चिकन बिर्याणी

Submitted by मेधा on 27 March, 2010 - 09:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम आकाराची कोम्बडी साधारण २ ते २.५ पाउंड
५ कप बासमती तांदूळ
७ -८ मोठे लाल कांदे, स्पॅनिश नव्हे
६ पाकळ्या लसूण
दीड इंच आले
२ च. चमचे मालवणी किंवा कायस्थी मसाला
१ कप ( २५० मि.ली. ) घट्ट दही
१ चमचा गरम मसाला
प्रत्येकी आठ वेलची, लवंगा, काळे मिरी, बडी वेलची, दालचिनी चे १ इंच तुकडे
२ -३ तेजपाने ( भारतीय तेजपाने, अमेरिकन दुकानातले लॉरेल लीव्हस नव्हे)
३ - ४ प्लम टॉमेटो चकत्या करून
अर्धा कप बारीक चिरलेली कोथिम्बीर
बटर आणि तेल भरपूर
तळलेले काजू
चिमूटभर केशर
२ बटाटे
४ अंडी

क्रमवार पाककृती: 

चिक चे स्किन काढुन मोठे तुकडे करुन स्वच्छ धुवून, कोरडे करून घ्यावे
त्यात हळद, मीठ, आले लसूण वाटून, मालवणी मसाला, गरम मसाला, दही आणि सर्व खडा मसाला लावून मुरु द्यावे. नीट झाकण लावून फ़्रीज मधे रात्रभर तरी ठेवावे.
सर्व कांदे उभे पातळ चिरून घ्यावे.
नॉन स्टिक पॅन मधे तेल आणि बटर घालून मंद आचेवर कांदे परतून घ्यावे- अगदी मऊ आणि काळसर झाले पाहिजेत.
तांदूळ धुवून अर्धा एक तास तरी निथळत ठेवावे.

थोडे लोणी, मीठ आणि २ लवंगा, वेलची,मिरी घालून जरा अर्धा कच्चा भात करुन घ्यावा.

अ‍ॅल्युमिनियम फॉइलच्या पॅन मधे तळाशी थोडे बटर घालावे

त्यावर तळलेला कांदा घालावा
त्यावर चिकनचे मिश्रण घालावे
नंतर टोमेटोच्या चकत्या व बारीक चिरलेली कोथिम्बीर घालावी
बटाट्याच्या तळलेल्या फोडी (ऐच्छिक)घालाव्या
वरून भात घालावा
शेवटी परत तळलेला कांदा घालावा.
तळलेले काजू व उकडून सोलून अर्धी चिरलेली अंडी घालावीत.
थोड्या दुधात खललेले केशर शिम्पडावे.
भात घालताना मधून मधून थोडे बटर ही घालावे.

वरून फॉइल ने घट्ट झाकून ४५० डिग्री ओवन मधे ५० ते ६० मिनिटे शिजवावे.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ६ जण
अधिक टिपा: 

ही जुन्या मायबोलीत टाकली होती. सिंडरेलाच्या सूचनेवरून इथे टाकते आहे. तिने शाकाहारी बिर्याणी करता काय बदल करावे लागतील हे विचारलं होतं. मी आजपर्यंत बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारे शाकाहारी बिर्यानी केलीय पण फोर्टातल्या वैभव मधे जशी मिळते तशी बिर्याणी काही आज पर्यंत जमली नाही! कोणाला येत असल्यास लिहा वेगळा धागा काढून प्लीज.

माहितीचा स्रोत: 
वहिनी, अन मग स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy नवर्‍याने गेले दोन वीक एंड बिर्यानी जोगकाकांच्या कृतीने केली. आता आज-उद्या तुझ्या पद्धतीने करतो म्हणालाय.