वसंता आणि त्याची सेना

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

विशेष सूचना : प्रस्तुत वृत्तांतातील सर्व व्यक्ती आणि प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सक्रिय वा रोमन मायबोलीकराशी वा अन्य वृत्तांतांतील घटनांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.

**********************************************************

झालं काय, की ५ फेब्रुवारी २०१०ला लालू या आयडीने मायबोलीवर रीतसर बाफ वगैरे काढून सैन्यभरतीबद्दल आवाहन करायला सुरुवात केली. एक ठिणगी पडावी आणि पाहता पाहता वणवा पसरावा तशी संपूर्ण मायबोलीभर बातमी पसरली. (पसरली म्हणजे काय, लालूनेच रिक्षा फिरवून ती पसरवली. पण ते असो.)

<ललित ऊर्फ विषयांतर मोड ऑन>
त्याचं काय आहे, की एप्रिल महिन्यात आमच्याकडे वसंताचं आगमन होतं. तो आला, की इथली चेरीची झाडं नाजुक रंगांच्या फुलांनी अंगभर फुलतात. इथल्या बर्फाळ कठोर हिवाळ्यात ४-५ महिने काढल्यानंतर उबदार वातावरण आणि फुललेला निसर्ग सणासारखे भासतात. आणि हा सण इथे 'चेरी ब्लॉसम' म्हणून उत्सवासारखा साजराही करतात. राजधानी वॉशिन्ग्टन डी.सी.चा उत्सव म्हणजे तर अमेरिकन चेरी ब्लॉसम्सचा दगडूशेठ हलवाईच!

आता तुम्ही म्हणाल या सगळ्याचा सैन्यभरतीशी काय संबंध? ('ललित मोड' असं स्पष्ट लिहूनही तुम्ही त्यात संबंध शोधणार? कम्माल आहे!)

तर लालूचं घर (घर? राजवाडा म्हणायला हवं बहुतेक. किंवा राजेवाडा?) डीसीपासून जवळ असल्यामुळे सैन्यात भरती होणार्‍या मायबोलीकरांना इच्छा असल्यास दगडूशेठचंही दर्शन घेण्याची संधी मिळेल असा विचार तिने केला असावा. किंवा नसावा. मला नीटशी कल्पना नाही. ती गेले दोन महिने 'वसंता वसंता' करत होती इतकंच मला माहीत आहे.

<ललित मोड ऑफ>

तर तिने 'ऐन वसंतात एका दिवशी' तिच्या घरी यायचं जाहीर आमंत्रण मायबोलीकरांना दिलं. (उत्साहाच्या भरात अमेरिकेबाहेरच्या माबोकरांनाही दिलं असं ऐकून आहे. पण त्यांच्यापैकी कोणी आलेलं दिसलं नाही.)

अमेरिकेच्या 'ह्या' (म्हणजे इष्ट) किनार्‍यापासून ते 'त्या' (म्हणजे अनिष्... आपलं, वेष्ट) किनार्‍यापर्यंत वसलेल्या तमाम मायबोलीकरांना सैन्यात दाखल व्हायची स्वप्नं पडायला लागली. सर्वांनी तत्काळ नावनोंदणीला सुरुवात केली. ही यादी रोज बदलत होती. शिवाय तीत 'मी येणार म्हणजे येणारच', 'तारीख बदला ना', 'मी येईन पण माझं कुटुंब नाही', 'माझं कुटुंब येईल पण मी नाही', 'मी एकटा येईन पण दुकटा जाईन', 'मी येईन, पण मग जाणार नाही' या आणि अशा अनेक उपयाद्या तयार होत होत्या. बेत बनत होते, ढासळत होते. कोणी प्लॅनिंग करायचं सोडून फाको करण्यात धन्यता मानत होते तर कोणी स्वघोषित पोलिस त्यांना तिथून आपापल्या बाफंवर हाकलत होते. कोणी शुभेच्छा देत होते, कोणी धावती बेरीज वगैरे करून देऊन यादी अद्ययावत् आणि उपयुक्त व्हायला मदत करत होते. पुढेपुढे पोष्टींची संख्या इतकी वाढत गेली की ती 'जाचक' बाफला मागे टाकणार की काय असं वाटायला लागलं. असो. (तो विषय नको!)

या मेळाव्याला काय नाव द्यावं अशी एक चर्चा पार्ल्यात झाली. (लालूनेच सुरू केली!) 'वसंत विहार' / 'वसंतोत्सव' वगैरे नावं फार गुळगुळीत वाटली. येणार्‍यांत बरेच पार्लेकर असल्यामुळे 'वसंत आहार' नाव जास्त शोभेल असा एक प्रस्ताव आला. 'वसंत कूजन' की कायसंसं नावही सुचवलं गेलं. पण याआधीच्या जीटीजींच्या अनुभवावरून मायबोलीकर करतात त्याला 'कूजन' पेक्षा कल्लोळ शब्द जास्त उचित ठरेल या विचाराने 'वासंतिक कल्लोळ' असं नामकरण झालं. वसंतात जमणार्‍या मायबोलीकरांना 'वसंतसेना' म्हणावं असंही तेव्हाच ठरलं.

हे लोण बारा, शिट्टी, अटलांटा, पार्ले अशा अमेरिकन बाफंवर पसरायला लागलं. सर्वात आघाडीवर (अर्थातच) बाराबाफ होता. सर्वांनी एकत्र जायचं हे ठरवणं सोपं होतं. पण कधी निघायचं, कुठे भेटायचं, कोणी कोणाला किती वाजता पिकअप करायचं, बस लागेल की विनयची व्हॅन पुरेल, माणसं संख्येने वाढली तर काय करायचं, आकाराने वाढली तर काय करायचं - असे अनेक गहन प्रश्न होते. (हे प्रश्न गहन आहेत हे समजून न घेता तिथे येऊन खिल्ली उडवणारी मंडळी स्वत: उशीरा पोचली यात नवल ते काय? पण आपण त्याबद्दल सविस्तर आणि वारंवार बोलूच.) झालंच तर गाडीत खायला कोणी काय आणायचं याचं प्लॅनिंग करायचं होतं. (खाण्याची चर्चा असून बारावर झाली बरं का, पार्ल्यात नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी!)

सगळा उत्साह अगदी दृष्ट लागण्याजोगा होता. मग वसंताने एक आठवडा आधीच येऊन त्याला तीट लावली. लालूनेही एक एप्रिलला 'जीटीजी कॅन्सल' अशी पोस्ट टाकून सेनेला 'एप्रिल फूल' बनवायचा प्रयत्न केला. (सो लेम ना!) झक्कींनी 'तळ्यात मळ्यात' नाटकाचे काही प्रयोग केले. पण प्रेमळ मायबोलीकरांच्या आग्रहाने हा तळ्यातला गणपती शेवटी मळ्यात आला.

हा हा म्हणता जीटीजीची पूर्वरात्र आली. विमानाने येणारे कंपू आपापल्या वेळी प्रस्थान ठेवते झाले. पहाटे निघणार्‍यांची ट्रिपला जाणार्‍या शाळकरी मुलांसारखी झोप उडाली. वसंतावर शुभेच्छांचा पाऊस पडला.

मला पहाटे पावणेपाचला 'मी निघालो आहे' असा झक्कींचा फोन आला. बरोब्बर पाच म्हणजे चार सत्तावन्नाला ते माझ्याकडे पोचले. माझ्याकडून सायोचं घर अर्ध्या तासावर. तेवढ्या वेळात मला
>झक्की काही काळ इन्डोनेशियात होते
>भारतीय माणसे हुशार असतात
>कसली हो हुशारी - लबाड नुसते!
>भारतीयांना बिझनेस सेन्स नाही
>बिझनेस करावा तर भारतीयांनीच
असं बरंच मौलिक ज्ञान प्राप्त झालं. सायोशी आदल्या रात्री त्यांचं बोलणं झालं होतं. 'पसैक अ‍ॅव्हेन्यूवरून या, सीआयटीच्या बाजूचं गेट बंद असेल' अशी सुस्पष्ट सूचना तिने दिली होती. पण फार पूर्वी (म्हणजे माझे बाबा हाफपँटमधे असताना) त्यांचं ऑफिस त्या भागात होतं आणि तिथे ते सीआयटीवरून जायचे म्हणून ते तरीही सीआयटीवरच गेले. सायोच्या कॉलनीचंच काय, इतरही दोनतीन बंद गेटं (ऊर्फ थुफो) आम्ही पाहून घेतली. (त्याला ते नंतर साईटसीइंग म्हणाले.) नशीबाने तेवढ्यात बुवांचा फोन आला, आणि आमचं गाडं वळणावर आलं.

सायोने पोहे आणणार असं सांगितल्यामुळे बरेच दिवस आम्ही तिला वचकून होतो. (संदर्भ : अन्नातून विषबाधा) आम्ही पोचल्याचा फोन केल्यावर ती पोह्याचं पातेलं घेऊन खाली येईल अशी आमची समजूत. पण तिने अस्सल मुंबईकरणीच्या अगत्याने सर्वांना (मी, झक्की, बुवा आणि देशपांडे) वर घरी नेऊन चहा पाजला. पोहे मात्र बसमधे खायला डब्यात भरून घेतले. (यावर 'चहा मिळतो, पण पोहे मिळत नाहीत' असं एक हृदयद्रावक ललित लिहीन लवकरच.) आम्ही पाच जण बरोब्बर ७:०५ला विनयकडे पोचलो. भाई आणि अतिथी ऑलरेडी आले होते. राहता राहिली मैत्रेयी. 'इथे कॉर्नरवरच आहे, पोचतेच' असा तिचा फोन आल्यालाही १५ मिनिटं होत आली. विनयचा पारा चढायला लागला. (खरंतर त्यात चिडण्यासारखं काय आहे? ती सर्वात जवळ राहते म्हणजे सर्वात उशीरा येणार हे उघडच होतं!) पण तेवढ्यात सुदैवाने तिची गाडी दृष्टीपथात आली आणि ग्रहण सुटलं!

बरोब्बर ७:२० ला 'पुंडलीक वरदे हाऽऽऽरी विठ्ठल'च्या गजरात 'बाराची गाडी निघाली'. भाई डायवर, विनय किन्नर, झक्की आणि बुवा स्पीकर आणि बाकी लिसनर अशी कामांची विभागणी होती. अतिथींपैकी एक राजश्री कुलकर्णी (जयाविची बहीण), आणि वृंदा आणि त्यांची मुलगी प्राची या रोमन मायबोलीकर. रोमात राहून त्यांनी केलेला अभ्यास वाखाणण्याजोगा होता. जरा उन्हं चढल्यावर झक्कींनी 'आता बिअर चालेल' असं म्हटल्याबरोब्बर प्राचीने 'म्हणजे रंपा ना?' असं विचारून त्याची चुणूक दाखवली. (अजून ग्रॅड नाही तोच ही तयारी! आजकालची मुलं म्हणजे!!)

नऊच्या सुमाराला विनयने त्याच्या पोतडीतून वडापाव काढले. अगदी मुंबई-पुणे प्रवासात कर्जत आल्यासारखं वाटलं. बुवांनी कचोर्‍या, मी चितळेंच्या बाकरवड्या, मैत्रेयीने सोनपापडी - असं काय काय आणलं होतं. पण बाराच्या बशीचं अन्नपूर्णा अवॉर्ड वृंदा यांनाच. त्यांनी तिखटामिठाच्या पुर्‍या, रिकोटा चीजचं पुरण भरलेल्या गोडाच्या पुर्‍या, आलेपाक, चॉकोलेटमधे बुडवलेल्या स्ट्रॉबेरीज असे बरेच लज्जतदार (यम्म्म्म्मी) प्रकार करून आणले होते. बुवा, मी आणि मैत्रेयी तर बोलूनचालून पार्लेकर! पण उर्वरित बाराकर प्रवाश्यांनीही सगळ्या खाऊला उत्तम न्याय दिला. यापुढच्या सर्व जीटीजींना वृंदा यांची उपस्थिती आवश्यक झाली आहे.

मधेच सिंडीचा फोन आला. 'आम्ही निघालोय' असं ती म्हणाली खरी, पण काल रात्री की आज सकाळी ते तिला सांगता येईना. त्याच गोंधळात 'वेळेत पोचायचं म्हणून आंघोळी केलेल्या नाहीत' असंही ती बोलून गेली. आता यांनी नेमक्या कधीपासून आंघोळी केलेल्या नाहीत या विचाराने बाराकरांना घाम फुटला.

लालूच्या घरी खरंतर अकरापर्यंत पोचायचा बेत होता, पण आम्हाला पोचायला अकरा वाजले. शोनू, सशल आणि सीमा आदल्या रात्रीपासून रहायला होत्या. सशल गात गात पुढे न आल्याने माझा बराच वेळ ती सशलच आहे यावर विश्वास बसे ना. पण बाकी कोणीच त्या आयडीवर हक्क सांगायला पुढे आलं नाही, तेव्हा मान्य करणं भाग पडलं,

बाहेरगावांहून येणार्‍या बशींमधे (अर्थातच) बाराचीच बस सर्वात आधी आणि वेळेत पोचली हे इथे नमूद करायला हवं. ही बाब सेलिब्रेट करायला बिअरच्या बाटल्या आणि अ‍ॅपेटायझर्स निघाली. बाराकरांनी बसमधे खाण्याची प्रॅक्टिस केली होतीच, ती आता उपयोगी पडली. बोलण्याचीही. 'आवाज कुणाचा' याचं उत्तर काय आलं असतं हे मी निराळं सांगायला नको.

यानंतर (म्हणजे बाराकर वेळेवेर पोचून त्यांची अ‍ॅपेटायझर्स खाऊन झाल्यानंतर) बाकी मंडळी हळूहळू उगवायला लागली. यात रॉनी पॉटवाला, नितीन बडबडे, ज्ञाती आणि कं., सुमंगला आणि त्यांचे श्री, अटलांटा कंपू १ आणि २, अ‍ॅडमिन आणि झारा, वेबमास्तर आणि भावना, अंजली आणि श्री. अंजली ही मंडळी होती. (क्रम चुकला असेल, पण ते जाऊ दे. बाराकर प्रथम पोचले हे कळलं की झालं. बाकीचा क्रम महत्त्वाचा नाही.)

मग एक महत्त्वाची घटना घडली. (नाही नाही, शिट्टीकर अजून पोचलेच नव्हते!) श्री. धनंजय सकाळी बाहेर गेले होते ते परतले आणि त्यांनी बार ताब्यात घेतला. (बार आणि अ‍ॅपेटायझर्स बेसमेंटमधे होते.) मग गप्पांना आणखीनच रंग चढला. (झक्कींनी कोणालातरी 'तुम्ही ते नवीन आयमॅड घेतलं की नाही अजून?' असं विचारल्याचं आठवतं.) श्री. धनंजय अत्यंत हसतमुख आणि सौम्य व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण व्हर्जिनियात कोणालाही कसलाही संगणकविषयक प्रॉब्लेम आला तर ते तो चुटकीसरशी सोडवतात असंही नंतर झकास यांच्याकडून कळलं. त्यांनी केलेल्या मार्गरिटाज् चाखल्यावर मला त्याबद्दल शंकाच नाही. परफेक्शनिस्ट माणूस करेल ते काम परफेक्टच करतो.

प्लेट्स, नॅपकिन्स, ग्लासेस इ.ची 'थीम' चेरी ब्लॉसम हीच होती - हे लालूने सांगितल्यावर मला कळलं. (खरा वाचक खाण्याचा कागद वाचतो, त्यावरची चित्रंबित्रं बघत नाही.)

शिट्टीकर (अजूSSSSन) आलेच नव्हते!!
इतक्यात कोणीतरी पग्या 'सहकुटुंब' येणार नसल्याचं सांगितलं. बायकोला घरी तिच्या सासूसासर्‍यांची सेवा करायची संधी मिळावी म्हणून हा बेत ठरवल्याचंही कळलं. त्यामुळे संयुक्ता सोल्जर्स त्याची आतुरतेने वाट बघायला लागले. तो आल्यावर प्रत्येकीने स्वतंत्रपणे त्याला 'काय रे, बायकोला नाही आणलंस का?' एवढा एकच प्रश्न विचारला. ('आणलंस' हा शब्दच मुळात अपमानकारक आहे हे कोणाच्या लक्षात आलं नसावं.)

सीमा आणि शोनू यांचे एव्हाना तीन तीन तरी कॉस्च्यूम्स बदलून झाले होते.

शेवटी एकदाचे शिट्टीकर उगवले! बुवांनी प्रत्येक ग्रूप आला की 'बशीत बस कोणाची? बाराची!!' असं ओरडण्याचा प्रघात तोवर पाडला होता, म्हणून बाराकर तेव्हाही तसं म्हणाले. त्यात शिट्टीकरांसाठी स्पेशल असं काही नव्हतं. (आंघोळी न करताही उशीरा पोचणार्‍यांसाठी काय म्हणून काही स्पेशल करावं?)

इतक्यात लालूची 'जेवायला चला' अशी रिक्षा फिरली. सगळा सरंजाम वर किचनमधे होता. मेन्यू वसंताच्या बाफवर सविस्तर लिहिण्यात आला आहे, तेव्हा रिपीट करत नाही. (पुन्हा पुन्हा पोस्टायला ती काही जुन्या माबोवरील कथाकादंबरी नव्हे!)

बरेच पदार्थ होते, सगळेच चवदार होते. लालूने 'अपने हाथोंसे बनाया हुवा' चिकनचा पांढरा रस्सा बेष्टेष्ट होता. भावना सगळ्यांना आग्रह करकरून गुलाबजांब वाढत होत्या. परागने सकसच्या खव्याच्या पोळ्या आणल्या होत्या. शिवाय त्या एका वेळी चतकोराच्या वर खाल्लेल्या चालतात असंही त्याने स्पष्ट केलं. (त्यामुळे त्याच्या बायकोचा विषय तांतडीने विस्मरणात गेला! बहुतेक त्याच्याही!)
डेजर्ट्समधे मँगो पाय आणि रॉनी यांचे स्पेशल तिरामिसूही होते असे (मला आजच) कळले. असो.

हवामान उत्तम होतं, त्यामुळे काही मंडळींनी डेकवर आपली पंगत केली होती. मुलंतर जवळपास दिवसभर बॅकयार्डमधेच हुंदडली (असावीत. कारण दिवसभरात मला ती दिसलीच नाहीत!) अ‍ॅडमिन जातीने फिरून सगळ्या ग्रूप्समधल्या चर्चांवर नजर ठेवून होते. (तारेत होते की कसं ते कळायला मार्ग नव्हता.)

जेवणानंतर खाली बेसमेंटमधे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी जीटीजी संयोजक लालू आणि कं., आणि प्रमुख पाहुणे वेबमास्तर आणि अ‍ॅडमिन यांना उपस्थितांनी चेरी ना चेरीची पाकळी म्हणून प्रेमाची भेट दिली. यानंतर विनयचा 'उ.उ.वि.'चा कार्यक्रम झाला. मंडळी ब.ब. पोट धरधरून हसत होती. मी, झारा, मो, बारीशकर, बुवा, स्वाती दांडेकर, सुमंगला, विनय इ.नी गाणी म्हटली. झारा, मो यांसारखे बरेच उत्तम गाणारे छुपे रुस्तुम यांतून लोकांपुढे आले. झकास यांनी पाडगांवकरांची एक कविता आणि मी आणि राजश्रीने स्वत:चीच एकेक कविता सादर केली. वेबमास्तरांनी 'निघून गेली माझी (नसलेली) मामी' हे कारुण्यपूर्ण गीत सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांतून टच्कन पाणी काढलं. तेव्हा लालूने सांत्वनपर \चहा सर्व्ह केला. ('वाजले की बारा' हे गाणं बाराचं 'अ‍ॅन्थम' झालेलं दिसतंय. पुढच्या जीटीजीपर्यंत मला ते नीट पाठ करायला हवं. ते म्हणताना भाई आणि विनय 'कोरस देतो' असं सांगून भच्या म्हला टो झाले हे ही नमूद करायला हवं. याचा टो आयडीशी काही संबंध आहे का काही कल्पना नाही. झाराने मात्र अ‍ॅडमिनिणबाईंच्या हुद्द्याला जागून मला शब्द पुरवले.)

यानंतर ओळखपरेड झाली. (त्याआधी नवीन मायबोलीकरांवर 'ओळखा पाहू'चे प्रयोग झाले होतेच.) सर्वांनी आपापली नावं, आयडी, मायबोलीवर कसे आलो, आल्यावर काय केलं (आणि काय नाही!), कोणाकोणाशी भांडलो, पुढे काय करायची इच्छा आहे (यात नावडत्या माबोकरांसाठी सुपार्‍या देणे / घेणे असेही प्लॅन्स कळले) इ.बद्दल सांगितलं. सीमाने काही व्यक्तिगत प्रॉब्लेम्स जाहीरपणे सांगितले. (कोतबोचा प्रभाव असावा.) वेबमास्तरांनी 'काही झालं तरी शेवटी भावना महत्त्वाची!' असं डिक्लेअर करून टाकलं. या राऊंडचे 'सेलेब्रिटी' अर्थातच झक्की होते. त्यांची चौफेर फटकेबाजी पाहून सर्वजण नव्याने त्यांचे फॅन झाले. यात विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे सुमंगला यांचे यजमान, जे हिंदीभाषिक आहेत, ते माबोकरांचा कल्लोळ ऐकून इतके प्रभावित झाले (की वैतागले?) की पुढच्या जीटीजीपर्यंत त्यांनी स्वतः(च) मराठी शिकण्याचा निर्धार केला आहे.

इतकं होतंय तोवर विनय बाराकरांना 'सात वाजले' म्हणून खुणा करायला लागला. खरंच तोपर्यंत (म्हणजे लालूकडे सर्वात आधी आणि वेळेत पोचल्यावर) घड्याळ नावाच्या वस्तूचा विसर पडला होता. मग अचानक पुस्तकं, मसाले, बी-बियाणे यांच्या देवाणघेवाणीची गडबड सुरू झाली. (त्यात सिंडीसारख्या मंडळींनी हात धुवून घेतले असं कळलं. असो.)

लालूचे घाईघाईने आभार मानून आणि सर्वांचा निरोप घेऊन बाराची गाडी परतीच्या वाटेला लागली. आता विनय डायवर आणि बुवा किन्नर होते. भाई मागे डुलक्या काढत होते (पण बस थांबली की बरोब्बर जागे होत होते!) मंडळी बोलून आणि हसून दमल्याचं सांगत होती खरी, पण तरीही बोलत होतीच. झक्कींचा स्टॅमिनातर वर्णनातीत आहे! बस अजून निघालीही नव्हती तोवर बुवा पुढल्या जीटीजीचं प्लॅनिंग करायला लागले होते. एकूण हा माहौल संपूच नये असंच प्रत्येकाला वाटत होतं. बसमधे पुन्हा खादाडी झालीच. (बाराकरांना पार्लेकरांचा वाण लागल्याचं लक्षण, दुसरं काय!) आणि या सगळ्या भानगडीत सायोने इतक्या कौतुकाने केलेले पोहे खायचेच राहून गेल्याचं (आणि डबा लालूकडे विसरून आल्याचं) लक्षात आलं. (इतके दिवस वचकून राहिलेलं मेलं फुकटच गेलं!)

मग जाताना होता त्याच्या उलट्या क्रमाने बाराकर मंडळी पांगत गेली. झक्कींनी मला घरी सोडलं तेव्हा रात्रीचे सव्वा वाजले होते. पोट भरलं होतं, पण (सकाळी पाच ते रात्री सव्वा झक्कींचं ऐकूनही) मन भरलं नव्हतं.

दिवसभर मांडलेल्या गोंधळातून मायबोलीच्या ऋणानुबंधांचा एक अंतस्थ सूर भरून उरला होता. आंतरजालावरच्या ओळखी भासमान (व्हर्च्युअल) म्हणतो आपण, पण घरी कार्य काढावं तसा लालू हे जीटीजी ऑर्गनाईझ करते काय, इतक्या लांबलांबून घरच्या कार्याला यावं तसेच अगत्याने माबोकर हजेरी लावतात काय, वय-हुद्दे सगळं विसरून थट्टामस्करी, गप्पाटप्पा करतात काय.. सगळंच अतर्क्य आणि हृद्य! काही गोष्टींचं फार अ‍ॅनालिसिस करायला जाऊ नये हेच खरं.

विषय: 
प्रकार: 

मस्त एकदम. Lol
मी आल्या आल्या तुला ओळखल. या वरुन मी मनात विचार केलेल्या प्रमाणेच दिसतेस हे ध्यानात घ्यावे.:P

सगळच कवर केलस!! ती मार्गारिटा वर्जिन प्यायलो असतो तर बर्‍याच गोष्टी लक्षात राहिल्या असत्या! असो, मस्त लिहीलय!
Happy

भारी वृत्तांत बाई.

उशीर होऊ नये म्हणून मी एक एप्रिललाच आंघोळ केली होती. पण फचिन आणि चमन ह्या दोन टीनएजर्सनी आवरायला फार वेळ घेतला.

मस्त वृतांत...
आम्ही ४ पोरांना घेउन येत होतो हे सगळी मंडळी सोईस्करपणे विसरली. त्यातल्या २ पोरांनी सिंडी सांगत्ये तसा नटायला बराच वेळ खाल्ला.

अरे अम्हाला तर वेगळीच बातमी दिली फचिन नी. सगळ्यात जास्त वेळ सिंड्रेला ला लागला म्हणे आवरायला. आणि शिट्टीतुन ७ सुंदर्‍या येणार होत्या म्हणे? टोटल ४ जणींचीच लागली फक्त.

स्वाती,
सही लिहिलाय वृतान्त..:).
करमणुकीच्या कार्यक्रमात फक्त गाणीच का?..डान्स वगैरे नाही ?? Proud

<<स्वातीचे पपेट्स >>
पपेट्स कसले, कैदी म्हणा. घट्ट धरून ठेवला होता नवर्‍याचा हात सग्गळा वेळ! बेडी घातली नव्हती इतकेच!
मागून काही लोकांनी सांगितले की तो प्रेमाने धरला होता. बायको नवर्‍याचा हात प्रेमाने धरते हे असले मला कुठून आठवणार? मला आपले बेडी, कैद असलेच वाटले.

स्वाती: Light 1 Light 1 Light 1

स्वाती मस्त व्रुतांत. मो, झारा आणि तुझी सगळ्यांची गाणी मस्त झाली. मो ने तर खरच surprise package दिलं. आम्ही इतक्यावेळा अटलांटामध्ये गटग केलं पण आम्हाला तिने पुसटशी कल्पनासुध्दा दिली नाही.

वा वा मजा आली वाचून. आणि शिट्टीकर, अटलांटाकर आणि खुद्द डीसीकर यांचे वृ. कोठे? या किनार्‍यावरचा वृ. आम्ही येथील मिनि-गटग मधे मिळवू Happy

यावर 'चहा मिळतो, पण पोहे मिळत नाहीत' असं एक हृदयद्रावक ललित लिहीन लवकरच.)>>smiley36.gif
स्वाती! व्रुतांत झक्कास्!(आयडि नव्हे)

Pages