जीवघेणी ४० मिनिटं !!

Submitted by हेरंब ओक on 30 March, 2010 - 12:47

मागेच शर्मिला फडके यांनी याच विषयावर इथे अतिशय उत्कृष्ठ लेख लिहिला आहेच. परंतु 'मांजा' बघण्याचा योग आत्ता आला. आणि तो बघून झाल्यावर राहवलं नाही म्हणून त्या तिरीमिरीत जे वाटलं ते लिहिलं आहे.

-------------------------------------------------------------------------

http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_28.html

श्वास कोंडला गेलाय, जगण्यासाठी विलक्षण धडपड करावी लागतेय, जीवाची प्रचंड घालमेल होतेय, काहिली होतेय, आतून उन्मळून पडल्यासारख वाटतंय, सारं निस्तेज अर्धमेलं वाटतंय असा भीषण अनुभव सलग ४० मिनिटं घेतला आहेत कधी? घ्यावा लागला तर कसं होतं माहित्ये? सरसर कापत जाणार्‍या मांजात अडकल्यासारखं वाटतं.

अगदी असाच अगदी हाच अनुभव कथा पटकथा संकलक दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा 'मांजा' देतो. ४१ मिनिटांची फिल्म. शॉर्ट फिल्म. विषय बाल लैंगिक शोषण. एवढा भयंकर विषय की भांडारकरच्या पेज-३ मध्ये शेवटी नुसता उल्लेख आणि एक पाव मिनिटाचं दृश्य बघून पुढचे दहा दिवस हादरलो होतो ते आठवतं. आणि इथे तर हा संपूर्ण चित्रपट त्यावर बेतलाय. अर्थात ४१ मिनिटं. पण लचका तोडतात ही ४१ मिनिटं.

बिना आई बापाचा १०-१२ वर्षाचा रंका आणि ५-६ वर्षांची त्याची किंचित वेडसर धाकटी बहिण. रस्त्यावरचं जीवन. रंका काचा कुटून, त्या मांजाला फासून मांजा वाळवण्याच्या कामात.. रात्रपाळीचा पिसाट हवालदार... दोघांशी बोलतो. ओळख वाढवतो. पोरीला खायला देतो म्हणून घेऊन जातो. मित्राशी बोलताना रंकाला हवालदाराचं खरं स्वरूप कळतं. रंका पोचेपर्यंत उशीर झालेला असतो !!! बहिणीला घेऊन हताश आणि असहाय्यपणे परतत असताना रंका तिला धीर द्यायला म्हणून खांद्यावर हात ठेवतो. ती झिडकारते आणि पुढे निघून जाते. स्वतःच्या भावालाही स्पर्श न करू देणारी रडत रडत पुढे जाणारी तिची ती ठेंगणी मूर्ती पाहून हलतं आतमध्ये.. आधीच्याच दृश्यात आपल्याबरोबरच रस्त्यावरच्या कुत्र्याला खाऊ घालणारी ती छोटुली हीच का असा प्रश्न पडतो. तिचे आधीचे हसरे डोळे आणि आताचा भेसूर चेहरा यांचा ताळमेळ लागत नाही क्षणभर...

पुढे मग रंका, मांजा, हवालदार, पाठलाग ...खल्लास ..... !!!

अखेरच्या दृश्यात बहिणीच्या कोमेजल्या चेहर्‍यावर हसू आणण्याचा रंकाचा सफल प्रयत्न !!!

झालं.. संपला पिक्चर. स्क्रीनवर संपतो. पण आतमध्ये संपत नाही. ओरखडे उठवून जातो.. सुरुवातीची नावं दाखवायला सुरुवात होते तिथपासूनच या चित्रपटाची भीषणता जाणवायला लागते. काळ्याशार डोहातून प्रेतांसारखी तरंगत वर येणारी नावं पाहून आपल्याला कळतं हे प्रकरण काहीतरी विलक्षण आहे, भयंकर आहे. हे असं कधी बघितलेलंच नाही. त्यातला एकूण एक प्रकार भयानक आहे. एकूण एक फ्रेम भयंकर आहे , अंगावर काटा आणणारी आहे... आणि सेपिया ट्रीटमेंट मुळे तर पिक्चर अधिकच भीषण, अधिकच वास्तव वाटतो. या अतीव बोलक्या छायाचित्रणाबद्दल पंकजकुमारचे पाय धरावेसे वाटतात. Each frame spoke a thousand words to me.. Really !!!हा चित्रपट रस्त्यावरच्या मुलंच एक उघडंनागडं जग समोर आणतो. आणि वास्तव वास्तव म्हणजे किती वास्तव असावं तर भांडारकरच्या 'चांदनी बार' किंवा रामूच्या 'सत्या' मधले संवाद नाटकी वाटावेत एवढे वास्तव. ते कानावर येऊन अक्षरशः आदळतात... आणि तेही एका १०-१२ वर्षाच्या मुलाच्या तोंडून...

शेवटचं एक मिनिट आशावादी शेवटाच्या दिशेने घेऊन जातं. पण आधीच्या ४० मिनीटांमधल्या ४० हजार वारांचं काय?

जाऊ दे लिहीवत नाहीये.. बास झालं थांबतो... झोप लागायची नाही आज ... आणि उद्या .. कदाचित परवा आणि तेरवाही !!!

------------------------

या भीषणतेचा कडेलोट पहायचा असल्यास इथे टिचकी मारुन सुनिता कृष्णन यांच्या भाषणाचा व्हिडिओ पहा.
--------------------------

तळटीप : आत्ता स्वतः राहीने माझ्या ब्लॉगला भेट देऊन या पोस्टवर कमेंट टाकली आहे.

गुलमोहर: