मांजा

Submitted by शर्मिला फडके on 13 June, 2008 - 11:02

राही अनिल बर्वे चा 'मांजा' समोर पडद्यावर पाहणे हा सोपा अनुभव नव्हता. मुंबईत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मिफ मधे पदार्पणातच उत्कृष्ट दिग्दर्शनासहीत सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा सुवर्णशंख पुरस्कार मिळालेली ही फिल्म मी दुसर्‍यांदा यशवंतराव मधे पहात असतानाही मन तसेच सुन्न झाले होते.
जेमतेम चाळीस मिनिटांचा मांजा समोर पडद्यावर उलगडत जाताना त्यातल्या प्रत्येक ब्लॅक ऍन्ड व्हाईट फ्रेममधून एक काचेरी धार अतिथंडपणे तुमच्या संवेदनशिलतेचा गळा खोलवर चिरत मन रक्तबंबाळ करुन सोडत जाते.
अनेक भीषण 'वास्तवांना' आत्तापर्यंत पडद्यावर अनेकदा पाहून आता निर्ढावलीय असं वाटायला लागलेली तुमच्यातली सेन्सिबिलिटीही समोरच्या रांका आणि चिमीच्या रोजच्या आयुष्यातल्या एका कोणत्याही २४ तासांत जे काही घडून जातं ते पाहून अंतर्बाह्य विछिन्न होऊन जाते, आणि मग मनावर काजळी धरत जाते एका दाट अस्वस्थतेची.. आपण जिथे सुखाने रहातोय त्या ह्या चकचकीत शहराच्या आंतरत्वचेवर फाटक्या चिंध्यांप्रमाणे लोंबकळत रहाणार्‍या वस्त्यांमधल्या कोणत्याही १०-१२ वर्षांच्या रांका आणि त्याच्या ४-५ वर्षांच्या बहिणीला हे सारं कदाचित रोजच भोगावं लागत असणार...!.

मांजाचा विषय चाईल्ड मोलेस्टेशनचा आहे आणि पटकथेतून तसेच दिग्दर्शनातून राही प्रत्येक फ्रेममधून ज्या धाडसाने तरीही संयतपणे, विषयावरची पकड किंचितही न सोडता, आवश्यक त्या 'डार्कनेस'सह आपल्यासमोर आणतो त्याला तोड नाही.
इतक्या कमी वेळात तिनही महत्वाच्या पात्रांच्या स्वभावतले कंगोरे, बारकाव्यांसहीत आणि मोजक्या परिणामकारक संवादासहीत विलक्षण ताकदीने आपल्यापर्यंत पोचतात..

शहराच्या क्षितिजावर म्लान काळेपणाने उडणार्‍या कावळ्यांच्या थव्यासारखी रांकाच्या आयुष्यात येणारी रोजची एक संध्याकाळ. दुष्काळी खेड्यातून आईबाप आणि किंचितश्या खुळ्या बहिणीसोबत शहरात जगायला आलेला रांका. काही दिवसांतच आई शरीर विकून पैसे कमवायचा सोपा रस्ता पकडायला निघून गेलेली आणि ते पाहून बापाने गाडीखाली जीव दिल्यावर काहीही मिळणारं काम करुन धाकट्या बहिणीला हिमतीने सांभाळत रस्त्यावर राहताना कसं जगायचं असतं हे आजूबाजूची परिस्थिती रांकाला शिकवत असतेच. ते शिकताना डोळ्यांतली उमज वय उलटून गेलेल्या माणसाची बनत चाललेली.

पतंग उडवण्याच्या वयातल्या रांकाचे हात आता काचांचा भुगा करत मांजा बनवण्यात गुंतलेले. पोट भरायचं त्याचं ते साधन. त्या संध्याकाळी तो तेच करत असताना, धांदोट्या झालेल्या फ्रॉकच्या मागे कोणीतरी मस्करीत बांधलेली पोचट डबड्यांची माळ फरपटवत, आपल्या अशक्त चिरचिर्‍या आवाजात रडत चिमी भावाला शोधत तिथे येऊन पोचते.
खाकी वर्दीतला तो हवालदार नेहमीप्रमाणे तिथेच आसपास घोंगावत आहे. ह्या हल्लीच दिसायला लागलेल्या अनाथ भावंडांची त्याला काहीशी काळजी आणि कुतुहल. त्याच्या अकारण चौकशा, विनाकारण सलगी. कामात लुडबुड करणार्‍या चिमीवर रांका खेकसतो तेव्हां हवालदार त्याच्यावरच डाफरत चिमीला समजावतोही. तिच्या फ्रॉकच्या मागची डबड्यांची माळही सोडवतो.

संध्याकाळ आणखी गडद,काळी होत जाते.
काचांचा थर दिलेला मांजा रात्रभर सुकवायला म्हणून दोन खांबांना ताणुन बसवून देत रांकाने आजचे काम संपविलेलं.त्यानंतरचं मग फुटपाथवरच्या दिव्याच्या मलूल उजेडातलं रांका चिमीचं, भटक्या कुत्र्याला पंगतीला घेऊन झालेलं 'जेवण', हवालदाराच्या जवळ येत पुन्हा झालेल्या गप्पा.
त्या कधी नव्हें ते मिळालेल्या शाब्दिक फुंकरीने सैलावलेलं रांकाचं मन आणि त्याभरात चिमीला आईस्क्रीम खायला घेऊन जाण्याची त्याने हवालदाराला दिलेली परवानगी.
'चांगला आहे हवालदार'.. मग बिडीचं थोटूक फुंकताना हातभट्टीवाल्या मित्राला तो सांगतो तेव्हां त्याच्याकडून अचानक कळलेला हवालदाराचा विकृत स्वभाव.

मध्यरात्रीच्या तडकलेल्या अंधारात जिवाच्या आकांताने रांका बहिणीला हाका मारत सैरभैर धावत सुटतो. अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या राबिटमधलं अशक्त हुंदके देत झोपलेलं चिमीचं चिमुकलं शरीर, तिचा फोलकटासारखा उडून बाजूला लटकणारा फ्रॉक आणि मुर्दाड थंडपणाने रांकालाच समजवणारा हवालदाराचा निर्लज्ज अविर्भाव.. जग असंच वागत असतं रांका, शिकून घे.
रांका आंधळ्या आवेशाने लाथा बुक्क्यांसकट तुटून पडताना हवालदाराचा फक्त कोडगा पश्चात्ताप.

पहाटे चिमीला रस्त्यावरुन चालवत नेताना रांका तिला चुचकारायला तिच्या खांद्यावर थोपटायला जातो तेव्हां भ्यालेल्या कोकरागत चिमी अंग काढते आणि रांका मुळासकट हादरतो आणि दिवसभर काही न सुचून वणवणल्यावर त्याच्या मनात पडते ती सुडाची ठिणगी.
त्याच रात्रीच्या अंधारात मग रांकाने हवालदाराचा दारुच्या गुत्त्यामधे घेतलेला तो विलक्षण सूड.
तो घेताना त्या एवढ्याशा पोरामधे जागलेली मानवी स्वभावातल्या कमजोर जागांवर अचूक प्रहार करण्याची जाण.

रक्ताने ओघळून जात मांजा संपतो तेव्हां रिकाम्या लटकत राहिलेल्या फिरकीप्रमाणे आपलं मन सुन्न भिरभिरत रहातं. मात्र मांजाचा हा शेवट नसतो.
सुदैवाने.
शेवट होतो तो चिमीच्या भाबड्या, विस्कटून गेलेल्या नजरेत माणसावरच्या विश्वासाचा कोवळा किरण पुन्हां उमटवण्यात तिच्या भावाला यश मिळाल्यावरंच.

'मांजा' कृष्णधवल रंगातली डिजिटल फिल्म आहे. संध्याकाळ, मध्यरात्र, पहाट, दुपार आणि मग पुन्हां रात्र अशा २४ तासांतल्या प्रत्येक प्रहराचं, तेही मुंबई शहरातल्या धारावी सारख्या एखाद्या बकाल वस्तीतल्या प्रहरांचं यात चित्रण आहे. चिआरास्क्युरोचा-प्रकाश छायेचा खेळ काळ्या-पांढर्‍या रंगामधून दृश्यांमधे किती ताकद आणू शकतो त्याचा नजरबंदी करणारा अनुभव या आधी आपण अनेकदा घेतलेला आहे. कागज के फूल, चारुलता मधे तो एक तरल सौंदर्यानुभव असतो आणि त्यातूनच मानवी भाव-भावनांची आंदोलने नाजूकपणे आपल्यापर्यंत पोचवली जातात, तर तारकोस्कीच्या स्टॉकर मधल्या 'झोन'पर्यंतच्या प्रवासात हाच चिआरास्क्युरो आपल्याला 'भय इथले संपत नाही...' चा विलक्षण वेगळ्या पातळीवरचा अनुभव देतो. 'मांजा' मधे केलेला चिआरास्क्युरोचा वापर ह्यां दोन्हीं अनुभवांचा एकत्रित प्रत्यय आपल्याला देतो. आधी शहरातली कठोर वास्तवता अधिक दाहकपणे आपल्यापर्यंत पोचते तर शेवटच्या दृश्यामधून 'जखम जिवाची हलके हलके भरुन यावी..' असं वाटायला लावणारी कोवळीकही जाणवून जाते. राही इतकंच ते श्रेय सिनेमॅटोग्राफर पंकजकुमारचं.

'मांजा' सुरु होताना जेव्हां समोर पडद्यावर कथा,पटकथा,दिग्दर्शन्,संकलन अशा 'सबकुछ' भूमिकेत
'राही अनिल बर्वे' ही अक्षरे दिसतांत आणि नंतर मांजा उलगडत जाताना ज्या वेगळ्याच पद्धतीने जातो ते पहातांना काही वर्षांपूर्वी वाचलेला राहीचा 'पूर्णविरामानंतर...' हा कथासंग्रह आठवणे अपरिहार्य असते. त्यांतल्या सगळ्याच कथा अशाच छोट्या आणि परिणामकारक, वाचकांना वेगळ्याच दृश्यप्रतिमांच्या जगात नेऊन पोचविणार्‍या, बर्‍याचशा ऍबस्ट्रॅक्ट आणि मानवी संवेदनांची टोकदार जाणीव करुन देणार्‍या, खूपशा जीएंच्या जातकुळीतल्या. मांजाची हाताळणी 'पूर्णविरामानंतरच्या' मधल्या जगाशी नातं जोडणारी नक्कीच वाटते.
कथांच्या वेगळेपणाचं भरपूर कौतुक होऊनही राहीने नंतर काहीच लिहीलेलं वाचण्यात आलेलं नाही. एकदम हा 'मांजा'. मधल्या मौनाच्या दीर्घप्रवासानंतरचा हा पहिलाच टप्पा.
टप्पा घेतलाय तोही कसल्या अफलातून उंचीवरचा!
अनिल बर्वेंच्या डोंगराएवढ्या उंचीपर्यंत एका उडीतच पोचलाय त्यांचा पोरगा हे नक्की.
त्याच्या आगामी 'तुंबाड' ह्या पूर्ण लांबीच्या हिंदी फिल्मबद्दल आणि 'आदिमायेचे' ह्यां पॉप्युलर तर्फे प्रसिद्ध होणार असणार्‍या कांदबरीबद्दल मनात कमालीची उत्सुकता निर्माण झालीय हे वेगळं सांगायलाच नको.

गुलमोहर: 

अनिल बर्वेंच्या डोंगराएवढ्या उंचीपर्यंत एका उडीतच पोचलाय त्यांचा पोरगा हे नक्की.
---पाहायला नाही मिळाला मांजा, पण वर्णनावरून हे पटलं.

भंयकर वेगळा विषय. स्पिचलेस.

शर्मिला, मस्त लिहिलयंस.... मांजा बघायलाच हवा.
.
थोडसं राहीबद्दल, हा मुलगा माझ्या वर्गात होता.. दहावी तरी पास होईल की नाहि अशी शंका यावी असे मार्क मिळवणारा.. पण ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे हे शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला माहीत होतं... चित्रकलेची विशेष गोडी होती..त्यासाठी दहावीची प्राथमिक पायरी तरी त्याने पार करावी म्हणून सगळेच शिक्षक त्याच्या कानीकपाळी ओरडायचे.. पण ह्याचं जगच वेगळं होतं... दहावीनंतर फारसा काँटॅक्ट उरला नाही.. मध्यंतरी ऍनिमेशनमध्ये काहीतरी करतोय हे समजलं होतं. पेपरमध्ये मांजा बद्दल वाचलं आणि समजलं की योग्य लाईन ह्याला मिळाली..
शाळेतही वक्तृत्व स्पर्धांमध्ये आधी नाव न देता आयत्यावेळी बाईंना विनवण्या करून माईकसमोर उभा राहून उत्स्फुर्तपणे गोष्टी रचण्यात, सांगण्यात ह्याचा हातखंडा होता..

धन्यवाद शर्मिला,
एका सुंदर फिल्मच सुरेख रसग्रहण आमच्यापर्यंत पोचविल्याबद्दल!
खरचं, असं आतवर अस्वस्थ करणारे परिणाम कृष्णधवल फ्रेम्समधे असतात.

शर्मिला.......अतिशय सुरेख लिहिलं आहेस समीक्षण.
खूप अस्वस्थ करुन गेलं गं हे सगळं ! अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपल्या भिंतीआड किती सुरक्षित असतो ना...! हे असे चित्रपट बघितल्यावर विदारक सत्याची जाणीव होते तेव्हा बधीर व्हायला होतं अगदी !

यशोधरा भोसले यांनी राहीचं सुंदर व्यक्तिचित्र लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव विसरलो.

शर्मिला, हा अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद!
मला नेहमी प्रश्न पडतो, माणसं आत्महत्या करतात तेंव्हा ज्या आयुष्याला आपण तोंड देऊ शकलो नाही त्याला आपली लहानगी कशी सामोरी जातील, त्यांची किती फरफट होईल असा विचार त्यांच्या मनात येत नसेल का? इतकं वाईट जग आहे तर आपल्या छोट्या मुलांना त्याच जगाच्या हवाली करून, एकटं करुन, सोडून जाण्याची कल्पना तरी कशी सहन होते? मान्य आहे, हा शेवटचा मार्ग असतो त्यांच्यासाठी. दुसरा काहीच उपाय नसतो. पण असं करून आपण आपल्याच मुलांवर केव्हढा मोठा अन्याय करतोय याची जाणिव कशी होत नाही त्यांना? का नाही जगत राहात ते आपल्या मुलांसाठी?

धन्यवाद शर्मिला आणि मंजू.. !

सिनेमा नाही पहिला, पण आशय पोचला. योगायोग म्हणजे आजच सकाळी ऑफिसला जाण्याची तयारी करताना १५ मि. साठी "जागो..." हा सिनेमा पाहीला. कथा अशीच काहीतरी होती. खुपच संवेदनशील विषय.

शर्मिला
फारचं परिणामकारी लिहिलंय. अशी माणसंही असतात जगात अन त्याबद्दल आपण काही करत नाही, हा विचार प्रत्येक सुजाण नागरिकाने करायला हवा. खरंच ही माणसं अशी का वागतात कळत नाही. एरवी देवाधर्माचं करणारी, घरच्यांची, आपल्या मुला बाळांची काळजी वाहणारी माणसं कोणा तिर्‍हाइत, निराधार, व्यक्ती प्रत अशी पराकोटीचि हिंसा करू शकतात . हे सर्व करून पुन्हा उजळ माथ्याने समाजात वावरायची तयारी असते. असल्यांच्या मेन्दूचं वायरिंग कसं असतं कोणास ठाउक?

बाप रे! speechless खरंच.
.
शर्मिला, धन्यवाद.
आता कथासंग्रहही मिळतो का बघते.

शर्मिला...
सुन्नाभुनव वाचूनच ...सिनेमा कधी बघायला मिळाला तर काय होईल..................
एका खूप वेगळ्या विषयावर लिहिल्याबद्दल धन्स !

शर्मिला, चित्रपट परिक्षण उत्तम जमले आहे. अनिल बर्वे आणि राही बर्वे ह्यांचे नाते काय आहे? आडनाव एकच आहे म्हणून विचारतो आहे.

चिनू, प्लीज आठवून सांग ना त्या पुस्तकाचे नावं..

'अपूर्व, अलौकिक, एकमेव' हे ते पुस्तक .. यात राहीचं खूप सुंदर व्यक्तिचित्र आहे.

ह्या सिनेमाची DVD संग्रही ठेवायलाच हवी, म्हणजे पुन्हा,पुन्हा पाहता येईल, कोठे विकत मिळते का? मार्गदर्शन करा किंवा लिन्क द्या.
बाकी विषय व रसग्रहण जबरदस्त सुन्न करणारं आहे
गोदेय

खुप touching लिहीले आहेस. 'मांजा' बघण्याची उत्सुकता आहे. धन्यवाद, इतक्या ताकदीच्या director ची ओळख करुन दिल्याबद्दल.

बी,
अरे शर्मिलाच्या लेखातले सुरुवातीचे तीन शब्द काळजीपुर्वक वाचलेस तर अनिल बर्वे आणि राही बर्वे ह्यांच्यातलं नातं समजेल तुला....

केवळ अप्रतिम!!
असंच परवा "सकाळ" च्या रविवार पुरवणीतले "पांढरं कुंकू " वाचून झाले होते. अंगावर सरसरून काटा आला. जे भीषण सत्य वाचताना, पाहताना डोळ्यांत पाणी आणतं ते ती चिमुरडी स्वतःवर कशी झेलत असतील? आणि तरीही ते आयुष्याशी झुंजत राहतात. ज्याला सरळ साधं जगता येत नाही त्यालाच जगण्यातली जिद्द कळते! सलाम त्या तमाम जिद्दीने पेटून जगत राहणार्‍यांना !! आणि त्यांना समाजापुढे आणणार्‍या राही , शर्मिला सारख्यांनाही!

एक अस्वस्थ करुन सोडणारा प्रभावी परिचय करुन दिलास. धन्यवाद. मांजा आणि पूर्णविरामानंतर हे दोन्ही बघायला वाचायला पाहिजे आता.

शर्मिला - उत्कृष्ट रसग्रहण. DVD वगैरे मिळेल का याची? कसा पहायचा हा सिनेमा?
आशू - खरंच पांढरं कुंकू वाचताना असाच काटा आला होता जसं आत्ता हे वाचताना आला. या विजिगीषु वृत्तीलाच सलाम.

शर्मिला, मन हेलावून टाकणारं लिहिलंय! शब्द सुचत नाहीत!

शर्मिला, अशा प्रचन्ड गम्भीर तसेच वास्तववादी विषयावरील लघुपटाचे तितकेच अनुचित परिक्षण आम्हा मायबोलिन्करापर्यन्त पोहचवण्याबद्दल अतिशय आभार.
अशा चिमुकल्या निरागस,निश्पाप जिवान्चे विश्वच मुळी लहान आणी त्यामुळेच कदाचित एवढे प्रखर प्रहार ते
सहन करत आसवेत. किती सामर्थ दड्ले आहे नाही ह्या जिवान्मध्ये? त्यानाही त्याची कल्पना नाही . यातुनच त्याना
ह्या जगाला समोरे जाण्याची अफाट शक्ती मिळत असावी.
त्याच बरोबर मनात एक प्रश्न उदभवतो. अशी असहाय्य बालके दिसल्यावर वात्सल्य न वर येता कामवासना का
येते वर?.

पहिली १० वाक्ये वाचूनच मन कापलं. "वाचू की नको पुढे" असा विचार आला. पण वाचलेच. फार परीणामकारक लिहिलेस शर्मिला!! सिनेमात शेवट आशादयाक केलाय हे मात्र फार चांगले केले आहे. त्या राही ने "पांढरे कुंकू" पण वाचले असेलच अशी आशा.. भारतात पण कायदे कठोर करणे फार जरूरी आहे.

भारतात पण कायदे कठोर करणे फार जरूरी आहे.<<< हा एक भाग झाला. पण ज्यांनी कायदे पाळायला मदत करावी त्यांनीच इतकी भयानक कृत्य केली तर कुणी तारायचं?
अशी असहाय्य बालके दिसल्यावर वात्सल्य न वर येता कामवासना का येते वर?<<<< मला सुध्दा हाच प्रश्ण पडतो.

शर्मिला, खुपच छान लिहिले आहे. अशा गोष्टींना छान म्हणणे जिवावर येते पण लिखाणाला दाद दिल्याशिवाय राहवत नाही म्हणुन छान म्हणते आहे. अनिल बर्वेंचे लिखाण वाचले आहे. पण त्यांच्या मुलाविषयी माहित नव्हते. ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
.
मला सुध्दा हाच प्रश्ण पडतो >>>> विकृती दुसरे काय् ? आजच परभणि कि परळी येथे पकडलेल्या "serial killer" ची बातमी वाचली. तेव्हा असाच प्रश्न पडला. सगळ्या लहान लहान मुली ह्याच्या लक्ष्य होत्या. कोर्ट केस वगैरे न चालवता सरळ फाशी दिले पाहिजे अशा लोकांना.

हा चित्रपट आम्हाला बघायला मिळणे अवघडच होते. इथे जवळजवळ प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव घेता आला.

बी,
राही बर्वे हा अनिल बर्वेचा मुलगा
फुलवा खामकर ( एका पेक्क्शा एक मधलि जज ) हि अनिल बर्वेचि मुलगी
प्रेरना बर्वे हि अनिल बर्वेचि पत्नि(शाहिर अमरशेख यन्चि मुलगि.
अनि अनिल बर्वे हे डोन्गार म्हातारा झाला, अकरा कोटि ग्यालन पानि अनि थन्क्यकु मीस्टर ग्लाड चे लेखक अनि पुत्रकामेश्टि नाटकाचे लेखक

खरं. आहे, कोर्ट वगैरे न करता सरळ फाशीच्--पण त्या आधी सगळ्या लोकांसमोर उभ करुन, त्या कोडग्या मनाला लाजेने मान खाली घालायला लावेल अशी काहीतरी शिक्षा लोकांकडुनच द्यायला हवी.

बाकी, मांजा ची जी कथा सांगितली आहे, ती सांगण्याची पध्द्त वाखाणण्या सारखी आहे.

Pages