कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा...

Submitted by ज्ञानेश on 3 April, 2010 - 14:46

------------------------------------------------------------------

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...
.
.
.
.
-ज्ञानेश.
---------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

तुमच्या रचनांना वाखाणताना माझ्याकडील सुंदर, अप्रतिम, इ. सर्व विशेषणे संपली आहेत, त्यामुळे कसे वाखाणावे असा प्रश्न पडला आहे.

अफाट प्रतिभा आणि पुन्हा तोच सहजपणा...वाह!!

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?
... शब्दांच्या पलीकडले!!

नभानेच ज्याचा असे घात केला,
अशा पाखराने उडावे कुठे?
या ओळी मी काही दिवसांपूर्वी एका प्रतिसादात वाचल्या होत्या.तेव्हापासून ही गझल वाचायची ओढ लागली होती.आज शोधली....
धन्य जाहलो.............../\..............

>> गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?
क्या ब्बात!! Happy

मस्त गझल. (कशी कोण जाणे वाचायची राहिली होती.)

याला म्हणतात शंभर नंबरी सोनं. याला म्हणतात गझल.
अप्रतिम गझल आहे.

(ऑर्कुटवर वाचलीच होती, पण आता वाचताना तीच मजा आली).

ज्ञानेशची आणखी एक ऑल टाईम फेव्हरीट गझल म्हणजे..

इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले होते ! Happy

( सरकारी कचेरीचा शेर त्यातच आहे ना ? बहि-यांच्या कानात मुके ओरडले होते ! अक्षरशः वेडा झालो होतो तो शेर वाचून. ज्ञानेशने ही गझल मायबोलीवर द्यावी ही विनंती)

मी नीट वाचली
छान आहेच ही गझल पण तितकीशीही ग्रेट गझल नाही वाटत ही

ज्ञानेशजीनी याहीपेक्षा कितीतरी ग्रेट गझला लिहिल्या आहेत काही मी वाचल्याही आहेत

कधी कधी शायराचे नाव पाहूनही आवर्जून प्रतिक्रिया येतात /लोक देतात
मीही इथे ज्ञानेशजींचे नाव ऐकूनच वाचायला आलो आहे पण त्याचा परिणाम माझ्या प्रतिसादावर मात्र न होवू देण्याचा मी प्रयत्न केलाय !!!

चू भू द्या घ्या

Pages