कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा...

Submitted by ज्ञानेश on 3 April, 2010 - 14:46

------------------------------------------------------------------

कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !

मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...
.
.
.
.
-ज्ञानेश.
---------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

व्वाह ज्ञानेश !! सुरेख गझल !
>>बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?

मस्तच !

क्या बात है!! सुरेख गझल !!
क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?>>
रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !>>
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...
>>> फारच भिडले !!

ज्ञानेश..... बरं झालं तुम्ही ही गझल दिलीत. मी "रुतावे कुठे अन दुखावे कुठे" ही माझी गझल तुमच्याच सानी मिसर्‍याच्या प्रेरणेतून लिहिली. पण लिहिल्यानंतर प्रेरणा कुठून घेतली ते आठवेचना. तुमच्या या गझल मुळे एकदम आठवलं. विसरल्यामुळे तुमचे आभार मानायचे राहूनच गेले.

मनापासून धन्यवाद आणि दिलगीर सुद्धा आहे हं.

गझल खूप आवडली हे वेगळं सांगायला नकोच Happy

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे

रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

व्वा!! सुमंदारमालेची गंमतच वेगळी... मजा आली....

संपूर्ण गझल आवडली.

'तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे'
हे कवींचे सार्वत्रिक आणि सार्वकालिक दु:ख!

सही !!!!

व्वा व्वा ज्ञानेश... बरे झाले इथे टाकलीस ते...

पूर्ण गझलच मस्त आहे पण..

बारकावे आणि पुरावे वर आपण तर लईच फिदा आहोत... कायम स्मरणात रहाणारे शेर...

रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे... >>> सुंदर...

मस्त ग़ज़ल आहे. वृत्ताचे नाव लिहिले नाहीत कोठे? हे वृत्त 'सुमंदारमाला' या नावाचे आहे. कवी कुसुमाग्रज यांची 'पृथ्वीचे प्रेमगीत' ही कविता किंवा कवी ग्रेस यांची 'तिला पाहिले मी नदीच्या किनारी, तिचे केस पाठीवरी मोकळे' ही कविता याच वृत्तात आहे. अवघड वृत्त आहे.

छान! अभिनंदन! Happy

संपूर्ण गझल मस्त.
त्यातही-मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?)

नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे...

छानच.

>>कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे...
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?

व्वा !!

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?) >>>>>> सॉल्लीड !!

सगळेच शेर जबरदस्त, माझ्यासारख्या नवख्यांसाठी तर मेजवानीच आहे ही ! धन्स ज्ञानेशजी !!

Pages