माझी हरहुन्नरी आई - बदलून ( मोठे फोटो )

Submitted by अवल on 1 April, 2010 - 02:22

नमस्कार !
सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.

तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच.
अन कुटुंबातील जवळ्जवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले.
भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या.

पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाने दोर्‍याची बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल.
१९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात.

याच विणकामाच्या नमुन्यांचे काही फोटो इथे टाकते आहे.

आणि हे सर्व चालू असताना टि. व्ही वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. अन ही सुडोकुही साधी नाहीत. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात; ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.

तिच्यावर एक सी. डी. ही मी तयार केली आहे, मराठी चॅनल्सकडे ती पाठवली होती, परंतु ओळखी नसल्याने त्याचा पाठपुरावा मला घेता आला नाही. येथे कोणाला तिचे काम आवडले तर कृपया मला मदत कराल ? केवळ तिचे हे प्रचंड काम लोकांपुढे यावे हाच दृष्टिकोन आहे. त्यात व्यावसाईक हितसंबंध नाहीत, ना तिचे, ना माझे.
असो.

आता तिच्या कामाचे काही फोटो-

हा गणपती विणलेला दाराचा पडदा

A1.jpg

ही काही डबलबेडशीट्स

A2.jpgA3.jpgA4.jpgA5.jpgA7.jpg

हा ५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल

A6.jpgA10.jpg

अन हा ६ बाय ४ फुटी टेबलासाठीचा टेबलक्लॉथ

A11.jpg

माझ्या मुलाला गाड्या अन वाहनांचे फार वेड. म्हणून त्याच्या या आजीने त्याच्या खोलीच्या खिडकीला हा पडदा विणला

A8.jpg

अन हा दाराचा पडदा. कमानी खाली नाचणारे मोर

A9.jpg

अन ही माझी आई Happy

A12.jpgतळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.


याचे मोठे फोटो फ्लिकरवरून इथे टाकते आहे

Bedsheet 2

Bedsheet

तळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.

गुलमोहर: 

अवल, काय सुंदर कला आहे तुझ्या आईच्या हातात. सगळे विणकाम एकदम सफाईदार.

नातवासाठी विणलेला पडदा खूप आवडला मला. ब्लॉग पण छान होतोय. व्हीडीओ दिसला नाही मला.

संधी मिळाली तर तुझ्या आईकडे विद्यार्थीनी म्हणून यायला नक्की आवडेल मला.

अवल, तुझ्या आईंना नमस्कार सांग! काय कला आहे गं! खूप प्रेमाने केलय सगळं ! पुढील पिढीने जीवापाड जपावा असाच ठेवा आहे.

वयाच्या ७७ व्या वर्षी एवढं करतात म्हणजे केवळ ग्रेट! प्रत्येक डिझाईन किती सुंदर विणलंय. शिवाय मोठे पडदे आणि बेड्शीट्स करणे म्हणजे खूप चिकाटीचं आहे. मानलं तुमच्या आईला.....
त्यांना माझा नमस्कार सांगा.

नशीबवान आहेस...!

माझ्या ओळी आठवल्या..

उरी अमृताचा पान्हा
गोड गळ्यात अंगाई
देवा सार्‍यांना मिळुदे
माझ्या आईवानी आई...

आईंना वंदन!!

धन्यवाद सर्वांना. आईला पुन्हा आनंद होईल, तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकून Happy
नलिनी,आई पुण्यात असते. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा मला संपर्कातून मेल केलीत की आपण भेटू शकू. आईलाही खुप आवडेल तुम्हाला भेटायला Happy अन हो, व्हिडिओ बद्दल सांगितल्याबद्दल धन्स. दुरुस्त केलय, आता बघू शकाल Happy

अवल, ह्या वयातही इतकी बारीक कलाकुसर इतक्या सफाईने करणार्‍या तुझ्या आईंना सादर प्रणाम !>>>>>>>>
माझाही.

तशी माझी आई.......................

पीडा सुमनाला, सुंड भ्रमराची
परी मधू घास देई, तशी माझी आई
.......................फुलापरी आई !

ऐरणीचे पाठी,घाव हाथोड्याचे
तेणे सोन्या भाव येई,तशी माझी आई
........................ऐरणीपरी आई!

तरू नोहे पाहे,जात पात धर्म
फूले फळे छाया देई,तशी माझी आई
.........................तरूपरी आई!

घारीची भरारी, नभी चार्‍यासाठी
लक्ष पिलांपाठी, तशी माझी आई
........................घारीपरी आई!

शशी तापे गगनी,रवि किरणाने
धरे देई शितलता,तशी माझी आई
........................शशीपरी आई!

टाकिच्या घावे,देवपण येई
देवाहुनही थोर्,आहे माझी आई
....................आहे माझी आई!!

आईंच्या चरणी ही कविता अर्पण..!! _/\_ !!विभाग्रज(अनंत केशव शिंदे).

हे सगळं काम बघून खरच थक्क झाले. आईंनी हे सगळं कुठे बघुन- वाचून केल का? मी सुद्धा थोडफार वीणकाम करते. पुस्तकात बघून नाहीतर नमुना बघून. तुम्ही हे लिहून ठेवा प्लीज. माझी काही मदत होण्यासारखी असेल तर जरूर संपर्क साधा.

"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे सोहळे" - या कविश्रेष्ठ बोरकरांच्या काव्यपंक्ति आठवल्या.
या "जादू" भर्‍या हातांपुढे पूर्ण नतमस्तक.

अवल्,
तुमच्या आई ला _/|\_ .खरंच अप्रतिम काम आहे!मला पण शिकायला आवडेल त्यांच्या कडे.माझि आई पण खूप क्रोशा चे काम करायची ,तिच्या कडून शिकुन पण घेतले होते ,पण ति नजाकत जमली नाही.

सर्वांना धन्यवाद !
विभाग्रज, खुप खुप धन्यवाद, आइला वाचून दाखवते ही कविता Happy खुप आनंद होईल तिला.
अनया, सुरुवातीला तिनेही काही पुस्तकांमधली डिझाईन्स केली पण आता तिची तीच करते नवनवी डिझाईन्स. कधी मीपण करते तिला मदत नवी डिझाईन्स करायला Happy
शशांक, धन्यवाद Happy

ग्रेट!
खरच, ह्या कलेचं त्यानी पुस्तकच लिहायला हवय, नवनवीन नमुने कसे बनवायचे ह्याच्या माहितिसह.

खरच थोरच आहे हा कलाविष्कार!

अप्रतिम !!!! तुझ्या आईला एक कडक सॅल्यूट !!
सगळे डिझाइन्स एक से बढकर एक आहेत.
माझ्या आईची आठवण आली एकदम !! ती सुद्धा क्रोशा, स्वेटर्स, वीणकाम, भरतकाम, शिवणकाम ह्यात तरबेज होती.

अवल, मी खूप लेट ही लिंक बघितली , घरी सासू सासर्यांना पण दाखवली ......खरोखर तुमच्या आईची कला पाहून थक्क झालो सगळेच ...
विणकाम वैगरे मला येत नाही पण करणार्यान बद्दल खूप आदर वाटतो.. अवल तुम्ही पण क्लास्सेस सुरु करा ना ...खरोखर शिकायला आवडेल .....
हा अनमोल ठेवा खरच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा ...
तुमच्या आईंना नमस्कार आणि अनेक शुभेच्छा

अतिशय सुन्दर हे सार पाहुन मला माझ्या आइची आठवण झाली.दोघीत खुपच साम्य आहे तिने यातील बरयाच गोश्टी तिने केल्या होत्या .चार वर्षापूर्वी तिचे निधन झाल ( वय ८७) मी महाविद्यालयात असतानाही माझे कपडे ती शिवे विणकाम भरतकाम क्रोशे सार काम तुमच्या आईसारखच होत डोळ्याचा मोतिबिन्दू काढ्ल्यावर एका डोल्याने दिसेना तेव्हा प्लस्टिक्च्या पिशव्यान्च्या पट्टया करून क्रोषाने विणून टेबल मॅट वगॅरे मोठ (जाड सुईच) काम केले तुमच अभिनन्दन एव्हढ्यासाठी कि तिच्या डोळ्यासमोर तिच्या कलेला तुम्ही सर्वान्समोर सादर केलत रेखामावशीना माझा सादर नमस्कार मनापासुन अभिनन्दन तुम्हा दोघीन्चे

Pages