खिचडी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी त्या दिवशी खूप आनंदात होत्ये. प्रमोशन झालं होतं, त्यामुळे आमचं विमान एकदम हवेत तरंगत होतं. शनिवार आला आणि मी आईबाबां मागे भुणभूण लावली माझ्याबरोबर लंचला यायला. पपांना काम होतं मग आई फक्त शॉपिंगला तयार झाली, लवकर येऊ- या अटीवर. हेही नसे थोडके! थेट सिकिंदराबाद गाठले. हा ड्रेस, तो ड्रेस मग हिच्यासाठी, तो शर्ट दादासाठी करत 'पार्कलेन' आणि किरकोळ खरेदीसाठी 'जनरल बजार' पालथं घालून झालं. एव्हाना खूप उशीर झाला म्हणून आईला बळेबळे 'उत्सव'ला नेलं. ते कसं छान शाकाहारी आहे, मग फेस्टिवल्स चालु असतात, बेबी कॉर्न मसाला इथे छान मिळतो वगेरे वगेरे माझी टकळी चालुच होती. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की आई बोलत नाहीये, काही खात नाहीये, फक्त माझ्याकडं पाहत बसली आहे.
"काय झालं आई? आवडलं नाही का? बरं वाटत नाही का? जाऊ या का?"
माझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.
"नाही गं राणी, काही नाही, तू होऊ दे सावकाश".
माझं लक्ष उडालं. कसंबसं पुढ्यात आलेलं संपवून बाहेर पडलो.
घरी निघालो. येतांना असलेला उत्साह आता साफ मावळला होता. संध्याकाळ होत आलेली. थोड्याच वेळापूर्वी जनांनी फुललेला रस्ता रिकामा वाटू लागला होता. तितक्यात रस्त्यावर माणसांचे लोंढेच्या लोंढे दिसायला लागले. आम्ही घाबरून चौकशी केली तर समजले. जवळच्या मैदानावर कुणाचे तरी भाषण आहे, त्यासाठी लोकं खेड्यापाड्यातून ट्रक किंवा जे वाहन मिळेल ते, पायी असे जमत होते.
आईला आता राहवेना. तिने घरी फोन करायला सांगितले, तर सेलफोनला सिग्नल नाही!
"पपा आले असतील, आपण खूप वेळेपासून बाहेर आहोत" इति ती.
आता मला तिच्या चिंतेच कारण कळाले. "अगं पपा अजून परतले नसतील, जरा गर्दी हटताच, लगेच पोचु आपण", मी असफल प्रयत्न केला.
कसेबसे पिकेटला आलो तसे सेलफोनमध्ये एक दोन बार दिसू लागले. घरी फोन केला. पपा तेव्हाच परतले होते. त्यांनी मला थोडावेळ परिस्थिती पाहून पपांच्या मित्राकडं जायचं सुचवलं.
"पपांनी काही खाल्लं नसेल, सकाळी फक्त ब्रेकफास्ट करून बाहेर पडलेत.". आईच्या न खाण्याच कारण कळलं. पपांना बाहेर खायला आवडत नाही. आम्हाला घरी पोचायची घाई झाली होती..
मला नेहमी आईच्या अश्या वागण्याचं आश्चर्य वाटत आलं आहे. पपा आमच्याबरोबर आले असते तर तिला कदाचित काही वाटलं नसतं, पण पपांनी काही खाल्लं नाही आणि आम्ही बाहेर 'चैन' करतोय, असं तिला काहीसं वाटलेलं.
पण या गोष्टीला काय हरकत आहे? नवरा कधी एकटा Enjoy करत नाही का? बायकांना एवढं guilty-feel का व्हावं? आपण काही मुद्दामून गेलेलो नाही ना? उशीर झाला म्हणूनच ना? मी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.
रिक्षावाल्याला बाबापुता केले तर, शेवटी त्याने कसेतरी स्टेशन पर्यंत सोडले. तेथून दुसरी रिक पकडून घरी आलो. तोवर रात्रीचे दहा वाजले होते.
पपांनी दार उघडले. मग त्यांनी सांगितले की कामानंतर त्यांच्या मित्राने संध्याकाळी अकस्मातपणे जेवायला बोलावले होते, पण आईला सांगितल्याशिवाय असे अचानक तिकडं जायला त्यांना रुचलं नाही. त्याला, पुन्हा कधीतरी येइन असं सांगून घरी आले होते ते.
आई गडबडीने किचनमध्ये पळाली. पपांनी हसत हसत ताटं घ्यायला सांगितली. तूरीच्या डाळीची खिचडी, तळलेल्या मिरच्या अशी तयारी होती. Happy मी कोशिंबीर करायला घेतली.
त्यादिवशीच्या त्या खिचडीची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय..

(एकमेकांबरोबर सुखी 'सहजीवन' साधणार्‍यांना समर्पित.)

विषय: 
प्रकार: 

चिन्नु मस्त वाटल, वाचतांना अगदी आपल्या घरची गोष्ट वाटली.. आई बाबांचं हे नात खरच निराळ असत.. ते एक वेगळ प्रेम असत..

व्वा! एकदम घरगुती लिखाण !!! आमचेही आई बाबा असेच एकदम. Happy

-------------------------------
आणि थोडक्यात मुद्दा मांडुन मोकळं केलं ते बरं केलंस.. नाहीतर 'आईचा जीव कसा टांगणीवर पडला' यात २ परिच्छेद.... 'रिक्षावाल्याने त्रास देणे'.. 'बाबा रात्री उशिरा येणे...'..... 'रडारड..' वगैरे उगाच नाही तिथे 'फुलवली' नाही गोष्ट हे लय भारी Proud
-------------------------------

त्यामुळे "निवडक" मधे नोंद केली जात आहे हो~~~~ Light 1

शुभेच्छा!!

अर्चु, रोहण-गावंडे, ऋयाम धन्यवाद.
ऋयाम :D. अरे 'रिक्षावाल्याने त्रास दिला नाही तसेच पपा आमच्याआधीच परतले होते. पपांनी केलेली खिचडी झकास होत्ये बर्का Proud त्यामुळे 'गोष्ट' 'फुलविण्याची' गरज पडली नाही. Light 1
ही एक साधी गोष्ट; पण 'सहजीवनाचा' जिव्हाळ्याचा विषय म्हणून इथे टंकावेसे वाटले एवढंच. तरी निवडक दहाबद्दल धन्यवाद.

जिवंत गोष्ट जिवंतपणे साकारलीय त्यामुळे जिवंत वाटली.
असे सुखी 'सहजीवन' ज्यांच्या वाट्याला येते त्यांचे जीवन खर्‍या अर्थाने जिवंत होते.
आई-पपांना प्रणाम सांगावा. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावेसे वाटते.

..............................................................
अवांतर

त्यामुळे आमचं विमान एकदम हवेत तरंगत होतं.
विमान नेहमी हवेतच तरंगत असते. ही काय उपमा/ दृष्टांत झाला ?

लवकर येऊ या बोलीवर.
हे वाक्य "लवकर येऊ या मायबोलीवर".असे हवे.

नवरा कधी एकटा Enjoy करत नाही का?
करतातच. त्यांच्या बायकाही स्वयंपाक झाल्याबरोबर गरम-गरम जेवन उरकून घेतात.
दादल्याची वाट पाहात बसत नाहीत. Happy

धन्यवाद गंगाधरजी. आईबाबांना कळवेन.
बोलीची बोली काही वेगळे बोलायच्या आत, बदलले आहे Happy आणि मायबोलीवर तसे धावत पळत यायला, त्या वेळी मला मायबोली ही साईट माहीत नव्हती हो. ही बर्‍याच वर्षांपुर्वीची गोष्ट आहे.
मी अद्यापही ,गरम गरम जेवन उरकणारी- दादल्याची वाट न पाहणारी स्त्री पाहिलेली नाही.

चिन्नु, चांगली जमलंय.
>>>गरम गरम जेवन उरकणारी- दादल्याची वाट न पाहणारी स्त्री पाहिलेली नाही.>>>> मग आज पहा. मी नाही थांबत नवर्‍याकरता. जर एक ५,१० मिनिटात येतोच आहे हे कळलं असेल तरच थांबते. फोन उचलत नसेल तर थांबायचे कष्ट घेत नाही. मुलांबरोबर सव्वा सात्/साडे सातला जेवून मोकळी. उद्देश हा की जेवण नी झोप ह्यात थोडं अंतर जावं.

सायो Proud
>>जर एक ५,१० मिनिटात येतोच आहे हे कळलं असेल तरच थांबते.
बघ, तुलाही थांबावसं वाटतच ना?
माझ्या नवर्‍यालाही त्याच्यासाठी मी तिष्ठत बसावं असं वाटत नाही. एकदा मुलं झाली की priorities बदलतात, पण तरी मी पाहिलेल्या सर्व स्त्रियांमध्ये (आई, आजी, मावश्या, काकु, मैत्रिणी, त्यांच्या आया ई. ई.) नवर्‍यासाठी जेवायला जमल्यास थांबावे असेच वाटत असते.

आधीच्या पिढीच्या बायका तू म्हणतेस त्या कॅटेगरीत आहेत हे खरंच. जेवा म्हटलं तरी जाम जेवायच्या नाहीत.

लवकर येऊ या बोलीवर
हे वाक्य का काढले?.मी गंमतीने लीहिलेय ते. Happy

या बोलीवर म्हणजे या शर्थीवर ना?
अशा शब्दांचा वापर टाळला तर हे शब्द लुप्तच होतील ना?

ते वाक्य टाकाना पुन्हा. वाटल्यास अर्थाची तळटीप द्या.

चिन्नु, खरच केवढे आनंदाचे क्षण असतात न ते. मेकमेकांबद्दलच्या भावना बोलून दाखवायची गरजच नसते. त्या समजल्या जातात. Happy

Happy छान गं!

सिंडरेला, थँक यु!
आर्च, अगदी अगदी Happy
अरुंधती धन्यवाद.
श्री, Proud
प्रीति, धन्यवाद.
गंगाधरजी, होतं असं. असु देते आता.

खरच... सहजीवनाचा कीस पाडत बसण्यापेक्षा हे किती साध असत ना... ! हे सांगण्यापेक्षा अनुभवणच जास्त खर !

खुप सुंदर, माझ्या आईबाबांचे सहजीवन पण असेच होते. त्याकाळी घरीच काय शेजारी पाजारी देखील फोन नव्हते. बाबांना उशीर झालाच, तर वाट बघण्याशिवाय, काहिच हातात नसे.

माझी आई, जेवण करताना, कधीही चाखून चव बघत नाही. इतर कुणाच्याही आधी आपण खाणे, हि कल्पनाच तिला सहन होत नाही.

धन्यवाद दिनेशदा. असे सुंदर सहजीवन पाहता पाहता त्याचा सहज मोह पडत जातो ना?
माझी आई नी साबा, दोन्हीही स्वयंपाक करतांना, चाखून बघत नाही. तरीही पदार्थ चविष्ट होतात. माझे मीठाचे प्रमाण हमखास चुकते Proud

मस्त!! आवडले.

मला कितीही ईच्छा असली तरी नवर्‍यासाठी जेवायला थांबायला जमत नाही .
भुकच निभवत नाही Happy

मस्त लिहीलेय. अश्याच छोट्या छोट्या प्रसंगांतुनच एकमेकांवरचं प्रेम व्यक्त होत असतं. यालाच 'सहजीवन' म्हणतात. Happy

Pages