सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ९

Submitted by बेफ़िकीर on 12 April, 2010 - 11:00

अहिंसा क्रान्ती पक्षाच्या कार्यालयातील हरकाम्या संजय यास आज पहिल्यांदाच इतके अर्जंट काम मिळाले होते. तेही रात्रीचे! नवीन जिल्हा उपप्रमुखांनी चक्क साडे सात वाजता ती सूचना दिली अन साडे नऊ वाजता कामाचा पहिला टप्पा पारही पडला होता. संजयला ’मीना कातगडे’ या व्यक्तीमत्वाबद्दल नितांत आदर निर्माण झाला होता. याची एकापेक्षा जास्त कारणे होती. एक तर आधीच्या कार्यालय प्रमुखांपेक्षा मीना त्याला जास्त आदर किंवा खरे तर ’आदर’ देत होती. दुसरे म्हणजे, तिची तडफ़ अचाटच होती. आणि तिसरे म्हणजे संजय हा स्वत: चांगल्या स्वभावाचा व नीतीमूल्यांचा माणूस होता. मीनाताईंच्या बोलण्यातील अर्जन्सी समजल्यावर त्याने क्षणाचाही वेळ न दवडता यंत्रणा तुफ़ान वेगात कार्यरत केल्या होत्या. त्या यंत्रणांमधील माणसांनाही त्यांचे नेहमीचे काम कधी अशा प्रकारे अती अर्जंन्सीमधे करायची सवयच नव्हती. पण पक्षाच्या निधीतून वाजवीपेक्षा अधिक मूल्य मीनाताईंनी ’ऎप्रूव्ह’ केल्यामुळे ते लोकही उत्साहीत झाले होते. आणि कामाचा शेवटचा टप्पा साधारण पहाटे चार वाजताच पूर्ण करून ते सगळे लोक निवांत साखरझोपेच्या वेळेला झोपायचा प्रयत्न करणार होते.

त्याच वेळी विकी बारटक्के भयानक घाबरलेला होता. त्याने मणीला सगळा प्रकार साद्यंत समजावलेला होता. आणि तो प्रकार ऐकून मणी तर हादरलेलाच होता.

विकी बारटक्के - विशाल लॊजचा मालक! मणी, तेथील वेटर, ज्याला त्या प्रकाराची पूर्ण माहिती असायची! दोघेही मुळापासून हादरलेले होते. आजच सायंकाळी अचानक विकीला पार्टीच्या कार्यालयात बोलावणे आले होते. पेपर वाचलेलेच होते त्याने. पळ काढायचा थोडासा विचार आधीपासूनच त्याच्या मनात डोकावू लागला होता. मात्र, काय होते ते तरी बघावे असे म्हणून तो मीनाला भेटायला आला होता.

तब्बल वीस मिनिटे मीना एकटीच बोलत होती. विकी अवाक होऊन ते बोलणे ऐकत होता. ’हे काय हे?, आपण हे कसे काय करायचे’ इतकाच विचार त्याच्या मनात घोळत होता. याच विचारात तो कार्यालयाच्या बाहेर पडला तेव्हा त्याला एकच गोष्ट जाणवली. ती म्हणजे सध्याचे दिवस मीनाचे आहेत. ती म्हणेल तसे होण्याची शक्यता आहे. आधीच नंदन अन माधव आत आहेत. आपण तर सरळ सरळ प्रत्यक्ष गुन्हेगार! आपल्याला आत व्हायला एक क्षणही पुरेसा ठरेल. नुसते नंदनने नाव घेतले तरी आपण कोठडीत! पण तरीही त्यात ही नवीन प्रमुख झालेली मुलगी सांगते की ’मी तुला वाचवेन’? खरच वाचवू शकेल का ती? नाही वाचवू शकली तर? आपण आत! इतके नक्की! पण... जर.. वाचवू शकली तर मात्र आपण... खरच वाचू! मग ती म्हणते तसे करायला काय हरकत आहे? नाही केले तर निश्चीत आत, केले तर कदाचित ती वाचवणार, म्हणजे ती तर नक्कीच म्हणते आहे, पण जिची आपण सी.डी. रेकॊर्ड केली ती आपल्याला वाचवेल? असो! सध्या त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. आपल्याला बोलवून ती इतक्या गोष्टी सांगते ... याची तरी तिला कुठे गरज होती? ज्या क्षणी तिला आपले नाव कळले असेल त्या क्षणीच ती सरळ चौकीला फ़ोन करू शकत होती. पण तिने केला नाही. .. कदाचित.. अगदी कदाचितच.. अशी शक्यता आहे की आपण वाचू! पण त्या शक्यतेसाठी तरी तिची मदत केलीच पाहिजे.

संजय आणि विकी व त्याचा साथीदार मणी मीनाने सांगीतलेल्या कामगिरीसाठी कार्यरत असतानाच मीना भाऊंच्या खोलीत प्रवेशलेली होती.

नाकावर ताजी जखम, दिवसभर झालेल्या भयानक प्रसंगांचा प्रभाव तोंडावर, डोळ्यात मीनाबद्दल कोणतीही आसक्ती नाही, उलट तिचा भयानक तिरस्कार, या मुलीला बरबाद करण्याची एकमेव इच्छा उरलेली, दोन दिवसात विविध आघाड्यांवर झालेल्या दारूण पराभवांचा अपमान!
भाऊ या सगळ्यामुळे भयानक दिसत होते.

आणि मीना! केवळ चार दिवसात अनंत दिव्ये पार केलेली कोवळ्या वयाची मुलगी! जिला फ़क्त आई होती या जगात! आत्ता त्याच राक्षसासमोर होती ज्याच्यामुळे हा सगळा नरकप्रवास सुरू झाला होता. ठिकाणही तेच, वेळही साधारण तीच!

त्या खोलीतील प्रत्येक वस्तू तिच्या परिचयाची होती. सोफ़ा, त्यावरील कुशन्स, टी.व्हीची जागा, बेड, बेडवरील चादरी, उशा! सगळं सगळं!

अत्यंत तिरस्करणीय!

मात्र, आत्ताची परिस्थिती उलटी होती. त्यादिवशी सारखी नव्हती.

त्या दिवशी मीना शिकार होती अन भाऊ शिकारी, आज उलटे होते.

भाऊ - हं! मी ना का त ग डे... जिल्हा उपप्रमुख... जिची अब्रू आहे तिच्या कनिष्ठ पातळीच्या अधिकारी व्यक्तीच्या हातात

भाऊंच्या त्या जखमी भयानक तोंडावरील जळजळीत व छद्मी भावना पाहून त्याही परिस्थितीत मीना शहारली.

काही असले तरी सदू शेवटी त्यांचा वर्षानुवर्षांचा नोकर होता. अनैतिक मुलगा होता... आणि... ती त्यांच्या खोलीत आजही एकटीच होती.

आज भाऊंनी काही केले असते तर...? पुन्हा....?

झटकन मीनाने हे विचार मनातून दूर सारले. भाऊंना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक होते.

मीना - खरच? एका स्त्रीच्या अब्रूशी एखादा माणूस असा खेळू शकतो?
भाऊ - खेळू? खेळणार नाहीये आता... आता गल्लीतील पोरेसोरे तुला पाहतील.. त्या सी.डी.त
मीना - असं? असं काय आहे बरं त्या सी.डीत?

भाऊ मोठा विनोद झाल्यासारखे हसले.

भाऊ - काही नाहीये.... फ़क्त जिल्हाउपप्रमुख बाई धंदा करताना दाखवल्या आहेत...
मीना - त्या सी.डीसाठी तुला काय पाहिजे ते एकदाच सांग..
भाऊ - तुला? तू मला ’तुला’ म्हणतेस?
मीना - तुझ्याच घरात..! ती सी.डी. परत देण्यासाठी तुला एकदाच काय पाहिजे ते सांग...
भाऊ - विसर! सी.डी. विसर.. आता सगळं विसर! तुला वेळ दिला होता
मीना - कसला वेळ?
भाऊ - नंदन अन माधवला सोडवायचा, केसेस मागे घ्यायचा.. तू ते केले नाहीस...
मीना - मग? तुला काय अडचण आहे? तू तर अडकलेला नाहीयेस ना?
भाऊ - मुडदा पाडीन पुन्हा ’ए’ म्हणालीस तर...
मीना - कुत्रा... कुत्रा म्हणते मी तुला... पुढे बोल

भाऊ किमान वीस सेकंद मीनाकडे भयानक रागाने बघत होते. नंतर तिच्या धमकीमधील फ़ोलपणा आठवल्यावर ते पुन्हा हसू लागले.

भाऊ - कुत्रा... कुत्रा नाही का? तुला कुत्रा फ़ारच आवडतो म्हणायचा.. नाही का?.... सद्या.... रोमूला वर घेऊन ये....
मीना - मी आत्ता चौकीवर कंप्लेंट देऊ शकते तुझ्याविरुद्ध! हे तुझ्या लक्षात नाही येऊ शकत का?
भाऊ - कसली कंप्लेंट? स्वत:ची अब्रू घालवशील? घालव! चल आत्ताच्या आत्ता!
मीना - तू म्हणतोयस ते खरं आहे...मी तसं करू शकणार नाही...

भाऊ पुन्हा हसायला लागले.

मीना - मी तसं अजिबातच करू शकणार नाही
भाऊ - जरा.. उशीराच उपरती झाली... अं?
मीना - तुला...
भाऊ - मला... मला उपरती? तुला तुझ्या अब्रूची किंमत आत्ता कळलीय...
मीना - माझ्या अब्रूची किंमत मला माहीत आहे... पण मी पोलीस स्टेशनवर स्वत:ची अब्रू घालवू शकणार नाही
भाऊ - चल... चौकीवर फ़ोन कर... म्हणाव माधव अन नंदन दहा मिनिटात मोकळे झाले पाहिजेत

मीनाने चौकीवर फ़ोन लावला.

मीना - वाघमारे
वाघमारे - कोण?
मीना - मीना कातगडे
वाघमारे - मॆडम... बोला मॆडम...
मीना - त्या दोघांना पकडलंय ना?
वाघमारे - हा मॆडम
मीना - त्यांच्याच बरोबर त्यांच्या म्होरक्यालाही पकडायचंय... ... काय? ऐकू आलं का?

तिकडॆ वाघमारे निशब्द झाला होता अन इकडे भाऊंनी मीनाच्या हातातला फ़ोन जोरात ओढून क्रेडलवर आपटला.

भाऊ - हुषार आहेस. चालती हो. उद्या स्वत:लाच पहा... बाजारात तुझ्या सी.डी. उपलब्ध असतील... अन पेपरात बातमीही असेल

मीना - बनसोडे... ज्या सी.डी च्या जोरावर तू शेपूट पिंजारतोयस ती तुझ्याकडे नाहीये...

या वाक्याचा अर्थ समजायलाच भाऊंना काही सेकंद लागले. त्यानंतर मात्र ते मनापासून हसू लागले.

हसता हसताच त्यांनी तिला जायची खूण केली.

मीना - बनसोडे.. एकदा शोध.. माझी सी.डी.

यावरही भाऊ हसले. मात्र त्यांना पूर्ण कल्पना होती. या पोरीने त्या दिवशी लाथ मारलेली होती. आज जर हिला सी.डी ची जागा समजली तर सदू वर यायच्या आत ही सगळ्या सी.डीज मोडून टाकेल. आणि आपले ब्रह्मास्त्रच नष्ट होईल. त्यामुळे ते तिच्यासमोर सी.डी. शोधण्याच्या भानगडीत अजिबात पडत नव्हते.

मीना - आत्ता शेवटची झोप घे या बंगल्यावर! उद्या दुपारी तू चौकीवर असशील.

भाऊ अजूनही हसतच होते.

मीना - अनेक मुलींच्या आयुष्याचे वाटोळे केल्याच्या आरोपावरून...

भाऊ हसता हसता थांबले.

भाऊ - आमदार बंडाभाऊ उद्या का येतायत माहितीय का? तुझा राजीनामा घ्यायला. आरोग्यमंत्र्यांनी सांगीतलंय.

या विधानावर मात्र मीना चरकली. भाऊ काही अगदीच फ़ालतू माणूस नाहीये हे तिला माहीत होतं! ज्या माणसाने आरोग्यमंत्र्यांशी बोलून बंगला वाचवला तो हेही कदाचित करू शकेल याबाबत तिच्या मनात शंका नव्हती. तिला काळजी पद जाण्याची नव्हती. काळजी होती सूड पूर्ण न होण्याची! पण तिने केलेल्या तयारीबाबतही ती कॊन्फ़िडन्ट होती.

मीना - सी. डी. शोध कुत्र्या... बाकी नंतर बोल....

मीनाही शेवटच्या अस्त्रावर आली. आता मात्र तिचा चेहरा पाहून भाऊंनाही शंका वाटू लागली. ही तीनतीनदा का म्हणते असं? सी.डी. शोध म्हणून?

भाऊंनी पटकन एका पूर्णपणे दुर्लक्षित असलेल्या डबडी वूडनपीसच्या बॊटमचा कप्पा त्या पीसखाली लपवून ठेवलेल्या किल्लीने उघडला.
.......
............
भाऊ हरलेले होते. संपूर्ण हरलेले होते.

मीना, एक कोवळ्या वयाची मुलगी... अगदी सहज जिंकली होती.

कप्प्यात एकही सी.डी नव्हती.

मीनाच्या तोंडावर बाजी जिंकल्याच्या भावना स्पष्ट होत्या. भाऊंचा चेहरा फ़ाटलेला होता.

"सदू....."

भाऊंची भयानक हाक बंगल्याच्या भिंतींनाही हादरवून गेली. हाकेचे प्रतिध्वनी मिटेपर्यंतच सदू दारात आला.

भाऊ - सद्या.. ***** .....तबकड्या कुठे आहेत? इथल्या?
सदू - .............
भाऊ - सद्या.... ********* तुला विचारतोय...
सदू - तुझ्या आया बहिणी होत्या त्याच्यात... पाहवलं नाही.. मोडून फ़ेकून दिल्या...

’तुझ्या’? ’आया बहिणी’? ’मोडून फ़ेकून दिल्या’???

हे वाक्य सदू बोलला? जो आपलाच अनैतिक पोरगा आहे? ज्याला आयुष्यात उभं राहायला आपण जागा घेऊन दिली?

सदू? आपल्या तुकड्यांवर जो आजवर जगला... तो?

भाऊ तीव्र संतापाने सदूला मारायला धावले. मधेच मीनाने त्यांच्या पायात पाय घातला. सपशेल लोटांगण घेत भाऊ सदूच्या पायांपुढे तोंड टेकून आपटले.

सदू - तू माझा बाप नसतास ना... मुंडकं तोडलं असतं तुझं.....

मीना चालत चालत दरवाज्यापाशी आली. आत्तापर्यंत भाऊ आधाराने उठून उभे राहिले होते. आज मीनाने पुन्हा भाऊंना जीव खाऊन लाथ मारली. भाऊ खाली बसत नडगी दाबत विव्हळले.

मीना - सदूला घेऊन चाललीय मी! उद्या दुपारच्या आतच तुला अटक होईल. पळून जायचा प्रयत्न करू नकोस...

आणि मीना सदूसह जिना उतरून जात असतानाच भाऊंनी तिला उद्देशून जे वाक्य उच्चारलं ...

त्याचा अर्थच मीनाला समजलेला नव्हता...

फ़क्त, इतकंच समजलं होतं, की प्रकरण वाटत होतं तितकं अजिबातच सोपं नव्हतं! तिचे अवसानच गळालेले होते.

आपण केलेल्या सर्व गोष्टींवर पाणी फ़िरल्याचे तिला समजले. आणि त्यामुळेच ती कधी नव्हे इतकी निराश झाली होती.

भाऊ म्हणाले होते...

ओरिजिनल सी.डी. तर केव्हाच पुढे पाठवलीय... आता तू संपणार आहेसच.....!

म्हणजे काय? ओरिजिनल सी.डी. पुढे पाठवलीय म्हणजे काय? जिन्याची एक एक पायरी उतरताना मीनाला ब्रह्मांड आठवत होते. कशासाठी पुढे पाठवलीय? कुणाला पाठवलीय? आणि पाठवलीय म्हणजे? विकलेली नाही, भेट म्हणून दिली नाही, कुणाला चुकून मिळालेली नाही... पाठवलीय! पाठवलीय म्हणजे हेतूपुरस्पर पाठवलीय. सी.डी. पाठवणे ही जणू एक नियमीत ऎक्टीव्हिटी असल्याप्रमाणे वाटतंय हे वाक्य!

मीनाने खाडकन जिन्यातच सदूकडे पाहिले. सदू याबाबतीत पूर्णपणे कोरा होता. त्याने ’काय माहीत’ अशा अर्थाचे हातवारे केले.

मीना आता बेभान झाली होती. स्वत:ची आहुती देऊनही हे प्रकरण संपत नव्हते. हे काहीतरी भयानक होते. यात काहीतरी ठराविक यंत्रणा होती. काहीतरी उद्देश होता.

मीनाने मनाशी ठरवले. आपली घराघरात बेअब्रू झाली, आपल्या आईला आत्महत्या करावीशी वाटली, लोकांनी आपल्याला पाहून शिट्ट्या मारल्या, आपला विनयभंग झाला... तरीही... तरीही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा. सोडायचं नाही! कुणालाच!

स्त्री बेभान होते तेव्हा भलेभले पराक्रमी पुरुष तिच्यापुढे नांगी टाकतात. याचे प्रत्यंतर येणार होतेच...

मीना आणि सदू बंगल्यातून निघून गेले तेव्हा भाऊंना दोनच गोष्टी आठवत होत्या. या सगळ्या भानगडीत शर्मिलाची सी.डी.ही गेली... आणि आरोग्यमंत्री हा एकच माणूस आपल्याला वाचवू शकेल.

सदूला अन मीनाला शिव्यांची लाखोली वाहात भाऊंनी प्रथम आपली दुखावलेली नडगी मलम लावून रिलॆक्स करायचा प्रयत्न केला. वेदना जाणवू नयेत म्हणून पटकन दोन तीन घोट ड्रायच लावले. त्यांची आवडती फ़ोर स्क्वेअर शिलगावून प्रचंड विचार करून शेवटी ते फ़ोनकडे वळले.

भाऊंनी रात्री नऊ वीस ला माने, म्हणजे मंत्र्यांचे सचिव, यांना फ़ोन लावला.

आश्चर्य म्हणजे माने सोलापूरलाच यायला निघाले होते. खास आरोग्यमंत्र्यांच्या हुकुमावरून! याचाच अर्थ, भाऊंना नीट समजला तो अर्थ, मंत्र्यांच्या दृष्टीने आमदार कच्चे होते व मानेंची या ठिकाणी जरूर होती. जिल्हाध्यक्षही निघाल्याचे मानेंनी सांगीतले.

भाऊ हुरळले नसले तरी मंद हासले. त्यांना विजयाची चाहूल लागलेली होती. वर्षानुवर्षे एकत्र काम केलेली मंडळी केव्हाच सहकारी, मित्र या पातळ्या ओलांडत आपुलकी या पातळीवर पोचलेली होती. तीच मंडळी उद्या येऊन बस्तान बसवून जाणार होती. मीना कातगडेचा राजीनामा घेऊन जाणार होती. आमदारांचे तोंड एवढेसे होणार होते. आणि त्यानंतर भाऊ मोकाट सुटणार होते.

भाऊंचा हात पुन्हा पुन्हा नाकाकडे अन नडगीकडे जात होता. त्या वेदनांमुळे त्यांना शर्मिला अन मीना दोघींचीही तीव्र आठवण येत होती. त्यातच सदूचे वाक्य कानावर आदळत होते. ’माझा बाप नसतास तर मुंडकं तोडलं असतं’! मुंडक तोडल्यावर मुंडक्याला अन उरलेल्या धडाला कसं वाटतं याचा अनुभव सदूला द्यायला हवा यावर भाऊ जसे ठाम झाले... त्यांनी वाघमारेला फ़ोन लावला.

भाऊ - वाघमारे, सचिव येतायत, जिल्हाध्यक्ष येतायत, बाजी आपण जिंकलेली आहे.

भाऊंना हे वाक्य बोलल्यावर आणखीन एक धक्का बसला. वाघमारेने अवाक्षर न उच्चारता फ़ोन आपटला होता. वाघमारे असे वागण्यामागे एक कारण होते...

चौकीवर विचित्रच प्रकार घडत होते. शर्मिलाचे नाव सांगायला कावेरी पोचली तेव्हा नंदन व माधव चौकीवरच होते. तसेच, या वेळेस योगिता व तिचे आई वडीलही तिथेच होते. मात्र सोलापुरच्या सायंदैनिकातून एकट्या नंदनचीच बातमी सोलापुरात पसरली अन एक महिला मोर्चा रात्री साडे नऊ वाजता चौकीवर आला. त्याचे नेतृत्व करत होत्या सौ. भेंडे!

महिलांना फ़सवणारा गुंड आहे हे कळल्यावर आपल्या मंडळातील महिलांचा ऐनवेळेस व अवेळी मोर्चा काढण्याचे अवघड काम सौ. भेंडेंनी शक्य करून दाखवले. यात त्यांचा स्वार्थ होता. उद्याच्या सकाळच्या पेपरमधे आपल्या मोर्चाचीही बातमी यावी व आपला फ़ोटोही यावा असा तो स्वार्थ! आपली अमेरिकेत स्थित असलेली विवाहीत मुलगी मेघना हिच्यावर प्रेम असलेल्या माणसाने ऐनवेळेस कोणतातरी दुर्धर आजार झाल्यामुळे लग्नाला नकार दिला होता इतकंच त्यांना ठाऊक होतं. मात्र, चौकीवर पोचल्यावर त्यांचे मातृत्व जागे व्हावे अशी घटना घडली.

तेथे माधवला पाहून मात्र त्यांच्या मोर्च्याला खरे स्वरूप आले. माधवला मुलींना फ़सवण्याच्या आरोपाखाली आत घेतलेले आहे हे कळल्यावर सर्वांसमक्ष, म्हणजे कावेरी, योगिता, योगिताच्या घरचे, वाघमारे, काही शिपाई, या सर्वांदेखत सौ. भेंडेंनी आतल्या खोलीत असलेल्या माधवच्या सरळ सरळ कानसुलातच भडकावली. तिथूनच त्यांनी संगीताला फ़ोन करून चौकीवर यायला सांगीतलं! त्यांना आजच समजलं होतं! माधव हा मुळातच चागला माणूस नाही. त्याने आपल्या मुलीला फ़सवलं असण्याचीही शक्यता आहे.
माधव हबकला. नंदनचीही पाचावर धारण बसली. वाघमारेला आता या बायका आणखीन काय करतात याची भीती वाटल्यामुळे त्याने मोर्चा रोखण्याची ऎक्शन सुरू केली.

मात्र सौ. भेंडेंची ही कृती पाहून कावेरी मात्र विषण्ण हसली. ती भेंडेंकडे जाऊन म्हणाली:

कावेरी - याला मारलंत? पुरुषाने मुलींना फ़सवलं म्हणून याला मारताय? मग तिचं काय?
सौ. भेंडे - कोण?
कावेरी - ....... शर्मिला?

कावेरी या नितांतसुंदर स्त्रीच्या तोंडावर असले हिंस्त्र भाव पाहून भेंडेबाई चरकल्याच! शर्मिला हे नाव ऐकल्यामुळे नंदन अन माधव यांची खरोखर फ़ाटली. हे प्रकरण शेवटी भाऊंपर्यंत जाऊन पोचणार अन आपला सन्मानाने जगण्याचा काळ संपला इतके त्यांना समजले.

आत्तापर्यंत ते वाघमारेला भाऊंशी फ़ोन जोडून देण्याची विनंती करत होते. त्यांना आशा ही होती की भाऊंशी एकदा बोलले की भाऊ तासात आपल्याला येथून बाहेर काढतील.

पण कुटुंबियांबरोबर व हॊस्पीटलमधील काही स्टाफ़बरोबर चौकीवर आल्यावर नंदनला पाहून योगिता हमसाहमशी रडत होती. आईच्या मिठीत ती स्वत:ला सुखरूप समजत होती. आणि तिचा लहान भाऊ भयानक भडकला होता. त्याने वाघमारेला ’नंदनला आत्ता बाहेर सोडल्यास त्याचे हातपाय मोडून टाकीन’ म्हणून सांगीतले होते. वाघमारेला असल्या पोरकट धमक्यांकडे लक्ष द्यायचे कारणच नव्हते. पण भाऊंच्या वर नवीन आलेल्या बाईला एक दिवस होत नाही तोवर नंदन अन माधव दोघेही पकडले जातात याचा अंधूक अर्थ त्याला जाणवत होता. प्रकरण भाऊंच्या पातळीचे नव्हते. आमदारांचा वरदहस्त असल्याशिवाय या नवीन बाई एका दिवसात इतके प्रकार करूच शकणार नव्हत्या.

तसेच, उपस्थितांना नंदन अन माधव भाऊंशी बोलले हे समजणे अत्यंत धोकादायक होते. त्यातून भाऊंवर काहींचा संशय नक्कीच निर्माण झाला असता. एका फ़ालतू दैनिकाचा वार्ताहर उगाचच चौकीत तळ ठोकून होता. अर्धवट काहीतरी ऐकून त्याने उद्या हवी ती नावे छापली असती तर पंचाईत झाली असती.
त्यामुळे वाघमारे नंदन अन माधवला भाऊंशी बोलूनच देत नव्हता. तो त्यांच्या जवळ गेल्यावर कुजबुजत्या स्वरात ते दोघे त्याला शिव्यांची लाखोली वाहात होते. तो आणखीनच भडकत होता. पण त्याचवेळेस त्यांच्या शिव्या ऐकण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता. कारण उद्या जर मीना कातगडेपेक्षा भाऊ वरचढ ठरले तर पुन्हा वाघमारेला जड जाणार होते.

मात्र, भेंडेबाईंनी ’शर्मिला’ प्रकरण पेटवले. वाघमारेने ’वाट्टेल त्या माणसाला आम्ही चौकशीसाठी आणू शकत नाही’ असे दहावेळा सांगून पाहिले. शेवटी भेंडेंच्या मंडळातर्फ़े तक्रार नोंदवली गेली. अजून भेंडेबाईंना माधवने मेघनाच्या बाबतीत केलेला प्रकार माहीतच नव्हता. मात्र, तेवढ्यात त्यांच्या फ़ोनला प्रतिसाद देऊन त्यांची मोठी मुलगी संगीता तिच्या पतीला म्हणजे सतीशला घेऊन तिथे आली. सतीश व संगीताने जेव्हा माधवला पाहिले तेव्हा संगीता अतिशय संतापली. तिला तेथेच चक्कर आली. त्यामुळे सतीश तिला घेऊन जरा लांब जाऊन थांबला. पण थोड्या वेळाने सतीशने संगीताला समजावले की हे जे प्रकरण आहे त्यात जर आपण तोंड उघडले नाही तर हा नरराक्षस पुन्हा सुटू शकेल. तुझ्या आईंच्या हातात एक मंडळ आहे. आपण वाघमारेवर दबाव आणायला हवा. मात्र संगीताला मेघनाच्या बेअब्रूची भीती वाटत होती. सतीशने तिला ’मेघनाचे नावच घ्यायचे नाही’ असे सुचवले. खूप वेळानंतर संगीताला बहिणीचे नाव बाहेर न पडता जर एक समाजकंटक अधिक अडकणार असेल तर अडकवणे योग्य आहे हे मनातच पटले. धीर करून तिने आईला मात्र विश्वासात घेऊन सगळे सांगीतले.

आता उलटाच परिणाम झाला. ज्या योगितावर झालेल्या प्रकाराचा निषेध म्हणून भेंडेबाईंनी चौकीवर मोर्चा नेलेला होता ती बाजूलाच पडली. स्वत: भेंडेबाईंचेच कौटुंबिक आयुष्य बरबाद करणारा नरराक्षस त्यांना सापडला होता. भेंडेबाई भयानक संतापल्या. त्यांनी नुसते थैमान घालायला सुरुवात केली. एक तर आधीच त्यांना मेघनाच्या आठवणींनी गलबलत होते. मात्र इतक्या बायकांसमोर रडणे शक्य नव्हते. उलट, या बायकांना स्फ़ुर्ती देणे आवश्यक होते. त्यांनी कशीबशी वाघमारेला साद्यंत हकीगत केवळ पाच मिनिटात समजावली. मात्र मेघनाचे नाव घेणे टाळले. त्यांनी असे सांगीतले की माझ्या जावयाच्या क्लासमधील एका विद्यार्थ्याने बोलता बोलता त्यांना असे सांगीतले होते की हा माधव नावाचा मनुष्य पोर्नोग्राफ़िक साईट्सवर असतो, शक्य आहे की याने फ़सवलेल्या मुलींचे फ़ोटो अशा साइट्सवर टाकले जात असतील. यात एक मोठा धोका होता. अशा साईट्सवर माधवला तपासले गेले असते तर मेघनाचाही तपास लोकांना लागू शकला असता. त्यामुळे भेंडेबाईंनी, ’पोर्नोग्राफ़िक साईट्स’ हा विषय जरी वर्तमानपत्रात आला तरी आमच्या मंडळाच्या बायका तुझ्या नावाने चौकीवर मोर्चे काढतील अन तूच त्यात सामील आहेस हे सर्वत्र सांगतील अशी धमकी दिली.

वाघमारेला यातले काहीच नवीन नव्हते. मात्र, तो स्वत: या प्रकरणात नव्हताच. एखाद्या स्थानिक मुलीने कोणताही आरोप करू नये व केलाच तर रॆकेटमधील लोकांचा बचाव करणे इतकेच त्याच्या कार्यकक्षेत होते. त्यासाठी त्याला हवे ते मिळत होते. रॆकेटने फ़सवलेली मुलगी त्याला कधीच मिळालेली नव्हती. पण शर्मिला एकदा आली होती. शर्मिलाच्या सहवासात घालवलेली ती एक रात्र वाघमारेच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट रात्र होती. याशिवाय मासिक हप्ता अन केस टू केस हप्ता हे होतेच. वाघमारे निवांत होता. पण आता त्याच शर्मिलाला पकडून आणणे अन या भेंडेबाईला सगळाच सुगावा लागलेला असण्याची शक्यता.. या दोन गोष्टींमुळे वाघमारे नखशिखांत हादरला होता.

सर्वप्रथम त्याने शर्मिलाला वाचवायची इच्छा मनातून घालवली. ती कितीही सुंदर असली तरी प्रकरण अशा थराला गेलेले होते की तिला वाचवायचा प्रयत्न करणे म्हणजे स्वत:ला अडकवणे होते. ही कावेरी मधूनच इथे कशी काय आली त्याला समजेना. कावेरी तर माधवकडे पाहून अशी हासत होती की माधवच्या काळजाचे पाणी पाणी होत होते. आत्ता आपण वाघमारेच्या डोळ्यासमोर आहोत हेच त्याला बरे वाटत होते. कावेरी येईपर्यंत चौकीवरून सुटायची त्याला इच्छा होती. ती तेथे आल्यावर मात्र काय व्हायचे तो होवो पण इथेच असलेले बरे हे त्याला समजले होते.

नंदन किरकोळ लेव्हलचा माणूस होता. त्याला आशा होती की वाघमारे तास दोन तासांनी सोडेल. पण आपलीच बातमी पेपरात आलेली समजल्यावर आता इथून सोडले की सरळ कर्नाटकात पळून जायचे एवढेच त्याने ठरवले होते. भाऊंशी संवाद होऊ शकत नव्हता. आता बायका शर्मिला, शर्मिला करत होत्या. शर्मिला इथे आली तर भाऊ वाचवायला धावणार हे निश्चीत होते. त्यामुळे शर्मिलाला पकडण्याची मागणी त्याला स्वत:ला फ़ायद्याची वाटत होती. मात्र वाघमारेवर तो भयानक चिडलेला होता. केवळ त्या मीना कातगडेने सांगीतले म्हणून हा आपल्याला आत घेतोच कसा? भाऊंशी बोलायला नको? आपल्याला दोन तासांचा अवधी द्यायला नको? आपण कुठल्याकुठे पोचलो असतो दोन तासात! एकदा निर्दोष सुटलो की या वाघमारेकडे पाहायचे.

वाघमारे मात्र वेगळ्याच विचारात होता. धाडकन सगळे रॆकेट समोर आणावे आणि आपणच मोठे ठरावे अशी त्याला इच्छा होत होती. कारण त्याच्या अचूक अंदाजाप्रमाणे या रॆकेटमधे भाऊंच्या डोक्यावर असलेली व्यक्ती महाराष्ट्रातील नव्हती. निदान राजकारणी तर नव्हतीच नव्हती. त्यामुळे रॆकेट समोर आणल्यामुळे वाघमारेचे काही बिघडेल अशी शक्यता फ़ार कमी होती. त्यामुळे ’केवळ सहा तासात एका वासनाकांडाचा पर्दाफ़ाश वाघमारे यांच्यामुळे’ अशी एखादी बातमी आली तर काय बहार येईल याच्यावर त्याचा विचार चाललेला होता. रॆकेटमधील लोकांनी कानीकपाळी ओरडून सांगीतले तरी ’जर पकडूनच वाघमारेने दिले आहे तर तो कशाला रॆकेटमधे सामील असेल’ ही जनमानसाची भावना निर्माण होणार होती व त्यात वाघमारे हिरो होऊ शकला असता. अचानक त्याला ’जे चालले आहे ते चांगले चालले आहे’ असा साक्षात्कार झाला. भाऊंकडून मिळणारे हप्ते विसरायला हरकत नव्हती. त्यापेक्षा मोठी गोष्ट, म्हणजे कीर्ती, मिळण्याची शक्यता होती. या कीर्तीच्या जोरावर पुढे मोठे घबाड मिळू शकले असते. त्याच त्याच पोझिशनला किती सडणार? त्याने सडनली ’अत्यंत तडफ़दार, कार्यक्षम व डॆशिंग अधिकारी’ अशी भूमिका स्वत:कडे घेत स्वत:च्याच चौकीत तांडव घालायला सुरुवात केली. त्याचा आवेश पाहून तर मोर्चा घेऊन आलेल्या महिलाच अवाक झाल्या. इतका तडफ़दार अधिकारी आहे हा? व्वा! नुसता तोफ़ेप्रमाणे बरसत आहे. चवताळला आहे. स्त्री दाक्षिण्य तर याच्या नसानसांतून वाहतंय! वाघमारेने पहिल्यांदा त्या दोघांना चौकीतील एका खोलीत बंद केले. त्या खोलीला अर्ध्या भागात गज होते. त्यामुळे ते कैद झाल्यासारखे दिसत होते. वाघमारेचे हे रूप त्या दोघांनीही आजवर पाहिलेले नव्हते. त्यातच माधवने त्याला उद्देशून एक कचकचीत शिवी घातल्यावर वाघमारेने गजांवर जोरात लाथ मारली. वाघमारेचा हिंस्त्र चेहरा पाहूनच माधव चरकला. वाघमारेने बायका बघितल्या नाहीत, योगिताच्या घरचे बघितले नाहीत अन माधव अन नंदनला अशा शिव्या द्यायला सुरुवात केली की असल्या शिव्या त्यांनी कधी ऐकल्याही नसाव्यात! वाघमारेची जीभ तलवारीसारखी चालत होती. शिपाई बेभानपणे त्याचे हुकूम पाळत होते. दोन जण पळत शर्मिलाच्या घरी धावले होते. मोर्चामधील बायका आता घोषणा थांबवून नुसत्या वाघमारेकडे बघत होत्या. योगिताच्या घरचे अन भेंडे कुटुंबीय अवाक होऊन हा आवेश पाहात होते. आता असा ऒफ़ीसर असल्यावर काय सुटतायत माधव अन नंदन! वार्ताहर वेड्यासारखा होणारी प्रत्येक गोष्ट नोंदवू लागला होता. त्याच्याकडे पाहून तर वाघमारे आणखीनच त्वेषात वागू लागला होता. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती. माधव अन नंदन यांचे दिवस वाघमारेमुळे भरले. मात्र, या सगळ्या गडबडीत वाघमारे एक अत्यंत महत्वाचा फ़ॆक्टर विसरूनच गेला होता. त्या घटकाचा विचार आधी मनात आला असता तर त्याने ही चूक केलीच नसती.

कावेरी! कावेरी रॆकेटमधील प्रत्येक माणसाला त्याच्या स्वत:पेक्षा जास्त ओळखून होती. फ़क्त तिला हे रॆकेट सी.डी.चे आहे हे माहीत नव्हते. वाघमारेला ती वाघमारेहून जास्त ओळखत होती. ती एका खुर्चीवर अत्यंत शांतपणे बसलेली होती... वाघमारेकडे बघत!

अचानक वाघमारेचे लक्ष कावेरीकडे गेले. कावेरीला असाध्य रोग झालेला आहे याची कल्पना रॆकेटमधील कुणालाच नव्हती. प्रत्येकाच्या दृष्टीने कावेरी अजूनही अती सुंदर स्त्री होती. मात्र एकमेकांमधील तिढ्यांमुळे कावेरीला प्रत्येक जण वचकून होता. तिला भाऊ बोलवू शकतात हे माहीत झाल्यापासून माधव तिच्यासमोर बरळायचाच काय, तिला भेटायचाही केव्हाच थांबलेला होता. त्याच कारणामुळे वाघमारेही तिला वचकून होता. नंदनचा तर प्रश्नच नव्हता. वाघमारे, नंदन, असल्या किरकोळ व्यक्तींकडे कावेरी कधी जाणारच नव्हती. पण सुंदरमल अन सिसोदियाशेठही तिला बोलवतात हे माहीत झाल्यापासून भाऊही तिला वचकून होते. सुंदरमल पार्टीचे सोलापुरातील फ़ायनान्सर होते. सिसोदिया मुंबईच्या उपक्रमांमधे आर्थिक हातभार लावायचे. एखादी बातमी आरोग्यमंत्र्यांकडे पोचली तर नवेच लफ़डे व्हायचे याची भाऊंना धास्ती होती. आणि आपले लफ़डे वर समजू नये यासाठी ते दोघे भाऊंना वचकून असायचे. मात्र, कावेरीचे फ़ावायचे. एकमेकांची मुख्य गुपीते अजिबात न सांगताही ती हुषारीने फ़क्त असंतोष माजेल इतकेच काहीतरी सांगायची. मात्र, तिला सी.डी. प्रकरणच माहीत नव्हते. तिला वाटत होते की आपल्याला ब्लॆकमेल करून वेगवेगळ्या लोकांकडे पाठवून माधव गब्बर होत आहे. मात्र ते लोक तिच्या दिलखेचक सौंदर्यावर भाळून तिलाही भरपूर भेटी, पैसे द्यायचे. आणि हे सगळे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये यासाठी वाघमारेला हप्ते दिले जातात अशी तिची कल्पना होती. तिच्या दृष्टीने वाघमारे एक सामान्य पोलीस अधिकारी होता. सुंदरमल, सिसोदिया अन भाऊ यांच्यापैकी एकाला नुसते तिने सांगीतले तरी वाघमारेची बदली होण्याची शक्यता होती. आणि याची वाघमारेलाही जाणीव होती.

पण तिढा इतकाच नव्हता. तिढा असा होता की आज कावेरी भडकलेली होती. सगळ्यांना या प्रकरणात कावेरीकडून सहकार्याची अपेक्षा असताना तिने वेगळाच रंग धारण केला होता. आणि त्याचे कारण फ़क्त तिला माहीत होते. माधवमुळे वाममार्गाला लागल्यामुळे ती मरणाच्या दारात उभी होती. आणि माधव पकडला गेल्याचे सुंदरमल यांनी तिला सांगण्याचे कारण वेगळेच होते. त्यांच्यामते तिने सोलापुरातून पळ काढायला हवा होता. कारण माधव कोणकोणत्या मुलींना सप्लाय करतो किंवा फ़सवतो याचा शोध घेताना ती पकडली जाण्याची भरपूर शक्यता होती. आणि तसे झाले तर तिचे ग्राहक कोण याचा कसून शोध घेतल्यास सुंदरमलचे नाव केवळ महिन्या दोन महिन्यात पुन्हा त्याच कारणासाठी जाहीर होणार होते. यावेळेस बंडाभाऊंना पटवणे शक्य होईलच असे नव्हते. कितीही पैसे दिले तरी ’बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ प्रमाणे कायमचा शिक्का बसणार होता. सुंदरमल, एक व्यभिचारी व अनैतिक धंदे करणारा माणूस, असा!

कावेरीने मात्र आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच हे ठरवले होते. ती चौकीवर आहे याचा पत्ता सिसोदिया, सुंदरमल व भाऊ यांच्यापैकी कुणालाच नव्हता. अत्यंत नैसर्गीक कारणास्तव सगळे हेच गृहीत धरत होते की कावेरी आत्तापर्यंत स्टेशनवर तरी पोचली असेल की बसस्थानकावर तरी! आणि कावेरी तडक आली होती चौकीवर! ती आल्याचे त्यांच्यापैकी कुणाला सांगायचे भानच वाघमारेला उरले नव्हते. कारण त्याच्यापुढे मोर्चामुळे व मीना कातगडेमुळे धर्मसकटे उभी राहात होती. त्याच्या प्रायॊरिटिजच वेगळ्या होत्या.

त्यात तिने चौकीवर येऊन सर्वांदेखत शर्मिला हे नाव उच्चारल्यामुळे वाघमारेला स्वत:ची भूमिकाच बदलायला लागली होती. आणि भयंकर संतापलेल्या अन भेसूर चेहरा करून चौकीत बसलेल्या कावेरीला वाघमारेने खोटी भूमिका घेतली आहे हे पक्के माहीत होते... आणि हाच वाघमारेचा प्रॊब्लेम होता. तिला ते समजलेले आहे याची त्याला संपूर्ण कल्पना होती.

अत्यंत थंड चेहरा करून कावेरी वाघमारेच्या थैमानाकडे बघत होती. त्याचा चेहरा जसा तिच्याकडे वळला, त्याचा सगळा आवेश एका क्षणात नष्ट झाला.

या क्षणी आपण काय भूमिका घ्यावी हेच वाघमारेला समजत नव्हते. इतर सर्व लोक त्याचे कौतूक करत होते. माधव अन नंदन त्याच्याकडे अतिशय खुनशी नजरेने पाहात होते. मात्र फ़क्त कावेरीच होती, जी त्याच्याकडे थंड, विषारी नजरेने बघत बसली होती. आणि तिला पाहून तो हादरला होता.

वाघमारे - ओ.. मॆडम.. तुम्ही तपासात विघ्न आणू नका... ओ भेंडेबाई... यांना जायला सांगा
सौ. भेंडे - यांच्यामुळेच आम्हाला त्या शर्मिलाचे नाव कळले आहे. या जाणार नाहीत. (भेंडे बाई ओरडत होत्या.)

चडफ़डत वाघमारे पुन्हा कामाला लागला. मात्र, आता तो मगाचचा आवेश त्याच्यात राहिलेला नव्हता. क्षणाक्षणाला कावेरीकडे बघत तो सूत्र हलवत होता. आणि कावेरी पापणीही न लववता त्याच्याकडे त्याच विषारी नजरेने बघत होती.

स्वत: भेंडे तितक्यात तेथे पोचले. त्यांना केवळ दहाच मिनिटात जावई सतीश याने सांगीतले की मेघनाच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला आहे. तो ऐकल्यावर सौ. भेंडेच काय, स्वत: भेंड्यांच्याही डोळ्यात पाणी आले. संगीता, सौ. भेंडे व श्री भेंडे एकमेकांना जवळ घेऊन रडू लागले.

हा दु:खाचा आवेग संपेपर्यंत काही वेळ गेला. मग मात्र भेंड्यांच्या डोळ्यात खून उतरला. आत जाऊन त्यांनी माधव असलेल्या खोलीच्या गजांवर शिव्या देत प्रहार केले. एका शिपायाने त्यांना बाजूला केले. तेवढ्यात इतर चौकीवरून आलेल्या दोन महिला पोलीस तेथे पोचल्या. कावेरी त्यांना पाहून अस्वस्थ झाली. आपण येथे जास्त थांबायला नको आहे हे तिला समजले. आहे तोच प्रोब्लेम आपला जीव घेणार आहे, त्यात आणखी मरायच्या आधी बदनामी नको. कावेरी हळूच उठून चौकीच्या बाहेर आली.
जवळपास वीस मिनिटे भेंडे आणि सतीश चर्चा करत होते. त्यांची चर्चा ऐकताना संगीता अन सौ. भेंडे यांच्या डोळ्याचे पाणीच थांबत नव्हते.

आणि नेमका तेव्हाच तेही घडत होते......

चौकीच्या बाहेर आलेल्या कावेरीने लक्षपुर्वक भेंडे कुटुंबियांची चर्चा हळूच ऐकली होती.

जो काही अर्थबोध तिला झाला तो भयानक होता.

माधवने त्यांच्या मुलीचे फ़ोटो कुठेतरी अशा ठिकाणी दिल्याचे समजत होते की जगातील कोणीही ते फ़ोटो पाहू शकेल.

आणि त्यामुळेच संगीता अन सौ. भेंडे सतत रडत होत्या. मोर्चाच्या बायका ’काय झालं, काय झालं’ विचारून जात होत्या, पण भेंडे त्यांना लांबच ठेवत होते.

आणि कावेरी प्रथमच हादरली होती. ’हे काय आहे?’ काय केले आपण?

आपणही माधवच्याच तर संगतीत असायचो? आणि? ते शुटिंग? रामन पिक्चर्स? म्हणजे... म्हणजे...
आपलेही फ़ोटो.....???

आपण एक घाणेरडी वेश्या आहोत? जी शरीरसुखाची चटक लागल्याने या व्यवसायात आली आणि...

एच. आय. व्ही पॊझिटिव्ह?

जिचे फ़ोटो जगातील कुणीही पाहू शकते?

राजीव... बघ ना काय झालं! तू असतास तर....

कावेरीच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या सरी वाहात होत्या. एका झाडाला टेकून ती मेलेल्या नजरेने खाली बघत बसली होती.

क्षणिक सुखाच्या मोहाने आपण काय करून घेतलं? का अशा वागलो?

एक नॊन रिटर्नेबल पातळी होती ती! कावेरी जगाचा लवकरच निरोप घेणार होती, हे तिला माहीत होतेच.. पण आता त्या दु:खाच्या जखमेवर मीठ चोळले गेले होते.

चौकीत काय चाललेले होते कोणास ठाऊक? मोर्चाच्या बायका काहीबाही घोषणा वगैरे देत होत्या.

भेंडेबाईंच्या एक दोन जवळच्या मैत्रिणी मात्र भेंडे कुटुंबियांच्या आसपास वावरायचा प्रयत्न करत होत्या. शेवटी सतीशने त्यांना सांगीतले की संगीताचे मामा आजारी आहेत मुंबईला. तेव्हा त्या गप्प बसल्या.
मात्र त्याच पाच मिनिटात कावेरीमधे अद्भूत बदल झाला होता. तिच्या डोळ्यामधून अंगार बरसत होता.
माधवचा सूड घेण्याची तिची इच्छा ती लवकरच पूर्ण करण्याचा विचार करणार होती. जवळपास शस्त्र असते तर याच क्षणी आत जाऊन तिने त्या गजांमधूनच ते त्याला मारले असते. पण सध्या आपण असहाय्य आहोत याची तिला जाण होती.

त्याचवेळी तो प्रकार घडला. एक व्हॆन वेगात चौकीच्या आवारात शिरली. दोन महिला पोलीस व एक पुरुष पोलीस तितक्याच वेगात व्हॆनमधून बाहेर आले. महिला पोलिसांनी ’चल, चल’ करत एका स्त्रीला बाहेर काढले.

शर्मिला.......!

अत्यंत अपमानीत मुखाने..... सोलापुरातील धनाढ्यांना लुबाडणारी मेनका, चौकीत धरून आणलेली होती.
तब्बल सतरा वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी लोकांना उल्लू बनवणारी, अनेक स्त्री पुरुषांची जीवने नासवणारी, सुंदर परंतु स्त्री जातीला काळिमा असलेली शर्मिला! पोलीस चौकीत एखाद्या सामान्य गुन्हेगारासारखी प्रवेशली होती.

शर्मिलाचे तोंडच वर होत नव्हते. कोण कोण आजूबाजूला थांबलेले आहे हेही तिला बघायचे नव्हते.
येण्यापुर्वी तिला हरजिंदर बग्गाला फ़ोन करायची इच्छा झाली होती. पण त्याचा अतापता समजला तर उद्या सुटलो तरी तिकडे येऊन हे लोक धरतील या विचाराने तिने ती कल्पना रद्दच केली होती.

शर्मिलाचा चौकीत प्रवेश होतानाच भेंडेंना ती दिसली. साडे सोळा वर्षे! साडे सोळा वर्षांपुर्वी भेंडेंचा स्वत:चा फ़्लॆट त्यांच्याच स्वत:च्या चुकीमुळे गेला होता. आणि... साडे सोळा वर्ष शर्मिला सोलापुरातच होती. भेंडे अब्रूच्या भीतीने काहीही करू शकत नव्हते. तो एकच क्षण! शर्मिलाला आत नेतानाचा! हेच ते शरीर! भेंडेंना आठवले. याच शरीराच्या मोहात त्यांनी आर्थिक नुकसानी तर सोसली होतीच, पण मुलींची लग्ने करतानाही त्यांच्या मनात धाकधुक होती की या बाईबरोबरचे आपले प्रकरण फ़ुटते की काय? साडे सोळा वर्षे भेंडे भीतीच्या सावटात होते. मेघनाचे लग्न मोडले तेव्हाही त्यांना आधी हाच संशय आला होता. खूप चौकशी केल्यावर असे समजले होते की माधव खरोखरच उपचारांसाठी मुंबईला गेलेला होता. म्हणजे आपले व शर्मिलाचे प्रकरण कळणे हे लग्न मोडण्याचे कारण नव्हते तर! अत्यंत घाईघाईत त्यांनी मेघनाचे लग्न अभिजीतशी ठरवले होते. खूप विरोधानंतर मेघना तयार झाली होती अन आता ते दोघेही अमेरिकेत वास्तव्यास होते.

या कालावधीत भेंडेंना मधेअधे शर्मिलाबाबत काही किरकोळ बातम्या समजायच्या! नगरसेवकाबरोबर असते, राजकारणात जाणार वगैरे वगैरे!

साडे सोळा वर्षात शर्मिलामधे फ़ारसा काहीच फ़रक पडला नव्हता. भेंडेंना आठवत होती तशीच ती आजही दिसत होती... जवळपास!

तिला पाहताच भेंडे संतापाने तिच्याकडे धावले. महिला पोलीसांनी भेंडेंना आवरले. मग आणखीन दोन शिपायांनी त्यांना धरले. सौ. भेंडे चकीत होऊन पाहात होत्या. ही स्त्री त्यांनी पाहिलेली होती. साडे सोळा वर्षांपुर्वीच! तिनेच भेंडेंचा फ़्लॆट विकत घेतला होता अन फ़ंक्शनला सौ. भेंडेंनाही बोलावले होते. सौ. भेंडे अवाक झाल्या होत्या. आपला पती असा का रागात धावला याची कारणेही जाणून घेण्याची त्यांची मनस्थिती नव्हती. उलट त्यांना याचेच आश्चर्य वाटत होते की याच स्त्रीला आपण कधीकाळी आपले घर विकले होते. तेव्हा ही किती सालस वाटली होती.

सतीश अन संगीता मात्र आश्चर्यचकीत होउन भेंडेंकडे बघत होते. अचानक भेंडेंना भान आले. वयाच्या पासष्टीत असताना त्यांना अचानक शर्मिला दिसली होती अन त्यांचा तोल गेला होता. भेंडेंनी सारवासारव केली. मेघनाचे ऐकल्यामुळे माझा तोल गेला होता असे ते म्हणाले. त्यांना एका ठिकाणी बसवून पाणी देण्यात आले. पण तितक्यातच आणखीन जोरदार आवाज आला. कुणीतरी कुणालातरी भयंकर संतापाने मारत असावे असे आवाज येत होते.

पाहिले तर दोन्ही महिला पोलीसांचा विरोध मोडीत काढत कावेरीने शर्मिलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केलेली होती. वाघमारे धावला होता. त्याने महिला पोलिसांना कावेरीला धरुन बडवण्याचा हुकूम दिला होता. त्यानुसार त्या तिला धरायला जात होत्या पण तिचे अवसानच इतके अफ़ाट होते की त्याच दूर ढकलल्या जात होत्या.

शर्मिला धुळीत खाली पडली होती. ती तडफ़डत ओरडत होती. कावेरी तिला उभी राहूनच लाथा मारत होती. काही झाले तरी कावेरी शर्मिलाहून कितीतरी लहान व तरुण होती. एका चाळिशीच्या स्त्रीला बडवून काढणे कावेरीला सहज शक्य होते. भर चौकीत हा असा विचित्र प्रकार घडत होता. महिला पोलिसांना ती आवरत नाही म्हंटल्यावर दोन शिपायांनी वाघमारेचा हुकूम ऐकून तिला धरून बाजूला ढकलले. एकाने चुकून काठी तिच्या पोटरीवर मारली. तरीही कावेरी त्यांच्या अंगावर धावली. आणि ते तिला आता पुन्हा धरून मारणार तेवढ्यात आगमन झाले .... मीना कातगडेचे!

वयात सगळ्यांहून लहान, सामाजिक दृष्ट्या सर्वांहून जास्त पाठबळ असलेली मीना कातगडे...

कर्कश्श आवाजात ओरडली:

मीना - वाघमारे... चौकीत बायकांना पुरुष मारतायत... राजीनामा टाक...आत्ताच्या आत्ता

मीनाबरोबर आलेला सदूसुद्धा मीनाकडे धक्का बसून पाहात होता. क्षणभर चौकीत सन्नाटा पसरला. मोर्चाच्या बायकाही हादरल्या. महिला पोलीस डोळे फ़ाडून मीनाकडे बघत होत्या. पुरुष पोलिसांनी केव्हाच कावेरीचा नाद सोडलेला होता. भेंडे कुटुंबीय, योगिताच्या घरचे, सगळे शॊक लागल्यासारखे मीनाच्या हिंस्त्र तोंडाकडे बघत होते. शर्मिला धुळीत पडूनच वेदना सहन करून ’आता ही आणखीन काय करणार’ या भीतीने मीनाकडे बघत होती. कावेरी हिंस्त्र नजरेने शर्मिलाकडे तर अचंब्याने मीनाकडे बघत होती.
आणि वाघमारे.....

एकच क्षण जिंकायला हवा होता. तोही हातातून निसटला होता. याच क्षणी जर त्याने एकाही पुरुष शिपायाच्या कानाखाली भडकावली असती तर प्रक्षोभ उसळला नसता. पण तो भानावर नव्हता. आत्ता, मीना कातगडे इथे येईल हा त्याचा अदाजच नव्हता. थोड्याच वेळापुर्वी तिचा त्याला भाऊंकडून फ़ोन आला होता. त्या फ़ोनवर तिने ’म्होरक्याला पकडायचंय’ एवढंच सांगीतलं होतं! मात्र तो फ़ोन कुणीतरी आपटून बंद केला होता. बहुधा भाऊंनी! तसेच, भाऊंचा नोकरही बंगल्यावर होता अन कुत्राही! मीना तिथून सुटणे अशक्य होते. त्या आघाडीबाबत वाघमारे निश्चींत होता.

आणि अचानक डरकाळी फ़ोडत तीच मीना कातगडे ऐन नाजूक क्षणी चौकीवर अवतरलेली होती.
खरे तर मार खाणारी स्त्री कावेरी असून ती का मार खात आहे हेही मीनाला माहीत नव्हते. पण तिला ते दृष्यच बघवले नव्हते. ती केवळ एका असहाय्य स्त्रीच्या मदतीसाठी म्हणून ओरडली होती. पण त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.

मोर्चातील बायकांना शर्मिलाला व्हॆनमधून पकडून आणल्यामुळे ती गुन्हेगार असणार इतके माहीत झाले होते. तिला भेंडेही मारू पाहात होते अन कावेरीही मारतीय हे कळल्यावर त्या भडकल्या. प्रक्षोभ उसळला. त्या बायकांनी त्या दोन शिपायांना गराडा घातला. शब्दाने शब्द वाढू लागला. वाघमारे मधे पडू शकत नव्हता. कारण मीनाच्या समोर त्या शिपायांना संरक्षण देण्याची भूमिका करणे त्याला परवडणार नव्हते. त्याने त्या शिपायांना शिव्या देऊन ’जणू त्यांना आता ढकलून आतच नेतो आहे’ असे दाखवत त्या गराड्यातून बाहेर काढायचा प्रयत्न सुरू केला. त्यातच त्यातल्या एका शिपायाने एका बाईवर खवळून तिला शिवीगाळ केली. झालं! आत्तापर्यंतचा सगळा प्रक्षोभ एका क्षणात बाहेर पडला. चौकीवरच तिघांना बायकांनी पायातल्या चपला काढून बडवायला सुरुवात केली. या गोष्टीला आवर घालण्यात पाच एक मिनिटे गेली. महिला पोलिसांनी कमाल करून सगळ्या मोर्चाला चौकीच्या बाहेर नेले. वाघमारे सौ. भेंडेंवर चौकीत पोलिसांना मोर्चा आणून मारहाण व कायद्याच्या कामात अडथळा असे आरोप लावण्याचा बाता करत होता. आता त्याला मीनाच्या उपस्थितीचीही भीती वाटेनाशी झाली होती. ज्या चौकीत गेली पाच वर्ष तो एखाद्या सुलतानासारखा वावरत होता तेथे बायकांकडून महिला पोलिसांसमोर चपलांनी मारहाण? वार्ताहराने हेही टिपून घेतलेले असणार म्हंटल्यावर वाघमारे तीरासारखा त्याच्याकडे धावला. वार्ताहर सरळ मीना कातगडेच्या बाजूला धावत येऊन उभा राहिला.

ही मुलगी मीना कातगडे आहे याची कावेरीला कल्पना नव्हती. कुणीतरी नवखी मुलगी अचानक भाऊंच्या वर आल्याचे तिला एक दोघांशी झालेल्या चर्चेतून समजले होते. पण तिला पार्श्वभूमी काहीच माहीत नव्हती.
मीना गरजली.

मीना - वाघमारे, ताबडतोब जाहीर माफ़ी माग बायकांची
वाघमारे - असशील पुढारी... चौकीत नाटकं केलीस तर आत घेईन....

मीना तर बेभान झालेलीच होती. पण तिच्याहून कावेरी बेभान झालेली होती. कावेरीला आता कसलेच भान उरले नव्हते. तिने सरळ येऊन वाघमारेच्या कानफ़डात मारली. खाडकन आवाज झाला. काय झाले यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. स्वत: वाघमारेचाही! आणि कावेरीला आवरण्याचे भानही महिला पोलिसांना राहिले नव्हते. वाघमारे ४४० चा धक्का बसल्यासारखा कावेरीकडे पाहात होता. मगाचपासूनच त्याला कावेरी चौकीत नको होती. पण तिने शर्मिलाचे नाव काढल्यामुळे मोर्चातील बायकांनी तिला चौकीवर रोखले होते.

मीना कातगडेची पहूंच नेमकी माहीत नसल्यामुळे व भाऊंची पहूच नेमकी माहीत असल्यामुळे वाघमारे मीनावर ओरडला होता. पण कावेरीने पाच बोटे उमटवली तेव्हा मात्र तो गर्भगळीत झाला.

ही बाई कोणत्या लेव्हलची आहे याची त्याला व्यवस्थित जाण होती. केवळ अपमानाचा बदला म्हणून त्याने महिला पोलिसांना तिला धरायचा हुकूम सोडला. मीना मधे पडली. महिला पोलिस मीनाला व्यवस्थित ओळखत होत्या. त्यांच्या असहाय्यतेची जाणीव झाल्याझाल्याच वाघमारे स्वत:च्या बुलेटला किक मारून चौकीतून निघून गेला. बाहेर जाऊन त्याने तत्क्षणी जादा कुमक मागवली. साधेसुधे प्रकरण कुठल्याकुठे पोचले होते. वाघमारेच्या हातात आता नियंत्रण राहिले नव्हते.

कावेरीसारख्या आपल्यापेक्षा जेमतेम दोन तीन वर्षांनी मोठ्या असलेल्या बाईने इतके अचाट धाडस करावे याचे मीनाला भयंकर आश्चर्य वाटत होते. यापुर्वी कुणाच्याही माहितीत असा प्रकार झालेला नव्हता. मोर्चातील बायकांना फ़क्त स्त्री मुक्ती वगैरेच माहीत होते. दिसला स्त्रीवर अन्याय झालेला की ओरडत सुटायचे अन स्वत:ला काही त्रास झाला की सर्वांनी मिळून घेराव घालून दमबाजी करायची हा आजवर त्यांचा परिपाठ होता.

पण चौकीचा मुख्य एका तरुण स्त्रीकडून सर्वांदेखत जोरदार थप्पड खातो अन तिला काहीही न करता उलट स्वत:च घाबरून मोटरसायकल घेऊन निघून जातो हे अचंबीत करणारं दृश्य त्या दिवशी किमान चाळीस जणांनी पाहिलं! चाळीसच्या चाळीस जण अवाक झालेले होते. मीना कावेरीकडे बघतच बसली होती. ही आहे कोण बाई? वाघमारेला तर आपणही असे करू शकणार नाही.

पण कावेरीला याचे काहीच वाटत नव्हते. ती पुन्हा आवेशात शर्मिलाकडे धावली होती. शर्मिला हा प्रकार मीनाने पहिल्यांदाच पाहिला होता. ही बाई का मार खात असावी हे तिच्या लक्षात येत नव्हते. तसेच, या बाईलाही चौकीवरच्या पुरुष पोलिसांनी मारले की काय असेही तिला वाटले. पण तसे असते तर ही मगाशी वाघमारेला मारणारी बाई तिला मारायला धावली नसती. काहीच समजेनासे झाले होते.

मीनाने धावत जाऊन कावेरीला धरले. तसे महिला पोलीसही धावल्या. कावेरी नियंत्रणातच येत नव्हती. एखादी स्त्री इतकी व्हायोलंट कशी काय होऊ शकते हे मीनाला समजत नव्हते. कावेरीला आवरण्याच्या प्रसंगात ती स्वत:च एकदा आपटली. भेंडे कुटुंबीय तिच्याकडे धावले. आत माधव अन नंदनला बाहेर काहीतरी विचित्र चाललेले आहे इतकेच समजत होते.

शर्मिला विव्हळत होती. कावेरीने काहीही पुढे मागे न बघता तिला लाथा मारलेल्या होत्या. कावेरीला अटक झाली. पण वाघमारे नसल्यामुळे मीनाने आधी चौकशी केली. त्यावर महिला पोलिसांनी ’हिला धरायलाच पाहिजे, मारतीय, साहेबालाही मारलं’ असं म्हंटल्यावर कावेरी अचानक महिला पोलिसाला उद्देशून भीषणपणे उद्गारली:

कावेरी - तुझे **तानाचे फ़ोतो आले असते ना? तूही त्याचा गळा आवळला असतास....

सन्नाटा पसरला. ही आपल्याला दिलेली शिवी आहे हे त्या पोलीस बाईला समजायला जितका काळ गेला तितकाच! त्याचक्षणी त्या महिला पोलिसांनी कावेरीला मारायला सुरुवात केली. पण प्रकरण भयंकर होते. मीनाला केवळ एका क्षणात ’कावेरी काय म्हणाली’ हे लक्षात आले होते. तिने ताबडतोब मधे पडून कावेरीला वाचवले. ’हिला अटक केलीय’ म्हणेपर्यंत मीनाने त्यांच्यासमोर बोट नाचवले.

मीना - थोबाड उघडू नकोस! अहिंसा क्रान्ती पक्षाची प्रमुख आहे मी सोलापुरची! हिला आत्ताच्या आत्ता घेऊन चाललीय इथून...

आता कावेरी अवाक झाली होती. शर्मिलाला इतक्यात पहिल्यांदाच लक्षात आले होते की मीना तेथे येऊन पोचली होती. वेदनांमुळे तिला मगाशी काय काय प्रकार झाले तिकडे लक्षच देता येत नव्हते. त्या पोलीस बायकाही सुन्न झालेल्या होत्या. योगिताची आई मात्र मीनाला ओळखत होती. तिने समोर येऊन महिला पोलिसांना बाजूला जायला सांगीतले. ही बाई फ़ार मोठी आहे आणि ती खरीखुरी समाजसेवक आहे असे त्या म्हणाल्या. पोलीस बायकांनाही मगाचचा प्रसंग आठवून जरा लाजच वाटली. कावेरीसारख्या एकट्या बाईला दोन पुरुषांनी मारावे हे त्यांनाही आवडले नव्हते. पण मन पालटण्य़ाइतक्या त्या सोज्वळ नव्हत्या. धुसफ़ुसत आणि खरे तर मीनाला घाबरून त्यांनी कावेरीला सोडायला परवानगी दिली.

शर्मिलाला आत घेऊन त्या निघून गेल्या. चौकीवर आता भेंडे अन योगिताचे कुटुंबीय, माधव, नंदन, शर्मिला आणि पोलीस स्टाफ़ उरलेले होते. मोर्च्याच्या बायका हळूहळू विखुरल्या होत्या, पण तिथेच थांबलेल्या होत्या. वार्ताहराने अचाट मुद्दे लिहून घेतले होते.

आणि मीना...

सदू अन कावेरीला घेऊन कार्यालयात रात्री साडे दहाला पोचली होती.

तेथे ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या कहाण्या समजल्या होत्या. सदू त्यावेळेस सी.डी.चे खोके आणायला मीनाच्याच घरी गेला होता. त्याने दुपारीच ते मीनाच्या घरी नेऊन ठेवले होते. आईने चौकशी केल्यावर त्याने इतकेच सांगीतले होते की मीनाताईंनी जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि कदाचित आज रात्री त्या घरी येऊ शकणार नाहीत. आई चिंतेत होती, पण सदूच्या तोंडावरचे खरेखुरे भाव तिच्या नीट लक्षात आले होते.

इकडे कावेरीची कथा ऐकून मीनाला प्रचंड धक्का बसलेला होता. शर्मिला नावाची पाताळयंत्री बाई या प्रकरणात असून तिच्यामुळे कावेरीवर हे दिवस ओढवले हे ऐकून तिला धक्काच बसला होता. कावेरी हमसाहमशी रडत होती. मात्र जशी मीनाने तिची कहाणी सांगीतली, कावेरीचा चेहरा पुन्हा आधीसारखा हिंस्त्र झाला. तिला हे पहिल्यांदाच समजले की आपलीही सी.डी. काढली गेली असू शकेल अन त्यामागे भाऊ बनसोडे आहे.

आजवर स्वतच्या शरीराच्या आगीत तिने भाऊ बनसोडेला तीन चारदा भस्म केलेले होते. मात्र आज त्याला खरेखुरे भस्म करायची तिला इच्छा होत होती.

मात्र दोघींनाही कल्पना नव्हती की या सी.डी काढल्या जात आहेत कशासाठी?

सदू अर्ध्याच तासात कार्यालयावर पोचल्यावर मीनाने आधी बाहेरून संजयला बोलवून उद्याची सगळी तयारी झाली आहे का हे विचारले. तो ’हो’ म्हणाल्यावर तिने कावेरीला सांगीतले की आज तू माझ्या घरी झोपायचे असल्यास झोप, मी काही माणसे घराच्या आजूबाजूस ठेवते, ज्यांच्यामुळे तुला धोका होणार नाही. गूढ तोंडाने कावेरी ’नाही’ म्हणाली तेव्हा मीनाला कसलीच शंका आली नाही. पण कावेरीचा प्लॆन ठरलेला होता. आणि मीनाचाही! मीना ते खोके घेऊन सरळ शर्मिलाच्याच बंगल्यावर गेली. मीनाच्या घरी टी.व्ही व सी.डी प्लेयर नव्हताच! आधी ती त्या सगळ्या सी.डी. शोभाच्या घरी बघणार होती. पण तिथे अनेक अडचणी होत्या. शोभाला त्यातले फ़ारसे कळू न देणे आवश्यक होते. शोभाच्या घरच्यांना तर काहीच! मीना इतका वेळ काय करतीय हा संशय येऊन ते शोभाच्या खोलीत चारवेळा डोकावले असते. पण हा प्रश्न चुटकीसरशी मिटला होता. शर्मिलाचा नोकर इतक्या काळात सदूला व्यवस्थित ओळखू लागला होता. शर्मिला निदान आजची रात्र तरी बंगल्यावर येणार नव्हती. तिच्या बंगल्याच्या तपासणीसाठी डिपार्टमेंट आले असते तर त्यांना काय सांगायचे हे मीनाने ठरवले होते.

पहिलीच सी.डी. मेघनाची होती. सदूला मीनाने खालीच थांबवले होते. एकटी असताना माधव अन मेघनाची ती दृश्ये बघताना तिला किळस येत होती. मेघनाच्या तोंडावर समर्पणाचे प्रामाणिक भाव होते. माधव मात्र सराईतासारखा हालचाली करत होता. पटापट फ़ास्ट फ़ॊरवर्ड करत तिने ती सी.डी. आटोपली. हे रेकॊर्डिंग कुठे केलेले होते हे तिला विकीनेही सांगीतले नव्हते. ते विशाल लॊज निश्चीतच नव्हते.

दुसरी सी.डी मात्र तिच्यासाठी धक्कादायक ठरली. वधूच्या पोषाखात असलेली कावेरी माधवच्या मिठीतून सुटायचा घनघोर प्रयत्न करत होती. शर्मिला तिला दाबून धरत होती. माधव तिच्यावर तुटून पडला होता. याच दृश्यात एका बाजूला एक कॆमेरामनही दिसत होता. तो मेहता होता. विकीने मेहताची माहिती सांगून त्याचा फ़ोटो मीनाला दाखवला होता. त्या अर्थी दोन बाजूंना दोन कॆमेरे होते. आणि ही खोली कुठली हेही मीनाला कळत नव्हते. अत्यंत आलिशान अशी ती खोली होती. एका स्त्रीची अब्रू लूटली जात असताना दुसरी स्त्री उलट त्या प्रकाराला सहाय्य करतानाचे किळसवाणे अन धक्कादायक दृश्य त्या सी.डी.त होते. मीनाने सुरुवातीपासून घाईघाईत ती सी.डी. पुन्हा पाहिली. सुरुवातीला कावेरी सहकार्य करत होती. नंतरच तिचा विरोध सुरू झाला होता. सी.डी.ची क्वॊलिटी खराब झाली होती.

कावेरीची सी.डी. कव्हरमधे पुन्हा ठेवताना त्या कव्हरवरील लाल खुण मीनाने पाहिली. तशी लाल खूण फ़क्त आणखीन एकाच कव्हरवर होती. एका कव्हरवर कसलीच खुण नव्हती, अन बाकीच्या दोनवर हिरव्या खुणा होत्या. त्यातल्यात्यात एक कव्हर अगदी नवे वाटत होते.

मीनाने ताडले. हीच आपली सी.डी! तिने ती रिकन्फ़र्म करण्यासाठी दोनच मिनिटे लावून पाहिली अन ते कफ़र्म झाले. मीनाने ती सी.डी. आपल्याच पर्समधे ठेवली.

चवथ्या सी.डीत दृष्य काहीच नव्हते. कोरी पट्टी येत होती. मीनाने सी.डी. पुन्हा पुन्हा तपासली. अगदी शेवटी शेवटी त्यावर काही फ़ोटो होते. त्यात एक तिचा स्वत:चाच होता. पण नंतरचा फ़ोटो पाहून मात्र मीनाला बसल्याजागीच घाम फ़ुटला. शोभा! यात शोभाही होती? तिच्या वागण्यात तर कधीच जाणवले नाही? पंचम मार्केटमधील डेंटिस्टकडे ती जिथे कामाला होती त्या रस्त्यावर ती चालत असतानाचा तिचा फ़ोटो होता हा! शोभा? तिला हे माहितीय तरी का? की यात ती बरीच आतवर पोचलेली आहे? आपली मैत्रीण? कदाचित.... कदाचित... असे तर नाही ना.... की? छे! काय घाणेरडे विचार आहेत हे! नक्कीच शोभाला माहीतही नसणार तिचा फ़ोटो काढला आहे म्हणून! यापुढे तिला तोंडावर ओढणी घेऊन चालायला सांगायला हवे. भयानक आहे हे सगळे.. भयानक! या सी.डी. वर हिरवी खुण होती.

पाचवी सी.डी खरी तर ऒन करायचीही मीनाला इच्छा होत नव्हती. आपल्या जिवलग मत्रिणीचा फ़ोटो बघून तिला तीव्र संताप आला होता. दोन ग्लास पाणी पिऊन तिने पाचवी सी.डी ऒन केली. याही सी.डीत फ़ोटो निघाले. कोणत्यातरी खोलीत एक बेड होता. बेडवर एकच व्यक्ती होती. आजूबाजूला त्या व्यक्तीचे व आणखी एका व्यक्तीचे कपडे इतस्तत: विखुरलेले होते. बेडवर निद्रिस्त असलेल्या व्यक्तीला बहुधा माहीतच नसावे की तिचे फ़ोटो काढले आहेत. एखाद्या पेंटिंगमधे चित्रकाराने आपली संपूर्ण प्रतिभा पणाला लावून आकृती काढावी अशी ती व्यक्ती होती. त्या व्यक्तीचे नाव होते योगिता! मानसोपचार घेत असलेली योगिता!
सौंदर्याच्या व्याख्या करायच्या ठरवल्या तर कावेरी अन योगिताच्या तुलनेत मीना अन शोभा कुठेच बसत नव्हत्या. पण कावेरी अन योगिताच्याच सी.डींवर लाल खुणा होत्या.

सहाव्या सी.डी वर कसलीच खुण नव्हती. मीनाने घाबरत घाबरतच ती सी.डी. ऒन केली. एका पालथ्या झोपलेल्या स्त्रीवर एक पुरुष पालथा झोपलेला होता. कॆमेरामन जणू एखाद्या मंगलप्रसंगाचे शुटिंग घेत आहोत त्या प्रमाणे फ़क्त योग्य जागीच्या हालचालींनाच कॆमेराबद्ध करत होता. शिसारी आल्याने मीनाने तीही सी.डी. फ़ास्ट फ़ॊरवर्ड केली. मात्र तिची शंका काही क्षणातच खरी ठरली. तिला त्या पुरुषाचे शरीर ओळखीचे वाटत होते. ते भाऊ होते. भाऊ बनसोडे! भाऊ बाजूला झाले व त्या स्त्रीच्या शेजारी पहुडले. त्याच क्षणी त्यांनी बरोब्बर कॆमेयाकडे हेतूपुरस्पर पाहिले. हा भाऊंचाच बंगला होता. तीच खोली होती. भाऊंना नक्कीच माहीत होते की शुटिंग चाललेले आहे. आणि दोन चार क्षणातच हसत हसत ती स्त्रीही उताणी झाली. शर्मिला! ती मात्र नशील्या डोळ्यांनी भाऊंकडेच पाहात होती. शर्मिलाने भाऊंना मिठी मारली. दोघेही हसू लागले. शर्मिलाचा चेहरा जसा भाऊंच्या तोंडाने झाकला गेला तसा मागच्यामागे भाऊंनी काहीतरी खुण केली. सी.डी. बंद पडली.

ज्या बंगल्यात मीना आत्ता याक्षणी होती त्या बंगल्याची मालकीणही फ़सल्याचे स्पष्ट कळत होते.

तब्बल पंधरा मिनिटे मीना खिळून एकाच जागी बसली होती. हा काय भयानक प्रकार असावा हे तिच्या लक्षात येत नव्हते. फ़क्त मुलींना ब्लॆकमेल करणे इतकेच याचे स्वरूप असेल? आपली ओरिजिनल सी.डी. पुढे पाठवलीय म्हणजे? म्होरक्या कुणीतरी वेगळाच आहे?

खाडकन ती भानावर आली. फ़ोनची रिंग वाजत होती. एवढ्यांदा आजवर ती दचकली नव्हती. सहा रिंग्ज होईपर्यंत ती दचकूनच फ़ोनकडे बघत होती. आपण फ़ोन उचलण्याचे कारणच नाहीये हे तिला माहीत होते. पण त्याचवेळेस तिला समजले.. प्रकरण खरे तर आपल्याच ताब्यात आहे. पाहुयात आहे तरी कुणाचा फ़ोन?

मीना - ...... हॆलो... (आवाजातील फ़रक नीट लक्षात येऊ नये म्हणून कुजबुजत्या स्वरात)
तो - अं... बेताब होगया हूं जानेमन.. कल पहुंच रही हो ना यहॊंपर.. (दारू प्यायलासारखा अन कानात कुजबुजल्यासारखा आवाज)
मीना - कहॊं...
तो - मजाक का मूड लग रहा है... मेरी जान पुरा चंडीगड इंतजारमे है...
मीना - जी...

एवढेच बोलून मीनाने फ़ोन ठेवला.

शर्मिला? चंदीगढला कशाला जाणार होती ही बया? आवाज तर असा होता की जणू हिचा प्रियकरच आहे कुणीतरी तिथे...

पण.. ही तर महाराष्ट्रीयन आहे? मग? एकदम चंदीगढ? का?

तेवढ्यात फ़ोन पुन्हा वाजला. आता हा फ़ोन घेणे धोकादायक ठरणार होते. पण धाडस करणे आवश्यक होते.

मीना - हॆलो
बग्गा - फ़ोन क्यूं रखदिया? बात नही करना चाहती?
मीना - नींद आ रही है... आप आओ ना इधर..
बग्गा - अभी? जानेमन डायरेक्ट फ़्लाईट होती तो आता भी... लेकीन भाऊ को पता चलता तो वो भी आता था (जोरात हसत)

एक नक्की! या माणसाचे शर्मिलाशी नाते प्रियकराचे नव्हते. कारण त्याच्या सोलापुरला येण्यात त्याला भाऊंचा डिस्टर्बन्स होईल असे वाटत होते. कदाचित.. किंवा नक्कीच... या माणसाचा संबंध रॆकेटशी होता... एक नाजूक प्रश्न टाकावा की नाही... मीनाने तो प्रश्न विचारलाच..

मीना - मेरी सी.डी. भेजी तो काम होजायेगा? (कुजबुजत्याच स्वरात पण हसत विचारले)

या प्रश्नात नेमके काय चुकले होते याची कल्पनाच मीनाला नव्हती. पण दचकवणारा प्रतिसाद आला.

बग्गा - तुम्हे पता चलगया उसने तुम्हारी भी सी.डी. बनायी है? (स्वरात भलतेच आश्चर्य होते.)

काहीतरी कारणाने शर्मिलाची सी.डी. बनणे ही गोष्ट त्या माणसाला जराशी शॊकिंग वाटत असावी हे मीनाला समजले.

बग्गा - बोलती क्युं नही? और ऐसे क्युं धीरेसे बोल रही हो? घरमे है कोई और क्या..?
मीना - अंहं! नौकर है आसपास... मैने वो सी.डी. चुराली है...
बग्गा - क्या???

हा बग्गाला आणखीनच धक्का होता. शर्मिलाला उपभोगल्यानंतर त्या सी.डी. वर त्याला साधारण चार लाख तरी मिळाले असते. त्याचा फ़्रान्सला जो मित्र होता, ज्याच्यातर्फ़े पैशांचे व्यवहार व्हायचे, त्याला बग्गाने आठ एक दिवसात काही हजार फ़्रॆन्क्स मिळण्याची शक्यता आहे असेही सांगून ठेवले होते. आता ती शक्यता मावळली होती. तिच्या सी.डी.ची बातमी कळण्याआधी तिने चंदीगढला मजा करण्यासाठी अन मजा देण्यासाठी यावे असे त्यालाही वाटत होते. पण सी.डी.ची बातमी कळल्यावर मात्र तिच्या येण्याचा मूळ हेतूच त्याच्यामते तिची सी.डी. हा झाला होता. आता त्या गोष्टीचा काहीच उपयोग होणार नव्हता. चार, सव्वाचार लाख मिळणार होते त्यावर पाणी सोडून उगाचच हिच्या सहवासात आणखीन आठ दिवस घालवायचे अन वर पैसे खर्च करायचे यातला त्याचा रस अचानक गेला.

शर्मिला आता त्याच्यासाठी अनावश्यक झाली होती. एका क्षणात!

दोन तीन सेकंदात बराच विचार करून त्याने प्रश्न टाकला.

बग्गा - सी.डी. भेजदोगी? डेढ लाख मिलेंगे..

हा प्रश्न विचारताना बग्गाला पूर्ण कल्पना होती की शर्मिला प्रचंड भडकणार! तिला स्वत:ला ’आपल्याला सगळ्या जगाने पाहावे’ हे कधीच रुचणार नाही. आपल्याबद्दल तिच्या मनात असलेल्या सगळ्या भावनांचा चक्काचूर होणार! आणि त्याचमुळे ती आपोआपच आपल्याला दुरावेल. तसे झाले की तिच्या इथे येण्याची कटकटच उरणार नाही. बनसोडेने नक्कीच एक कॊपी त्याच्याकडे ठेवली असेल. ती आपल्याला घेता येईलच! परत बनसोडेला शर्मिलाने ऒफ़र केलेल्या परसेंटेजमधेही पटवता येईल. हा सगळा विचार करून त्याने बिनधास्त हा प्रश्न टाकला होता. पण त्यालाच धक्का बसला.

कारण मीनाला त्या प्रश्नाचा अर्थ समजला होता. आपण आत्ता रॆकेटच्या म्होरक्याशी बोलत आहोत हे तिने ताडले.

मीना - सिर्फ़ डेढ?
बग्गा - मतलब? तुम्हे मंजूर है?

शर्मिलाच्या बंगल्यात यावेळेस दुसरीच कुणीतरी स्त्री असेल आणि शर्मिला नसेलच याची बग्गाला कल्पना येणेच शक्य नव्हते.

मीना - अब... आप कहेंगे तो मै गरीब क्या करुंगी...

बग्गाला शर्मिलावर जान कुर्बान करावीशी वाटायला लागली. काय बाई आहे. मुनाफ़ाही करून देणार, आपल्या बंगल्यावर आठ दिवस राहणारही... दिलदार! दिलदार बाई आहे.

बग्गा - मेरी जान... डेढ नही दो दिलवाऊंगा.. अब तो खुष?
मीना - लेकिन मै कल नही आ सकती.. परसो निकल रही हूं!
बग्गा - क्युं???
मीना - रिझर्व्हेशन बदलना पडा!
बग्गा - क्युं लेकिन???
मीना - यहां वो लडकी है ना... मीना.. उसने बवाल मचा रख्खा है...
बग्गा - मीना? वो वही? जिसकी सी.डी. अभी भेजी थी?
मीना - हं!
बग्गा - जोरसे बोलो ना.. नौकरको कहो बाहर जाने के लिये...
मीना - मै बादमे बात करती हूं! आपका पोस्टल पता बताईये और फ़ोन नंबर! सी.डी. भिजवानेके लिये...

बग्गाला मीनाची भीती बाळगण्याचे कारणच नव्हते. त्याच्यापर्यंत बाबी पोचणारच नव्हत्या. भाऊ आपले राजकीय वजन वापरून सगळे सोलापुरातच मिटवणार होते. त्याने दारूच्या नशेत सरळ पत्ता व फ़ोन नंबर दिला.

कोणतेही प्रयत्न करता म्होरक्या मीनाच्या हातात आला होता. फ़ोन ठेवला तेव्हा मीना बंगल्यातून जायला निघाली. शर्मिलाच्या नोकराला शर्मिलाने कुठे कुठे प्रवास केलेला आहे व कुठे कुठे करणार होती हे विचारले व माहिती जुळल्यावर सदूला घेऊन ती बंगल्याच्या बाहेर पडली.

रात्रीचे बारा वाजले होते. आता घरी जावे लागणारच होते. कारण पाहणी करण्यासाठी पहाटे चारला पुन्हा बाहेर पडावे लागणार होते. संजयने काम चोख केले आहे की नाही हे सहाच्या आतच निरखावे लागणार होते. नंतर वेळच नव्हता.

चौकीवर काय झाले हे समजून घेण्याची तिला भयंकर उत्कंठा होती. पण आता डोळेही मिटायला लागले होते, तिला स्वत:ला निदान रात्री तरी काहीच धोका नव्हता आणि मुख्य म्हणजे आमदारसाहेबांच्या स्वागताला ताजेतवाने दिसणे फ़ार महत्वाचे होते.

अहिंसा क्रान्ती पक्षाची गाडी मीनाच्या जुनाट, बकाल वस्तीकडे वळली तेव्हा सदू आजच्या दिवसातील वेगवान घडामोडी आठवून मीनाच्या तडफ़ेवर बेहद्द खुष झाला होता.

वाघमारे चौकीवर परत आला तेव्हा मोर्चा, भेंडे कुटुंबीय अन योगिता व तिच्या घरचे निघून गेले होते. जादा कुमक आली होती. पण आता काहीच काम नव्हते. आता फ़क्त शर्मिला, माधव व नंदन यांना जनक्षोभास्तव अडकवून ठेवणे व सोडवण्याचा प्रयत्न करणे, कावेरीला पकडून तिला अटक करणे व उद्याच्या उद्या स्वत:च्याच बदलीच्या मागे लागणे इतकेच राहिले होते. सगळे जाबजबाब झालेलेच होते. तो निघून गेल्यानंतर काय झाले हे महिला पोलिसांनी त्याला रंगवून सांगीतले. कावेरीच्या शोधार्थ दोन महिला व दोन पुरुष पोलिस त्याने पिटाळले.

मात्र वाघमारेचे दुर्दैव संपले नव्हते. भाऊंनी फ़ोन करून त्याला शर्मिलाला पकडल्याबद्दल झापला. त्याने मोर्चाने आणलेला दबाव सांगीतला. तरीही भाऊ झापत होते. शेवटी वाघमारे बिथरला व त्याने भाऊंनाच शिवी दिली. भाऊंनी फ़ोन आपटला. वाघमारेला आपले उद्याचे भवितव्य समजून चुकले. उद्या आमदार आले की आपली सर्वांसमक्ष चंपी करून आपल्याला फ़ालतू एरियात ट्रान्सफ़र करणार! त्याचा राग त्याने एक दोन शिपायांवर काढला. त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी आपले ऐकून घेतले. मात्र इकडे नंदन खवळला होता. त्याने वाघमारेला हाक मारली. आजवर अशी हाक त्याने वाघमारेला मारली नव्हती.

नंदन - ए वाघमारे... ***** चरबी चढली का? काढ हे कुलूप...

झालं! आत्तापर्यंतचा अपमान सहन करणारा वाघमारे भयानक भडकला. त्याने दोन शिपायांना घेऊन नंदनला चौकीतल्याच एका बंद खोलीत नेले. किमान वीस मिनिटे नंदनच्या जीवघेण्या किंकाळ्या ऐकणारा स्टाफ़ निवांत होता. मात्र माधव संपूर्ण हादरला होता. शर्मिला तर गर्भगळीतच झाली होती. इथे काय झाले आहे ते कसेतरी बग्गाला कळवण्याचा तिचा प्रयत्न तिने तात्काळ थांबवला.

नंदन अक्षरश: रांगतच खोलीच्या बाहेर आला. कसाबसा पाण्याचा एक घोट गिळेपर्यंत वाघमारेने तो ग्लास लाथेने उडवला. नंदन रडत होता. त्याचे ते भेसूर रडणे पाहून माधव अन शर्मिला चिडीचूप झालेले होते. नंदनच्या अंगावर कुठेही जखम नव्हती की रक्ताचा थेंब! पण त्याला नुसतं बसणंसुद्धा शक्य नव्हतं!

तो तसाच रखडत, खरडत माधवपाशी येऊन बसला.

आता अचानक शर्मिला भेसूर रडू लागली.

महिला पोलिसांनी तिची चौकशी केली तेव्हा ती नुसतीच घाबरलेली आहे हे त्यांना समजले.

वाघमारेने काहीही कारण नसताना माधवला त्याच खोलीत नेले. माधव नंदनपेक्षाही जास्तच आक्रोश करत होता. नंदनला पडलेला मार बरा अशी माधवची अवस्था झाली होती. त्याला तर दोन शिपायांनी मुटकुळं करूनच आणलं!

अर्ध्या तासाने वाघमारेने अचानक काही कागदपत्र तयार करत आलेली सगळी जादा कुमक परत पाठवली. आता चौकीवर एक शिपाई अन एक महिला पोलीस राहिले. दोन शिपाई व दोन महिला पोलिस कावेरीच्या शोधार्थ गेलेले होते. त्यांचे दर अर्ध्या तासाने फ़ोन येत होते व वाघमारे त्यांना सूचना देत इकडून तिकडे पळवत होता. शिपायाला वाघमारेने बसस्टॆन्डवरून गुटखा आणायला सांगीतले. महिला पोलिसाला त्याने शर्मिलाच्या चौकशीसाठी तिला आत घेऊन चल म्हणून सांगीतले. शर्मिला हादरली.

आत गेल्यावर त्याने महिला पोलिसाला शर्मिलाला बडवायची सूचना दिली. त्यात स्वत:ही थोडा हात धुवून घेतला. शर्मिला ओरडत होती. सतत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. शेवटी तिला बोलू दिले तेव्हा ती म्हणाली की या बाईसमोर मी काही सांगणार नाही. यात शर्मिलाचा उद्देश वेगळा होता. वाघमारेला रॆकेटबद्दल काहीतरी तरी माहिती होती. त्या बाईला काहीच नव्हती. जाब घ्यायचा आहे म्हणून वाघमारेने महिला पोलिसाला बाहेर पाठवले. महिला पोलीस जराशा संशयानेच बाहेर आली.

वीस मिनिटाने वाघमारे बाहेर आला तेव्हा फ़ार आनंदात दिसत होता. शर्मिलाने त्याला सांगीतले होते की त्याने जर तिला बग्गाला फ़ोन करू दिला व आत्ताच्या आत्ता सोडले तर त्याला ती घरातूनच दोन लाख कॆश द्यायला तयार होती. हा प्रस्ताव जरा गंभीरच होता. अचानक शर्मिला कशी पळून गेली हे सांगणे जमणारच नव्हते. पण दोन तीन जेंट्स अन लेडिज पोलिसांना मिळून लाखभर रुपये दिले तर काहीतरी नाटकी प्रसंग निर्माण करायला ते तयार होणार होते. असे आपल्या हाताखालील पोलीसही वाघमारेला माहीत होते. ’तुला रात्री अडीचला व्हॆनमधून तुझ्या घरी नेऊ, तेथेच खात्यातल्या लोकांच्या हातावर कॆश ठेवायची, तिथून तुझ्या अंगावर लोखंडाने काहीतरी प्रहार करू, खात्यातील एका शिपायाच्या अंगावरही प्रहार करू, अन तुला बसस्टॆंडपाशी सोडू अशी अतर्क्य योजना वाघमारेने तिला ऐकवली. याक्षणी सुटण्यासाठी काहीही करायची शर्मिलाची तयारी होती. ती हो म्हणाल्यावर वाघमारेने त्याची शेवटची अट ऐकवली. आत्ताच्या आत्ता इथेच शर्मिलाने त्याची वासना भागवायची होती.

अत्यंत तिटकारा येऊनही शर्मिलाने ती अट मान्य केली व पुर्णही केली.

वाघमारे बाहेर आला तेव्हा महिला पोलिसाकडे पाहून डोळा मारून म्हणाला.. ’पंचवीस... आहे का तयारी?’

ती पोलीस दुसरीकडे मान फ़िरवून बसली. तोच होकार आहे हे अनुभवाने वाघमारेला माहीत होते.

हात हलवत व्हॆन परत आली हे पाहून रागवायच्या ऐवजी वाघमारे खुषच झाला. ताबडतोब अनुभवातील दोन शिपाई व आणखीन एक महिला पोलिस त्याने तो प्रसंग निर्माण करायला तयार केले. चौघांना मिळून एक लाख मिळणार होते अन एक लाख वाघमारेला...

केवळ काहीच वेळात, म्हणजे बरोब्बर मध्यरात्री दोन वाजता, ज्यावेळेस मीना शर्मिलाच्या घरातून बाहेर पडून आपल्या घरी जाऊन झोपली होती, शर्मिला व्हॆनमधून तुफ़ान वेगात स्वत:च्या घरी निघाली होती... आणि .... त्याचवेळेस एक व्यक्ती वळणावर उभी होती... पलीकडून जी गाडी येईल त्याच्याखाली जीव देण्यासाठी...

योगिताला आपले भवितव्य समजले होते. तिच्या घरच्यांनाही समजले होते. चौकीवर जे प्रकार झाले त्यांचा अर्थ इतकाच होता की उद्याच्या पेपरांमधे योगिता या निरागस मुलीला फ़सवणारा नंदन वार्के समाजाच्या समोर नग्न होणार होता. आणि त्याचा परिणाम म्हणून योगिता आयुष्यात कधीही उभी राहू शकणार नव्हती. आजवर कशीतरी लपवलेली ती गोष्ट सेवाभाव रुग्णालयातील त्यातल्या त्यात समजदार महिला पेशंटने वनिता नर्सला नुकताच झालेला प्रकार सांगीतल्याने समाजासमोर उघड झाली होती. शांतारामने काय केले हे जसे त्या पेशंटने सांगीतले, रुग्णालयाने ’आपल्या अखत्यारीतला विषय’ मानून सरळ पोलीसकेस केली होती. त्यात योगिताचा सगळा इतिहासच उघड झाला होता. कारण मीना कातगडे या बाईने योगिताच्या घरातल्यांच्या भावनांचा चक्काचूर करत सरळ त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना भाग पाडले होते.

घरी आल्यानंतर शांतपणे विचार केल्यावर ही बाब योगिताच्या आईवडिलांना जाणवली. शांतारामने केलेला विनयभंग हा प्रकार थोडक्यात आटोपला असता. कदाचित योगिताचे नावही त्यात गोवले गेले नसते. पण नंदनला पकडल्यामुळे सगळाच प्रकार उघडा झाला.

मात्र योगिताचा भाऊ लहान असला तरी स्वतंत्र विचारांचा होता. त्याने आई वडिलांचे डोळे खाडकन उघडले होते. वयाने लहान असूनही त्याने घरातच असा विचार करताना पाहून आई वडिलांची निंदा केली होती. त्यांची भांडणे झाली होती. मात्र भावाने निर्वाणिचे सांगीतले होते. या प्रकरणात ताईच्या बाबतीत तुम्ही माघार घेणार असाल तर मी चाललो. मला राहायचे नाही इथे!

बराच विचार केल्यानंतर त्याचे म्हणणे त्यांनाही पटायला लागले होते. व्हायचे ते केव्हाच झाले होते.

योगिताचे आयुष्य बरबाद झालेच होते. नशीब दुसरीही मुलगी नव्हती की लग्नाचा प्रश्न यावा. आता हातपाय गाळून गप्प बसण्यापेक्षा यथाशक्ती प्रतिकार करणे हेच योग्य होते.

नंदनविरुद्धची केस चालूच ठेवण्याचा निश्चय झाला. बालादपि सुभाषितं ग्राह्यं!

मात्र मीना या मुलीने यात का पडावे हे त्यांना समजत नव्हते.

नंतर त्यांना ती मुलगी आठवली. जी एखाद्या विजेसारखी कोसळत होती. जिने वाघमारेला सरळ सरळ थोबाडात लावली. जिने त्या पकडलेल्या बाईला विव्हळण्याइतकं मारलं! एक मुलगी जर अशी वागू शकते तर आपण का नाही?

मात्र.... आजच्या दिवस घरी आलेल्या योगिताच्या मनात आत्महत्येचे विचार प्रकर्षाने येऊ लागले होते...
कावेरी या विषयावर आज अनेक घरांमधे चर्चा चाललेली होती.

पण कावेरी... तिला कशाचेच भान नव्हते.

ती चौकीवरून सरळ घरी आली अन केवळ पंधरा मिनिटात पुन्हा आवरून ती निघाली.

फ़क्त जाण्याआधी तिने एक फ़ोन केला होता व त्यावर फ़क्त ’दोन लाख’ इतकंच म्हणाली होती ती! तिकडून होकार आल्यावर ती निघाली.

वेळ रात्री पावणे अकराची! कावेरीसारखी स्त्री तीरासारखी बेभान होऊन एका विशिष्ट दिशेला चालत चालली होती.

एका बंगल्यासमोर आल्यावर तिने गेट वाजवले. रोमू नावाचा कुत्रा भुंकू लागला. पण तो बांधलेला होता. कावेरी सरळ आत आली. सदू मीनाबरोबरच असलेला तिने पाहिला होता. कसलाही विचार न करता ती सरळ वरच्या खोलीत आली.

नगरसेवक बनसोडे प्रचंड विचारमग्न होते. त्यांना पुर्ण आत्मविश्वास होता की उद्याचा दिवस त्यांचाच! मीनाचे पद जाणार, नंदन अन माधव सुटणार, आमदार वाघमारेला अतिशय झापणार, पुन्हा आपल्या हातात सुत्र येणार!

प्रश्न फ़क्त एकच होता. सगळ्या सी.डी. मोडून फ़ेकून देण्यात आल्या होत्या. आणि हे काम कुणी करावे तर सदूने? त्यात शर्मिलाचीही सी.डी. होती. त्यामुळे शर्मिला फ़ुकटच हातची गेली होती. आता ती चौकीत सडत होती हे आठवून खरे तर त्यांना बरेच वाटले. मगाशी उगाचच वाघमारेला झापला. असली बाई अडकलीच पाहिजे.

सचिव माने व बनसोडे एकाच गावाचे! साधारण एकाच वयाचे! ते चांगले मित्र होते! पण सचिव सचिव झाल्यापासून किंचितच दूर झाले होते त्या नात्यातून! आणि ते समजण्यासारखेही होते. शेवटी पक्षाच्या संस्थापकांबरोबर राहायचे म्हणजे असली नाती अन मैत्री टिकवणे शक्य होणारच नाही. पण हेही तितकेच खरे होते की वेळ पडलीच तर सचिव संस्थापकांना निश्चीत भाऊंना सोडवायला सांगणार होते. आणि त्याची तरी किती जरूर होती? फ़ारच कमी! स्वत: संस्थापकांना अतिशय नीट माहिती होते की त्यांचा मुलगा बच्चा असल्यापासून बनसोडे आपल्याबरोबर आहे. आपण नवीन पक्ष काढला तो सोलापुरात अन काही प्रमाणात खुद्द उस्मानाबादमधेही उभा करण्यात बनसोडेने महत्वपूर्ण कामगिरी निभावलेली होती. आज निदान सहा जागा अशा होत्या की तिथले उमेदवार निवडून येण्यात कधीकाळी बनसोडेने केलेल्या ग्रासरूट लेव्हलच्या कामाचा सहभाग होता. बनसोडेच्या कॊस्टवर मीना या कालच्या पोरीला वाचवायला सचिव अन संस्थापक कोणीच तयार झाले नसते.

क्षणाक्षणाला भाऊ स्वत:वरच खुष होत होते. नडगीला आता पट्टी बांधली होती. नाकाकडे सारखा हात जात होता अन त्यामुळे शर्मिलाला झालेली अटक सुखावत होती. शर्मिलाला अटक झाली तर प्रकरण आपल्यापर्यंत पोचेल ही भीती मगाशी उगाचच वाटली हे त्यांना उमगले होते.

पण... पण... असे का वाटत आहे की.... बराच वेळ झाला ....

कुणीतरी आपल्या खोलीत आहे?... कसला तरी मंद सुगंध....

भाऊंनी खाडकन वर पाहिले.

कावेरी!

कावेरी? आपल्याकडे? आत्ता?

एकच क्षण! एकच क्षण तिचे ते रूप पाहून भाऊंना सगळ्याचा विसर पडला होता. झरझरीत साडी, गुलाबीपणाकडे झुकणारा गोरापान रंग, आव्हान देणारे डोळे, संपूर्ण खोलीत पसरलेला एक जादुई सुगंध!
कावेरी!

भाऊ बहकलेले होते. कावेरी दाराला टेकून त्यांच्याकडे पाहून अशी हसत होती जणू दोन प्रेमिकांना आता कितीतरी दिवसांमधून पहिला एकांत मिळाला होता.

पण तो क्षण गेला. भाऊंना आठवले.... आजच्या दिवसात काय काय झाले ते! कावेरी या प्रसंगी इथे असण्यात नक्कीच काहीतरी काळबेरं होतं!

भाऊ - तू?

कावेरी लाडीक हालचाली करत दोन पावले पुढे आली.

कावेरी - दहा मिनिटे झाली.
भाऊ - तू आत्ता कशी?
कावेरी - काय लागलं नाकाला?
भाऊ - ते जाउदेत... तू कशी आलीस आत्ता इथे?

कावेरी भाऊंच्या समोर बसली. आळस दिल्यासारखे करत म्हणाली:

कावेरी - जगात काय चाललंय ते सांगावं म्हंटलं!
भाऊ - काय चाललंय?
कावेरी - दोन लाख दिले... वाघमारेला
भाऊ - कुणी?
कावेरी - शेठजींनी
भाऊ - कोण शेठजी?
कावेरी - दुसरे कोण? सुंदरमल...

स्वत:च्याच अंगावर उकडत असल्याप्रमाणे फ़ुंकर मारत कावेरी म्हणाली. तिची ती अदा पाहून पुन्हा क्षणभरासाठी भाऊ घायाळ झाले.

भाऊ - सुंदरमल?... का?
कावेरी - मी सांगीतलं नसतं का? मला ते माधवमुळे बोलवतात म्हणून...?
भाऊ - म्हणजे?

कावेरी लाजल्याप्रमाणे खाली नजर झुकवून हासली. किमान मिनिटभर भाऊ तिच्याकडे बघत ती काय म्हणाली याचा विचार करत होते. त्यांच्या दिवसभर वाट्टेल ते प्रसंग झेललेल्या टाळक्यात फ़ारच हळूहळू प्रकाश पडला. अन तो पडल्यावर तर त्यांना आभाळच ठेंगणे झाले.

माधवला पकडल्यावर तो रहस्य उकलणार होता. त्याच्यावर नंदनप्रमाणेच मुलींना फ़सवल्याचा आरोप होता. त्याने कावेरीचे, आपले, सुंदरमलचे अन सिसोदियाचे नाव तर सांगीतलेच असते. मोर्चा आलेला होता म्हंटल्यावर वाघमारेलाही फ़ारसे काही करता आले नसते. सुंदरमलने इज्जतीला घाबरून आधीच वाघमारेला पैसे देऊ केले. त्यामुळे माधव काहीही बकला तरी आता ते बाहेर पडणार नव्हते. नंदनची भीती सुंदरमलला नव्हतीच! पण त्याच पैशात एकूण प्रकरणच बाद करायचे सांगीतलेले असणार असल्याने आता सगळेच शांत झालेले असणार होते. परस्परं तेरंभारे!

पण मग शर्मिलाचे काय? तिला पकडलंय म्हंटल्यावर ती काहीतरी बरळेल की?

भाऊ - पण.... शर्मिला?
कावेरी - बुद्दू आहात.

कावेरी काय बोलतीय हेच भाऊंना समजत नव्हते. कावेरीने चौकीवर सुंदरमलचे नाव सांगीतले तर सुंदरमल धोक्यात येणार होता. पण सुंदरमलचे नाव तर माधवही सांगू शकत होता. म्हणून सुंदरमलने पैसे देऊन सगळंच शांत केलेलं दिसत होतं.

पण शर्मिलाचं काय? आपण बुद्दू कसे?

भाऊ - नीट बोल...
कावेरी - फ़क्त बोलायचंच आहे?

तिच्या त्या अदांनी घायाळ होत असतानाच भाऊ प्रचंड वेगाने विचारही करत होते.

भाऊ - शर्मिला कुठे आहे?
कावेरी - चौकीवर.. तिघंही चौकीवर आहेत... फ़ोन करून विचारा...
भाऊ - मग? ती ....

भाऊंना अचानक जाणवलं की आपलं अन शर्मिलाचं काहीतरी सी.डी. प्रकरण आहे हे कावेरीला माहीतच नाहीये. सी.डी. हा विषय कावेरीपासून दडवण्यात आलेला होता. पण ते कावेरीला आजच मीनाकडून कळलं आहे हे त्यांना कळलं असतं तर एक क्षणही तिला त्यांनी बसू दिलं नसतं!

भाऊ - शर्मिला नाही का सांगायची? ... सुंदरमलचं नाव?
कावेरी - काय सांगेल ती?

आपण बुद्दू का आहोत हे भाऊंना आता समजले. खरच की? काय सांगणार शर्मिला? सी.डी. प्रकरण तर ती बोलणारच नाही. कारण ते माधव अन नंदनही बोलणार नाहीत. कितीही झालं तरी वाघमारेला सी.डी. प्रकरणाचे हप्ते जात होतेच. कुत्र्याची जात आहे. हप्त्यांची आठवण आली की इमान दाखवेलच! मग शर्मिला काय सांगणार? आणि कावेरीच्या दृष्टीने शर्मिला काहीच करू शकणार नाही याचे वेगळेच कारण आहे. कावेरीला सी.डी. ची भीतीच नाहीये. तिला भीती आहे ती बेकायदा शरीर विक्रय केल्याच्या आरोपाखाली अटक होण्याची! पण त्यात शर्मिला काय करणार? तोच तर आरोप सिद्ध होऊ नये म्हणून दोन लाख दिले गेले आहेत. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र तसं आपलं काम आपोआपच झालं आहे.

भाऊ - म्हणजे तिघं मजेत आहेत तर चौकीवर...
कावेरी - फ़क्त तिघंच मजेत आहेत....
भाऊ - म्हणजे?
कावेरी - मी तुमच्याकडे आलीय... पण तुमचं लक्षंच नाहीये...
भाऊ - हा हा हा! तू तर सुंदरमलकडे जायला हवं होतंस.......?
कावेरी - आज? ... आज त्यांची हिम्मत तरी होईल का? ... आई वाटेन त्यांना मी....

इतक्या दर्जेदार विनोदावर भाऊ जवळपास पाच मिनिटे हासत होते. कावेरी खळखळून हासत त्यांची साथ देत होती.

जसजसा घड्याळ्याचा काटा सरकत बाराकडे जात होता, वाईट ग्रहांचा फ़ेरा बहुधा संपू लागला होता. भाऊ पुन्हा जुने भाऊसाहेब बनसोडे होत होते. आणि ते हसताना नाकावरील जखमेमुळे विनोदी दिसत असल्यामुळे कावेरी आणखीनच जोरात हसत होती.

भाऊ उठले. तशी तीही उठून उभी राहिली. तिच्या निकट गेल्यावर भाऊ पिसाळल्यासारखे तिच्याशी झोंबू लागले.

कावेरी - नाकाला.... नथ लागली का कुणाची... चुकून?

खिदळत खिदळत उभ्या उभ्याच रानटी पद्धतीने प्रेम चालू झाले. कावेरीला फ़ालतू नाजूकपणा आवडायचाच नाही. सुंदरमलकडे जायला ती त्याचमुळे नाराज असायची.

भाऊंनी तिच्या पदराला हात घातला तसे तिने त्यांना पलंगावर ढकलले. ते करताना तिचा सॆंडल चुकून त्यांच्या नडगीला लागला. ते विव्हळले. ते पाहून कावेरीने आणखीनच चेष्टा केली. त्यामुळे भाऊ लटकेच चिडले. त्यांनी त्या चेष्टेचा सूड तिच्या शरीरावर काढायला सुरुवात केली. कावेरी आणखीनच सुखावली.
रात्रीचा सव्वा!

दोन शरीरं धपापत एकमेकांशेजारी पहुडली होती. खिदळण्याचा अजून अंत झालाच नव्हता. जणू प्रेम नसावे, स्पर्धाच असावी तसे वागत होते!

कावेरी - निघते...
भाऊ - आत्ता?
कावेरी - पहाटे तुमचे साहेब येणारेत असं सुंदरमल म्हणत होते...
भाऊ - गोली मारो साब को
कावेरी - ती तुम्हीच मारा.. मला जाऊदेत...
भाऊ - तुला जाऊ देणारच नाहीये मी...
कावेरी - जाऊ देणारच नाहीये... वाघमारेला भेटायचंय दिड पावणे दोनला
भाऊ - कशाला? (भाऊ चक्रावले.)
कावेरी - जाबजबाब वाचून शेठजींनी फ़ोन करायला सांगीतलाय
भाऊ - अरे? च्यायला खरच की? मलाही फ़ोन कर बरका?
कावेरी - तुम्हाला कशाला? तुम्ही काय दोन लाख दिलेत?
भाऊ - मी कशाला देऊ? ज्याला काळजी तो देईल

पुन्हा दोघे हसायला लागले. भाऊ पुन्हा आवळत असतानाच प्रतिकार करून कावेरी उठली. इतस्तत: विखुरलेले सगळे कपडे गोळा करून ती बाथरूममधे गेली. तिला पाठमोरी पाहताना भाऊंना आत्ताच उपभोगलेले स्वर्ग सुख आठवत होते. भाऊंच्या तोंडावर विजयी हास्य उमलले. उद्याचा दिवस आपलाच! या विचाराने ते उठून बसले.

दहा मिनिटांनी कावेरी बाहेर आली. आधीहूनही सुंदर दिसत होती ती! भाऊंकडे पाहात येते म्हणाल्यावर भाऊंनी तिला पुन्हा अडवायचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस ती अधीन झाली नाही. भाऊही निराश झाले नाहीत. उद्यापासून हिला केव्हाही बोलवता येईल या सुखद विचारात त्यांनी तिला जाऊ दिले. खिडकीतून तिला भाऊ बघत होते. इतक्या अपरात्री ही कशी जाणार हा विचारही त्यांच्या मनात आला नाही. कावेरीने वर पाहिले. दोघांनीही एकमेकांना हात केला. त्यानंतर भाऊंनी स्वत:साठी सेलेब्रेशन ड्रिंक तयार केले. जवळपास पंधरा मिनिटे खिडकीत उभे राहून भाऊ ड्रिंक घेत होते. त्यानंतर बाथरूमला जावे या विचाराने त्यांनी ग्लास खाली ठेवला अन बाथरूमचे दार उघडून ते आत गेले. समोरच मोठाच्या मोठा आरसा होता. भाऊ रोजच आत गेल्या गेल्या त्या आरश्यात स्वत:चे रूप बघायचे. मात्र आज...
आरश्याकडे बघताना भाऊ नखशिखांत हादरले होते....

कावेरीने तिच्या लालभडक लिपस्टिकने आरश्यावर मोठ्या अक्षरांत लिहून ठेवले होते....

वेलकम... टू द वर्ल्ड ऒफ़ एड्स....

आज रात्री चौकीच्या भागात बरीच वाहतुक होण्याची शक्यता होती. हे माहीत असल्यानेच तीरासारखी चालत असलेली ती व्यक्ती एका वळणावर उभी राहिली. येईल त्या गाडीसमोर ती स्वत:ला झोकून देणार होती.

आणि तुफ़ान वेगात एक गाडी येत आहे हे वळणावर पडलेल्या दिव्यांच्या झगमगाटावरून जाणवत होते.
करकचून ब्रेक दाबूनही ती गाडी सावरू शकली नाही. अचानक चकव्याप्रमाणे समोर आलेल्या स्त्रीला गाडीने धडक दिली.

किमान वीस फ़ूट ती स्त्री गाडीबरोबर फ़रफ़टत गेली असावी. रात्रीच्या त्या नीरव शांततेत इतका प्रचंड आवाज ऐकून आजूबाजूचे काही लोक उठून धावले.

शरीराचे अनेक तुकडे झालेले एका स्त्रीचे प्रेत पडलेले होते. आणि गाडीतून उतरत होते, गाडीचा ड्रायव्हर, काही पोलीस, स्वत: वाघमारे आणि...

शर्मिला!

आणि शर्मिलाने प्रेत लगेच ओळखले.

कावेरीने स्वत:च्या जीवनाचा अंत केला होता.

पण जाण्यापुर्वी... दोन फ़ार महत्वाच्या गोष्टी तिने केल्या होत्या... एक तिच्या नकळत झाली होती.. दुसरी हेतूपुरस्पर...

इतक्या लोकांनी पाहिल्यावर शर्मिलाला आता सोडणे वाघमारेला शक्य नव्हते आणि........

सोलापूर सेक्स स्कॆंडलचा सोलापुरातील सर्वात मोठा मोहरा... भाऊसाहेब बनसोडे... निदान... सडून तरी निश्चीतच मरणार होता...

गुलमोहर: 

काय ओघ आहे.............................
निशब्द करणार...............
पु.ले.शु

सर्वांचे मनापासून आभार!

कामानिमित्त परगावी असल्याने मला काही अडचणी आल्या होत्या. दहाव्वा भाग तयार आहे. अपलोड करत आहे.

प्रेमळ प्रोत्साहनाचे अनेक धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अहो बेफिकिर तुम्ही काय लिहिता हो? जबरी... कुठे ही तपशीलात घोळ नाही.
अगदी त्रोटक सोडल्यास.
एक शंका आहे फक्त मला, एच आय व्ही असा एका झटक्यात बहुतेक पास होत नाही. Happy बाकी कथा सॉलिड. इतकी पात्रं असूनही कुठेही गोंधळ उडत नाही वाचताना..