश्वास ठेवावा लागत होता. पण बाबा ’खून आणि स्त्री या दोन गोष्टींपासून जप’ असे का म्हणत असावेत हे लक्षात येत नव्हतं!
बंडा - आहे कुठे ती..???
मोरे - दहा मिनिटात आणतो रूमवर सर...
बंडा - सात मिनिटात आणायचं...
कसली सात मिनिटे अन कसलं काय! दोनच मिनिटात मोरे परत रूममधे धावत आला.
बंडा - काय झालं?
मोरे - सर...
बंडा - झालं काय? मीना कुठे आहे??
मोरे - त्या सरदाराकडची बातमी आली सर... विचित्रच बातमी आहे
बंडा - .... काय?
मोरे - मीनाताई... त्या सरदाकारडे सी.डी. आहे मीनाताईंची.... नंदनबरोबरची...!!
तब्बल पाच सेकंद! पाच सेकंद आमदार पूर्ण कोरड्या तोंडाने मोरेकडे बघत होते. ऐकलेली गोष्ट समजायला अन त्यावर मत बनवायला दिवसभराच्या गोंधळानंतर इतका वेळ लागलाच त्यांना! आणि जेव्हा त्यांना सगळे समजले तेव्हा.....
पूर्ण चेहराभरून स्मितहास्य केले त्यांनी. सगळाच उलगडा झाला होता. सगळ्या प्रकरणाचं मूळच समजलं होतं! काय कुठे सुरू झालं अन कुठे संपणार होतं हेही त्यांच्या लक्षात आलं! चारशे ऐंशी किलोमीटरवर बसणारे अन एक खातं सांभाळणारे आपले बाबा आपल्याला आधीपासूनच काय सांगत होते हे त्यांच्या आता लक्षात आलं! सगळंच भयानक होतं! आपण एका नागिणीशी खेळत होतो.
बंडा - कुणाकुणाला सांगीतलंयत हे?
मोरे - फ़क्त आपण! पण हे मला मानेकाकांनी सांगीतलं! त्यांनी बहुधा सरांना सांगीतलेलं असणार आहे.
त्याचक्षणी फ़ोन वाजला.
बंडा - हॆलो
दादा - सांगायचो ना तुला? खून आणि स्त्री या भानगडीत पडू नकोस... स्त्रीच्या भानगडीत पडलास तू..
दादासाहेबांनी फ़ोन ठेवला होता. आमदार आता घाबरलेले नव्हते. त्यांना दादासाहेबांचा हा आवाज माहीत होता. या आवाजात संरक्षण होतं! बापाचे प्रेम होते. आमदारांनी आता सगळं प्रकरणच उलटावायचा निर्णय घेतला होता.
बंडा - सरदाराला आणणारेत का उद्या?
मोरे - हो सर!
बंडा - पेपराला दिलंय का? मीनाच्या सी.डी.चं?
मोरे - मानेकाका म्हणाले सर! दिलंय म्हणून
बंडा - काय दिलंय?
मोरे - अहिंसा क्रान्तीच्या उपप्रमुख मीना कातगडे याही वासनाकांडाची शिकार!
बंडा - जाऊन बातमी बदला....
मोरेने हे वाक्य ऐकून आवंढाच गिळला. मानेकाकांच्या निर्णयात आमदारसाहेबांनी ढवळाढवळ केलेली त्यांनी आजवर पाहिली नव्हती.
मोरे - हो सर... काय बातमी देऊ?
बंडा - फ़ायदा मिळेनासा झाल्यावर मीना कातगडेंकडून वासनाकांडाचा पर्दाफ़ाश!
आमदाराकडे बापाचंच डोकं आहे याची मोरेंना खात्री पटली. मानेकाकांनी उगीचच गुळमुळीत बातमी दिली होती. समजा तिसया दिवशी आमदारांची बातमी खोटी ठरली असती तरी दिवसभरात मीनाच्या बाबतीत जे जनमत बनले असते ते इंप्रेशन काही पुसणे शक्य झाले नसते. त्या दिवशी अन पुढेही... मीना कातगडे मनाने कधीच समर्थपणे उभी राहिली नसती. मोरेने उघड सांगीतले.
मोरे - सर... मानलं! ही बातमी दिली तर सगळं उलटेलच!
मोरेच्या तोंडावरचे भाव अन त्याने केलेली स्तुती पाहून आमदारांना जाणवलं! हा माणूस निष्ठावानच आहे. आपण उगीच ओरडायचो.
बंडा - मोरे, तेवढं करून तुम्हीही जरा वेळ पडा! पहाटे बाबा आल्यावर पुन्हा रणधुमाळी माजणारच आहे.
बरेच दिवसांनी पहिल्यांदाच मोरेने अशी आपुलकी पाहिली होती त्यांच्याकडून. खूप बरे वाटल्यामुळे मोरे शांत तोंडाने रूमबाहेर गेला अन पुन्हा आला.
मोरे - मीनाताईंना... इथे यायला..
बंड - होय! येताना तिला इथे घेऊन या आणि ती रूममधे आमच्याबरोबर असेपर्यंत तुम्ही इथेच बसायचंत!
नागीण त्याचवेलेस सळसळत अख्खं सोलापूर पिंजत आहे याची दोघांनाही कल्पना नव्हती.
एक तासाने मोरे बातमी देऊन, पण हात हलवतच आला. मीना त्याला भेटलीच नव्हती. पण एक भयंकर, फ़ार भयंकर बातमी त्याला मिळाली होती. आमदार मीना आली नाही म्हणून चिडणार एवढ्यात मोरेने त्यांना ती बातमी सांगीतली. ती बातमी ऐकून आमदार बर्फ़ासारखे थिजले होते. दहा मिनिटांनी ते पुन्हा तेच म्हणाले. ’तिला ताबडतोब घेऊन या’!
मोरेने त्यांना दिलेली बातमी होती.... की देशपांडेच्या माणसाने आपल्या एका कार्यकर्त्याला खासगीत सांगीतले.......
सायंदैनिकात द्यायची बातमी घेऊन मीनाताई स्वत: त्यांना भेटल्या होत्या...
जिला आपण मोहाने गेस्ट हाऊसवर बोलवले होते... ती सुंदर दिसणारी विषारी नागीण या सगळ्याच्या मागे होती. आमदार हतबुद्ध झाले होते.
लातूरला असलेले मीनाचे दोन्ही मामा मीनाच्या निवडीने अभिमानाने सोलापूरला येणार होते. पण कामामुळे दोन दिवस उशीर झाला. ते आज संध्याकाळी आले. दोन दिवसात येत असलेल्या बातम्या त्यांना माहीतच होत्या. पण आज अगदी उघड एका छोट्या दैनिकाने मीनाच्या पक्षांतर्गत विरोधकाचा म्हणजे भाऊंचा पर्दाफ़ाश केल्याचे अन आमदारांनी सोलापूर ढवळून काढल्याचे त्यांना समजले अन त्यांना काय बोलावे हेच कळेना! आई एका डोळ्याने हसत अन एका डोळ्याने रडत होती. शोभा तर वेडीच झाली होती.
इंदापूरच्या आधी वीस किलोमीटरवर असताना आरोग्यमंत्र्यांना आपल्या मुलाने मानेने दिलेली बातमी बदलून मीनाची उलटीच बातमी द्यायला सागीतल्याचे समजले अन ते खुष झाले. ते यईपर्यंत मैदान बरेच शांत होणार होते तर एकंदरीत! मीनानेच पेपर आऊट केल्याचे त्यांना त्यानंतर केवळ एकच तासाने समजले.
आणि मीना...
मीना एका मोठ्या पोलीस स्टेशनवर जाऊन एक भलतीच तक्रार नोंदवत होती. तीन पेपरांनाही ती जाऊन भेटली. रात्री साडे अकरा वाजता ती घरी आली तेव्हा आई रडू लागली. मामांना पाहून मीनाच्या डोळ्यात पाणी आले. मामांना कळेना या दोघी रडतायत कशासाठी! मग आईने अगदीच थोडक्यात झालेले प्रकार सांगीतले. मामा सरळ मार्गी होते. अत्यंत संताप आल्यावर त्यांनी फ़क्त बहिणीला अन भाचीला धीर देला. तेही रडत होते. आपण सामान्य माणसं या सत्ताधीशांपुढे किती कमी पडतो याची त्या गरीब घराला जाणीव होत होती अन ते घर आणखीनच असहाय्य होत होते. त्याचवेळी दारावर थाप पडली. बाहेर दोन कार्यकर्ते उभे होते. त्यांनी मीनाला रेव्हन्सवर ताबडतोब यायला सांगीतलं! मामांनी त्यांना निघून जायला सांगीतलं! पण मीनाने त्यांना सांगीतलं की आमदारसाहेब खूप मोठे अन चांगले आहेत. त्यांनीच तर हे सगळे पापी लोक पकडून दिले. मीना रात्री सव्वाबारा वाजता कार्यकर्त्यांच्या गाडीतून रेव्हन्सला निघाली. नागिणीवर आणखीन एक वार होणार होता.
रेव्हन्सच्या स्विटमधे मोरे, मीना अन आमदार बसलेले होते. तब्बल दहा मिनिटांनी आमदारांनी तोंड उघडले.
बंडा - चूक केलीस तू.. फ़ार मोठी! पक्षाची हानी झाली. जबाबदारी तुझी आहे.
या विधानावरून मीनाला समजले की आपल्यावर भाऊंकडे गुदरलेल्या प्रसंगाची कुणकुण आमदारांना लागलेली असावी. पण कशी? भाऊ अन माधव तर अत्यवस्थ होते. शर्मिला मेलेली होती. वाघमारे, मेहता अन विकी काही बोलण्याच्या परिस्थितीतच नव्हते...मग? मग कसे कळले?? की तो... बग्गा... बग्गा बोलला???
बग्गा हा फ़ॆक्टरच मीनाने दुर्लक्षित ठेवला होता. तसेच, त्याच्याबाबतीत काही करण्याइतकी ती कुणीच नव्हती. पण ती त्याही परिस्थितीत धीट झाली. अब्रू गेलेली स्त्री भयानक असते. भल्याभल्यांनी तिच्या नादी लागू नये.
मीना - राजीनामा तर संध्याकाळीच दिला होता मी... आपण स्वीकारला नव्हतात..
बंडा - तोंड बंद! उद्या परिषदेत राजीनामा द्यायचा. त्यापुर्वी आम्ही सांगतो ते बोलायचं!
मीना - काय?
बंडा - या प्रकरणात खरे तर मी ओढले गेले ते नंदन व बग्गामुळे! नंदनवर माझे प्रेम होते. बग्गा हा नंदनचा जुना ओळखीचा होता. पैश्याच्या लोभाने नंदनने माझ्य प्रेमाची किंमत न ठेवता आमचे रेकॊर्डिंग केले अन बग्गाला ते देऊन पैसे घेतले. त्यानंतर नंदनने माझ्याशी संबंध सोडले. मी हताश झाले होते. शेवटी हिय्या करून ही तक्रार घेऊन मी आमदार साहेबांना भेटले. सगळी कहाणी सांगीतली. आमदारांनी मला हवी असल्यास नोकरी देऊ करू किंवा पक्षात काम देऊ असे सांगीतले व नंदनला जाब विचारण्याची हमी दिली. पण मला तेवढा सूड पुरेसा वाटत नव्हता. म्हणून मग मी नंदनचा रेकॊर्डिंग करणार मित्र शोधला अन त्याला पक्षाचाच एक महत्वाचा पदस्थ माधव अन सोलापुरातील सर्वात महत्वाचे नेते भाऊसाहेब यांचे चोरून रेकॊर्डिंग करण्याचे काम दिले. त्याने ते खूप प्रयत्नांनतर मान्य केले. मृत कावेरी या माझ्या मैत्रिणीला माधवकडे पाठवून त्याला फ़सवले व मोहात पाडले. तसेच, मृत शर्मिला या मैत्रिणीला भाऊसाहेबांकडे पाठवून त्यांनाही फ़सवले. हे सगळे मी एका दिवसात घडवून आणले. भाऊसाहेब व माधवला सांगून मी आमदारांना पक्षातील महत्वाचे पद देण्यासाठी प्रेशर आणले. खूप चौकशी केल्यावर आमदारांना असे समजले की भाऊ व माधव यांच्या बाजूचे सर्व कार्यकर्ते लक्षात घेता सोलापुरात पक्षांतर्गत शांतता असावी म्हणून असा निर्णय घ्यायला हरकत नाही. त्यानंतर मी पदावर आल्यावर मात्र नंदन खवळला व त्याने मला सी.डी. चौकीत दाखवण्याची धमकी दिली. त्यामुळे मी त्याचा इतिहास खणून काढून योगिताकरवी त्याच्यावर तक्रार दाखल केली. हे पाहून माधव बिथरला. पण मी माधवलाही सरळ चौकीवर अडकव व सगळ्यांचाच सूड घेण्याच्या इच्छेने सगळे पेपरात दिले. केवळ गैरकृत्ये करून मी पक्षातील पद मिळवले होते. याची जाण ठेवून मी माझा राजीनामा संस्थापकांकडे देत असून स्वत:ला कायद्यापुढे सादर करत आहे. मला जी शिक्षा कायद्याने मिळेल ती अर्थातच मंजूर आहे.
मीना - अक्कल आहे का? जरा तरी?
काय??? ही कालची पोरगी काय बोलली हेच आमदारांना समजले नाही. मोरे हबकून तिच्याकडे बघत होता.
जरावेळाने तिच्या त्या बोलण्याचा धक्का पचवल्यावर आमदार तिचे धाडस बघून हसू लागले. हसत हसत म्हणाले:
बंडा - काय म्हणलीस?
मीना - अक्कल! .......आहे का?
मोरे जहाल डोळे करत उभा राहिला त्याचक्षणी आमदार ताडकन उभे राहिले होते. एका आमदारासमोर त्याच्याच जागेत कुणी असे बोलेल ही शक्यता त्यांना माहीतही नव्हती. भयानक अपमान झाला होता. एरवीची वेळ असती तर या अशा बोलण्यावर आमदारांनी तिला कशाततरी अशी अडकवली असती की पुन्हा तिची जीभ चाललीच नसती. पण ही वेळच विचित्र होती. पाऊण वाजला होता. रूममधे फ़क्त मोरे आणि ते स्वत: होते. चार, पाच तासांनी वडील येणार होते. अन सोलापूर असे ढवळले गेले होते की त्याच्यासमोर ही गोष्ट डोक्यात महत्वाची ठरतच नव्हती.
पण सोलापूर ढवळले जाण्याचे कारण हीच मुलगी आहे.
बंडा - मोरे, एक काम करा, चौकीवर फ़ोन करून हिला चौकशीसाठी ताब्यात घ्यायला सांगा! आत्ताच्या आत्ता! अन हिला ताब्यात घेतलंय याची बातमी पेपरला द्या! ए... चल.. तू निघ... घरी जा नाहीतर कुठेही जा.. एक तासात तू आत असशील.. आणि उद्या तुझ्या.... एक नाही... दोन बातम्या येतील.. दोन....!
भयानक हिंस्त्र तोंडाने आमदार तिच्याकडे बघत होते. मोरेही खिळून उभा होता. मीना शांतपणे उठली... अन म्हणाली:
मीना - तुम्हाला अजून माहीत नाहीये.... उद्या माहीत होईल...
बंडा - ............
मीना - तुमच्या पक्षाची काय स्थिती होणार आहे ते....
बंडा - .............
मीना - आरोग्यमंत्र्यांना .... इथे आल्याचा... पश्चात्ताप होणार आहे...
झपकन ती रूमबाहेर गेली तेव्हा दोघेही अवाक झालेले होते. काय बोलली??? काय बोलली ही? बाबांना पश्चात्ताप???
एक तासाच्या आतच तिला चौकीवर ताब्यात घेतलेले होते. आईला माहीतच नव्हते. आपली मुलगी निदान आज रात्रभर तरी घरी येण्याची शक्यता कमी आहे याची तिला कल्पना होती. कारण सोलापुरात प्रकारच तसे घडले होते. पण तिला ताब्यात घेतले असेल हे तिला माहीतच नव्हते.
पण त्या एक तासात मीना पुन्हा मगाचच्याच पेपरवाल्यांना पुन्हा भेटली होती. मात्र ताब्यात घेतल्यावर तिची कसून चौकशी सुरू झाली. चारचार जण एकाच वेळेस तिची चौकशी करत होते. सगळे हुषार अधिकारी होते. त्यांना तोंडावरच्या भावांचे परीक्षण करण्याची जुनी सवय होती. देहबोलीवरून माणूस खरे बोलतोय की खोटे हे त्यांना व्यवस्थित समजायचे. उत्तर द्यायला सेकंदाचा नेमका किती भाग वेळ आरोपी घेत आहे याचे त्यांना जजमेंट होते. सरबत्ती केल्यावर फ़ार तर पंचविसाव्या प्रश्नाला चुका व्हायला सुरुवात होते हा त्यांचा अनुभव होता.
आणि मीना कशालाही बळी पडू शकत नव्हती. जो मुळातच खरा असतो त्याला या गोष्टींचे भय नसते.
पहाटे पाच वाजता पंधरा गाड्यांचा ताफ़ा जेव्हा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आला तेव्हा चहा प्यायला गाड्या ढाब्यावर थांबल्या. सोलापूर केवळ तीस किलोमीटर दूर होते. आणि नेमके तेव्हाच... वासनाकांडाचा त्या दिवशीचा पहिलाच आणि आजवरचा.... सर्वात मोठा हादरवून टाकणारा स्फ़ोट सोलापुरात अन त्या ढाब्यावरही एकाचवेळी झाला.
जेवढा माणूस मोठा.. तेवढे कव्हरेज वृत्तपत्रात त्याला मिळते....
उलटसुलट बातम्या असल्या तरीही... ते झालेच होते...
ढाब्यावर आलेला पहिला पेपर पाहून कसेबसे डुलक्या घेत असलेल्या आरोग्यमंत्र्यांकडे त्यांचा एक सहाय्यक धावला तेव्हा त्याला कसलेही भान नव्हते.... मुखपृष्ठावर हेडिंग होते...
अहिंसा क्रान्तीचे आमदार बंडाभाऊ वासनाकांडात....
खाली कुठेतरी चिमूटभर बातमी होती....
मीना कातगडे यांना चौकशीसाठी अटक.. वासनाकांडाची माहिती असल्याचा त्यांच्यावर संशय....
आपण इथे यायलाच नको होते या विचाराने आरोग्यमंत्र्यांचे मन व्यापून गेले. कुठलाही चहा वगैरे न पिता पंधराच्या पंधरा गाड्या सुसाट वेगाने रेव्हन्सकडे निघाल्या. सोलापुरातील रस्त्यावर हळूहळू उजाडतानाच गर्दी होऊ लागली होती. अचाट जनप्रक्षोभाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे याची जाणीव त्यातील प्रत्येक गाडीला होती. वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याप्रमाणे त्या सुटल्या होत्या.
रेव्हन्सवर आमदार काळवेळ न बघता सरळ ड्राय घोट मारत होते. आपले बाबा येणार आहेत याचेही भान त्यांना उरले नव्हते. डोळे इंगळीसारखे झाले होते. मोरे डोकं धरून लॊबीत बसला होता. रूमवर जाण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. कार्यकर्ते तीव्र वेगात रेव्हन्सवर गर्दी करू लागले होते. भेंडेबाई अन त्यांच्यासारख्या मंडळांचे एकमेकांना केव्हाच फ़ोन गेले होते. फ़िल्डींग लावली जात होती. पोलिसांची मोठी कुमक जागोजागी यायला सुरुवात झाली होती. आणि सी.एम.चा पहिला फ़ोन पाच वीसला आरोग्यमंत्र्यांना आला होता. सहा तासात परिस्थिती क्लीअर करा नाहीतर पाठिंब्याची गरज नाही असे सरळ शब्द आरोग्यमंत्र्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकले होते.
आणि मीनाला... ’कोणत्याही प्रश्नात काहीही विचित्र न सापडल्यामुळे’ असे दाखवायला कारण दाखवून... पण.. आमदारांचीच बातमी आलेली पाहून ... सरळ सरळ चौकीवरून सोडून दिले होते.
मानेकाका, मोरे अन दोन आणखीन जुने लोक... यांच्यासमोर... या वयात बाबांनी आपल्या कानाखाली आवाज काढावा हे आमदारांना सहन झाले नाही.
आणि सी.एम. चा फ़ोन आला होता कळल्यावर त्यांची उतरली.
भयानक दहशत! सकाळी दहा वाजेपर्यंत रूममधे भयानक खलबंतं चाललेली होती. मंत्री, आमदार अन दहा जुने मुरब्बी लोक आपली सगळा मुत्सद्दीपणा पणाला लावून यावर काय करावे याचा विचार करत होते. चार तासाची मुदत लॊ कडून मागून घेण्यात मंत्रीसाहेब यशस्वी झाले होते. गेल्या आठवड्यात काय काय झाले याचा संपूर्ण अहवाल मोरे अन आमदारांना द्यायला लागला. मीनाला गेस्ट हाऊसवर बोलवले होते हे सांगताना त्यांची मान जी खाली गेली ती वर उठलीच नाही. सकाळी सात वाजताच समजले होते की काल कोणत्यातरी बाईने आमदारांविरुद्ध रेव्हन्समधे जबरदस्ती केल्याची तक्रार चौकीवर केली होती आणि तिचे नाव होते सोनल! ते ऐकून तर आमदार अन मोरे वरच बघेचनात!
या चार तासात मीना कातगडे खलनायिका ठरली होती. तिच्या घरासमोर निदर्शने झाली. तेवढे सोडले तर संपूर्ण सोलापूर आमदारांना शिव्या देण्यात मग्न होते. केवळ चोवीस तास! बरोब्बर चोवीस तासांपुर्वी आमदार ’सोलापूरचे भाऊ’ ठरले होते. चोवीस तासांनी राक्षस! आमदारांच्या होर्डिंग्जवर शेण टाकण्यात आले. ती फ़ाडण्यात आली. वाट्टेल तसे मोर्चे निघू लागले होते.
आधी ठरलेल्या सगळ्या पत्रकार परिषदा व भाषणे रद्द झाली. अचानक अकरा वाजता बग्गाचे सोलापुरात आगमन झाले. प्रक्षोभ आणखीनच वाढला. यंत्रणा मेटाकुटीस आल्या.
बारा वाजता सी.एम.चा दुसरा फ़ोन आला. अजून परिस्थिती क्लीअर नाही आहे असे ते म्हणाले. मंत्र्यांनी त्यावर ’केवळ दोन तास द्या’ असे सांगीतले.
एक वाजता बग्गाची कालची चंदीगड येथील तपासणी व सोलापुरातील चौकशी यातून सी.डी.ची संपूर्ण यंत्रणा डिपार्टमेंटला समजली. कमिशनर ऒफ़ीसमधे बग्गाकडील किमान सोळा सी.डी.ज फ़ास्ट फ़ॊरवर्ड करून तपासल्या गेल्या. त्यातील सहा सोलापूरच्या होत्या. फ़ोटोंची सी.डी. सोडून सर्व स्त्रिया आरोग्यमंत्री सोडून इतर सर्वांना माहीत होत्या.
आणि त्याचवेळेस तो प्रकार घडला. एक वरिष्ठ अधिकारी मीनाला घेऊन अचानक तेथे अवतरला. प्रथमच, ती व आरोग्यमंत्री एकमेकांसमोर आले होते. मीनाने त्यांना ओळखही दाखवली नाही. तो अधिकारी म्हणाला की बग्गाने दिलेल्या माहितीचा उर्वरीत भाग या सांगणार आहेत.
प्रथमच, प्रथमच सगळे सावरून बसले. बग्गा हळूच मीनाकडे बघत होता. आरोग्यमंत्री विषण्ण तोंडाने तिच्याकडे पाहात होते.
मीनाने स्त्रीच्या उपजत गुणांमुळे मान खाली घातली. एक स्त्री! अत्यंत अपमानीत स्त्री! तीही या वयातली. काय बोलणार? एवढ्या सगळ्या पुरुषांसमोर? आपलीच बेअब्रू? कशी सांगणार?
आपण गेल्या काही दिवसात काय करून बसलो हे तिला आठवलं!
मीनाला रडू कोसळलं! ती तिथल्यातिथे सगळ्यांसमोर खाली बसली. पायातला जोरच गेला होता. तातडीने महिला पोलिसांना आणण्यात आले. अर्धा तास मीनाला दूर नेण्यात आले. सगळे शांत होते. रूममधे सन्नाटा होता. कमिशनरांच्या सांगण्यावरून सोलापुरातील एक ज्येष्ठ महिला वकील व एक ज्येष्ठ समाजसेविका अशा दोघींना ताबडतोब बोलवण्यात आलं! त्यांना केस पेपर वाचून माहिती होतीच! त्या तेथे बसल्या. मीनाला जरा आधार वाटावा म्हणून त्यांना तिच्या समोर येतील असे बसवण्यात आले.
पुन्हा मीना आली. चेहरा भकास झालेला होता. कुणाकडॆही न बघता ती सरळ बोलू लागली. प्रत्येक अक्षर उच्चारताना तिच्या डोळ्यांमधून आसवे ओघळत होती.
मी... मीना कातगडे... वडील नाहीयेत... आई बारीकसारीक कामे करते.. मी नर्सिंगचा कोर्स... करते.. क.. करायचे... श्री...धर .. नगरला घर... आहे.
मीना थांबली. तिने सरळ सर्वांदेखत डोळे पुसले. मनात विचार केला. व्हायचे ते झालेले आहे. आता आपली बेअब्रू छापून आलीच आहे. आता इथे रडून काय होणार आहे? आपल्याला कोण धीर देणार? कोण धीट बनवणार आपल्याला? वडील नाहीयेत. आई म्हातारी आहे. ही सगळी परकी माणसं! आपणच धीट व्हायला हवे. एका स्त्रीची अजून बेअब्रू होईल. पण.. हाच.. आत्ताचाच.. एकमेव क्षण आहे.. नंतर ... काही नाही.
मीनाने धीर गोळा केला. तिचा चेहरा बदललेला काही जणांना कळला. कमिशनर, दोन अधिकारी आणि.. आरोग्यमंत्री!
’मी मीना कातगडे! गरीब घरची मुलगी आहे. डॊक्टर व्हायचं होतं! पण मार्क्स थोडे कमी पडले. नर्सिंगचा कोर्स मुद्दाम जॊईन केला. कारण वडिलांचा मृत्यू झालेला पाहिला होता. नंदन! नंदन मला भेटायचा. त्याने घरी येऊन आईला मला नोकरी देईन असे सांगीतले. आम्ही गरीब स्वभावाची माणसे आहोत. सुरुवातील थोडेसे चाचपत चाचपत वागलो. पण नंतर विश्वास बसला. काही दिवस मी व तो भेटायचो. तो बनसोड्यांबरोबर काम करायचा.’
पंधरा मिनिटे मीना बोलत होती. नंदन अन तिचा विशाल लॊजचा प्रसंग ती सांगत असताना यावेळेस ती खंबीर होती... पण त्या दोन बायकांनाच कसंतरी झालं होतं! आमदारांना गेस्ट हाऊसवर ती भेटली हा प्रसंग आरोग्यमंत्र्यांना माहीत होता. पण तो तिच्या तोंडून सगळ्यांदेखत ऐकताना त्यांची मान खाली गेलीच. मीना बोलू लागली. तो प्रसंग ऐकून कमिशनरांनाही धक्काच बसला. या आरोपावर मंत्री काही बोलत का नाहीत हे त्यांच्या लक्षात येत नव्हते.
’सत्ता! सत्ता हातात आहे म्हणून हे सगळं तुम्ही लोक करू शकता. का? राठीला मुलगी होती म्हणून त्याने माझी साथ दिली. सदूला स्वत:च्या बायकोची काळजी होती म्हणून तो बनसोडेंकडे कुटुंब घेऊन राहायचा नाही. त्यानेही माझी साथ दिली. तुमच्यापैकी नाहीये कुणाला? मुलगी? कुणाचेच लग्न झालेले नाहीये? एकालाही बहीण नाहीये? आमदार! आमदार हे आमदार आहेत. ते वासनाकांडात नाहीत. मग आता त्यांचा सत्कार करणार? सोलापूरचे भाऊ? भाऊ ठरणार ते?’
’माझ्याकडे सगळ्या सी.डी.च्या कॊपीज आहेत. पण काय करणार आहे मी त्याचे? पेपरला देणार?
साधा विचार करा! मी जर भाऊ बनसोडेंनी केलेल्या जबरदस्तीनंतर गप्प बसले असते.. तर आज ही तुमची मीटिंग ठरली तरी असती का?
काय होईल फ़ार तर? एक अहिंसा क्रान्ती पक्ष बदनाम होईल? हो ना? पण ते सहन होणार नाही! नाही का? एका फ़ालतू मुलीच्या अब्रूपेक्षा पक्षाची अब्रू कितीतरी मोठी आहे! नाही का? मी जर आमदारांच्यासमोर माझे... त्या दिवशी मी जर त्यांना भेटले नसते तर... मी आज कुठे असते? माझ्या गरीब आईबरोबर लातूरला माझे मामा राहतात तिथे कायमची गेले असते. पुढे मागे कधीतरी लग्न झाले असते. मग माझ्या पतीला दहा वर्षांनी कुठूनतरी कळले असते की माझे अन नंदनचे संबंध होते. संसाराचा नाश झाला असता. पक्ष मात्र वाढला असता. सत्तेवर आला असता. भाऊ बनसोडे मंत्री झाले असते. नंदन प्रमुख झाला असता. माधव आमदार झाला असता. आणि आमदार? माझ्यासारख्यांचे शोषण करून मुख्यमंत्रीही झाले असते. आत्ता तुम्ही सगळे ऐकताय कारण तुम्हाला सत्य ऐकायचं होतं! आणि तशी परिस्थिती निर्माण केली मी! की तुम्हाला माझ्या तोंडून सत्य ऐकावसं वाटावं! मी जर काहीच केलं नसतं अन एखाद्या... एखाद्याच कशाला... वाघमारेच्याच चौकीवर नंदन अन भाऊंविरुद्ध गुन्हा नोंदवला असता तर? पेपरमधे आलं असतं! नोकरीच्या आमिषाने बलात्कार! युवतीचं नाव छापत नाहीत. केवढा उपकार? आजूबाजूच्यांना, घरच्यांना कळत नाही असे वाटते का? बेअब्रू होत नाही तिची? मग पानाच्या टपरीवर शेंबडा पोरगा, ज्याला अजून मिसरूडही फ़ुटले नाही, तोही म्हणायला मोकळा! ही सामील असल्याशिवाय असं होतंय होय? पण... सामान मात्र भारीय हां!’
मीनाचे वाक्य ऐकून सगळ्यांच्याच माना खाली गेल्या. एकटी मीना निर्लज्ज झाली होती. व्हावंच लागत होतं!
’सामान! माल! व्वा! काय नावं ठेवलीयत आयाबहिणींची! हे... हे इथे हे मंत्री बसलेत ना? यांच्या चिरंजीवांना विचारा! कसे वागत होते माझ्याशी त्या रात्री! आज अगदी मुंबईहून धावत आलेत सोलापुरात! त्यावेळेस मी फ़ोन केला असता तर पोहोचू तरी शकला असता का यांच्यापर्यंत? करताय मला सून तुमच्या घरची? पहिली सून असताना?? बेअब्रू होऊ नये माझी म्हणून! तुमच्या राज्यात एका गरीब मुलीची बेअब्रू होऊ नये म्हणून सून करा मला तुमची! करताय? थुंकते मी तुमच्या घराण्यावर! तुम्ही पाया पडून सून करायला तयार झालात तरी थुंकते. असलं घाणेरडं रक्त असलेलं घराणं नको..’
आता आरोग्यमंत्री कडाडले.
’ए मुली.. ही मीटिंग काही चांगल्या हेतूने घेण्यात येत आहे. आम्ही अहवाल ऐकून जो अपराधी आहे त्याला शिक्षा करणार आहोत. तुझी बडबड सगळे ऐकून घेतायत याचे नवल वाटते. शेवटी कायद्याच्याच मार्गाने सर्व व्हायला हवे’
मात्र एवढे बोलून मीनाचा हिंस्त्र चेहरा बघून ते चपापले.
मीना उसळली:
’कायद्याच्या मार्गाने? तुमच्या मुलाने माझ्यावर... कायद्याच्या मार्गाने बलात्कार केला? .’
मंत्री - पुरावा काय आहे...???
मीना - का? पुरावाच का लागतो अशा गोष्टींचा? तुम्ही तुमच्या बायकोबरोबर संबंध ठेवल्यामुळे हे आमदार तुम्हाला झाले याचा पुरावा देता? लावलेवतेत कॆमेरे घरात तेव्हा???
मंत्री - ए...
आरोग्यमंत्री थरथरत्या हाताची बोटे तिच्याकडे रोखून ताडकन उभे राहिले होते. त्यांच्या डोळ्यांमधून आग बरसत होती. अख्खी कॊन्फ़रन्स हादरली होती. सन्नाटा! सगळे थिजून मंत्र्यांचा हा जाहीर सर्वांदेखत झालेला अपमान बघत होते. मीनाचे साहस पाहून कमिशनर तर काही क्षण अवाकच झाले होते.
मीना - का? राग का आला? तुम्ही तुमच्या आईला तुमच्याच वडिलांपासून झालात याचा पुरावा तरी आहे??? तुमच्या आई वडिलांची सी.डी. मागीतलीत कधी???
मीना अक्षरश: विजेसारखी कोसळत होती. मंत्री गोठलेल्या अवस्थेत उभे राहून तिच्याकडे जमतील तितके मोठे डोळे करून बघत होते. लोक आता यापुढे ही काय म्हणणार या कल्पनेने घाबरत होते. मीनाचा आवाज कर्कश झाला होता. तिचा अवतार पाहून कुणाचेही तिच्याजवळ जायचेही धाडस होत नव्हते.
अचानक कमिशनरांनी महिला पोलिसांना बोलवून तिला ताबडतोब बाहेर न्यायला सांगीतले.
मीना - मंत्र्यांची पत्नी अन मंत्र्यांची आई म्हंटले की सगळे कसे अंगावर येतात. मीना कातगडे रस्त्यावर पडलीय??? रस्त्यावर पडलीय मी???
ग्रूपपैकी जे चार जण मुंबईहून आले होते त्यांच्यातील एक जण दादासाहेबांचे विरोधक नानासाहेब यांनी मधेच घुसवलेला माणूस होता. तो खरे तर होता पत्रकार पण त्याला क्रिमिनल सायकॊलॊजीचा एक्सपर्ट व गुन्हे प्रतिबंधक शाखेचा तञ म्हणून त्या वर्तुळात घुसवण्यात आले होते. त्याचा दबदबा बराच होता. तो उठला.
तो - या मीनाताइंची आरोपी म्हणून रात्रभर चौकशी झालेली आहे. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. उलट त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांमुळे सोलापुरातील वासनाकांड ओपन आऊट झालेलं आहे. जरी त्यांनी बोलण्याचा हा फ़ोरम नसला अन जरी वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार त्यांना नसला तरी त्यांच्यावर आठवड्याभरात झालेल्या अन्यायांचा विचार करता कोणत्याही कायद्यापेक्षा किंवा न्यायालयापेक्षा स्त्रीच्या अब्रूला अन निष्पाप माणसाला सन्मान मिळवून द्यायलाच हवा. तुम्ही बोला मीनाताई, मी बघतो कोण तुमचा विरोध करतंय!
या माणसाचे बोलणे मनावर घ्यायलाच हवे इतके सगळ्यांनाच ठाऊक होते. मात्र मंत्री महोदय उठले.
दादा - मित्रहो, मीनाताईंवर अत्यंत दुर्दैवी अन्याय झालेला आहे हे आपण सगळे जाणतोच. आपली नुसतीच त्यांना सहानुभुती नाहीये तर या अन्यायाला वाचा फ़ोडून गुन्हेगारांना जास्तीतजास्त शिक्षाही आपण द्यायलाच हवी. मात्र आत्ता त्या अतिशय चिडलेला असल्याने, जेही साहजिकच आहे, त्यांच्या आत्ताच्या बोलण्यातील मुद्दे किंवा बाबी यांचे अनावश्यक उदात्तीकरण करून त्याचे कुणी राजकीय भांडवल...
मीना - बसा खाली. खाली बसा! आमदारांचे लग्न करून दिले आहेत ना? सून आहे ना घरी? तिच्यावर बलात्कार झाला की राजकीय भांडवल सुचेल का? ऒं? पैज लावताय? तो बग्गा जिवंत आहे अजून! बघा त्याच्याकडून सी.डी. करून सुनेची! मग बघू राजकारण सुचतंय का इज्जत...
मीना घणाघाती प्रहार करत होती. आरोग्यमंत्र्यांवर अशी जाहीर अन त्यांच्या तोंडावर चिखलफ़ेक करणारी ही पहिलीच व्यक्ती असावी. अती अपमानाने ते उठले. सगळे जण त्यांच्याकडे बघत होते.
मीना - बसा! आता जावंसं वाटतंय निघून? एक मुलगी स्वत:च्या तोंडाने या गोष्टी चार पुरुषांसमोर सांगतीय... तिला कसं वाटत असेल??
दादा - आवाज बंद! धिस इज लॊ! हे मर्कटालय नाही. कुणीही येऊन काहीही बोलायला. कमिशनर साहेब, ताबडतोब या मुलीचा बंदोबस्त करा. एक अक्षर जरी खोटं निघालं किंवा पुराव्याविना बोलत असली तर अब्रूनुकसानीचा दावा ठोकेल आमची...
अचानक तो माणूस उठला. त्याच्या आविर्भावाकडे बघूनच मंत्री चपापले.
तो. - अब्रूनुकसानी? हा हा हा हा! आपल्या पक्षाचे आमदार, आपले चिरंजीव, बंडाभाऊ यांनी आपल्या पक्षाची अब्रू पेपरांमधे आज सकाळीच घालवलीय. वाचलं असेलच आपण!
हा घाव वर्मी बसला. मंत्री चवताळले.
दादा - काय बोलतोस? कोण आहेस तू? तुला नानाने पाठवलंय! मला काय समजत नाही का? बाहेर हो या रूमच्या. कमिशनर साहेब, हा माणूस कोणत्या अधिकारात इथे आला आहे ते आम्हाला समजायला हवं!
मीना - तुम्ही कोणत्या अधिकारात इथे आला आहात? इफ़ धिस इज लॊ, व्हाय आर यू हिअर??? (मीना किंचाळली)
पुन्हा सगळे स्तब्ध झाले. मंत्र्यांची पंचाईत मोठी झाली. आता बाहेर गेले तर ही म्हणते बाहेर जायला काही लाज वाटत नाही? आत राहिले तर ऐकून घ्या. बर, आपल्याला या परीघामधे कायद्याने अधिकार काहीच नाही.
बग्गा मात्र मुळापासून हादरला होता. या मीना नावाच्या मुलीने प्रकरण भयानक पातळीवर आणलं हे त्याला समजलेलं होतं! भाऊ त्याला पहिल्यापासून सांगत होते, तिची सी.डी. पुढे पाठवू नकोस... पण त्याने ऐकलं नव्हतं! तो मान खाली घालून बसला होता.
मीना - पुरावा! पुरावा मागताय ना? पाहायचाय पुरावा? कसला पुरावा पाहायचाय? माझी स्वत:ची सी.डी. दाखवून मग तोंड वर करता येत नसल्यामुळे आत्महत्या करू? घेताय जबाबदारी? की कावेरीला धंदा करायला भाग पाडले याचा पुरावा हवा आहे? तो बसलाय की दाढीवाला सरदार तिथे? की तुमच्या पक्षाचा नगरसेवक फ़ावल्या वेळात काम करून इतर वेळी शहरातल्या बायकांना पक्षाने दिलेल्या राहत्या बंगल्यावर बोलवून त्यांच्याबरोबर मजा करायचा याचा पुरावा??? की त्या गरीब योगिताचे फ़ोटो पाहायचे आहेत..???
दादा - ए... फ़ार बोलायचं नाही.. बंडाभाऊंवर काय आरोप केलेस? कुठल्या मुलीला काल खोटी तक्रार दाखल करायला लावलीस?
मीना - खोटी?? कशावरून खोटी? तुम्ही म्हणता म्हणून? तुम्ही मंत्री आहात म्हणून?????
मंत्र्यांचे बॊडीगार्ड्स जर आत असते तर त्यांनी या मुलीला केव्हाच बाहेर नेले असते. पण त्यांना प्रवेशच नव्हता. मीनाने भयानक तोंड करत एक सी.डी. ऒपरेटरकडे पास केली. त्याने कमिशनरांकडे बघितले. तो मगाचचा माणूस त्याला ’लाव तू सी.डी, आम्हाला बघायचीय’ म्हणाला. लगेच रूममधील दोन बायकांनी ईब्जेक्शन वगैरे घेऊन दाखवलं! मीना त्यांच्यावरच कडाडली.
मीना - वकील आहात ना? पुरावा पाहायला नको? काय हो समाजसेविका बाई? मला तुमच्या इथे असण्याची गरज नाहीये. मी मुलगी असले तरी समर्थ आहे. बसायचं तर बसा नाहीतर निघा!
आता ती एकटीच राहिल्यावर सी.डी. कशी बघायची म्हणून तिघींना बाहेर जायला सांगायचा निर्णय झाला. तिघीही बाहेर गेल्या. केवळ पाचच मिनिटांनी त्यांना आत बोलवण्यात आलं! सोनल नावाच्या कॊलगर्लने कमाल केली होती. तिने काय केलं होतं हे कुणालाच माहीत नव्हतं! पण मीनाचा शुद्ध हेतू लक्षात घेऊन तिने ऐन प्रसंगी जे डोकं चालवलं होतं ते म्हणजे कमालच होतं!
जितका काळ ती कुशीवर असायची, आमदारांच्या विरुद्ध बाजूचा हात व पाय ती सुटकेची धडपड करत असल्याप्रमाणे हालवत होती. आणि ते आमदारांना समजणे शक्यच नव्हते अशा कसबाने हलवत होती. त्यांच्या अंगाखाली असेल तेव्हा ती पावले हलवत होती अन असेच काय काय! जेव्हा कॆमेरा तिचा चेहरा टिपत असेल अन चेहरा आमदारांकडे नसेल तेव्हा ती तोंडावर भयंकर घाबरल्याचे अन रडवेले भाव दाखवत होती. आणि काल रात्री जेव्हा आमदार सोलापुरात ’सोलापूरचा भाऊ’ म्हणून मिरवून थैमान घालत होते तेव्हा मीनाने केवळ दहा मिनिटांत ही सी.डी. पाहून मनातल्या मनात सोनलला सलाम केलेला होता. आणि तीच सी.डी. आत केवळ पाच मिनिटांत कशीबशी बघून पुन्हा तिघींना आत बोलावलं होतं!
मंत्रीमहोदय खलास झालेले होते. त्यांची मानच वर होईना!
मीना - आता सांगा! जो सरळ सरळ बलात्कार आहे, आणि जो करताना आमदारांचे शुटिंग त्यांच्या नकळत बनसोडेंनीच घेतले आहे.....
खाडकन मंत्र्यांनी मीनाकडे बघितले... म्हणजे? बनसोडे इतका ***** होता? मरायला टेकलाय आता ****
मीना - त्या बनसोडेंनी ही सी.डी. या सरदाराला पाठवली असती तर ही बिचारी स्त्री बरबाद झाली नसती..???
ती स्त्री कोण आहे हा विचारच आत्ता कुणी करत नव्हते. तो मगाचचा माणूस सरळ ताडकन उठला.
तो - हे सगळे भयंकर आहे. हे सगळे जनतेला समजायलाच हवे.
मंत्र्यांना काहीही समजायच्या आत तो तीरासारखा रूमच्या बाहेर गेला.
केवळ दोन तासात वादळ फ़िरावे तशी बातमी सोलापुरात, फ़ोनवरून सी.एम.ना अन सर्वत्र पसरली.
सोलापूर वासनाकांडात आमदार पुराव्यासहीत गुन्हेगार म्हणून सिद्ध! आरोग्यमंत्र्यांचे अचानक घुमजाव! त्यांनी आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.
ही बातमी पसरण्याबरोबरच आणखीन एक छोटी बातमी पसरली. मीना कातगडे ही तरुणी शोषित आहे. तिने दाखवलेल्या धाडसाने सोलापूर वासनाकांड उघड झाले.
ताबडतोब मीनाच्या घरासमोर रीघ लागली. आईला अन मामांना काही समजतच नव्हतं! मीना घरी आली तेव्हा जल्लोष चालला होता. पब्लिकपण काय असतं! आज याचा उदो उदो तर उद्या त्याचा! कशाला काही ताळमेळच नाही.
मीना आठवून आठवून बघत होती. कितीही प्रयत्न केला तरी तो कोण असावा तिच्या लक्षात येत नव्हतं! येणारही नव्हतं! तिने त्याला यापुर्वी कधी पाहिलंच नव्हतं!
अहिंसा क्रान्तीच्या विरोधात अख्खं सोलापूर उभं होतं! भाऊ बनसोडे, माधव, वाघमारे शेवटच्या घटका मोजत होते. आणि शेवटच्या मोजत होते राजकीय भवितव्य, आमदारांचे ... आणि काही प्रमाणात त्यांच्या वडिलांचेही...
बग्गाने सांगीतलेली सगळी यंत्रणा समजून घेतल्यावर फ़्रान्सच्या एजन्सीवर भारतात आरोप ठेवण्यात आला. आमदारांच्या सी.डी.ची बातमी सायंदैनिकात छापून आली. आमदार हा सत्तेच्या जोरावर स्त्रियांना फ़सवणारा एक नराधम आहे असे छापून आले होते.
नेमके कोणत्या गाडीत बसून आमदार अन मंत्रीसाहेब जिल्ह्याच्या बाहेर गेले हे जरी लोकांना समजलेले नसले तरी त्या दोघांना हायवे लागेपर्यंत ’जीवाची भीती’ म्हणजे काय असतं ते व्यवस्थित समजलं होतं! सर्व बाजूंनी लोक ओरडत ओरडत घोषणा देत होते. उस्मानाबादमधे आमदारांना अटक करणार हे निश्चीत झाले होते.
अहिंसा क्रान्ती पक्ष सोलापुरात नामशेष झाला होता. आणि ’त्यांच्या पाठिंब्यावर सरकार का ठेवायचे’ असा प्रश्न हायकमांडने सी.एम.ना विचारला होता.
हे सगळं छापून येण्यामागे नानासाहेबांनी मीटिंगमधे घुसवलेला क्रिमिनल सायकॊलॊजीवाला माणूस होता. त्याच नाव होतं! ... योगेश...
डॊ. योगेश अत्रे! ... शर्मिलाचा धाकटा दीर! त्याने नानासाहेबांपेक्षा स्वत:च्याच पोटतिडकीने हे सगळे उघड केलेले होते.
मीना त्याच्यामार्फ़त नानासाहेबांकडून आलेलं पक्षप्रवेशाचं आमंत्रण केव्हाच धुडकावून घरात बसली होती. दोन्ही मामा रिक्षा आणायला गेले होते. शोभा तिच्या गळ्यात पडून रडून रडून अर्धमेली झाली होती. राठी, संजय, सदू अन भेंडे घराबाहेर डोळे पाणावून उभे होते. आई किरकोळ पिशव्यांमधे किरकोळ सामान भरत होती...
शोभाने मीना तिच्याकडून नेहमी नेत असलेली निळी साडी मीनाला भेट म्हणून दिली. मग मात्र मीनाचा धीर सुटला.
जवळपास पंधरा मिनिटे मीना, आई अन शोभा एकमेकींचे सांत्वन करत हमसाहमशी रडत होत्या.
वडिलांचा फ़ोटो पिशवीत ठेवला गेला. आईने घराकडे एकदा पाहिलं! घरमालकाने भाडं केव्हाच नाकारलं होतं! दोन्ही मामा दोन रिक्षा घेऊन आले.
घराला कुलूप लावताना मीना शोभाच्या खांद्यावर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागली. शोभाला अजूनही तिचा फ़ोटोही सी.डी.त होता हे सांगीतलं नव्हतं!
पाच मिनिटांनी दोन रिक्षा निघाल्या होत्या.
मीना कातगडे... एक गरीब घरची मुलगी... स्वत:ची आहुती देऊन.. तिने स्कॆंडल चव्हाट्यावर आणलं होतं आणि खलास केलं होतं
पुन्हा साधीसुधी मुलगी होण्याचे कष्ट सोसणे तिला जमणार होतं की नाही कुणास ठाऊक? सगळ्याच संघटना तिला स्वीकारायला तयार होत्या.
पण .. तिला थाटायच होता छोटेखानी संसार, ती, तिचा नवरा, एक दोन गोंडस मुले... आणि भूतकाळ विसरायचा होता...
आपल्याला या राजकारणाच्या, गुन्हेगारीच्या गोष्टी झेपणार नाहीत हे तिला माहीत नव्हतं!
प्रश्न फ़क्त इतकाच होता की आता लग्न करायला तरी कुणी तयार होईल का???
स्वत: नरकातून जाऊन तिने पुढच्या कित्येक मुलींचे आयुष्य स्वर्ग होण्यास मदत केली होती. जीवाची भीतीही यापुढे होतीच! पण....
समाधान एकच होतं......
ठरवल्याप्रमाणे........ सोलापूर सेक्स स्कॆंडल.... नामशेष झालं होतं!
बेफिकीरजी AGAIN HATS OFF TO
बेफिकीरजी
AGAIN HATS OFF TO YOU..........
वाचून सूण्ण झाले. एवढया धाडसी विषयावर एवढ्या प्रगल्भपणे लिहू शकलात.. खरचं ग्रेट आहात.
नव्या कादंबरीसाठी हार्दीक शुभेच्छा!!! लिहीत राहा.
स्वाति
बेफिकीर अशा कादंबरी वाचल्यावर
बेफिकीर
अशा कादंबरी वाचल्यावर मला नेहमी मला असा प्र्श्न सुचतो कि,
अशा गोश्टि खरच या जगात होत असतिल का? यात कुठेतरि सत्य आहे का? असे होत असेल का?
जबरदस्त कादंबरी !
जबरदस्त कादंबरी !
@ बेफिकीर जाता जाता या
@ बेफिकीर
जाता जाता या कादंबरीवर प्रतिक्रिया देणे हे कर्तव्य वाटतेय. लेखकाने दिलेला वेळ, त्याच्या जिवाची तगमग हे सगळं माहीत असताना लिखाणाची पोचपावती न देता जाणं योग्य वाटलं नाही. माझ्या बुद्धीला पटणारी प्रतिक्रिया टण्या यांनी दिली आहे तर मनापासूनची मनातली बी विजयकुमार (चर्च, १९९२ या कवितांमुळे लक्षात राहीलेले) या प्रतिभावंताने दिलेली आहे. पुढील लिखाणास मनापासून शुभेच्छा !
अ.प्र.ति.म...!!! बेफिकीर तुमच
अ.प्र.ति.म...!!!
बेफिकीर तुमच लिखाण अचाट आहे.
ऑफिस मध्ये जसा वेळ भेटेल तसा तुमच लिखाण वाचत होतो.
आज शेवट झाला आणि अंगावर अक्षरशः काटे आले.
कहाणीचा फ्लो जबरदस्त होता.
तुमच्या पुढील लिखाणास शुभेछा
खरच खूप छान कथा आहे. प्रत्येक
खरच खूप छान कथा आहे. प्रत्येक पात्राच्या मनातील विचार आणि मनातील भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत. काहीतरी वेगळ्या विषयावर निर्भीडपणे लिहिले आहे. कथेतील पात्रांची नावेसुद्धा कथेला शोभतील अशीच आहेत. ८ ही भाग वाचले. खूप छान वाटल.
भयानक..प्रतिक्रिया देण्यासाठि
भयानक..प्रतिक्रिया देण्यासाठि शब्द नाहित..मीनने स्वतःच आयुष्याचि आहुति देउन कितितरि आयुष्य वचवले..एक निराधार मुलगी असुन इतक धाडस केल आपन काय करतो..... फकत वाचून सोडुन देतो...............
पण .. तिला थाटायच होता छोटेखानी संसार, ती, तिचा नवरा, एक दोन गोंडस मुले... आणि भूतकाळ विसरायचा होता...
प्रश्न फ़क्त इतकाच होता की आता लग्न करायला तरी कुणी तयार होईल का???
एक खरा वास्तव प्रश्न........उत्तराची अपेक्षा करनच एक चुक.......???
(No subject)
या कादंबरीत आमदारांचे नाव
या कादंबरीत आमदारांचे नाव कांबळे असे दिलेले आहे. देईना का. खरं म्हणजे कांबळे आडनावाच्या आमदारात एव्हढी हिंमत कशी आली हेच कोडं आहे. आमचे बापट काही कमी नाहीत. ही प्रतिक्रिया देण्याचे कारण म्हणजे बेफिकीर यांनी नुकतीच एका वाहत्या पानावर उधळलेली मुक्ताफळे. मुद्दाम टार्गेट केल्याचा आरोप त्यांनी एका नवीन लेखकावर केलेला आहे. त्यांचे हे मत पाहता या कादंबरीतली नावे निवडताना त्यांचा असा काही हेतू असावा का ? चोराच्या मनात म्हणतात तसं काही नाही ना ?
त्यांना काहीही उधळायला आणि मुक्तपणे बागडायला परवानगी असल्याने आपण दुस-यावर जी टीका करतो ती आपल्या स्वतःला लागू नाही हा त्यांच समज आहेच.
त्याच पानावर आपले सगेसोयरे आणि जातभाई यांची भरती चालू असल्याने मायबोलीवर फार काळ राहणे शक्य नाही असेही म्हटले गेलेले आहे. ही कादंबरी चालू असताना बेफिकीर यांनी अॅडमिनला त्यांचे काही सगेसोयरे अॅडमिनवर येणार असल्याचे कळवल्याचे आठवते. त्या वेळी बहुतेक मुक्त प्रवेश होता.
स्क्रीनशॉट्स आहेत .




अनायासेच हा बाफ वर आल्याने
अनायासेच हा बाफ वर आल्याने आठवलं. तक्रार वगैरे तेव्हाही केलेली नाही, आताही इच्छा नाही. महाराजांच्या वक्तव्यांना आरसा दाखवला फक्त
हिज हायनेस यांच्य लिखाणातले अश्लील उतारे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गलिच्छ शब्द यांची लिंक किंवा स्क्रीनशॉट्स देणे अशक्य नाही. पण ब-याच जणांना ते ठाऊक असल्याने वेळ घालवित नाही. धन्यवाद.
befikir tumchya likhanala
befikir tumchya likhanala paryay nhi.... akda survat keli ki bndch kru vatat nhi.... hatsoff...
तुमची लिखाण शैली प्रचंड आवडली
तुमची लिखाण शैली प्रचंड आवडली मला हॉफ राईस दाल मारके पण वाचालीय मी...मला तुमच्या लिहिलेल्या कथा फार आवडतात... अजून अश्या उतकंठावर्धक कथा वाचायला खूप आवडेल...
खूपच छान आहे
खूपच छान आहे
नासण्यापूर्वीची मायबोली
नासण्यापूर्वीची मायबोली
पुन्हा वाचली
पुन्हा वाचली
Pages