इंडिया आफ्टर गांधी - रामचंद्र गुहा

Submitted by टवणे सर on 26 March, 2010 - 05:55

आपल्या अनेकांच्या मनात इतिहास म्हटले की पंधरा ऑगस्टला वर जाणारा भारताचा तिरंगा आणि खाली उतरणारा युनिअन जॅक (वजा फाळणी) हाच शेवट डोळ्यासमोर येतो. याला कारण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहास इथेच संपतो. इथून पुढे सुरु होते ते नागरिकशास्त्र आणि ते जणू काही इतिहासाशी काहीच संबंध नसल्यासारखे शिकवले जाते. इंडिया आफ्टर गांधी ह्या ७५० पानी (अधिक १००-१५० पाने संदर्भसूची आणि तळटीपा) ग्रंथात रामचंद्र गुहांनी नेमक्या ह्याच काळाच्या (१५ ऑगस्टपासून पुढच्या) इतिहासाचा परामर्ष घेतला आहे.

देशाच्या फाळणीपासून पुस्तकाची सुरुवात होते. फाळणीबाबत संपूर्ण तटस्थतेने (एक भारतीय असून देखील) आणि इतिहासकाराच्या दृष्टीकोणातून ते घटना मांडतात. त्याचबरोबरीने तेव्हाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी ही परिस्थिती कशी हाताळली हे खरेच वाचण्यासारखे आहे. पश्चिम पाकिस्तानातून परतलेल्या शेतकर्‍यांचे, कारागिरांचे पुनवर्सन, पहिली निवडणुक (सुकुमार सेन ह्या अधिकार्‍याने हे काम पार पाडले), सर्व संस्थानांचे भारत गणराज्यात विलिनीकरण (नायर नावाचे प्रशासकिय अधिकारी आणि सरदार पटेल) हे पहिल्या काही भागात येते. यानंतर आपण सहसा न वाचलेले पण फार महत्वाचे असे कॉन्स्टिट्युशन असेंब्लीचे (ह्याला मराठीत प्रतिशब्द मला सुचत नाहिये) कामकाज आणि त्यातली भाषणे. बाबासाहेब आंबेडकर, पं नेहरु, श्यामाप्रसाद मुखर्जी, समाजवादी नेते, काही साम्यवादी नेते, मुस्लिम नेते, आदिवासी नेते अश्या अनेकविध लोकांनी बनलेल्या ह्या असेंब्लीने घटनेच्या प्रत्येक कलमावर कसून चर्चा केली. ह्यावेळची भाषणे, मते अभ्यासण्यासारखी आहेत.
पुढच्या भागात पोट्टी श्रीरामुलुच्या प्राणांतिक उपोषणाने झालेल्या मृत्युच्या तात्कालिक कारणाने (आणि अनेक वर्षे मागणित असलेली) प्रस्थापित करण्यात आलेली राज्य पुनर्गठन समिती आणि भाषावार प्रांतरचना ह्याचा इतिहास येतो. ते संपते ना संपते तोच पुर्वांचलात नागा उग्रवाद्यांचा उठाव येतो. तेलंगण्यात लोकाश्रय असलेल्या सशस्त्र साम्यवादी चळवळीचा इतिहास येतो. आणि भारताला बसलेली थप्पड, तवांगचा पडाव आणि तेझपूरपर्यंत घुसलेल्या चीनच्या सैन्याने केलेला भारताचा पराभव हा भारताच्या इतिहासातला दुसरा टप्पा संपतो.
तिसर्‍या भागात इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचे विभाजन, वाढता भ्रष्टाचार, लोकशाही मुल्यांना व स्वतंत्र संस्थांना (सीएजी, निवडणुक कमिशन, राष्ट्रपतींची नेमणुक इत्यादी) पायदळी तुडवणे व ह्या सगळ्याचे आणिबाणीत झालेले रुपांतर इथवर येते.
ह्याच्या बरोबरीने भारताचे जगाच्या बाजारातील, जगाच्या राजकारणातील स्थान, जाती-पातींचे वाढते महत्व, धार्मिक तेढ इत्यादीवरही भाष्य येत जाते.
यानंतरच्या भागात पंजाबमधील उग्रवादी फुटीर चळवळ, ब्लुस्टार, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींनी उचललेली विकासात्मक पावले, शहाबानो प्रकरणाने ह्यासर्वांवर पुसलेला बोळा आणि काश्मिरमधील वाढता हिंसाचार ह्याचा परामर्ष येतो.
शेवटच्या भागात मात्र लेखकाने हा काळ सध्याच्या काळाच्या फारच जवळचा असल्याचे (गेली २० वर्षे) नमूद करुन, इतिहासकार म्हणुन नि:पक्षपातीपणे ह्याबद्दल लिहिण्यास लेखक असमर्थ आहे असे मान्य केले आहे. तरीसुद्धा राइट्स, रायाट्स, सिनेमा-बॉलिवूड, मंडल-कमंडल अश्या वेगवेगळ्या शीर्षकांखाली ह्या कालखंडाची नोंदणी आहे. पण ही कालानुरुप (क्रोनोलॉजिकली) न जाता घटनांच्या स्वभावानुसार वा वैशिष्ट्यानुसार ही विभागणी आहे.

भारतासारख्या अतिविविध, अतिविशाल, बहुसंख्य लोकांच्या गेल्या ५० वर्षांचा अत्यंत वादळी इतिहास लिहिणे हे फार मोठे शिवधनुष्य गुहांनी चांगलेच पेलले आहे. त्यांचा नि:पक्षपाती दृष्टीकोणदेखील बहुतांशी अबाधित राहिलेला आहे. पुर्वांचलातील फुटीर चळवळ, चीन बरोबर भारताचे संबंध (अक्साई चीन आपल्या ताब्यात घेउन अरुणाचल आपल्याला देण्याची छुपी सुचक वक्तव्ये. अर्थात इतर भारत-चीन संबंध तज्ज्ञांनुसार ह्यात फारसे तथ्य नाही - सं: अरुण शौरी, are we falling backwards?), शेख अब्दुल्ला हे कोडं आणि काश्मिरचा चिघळलेला प्रश्न ह्याबाबत भावनिक (व भारतीय) न होता त्यांनी दोन्ही बाजू व्यवस्थितपणे मांडलेल्या आहेत.

खटकणारी गोष्ट म्हणजे इतर सर्व बाबतीत नि:पक्षपातीपणे घटना नोंदवणारा हा इतिहासकारदेखील बहुसंख्यभयगंडाने (majority-fobia) पछाडलेला दिसतो. जिथे जिथे संघाचा संदर्भ येतो तिथेतिथे संघाला फक्त अतिरेकी संघटनाच काय ते म्हणायचे बाकी ठेवतो. गोळवलकर गुरुजींचा अतिरेकी विचाराचा मनुष्य म्हणुन टाकतो. अर्थात एक इतिहासकार म्हणुन त्यांना त्यांची मते मांडण्याचा व निष्कर्श अधिकार आहे. पण जिथे घटना नोंदवण्यात आल्या आहेत तिथे इतर सर्व जागी भरभक्कम पुरावे दिले आहेत मात्र ’भारतात झालेल्या धार्मिक दंगलींमध्ये दहा पैकी न‍उ मृत्यु हे मुसलमानांचे होतात’ ह्यासारखे अतिशय महत्वाचे विधान मात्र खुशवंतसिंगांच्या कुठल्यातरी लेखाचा हवाला देउन केले जाते. एकुणात अल्पसंख्यांवर अतिशय अत्याचार होतात व बहुसंख्य हिंदु हे अतिरेकी विचाराचे आहेत असाच सूर (वा लावण्याचा अट्टाहास) दिसतो. त्यांच्याच तर्काने जर पुढे जायचे ठरवले तर फाळणीच्या वेळी जवळपास पंच्याऐंशी-नव्वद टक्के असलेल्या बहुसंख्य समाजाने अल्पसंख्य समाजाला कधीच संपवले असते. आणि मग हे विधान सत्य म्हटले (hypothesis 0) की मग केवळ नेहरुंच्या व त्यांच्या पिल्लावळीच्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या भक्कम बैठकीमुळेच जणु भारताचा हिंदू पाकिस्तान झाला नाही हे दोन ओळींमधले विधान ठसठशीत पणे समोर यायला लागते. अर्थात एखादा समाजवादी ह्याला डोक्यावर उचलून घेइल, संघवाला पायदळी तुडवेल व साम्यवादी कचर्‍याचा डबा दाखवेल कारण त्यांच्या मते बोटचेप्या धोरणांमुळे धार्मिक तेढ वाढतीच राहिली. पण मुळात हायपॉथिसीस मांडायचा आणि मग तो हायपॉथिसीस जणु सिद्ध विधान आहे अशी एक डूब मध्येच द्यायची व पुढची विधाने मांडायची हा intelligentsia-डाव गुहांनी पण व्यवस्थितपणे वापरलेला आहे.

अर्थात इतक्या व्यापक, सर्वसमावेशक आणि आपल्याशी जवळून निगडीत असलेल्या घटनांचे, इतिहासाचे नोंदणीकरण करुन आणि अतिशय सुलभ भाषेत हा इतिहास सामान्य वाचकांना उपलब्ध करुन देउन रामचंद्र गुहांनी विशेष मोठे काम केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम आढावा.

>>> अर्थात इतक्या व्यापक, सर्वसमावेशक आणि आपल्याशी जवळून निगडीत असलेल्या घटनांचे, इतिहासाचे नोंदणीकरण करुन आणि अतिशय सुलभ भाषेत हा इतिहास सामान्य वाचकांना उपलब्ध करुन देउन रामचंद्र गुहांनी विशेष मोठे काम केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.
--- सहमत आहे. शिवाय पहिल्या निवडणुका, संख्याशास्त्रज्ञांचे काम आणि भाषावार राज्यरचना ही प्रकरणे विशेष आवडली. भिंद्रनवालेच्या उदयामागे हरितक्रांतीतून आलेली अचानक सुबत्ता कशी कारणीभूत ठरली हे थोडं फ्रीकॉनॉमिक्सच्या वळणानं जाणारं विवेचनही उत्तम. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल अजून माहिती यायला हवी होतं असं वाटलं, पण त्यात कदाचित मी मराठी भाषक असण्याचा संबंध असू शकेल. शिवाय लेखात म्हटल्याप्रमाणे मेजॉरिटी-फोबिया आणि कधी छुपं, कधी उघड असं नेहरू-समर्थन ह्या गोष्टी खटकण्याजोग्या.

थोडं अवांतर - हे पुस्तक वाचून झाल्यावर म्हणा किंवा काही महिन्यांनी म्हणा, त्यातून इतिहासाच्या आपल्या ज्ञानात किती भर पडली या प्रश्नाचं उत्तर निदान माझ्या बाबतीत तरी फारसं उत्साहवर्धक आलं नाही. याचं कारण, बर्‍याचशा मुख्य घटना आपल्या देशाचा अलीकडचा इतिहास असल्याने आपल्याला ठाऊक असतात हे असू शकेल का? वर म्हटलं त्याप्रमाणे पहिल्या निवडणुकांचे प्रकरण, त्यात नवस्वतंत्र देशात ही प्रणाली रुजवताना आलेल्या अडचणी आणि ओघाओघाने घडलेले मजेदार किस्से (जसं की उत्तर भारतात मोठ्या संख्येने स्त्रियांनी आपली नावं 'गुड्डू की माँ' यासारखी नोंदवली इ.) हे वाचनीय असले तरी आत्ता या क्षणी निव्वळ तेवढंच आठवावं ह्यात थोडंसं खटकण्याजोगं काही आहे, असं मला वाटतं. अर्थात एखादी कादंबरी वाचल्यानंतर असे प्रश्न संभवत नाहीत. तेव्हा याच दृष्टिकोनातून ह्या पुस्तकाचं यश (माहितीपेक्षा किंवा बरोबर वाचनीयता, समतोल) मोजावं का, असा कधी कधी प्रश्न पडतो. तुमचं आणि इतर वाचकांचं याबद्दलचं मत जाणून घ्यायला आवडेल.

टण्या, चांगले लिहीले आहेस परिक्षण. आता वाचावेसे वाटत आहे. या पुस्तकाला अमेरिकेतही कव्हरेज मिळालय. रामचंद्र गुहाची C-Span वर मुलाखतही झाली. मस्त बोलतो तो. आज बघितले तर आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे.

टण्या, चांगलं लिहिलंयस. वाचायला हवं.
नंदन, नेहमीप्रमाणेच विचारांत पाडणारी पोस्ट.

खटकणारी गोष्ट म्हणजे इतर सर्व बाबतीत नि:पक्षपातीपणे घटना नोंदवणारा हा इतिहासकारदेखील बहुसंख्यभयगंडाने (majority-fobia) पछाडलेला दिसतो. जिथे जिथे संघाचा संदर्भ येतो तिथेतिथे संघाला फक्त अतिरेकी संघटनाच काय ते म्हणायचे बाकी ठेवतो >>> अगदी. इथे मला खटकले. पण ज्यांना मुळातून संघ काय चिज आहे हे माहीत नाही ते असेच बरळत असतात ह्या आजवरच्या अनुभवाने मी ते सोडून दिले.

हे पुस्तक मला आवडते. साधारण चारेक वर्षांपुर्वी मी वाचले तेंव्हा आपल्या नविन इतिहासातील बर्‍याच गोष्टी नव्याने कळाल्या. काही ठिकाणी लेखक त्याच्या दृष्टीने गोष्टी पाहतो, (उदा संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संघ) पण ओव्हरऑल मला आवडले. मागे मी वाचलेले पुस्तक मध्ये मी ह्याचा उल्लेख केला होता.

नविन इतिहास समजून घ्यायला थोडेफार उपयोगी.

छान परामर्ष घेतला आहेस पुस्तकाचा.

ह्यातली इंदिरा गांधी आणि आणीबाणीच्या काळच्या परिस्थितीबद्दलची प्रकरणं मोठी रंजक आहेत, आणि त्यानंतर गुहांनी केलेली हायपोथेटीकल विधानं तर.....
कुठे कुठे नेहरूंना कॉग्रेसी विचारसरणी घडवणारा याच्याही पुढे जाऊन महत्त्व दिले आहे की नंतर कोणत्या काँग्रेस नेत्यांनी नेहरूंना अपेक्षित नसलेली कामं केली ह्याचेही दाखले येतात.

भारतासारख्या अतिविविध, अतिविशाल, बहुसंख्य लोकांच्या गेल्या ५० वर्षांचा अत्यंत वादळी इतिहास लिहिणे हे फार मोठे शिवधनुष्य गुहांनी चांगलेच पेलले आहे. त्यांचा नि:पक्षपाती दृष्टीकोणदेखील बहुतांशी अबाधित राहिलेला आहे. >>> इतिहासलेखक म्हणून गुहांनी या पुस्तकातून फार मोठे आणि छान काम केले आहे, पण काही खास व्यक्तींचा आणि धोरणांचा उल्लेख येताच त्यांच्यावर कुणाचा वैचारिक प्रभाव आहे हे नको तितके दिसून येते.

मागे सुकुमार सेनांबद्दल माहिती शोधतांना हे पुस्तक सापडले,
स्वातंत्र्यानंतर लोकतंत्राची घडी बसवण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला (सामान्य जनता मात्र भलत्याच पाखंडींना ह्याचे श्रेय देते) त्यापैकी एक सुकुमार सेन.

नंदन, चमन, केदार आणि इतरः
भिंद्रनवालेचा उदय केवळ हरितक्रांतीच्या पार्श्वभूमीवर झाला नव्हता. खरेतर त्याला हरित क्रांती किती कारणीभूत होती हा वादाचा प्रश्न आहे.. १९८४ला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नोव्हे-डिसेंबर मध्ये कधीतरी आउटलूकने एक फार चांगला अंक काढला होता.. असो..

संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्द्ल त्रोटक वाटते ह्याचे कारण आपल्याला ती चळवळ अधिक जवळची आहे..

आपल्याला ह्या पुस्तकातल्या अनेक गोष्टी पहिलेपासूनच माहिती होत्या, उदा: आणिबाणी, भिंद्रनवाले, नागा चळवळ.. पण कित्येकांना ह्यातल्या कोणत्याच गोष्टी माहिती नसतात.. म्हणुन ह्या पुस्तकाचे महत्व अधिक आहे असे मला वाटते. आणि भाषाशैलीसुद्धा फार सोपी आहे.

पुन्हा आपण सर्वांनी वर नमूद केल्याप्रमाणे संघाच्या बाबतीत अज्ञानी आणि एकसुरी विरोध आहेच.. पण ते चालायचेच.. इंटलिजेन्शिया म्हणायचे आणि सोडून द्यायचे Happy

अर्थात इतक्या व्यापक, सर्वसमावेशक आणि आपल्याशी जवळून निगडीत असलेल्या घटनांचे, इतिहासाचे नोंदणीकरण करुन आणि अतिशय सुलभ भाषेत हा इतिहास सामान्य वाचकांना उपलब्ध करुन देउन रामचंद्र गुहांनी विशेष मोठे काम केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.>>>>टण्या, अनुमोदन.

पण मला बर्‍याचदा एक पुस्तक फारसे भावून गेले नाही. कदाचित बर्‍याचशा घटना आधीपासूनच माहित असल्याने किंवा त्याचा प्रभाव अजूनदेखील जाणवत असल्याने असेल कदाचित.

संघावरची मते खटकली.. आणि एक प्रश्न मनात डोकावून गेला. संघामधे काम न करणार्‍या किती जणानी संघाविषयी न्युट्रल दृष्टीकोन ठेवून लिहिले आहे??

संघामधे काम न करणार्‍या किती जणानी संघाविषयी न्युट्रल दृष्टीकोन ठेवून लिहिले आहे??>>
संघात काम करणार्‍या जितक्या जणांनी संघाविषयी न्युट्रल दृष्टीकोन ठेवून लिहिले आहे तितक्याच....

हायपॉथिसीस मांडायचा आणि मग तो हायपॉथिसीस जणु सिद्ध विधान आहे अशी एक डूब मध्येच द्यायची व पुढची विधाने मांडायची हा intelligentsia-डाव गुहांनी पण व्यवस्थितपणे वापरलेला आहे.
>>> अचूक निरिक्षण केलं आहेस टण्या. एकंदरच परिक्षण खूप छान केले आहेस. मलाही पुस्तकातली अनेक विधानं, नेहरु समर्थनं खटकली आणि नंदन म्हणतो तसं एकंदर इतिहासाच्या ज्ञानात काही विशेष भर पडली नाही (अपवाद भिन्द्रनवालेंच्या उदयाचं प्रकरण ) तरी अशा एकत्रितपणे समोर आलेल्या घटना बरेच नवे पैलू, कारणमिमांसा नजरेपुढे आणतो. एका खूप मोठ्या कालखंडाचा आढावा गुहांनी सहज वाटाव्या अशा पद्धतीने घेतला आहे हे नक्कीच.

संघामधे काम न करणार्‍या किती जणानी संघाविषयी न्युट्रल दृष्टीकोन ठेवून लिहिले आहे??>>
संघात काम करणार्‍या जितक्या जणांनी संघाविषयी न्युट्रल दृष्टीकोन ठेवून लिहिले आहे तितक्याच....
>>>>>

हुडा, हे पटेश हां.. संघात काम करणारेदेखील तितकेच पोथीनिष्ठ असतात.. विशेषतः मिडल मॅनेजमेंट.. स. ह. देशपांड्यांसारखे विरळेच..