धरणी माझं नाव (युगाणी - विश्वनाथ खैरे)

Submitted by प्रज्ञापाटील on 30 March, 2010 - 22:48

हे आहे माझे वडील विश्वनाथ खैरे यांच्या १९७९ मधे प्रकाशित झालेल्या "युगाणी" मधील एक विज्ञान-गाणे -
"धरणी माझं नाव"

धरणी माझं नाsव
आकाश आमचं गाsव
सूर्याजी गोळा, माझा
बाबा, गावाचा राजा

आम्ही लेकरं नsऊ
फिरत सारखी राहू
बाबा फिरतो खुंटाला
कुणाला नाही कंटाळा

आपल्या भवती गिsरकी
बाबाच्या भवती फिsरकी
एवढं मोठं अंगsण
तरी ज्याचं त्याचं रिंगsण

बाबाची मूरत केवढी
पाटलाच्या रांजणाएवढी
मी तर बाई केवढीशी
चिमखडी गोटी एवढीशी

जराशी तिरकी घेत गिरकी
रातंदीस मारत्ये फिरकी
भवरुन भवरुन सालोसाल
कंबर झाली फुगीर गोल

पायीडोई बर्फाळ भारा
अंगाभवती हवाई फुलोरा
रंगारंगाची पोटी चोळी
परकराची झाक निळी

ऊन वारा पाऊस खात्ये
पोटाशी सारे खेचून धरत्ये
सावलीत अर्धी उजेडी अर्धी
जित्या भावल्यांची अंगावर गर्दी

युगाणीच्या भूमिकेतून :
"विज्ञानातल्या अनेक शब्दांना आपल्या भाषेत रुळलेले शब्द नाहीत, असले तर कोरडे शास्त्रीय आहेत. तेव्हा नवे शब्द बनवणे ओघाने आलेच. ते बनवतानाही साधेपणा, सोपेपणा, चपखलपणा आणि मराठीच्या प्रकृतीशी ताळमेळ राखण्याचा प्रयत्न केला आहे. गावरान मराठीत या नव्या संकल्पना कशा उतरल्या असत्या याची कल्पना करून हे शब्द उपयोजिले आहेत."
या गाण्यात - "धरणी आपल्याभोवती घेते ती गिरकी, पण सूर्याला प्रदक्षिणा घालते ती फिरकी. या फिरकीत तिचा आस सूर्याकडे कललेला असतो म्हणून तिरकी म्हटले आहे."

गुलमोहर: