माझी हरहुन्नरी आई - बदलून ( मोठे फोटो )

Submitted by अवल on 1 April, 2010 - 02:22

नमस्कार !
सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.

तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच.
अन कुटुंबातील जवळ्जवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले.
भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या.

पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाने दोर्‍याची बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल.
१९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात.

याच विणकामाच्या नमुन्यांचे काही फोटो इथे टाकते आहे.

आणि हे सर्व चालू असताना टि. व्ही वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. अन ही सुडोकुही साधी नाहीत. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात; ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.

तिच्यावर एक सी. डी. ही मी तयार केली आहे, मराठी चॅनल्सकडे ती पाठवली होती, परंतु ओळखी नसल्याने त्याचा पाठपुरावा मला घेता आला नाही. येथे कोणाला तिचे काम आवडले तर कृपया मला मदत कराल ? केवळ तिचे हे प्रचंड काम लोकांपुढे यावे हाच दृष्टिकोन आहे. त्यात व्यावसाईक हितसंबंध नाहीत, ना तिचे, ना माझे.
असो.

आता तिच्या कामाचे काही फोटो-

हा गणपती विणलेला दाराचा पडदा

A1.jpg

ही काही डबलबेडशीट्स

A2.jpgA3.jpgA4.jpgA5.jpgA7.jpg

हा ५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल

A6.jpgA10.jpg

अन हा ६ बाय ४ फुटी टेबलासाठीचा टेबलक्लॉथ

A11.jpg

माझ्या मुलाला गाड्या अन वाहनांचे फार वेड. म्हणून त्याच्या या आजीने त्याच्या खोलीच्या खिडकीला हा पडदा विणला

A8.jpg

अन हा दाराचा पडदा. कमानी खाली नाचणारे मोर

A9.jpg

अन ही माझी आई Happy

A12.jpgतळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.


याचे मोठे फोटो फ्लिकरवरून इथे टाकते आहे

Bedsheet 2

Bedsheet

तळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.

गुलमोहर: 

फारच सुंदर... आणि ते सुद्धा या वयात!! मी कल्पनाही नाही करू शकत. मानलं तुझ्या आईला.
ही डिझाईन्स खरोखरच नीट डॉक्युमेंट करून पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करता येतील का? त्यापासून बरच काही शिकता येइल सगळ्याना.
आईंना नमस्कार सांग. आणि ह्या संदर कलाकृती आमच्यापुढे आणल्याबद्दल तुलाही धन्यवाद.

सर्वांना धन्यवाद ! आईने नमस्कार केलेल्यांना आशिर्वाद दिले आहेत, अन बाकीच्या सर्वांना नमस्कार सांगितला आहे Happy

अप्रतिम आहे . खरच,सगळ व्यवस्थित डॉक्युमेंट करुन ठेवा. मला तो वाहनांचा,विमानाचा केलेला पडदा तर खुप आवडला.:)

सुंदर!! डिजाईन पण मस्त आहेत. मला गोल टेबलक्लॉथ खुप आवडला. तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा!!
माझी आई पण क्रोशा वर काम करते. रुमाल. शाली, स्कार्फ वगैरे.. मी शिकुन घेण्याचा प्रयत्न नाही केला कधी. Sad

सिंडरेला, तुम्ही तुमच्या आईने केलेले काम कसे डॉक्युमेंट करत आहात याची कल्पना द्याल का?

वा..किती अप्रतिम काम आहे. अशी हॉबी असल्यावर अजून काय पाहिजे.. खरोखर ग्रेट आहे तुझी आई.आमच्याकडून तिला नमस्कार सांग..प्रत्यक्षात भेटली असती मीठी मारून तिचं अभिनंदन केलं असतं Happy

अरे बापरे! केवढि ती चिकाटी! ते देखिल उतारवयात! ग्रेट! Happy
(हे बघितल्यावर वाटत, साल आपण आजवर आपल्या आयुष्यात काहीच केल नाही, नुस्ता वेळ फुकट घालवला! लिम्ब्या, शीक लेका शीक काहीतरी यातुन! Happy )

आरती ,खरच तुझी आई हरहुन्नरी आहे .त्याना माझा शि.सा.नमस्कार .मला माझ्या आईची आठवण
झाली .ती पण क्रोशावर्क मध्ये तरबेज होती .तिच दिसण आणि शरीराची ठेवण पण अशीच होती .
तिने टीचर्सट्रेनिंगचा कोर्स केला होता .घरी तिची दोन तीन हस्तलिखीते आहेत त्यात भरतकामाच्या
प्रत्येक टाक्याची माहिती एका बाजुला व नमुन्याची कलाकुसर त्याच पानाच्या समोरच्या बाजुला अस
आहे .मी सहज म्हणून अनेकदा न्याहाळते .मी तिसरी चवथीत असताना अगदी मन लावून क्रोशावर्क
करणारी माझी देखणी मेहनती आई डोळ्यासमोर आली .धन्यवाद .

त्यांनी आता पुस्तक लिहिण्याचे मनावर घ्यावे... आमच्यासारख्या हौशी शिकाऊंना फार मार्गदर्शक ठरेल ते.... एवढे प्रचंड काम!!!... खरच महान कलाकार आहेत त्या...

धन्यवाद ! >>> त्यांनी आता पुस्तक लिहिण्याचे मनावर घ्यावे<<< अगं आता डोळ्यांमुळे वाचन लिखाण सुटलय तिचं Sad पण पुण्यात असशील तर नक्की शिकवेल ती. मला संपर्कातून पत्र टाक Happy

मी मराठी, सुनिता, सायली; धन्यवाद !
सायली हो सांगते Happy
परवा आई येणार आहे; तिला दाखवते सगळ्यांच्याच प्रतिक्रिया Happy

Pages