श्री विश्वनाथ खैरे यांचे भाषासंशोधन

Submitted by प्रज्ञापाटील on 28 March, 2010 - 15:06

ज्येष्ठ भाषासंशोधक श्री विश्वनाथ खैरे यांना साहित्य अकादमीतर्फे भाषासंशोधनासाठी दिला जाणारा "भाषासम्मान" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय भाषांच्या एकात्मतेचा "संमत"(संस्कृत-मराठी-तमिळ) विचार आणि प्राचीन काळापासूनच्या भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविणारी "नवी भारतविद्या" या त्यांच्या संशोधनाची माहिती मायबोलीकरांना देण्याचा हा प्रयत्न.

१९७६-७९ मधे मद्रासला रहाताना तमिळ भाषा शिकल्यावर मराठी-तमिळ भाषा व संस्कृती यांचे घनिष्ठ सम्बन्ध त्यांना दिसून आले. साधना साप्ताहिकात "अडगुलं मडगुलं" ही १५ लेखांची माला प्रसिद्ध झाली. महाराष्ट्रातील स्थळनामांचा तमिळ मधे शोध घेणारे "द्रविड महाराष्ट्र" आणि "मराठी भाषेचे मूळ" ही पुस्तके त्यानंतर लगेचच प्रकाशित झाली.

मायबोलीवर प्रथमच लेखन करीत आहे... आज एकच पण सहज पटेल असे उदाहरण देते:
मराठी-तमिळ सम्बन्ध प्रतीकार्थाने मराठीच्या बाळपणापासून सुरू होतो असं दाखवणारं गाणं म्हणजे बाळाला तीट लावण्याच्या वेळी मराठी आया शतकानुशतके म्हणत आल्या आहेत ते:
अडगुलं मडगुलं | सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा | तान्ह्या बाळा | तीट लावू ||
१. तमिळ मधे अटकु (अडगु) म्हणजे ठेवीची, विनिमयाची किंवा गहाणाची वस्तू.
मडक्कु म्हणजे मातीची मोठी थाळी, मट् कलम म्हणजे मडकं.
यावरून पहिल्या ओळीचा अर्थ "थाळी /मडकं मोल म्हणून दिलं किंवा गहाण ठेवलं" असा होतो.
२. सोन्नम् म्हणजे सोनं आणी कडगम् म्हणजे कडं - "सोन्याचं कडं घेतलं"
३. वाळम् म्हणजे गोल किंवा वर्तुळ, इरुप्पु म्हणजे रुपं - "रुप्याचा वाळा घेतला"
४. ताने म्हणजे स्वतःचे
५. ती म्हणजे आग,जाळ. तीत्तल् म्हणजे करपवणं, काजळणं. तीटुतल म्हणजे अंगाला लावणं. तीत्तु म्हणजे दुष्टावा.
दृष्ट लागू नये म्हणून काजळीची तीट लावताना म्हणायच्या या गाण्यात हे सगळे अर्थ एकत्र आले आहेत.

मराठी आणि तमिळ या भिन्नकुळी समजल्या जाणार्‍या भाषांचा एकत्र अभ्यास केल्यास असे दिसून येते की मराठी बोलीभाषा ही जुन्या तमिळशी खूप जवळची आहे.

"ओवी" हा साधा-सोपा मराठी शब्द. या शब्दाचे मूळ संस्कृतमधून शोधताना "ओवीचा चौथा चरण तुटका असतो" यावरून व्युत्पत्ती देण्यात येते ती अशी -
अर्धचतुष्पदी-अठ्ठोठ्ठ्वई-अड्ढुड्ढ्वयी-अड्ढूहवई- ढूहवई-हूहवई-होवई-ओवाई-ओवी
किंवा अशी -
अपपादिका-अववाइआ-ओवैया-ओवी
तेच तमिळ भाषेकडे पाहिले तर असे दिसते:
तमिळ ओवाय् म्हणजे दात नसलेलं तोंड्/तुटक्या काठाचं भांडं. अर्थात काहीतरी त्रुटि-सूचक शब्द.
ओवि म्हणजे ध्व्नी/आवाज; ओ-वर म्हणजे भाट. अर्थात नाद-सूचक शब्द. या दोन्हीतून बनली "ओवी".
संस्कृतमधून व्युत्पत्ती काढायची म्हणजे जो द्राविडी प्राणायाम करवा लागतो, तो या द्राविडी भाषेतून करावा लागत नाही...

---------

मराठी गावे, तमिळ नावे
‘द्रविड महाराष्ट्र’ या पुस्तिकेत तमिळ-मराठी-संस्कृत यांच्या परस्परसंबंधातून महाराष्ट्रातली स्थळनामे आणि देशनामे यांचा शोध घेतला आहे.(साधना प्रकाशन 1977)
पुण्याईची पुरे
पुण्याला पुण्यनगरी म्हटले की आपल्याला बरे वाटते, कारण मराठी भाषा संस्कृतवरून आली असे सामान्य मत असल्यामुळे पुण्यासारख्या गावाचे नाव मूळ संस्कृत असावे असे समजतात. कोरीव लेखांमध्ये जे संस्कृत नाव आले असेल ते मूळचे असे म्हटले जाते. बाराशे वर्षांपूर्वीच्या एका ताम्रपटात या विभागाला ‘पुण्यविषय’ म्हटले आहे. त्यातच दापोडीला ‘दर्पफरिका’ असे, आठ वर्षांच्या मुलीला इरकली लुगडे नेसवल्यासारखे ऐसपैस अन पल्लेदार नाव दिले आहे. त्याच सुमाराच्या दुसऱ्या ताम्रपटात ‘पूनकविषय’ असे नाव आले आहे. म्हणजे खरे प्रचारातले नाव पुने-पुणे असेच काहीतरी असावे.
आणि या नावाला तमिळ अर्थ आहे. पुनम् म्हणजे जिराईत, कोरडवाहू जमीन, उमाठ्यावरची पिकाऊ जमीन. पुण्याच्या ठिकाणी डोंगर टेक जवळजवळ संपतात. साहजिकच उमाठ्यावरच्या या जागेचे पिकाऊपण मनात भरले आणि त्याचे नाव तिला मिळाले. या वस्तीला कधी पुनवडि असे नाव असले तर तेही सार्थ आहे. तमिळ वडि म्हणजे नाला. पुनवडि म्हणजे या कोरडवटीतून ओघळणारा नाला. पुनवडीच्या जोडीला वानवडी आहे. त्यातल्या वान चा अर्थ पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन.

पशुपालांच्या वस्त्या
वानवडी-पुनवडी या उघडच शेतकऱ्यांच्या असलेल्या गावांजवळ एक एरुवडैची जागा आली (येरवडा).खत या अर्थाचा तमिळ शब्द एरु. गुरे किंवा शेळ्यामेंढ्या खतासाठी शेतात बसवणे म्हणजे एरुवडै. असे गाईगुरांचे कळप पाळणाऱ्यांना गौळवाडे हवेतच. अशा जागांना तमिळ शब्द आकोल् असा आहे. आ म्हणजे गाय, कोल् म्हणजे धरणे. अकोले, आकोले, आकोला अशा नावांची पंचेचाळीस हून अधिक गावे महाराष्ट्रात आहेत. कल्याणच्या परिसरात कन्रेपाडा आहे. कन्रु म्हणजे वासरू आणि पाडम् म्हणजे आळी. एक तुर्पापाडा उल्हास नदीच्या काठाला आहे. तुरप्पु म्हणजे जनावरे हाकणे. जवळपास मानपोवा आहे. मान् म्हणजे जनावरे, गुरे; पोवु म्हणजे जायला निघणे. झुंजुरकाच (पहाटेच) खिल्लारे इथून जायला निघत असतील. त्यांची मुक्कामाची ठिकाणे असतच. नीरा नदीवरचे होळ गाव असे असावे. त्याच्या जवळचा तमिळ शब्द ओळि. त्याचा अर्थ विसावणे किंवा बसून राहणे असा आहे. होळकर घराणे धनगरांचे होते हे प्रसिद्धच आहे.
यांचे शेळ्यामेंढ्यांचे कळप जेजुरीवरून दिवे घाटातून उत्तरेला पुण्याकडे जात असत. तमिळ तिववु म्हणजे डोंगरात कोरलेल्या पायऱ्या. घाटाच्या उत्तर पायथ्याला वडकी आहे. तमिळ वडक्कु म्हणजे उत्तर दिशा. संस्कृतला तमिळमध्ये उत्तरभाषा – वडमोळि म्हणतात. अर्थात वडकीकरांना या वडमोळीचा गंधही नव्हता.

व्यापारी मुंबई
पुण्याजवळचे थेऊर याचा संबंध संस्कृत स्थावरशी जोडला आहे. त्यासाठी तेथे ब्रह्मदेवाने तप केल्याची कथा सांगितली आहे. थेरपुर असेही त्याचे मूळ म्हणून सुचवले आहे. थेऊर म्हणजे तमिळ ते ऊर् – देवाचे गाव. तुकारामांच्या देहू च्या नावात तमिळ देव्वु, देहुल् (भरून जाणे, ओसंडणे) असावेत. नदीकाठच्या गावाला ते साजेसेच आहेत. पुण्यातले पाताळेश्वर, बाणेर, शेलारवाडी, भाजे, कार्ले ही लेणी म्हणून देवस्थाने असली तरी मूळची व्यापारी तांड्यांची मुक्कामाची ठिकाणे होती. हा व्यापार बैलांवरून चाले. बैलाच्या पाठीवर दोन्ही बाजूला लोंबणाऱ्या उघड्या तोंडाच्या गोण्यांमध्ये व्यापाराचा माल भरीत. या गोण्यांना मराठीत कंठाळी म्हणतात. तमिळ शब्द कंडाल्हम्. खंडाळ्याचा घाट असा गोण्यांचा घाट आहे. हे तांडे मुंबईला जात.
या परिसरातल्या एका बेटावरची लोकदेवता मुंबा होती. तिचे मूळ तमिळ मुन्पा असावे. मुन् ला प्राचीनता, महत्ता, शक्ती असे अर्थ आहेत. मुन्पा ही साहजिकच आदिमाता शक्ती होते. तीनशे वर्षांपूर्वीच्या एका नकाशात कुलाब्याच्या उत्तरेच्या बेटाचे नाव म्हातारीचे बेट आहे. मुन्पा हीच ती म्हातारी असावी.
जुन्या काळात माणसांच्या नावाने फारशा जागा ओळखल्या जात नव्हत्या. अनेक स्थाने देवदेवतांच्या नावाची होती. एरवी प्रकृती आपल्या आदिम स्वरूपात विसावलेली होती. तिचे आविष्कार सहज टिपण्याइतके स्पष्ट होते, विविध होते. ते माणसांच्या ओठी सहज शब्दरूप पावत होते. ते शब्द पोटी अर्थ साठवून येत होते. आणि सहजच एकेका स्थळाच्या खुणेचे काम करीत होते. ते अर्थ, त्या खुणा आकलन होण्यासाठी त्यांच्या मूळ भाषेत शोध घेतला पाहीजे.
परवापर्यंत परळ मुंबईत गिरणगाव म्हणून खड्यासारखे वेचून निघत होते. पूर्वी सागर त्याच्या चरणतळांना धूत होता, भरतीओहोटीतून किनाऱ्यावर बोरखडी वाळू आणून टाकीत होता. परळ या तमिळ शब्दाचा अर्थ बोरखडे, इंग्रजीत ग्रेव्हल म्हणतात ते.
माहीम हे मुळात माहम असावे. त्याचा अर्थ उंचावरची जागा. पवईच्या वनराईची खूण सांगणारा तमिळ शब्द पवर् म्हणजे दाटी, घनदाटपणा. वनाला कान् असा तमिळ शब्द आहे. आणि एऱ्हि म्हणजे चढण. कान्हेरी म्हणजे वनातली चढण. कृष्णगिरी हे नंतरच्या काळातले संस्कृतकरण.
ही माणसे मातीच्या रंगाला कशी विसरणार ? ती लाल रंगाला चे, चेम् आणि तांबे किंवा तांबेरंगाला चेम्बु म्हणत. येवढ्यावरून चेंबूर या नावाची सहजच आठवण येईल. अजूनही तेथे लाल डोंगरी नावाचा भाग साक्षीला उभा आहे.
समुद्राची रूपे, त्यातली जलचरे, त्यावरून चालणारे व्यापार यांच्याही खुणा जागोजाग आहेत. वेसावै म्हणजे शांत होणे, खळबळ थांबणे. मालाडच्या खाडीशी वेसावे आहे. तिथल्या समुद्राचा हा विशेष नौकांना फायद्याचा होता. जोगेश्वरीची लेणी याच परिसरात आहेत. दुसऱ्या बाजूला माहूल आहे. मावुलाच्चि हे सुरमाई माशाचे तमिळ नाव माहूल च्या नावाला जवळचे आहे. हा मासा या परिसरात सापडतो. उल्हम्, उल्हा म्हणजे पल्ला मासा. तो खासकरून उल्हास नदीच्या खाडीत सापडत असे. या नदीचे नाव संस्कृत नाही हे यावरून लक्षात येईल.
या उल्हास नदीच्या खाडीतून पूर्वी कल्याणपर्यंत नौका जातयेत. समुद्रातून तिच्यात प्रवेश करण्यासाठी वळण घ्यावे लागे. वळणे, वळवणे याला तमिळ शब्द वसै. व्युत्पत्तीचा मुळीच वळसा न घ्यावा लागता वसई या नावाचा असा अर्थ लागतो. या साऱ्याच बेटाला प्रदक्षिणा घालून ठाण्याच्या खाडीत आल्यावर वाशी लागते. वाशल् म्हणजे प्रवेशद्वार. घारापुरीच्या बाजूने ठाण्याच्या खाडीत शिरणाऱ्यांचे हे प्रवेशद्वार होते.

सारांश
गावांची, नद्यांची, डोंगरांची वगैरे नावे कालाच्या ओघात सहसा बदलत नाहीत. अगदी अमेरिकेतली मेनहाटन, मिसिसिपी यासारखी नावे मूळच्या रहिवाशांनी ठेवली होती ती तशीच राहिली. म्हणून त्या नावांवरून जुन्या काळातल्या रहिवाशांच्या बोलीचा अंदाज येतो. महाराष्ट्रातल्या गावांच्या नावांवरून पाहिले तर या प्रदेशात जुन्या काळात जी बोली प्रचलित होती तिच्यातले शब्द तमिळ भाषेत सापडतात. त्या नावांचे सहज अर्थ संस्कृतवरून लागत नाहीत. त्यामुळे मराठी बोली तमिळशी खूप मोठ्या प्रमाणात संबंधित आहे हे लक्षात येते.

---------
मराठी आमुची बोली

सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी लोकांना समजणाऱ्या भाषेत गीतेचा अर्थ सांगण्यासाठी मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत आपल्या भाषेला मऱ्हाटी म्हटले आहे. “माझा मऱ्हाटाचि बोल कवतिकें। अमृतातेंहि पैजा जिंके।” हे त्यांचे प्रसिद्ध वचन आपल्याला ऐकून माहीत असते. ते मराठी भाषेच्या गौरवाचे आहे असे म्हणून आपण त्याचा अभिमानाने उल्लेखही करीत असतो.

आपल्याला माहीत आहे की गीतेत अर्जुनाला कृष्णाचा उपदेश आहे तसेच अर्जुनाचेही त्यावर बोलणे आहे. एका ठिकाणी कृष्णाचा उपदेश गोंधळात टाकणारा वाटल्यामुळे ज्ञानेश्वरांचा अर्जुन त्याला म्हणतो, “म्हणौनि आइकें देवा। हा भावार्थ न बोलावा। विवेकु मज सांगावा। मऱ्हाटा जी। - देवा मला मऱ्हाटा विचार सांग, स्पष्ट उघड अर्थ सांग, भावार्थाने बोलू नकोस.’’ येथे मऱ्हाटा म्हणजे उघड, न झाकलेला. मऱ्हाटा शब्द इथे भाषेच्या नावाचा नाही, गुणवाचक आहे.

ज्ञानेश्वरीत ‘मऱ्हाट-टा-टी-टे’ असे शब्द एकूण बावीस जागी आले आहेत. त्या सगळ्या जागी संदर्भावरून अर्थ पाहिला तर “ उघड, उघडे, स्पष्ट. न झाकलेले” अशा स्वरूपाचा मिळतो. तो मऱ्हाटी भाषेला लागू पडतो कारण ती संस्कृत या सर्वसामान्यांना न समजणाऱ्या भाषेहून वेगळी आहे.अध्यात्माचे ज्ञान संस्कृत भाषेतच आहे आणि संस्कृतातच सागितले पाहिजे असा त्या काळच्या सनातन्यांचा आग्रह होता. वेदांना ‘छन्दस्’ म्हणजे ‘झाकलेले’ असे एक नावच आहे.

मऱ्हाट हे नाव किंवा वर्णन देशालाही लागू पडते. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे ज्या आपल्या देशाला आपण म्हणतो तोही असाच उघडावाघडा आहे; झाडझाडोरा नसलेले उघडेबोडके डोंगर असलेला हा ‘मऱ्हाट’ देश आहे. मऱ्हाट देशाची भाषा ती तशीच मऱ्हाटी.

मराठी किंवा मऱ्हाट यांचा हा अर्थ तमिळमधील ‘मऱ्ऱ’ म्हणजे झाकणे आणि मऱ्ऱ चे नकारी रूप ‘मऱ्ऱा’ म्हणजे उघड करणे या शब्दांवरून कळतो. तमिळ ऱ्ऱ चा मराठी बोलण्यात ऱ्ह होतो आणि ट कित्येक मराठी शब्दांच्या शेवटी येतोच (ताप-ट, चाव-ट, खार-ट) तसा हा मऱ्हाट शब्द झाला. ‘महाराष्ट्र’ हे त्याचे नंतरचे संस्कृत केलेले रूप. ‘महाराष्ट्री’ हे भाषेचे संस्कृत नाव असे म्हणून मग मराठी हा शब्द 'महाराष्ट्री'चा ‘अपभ्रंश’ असे म्हणू लागले.

मराठी आमची बोली आहे, तिचा हा ‘मऱ्हाटा विवेक’ आहे.

गुलमोहर: 

मृदुला, जमेल तशी लेखात भर अवश्य घालत राहीन. हे काही कठीण शब्द लिहायला सध्या तरी बराच वेळ लागतोय...

अरे वा. हे माहिती नव्हतं. मायबोलीवर स्वागत.

त्यांचं अभिनंदन. तुमचा आणि त्यांचा परिचय आहे का? त्यांनाही मायबोलीवर यायला सांगा.

अगदी लहानपणी किशोर मधे त्यांचं काही लेखन वाचलेलं आठवतं. "सूर्व्यार्जी गोळा माझा, बाबा गावाचा राजा" अशी कुठली कविता अंधूकशी आठवते. पृथ्वी, सूर्य, ग्रह याबद्दलची होती.
त्यांचं अजून लेखन वाचायला आवडेल. तुमचा हा लेख मायबोलीवरच्या भाषा ग्रूपमधे जास्त शोभेल असं वाटतं http://www.maayboli.com/node/2176

मानेगुरुजी, विश्वनाथ खैरे माझे वडील. ते सध्या मायबोलीचे फक्त वाचक आहेत... तुम्हाला त्यांची कविता आठवते हे वाचून त्यांना आनंद झाला.
मी ती कविता मायबोलीवर टाइपली आहे - http://www.maayboli.com/node/15031

मराठी आणि तामिळ या भाषांचा संबंध नवीनच कळला.
खरे तर अवघड शब्दांची फोड मुळ संस्कृत शब्द आणि त्यातुन झालेला मराठीतला बदल असे शोधण्याची सवय होती. Happy

प्रज्ञा, मस्त चाललय. भाऊ वाचताहेत का? हळूहळू जमेल तसं त्यांच्या इतर लेखनाविषयीपण लिही.
आणि देवनागरी लिहीण्यात चांगली प्रगती होते आहे तुझी. Happy

अश्विनी, हा लेखाचा दुसरा भाग भाऊंनीच लिहून पाठवला... मी नुसतं कॉपी-पेस्ट करून लेखात भर घातली... ते मायबोली वाचत असतात, पण अजून थेट मायबोलीवर लेखन नाही सुरु केलं.
मी त्यांच्या काही कविता पोस्ट केल्या आहेत. आता आणखी पण करीन.