काल सकाळपासून धावपळ , घरी खूप पाहुणे आलेले. मामेबहीणीला बघायला मुलगा येणार होता म्हणून सकाळपासून घरात आवराआवर चाललेली. खालच्याच फ्लॅटमधे मावसभाऊ राहतो त्याची दीड वर्षाची मुलगी सुखी रडते आहे म्हणून बघायला गेलो तर स्नेहलने,तिच्या आईने सांगितले की रात्री थोडा ताप आला होता म्हणून तिची झोप झाली नाही त्यामुळे किरकिरत आहे. घरात पाहूणे , कामवालीची दांडी , सुखीची रडारड , म्हणून माझी बायको व स्नेहल दोघीही वैतागून गेलेल्या सकाळी सकाळीच.
दहाच्या सुमारास त्या पाहुण्यांचा फोन आला की आम्हाला अॅड्रेस सापडत नाहीये , मग त्यांना आणायला गेलो, ते जिथे थांबले होते तिकडे. तेंव्हा घरात शांतता होती, सुखी झोपली आहे अशी खात्री करुन मी बाहेर गेलो. पाहुणे आले, त्यांना चहा देत असताना स्नेहलची किंचाळी ऐकू आली भावजी, सुखी कसं करतेय बघा ना ..... मी हातातलं सगळं टाकून खालच्या फ्लॅटमधे धाव घेतली. तिच्या हातातून सुखीला घेतले तर माझ्या पायाखालची जमिनच सरकली..... पूर्ण शरीर पांढरे फटक पडलेले तिचे, ओठ काळे-निळे झालेले, अंग टाकून देत होती, थंडगार शरीर सगळे , अंगावर काटा येतोय ते आठवूनच... मी सचिन कुठे आहे असे विचारले तर तो घरात वेड्यासारखा फिरायला लागला होता, गाडीची चावी शोधत.प्रसंगावधान राखून तसेच पळत गेलो खाली, पार्कींगमधे मामांची गाडी होतीच , स्नेहलपण आली सोबत, तसेच जवळच्या डॉ. कदमांकडे गेलो , ते सुखीचे रेग्युलर डॉ. होते. गाडीत स्नेहलने जेंव्हा कृत्रिम श्वास दिला तेंव्हा तिच्या घशातून आवाज आला तेंव्हा मी थोऽऽडा रीलॅक्स झालो, तिचे हाय,पाय , पोट चोळले, रविवार असूनही डॉ. कदम तिथे भेटले हे आमचे नशीब. त्यांनी विचारपूस चालु केली , हे कसे झाले ? मला सांगता येइना म्हणून स्नेहलला बोलावले तर तिला रडूच आवरेना.... पाळण्यात झोपवले होते तिला, हा पाळणा त्यांनी गावाहून आणलेला, लाकडी ! त्याच्या एका साईडच्या पट्ट्या निघालेल्या होत्या त्याच जागेतून सुखी झोपीत घसरत आली होती !! तिचे मानेपर्यंतचे शरीर बाहेर आले व मान अडकून पडली व गळ्याला फास लागला
दहाच मिनिटापुर्वी स्नेहल ती उठली का हे बघण्यासाठी बेडरुममधे गेली होती. तेंव्हा सगळे व्यवस्थित होते. डॉ.ना लक्षात आले. त्यांनी लगेच दुसर्या हॉस्पीटलला हलवले. तिकडे तिला वेंटिलेटर वर ठेवले होते. परत तिथून के.इ.एम ला घेऊन जाण्यास सांगितले. तिकडचे डॉ. ४८ तास आम्ही काहीच सांगू शकत नाही असे म्हणतायेत
तिचे हात पाय हलवतेय ती पण शुद्धीवर आली नाहीये.. सुखीचं व्यवस्थित होईल ना हो ? सुखी मला परत मम्मी म्हणेल ना हो ? ह्या स्नेहलच्या प्रश्नांवर काय उत्तर द्यावे हे ही कळत नाहीये .... कितीसा धीर देणार तिला जिथे आमचाच धिर सुटत चाललाय ? मावशीने इथे आल्यावर 'काही होणार नाही तुझ्या सुखाडला 'असं म्हणून तिने बळजबरी ऑफीसला पाठवले. ती खूप स्ट्राँग आहे. पण माझं मन मानत नाही.
तिला हॉस्पीटलला नेताना सगळे आठवून खुप रडू येत होते, मी खाली खेळताना खिडकितून 'काक्का' अशा सारख्या हाका मारायची, सुखे गप्प बस म्हणेपर्यंत, तिलाही माझ्यासोबत बॅडमिंटन खेळायचं असायचं. 'काकाचं पिल्लू कुठाय ? म्हटलं की ती स्वत:च्या छातीवर हात मारायची ... हे सगळं आठवून अजूनच वाईट वाटत होते. पण ते फक्त मनात ठेवून सचिन-स्नेहलला सांभाळणे , धीर देणे हे खूप आवश्यक होते. काल आमची अख्खी सोसायटी हळहळली. लोक संध्याकाळपर्यंत बाहेरच होते. सगळे तिच्यासाठी आपापल्या देवाकडे प्रार्थना करतायेत कालपासून.
सुखीचं सगळं व्यवस्थित होइल ना ? प्लीज लोकहो , तिच्यासाठी प्रार्थना करा.
मला कसे बरे दिसत नाहीत फोटो?
मला कसे बरे दिसत नाहीत फोटो?
आजच पहिल्यांदा हा लेख वाचला
आजच पहिल्यांदा हा लेख वाचला आणि ती बरी असल्याचा प्रतिसाद आधी शोधला
ती बरी आहे हे वाचून खूप बरं बाटलं !
Pages